मागील दुसर्या अध्यायात अर्जुनाच्या भ्रमित मनाला शांत करण्यासाठी श्रीकृष्णांनी अनेक उपाय सूचवले आहेत. ते अनेक उपाय श्रीज्ञानदेवांनी सर्वांना सहज समजतील असे सोप्या रीतीने निरूपित केले आहेत. हा तिसरा अध्याय कर्मप्रेरक आहे. आपण नित्य जे कर्म करतो, ते कर्म अतिशय आवडीने आणि ज्ञानाने पूर्ण केल्यास ते कर्म फक्त कर्मच राहात नाही, तर ती ईश्वराची पूजा होते, असे सविस्तर वर्णन इथे आले आहे.
त्यावेळी युद्ध करणे हे अर्जुनाचे प्रासंगिक आणि आवश्यक कर्म होते. पण त्या युद्धकर्मापासून तो परावृत्त होत होता. कारण त्याचे मन युद्धासाठी खंबीर किंवा दृढ झाले नव्हते. याचाच अर्थ अर्जुनाला अत्यंत उच्च प्रतीच्या आत्मिक विकासाची आवश्यकता होती. अशा त्यावेळी अर्जुनाला ज्ञानाची आवश्यकता आहे, हे श्रीकृष्णांनी जाणले. जसे एखादी गोष्ट समजावून सांगण्यासाठी ती मूळापासून सांगितली पाहिजे, तसे त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान देत देत आत्मज्ञानापर्यंतचे मूळ ज्ञान येथे सांगितले आहे. ज्ञानाचे महत्त्व जाणवल्यावर अर्जुन श्रीकृष्णाला असे म्हणाला,
तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कर्मीं सुतां ॥३॥
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी॥४॥
“हे श्रीहरी, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मला ‘युद्ध कर’ असे का म्हणत आहात? देवा, इथे या महाभयंकर कर्मामध्ये मला घालताना आपल्याला संकोच वाटत नाही का? आपण सर्व कर्मांचा पूर्णपणे निषेध करता, तर माझ्या हातून हे हिंसक कार्य का करवत आहात? "
“अर्जुन मनात विचार करतो, मला ते पवित्र ज्ञान देऊन, श्रीकृष्ण आत्मरूपात विलीन होण्यासाठी का सांगत नाहीत? मला हे युद्ध करणे भयंकर आहे, असे वाटते. आप्तांशी युद्ध करणे हे अतिशय कठीण कर्म आहे. त्यापेक्षा मला ज्ञानच लाभावे, अशी माझी इच्छा आहे.” हे अर्जुनाचे विचार जाणून कर्म आणि ज्ञान यांच्या भ्रमामुळे विचलित झालेल्या अर्जुनाला निश्चित एकच सांगण्याची आवश्यकता आहे, असे श्रीकृष्णांनी ठरवले. आपल्या वाट्याला आलेले कर्म करूनच ज्ञान कसे लाभते, ते या अध्यायात श्रीज्ञानदेवांनी अतिशय सोप्या रीतीने सांगितले आहे. या अध्यायात अर्जुनाची प्रश्न विचारण्याची शैली श्रीज्ञानदेवांनी विशद केली आहे. अर्जुन स्वत:ला श्रीकृष्णाचा एक शिष्य म्हणवतो, तो अतिशय नम्रपणे श्रीकृष्णाला म्हणतो,
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज॥१०॥
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ॥१८॥
‘मी अतिशय मंदबुद्धी आहे. मला काही समजत नाही. मी मोहाने ग्रासलो आहे. कृपया मला विवेकाविषयी स्पष्ट करून सांगा. हे श्रीकृष्णा, मला योग्य प्रकारे समजेल असे सांगा, जे एकनिष्ठ आहे.’
यावरून ज्ञान ग्रहण करताना आपल्या श्रीगुरुबद्दल समर्पण आणि श्रद्धा किती आवश्यक आहे हे समजते. ज्यामुळे सर्वांचे कल्याण होणार आहे, असा मार्ग अर्जुनाला जाणून घ्यायचा आहे. श्रीज्ञानदेवांनी ज्ञान ग्रहण करणारी अर्जुनाची भूमिका अशा पद्धतीने प्रकट केली आहे, की आजच्या यन्त्रयुगात सुद्धा ही भूमिका, सर्व ज्ञान ग्रहण करू इच्छिणार्यांसाठी महत्त्वाची आहे.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
तरीं पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥३१॥
पार्थ म्हणाला, तर मग परलोकात हितकारक आणि आचरण्यासाठी योग्य असे एक मला निश्चित सांगा. अर्जुनाला परलोकात हितकारक असलेला आणि सध्या आचरण्यासाठी योग्य असा एक निश्चित मार्ग हवा होता. त्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांख्ययोग आणि कर्मयोग असे दोन मार्ग सांगितले आहेत. श्रीमद्भगवद्गीतेत प्रतिपादित केलेला सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे आणि योग्यांची निष्ठा असलेला म्हणजे योगीजणांना अत्यंत प्रिय असा कर्मयोग आहे. हे दोन्ही मार्ग एकाच ईश्वराकडे घेऊन जातात, पण हे दोन मार्ग दोन प्रकारच्या साधकांसाठी आहेत. ज्ञान जाणून घेण्याची इच्छा असणार्या आणि ज्ञान जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणार्या व्यक्तीला आपण ज्ञानी असे म्हणावे. ज्ञानाने समृद्ध झालेल्या व्यक्ती आत्मज्ञानाची ओळख होताच आत्म्यात लीन होतात, त्यालाच ज्ञानाने आत्मरूप होणे असे म्हणतात. हाच ज्ञानमार्ग आहे, जो ज्ञानामुळे लवकर साध्य करता येतो. श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥४३॥
