भस्मबीज - भाग ८

Submitted by नितनवे on 28 July, 2026 - 12:00

भस्मबीज – भाग ७
पूर्वभाग
चंद्रिकेच्या हत्येचा सूड उगवताना मल्ली दोन आरोपींना ठार मारतो, पण तिसऱ्या आरोपीवर हल्ला करताना तो पकडला जातो आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार करून त्याला यानाच्या जंगलात टाकून दिलं जातं. तिथे कल्लेश्वर बाबा त्याला वाचवतो आणि भस्मबीजाच्या निषिद्ध विधीचं आमिष दाखवत चंद्रिकेला पुन्हा जिवंत करण्याचं खोटं स्वप्न दाखवतो. सूड, दुःख आणि आशेच्या आहारी गेलेला मल्ली त्या विधीचा साधक बनतो, ज्यातून भस्मबीज हळूहळू जागृत होऊ लागतं. देवप्पा अभिजितला सांगतो की भस्मबीजाचा कायमचा नाश अशक्य आहे; ते रोखण्यासाठी त्याने स्वतःचं कुळ, कुलदेवता आणि गुप्त कवच शोधून आवश्यक कुलाचार पूर्ण करणे गरजेचं आहे.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग ८ - नवं सावट
रविवारी सकाळी नाश्ता आटोपून बॅगा भरत असताना अभिजितची नजर हॉलमधल्या टेबलावर गेली. टेबलावर काही जुनी, पिवळी पडलेली कागदपत्रं व्यवस्थित रचून ठेवलेली होती.

त्याने सहज एक कागद उचलून बघितला. त्यावरची लिपी त्याला ओळखीची वाटेना. ना ती कन्नड होती, ना देवनागरी. वेगळीच, वळणदार, जुन्या पद्धतीची अक्षरं, एकमेकांत गुंफलेली.

"आजी," त्याने आश्चर्याने विचारलं, हातातला कागद तिच्यासमोर धरत, "हे कसले कागदपत्र आहेत? आणि कुठल्या भाषेत लिहिलेत?"
आजी नुकतीच स्वयंपाकघरातून बाहेर आली होती, हातात चहाचा ट्रे घेऊन. तिने ट्रे टेबलावर ठेवला आणि अभिजितच्या हातातल्या कागदाकडे बघत हसली.

"अरे ही मोडी लिपी आहे. जुनी जमीन-महसुलाची कागदपत्रं आहेत ही, एका शेजारच्या कुटुंबाची, त्यांनी मला सांगितलंय लिप्यंतर करून द्यायला. वडिलोपार्जित जमिनीच्या वादासाठी हवाय म्हणे त्यांना."

अभिजित त्या कागदाकडे, मग आजीकडे बघत राहिला, त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि आश्चर्य दोन्ही स्पष्ट दिसत होतं.

"तुम्हाला मोडी लिपी येते?" त्याने विचारलं, आवाजात खरीखुरी दाद.

आजी खुर्चीत बसत हसली, "माझ्या वडिलांनी शिकवली मला, लहानपणी. ते गावचे कुलकर्णी असल्यामुळे जमीन-महसुलाची कागदपत्रं आणि हिशेबवह्या मोडीतच लिहायचे-वाचायचे. मला लहानपणापासून त्यांच्या शेजारी बसून बघायची सवय होती, आणि हळूहळू ते मलाही शिकवत गेले.
आजही गावातले लोक, आजूबाजूच्या तालुक्यातलेही, जुनी कागदपत्रं घेऊन येतात कधीकधी. जमिनीचे दस्त, जुन्या खरेदीखत, वंशावळीच्या नोंदी. कुणाला जुन्या पत्रव्यवहारातून काही शोधायचं असतं, कुणाला कोर्ट-कचेरीसाठी जुना पुरावा हवा असतो. मी निवांतच असते घरी, त्यामुळे मदत करते जमेल तेवढी." ती खांदे उडवत हसली.
************************************************************************************************************************
नेहा आणि अभिजित आजीचा निरोप घेऊन बॅगा गाडीत भरत असताना अभिजितचा फोन वाजला. अनोळखी नंबर, पण कर्नाटकचा कोड बघून त्याने लगेच ओळखलं.

