संकल्पाची ऐशी तैशी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्‍याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ.इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्‍यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्‍याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केलेही असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!! अर्थात, घोडा मैदान जवळच आहे म्हणा, कळेलच लवकर कोण किती दृढनिश्चयी आहे, आणि संकल्पांची घोडी कुठपर्यंत दामटली जाताहेत ते!!

मला विचाराल तर, माझा काहीही संकल्प नाही!! आतापर्यंत संकल्प करण्याचे अन ते डोळ्यांदेखत आणि मनादेखत खितपत पडण्याचे अन पाडण्याचे भरपूर प्रयत्न आणि प्रयोग आपसूकच झालेत. त्यात परत काय आहे, की मुळातला पिंड आहे गोवा, कारवार वगैरे या भागातला, तेह्वा उगाच कटकट, दगदग करायला आवडत नाही! सुशेगात राहण्याला प्रथम पसंती!! त्यात हे असल काय बसत नाही हो!! जेवढ काही जिवाला त्रास न देता, सहजगत्या होऊ शकत तेवढच करायच, हे ब्रीदवाक्य. स्वतःच संकल्प करायचे, स्वतःच त्याची आखणी करायची, व्यवस्थित फूल प्रूफ प्लॅन करायचा, किती कष्टाच, अन वेळखाऊ काम आहे माहित आहे का? अन भरीस भर म्हणून पुन्हा त्याची अंमल बजावणी, ती पण आपणच स्वतः करायची... परत एखाद दिवशी समजा नाहीच जमल, तर पुन्हा आपणच आपली खरडपट्टी काढायची!! आता आहे का?? म्हणजे आपणच आधी सगळ ठरवायच वगैरे, म्हणजे, संपूर्णतः आपण या संकल्पनेचे मालक असतो, नाही का?? पण सरते शेवटी ही संकल्पना, किंवा संकल्पच आपले मालक बनून जातात, अशी काहीशी परिस्थिती!! हे काय बरोबर वाटतय का, सांगा बर! सांगितलेत कोणी नको ते धंदे?? म्हणजे जर आपण ठरवणार असू, की आपल्याला अमूक अमूक, अस, याप्रकारे करायचय बरका आता नव्या वर्षापासून वगैरे, तर एखाद दिवशी ते नाही केल म्हणून काय बिघडणारे का??? पण तस नसत रे सायबा...

संकल्प केलाय, मग तो पार पाडायला हवा, असा काहीतरी अलिखित नियम आहे म्हणे!! म्हणजे, आपली स्वतःची काहीच हरकत नसते एखाद दिवस नेहमीच "संकल्प नामक रुटीन" बदलायला, पण ज्या कोणाला आपल्या संकल्पाची कल्पना असते त्या सर्वांची मात्र असते!! मग आधीच डोक्यावर ते संकल्प नामक ओझ आणि भरीला भर म्हणून सर्वांच्या हरकतीच ओझ!! सरळ साध असणार आयुष्य उगाचच खड्ड्यात घालायच असेल तर खुशाल करा संकल्प!! होऊनच जाऊंदेत मग!!

तर, तुम्हां सार्‍या उत्साही जनांना शुभेच्छा, संकल्प करण्यासाठी, ते अमलांत आणण्यासाठी आणि यदाकदाचित ते मोडलेच, तर फारस वाईट न वाटून घेण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्यांच्या कमेंटस धीरोदात्तपणे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देण्यासाठीही. प्रयत्नांती संकल्पेश्वर म्हणे!!

तेह्वा, चालू देत तुमच संकल्पवाल्यांच. मी तरी आपलं, मस्तपैकी संकल्पविरहीत सुशेगात जगायच म्हणते यावर्षी!!

येणार्‍या नवीन वर्षाच्या तुम्हां सार्‍यांना खूप सार्‍या शुभेच्छा!!

विषय: 
प्रकार: 

पसंत आहे आपल्याला, एकदम. काय उग्गीच संकल्प! कायतरी मोठ्ठा प्रकल्प हातात घेऊन बसल्यासारखं वाटतं. माझ्या एका मैत्रिणीने मुलाचं नाव संकल्प ठेवण्याचा शहाणपणा केला... आता उर्वरीत आयुष्य 'एक संकल्प केलाय तेव्हढा पुरे' ह्याच्यावर घालवतायत नवरा बायको..... एकदम हुश्शार माणसं.... गोव्याकडलीच आहे ती सुद्धा Happy

मस्तच लिहिलयस, आवडलं.

हो ग.

अगदी 'सुशेगाद सुशेगाद' जगायच उद्या पासून.

बाकी 'संकल्प' वगैरे जी भानगड आहे ती 'फाल्गूनी पाठक' वगैरे भगीनी साम्भाळताहेत की इमाने-इतबारे दरवर्षी.

>>>स्वतःच संकल्प करायचे, स्वतःच त्याची आखणी करायची, व्यवस्थित फूल प्रूफ प्लॅन करायचा, किती कष्टाच, अन वेळखाऊ काम आहे माहित आहे का? अन भरीस भर म्हणून पुन्हा त्याची अंमल बजावणी, ती पण आपणच स्वतः करायची... परत एखाद दिवशी समजा नाहीच जमल, तर पुन्हा आपणच आपली खरडपट्टी काढायची!! आता आहे का??

खरय खरय शैलु किती उदात्त विचार आहेत तुझे :)))) मलाही चांगलेच पटले ग.
एकाद्या विषयाकडे चहु अंगाने कसं बघाव हे तुझ्याकडुन शिकण्यासारखे आहे:)

तर मग मी पण सुशेगाद रहायचा किमान संकल्प करु म्हणतेयः)))
तुलाही नवीन वर्षाच्या खूप खूप सार्‍या शुभेच्छा!!!!!

मस्तच लिहीलेय.
सुशेगात हा शब्द अगदी कामाचा आहे हं आपल्यासारख्यांसाठी. Happy
तुझा संकल्प पूर्ण होवो आणि नवे वर्ष सुखाचे जावो ही सदिच्छा. Happy

दाद, हसू आल संकल्पकर्त्यांच! Happy धन्यवाद अभिप्रायाबद्दल. नीलू, केदार, संघमित्रा आभार तुमचे. नीलू, हो , हो, तू पण कर असाच संकल्प Happy

आवडलं, आणि पटलं आपल्याला.
पण सुशेगादपणा गोव्यात जसा खुलतो ना तसा आणखी कुठे नाही खुलत!

पटलं बघ. दाद Happy

मला कालच ऑफीस मधे हाच प्रश्न विचारला होत, नवीन वर्षाचा काय संकल्प,
अस्मादिक : काहीच नाही !!! Happy

शेवटी तो तरी केलेलाच दिसतोय.. किंवा सुशेगाद (आरामात) राहण्याचा संकल्प करता येईल....

'परदेसाई' विनय देसाई

हेम्स, चिन्नु, संदीप, विनय आभार तुम्हां सार्‍यांचे Happy