पक्ष्याच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानमार्गाचे आचरण करून, ज्ञानी मनुष्य मोक्ष प्राप्त करून घेतात. उडणारे पक्षी जसे फळे लवकर प्राप्त करू शकतात, तसे ज्ञानी मनुष्य ज्ञान लवकर प्राप्त करतात. कारण त्यांना ज्ञानाचे महत्त्व समजलेले असते. पण ज्यांना काही कारणांमुळे ज्ञानाच्या गोष्टी लवकर समजत नाहीत, त्यांच्यासाठी दुसरा कर्ममार्ग आहे, तो केवळ कर्मांने प्राप्त करता येतो. हा कर्ममार्ग अत्यंत सोपा आहे कारण आपण रोज जे कर्म करतो त्या कर्मांत काहीही दोष न ठेवता करावेत, असे त्यात म्हटले आहे. असे कर्म आपले अंत:करण शुद्ध ठेवतात. शुद्ध अंत:करण हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या वाट्याला आलेल्या आणि योग्य रीतीने केलेल्या कर्मांमुळेच ज्ञानाची ओळख होते, हे कधीच विसरू नये. आपण रोज जे कर्म करतो म्हणजे आपल्या वाट्याला जे कर्म येतात ते विहितकर्म आहेत. हेच विहितकर्म कोणताच भेद न करता, प्रामाणिकपणे, आळस न करता व वेळेवर करावेत.
श्रीज्ञानदेव येथे कर्ममार्गाचे महत्त्व सांगतात,
म्हणोनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥५०॥
ज्यांची नैष्कर्म्यपदावर आस्था आहे, त्यांनी सर्व कर्म योग्य प्रकारे करावेत, त्यांचा त्याग करू नये. जे कर्म आपण करतो ते कर्म आपल्यासाठी ईश्वराने दिले आहे आणि ते कर्म ईश्वरासाठी आहे, असे समजून करावे. असे समजल्यामुळे आपण चिंतारहित होतो. थोडक्यात आपले मन शांत होण्यास मदत होते. समोर जो येईल तो ईश्वराचे एक रूप आहे, असे समजल्यास कर्म कठीण न वाटता कर्म करताना उत्साह वाटेल. नेमके हेच आपल्या हातून होत नाही असे वाटते, तेव्हा आपला सर्व भार ईश्वरावर सोपवावा.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥५९॥
कर्मांमध्ये पराधीनता असल्यामुळे ते प्रकृतीच्या गुणांनुसार उत्पन्न होतात. म्हणून ‘मी हे कर्म करेन अथवा हे कर्म करणार नाही’ असे म्हणणे व्यर्थ आहे.
प्रकृतीमध्ये सात्त्विक, राजस आणि तामस या तीन गुणांचा अधिवास आहे. आपण आपले कर्म चांगलेच करतो. तरीपण कधी कधी असा अनुभव येतो, की समोरचा व्यक्ती आपल्या त्या कर्मांना कसे रूप देईल हे आपल्याला समजत नाही. प्रकृतीत होत असलेले कर्म तीन गुणांमुळे
पराधीन होऊन जातात. प्रत्येक मनुष्य आपापल्या गुणांप्रमाणे पाहात असतो. उदा. जेथे आपल्याला वाटते आपण खूप छान कर्म केले आहे, पण त्या कर्मामुळे समोरचा मनुष्य आनंदी होत नाही, इतकेच नव्हे तर त्यात दोष ही दाखवू लागतो. त्यावेळी आपले मन नाराज होते. मग आपल्याला असेही वाटू शकते ते कर्मच वाईट होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, चांगल्या हेतूने केलेले कर्म कधीच वाईट नसतात. समोरच्या व्यक्तीचा पाहाण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो. अशा वेळी योग्य रीतीने पार पाडलेल्या कर्मांपासून आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये, म्हणून ते कर्म ‘कृष्णार्पण किंवा ईश्वराला अर्पण करावेत.’ थोडक्यात त्याच्या परिणामाची चिंता न करता ते केवळ ईश्वरासाठी मी केले आहेत, अशी भावना आपल्या मनात सदैव असू द्यावी. ‘एखादे कर्म मी करेन किंवा मी करणार नाही’ असे म्हणण्याची वेळच आपल्यावर येत नाही. अशा पद्धतीने अर्जुनासाठी जे श्रीकृष्णाने ज्ञान दिले आहे, ते नैसर्गिक ज्ञान असून, समर्पक उदाहरणे देत देत अधिकाधिक सोपे आपल्यासाठी श्रीज्ञानदेवांनी केले आहे.
जन्म आणि मृत्यू परस्वाधीन आहेत, पण ज्याला आयुष्य म्हटले आहे तो मधला काळ आपल्या हातात असतो. हा आयुष्याचा काळ प्रत्येकांना त्यांच्या कर्मांतून नेतो. म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाने आपले सर्व कर्म व्यवस्थित, वेळेवर आणि दोषरहित पार पाडावेत. आपल्याला जे कर्म करायचे आहे आणि जे आपण करू शकतो ते कर्म कोणत्याच कारणाने टाळू नये. प्रामाणिकपणे आणि योग्य रीतीने केलेल्या कर्मांना शुद्ध कर्म म्हणतात. अशा शुद्ध कर्मांची गती जशी जशी वाढत जाईल, तसे तसे आपल्या अंत:करणात ज्ञान वाढत असलेले आपल्याला दिसेल.