"देवप्पा?"

"हो, मीच." पलीकडून आवाज तुटक, अधूनमधून खरखरता येत होता. "भेटून जा जाता जाता , अभिजित. फार महत्वाचं सांगायचं आहे, आणि येताना नेहाला गाडीतच बसु दे ."

अभिजित एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला, नेहाला ऐकू जाऊ नये म्हणून आवाज खाली करत. "काय झालं? आता तुमच्याकडे आलो तर मुंबईला पोहोचायला उशीर होईल रात्री"

फोनवर थोडा वेळ शांतता होती, देवप्पा फोनवर सांगू कि नको याचा विचार करत होता बहुधा.

"काल तुला जे सांगितलं, त्याची जर कल्लेश्वर बाबापर्यंत बातमी पोहोचली तर तो शांत बसणार नाही. त्याच्याकडे अघोरी शक्ती आहेत, आणि जर त्याला वाटलं की त्याचं गुपित उघड होतंय, तर तो तुझ्यासाठी, आणि तुझ्या माणसांसाठीही संकट निर्माण करू शकतो."

अभिजितच्या पोटात भीतीने गोळा आला , "काल हे तुम्ही का नाही सांगितलं?"

"नेहा समोर होती म्हणून उगीच घाबरवायचं नव्हतं तिला. डोळे उघडे ठेव. काहीही विचित्र वाटलं, तरी लगेच फोन कर. आणि हो, इथे नेटवर्कचा नेहमी घोळ असतो, कधी फोन नाही लागला तर मेसेज पाठवत जा. लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस."

फोन कट झाला. नेहा दुरूनच त्याच्याकडे बघत होती, बॅग खांद्यावर अडकवत. "कोणाचा फोन होता?"

"देवप्पांचा. प्रवासाबद्दल विचारत होते," अभिजित चेहऱ्यावर काळजी लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
************************************************************************************************************************
गाडी खंबाटकीच्या घाटातून बाहेर पडून महामार्गावर आली, तेव्हा संध्याकाळचा शेवटचा सोनेरी उजेड हळूहळू विरत होता. काही क्षणांपूर्वी डोंगरांवर पसरलेलं प्रकाशाचं आच्छादन आता काळसर सावल्यांनी गिळून टाकलं होतं. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इंजिनचा एकसुरी आवाज आणि टायरखालून सरकणारा डांबरी रस्ता एवढंच दोघांच्या शांततेला साथ देत होतं.

सातारा ओलांडल्यानंतर नेहानेच अभिजीतला सांगून गाडी चालवायला घेतली होती. काल दिवसभरात ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीचा भार तिच्या मनावर होता. अभिजित खिडकीबाहेर पाहत बसला होता. देवप्पाचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते. "आता तो जागा होतोय."

अचानक नेहाने ब्रेकवर हलका पाय ठेवला.

"अभिजित सर"

त्याने तिच्याकडे पाहिलं. समोर, रस्त्याच्या मधोमध, जणू हवेतूनच एक काळसर धुराचा थर तयार होत होता.

नागमोडी वळणं घेत हळूहळू तो संपूर्ण रस्ता गिळू लागला. काही क्षणांतच त्यांच्या गाडीचे हेडलाईट्स त्या धुरात विरघळून गेले.

"हे - हे काय आहे?" नेहाच्या आवाजात भीती उतरली.

तिने वायपर सुरू केले. पण काहीच फरक पडला नाही. कारण धूर काचेवर नव्हताच, तो काचेच्या पलीकडे होता.

त्याच क्षणी अभिजितच्या नाकात तो परिचित वास शिरला. जळलेल्या राखेचा. उग्र. गुदमरवणारा. त्याच्या पोटात गोळा आला.

