बिनकामाचे सेलेब्रिटी पाहुणे

Submitted by Madan Hunkare on 9 August, 2026 - 10:53

तुम्हाला असे काही पाहुणे माहिती आहेत का जे घरी आले कि सगळ्या सोहळ्याचा ताबा घेतात.
सगळे जमलेले नातेवाईक, पै पाहुणे त्यांच्या पुढे पुढे करतात. ते सेलेब्रिटी असतात. प्रत्येक जण आपल्या लेकरांना या पाहुण्यांना विविध कलादर्शन करायला सांगतो. त्यांनी शाबासकी दिली कि मूठभर मांस चढते.

हे जरा वरच्या वर्तुळात ऊठबस असलेले असतात. पण ते कधीही आपल्या उपयोगी पडत नाहीत. कधीच आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा नोकरी व्यवसायासंबंधी करीयर मधे मदत करत नाहीत. पण नको त्या लोकांच्या उपयोगी पडतात.

त्यांच्या अशा उपद्वापाबद्दल पाठीमागे चर्चा होते पण ते समोर आले कि लगेचच त्यांची हांजी हांजी सुरू होते. ते मदत न करण्याचे गोड बहाणे गोड शब्दात सांगतात आणि आपण पण लगेच "नाही हो, हे चालतंच, आम्हाला नाही काही वाटलं. शेवटी तुमच्या पण अडचणी असतात ना" अशी भूमिका घेतो. आपण किंवा पाठीमागे त्यांच्याबद्दल तक्रारी असणारे नातेवाईक. आणि मग बाकीचे टोमण्या नजरेने एकमेकांकडे बघतात.

तुमच्या राशीला असे नातेवाईक आले असतील तर तुम्ही पुण्यवान आहात. नसेल तर मागच्या जन्माच्या कर्माचे फळ समजा.

तुम्ही पुण्यवान आहात का? मग येऊ द्या अशा सेलेब्रिटी नातेवाईकांचे किस्से.
(या आधी जर मी किंवा कुणी असा धागा काढला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. नव्याने सुरूवात करा.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे माझे एक काल्पनिक पत्र:
=====

ती. श्रीमती चुलत मावशी,

शि. सा.न.वि. वि.

पत्रावर तारीख न लिहिण्याचे कारण हे आहे की हे पत्र कधीही कालबाह्य ठरू नये. सुरुवात श्री ने न करण्याचे कारण हे की तुम्ही व तुमचे कुटुंब व शुभगोष्टी ह्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही.

निव्वळ नातवंडांना सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून सुमारे बारा चौदा अत्यंत त्रासदायक कुटुंबीय घेऊन दर वर्षी आमच्या घरी पंधरा एक दिवस येऊन ठाण मांडण्याची तुम्ही पाळलेली प्राचीन परंपरा ह्यावर्षी खंडित होत आहे.

तुमच्या परिसरातील उंदीर जरी ह्या भागात आढळला तर तो मारला जाईल.

आमचे घर म्हणजे धर्मशाळा नव्हे.

येताना तुम्ही जे कसलेतरी एक लोणचे आणता ते गेली कित्येक वर्षे येथे विकत मिळते. मुळात आम्हाला ते नकोच असते. ते आम्हाला हवे असेल असे गृहीत धरून तुम्ही येथे जो तंबू ठोकता तो ह्या वर्षीपासून उधळण्यात येत आहे. वय वर्षे दोन ते अठ्याहत्तर ह्या वाट्टेल त्या रेंजमधील पूर्णपणे निरुपयोगी व उपद्रवी असलेली माणसे आमच्या घरात पंधरा दिवस काय, पंधरा क्षणही टिकणार नाहीत. हाताला लागेल त्या वस्तूने फोडून काढली जातील. त्या किंकाळ्या ऐकून आमची गल्ली हादरेल. पारले बिस्किटांच्या दोन मोठ्या डब्यांचा गेल्या वर्षी तुमच्या त्या छोटू नामक द्वाड प्रौढाने फन्ना उडवला होता. कित्येक कप व ग्लास तुमच्या पिलावळीने भातुकली खेळताना फोडले आहेत. आमच्याकडे हल्ली सगळेजण निर्जळी उपवास करतात. घरात खायला दाणा नाही. दोन अगडबंब कुत्री पाळली आहेत. त्यांना तर आम्हीसुद्धा घाबरतो. तुमची काय बिशाद! चाळीत नवीन नियम झाला आहे. कोणाकडे पाहुणे आल्यास त्या पाहुण्यांच्या अंगावर येताजाता पाणी ओतायचे.