श्रीज्ञानदेव कर्माविषयी स्पष्टपणे म्हणतात,
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥७५॥
‘ज्याचे शुद्ध कर्मांमुळे जगामध्ये विशेष वर्णन केले जाते त्याला योगी म्हणतात. म्हणून असा कर्मयोगी होण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.’ मनात नेहमी संयम राखावा. मनाला अंत:करणात स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, मग आपली कर्मेन्द्रिये आपाआपला व्यापार सुखाने करत राहातील.
आकाशातून पडणार्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे अत्यंत सरळ आपले अंत:करण असायला हवे. असे अंत:करण लाभलेले कर्मेन्द्रिय वाईट कर्म करूच शकत नाहीत. ते जे कर्म करतील त्या कर्मांना दिव्यता प्राप्त झालेली असेल. कर्ममार्गाचे अधिक विस्तृत विवेचन करताना श्रीज्ञानदेवांनी पुढील एक उदाहरण दिले आहे. समजा ज्ञान म्हणजे झाडावरील एक स्वादिष्ट फळ आहे. आपल्याला ते हवे आहे तर क्रमाक्रमाने झाडावर चढून, त्याच दिशेने जात, त्रास सहन करत ते फळ प्राप्त करता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे ज्ञानाचे स्वादिष्ट फळ मिळवणे हे आपले उद्दीष्ट असायला हवे. ज्ञानाचे स्वादिष्ट फळ मिळवण्यासाठी जे कष्ट होतील ते सहन करावे लागतात. या कष्टानांच ज्ञान मिळवणे असे म्हणतात. आपले कष्ट जेवढे स्पष्ट, सत्य आणि वेगाने होतील तेवढे ज्ञान लवकर लाभेल. थोडक्यात ज्ञानमार्ग ज्ञानावर श्रद्धा ठेवून ज्ञानानेच साध्य केला जातो. जो दुसरा कर्ममार्ग सांगितला आहे, तो सामान्य माणसांना सुद्धा सहज समजेल एवढा सोपा आहे. कर्म तर प्रत्येकाला रोज करावेच लागतात. हेच कर्म ईश्वराच्या चरणांवर अर्पण केले आहेत, अशी भावना करून करावेत. ‘मी हे करेन, मी हे करणार नाही, हे मला आवडते, हे आवडत नाही’ असे म्हणू नये. जो देह रोज नष्ट होत जातो, त्या नाशिवंत देहाच्या पोषणासाठी अयोग्य मार्ग स्वीकारून आपण कर्म केले आणि त्या देहाच्या अवयवाने त्याचे एखादे कर्मच करणे बंद केले तर काय होईल, याचा विचार करावा. आपल्या दैनंदिन कर्मात देहाचा महत्त्वाचा सहभाग आहे, असे समजून देहाला योग्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करावे. येथे नित्ययज्ञ म्हणजे स्वधर्म आहे हे सांगताना,
श्रीज्ञानदेव म्हणतात,
स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥८१॥
जो स्वधर्म आहे तोच नित्ययज्ञ आहे असे समजावे. म्हणून स्वधर्माचे आचरण करताना कधीच पापाचा संचार होत नाही.
ज्ञानी मनुष्य त्यांच्यावर येणार्या प्रासंगिक कर्मांना सुद्धा श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून देतात. त्या कर्मापासून उत्पन्न होणार्या कोणत्याच फळाची ते अपेक्षा करत नाहीत. उदा. मानसन्मान घेणे, मोठेपणा मिरवणे, अधिक अर्थप्राप्ती करून घेणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रथम स्थानाची अपेक्षा करणे, असे कोणतेच प्रकार त्यांच्या हातून होत नाहीत. त्यांच्या मनात एवढा सेवाभाव असतो की ते प्रत्येक प्राणिमात्रांची सेवा ईश्वराच्या पूजेप्रमाणे करतात. आपल्या विचारांना चुकूनही वाईट विषयांकडे जाऊ देत नाहीत. नित्यकर्म प्रामाणिकपणे करणे हा सुद्धा एक यज्ञाचा प्रकार आहे. आपल्या रोजच्या कर्मांना म्हणजे नित्यकर्मांना आपण यज्ञाचे स्वरूप देऊ शकतो. त्यात स्वत:च्या इच्छा न ठेवता प्रत्येक कर्म ‘स्वाहा’ म्हणजे ईश्वराच्या चरणी अर्पण केले जातात. ज्ञानी मनुष्य स्वत:चे नित्यकर्म असेच करतात. त्यामुळे त्यांचे रोज अंत:करण शुद्ध होत असते. श्रीब्रह्मदेवाचा उपदेश येथे श्रीज्ञानदेव सांगत आहेत,
तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । पुरती काम॥८८॥
तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा॥८९॥
योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥९०॥
तुम्हाला वर्णविशेषानुसार आम्ही हा स्वधर्मच येथे सांगितला आहे. स्वधर्माची उपासना करा, मग आपोआपच तुमच्या कामना पूर्ण होतील. तुम्ही व्रतें, नियम करू नका. शरीराला पीडा देऊ नका. दूर कोठे तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही. योगादिक साधने, काम्यव्रताची आराधना आणि मन्त्रतन्त्रांची विधाने सोडून द्या. सृष्टीच्या आरंभी श्रीब्रह्मदेवाने आपल्या प्रजेला असे सांगितले होते की आपले नित्यकर्म प्रामाणिकपणे करा. हाच तुमच्यासाठी स्वधर्म आहे. व्रत, नियम, तीर्थयात्रा, मन्त्रतन्त्र, काम्यव्रत, योगादि साधने हे काहीही करण्याची आवश्यकता नाही. त्या सर्वांपेक्षा तुम्ही रोज जे कर्म करता, ते अधिक चांगले कसे होतील, ते पाहा.