"नेहा, गाडी थांबवा!"

वाक्य पूर्ण व्हायच्या आतच धुराच्या गर्भातून दोन पिवळसर दिवे चमकले. एका क्षणासाठी ते हवेत तरंगणाऱ्या डोळ्यांसारखे वाटले. पुढच्याच क्षणी त्या दिव्यांमागून एक प्रचंड ट्रक गर्जत समोर आला. तो त्यांच्या दिशेने झेपावत होता.

"सर...!!"

नेहाची किंकाळी फुटली. तिने पूर्ण ताकदीने स्टिअरिंग डावीकडे खेचलं. पण स्टिअरिंग जड झालं. जणू कोणीतरी दुसराच त्यावर हात ठेवून बसलं होतं. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हतबलता उमटली.

"स्टिअरिंग फिरत नाही!"

अभिजितचं हृदय अक्षरशः त्याच्या घशात आल्यासारखं वाटलं. ट्रक आता अगदी समोर होता. फक्त काही फुटांवर.

आणि अचानक स्टिअरिंग स्वतःहून फिरलं. अतिशय अलगद. नेहाच्या हातात असूनही ते तिच्या इच्छेने फिरत नव्हतं. जणू एखाद्या अदृश्य हाताने तिच्या हातांवर स्वतःचे हात ठेवले होते.

गाडी एका झटक्यात रस्त्याच्या कडेला वळली. टायरांचा कर्णकर्कश आवाज झाला. गाडी दोन-तीन वेळा गचके घेत शेवटी जोरात थांबली.

काही क्षण...फक्त दोघांच्याही धापा ऐकू येत होत्या. नेहाचे हात अजूनही स्टिअरिंगवर घट्ट रोवलेले होते. ती अक्षरशः थरथरत होती.

"तो ट्रक." ती कसंबसं पुटपुटली.

अभिजितने मागच्या आरशातून रस्त्याकडे पाहिलं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. ट्रक, धूर, दिवे, राखेचा वास यापैकी आता काहीच नव्हतं. जणू काही काहीच घडलं नव्हतं.

दोघेही गाडीतून खाली उतरले. महामार्गावर दूरवरपर्यंत नजर टाकली. दोन्ही बाजूंनी रस्ता ओसाड पडला होता.

नेहा अजूनही हादरलेली होती. "सर" ती कुजबुजली, "मी स्टिअरिंग फिरवलंच नव्हतं, शेवटच्या क्षणी ते स्वतःच वळलं."

अभिजितने उत्तर दिलं नाही. त्याची नजर अजूनही त्या काळोख्या रस्त्यावर खिळलेली होती. देवप्पाचे शब्द पुन्हा त्याच्या मनात घुमले, "लक्षात ठेव, तू एकटा नाहीयेस."

त्याच क्षणी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका जुन्या वडाच्या झाडामागे एखादी शुभ्र आकृती क्षणभर उभी असल्याचा भास त्याला झाला. त्याने दचकून पुन्हा पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं.

बराच वेळ दोघेही रस्त्याच्या कडेला तसेच उभे राहिले, अंधारात दूरवर नजर लावून, जणू तो ट्रक, तो धूर परत येईल याची भीती अजूनही मनात घर करून होती. अखेर नेहाने दीर्घ श्वास घेतला, हात अजूनही थरथरत होते. "मला वाटतं मी चालवू शकणार नाही आता."

"मी चालवतो," अभिजित म्हणाला, त्याच्याही आवाजातली थरथर लपत नव्हती, पण त्याला जाणवलं की कुणीतरी स्थिर राहायला हवं.

दोघांनी जागा बदलली. नेहा शेजारच्या सीटवर बसली. सीटबेल्ट लावताना तिची बोटं इतकी कापत होती की लॉकही दोनदा चुकला.

