भस्मबीज – भाग ५
पूर्वभाग
अभिजित आणि देवप्पा यांनी गुप्त गुहेत प्रवेश केला, जिथे भिंतीवरील १२ पूर्ण व १३ व्या अपूर्ण खुणेसह हळे कन्नड लिपीतील मंत्र आढळले. देवप्पाने स्पष्ट केले की या गुहेचा अभिजितच्या घराण्याशी जुना संबंध असून अधिक मास अमावास्येला जन्मलेल्या स्त्रीचा १३ वा बळी देऊन हा विधी पूर्ण केला जाणार आहे. हा प्रकार कायमचा संपवता येत नसला तरी तो काही शतकांसाठी रोखता येऊ शकतो, असे सांगत देवप्पाने या विधीमागील सूत्रधार 'मल्ली' याची कहाणी मांडायला सुरुवात केली. उडुपीजवळील गावात जन्मलेल्या मल्लिकार्जुनला लहानपणापासूनच स्त्री-भावनेची आवड होती, परंतु वडिलांचा अमानुष छळ आणि समाजाच्या टोमण्यांना कंटाळून अखेर त्याने वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडले.
************************************************************************************************************************
भस्मबीज – भाग ६ - मल्ली आणि चंद्रिका - एक अपूर्ण प्रेमकथा
सुरुवातीचे काही महिने त्याने स्टेशनांवर, बसस्थानकांवर झोपून काढले. भूक लागली की उष्ट्या पत्रावळ्यांतून उरलेलं अन्न खाल्लं. एका रात्री काही मवाल्यांनी त्याला बेदम मारलं, फक्त तो "वेगळा" दिसतो म्हणून. तो बेशुद्ध पडेपर्यंत ते थांबलेच नाहीत. पहाटे शुद्धीवर आला, तेव्हा अंगभर जखमा होत्या आणि आजूबाजूला कुणीच नव्हतं.
तो रस्त्याच्या कडेला बसून होता; भुकेला, जखमी, निराश. तेवढ्यात एका गुरुमाची नजर त्याच्यावर पडली. तिने त्याला आपल्या डेऱ्यात आणलं. तिथे त्याला एक कुटुंब मिळालं. रक्ताचं नाही, पण मायेचं.
गुरुमाने त्याला जगण्याचे नियम शिकवले. कोणावर सहज विश्वास ठेवायचा नाही, अपमान गिळून जगायचं, आणि मनात कितीही वादळ असलं तरी चेहऱ्यावर हसू ठेवायचं.
"पैसे घेऊन लोकांना आशीर्वाद द्यायचा असेल, तर डोळ्यांत पाणी नको. लोकांना अश्रू आवडत नाहीत.." ती म्हणायची.
हळूहळू मल्ली त्या नव्या आयुष्यात रुळू लागला. तो बुद्धिमान होता आणि त्याची निरीक्षणशक्तीही विलक्षण होती. नवं काही शिकायला त्याला वेळ लागत नसे.
तसाच तो दिसायलाही तो अत्यंत देखणा होता. डेऱ्यातल्या इतर जणी त्याची चेष्टा करत म्हणायच्या, "मल्ली, देवाने तुला घडवताना जरा जास्तच वेळ घेतला असणार."
मल्लीही त्यांच्यासोबत हसायचा. पण त्या हसऱ्या चेहऱ्याच्या मागे किती खोल वेदना दडल्या आहेत, किती अपमान, किती एकटेपण सहन केला आहे... हे त्याचं त्यालाच ठाऊक होतं.
"इतक्या लहान वयात... इतकं सगळं..." नेहा नकळत पुटपुटली, तिचा आवाज भरून आला होता.
देवप्पाने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत करुणा होती, "आणि ही तर फक्त सुरुवात होती, पोरी."
************************************************************************************************************************
आणि याच डेऱ्यात, एका मुसळधार पावसाच्या संध्याकाळी, चंद्रिका आली. अंगावर पावसाने चिंब भिजलेले कपडे, चेहऱ्यावर भीतीचं सावट आणि डोळ्यांत अजूनही न सुकलेले अश्रू.
पहिले काही दिवस ती कुणाशीच फारशी बोलली नाही. सगळ्यांपासून दूर, अंगणाच्या एखाद्या कोपऱ्यात गप्प बसून राहायची. कुणी काही विचारलं तरी फक्त मान हलवायची. तिच्या डोळ्यांत सतत एकच प्रश्न असायचा, “निदान इथंतरी मला स्वीकारलं जाईल का?”