उदा. एका लहान बाळाच्या आईला एखाद्या नातलगांच्या सोहळ्यात जाणे तितके महत्त्वाचे नाही, जितके तिला तिच्या घरी बाळाला सांभाळणे अधिक महत्त्वाचे आहे. अशा वेळी हेच कार्य तिच्यासाठी सोहळ्याप्रमाणे आहे. एखाद्याला आपल्या घरी असलेल्या आजारी जेष्ठ व्यक्तीला सोडून तीर्थयात्रेची आवश्यकता नाही. कारण तीर्थयात्रेपेक्षा अधिक पुण्य आजारी व्यक्तीच्या सेवेतून मिळेल. असे आपल्याभोवती घडणारे अनेक प्रसंग आपल्या बुद्धीने ठरवून ते चांगले कसे पार पाडता येतील, त्याकडे लक्ष द्यावे. कोणालाही फसवू नये, कोणाचीही उपेक्षा करू नये,
आपले वागणे सर्वांना आनंद देईल असे असावे. कोणामध्येही भेदाभेद न पाहाता सर्वांशी एकसारखे वागावे. खोटे कधीच बोलू नये. सर्व चांगल्या गोष्टी निवडून आचरणात आणाव्यात. इन्द्रियांवर नियन्त्रण ठेवावे. नित्यकर्म तर करावेच पण निमित्यांनी घडणारे कर्मही चांगले करावेत. असे आपले आचरण यज्ञ करण्यापेक्षाही श्रेष्ठ ठरते. अशा प्रकारच्या कर्मांमधून जे उरेल त्याचा उपभोग घेणे, हे सर्व ऐश्वर्याच्या उपभोगांप्रमाणे आहे. विधीप्रमाणे यज्ञ करून जे पुण्य मिळवले जाते, त्यापेक्षा योग्य आचरणातून आणि सर्वांच्या उपयोगी येऊन मिळवलेले पुण्य अधिक श्रेष्ठ आहे.
अन्नाला परब्रह्म असे म्हटले जाते म्हणून आपल्याकडे जेवढे असेल त्यातील इतरांना देऊन ते खावे, त्या अन्नानी सर्वांना संतुष्ट करावे, त्यालाच अन्नाचा यज्ञ म्हणतात. प्रत्येकांमध्ये ईश्वराचे अस्तित्त्व असते असे मान्य केल्यास त्या सर्वांच्या हृदयस्थ ईश्वरासाठी कर्म करावेत. हा एक प्रकारचा कर्मरूपी यज्ञच आहे. यज्ञ वेदांने सांगितलेल्या विधीने प्रकट होतात, तर आपले कर्म चांगल्या आचरणाने प्रकट होतात. चांगल्या कर्मांना यज्ञाची योग्यता लाभते. हे चांगले कर्मच यज्ञ घडवून आणतात. त्यामुळे आपल्या अवतीभोवती असणार्या अनेकांना या आचरणाचा लाभ होईल.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥८०॥
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥८३॥
क्रमाक्रमाने जो स्वत:च्या धर्माचे आचरण करतो, त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते. स्वत:चे कर्म योग्यप्रकारे आचरणात आणणे म्हणजे आपला धर्म सांभाळणे असे आहे. हेच अखंड यज्ञ करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्मानुष्ठान करतो त्याला कधीच बंधन घडत नाही. हा मनुष्यलोक कर्मांनी बांधलेला आहे. जो अशाप्रकारे नित्यकर्म करत नाही, तो या भूतलावर पराधीन होऊन जीवन जगतो, असे समजावे. नित्ययज्ञ म्हणजे स्वत:च्या कर्माचे योग्य आचरण करणे होय. ज्याचे वागणे इतरांना त्रासदायक होते, त्याला काळ शिक्षा करतो. जे व्यक्ती इतरांसाठी त्रासदायक असतात, त्या केवळ पापाची रास आहेत. असे आचरण पृथ्वीला मान्य नाही. ज्या पृथ्वीवर आपण राहातो तिचा नित्ययज्ञ चालू आहे. स्वत: भ्रमणशील असूनही कष्ट करणार्यांना ती दुप्पट लाभ मिळवून देते. म्हणून तिला निष्क्रियता मान्य नाही. स्वत:चे कार्य एकनिष्ठेने पार पाडणारे मनुष्य पृथ्वीला प्रिय आहेत. मानवाच्या शरीर रचनेत ज्ञानेन्द्रिये स्वयंपूर्ण असून त्यांचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा हा उद्देश पृथ्वीला अभिप्रेत आहे. समान असणारी वस्तू समान असणार्या गोष्टीकडे आकर्षिली जाते. त्याप्रमाणे स्वकर्मरत असलेल्या पृथ्वीला स्वकर्मरत मनुष्य प्रिय आहेत. काहीही वाईट न करता स्वस्थ बसणे, हे सुद्धा पृथ्वीच्या सक्रियतेला बाधा आणणारे आहे. त्याचा अर्थ पृथ्वीला सक्रियता प्रिय आहे. थोडक्यात पृथ्वी मानवांना म्हणते, ‘अनंत मिळवण्यासाठी बीजारोपण करा, पण ते चांगल्या विचारांचे, चांगल्या कर्मांचे आणि चांगल्या अनुकरणांचे.’
