श्रीज्ञानेश्वरी कथासार - अध्याय १

Submitted by डॉ. कल्पना देशमुख on 26 July, 2026 - 06:46

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
हे सर्वांमध्ये प्रथम आणि वेदांनी वर्णिलेल्या ओंकारा तुला नमस्कार असो. स्वत:च्या अनुभवानेच जाणून घेण्यास समर्थ अशा आत्मरूपाचा जयजयकार असो.

ज्ञानेश्वरी या ग्रन्थात सुरुवातीच्या ओवीत ज्ञानदेवांनी वेदांनी प्रतिपादित केलेल्या मूळ ॐकाराला नमस्कार केला आहे. वेदवर्णित जो ॐकार आहे त्याचे स्वरूप आत्मरूप आहे. म्हणून आत्मरूपाला नमस्कार आणि त्याचा जयजयकार वरील पहिल्या ओवीत आहे.
आत्मरूप म्हणजे आपले स्वत:चे रूप आहे. हे आपले स्वत:चे रूप आपण जाणून घेऊ शकतो. म्हणून माउलींनी या रूपाला ‘स्वसंवेद्या’ असे म्हटले आहे. स्वसंवेद्य म्हणजे आपण स्वत: आपले रूप समजून घेऊ शकतो, स्वत: त्या रूपाची अनुभूती घेऊ शकतो. तसेच ‘आत्मरूप होणे’ हे ज्ञानेश्वरीतील श्रेष्ठ ध्येय असून पहिल्या ओवीपासून ते शेवटपर्यंत ज्ञानेश्वरीत प्रकट होत आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओळीत ज्ञानदेवांनी ‘आत्मरूपा’ असे म्हटल्यामुळे हे आत्मरूप म्हणजे काय ते आपण आधी सविस्तर पाहू या.
आत्मा हे सर्वव्यापी असलेले एकच तत्त्व आहे. या तत्त्वालाच आपण आत्मा, ब्रह्म, परमात्मा, ईश्वर इत्यादि अनेक नावांनी ओळखतो. ज्या आत्म्यापासून प्रकृती निर्माण झाली, त्या आत्म्याचे अस्तित्त्व प्रकृतीच्या अणुरेणूत, कणाकणात किंवा चराचरात आहे. याचा अर्थ आत्म्याचे अस्तित्त्व आपल्यामध्ये सुद्धा आहे. ते आत्म्याचे अस्तित्त्व आपल्यामध्ये आपण स्वत: शोधून मूळ आत्म्याशी आपण एकरूप होऊ शकतो, त्यालाच ‘आत्मरूप’ होणे असे म्हटले आहे.

ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आत्मरूपाच्या जयजयकारानंतर श्रीगणेशाचा एकेक अवयव जणू साहित्यातील एक एक ग्रन्थ आहे, असे श्रीगणेशाचे सर्वव्यापी वर्णन श्रीज्ञानदेवांनी केले आहे. वेद, स्मृती, अठरा पुराणे, काव्य, नाटक, षड्दर्शने, तर्क, नीतिभेद, वेदांत, बौद्धमते, सत्कारवाद, मीमांसा इत्यादि सर्व साहित्यात श्रीज्ञानदेवांना श्रीगणेशाचे रूप दिसले. या सर्वव्यापी श्रीगणेशाला नमस्कार केल्यावर वाचेचे माधुर्य वाढवणारी देवी शारदा, हिला श्रीज्ञानदेवांनी नमस्कार केला आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचे जन्मक्षेत्र असलेल्या महाभारत या ग्रन्थाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

येथे श्रीज्ञानदेव म्हणतात,
म्हणऊनि महाभारतीं जे नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७॥