गाडीत बसल्यावर काही मिनिटं दोघेही निःशब्द राहिले. मग नेहाने विचारलं, "सर, तुम्ही ते बघितलंत? त्या झाडामागे?"

अभिजितने तिच्याकडे बघितलं, आश्चर्याने. "तुम्हालाही दिसलं?"

"क्षणभरच. पांढरं काहीतरी. पण मग गायब झालं." तिने स्वतःचेच हात चोळले. "अभिजित सर, हे काय होतं? स्टिअरिंग स्वतःहून कसं फिरलं?"

"मला माहीत नाही नेहा. पण देवप्पांनी सकाळीच सांगितलं होतं, 'तू एकटा नाहीयेस या प्रवासात.' कदाचित त्यांना हेच म्हणायचं असेल."

नेहा काही क्षण गप्प राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, "म्हणजे कुणीतरी आपल्याला वाचवलं?"

"किंवा कुणीतरी आपल्याला मारायचा प्रयत्न केला, आणि कुणीतरी दुसऱ्याने ते थांबवलं." अभिजितने हात स्टिअरिंगवर घट्ट रोवत गाडी पुन्हा रस्त्यावर आणली.
************************************************************************************************************************
रात्री १० वाजता अभिजीतने नेहाला तिच्या सोसायटीत सोडले आणि अर्ध्या तासात घरी पोहचला.

दार उघडताच स्वाती समोर उभी होती, तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं.

प्रवासाचा थकवा, चेहऱ्यावरची काळजी, डोळ्यांत दडपलेली भीती; सगळं तिने एका नजरेत वाचलं.

पुढच्याच क्षणी ती काहीही न बोलता त्याच्या गळ्यात पडली.

तिने त्याला इतकी घट्ट मिठी मारली, की जणू तो पुन्हा कधीच दूर जाऊ नये.

क्षणातच तिचा बांध फुटला. ती हुंदके देत रडू लागली. तिचे खांदे थरथरत होते. तिच्या डोळ्यांत साचलेलं सगळं दुःख त्या अश्रूंमधून बाहेर पडत होतं.

अभिजित पूर्णपणे गोंधळून गेला.

"स्वाती... अगं काय झालं?" त्याने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला.

ती काही बोलली नाही. काही क्षण फक्त रडत राहिली. शेवटी कसाबसा आवाज काढत म्हणाली, "तू- तू एवढं सगळं एकट्याने सहन करत होतास"

"एकदाही वाटलं नाही तुला की मला सांगावं?"

ती पुन्हा रडू लागली. "एवढी परकी झालेय का रे मी तुला?"

"स्वाती..."

"निशिकांतने सांगितलं मला." ती डोळे पुसत म्हणाली.

"तू त्याला फोन केला होतास. त्या बेपत्ता स्त्रियांबद्दल, त्या तारखांबद्दल, त्या विचित्र पॅटर्नबद्दल." ती क्षणभर थांबली.

"त्याला वाटलं, तू खूप अस्वस्थ आहेस. म्हणून त्याने मला फोन केला. 'अभिजित ठीक आहे का?' एवढंच विचारलं. पण त्याच्या आवाजातूनच मला समजलं, काहीतरी खूप मोठं घडलंय."

अभिजितचं हृदय जोराने धडधडू लागलं. "स्वाती... मी."

"आणि हे?"

तिने एक दुमडलेला कागद दाखवला.

अभिजितच्या चेहऱ्याचा रंग उडाला.

तोच कागद ज्यावर त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात बारा स्त्रियांची नावं.

बेपत्ता होण्याच्या तारखा. लिहिल्या होत्या त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली यादी.

"तुझे कपडे धुवायला काढत होते. तेव्हा शर्टच्या खिशात होता."

ती हळू आवाजात म्हणाली.

अभिजित काही क्षण नुसताच तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्याकडे उत्तर नव्हतं.