वर उल्लेखित सर्व चांगल्या गुणांचे आचरण एखाद्या व्यक्तीकडून होत असेल तर ते नैसर्गिक आहे. तो मानवांचा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्या आचरणात अलौकिक असे काही नाही. पण त्याउलट आचरण जेथे दिसेल, तेथे त्या व्यक्तीचे खूप नुकसान आहे. वाईट आचरण करणार्यांमुळे आजूबाजूच्या व्यक्ती विचलित होऊ शकतात. तर चांगल्या व्यक्तींच्या अनुकरणाने भ्रमित व्यक्तींचा भ्रम दूर होतो. सज्जनांच्या सहवासाने वाईट व्यक्तींचे आचरण बदलून चांगले होऊ शकते. प्रकाशाचा एक किरण अंधकार नाहीसा करतो. तसे सत्चरित्रवान व्यक्ती इतरांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणू शकतात. म्हणूनच श्रीज्ञानदेव म्हणतात,
या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥९६॥
ऐसें समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मेंनिरत । वर्ताल बापा ॥१०२॥
या स्वधर्मालाच पूजनीय मानले तर सर्व देवतागण तुमचा योगक्षेम निश्चितपणे चालवतील. अशा रीतीने जर तुम्ही एकनिष्ठपणे स्वधर्मामध्ये राहून आचरण कराल, तर तुम्ही सर्व भोगसंपन्न आणि निरीच्छ व्हाल. समाजात अशाही व्यक्ती दिसून येतात ज्या केवळ स्वत:वरच प्रेम करतात. त्यांना इतरांनी केलेला उपदेश आवडत नाही. ते उपदेश करणार्यांनाच हिणवतात, त्यांना टाकून बोलतात, त्यांची निंदा करतात आणि स्वत:च्या वाईट वागण्याची स्तुती करतात. त्यांचे वागणे चांगले नसते, तरी ‘चांगलेच आहे’ असे सिद्ध करण्याचा निरर्थक प्रयत्न करतात. अशा वेळी त्यांच्या
बोलण्याने भुलून जाऊ नये. असे मनुष्य स्वत:चा घात तर करतातच, त्या सोबत दुसर्यांचा घात करू इच्छितात. त्यांचे आचरण तात्पुरते चांगले दिसते, पण मनातून कपट किंवा ते कारस्थान असते. जे मनुष्य अंतरबाह्य शुद्ध असतात, त्यांना इतरांना दाखवण्याची आवश्यकताच नसते. जसे चांगल्या गोष्टी जाहिरात करून सांगाव्या लागत नाहीत. तसे फुलांच्या सुगंधाप्रमाणे चांगल्या गोष्टी आपोआप पसरतात. वाईट गोष्टींपासून चांगले मनुष्य दूर राहातात हे ही स्वाभाविक आहे. काम, क्रोधादि विषयांची वाढ झाली की राक्षसी प्रवृत्तीत वाढ होते. राक्षसी प्रवृत्तींच्या इच्छा न संपणार्या असतात. त्यांना सर्व सुखसोई मिळाल्या तरी त्या कमीच वाटतात. अधिकाधिक मिळवण्याचा हव्यास ते धरतात. अशा व्यक्तींपासून ज्ञान दुरावते. कारण ही प्रवृत्ती ज्ञानाला जवळ करत नाही तर विषयांचे पोषण करते. अज्ञान कसे असते ते अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती दाखवून देतात.
ज्यांना खरोखर ज्ञान झालेले असते ते काम, क्रोधादि विषयांपासून दूर असतात. काम व क्रोधांना पार करून गेल्यावर ज्ञान दिसते. म्हणून आपल्यातील काम व क्रोध यांचे आवरण आधी दूर करणे महत्त्वाचे ठरते. हे चांगल्या कर्मांनेच शक्य होते. अशाप्रकारे आपल्या नित्यकर्मांनेच ज्ञान प्राप्त होऊ शकते आणि स्वधर्माच्या आचरणातून ज्ञानाची वृद्धी होते, हे दाखवण्यासाठी श्रीज्ञानदेवांनी कर्माचे शुद्ध स्वरूप कसे असावे, हे वरील पद्धतीने स्पष्ट केले आहे. येथे स्वधर्माचा महिमा सांगताना श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥११०॥
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥१११॥
जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें। विसंबों नये ॥११७॥
म्हणोनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढत पुढती । म्हणिपत असे ॥११८॥
स्वधर्मच जर लोपला तर सर्व सुखांचा आश्रय नाहीसा होतो, जसे की दिवा शांत झाल्यावर प्रकाश नाहीसा होतो. जेथे आपले आचरण टाकले जाते, तेथे स्वतंत्रतेला स्थान नसते. हे प्रजाननहो, लक्षपूर्वक ऐका असे ब्रह्मदेव म्हणाले. जलचरांनी जलात राहाण्याचे सोडले तर त्याक्षणी त्यांना मृत्यू येतो. त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग कधीच करू नये. म्हणून तुम्ही सर्वजण आपआपल्या योग्य कर्मांच्या आचरणामध्ये तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. श्रीज्ञानदेवांनी प्रत्येक मनुष्याने स्वधर्माचेच आचरण करावे, असे अत्यंत व्याकुळतेने सांगितले आहे.