येऊ नका!

माय मरो मावशी जगो म्हणतात त्यांना आम्ही कोलतो.

कळावे...

आपला विश्वासू भाचा

-------------- अन्यत्र पूर्वप्रकाशित माझा लेख ------------------
Families are like fudge, mostly sweet with a few nuts.

या वाक्याचा अनुभव सर्वांनाच येतो. नातेवाईकांबरोबर जेवणावळी उठवताना, सणसमारंभ साजरे करताना, कधी त्यांच्या सुख-दुःखात रक्ताच्या नात्याने हक्काचे साथीदार बनताना आपण कधी आणि कसे गुंतत जातो ते आपल्यालाही कळत नाही. बहुतेकदा या गुंतवणुकीचा त्रासच होत होतो पण जर त्रयस्थ दृष्टीने पाहिलं तर नानाविध मानवी स्वभाव दिसून येतात. अलिप्तपणाने बघताना अनेक गमतीजमती सापडून जातात. त्यांपैकी काही :
**
एकदा एका लग्नात माझ्या नणंदेच्या सासूबाईंच्या नणंदेची थोरली बहीण उपस्थित होती. या आजी ९० वर्षांच्यातरी असतील, ऐकायला कमी येई. वयाच्या मानाने त्या बर्‍यापैकी लवलवाट करत होत्या. त्यात ज्येष्ठत्वाचा मान असल्यामुळे जिकडेतिकडे त्यांचं मानपान होतही होतं. नवर्‍याचा एक मित्र आणि नवरा ही सर्व लगबग पहात होते. त्या जवळच होत्या तरी या वात्रट मित्राने, नवर्‍याला विचारलं "आज्जीबाई धामधुमीत दिसतायत. त्या कधी टोटल होणार याची वाट पहातायत बहुतेक सगळे. आता पुरे की म्हणावं." नेमकं हे कसं माहीत नाही आज्जींना ऐकू गेलं आणि त्यांनी नवर्‍याला जोराने विचरलं "काय रे, काय म्हणतायत तुझे मित्र? टोटल म्हणजे रे काय?"
.
बाप रे! बाका प्रसंग होता तरी सावरून घेत तो म्हणाला "अगं, म्हणजे जेवणार कधी? तुम्ही जेवणार कधी ते विचारतोय तो." यावर आजीबाई उवाच - "माझं म्हातारीचं काय रे! आधी वधु-वर टोटल होतील, मग वरपक्ष-वधुपक्षाकडचे टोटल होतील, नंतर विहीणी-वरमाईची टोटल व्हायची बारी आणि सगळ्यांचं झालं की मग मी टोटल." तिथल्या सर्वांची हसता हसता पुरेवाट झाली पण कोणाला उघड हसताही येईना. शेवटी आज्जीबाई काही कामानिमित्त तिथून निघून गेल्यावर मग जो काही हास्याचा कल्लोळ झाला त्याला तोडच नाही.
**
असेच माझ्या सासूबाईंचे धाकटे बंधू. कित्येक पावसाळे पाहूनही, 'धाकटेपणाची', लक्ष वेधून घेण्याची हौस काही पूर्ण होत नसे. प्रत्येक लग्नात मानपानासाठी अडून बसणारे. मग आपण वरपक्षाकडचे असो की वधूपक्षाकडचे, हे नेमके ओवाळण्याच्या, भेटवस्तू देण्याच्या वेळेला अळम्‌टळम्‌ करणार, खुर्चीच नाही सोडणार, जागेवरून ढिम्म हलणारच नाहीत! जोवर त्यांच्या मनासारखं घडत नाही तोवर बसल्या जागी 'सत्याग्रह'. खरं तर 'पेन इन द नेक', पण करणार काय? समारंभात विघ्न नको, अतृप्ती नको म्हणून सगळेजण कलाकलाने घेत. पण यांच्या मुलीच्या लग्नात काय मज्जा मज्जा झाली हे सांगायलाच हवं का? इतकी रुसवा-फुगवी झाली, इतक्या मनधरण्या झाल्या की नंतर पुन्हा हे मामा रुसल्याचं कोणी पाहिलं नाही.
**
आमची एक दूरची आत्या. म्हणजे आहे, खरीच सुंदर आहे; पण आल्यागेल्या, पाहुण्यारावळ्यांना कितीदा आपले आल्बम्स दाखवायचे त्याला काही लिमिट? म्हणजे मी पूर्वी अशी होते अन तशी होते, सुंदर होते आणि कॉलेजमध्ये माझ्यावर विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण कसे लट्टू होत. तिला कॉलेजात असतानाच मॉडेलिंगची ऑफर कशी आली आणि मग तिने ती कश्शी उडवून लावली, पण आता त्याचा कसा पश्चात्ताप होतो हे आख्यान तर आम्हां मुलांचं घोकून पाठ झालेलं होतं.
**
आणखी एक म्हणजे आमचा मामा आणि आई. या दोघांतली 'सिबलिंग रायव्हलरी' संपण्याची अजिबात शक्यता नाही. एकाने पूर्व दिशा म्हटली की हटकून दुसरी पश्चिमेकडे निघणार. आई एम.ए. करत होती त्याकाळची गोष्ट. मी मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे रहायला गेलेले होते. मामीची बहीण आणि तिची दोन मुलंही होती; माझी मामेभावंडंही होती. खूप धुडगूस घालायचो आम्ही. भरपूर हुंदडून, बालनाटकं वगैरे पाहून (टिळकस्मारकला बालनाट्यं लागत त्या काळी), रात्री भुताखेतांच्या गप्पा ऐकत वेळ एकदम खास जात असे. एकदा रात्री मी अशीच झोपेची आराधना करत होते आणि बाहेरच्या खोलीत मोठ्या माणसांच्या - मामी, तिची बहीण, मामा - यांच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा माझ्या तिखट कानांनी मामाचे एक वाक्य बरोबर ऐकलं. "रजीला काही नाही, मिरवायची हौस फार. म्हणून एम.ए. करतेय झालं. मुलां-संसाराकडे लक्ष द्यायचं सोडून लष्करच्या भाकर्‍या भाजायचे धंदे आहेत हे." मी तेव्हा सातवीत होते. लगेच दुसर्‍या दिवशी इमानेतबारे, आईच्या कानावर ते वाक्य घातले, मग जी खडाजंगी झाली म्हणता! भावा-बहिणीचं भांडण मस्त पेटलं.
**
आपल्याला जसे तापदायक नातेवाईक असतात तसे आपणही कोणाचे तरी 'तापदायक' नातेवाईक असतोच की. आणि शेवटी आपले सगळ्यांचेच पाय मातीचे. हेवेदावे, मत्सर राग-लोभ हे कोणालाच चुकले नाहीयेत. हां, आता 'फज'मधले शेंगदाणे मजा लुटत खायचे की तोंड वाकडं करून ते आपले आपण ठरवायचं. माझं तरी हेच मत आहे की हे शेंगदाणे-काजू-बदाम कुडुम-कुडुम चावत, फज खाण्याची मजा काही औरच.