शेवटी तो हळू आवाजात म्हणाला, "स्वाती मी तुला सगळं सांगणार आहे. एकही गोष्ट लपवणार नाही. पण"

त्याने थकलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं.

"आत्ता नाही. मी खूप थकलोय. माझं डोकंच काम करत नाहीये."

तो तिच्यापासून काही लपवत नव्हता. तो खरोखरच कोसळण्याच्या अवस्थेत होता.

तिने हळूच मान हलवली. "ठीक आहे."

त्या रात्री झोपताना तिची बोटं त्याच्या केसांतून हळुवार फिरू लागली. दिवसभर साचलेला ताण, भीती आणि थकवा त्या स्पर्शाने हळूहळू विरघळत गेला. अभिजितचे डोळे मिटले. झोप कधी लागली, त्यालाच कळलं नाही.

पण झोपण्यापूर्वी त्याला शेवटचं जे जाणवलं ते म्हणजे स्वातीच्या बोटांचा तो ओळखीचा, आश्वासक स्पर्श. ज्याची त्याला सर्वाधिक गरज होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित नेहमीपेक्षा लवकर जागा झाला. रात्रीची गाढ झोप लागली होती, पण मनावरील ओझं काही हलकं झालं नव्हतं. उलट, आज स्वातीला सगळं सांगायचं आहे, या विचाराने त्याच्या मनात एक वेगळाच ताण होता.

आज ऑफिसला जाणं शक्य नाही, हे त्याला उठल्या उठल्याच जाणवलं, आणि त्याने वर्क फ्रॉम होम घेण्याचा निर्णय घेतला. मोबाईल उचलून त्याने नेहाला फोन लावला.

"हॅलो सर?" पलीकडून नेहाचा आवाज आला.

"नेहा, गुड मॉर्निंग," अभिजित म्हणाला, आवाजात रात्रभराच्या थकव्याची किनार लपत नव्हती.

"गुड मॉर्निंग, सर."

"आज मी ऑफिसला येऊ शकणार नाही. वर्क फ्रॉम होम घेतो आहे."

"सगळं ठीक आहे ना, सर?" तिने विचारलं.

"हो, तसं काही गंभीर नाही. पण घरी एक महत्त्वाचं काम आहे, आजच्या माझ्या काही छोट्या मिटिंग्ज तुम्ही सांभाळू शकाल का?" अभिजित म्हणाला.

"नक्की, सर. तुमचं कॅलेंडर मी सकाळीच पाहिलं होतं. दहाची क्लायंट कॉल, अकराची इंटरनल रिव्ह्यू आणि दुपारची व्हेंडर मिटिंग मी अटेंड करते. काही तातडीचं असेल तर तुम्हाला लगेच फोन करते."

"धन्यवाद," अभिजित म्हणाला.
नेहा काही क्षण गप्प राहिली, जणू पुढचं वाक्य बोलावं की नाही याचा विचार करत होती. मग संकोचतच ती म्हणाली, "सर कालच्या घटनेनंतर तुम्हाला झोप लागली का?"

अभिजित काही क्षण उत्तर देऊ शकला नाही, कालच्या रात्रीच्या आठवणी पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. "फारशी नाही," तो अखेर म्हणाला.

"मलाही नाही, सर," नेहाने कबूल केलं.

"आज आधी मला स्वातीला सगळं सांगणं गरजेचं आहे," अभिजित म्हणाला, स्वतःशीच निर्धार पक्का करत असल्यासारखं.

"बरोबर आहे, सर," नेहा शांतपणे म्हणाली. "आता त्यांच्यापासून काहीही लपवू नका."

"नाही. आता काहीही लपवणार नाही," अभिजितने उत्तर दिलं.
"ठीक आहे, सर. ऑफिसची काळजी करू नका. इथलं मी बघते."

"धन्यवाद, नेहा."

स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध येत होता. स्वाती शांतपणे नाश्त्याची तयारी करत होती. अभिजित अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,

"स्वाती"

ती वळली. त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहताच तिने गॅस बंद केला.