म्हणोनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥१२५॥
संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥१३०॥
म्हणूनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥१३९॥
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी । जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥१४०॥
म्हणून स्वधर्माने जे मिळेल त्याचा स्वधर्मासाठीच विनियोग करावा. मग त्यातून जे उरेल, त्याचा आनंदाने उपभोग घ्यावा. आपल्या जवळील सर्व संपत्तीचे प्रकार हे हवनद्रव्य आहेत, असे समजावे. मग ते स्वधर्मरूपी यज्ञाने आदिपुरुषाला अर्पण करावेत. म्हणून अगदी मुळापासून योग्य असलेला हा स्वधर्मरूपी यज्ञ आहे. या लोकात जो स्वधर्माचे आचरण करत नाही, तो उन्मत्त होय. जो मनुष्य कुकर्म करून इन्द्रियांचे केवळ लाड करतो, तो पापांची रास आणि भूमीला भार आहे. स्वधर्माचे आचरण करणे हेच आपले जीवन आहे. जेवढा मनुष्याला श्वसनासाठी प्राणवायू आवश्यक आहे, तेवढाच यशस्वी जीवनासाठी स्वधर्म आवश्यक आहे. नित्य प्रामाणिक आचरणाने स्वधर्माचा पाया मजबूत करणे शक्य होते. स्वधर्माने वागणार्या मनुष्याचे मनोबल अतिशय दृढ बनते. त्याची मनोवृत्ती ज्ञान ग्रहण करण्यासाठी सक्षम होते. ज्ञान म्हणजे अक्षय्य धन आहे हे सर्वांनाच पटणारे आहे. ज्ञानाने मनुष्य हुशार होतो, दृढ होतो आणि योग्य मार्ग निवडू शकतो. आपण जेव्हा आपल्या अवतीभोवती पाहातो, तेव्हा विविध प्रकारे आचरण करणार्या व्यक्ती आपल्याला दिसतात. काही जणांना काही गोष्टी माहीत नसतात, त्याचा अर्थ त्यांच्याजवळ काही गोष्टींचे ज्ञान नसते.
काही सामान्य विचारांच्या व्यक्ती अशा असतात, की त्या ज्ञान जाणून घेण्याची इच्छा करत नाहीत. जे आहे ते ठीक आहे, असे त्यांचे मत असते.
काही व्यक्ती अशाही असतात त्यांना जाणीव करून दिल्यास त्या रागावतात. त्यांचा अहंकार दुखावला जातो.
पण समाजात काही व्यक्ती अशा असतात जे ज्ञान लाभताच आनंदी होतात आणि आपला पूर्वीचा मार्ग चुकीचा होता, हे त्यांना लागलीच समजते. त्या चुका दुरुस्त करून चांगल्या मार्गाचे अनुकरण करतात. अशा अनुकरणप्रिय व्यक्तींसाठी समाजात ज्ञानी व्यक्तींची सदैव गरज
भासते. ज्यांना ज्ञानाने योग्य मार्ग समजला त्या व्यक्ती आपल्या जन्मासोबत इतरांचेही सार्थक करतात. अशा व्यक्तींचे आचरण पुढील पिढीसाठी शिक्षणाचे साधन होते. या पद्धतीने लोकसंस्था टिकवली जाते. उत्तम आचरण कसे असावे, ह्याचा वारसा भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. येथे श्रीज्ञानदेव म्हणतात,
जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥१५४॥
‘जे सज्जनांचे आचरण इतर मनुष्य पाहातात, ते आचरण इतर मनुष्यांसाठी उदाहरण होईल आणि त्यामुळे पुढील वाईट प्रसंग टाळता येतील.’
अशाप्रकारे ज्ञानदेवांनी भावी पिढीला ज्ञान कसे मिळेल त्याची पण काळजी घेतली आहे. ज्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान आहे आणि त्याने ते ज्ञान इतरांना फसवण्यासाठी वापरले तर त्याला खूप मोठा दोष लागतो. अज्ञानी व्यक्ती तर अज्ञानीच असतात. एखाद्या अज्ञानी व्यक्तीने एखादी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हे योग्य आहे. पण सज्ञानी व्यक्तींने एखाद्याला फसवणे त्यासारखे महापाप नाही. ज्ञानी व्यक्तींवर समाजाची एक प्रकारे खूप मोठी जबाबदारी येते. म्हणून ज्ञानी व्यक्तींने इतरांना शुद्ध कर्म आपल्या आचरणातून करून दाखवावेत.