महाभारताबद्दल असे म्हटले जाते की जो विषय महाभारतात नाही, तो तिनही लोकात कोठेच नाही. म्हणून तिन्ही लोक श्रीव्यासांचे उष्टे आहेत असे म्हटले जाते. श्रीज्ञानदेवांच्या मते श्रीव्यासविरचित महाभारतरूपी सागरातून ढवळून काढलेले लोणी म्हणजे श्रीमद्भगवद्गीता आहे. या श्रीमद्भगवद्गीतेतील आत्मज्ञान हे अमृत असून ते प्राशन करून अर्जुन महाभारताचा अभिनेता ठरला आहे. हे आत्मज्ञान किंवा मोक्षप्राप्तीचे ज्ञान महाभारताशिवाय कोठेही मिळणार नाही, असे आहे. जसे माळेमध्ये मेरूमणी श्रेष्ठ ठिकाणी असतो किंवा त्याच्या श्रेष्ठत्वामुळे लागलीच दृष्टीपथात येतो, तसे महाभारतात ‘श्रीमद्भगवद्गीता’ आत्मज्ञानामुळे अग्रस्थानी शोभून दिसते. म्हणून महाभारतात श्रीमद्भगवद्गीतेचे स्थान अलौकिक आहे. महाभारताची रचना करताना व्यासांच्या बुद्धीला लाभलेला महाभारताचा सारांश किंवा व्यासांच्या विचारांनी कढवलेले तूप, असे श्रीमद्भगवद्गीतेला म्हटले जाते. महाभारताचा सारांश असलेल्या या ग्रन्थाचे वाचन अतिशय स्थिर अंत:करणाने आणि अत्यंत गंभीरतेने झाल्यास खरा लाभ होऊ शकतो. म्हणून श्रीज्ञानदेवांनी श्रीमद्भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक स्पष्ट करून, त्यात दडलेल्या रहस्यांवर अत्यंत सोप्या मराठी भाषेत निरूपण केले आहे.
सर्व देवतांनी प्रशंसा केलेली श्रीमद्भगवद्गीता आहे. आणि त्यावर आधारित श्रीज्ञानदेवांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वरी हा ग्रन्थ, अर्थ आणि साहित्याच्या बाबतीत अत्यंत मौल्यवान ठरला आहे. म्हणून हा ग्रन्थ अत्यंत हळूवारपणे वाचावा, प्रत्येक ओवी समजून घ्यावी, त्यातील प्रत्येक सिद्धान्त प्रत्यक्ष आपल्या आचरणात आणावेत, त्यातील प्रत्येक शब्द नीट समजावून घेऊन मौन राहून आपल्या अंत:करणाशी संवाद साधावा. अशाच पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्यावा लागतो. थोडक्यात हा ग्रन्थ सर्व इन्द्रियांनी ग्रहण करावा असाच आहे.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥५३॥
जे विरक्तीची अपेक्षा करतात, नेहमी संतांचा अनुभव घेतात आणि सोहंभावसंपन्न असतात, तेच येथे रमतात.
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । तें भीष्मपर्वीं संगती । सांगिजैल ॥५४॥ जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥५५॥

जिला भगवद्गीता म्हणतात, श्रीब्रह्मदेव आणि श्रीशंकरानी तिची प्रशंसा केली आहे आणि जी सनकादिक आदराने श्रवण करतात. जसे शरदऋतूतील चन्द्रकिरणांमध्ये असलेले कोवळे अमृतकण चकोराची पिल्ले अत्यंत आवडीने आणि हळूवारपणे वेचतात.
संपूर्ण मौन राहून म्हणजे आपले अंत:करण पूर्ण भक्तीने भरून घेऊन, त्यात फक्त आणि फक्त श्रीकृष्ण जेव्हा विराजमान होतील, तेव्हाच आपण गीतेचे आकलन करू शकू. यासाठी श्रीज्ञानदेवांनी निसर्गाशी निगडीत किती समर्पक उदाहरण येथे दिले आहे पहा,

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥५९॥ कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥६०॥

जसे भ्रमर कमलदलांना जाणीव होऊ न देता परागकण घेऊन जातात, जसे चन्द्र दिसू लागताच आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देणे आणि ते सौख्य उपभोगणे, हे कमलिनीच जाणते. तसे हा ग्रन्थ श्रवण करण्याची पद्धत आहे.
तरी पण श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ अत्यंत सखोल आहे.
श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण आकलन होणे अशक्य आहे.
याचे कारण श्रीज्ञानदेव येथे सांगत आहेत,
हा वेदार्थसागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥७२॥