>> मग येऊ द्या अशा सेलेब्रिटी नातेवाईकांचे किस्से.<<
धाग्याशी डायरेक्ट संबंधित नाहि, पण सेलब्रिटिंशी जवळीक करण्याची संधी ममव सोडत नाहित याची कित्येक उदाहरणं डोळ्यासमोर आहेत..

वर्षभरात इथे कोणिना-कोणी सेलब्रिटी येतंच असतात. सध्या चालू असलेलं बीएमएम्चं अधिवेशन हे एक उदाहरण. ३०-३५ वर्षांपुर्वि त्यांचा मुक्काम एखाद्या उत्साहि स्वयंसेवकाच्या घरी होत असे, सध्या सेलब्रिटींचा भाव आणि आयोजकांचं बजेट वाढलेलं असल्याने त्यांची सोय हॉटेलात होते. तर ३०-३५ वर्षांपुर्वि, सेलब्रिटी आपल्या घरात उतरले हा होस्टकरता एक मोठ्ठा ब्रॅगिंग राइट असायचा. बर्‍याचदा होस्ट आपलं जीवन सार्थक झाल्यागत त्याची जाहिरात पुर्वि कुठेहि भेटल्यावर, नंतर सोमिवर टॅग करुन पीळ आणायचे. मग त्यात सेलब्रिटीच्या डाउन-टु-अर्थ नेचर पासुन ते नखर्‍यां पर्यंत सगळ्या किश्यांचा समावेश असायचा. हल्ली एखादा सेलब्रिटी स्वखुशीने स्वयंसेवकाच्या घरी रहायला तयार होतो का याची क्ल्पना नाहि, पण कोण जाणे एखादा नारायण मुर्ती असु शकतो जो कंपनी कामाकरता इथे आला तरी एंप्लॉयीच्या घरी उतरणं पसंद करायचा... Wink

तुम्हाला असे काही पाहुणे माहिती आहेत का जे घरी आले कि सगळ्या सोहळ्याचा ताबा घेतात.
सगळे जमलेले नातेवाईक, पै पाहुणे त्यांच्या पुढे पुढे करतात. >>

@मदन सर,
इथे मायबोली कुटुंबातच असे काही सेलिब्रिटी नातेवाईक आहेत. उघडा डोळे बघा नीट. Wink

असं म्हणतात

Every family has one weird relative. If you don't know who it is, then it's probably you.