म्हणून ज्ञानदेव म्हणतात,
म्हणोनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥१६८॥
जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां ॥१७०॥
‘येथे जो सर्व ज्ञानाने समर्थ आहे, त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधीच करू नये. ही सर्व लोकसंस्था पुढील पिढीसाठी सर्व प्रकारे रक्षण करावी.’ आपल्याला प्रत्येक सूर्योदयाबरोबर एका नवीन दिवसाचा लाभ होतो. दिवसाचा उगम सर्व प्राणिमात्रांच्या कर्मांना चालना देत येतो. जर निसर्गाचे नियमच कर्म दर्शवतात तर निसर्गावर आधारित मनुष्याने कर्म केलेच पाहिजेत. कर्म म्हणजे काय, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. कर्म म्हणजे पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करावे लागणारे सर्व कार्य आहेत. त्याशिवाय उदरनिर्वाहासाठी कर्म आहेतच. त्या कर्माचे सध्या या कलीयुगात दोन भाग झाले असून एक योग्य कर्म आणि दुसरे अयोग्य कर्म आहेत. योग्य कर्मांचा मार्ग सरळ असतो. सरळ मार्गाने जाणारा कधीच अडखळत नाही. सरळ मार्गावर अपयश क्वचित असते पण यश निश्चितपणे मिळते. अयोग्य कर्मांना सरळपणा नसतो, असे कर्म वाकड्या मार्गाने जातात. सुरुवातीला लवकर यश मिळालेले दिसते पण त्या मार्गात अनेक संकटे, भीती आणि कटकट अधिक असते. वाईट मार्गाने जाणार्यांना यशाची खात्री नसते. त्या मार्गाचा शेवट अर्थातच अत्यंत वाईट होतो.
श्रीज्ञानदेव म्हणतात, जर कर्म करावेच लागतात तर योग्य मार्गाचा स्वीकार करावा.
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवीं विषयाचरण । आत्मघाता ॥२०१||
अगास्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥२१९॥
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥२२०॥
स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जिविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥२२९॥
ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन दिल्यावर पतंगाला निश्चित मृत्यू येतो, त्याप्रमाणे विषयांमध्ये आसक्त असणार्यांचा आत्मघात होतो. आपला स्वधर्म जरी कठीण वाटत असला, तरी स्वधर्मच आचरणात आणणे चांगले आहे. दुसर्या धर्माचे आचरण चांगले दिसत असले तरी सुद्धा आपल्याच धर्माचे आचरण करावे. या स्वधर्माचे आचरण करताना आपले जीवन कामाला आले, तर या लोकात आणि परलोकात आपला धर्मच चांगला आहे.
म्हणून श्रीज्ञानदेवांनी ‘आपले कर्म कठीण वाटत असतील तरीही करावेत, स्वधर्म त्यातून तारून नेतो’ असे वारंवार सांगितले आहे. वाईट मार्गांकडे कौतुकाने सुद्धा जाऊ नये. केवळ स्वत:च्या स्वार्थाचा विचार करणे, देहाचा विचार करणे किंवा जिभेला आवडेल ते पुरवत जाणे, त्यामुळे इन्द्रिय स्वैर सुटतात. योग्य कर्म करणे त्याचा अर्थ स्वधर्माचा त्याग करू नये. स्वधर्माचा त्याग केला की काम व क्रोधादि आपले अवयव पसरवतात. काम व क्रोधादि यांच्यासोबत येणारे सर्व ज्ञानाचे शत्रू त्या व्यक्तीला घेरतात. त्याची विचार करण्याची शक्ती नष्ट होते. म्हणून स्वधर्माचे आचरण करणे कधीच सोडू नये. या मनुष्य जन्मात स्वधर्म हा तारक आहे. जो काम व क्रोधांना आपल्यापासून दूर ठेवतो तो ज्ञान मिळवू शकतो. शुद्ध ज्ञान प्राप्त करायचे असल्यास काम व क्रोधांना ओलांडून जावे लागते.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥२६२॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेले ॥२६३॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळुनि घाली तियें । सर्वथैव॥२६८॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । यापापियांचा ॥२६९॥
‘ज्याप्रमाणे बीज कोंड्यासह उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा काम व क्रोधादि विषयांसह उत्पन्न होते. तसे पाहिले तर ज्ञान शुद्धच आहे, परंतु या काम व क्रोधांनी त्याला आच्छादलेले आहे, म्हणून ते अगाध होऊन राहिले आहे. त्यांचे पहिले आश्रयस्थान इन्द्रिये आहेत, येथेच कर्माची प्रवृत्ती होते. अगोदर सर्व प्रकारे त्या इन्द्रियांचेच निर्दालन करावे. मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धीची मुक्तता होईल. जसे बीज आवरणामध्ये सुरक्षित असतात, तसे शुद्ध ज्ञान सुद्धा संरक्षित असते. मात्र त्याचे संरक्षण काम व क्रोधादि या मालिकेने केले आहे. हे सर्व वाईट दोष दूर केल्यावर शुद्ध ज्ञानाचे दर्शन घडते. या दोषांना केवळ शुद्ध कर्म करूनच नष्ट करावे लागते. म्हणून श्रीज्ञानदेवांनी आपले नित्यकर्म योग्य रीतीने करत राहा, असे म्हटले आहे.
कर्म सर्वांसाठी असतात याचा थोडा सद्यस्थितीसाठी सविस्तर विचार करू या. जे बालक सर्वस्वी आपल्या आईवडीलांवर अवलंबून असतात, अशा लहान बालकांनी आईवडील सांगतील ते ऐकले पाहिजे. तरुण वर्गाने सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास घ्यावा. आपण शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या मार्गाने करावा. जेथे जेथे जे जे चांगले दिसेल ते ते आत्मसात करावे. कधी कधी चांगले निवडताना काही वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. त्या वाईट गोष्टींकडे लक्ष न देता त्यातून फक्त चांगले तेवढे निवडावे. जसे रस्त्याने जाताना आपण अंधाराकडे वळत नाही, तसे वाईट गोष्टींकडे कधीच वळू नये.