गीतेतील तत्त्व प्रत्यक्ष ईश्वरवर्णित आहेत. ज्याच्या श्वासांना वेद असे म्हटले जाते, अशा ईश्वराच्या मुखातून बोललेले ज्ञान म्हणजे श्रीमद्भगवद्गीता आहे.
गीतेवर निरूपण करणे केवळ श्रीगुरुकृपेमुळे शक्य झाले आहे असे श्रीज्ञानदेवांनी म्हटले आहे. ज्ञानेश्वरी या ग्रन्थाचे सर्व श्रेय श्रीज्ञानदेवांनी आपल्या श्रीगुरुच्या चरणी अर्पण केले आहे. हा ग्रन्थ वाचताना असे वाटते की श्रीज्ञानदेवांच्या या उदात्ततेने जणू दुसरी उदात्तता उत्पन्न केली आहे. एक महानतेने दुसर्या महानतेला जन्म दिला आहे. या महान संतांच्या, श्रीगुरु आणि शिष्याच्या अलौकिक कृपाप्रसादामुळे हा शीतल छाया देऊन मन शुद्ध करणारा, भवतारक ग्रन्थ आपल्याला लाभला आहे.
त्यानंतर सर्व संतांची कृपा आपल्यावर असावी, त्यासाठी ते संतांना विनंती करतात. तसेच ज्ञानेश्वरीच्या श्रोत्यांना ग्रन्थाच्या सुरुवातीला म्हटले आहे, की काही कमी अधिक झाले असेल तर मान्य करून घ्या. याचा अर्थ एक शिष्य, एक महान ग्रन्थकार, एक वक्ता किंवा एक संत कसा असावा, याचे एक उत्तम उदाहरण ते आपल्या लिखाणाच्या शैलीतून प्रस्तुत करत आहेत.
प्रस्तुत अध्यायाच्या विषयाला सुरुवात महाभारतातील युद्धाच्या प्रसंगाने होते. येथे श्रीज्ञानदेवांनी युद्धाचे वर्णन केले आहे.

येथे श्रीज्ञानदेव म्हणतात,
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥८६॥

ज्याला धर्मालय म्हणतात तेथे पांडव आणि धृतराष्ट्रपुत्र युद्धाच्या निमित्ताने आले आहेत.
तेव्हा युद्धभूमीला श्रीज्ञानदेवांनी ‘धर्मालय’ असे म्हटले आहे. या नावावरून असे सूचित होते की युद्धाच्या क्षेत्रात सुद्धा न्याय धर्मालाच मिळतो. युद्ध हे कोणत्याही काळात झाले असतील तरी ते फक्त विनाशच दर्शवतात आणि ग्रासणार्या काळाला सुद्धा दया यावी असा हा महाभयंकर प्रसंग म्हणजे युद्धप्रसंग असतो. श्रीमद्भगवद्गीतेत युद्धभूमीवर दुर्योधन द्रोणाचार्यांना जेव्हा प्रतिपक्षातील योद्ध्यांची ओळख करून देतो, तेव्हा त्या प्रसंगाचे वर्णन श्रीज्ञानदेवांनी त्या व्यक्तींच्या वैशिष्ट्यांसह केले आहे. त्या वैशिष्ट्यांमधून दुर्योधनाचा अहंकार स्पष्ट दिसत आहे. स्वत:च्या सैन्यांतील सेनापती, योद्धे आणि राजेमहाराजे यांचे वर्णन करताना त्याची शैली अहंकारयुक्त आणि अभिमान दर्शवणारी आहे, तर पांडवांच्या सैन्यातील योद्ध्यांचे वर्णन करताना त्यांना तो अल्प समजून त्यांची ओळख करून देतो, त्यातूनही त्याचा अहंकारच स्पष्ट दिसत आहे.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥१४०॥

‘ज्या बाजूने प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण अश्ववाहक आहेत, त्या रथाचे वर्णन मी काय करू?’
श्रीज्ञानदेवांनी प्रत्येकाच्या मुखातील संवाद प्रकट केले आहेत. ते वाचून जणू प्रत्यक्ष समोर युद्ध घडत आहे असे वाटते. केवळ युद्धात वाजवले जाणारे शंखध्वनी एवढे भयंकर आहेत की त्या वाद्याच्या भयंकरपणामुळे नैसर्गिक तत्त्वे डळमळीत झाली आहेत, असे श्रीज्ञानदेव आपल्या निरूपणात म्हणतात. उदा. पर्वत हालू लागले, समुद्राचे पाणी उसळले, पृथ्वी दणाणून गेली, दिवसा सूर्य थांबला आणि आकाश उलटू पाहात होते. यावरून हे स्पष्ट दिसते की श्रीज्ञानदेवांना युद्धाचे वर्णन आणि निसर्गाचा प्रकोप यांच्यामध्ये साम्य दिसले. हे तर निश्चितच आहे की युद्ध म्हणजे सर्व प्रकारचे नुकसान आहे. त्याशिवाय निसर्गाला प्रकोपित करणारे हे भयंकर कृत्य सुद्धा आहे.
श्रीज्ञानदेवांच्या निरूपणानुसार या अध्यायात आलेल्या एकूण व्यक्तिरेखा पाहिल्यास असे दिसते, की अविचारी दुर्योधनाला युद्धाची हाव सुटली आहे. तर दुसरीकडे अर्जुन युद्धामुळे होऊ शकणार्या सर्वनाशाचा प्रथम विचार करत आहे. या दोन विसंगत व्यक्तिरेखा पाहिल्यास असा बोध होतो, की युद्धाचे मूळ कारण दुर्योधनाचा अहंकार आहे. एकीकडे दुर्योधन अहंकाराने मदोन्मत्त झालेला दिसत आहे, तर दुसरीकडे अर्जुन अत्याधिक मायेने व्याकूळ झालेला आहे.