मी एकंदरीत काका अन् मामा दोन्ही कुटुंबांत weird नातलग निर्दालक म्हणूनच नामी! माझे काही सल्ले खूप रॅडिकल असतात.

उदा : १८ ची झाली की पोरांच्या बुडावर लाथ घालून त्यांना घराबाहेर काढा, जग बघू द्या इत्यादी.

आमच्या घरी आमचे एक मामा आहेत सगळ्यात छोटे पण करारी इत्यादी इत्यादी आहेत आताशा साठ टच करतायत पण ७५० कोटीचा व्यवसाय उभा केला आहे स्वतःचा यंत्रसामुग्री पुरवठादार आणि निर्यातक म्हणून.

आमची मामाच्या साईडची जवळपास सगळी पोरे नोकरी करतात, सुटली का ह्या मामांच्या पाया पडून त्यांच्याच व्यवसायात व्यवस्थापक, इंजिनीयर, मार्केटिंग असली कामे करतात पगारदार कर्मचारी म्हणून. एकटा मी आहे अख्या १८ भावंडांत ज्याने एकदाही मामांचे पाय धरलेले नाहीत. ना शिक्षणासाठी ना नोकरीसाठी. करण माझे तत्व आहे
न कुठल्या भावकीची नाही
जातीची नाही
नात्याची नाही
कोणीच म्हणणार नाही
का मी ह्याला दहा पाच दिलेत अन् ह्याला मोठं केलंय
जे आहे स्वतःच्या दमावर
दिवस वाईट होते
आज चांगले आहेत
उद्या परत वाईट येतील
वाईट आले किडनी विकू पण
रुबाब तोच राहणार !

ह्याचा त्या मामांना कोण राग. बरं त्याचं मीठ खाल्लं म्हणाल्यावर कुठलेच भावंड काही बोलणार नाही त्यांच्यापुढे, मावश्या मामे पण सगळे गप ह्यांनी पोरे पोटापाण्याला लावले म्हणून.

एकदा मला नडले हे असे नसते ते तसे नसते करत (माझ्या नोकरीच्या संदर्भात) मी सरळ म्हणले.

जाऊ दे ना मामा, तू लोड घेऊ नको उद्या रस्त्यावर आलो तरी तुझ्या उंबरठ्यावर भाकरी तुकडा मागायला उभारणार नाही त्यामुळे तू चिंता करू नकोस.

माझे आईवडील खुप टूकीने राहिले, वडील एका खासगी पतसंस्थेत अकाऊंटंट होते व सोबत घरची २.५ एकर शेती होती, आई शेवया पापड लोणची लहान मुलांचे कपडे कुरडया इत्यादी करत असे, ताईला आमच्या शिकवले त्यांनी लग्न करू दिले, ते पण ताई स्वतंत्र झाल्यावर आर्थिकदृष्ट्या. मला शिकवले graduate होईपर्यंत पुढे अक्षरशः साबण विकत सर्विस मधून स्पॉन्सर्ड MBA करून पुढे आलोय.

सेल्फ मेड माज अशा लोकांना दाखवायलाच हवा असे माझे स्पष्ट मत आहे.

छान विषय
अशी माणसे सगळीकडे असतात आणि त्यांचे वागणे साहजिकच पटत नाही.
पण मी त्यांचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा इग्नोर करतो. कारण मला माझेच आयुष्य जगायला वेळ पुरत नाही. त्यामुळे इथे लिहिण्यासारखे काही नाही.

मस्त आहे! धाग्या च्या मथळ्या मधे काहीतरी अनुभव लिहिले असते तर मजेशिर झाले असते.
सामो & वांड तुमचे अनुभव छान आहेत Happy

आमच्यात पण १ काका (मावशीचे पती) आहेत त्यांना कायम ताठा असतो, अख्खा गाव वाखाणुन मेजवानी खात असतो पण ह्यांना पथ्थ्याचं/ वेगळं काहीतरी हवं. मग त्यांच्या ताला नुसार लोकांनी झुलायचं!
बायकोच्या माहेरच्यांनी येताना खाली हाती यायचे नाही..वगैरे वगैरे..