मग जीवनाच्या प्रवासात वृद्धत्वाची वाटचाल सुरू होते. अशा वेळी व्यवसायातून किंवा नोकरीच्या कार्यातून निवृत्ती घेण्याची वेळ येते. आपल्या सभोवती अशा अनेक व्यक्ती असतात, की ज्यांची मुले मोठी होऊन घरातील जबाबदारी सांभाळताना दिसतात आणि मुली लग्न होऊन आपआपल्या घरी गेलेल्या असतात. अशा वृद्ध मनुष्यांच्या कामाचा व्याप कमी झालेला असतो. जे पूर्वी खूप कार्य होते ते आता बंद झाल्यामुळे नियोजित असे कार्य राहात नाहीत. पण आपल्याने जेवढे शक्य आहे तेवढे घरकार्याला हातभार लागेल असे कार्य करत राहावे. आतापर्यंत खूप काम केले, घरासाठी खूप हालअपेष्टा सहन केल्या, मुलांना मोठे केले, शिक्षण दिले, सक्षम बनवले, लग्न केले, घर घेतले असे अनेक कार्य केलेले अनेक आईवडील म्हणतात. आपण केलेले कार्य सांगून स्वत: कार्यातून निवृत्त होऊ इच्छितात, थोडक्यात सांगायचे तर आराम करू पाहातात. आपले संपूर्ण आयुष्य कार्य करण्यात घालवले त्या शरीराला आरामाची सवय नसते. तुमच्या कामातील कौशल्य आणि अनुभव हा पुढच्या पिढीसाठी खूप मौल्यवान ठेवा आहे. जर तुम्ही कार्य करणेच बंद केले ते हे ज्ञान पुढे कसे पोहचेल? हा आहे ज्ञानाच्या हस्तांतरणाचा प्रश्न आणि आपला वेळ कसा जाईल, हा प्रश्न पण आपल्या पुढे आहेच. म्हणून जोपर्यंत आपण सक्षम आहोत तोपर्यंत सतत योग्य कर्म करत राहाणे, हा एकच उपाय आहे.
सतत गतिमान असलेल्या या पृथ्वीवर कोणतीच गोष्ट स्थिर नाही. म्हणून कार्य करणे कधीच थांबवू नये. कोणतेही चांगले कार्य सतत करत राहावे. चांगल्या कार्यात शरीराला आणि चांगल्या विचारात मनाला नेहमी प्रवृत्त करावे. आपले शरीर म्हणजे एक कारखाना आहे, ज्यात अनेक घडामोडी नव्याने होत असतात. काहीही न करता स्वस्थ बसून राहिलो तरी शरीराचे कार्य चालतच राहाते, पण अनेक अवयव शिथिल पडतात. नको ते आजाररूपी शत्रू डोके वर काढतात. एका आजाराला थांबवले की दुसरा आजार वर येतो. कदाचित अशी रोगांची मालिकाच मागे येऊ शकते म्हणून कार्य करा, रिकामे राहू नका, जितके जमेल तेवढे कार्य करा आणि ते कार्य ईश्वराच्या चरणी अर्पण करा, म्हणजे मनात यशापयशाचा विचार राहाणार नाही. कोणाबद्दलही राग व द्वेष वाढणार नाहीत आणि त्यापासून उद्भवणारे सुखदु:ख जाणवणार नाहीत. मनात ईश्वरभाव सदैव जागृत ठेवल्यास मनाची स्थिती स्थिर राहाते. राग व द्वेष यांच्यावर विजय मिळवण्यासाठी सतत कार्य करत राहावे, हा ज्ञानप्राप्तीचा एक उपाय आहे.
एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे आहे, की जो आपल्या कर्मांना अगदी स्पष्ट जाणतो, तरी पण तो त्याच कर्मांत चुकतो. समाजात असे म्हटले जाते की वैद्याचा मुलगा असूनही साध्या आजाराने मृत्यूला प्राप्त झाला. येथे तो मनुष्य काही कर्म चांगले करतो तर काही कर्म वाईट ही करतो. अशा वेळी मिश्र कर्मांचा परिणाम ही वाईटच असतो. याचा अर्थ जो एखाद्या चांगल्या कौशल्याने निपुण झाला आहे, ज्याने अतिशय श्रम घेऊन विद्या आत्मसात केली आहे, पण ते कौशल्य किंवा ती विद्या तो जर चांगल्या कार्यासाठी उपयोगात आणत नसेल, तर त्याला महादोषांचा सामना करावा लागतो. त्याला त्या कर्माचे सर्व ज्ञान असूनही तो त्याच कर्मात चुकतो. अर्थात त्याला यश मिळत नाही. म्हणून आपली विद्या किंवा आपले कौशल्य चांगल्या कर्मांसाठी वापरले जाणे आवश्यक आहे. वाईट कर्म करणार्या व्यक्तीच्या हातून, वाईट कर्म स्वाभाविकपणे वाईट गुणांमुळे घडून येतात. याचा परिणाम त्या व्यक्तीने मोठ्यात मोठे यश जरी मिळवले असेल, तरी त्याने केलेल्या वाईट कर्मांमुळे ते नष्ट होते.
पुढील चौथ्या अध्यायात श्रीकृष्णांनी आपली दैवीशक्तीची ओळख अर्जुनाला करून दिली आहे. तसेच अर्जुनाला सांगितलेला ज्ञानयोग अधिकाधिक सोपा करून श्रीज्ञानदेवांनी सांगितला आहे.
-------------------------------------------