राजा धृतराष्ट्र पुत्रांच्या मोहात एवढे खचले आहेत, की त्यामुळे योग्य निर्णय घेणे हे राजाचे मूलभूत कार्य आहे, ते ते करू शकत नाहीत. श्रीव्यासांच्या कृपेने अलौकिक दृष्टी प्राप्त झालेला संजय आपले कार्य चोख बजावत आहे. युद्धातील दोन बाजूपैंकी एक सत्य आणि दुसरी असत्यावर आधारित आहे. अर्थात श्रीकृष्ण सत्याच्या बाजूला पेलून धरत अर्जुनाला मोहापासून दूर नेऊन त्याला त्याचे मूळ स्वरूप त्याला दाखवत आहेत. खर्या भक्तीचं मूर्तीमंत प्रतिबिंब म्हणजे श्रीकृष्ण आज युद्धभूमीत अर्जुना सोबत आहेत.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्तांचें । जें सारथ्य पार्थाचें । करितु असे ॥१४२॥ पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला ।

त्या प्रभूचे आश्चर्य पाहा, जो भक्ताच्या अद्भुत प्रेमासाठी पार्थाचे सारथ्य करत आहेत. आपल्या शिष्याला मागे सुरक्षित ठेवून आपण पुढे उभे राहिले आहेत.
अर्जुन जरी मोहाने ग्रस्त झाला असला तरी त्याची विचार करण्याची क्षमता वास्तविकता जाणणारी आणि सत्याला धरून आहे. त्याला युद्धाऐवजी भिक्षाटन करून जगणे किंवा राज्याचा त्याग करणे मान्य आहे. पण स्वकीयांना आपल्या हाताने मारणे किंवा त्यांच्याशी युद्ध करणे त्याला मान्य नाही. युद्धाचा परिणाम काय होईल किंवा युद्धात कोण जिंकेल त्याबाबत निश्चित माहिती नसतानाही त्याच्या मनात स्वत:ची बाजू सत्य आहे, त्याची त्याला पूर्ण जाणीव आहे. कदाचित त्यामुळे त्याला युद्ध करणे महापाप वाटत असावे. शस्त्राने एखाद्याला मारणे सोपे आहे, पण मायेचे पाश तोडणे अतिशय कठीण आहे.
श्रीज्ञानदेव म्हणतात,
या मायेचे वर्णन करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, ‘माया अतिशय दुर्धर असते, ती एका योद्धयाला सुद्धा आपल्या अंकित करू शकते.’
जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥२०१॥ तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें । तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥२०२॥

जसे भुंगा सहजपणे मोठमोठे लाकूड पोखरून तोडून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्ये मात्र अडकतो. तेथे प्राण जाऊ लागला तरी कमळाचे दल चिरून बाहेर पडावे, हे तो जाणत नाही, त्याप्रमाणे पाहा हा स्नेह स्वाभाविकच कोवळा पण निवारण्यास कठीण आहे.

हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाहि नयेचि आया । म्हणऊनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥२०३॥

ही आदिपुरुषाची माया ब्रह्मदेवाला सुद्धा आकलन होत नाही, म्हणून तिने एका राजपुरुषाला सुद्धा भुलवले.
अर्जुन त्या काळातील जागतिक दर्जाचा महाधनुर्धर होता. वेगवेगळ्या अस्त्र व शस्त्रांचा अभ्यास त्याने केला होता. अन्यायाविरुद्ध तो लढत होता. वारंवार कौरवांकडून गुप्तहल्ले, कटकारस्थान आणि अपमानजनक वागणूक त्यांना मिळाली होती. असे असूनही युद्धभूमीवर लढण्यासाठी तो जेव्हा प्रतिपक्षासमोर म्हणजेच कौरवांसमोर आला, तेव्हा त्याला ते आपले शत्रू वाटले नाहीत. त्याला ते सर्व आपलेच स्वकीय, नातलग, बंधू, गुरु आणि जेष्ठ आहेत असे वाटू लागले. यावरून असे सिद्ध होते की श्रेष्ठ मनुष्यांचे विचार श्रेष्ठच असतात. त्यांचे कोणत्याही प्रसंगी विचार ढासळत नाहीत. युद्धासारखा प्रसंग असो किंवा प्राणावर संकट असो, असे कितीही त्यांच्यावर वाईट प्रसंग आले, तरी त्यातून चांगलेच शोधणे हा सत्याला धरून वागणार्या मनुष्यांचा स्वभावच असतो. हे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य श्रीज्ञानदेवांच्या निरूपणातून आपल्यासमोर येते.

युद्धाच्या ठिकाणी माया उत्पन्न होणे किंवा शत्रूपक्षाला आपले समजणे ही साधारण गोष्ट नाही. त्यातून अर्जुनाच्या स्वभावाचे अनेक उत्कृष्ट पैलू श्रीज्ञानदेवांनी आपल्यासमोर मांडले आहेत. अर्जुनाचे मन शेवटच्या क्षणी सुद्धा युद्ध टाळण्यासाठी आणि युद्धापासून होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत होते. स्वत:चा राजघराण्याशी संबन्ध असूनही एक सामान्य जीवन व्यतीत करण्याचा अर्जुनाचा मानस हा सुद्धा खूप महान त्याग आहे. या महान त्यागामुळे अर्जुनाला प्राप्त झाले, परम परमात्मा श्रीकृष्ण.
सदैव सत्याची बाजू घेणारे एक दैवी व्यक्तिमत्त्व जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला झालेला मायेचा भ्रम दूर करण्यासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्याच्याकडे धावून आले. श्रीकृष्ण म्हणतात, अन्याय हा वाईटच असतो. अन्याय करणारा आप्त आहे का परका आहे हे महत्त्वाचे नाही. एक विशिष्ट मर्यादा सोडून केलेले कृत्य म्हणजे अन्याय होय, अपराध होय. जरी तो आप्त असेल, तरी अशा वेळी अन्यायाचा प्रतिकार करणे हेच आपले कर्तव्य असते, हे श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले आहे. त्या प्रसंगात दडलेले ज्ञान श्रीज्ञानदेवांनी अनेक उदाहरणे देऊन आपल्यासमोर प्रकट केले आहे.
ज्या युद्धभूमीवर युद्धासाठी जमलेल्या त्या सेनासमूहांमध्ये अर्जुनाला मायेने व्यापले होते, त्या मायेचे स्वरूप विलक्षण आहे. माया कधी प्रकट होईल आणि ती कोणाला ग्रासेल हे सांगणे कठीण आहे.

येथे अर्जुन म्हणतो,
ऐसियांतें कैसेनि मारूं । कवणावरी शस्त्र धरूं । निजहृदया करूं । घातु केवीं ॥२२१॥

सर्व माझे आहेत, अशा त्यांना मी मारू तरी कसा? कोणावर शस्त्र चालवू? माझ्याच हृदयाचा घात मी कसा करू?
अर्जुनाच्या मनात माया तर उत्पन्न झाली होती, त्याशिवाय त्याच्या मनात अहंकार उत्पन्न झाला होता. त्याला असे वाटत होते की आपण मारल्यामुळे हे स्वकीय मरणार आहेत. त्याचा ‘अहम्’ भाव जागृत झाला होता. जन्म आणि मृत्यू हे दोन सत्य कोणाच्याच स्वाधीन नसतात. जन्म आणि मृत्यू केवळ ईश्वराच्या स्वाधीन आहेत. असे असतानाही प्रतिपक्षात असणार्या स्वकीयांचा मृत्यू आपल्यामुळे होईल असे अर्जुनाला वाटत होते. हा त्याचा भ्रम आहे हे त्याला सांगणे त्यावेळी आवश्यक होते. ‘केवळ भ्रम दूर करणे सोपे होते पण संपूर्ण मायेचे स्वरूप उलगडून त्याला त्याचे मूळ रूप दाखवणे आणि जन्ममृत्यूचे अंतिम सत्य काय आहे, हे सांगणे हा उद्देश श्रीकृष्णाचा होता,’ असे श्रीज्ञानदेव म्हणतात.
जेव्हा आप्तस्वकीय मत्सराने एकमेकांचा वध करण्यास प्रवृत्त होतात, तेव्हा दोन्ही कुळात कुलक्षय होतो. म्हणून त्या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळामध्ये अधर्म माजतो. येथे योग्य-अयोग्य विचार, कोण कशाचे आचरण करावे ही रीत आणि सर्व विधिनिषेध बंद पडतात.