"आज सांगणार का?"
अभिजितने तिच्या डोळ्यांत पाहत मान हलवली.

"हो, एकही गोष्ट लपवणार नाही."

दोघांनी आधी अथर्व आणि अनन्याला तयार करून निरोप दिला. मुलं घराबाहेर पडताच स्वातीने मुख्य दरवाजा बंद केला. दोघेही हॉलमध्ये येऊन समोरासमोर बसले. अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

पहिल्यांदा पडलेल्या त्या विचित्र स्वप्नापासून, खिडकीवर उमटलेल्या ☾१३ या गूढ चिन्हापासून, नाकात भरून राहणाऱ्या राखेच्या वासापासून, उत्तर कन्नड, याना, भैरवेश्वर मंदिर आणि मोहिनी शिखराच्या शोधापासून देवप्पाची भेट, गुहेतील बारा कोरीव खुणा, मल्ली आणि चंद्रिकाची हृदयद्रावक कहाणी, कल्लेश्वर बाबा, अधिक मास अमावस्येचं रहस्य, गेल्या तेहतीस वर्षांत बेपत्ता झालेल्या बारा स्त्रिया आणि त्यांच्या तारखांमधील भयानक संबंध आणि शेवटी, काल महामार्गावर त्यांच्या गाडीसमोर अचानक प्रकट झालेला धुराचा पडदा, राखेचा वास, तो रहस्यमय ट्रक आणि एखाद्या अदृश्य शक्तीने त्यांना मृत्यूच्या दारातून परत खेचल्यासारखा वाटलेला अनुभव.

अभिजित एकामागून एक सगळे प्रसंग सांगत राहिला. स्वाती एकदाही मध्ये बोलली नाही. पण तो महामार्गावरचा प्रसंग ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती उमटली.

अभिजितचं बोलणं संपलं तेव्हा घरात पूर्ण शांतता पसरली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिकही त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होती.

बराच वेळ स्वाती फक्त अभिजितकडे पाहत राहिली.

शेवटी ती मंद आवाजात म्हणाली, "अभिजित, हे सगळं जर दुसऱ्या कुणी मला सांगितलं असतं, तर मी त्याला सरळ मानसोपचारतज्ज्ञाकडे जायचा सल्ला दिला असता."

"मलाही तसंच वाटलं असतं." अभिजित पुटपुटला.

स्वाती उठली. ती खिडकीजवळ जाऊन बराच वेळ बाहेर पाहत उभी राहिली. तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. काही क्षणांनी ती पुन्हा अभिजितसमोर येऊन बसली.

"पण तू-तू खोटं बोलत नाहीयस. तुझ्या डोळ्यांत मला ते स्पष्ट दिसतंय." ती त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली, तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला.

"मला अजूनही या असुरांवर, भस्मबीजावर, मोहिनीवर किंवा या सगळ्या अलौकिक गोष्टींवर विश्वास बसलेला नाही. माझी बुद्धी अजूनही ते स्वीकारायला तयार नाही. पण मला तुझ्यावर विश्वास आहे."

अभिजितच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं.

मग तिच्या आवाजात विलक्षण ठामपणा आला. "आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अभिजित. यापुढे हे सगळं तुला एकट्याने पेलायचं नाही. जे काही करायचं असेल ते आपण दोघं मिळून करू. गरज पडली तर नेहाचीही मदत घेऊ. पण आता तू एकट्याने या संकटाचा सामना करणार नाहीस."

अभिजितने तिचा हात घट्ट पकडला. कित्येक दिवसांनी त्याच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झाल्यासारखं वाटलं.

ती हसली, तिच्या डोळ्यांतली भीती काही क्षणासाठी विरून गेली. अभिजितने तिचा हात हातात घेतला, बराच वेळ तसाच धरून ठेवला. शब्दांची गरजच उरली नव्हती.

