मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे

Submitted by तुष्कीनागपुरी on 21 August, 2026 - 06:55

मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे
ती आज म्हणाली.
बोल की आता वेळ आहे मला.
तसं नाही शांतपणे बसून बोलायचं आहे.
संध्याकाळी कॉफी शॉप मधे बोलुया.
बरं म्हणालो मी.
तुमच्याशी रोज बोलणारी,
सतत जिच्याशी बोलणे गप्पा होतच असतात ती;
जेव्हा थोडंसं बोलायचं आहे,
असं म्हणते.
तेव्हा घाबरावं!
ते बोलणं सोपं नसतं.
मी पण घाबरलो.
घाबरतंच कॉफी शॉप मधे पोचलो.
तिचा चेहरा गंभीर.
माझ्या काळजावर पीळ.
काय बोलायचं आहे?
"आमच्या मेडिया कंपनीमधे
माझ्या कानावर रोज बातम्या येत असतात रे.
की आज काय बलात्कार झाला,
आज काय घरगुती मारात कुणी दगावले,
कुणी छेड काढली,
कुणी बसमधे खोडी केली,
नराधम भरलेले आहेत रे सगळी कडे.
सगळं ऐकून असं वाटतं की आपण ,
माणूस नावाच्या श्वापदांनी भरलेल्या;
जंगलात राहतो आहोत.
या श्वापदांना वयाची लाज नसते.
शाळेतल्या मुलापासून सेवानिवृत्त आजोबापर्यंत,
सर्व वयाच्या श्वापदांच्या बातम्या देते मी.
पण तुला गृहितच धरते मी.
तू याच माणसांच्या अश्या बाजूचे प्रतिनिधित्व करतोस
ज्यांना माणूस म्हणणे खरे ठरेल
आपलं जग माणूस नावाच्या श्वापदांनी भरलेय
तसेच माणूस म्हणून जगणाऱ्या,
तुझ्यासारख्या लोकांनी देखील भरलेले आहे.
श्वापदांच्या बातम्या देत असतांना
या दोन गटातली दरी रोज वाढत जातांना बघते मी.
पण तुला गृहितच धरते मी.
वेळोवेळी तू माणूस आहेस म्हणून त्याचा
दोष देखील देते मी तुला;
पण तुझ्याबद्दल हवी तितकी
कृतज्ञता आणि कौतुक बोलून दाखवत नाही मी.
आज मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.
या माणूस श्वापदांच्या जंगलात
तुझे मला कौतुक वाटते
तू माझी काळजी घेतोस
भांडल्यावरही परत येतोस सहन करतोस
विचारपूर्वक मला सांभाळतोस
धीर देतोस त्याचा मला आदर आहे
कौतुक आहे आणि तुला मी शब्दात
हे कधी सांगितलेले नव्हते .
चल कॉफी पिऊया"
.
तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, २० ऑगस्ट २०२६, २०:१०

Group content visibility: 
Use group defaults

खूपच छान...

हेही आवर्जून सांगणे गरजेचे असते खरेतर.....