श्रीज्ञानदेव म्हणतात,
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्य धर्म जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ॥२४८॥ जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा विचरती । म्हणवूनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥२४९॥ उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥२५०॥

कुळात ज्यावेळी कुलक्षय होतो, त्यावेळी पूर्वी असलेला कुलधर्म जातो, मग तेथे पापाशिवाय दुसरे काही राहाते का? जेथे इन्द्रिये आणि मन यांचा निग्रह थांबतो, तेथे इन्द्रिये स्वैर सुटतात. म्हणून कुलीन स्त्रियांकडून व्यभिचार घडतो. उत्तम मनुष्य अधमांमध्ये संचार करतात, अशा रीतीने वर्ण एकमेकांत मिसळतात, तेथे जातीधर्म समूळ नाहीसे होतात.
धर्माचा नाश झाला की अनेक अनिष्ट गोष्टींना चालना मिळते. म्हणून गीतेच्या आरंभापासून शेवटपर्यन्त प्रत्येकांनी आपला धर्म सांभाळावा, याचे पुन्हा पुन्हा वर्णन आले आहे. जसे एका घराला लागलेली आग दुसर्या घरानांही जाळून खाक करते, तसे त्या कुळाच्या सहवासाने जे जे मनुष्य वर्तन करतात, ते सुद्धा त्यांच्यामुळे बाधित होतात. म्हणून आपण आपले शुद्ध आचरण सोडू नये, आपले कर्तव्यकर्म करणे सोडू नये, आपला धर्म सोडू नये, आपण नीती नियमांनी वागतो, ते कधीच सोडू नये.
धनुष्यबाणांचा त्याग करून रथावर अस्वस्थ बसलेल्या अर्जुनाच्या मनाची स्थिती श्रीज्ञानदेवांनी अचूक वर्णन केली आहे. अशा भ्रमित झालेल्या अर्जुनाच्या मनाचे परिवर्तन आणि त्याला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य श्रीकृष्ण कसे घडवून आणतील आणि ते आणखी सहज सोपे करून श्रीज्ञानदेव त्यावर कसे निरूपण करतील, ते पुढील अध्यायांपासून सुरू होईल.
जेथे अर्जुनासारखे न्यायपूर्ण मन आणि दुसर्यांच्या सुखासाठी तळमळ असते, तेथे श्रीकृष्ण नक्कीच असतात हे स्वाभाविक आहे असे श्रीज्ञानदेव म्हणतात.

आजच्या वास्तविकतेला धरून ह्या प्रसंगाचा विचार केल्यास असे दिसून येते, की अर्जुन ही भूमिका आपल्या सारख्या मोहात अडकलेल्या मानवांची आहे. युद्ध हे आपल्यात समाविष्ट असणार्या षड् विकारांविरुद्ध होत आहे, युद्धभूमी हा संसार आहे आणि श्रीकृष्णरूपी परमात्मा संसारातून पार करणारे खरे सूत्रधार आहेत. थोडक्यात या मायारूपी संसारातून यशस्वीपणे तरुन जाण्यासाठी सर्वांना श्रीकृष्ण परमात्म्याची नित्य भक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रीज्ञानेश्वरी कथासार - अध्याय २
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर लेख!
पुढील अध्यायांवरील लेखांची उत्सुकतेने वाट पाहत आहे Happy

लेखाचा आवाका मोठा आहे.
निवांतपणे एकेक वाक्य आतमध्ये मुरवत वाचलं पाहिजे.
पहिला परिच्छेद वाचल्यावरच लक्षात आलंय हे.