(या लिखाणात स्टीव्हन स्पीलबर्गच्या "डिस्क्लोझर डे" या सिनेमातले स्पॉइलर्स आहेत त्यामुळे तुम्ही तो पाहिलेला नसेल तर पुढे वाचायचे की तो पाहून झाल्यावर मग वाचायचे हे तुम्ही ठरवा)
.
अनेक वेगवेगळ्या पाठभेदांत एक गोष्ट सांगितली जाते, मी ती गोष्ट ऐकली त्याचे विवरण असे की, एक मृत्यूशैयेवर असलेल्या माणसाचे सगळे नातेवाईक उत्सुक असतात की तो महत्वाचे रहस्योद्घाटन करणार असतो, पण लहान मुलगा येई पर्यंत सांगणार नाही असे त्याने सांगितलेले असते. मधेच त्याला ढास लागते आणि तो राहतो की जातो अशी धाकधुक सगळ्यांना लागलेली असते. (गोष्टीमधे या टप्यावर सांगणारा अजून जमेल तेवढा थरार मिलेल असे अनेक वळणे टाकू शकतो) शेवटी तो लहान मुलगा येतो आणि तो आल्यावर त्याच्या कानात त महत्वाची गोष्ट सांगणार त्या क्षणी तो माणूस देह सोडून इहलोकातून रजा घेतो. (गोष्ट संपली)
.
यानंतर ऐकणाऱ्यांचा वैताग आणि ही गोष्ट ऐकण्यासाठी आपण घालवलेला वेळ यावर त्यांचे विचार आदानप्रदान करण्यात जातो, आणि गोष्ट सांगणारा छद्मी हास्यातून त्याचा आनंद घेत असतो.
.
ही जुनी गोष्ट आठवण्याचे कारण असे की मी इतक्यात स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित "डिस्क्लोझर डे" हा चित्रपट पाहिला आणि त्याचा शेवट पाहून माझी अवस्था वरच्या गोष्टीस ऐकून जशी ऐकणाऱ्यांची होत असेल तशी झाली आहे. अगदी कशासाठी केला इतुका अट्टाहास पासून इतका वेळ गेला त्या वेळात काय काय करता आले असते पर्यंत सगळे विचार मनाच्या वाहिनीवर जलद गतीने येऊन गेले.
.
या चित्रपटात दिग्दर्शकाने घेतलेल्या काही निर्णयांचे प्रयोजन कळत असले तरी त्या अनुषंगाचे अनेक प्रश्न निर्माण झाले. विज्ञानकथा अनेकदा प्रगत संस्कृतीची यंत्रे आणि तंत्रज्ञान मोठ्या कल्पकतेने उभे करतात पण त्या संस्कृतीचे स्वतःचे जग, तिची जीवनपद्धती आणि सांस्कृतिक परिपक्वता मात्र तितक्याच समर्थपणे कल्पू शकत नाहीत. आकाशगंगांचा प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एखाद्या परग्रहवासी प्रजातीने वस्त्रप्रावरणे, पर्यावरणनियंत्रण व्यवस्था, जनुकीय अभियांत्रिकी, कृत्रिम देह किंवा आपल्या आकलनापलीकडील तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने स्वतःच्या जैविक शरीराशी असलेले नाते निश्चितच बदललेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.
तरीही चित्रपटांमध्ये अशा जीवांना वारंवार नग्न, आदिम भासणाऱ्या कवचांनी झाकलेले जीव म्हणून दाखवले जाते जसे की त्यांची फक्त तांत्रिक बुद्धिमत्ता प्रचंड विकसित झालेली, पण रचना, संस्कृती, स्व-अभिव्यक्ती आणि शरीरसंरक्षण यांचा विकास कधी झालाच नाही. चित्रपटनिर्मात्यांना मानवापेक्षा अधिक प्रगत असलेली सभ्यता कल्पता येत नसेल, तरी किमान मानवाने आजवर प्राप्त केलेली सांस्कृतिक आणि तांत्रिक परिपक्वता तरी त्यांनी त्या प्रगत परग्रहवासी जीवांना बहाल करण्यास काय हरकत आहे?
.
कदाचित प्रक्षकांना तो नागडा मोठे डोके आणि मोठ्या डोळ्यांचा सडपातळ दोन पायांवर उभा प्राणीच परग्रहवासी म्हणून पाहण्याची सवय लागली आहे हे गृहित धरून तसे केले जात असावे.
.
आपले लेखक आणि दिग्दर्शक, जे आपल्या पृथ्वीला भेटायला येतात त्या परग्रहवासियांना एक आकाशगंगा पार करण्याचे प्रगत वाहन देतात, अणू उर्जेवर चालणारी हत्यारे देतात, टेलेपॅथी मानसिक संवाद क्षमता वगैरे देतात पण वैयक्तिक आभुषणे, विनोद, व्यवसाय, सामाजिक ओळख, ऐतिहासिक सांस्कृतिक पोशाख, धार्मिक किंवा तात्विक आभुषणे, वेगवेगळ्या घटकांना वेगळे पोषाख असले काही देत नाहीत या कल्पकतेच्या दुटप्पीपणाचे नवल वाटते.
.
काही चित्रपटांनी परग्रहवासियांचे जग तयार करण्याचे प्रयोग केले आहेत नाही असे नाही, जसे अवतार, एनिमी माईन, डिस्ट्रीक नाईन, फॅंटास्टिक प्लॅनेट, एलियन नेशन पण ते सगळे इतर ग्रहावरील कल्पना आहेत, आपल्या पृथ्वीला भेटायला आलेले परग्रहवासी नाहीत. स्टार ट्रेक मालिकेने तयार केलेले क्लिंगन प्रजातिचे विश्व खरेच वाखाणण्यासारखे आहे. स्टॉर वार्स, फिफ्थ एलिमेंट सारख्या मालिका आणि चित्रपण अती नाटकीय विश्वे करून दाखवतात पण सगळीकडे जुनाट समाज रचना आणि राजे वगैरे दाखवून गोंधळ घालताना दिसतात.
.
असो, स्टिव्हन काकांनी त्यांच्या चित्रपटात सहज सुलभ नागडा परग्रहवासी दाखवून गोष्ट सोपी केली आहे असे दिसते, तरीही आकाशगंगेला पार करून आपल्याला भेटायला आलेल्या परग्रहवासियांना आपल्या इतके देखील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगल्भ नसलेले पाहणे म्हणजे फसविल्या गेल्यासारखे वाटते.