"स्वाती," तो हळू आवाजात म्हणाला, "गेल्या काही महिन्यांत मी तुझ्यापासून किती दूर गेलो होतो, हे आत्ता कळतंय मला आणि तरीही तू"

"श्श." तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं. "आत्ता ते नको बोलूस. आज आपण दोघं परत एकत्र आहोत, आणि हेच पुरेसं आहे."

तिने त्याच्या गालावर हात ठेवला, त्याच्या डोळ्यांत रोखून बघितलं; इतक्या महिन्यांत पहिल्यांदाच तिच्या नजरेत नकार नव्हता, अंतर नव्हतं, फक्त एक शुद्ध, निखळ ओढ होती.

अभिजितने तिला हळूच जवळ ओढलं. तिने प्रतिकार केला नाही उलट स्वतःहून त्याच्या मिठीत विसावली, तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकलं.

"किती दिवसांनी," ती पुटपुटली, आवाज दाटलेला.

"किती महिन्यांनी," तो म्हणाला.
************************************************************************************************************************
बराच वेळानंतर, स्वाती शांत झोपी गेली, तिचा श्वास संथ, नियमित झाला. दुपारच्या या अनपेक्षित निवांत क्षणी तिचा थकवा तिला झोपेत घेऊन गेला होता. अभिजित मात्र जागाच होता, तिच्या केसांतून हात फिरवत, या हव्याहव्याशा शांततेचा आस्वाद घेत.

खिडकीतून दुपारचं ऊन खोलीत तिरपं येत होतं, पडद्यांच्या फटीतून प्रकाशाचे बारीक पट्टे भिंतीवर पडले होते. बाहेर रस्त्यावरचा नेहमीचा दुपारचा शुकशुकाट.

तेवढ्यात, त्याच्या नाकात काहीतरी जाणवलं. इतकं हलकं, इतकं क्षणिक, की त्याने आधी दुर्लक्षच केलं. पण मग ते पुन्हा आलं, यावेळी अधिक स्पष्ट.

राखेचा वास. आणि त्या वासासोबत, विचित्रपणे, खोलीतल्या उजेडातही एक क्षणभराचा गारवा उतरला. जणू उन्हातच अचानक एक थंड सावली सरकून गेली.

अभिजितचं हृदय धडधडू लागलं. त्याने स्वातीकडे बघितलं. ती अजूनही शांत झोपलेली होती, तिला काहीच जाणवत नव्हतं.

त्याने हळूच अंथरुणातून उठून बसण्याचा प्रयत्न केला, आणि नेमक्या त्याच क्षणी, खोलीच्या कोपऱ्यातल्या आरशात, अगदी क्षणभरासाठी, त्याला स्वतःच्या प्रतिबिंबामागे दुसरं काहीतरी हललेलं दिसलं; एक अस्पष्ट, काळपट आकृती, जी उन्हाच्या उजेडातही स्पष्ट न दिसता तशीच सावलीत गुरफटलेली होती.

त्याने दचकून मागे वळून बघितलं. खोलीत त्याच्या मागे काहीच नव्हतं, फक्त दुपारचं शांत ऊन. पण आरशात परत बघितल्यावर, त्या आकृतीचे डोळे अजूनही तिथेच होते, त्याच्याकडेच रोखलेले.

भस्मबीज – भाग ९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त.
अरे किती उत्सुकता ताणताय....
लवकर टाका पुढचा भाग.

अरे बापरे.. ते अमानवीय आता त्याच्या घरापर्यंत आले की..

आणि ती स्वप्ने, राखेचा वास, हे सगळे अभिजीतला का येत होते ? त्याचा कसा संबंध आहे देवप्पा आणि malli बरोबर ? तोच का निवडला गेला हा सामना करायला?

धन्यवाद किल्ली, आबा., सामी, माबो वाचक, ऋतुराज. आणि धनवन्ती.

@धनवन्ती पुढच्या काही भागात हळूहळू उलगडा होईल.