मल्लीने तिला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा ती अंगणातल्या एका कोपऱ्यात गुडघ्यांत डोकं खुपसून बसली होती. तिचे खांदे हुंदक्यांनी हलत होते.
तो हळूच तिच्याजवळ जाऊन बसला. "रडू नकोस. इथं कुणी तुला हसणार नाही ."
ती रडून लाल झालेल्या डोळ्यांनी सावधपणे वर पाहू लागली. "सगळे सुरुवातीला असंच म्हणतात," ती पुटपुटली. "नंतर सगळं बदलतं."
"नाही बदलणार, मी वचन देतो. आणि माझं वचन मोडलं...तर सगळ्यांसमोर मला बदडून काढ."
अनेक दिवसांनी तिच्या ओठांच्या कोपऱ्यात एक हलकंसं हसू उमटलं. कदाचित डेऱ्यात आल्यापासून पहिल्यांदाच.
मल्लीनेही सुटकेचा निःश्वास सोडला. त्या क्षणी त्याला कळलं नव्हतं...की त्या एका छोट्याशा हास्यापासून त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर, आणि सर्वात दुःखद प्रवासाची सुरुवात झाली होती.
त्यानंतर हळूहळू दोघांची मैत्री घट्ट होत गेली.
चंद्रिका मल्लीपेक्षा दोन वर्षांनी लहान होती. स्वभावाने शांत, संयमी. तिच्या डोळ्यांत एक विलक्षण स्थैर्य होतं. जणू आयुष्याने दिलेल्या प्रत्येक जखमेचा स्वीकार तिने आधीच केला होता. आता तिला फक्त उरलेले दिवस थोडेसे सुंदर करून जगायचे होते.
डेऱ्यातल्या छोट्या-मोठ्या कामांत, सणवारांत, लग्नसमारंभांत, दोघे कायम एकत्र असायचे. हसणं, चेष्टा, भांडणं, अबोला... आणि पुन्हा हसणं; नकळत ते एकमेकांचे आधार बनले.
त्यांच्या नात्याला खरं वळण मिळालं ते एका लग्नाच्या मांडवात. आशीर्वाद द्यायला आणि नाचासाठी दोघेजण गेले होते. रात्री उशिरा, कार्यक्रम संपल्यावर, परतीच्या वाटेवर चंद्रिकाने एक जुनं गाण्याचं कडवं गुणगुणायला सुरुवात केली.
"दुःख जरी डोंगराएवढे, तुझ्या साथीने हलके होते,
तुझ्या शब्दांच्या सरींनी, मन पुन्हा पालवी धरते…
दुःख जरी डोंगराएवढे, तुझ्या साथीने हलके होते,
तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने, कोमेजलेले मन फुलते…
दुःख जरी डोंगराएवढे, तुझ्या साथीने हलके होते,
तुझ्या हसऱ्या सहवासाने, आयुष्य पुन्हा बहरते."
तिचा आवाज इतका मधुर आणि इतका भावपूर्ण होता की मल्लीची पावलं आपोआप थांबली. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला.
चंद्रिका गात राहिली. गाणं संपलं, तरी मल्ली काही बोललाच नाही.
"काय झालं?" चंद्रिका हसत म्हणाली. "असा का बघतोयस?"
मल्ली भानावर आला. "काही नाही..."
ती भुवया उंचावत त्याच्याकडे पाहू लागली.
"तुझा आवाज... ऐकतच राहावासा वाटतो."
चंद्रिकेने नजर खाली वळवली. तिच्या ओठांवर मंद स्मित उमटलं.
आणि त्या क्षणी मल्लीला पहिल्यांदा जाणवलं...या आवाजात, या हसण्यात...आपण नकळत हरवत चाललो आहोत.
महिने सरले. ऋतू बदलले. आणि नकळत वर्षंसुद्धा निघून गेली. त्या दोघांमधलं नातं नेमकं मैत्रीतून प्रेमात बदललं, हे त्यांनाही सांगता आलं नसतं. एखाद्या नदीत समुद्राचं पाणी कधी मिसळतं, हे जसं कुणाला कळत नाही, तसंच काहीसं.
ते निरपेक्ष, निर्मळ प्रेम. जगाने जखमा दिलेल्या दोन जीवांनी एकमेकांच्या मिठीत शोधलेला निवारा.
रात्री सगळे झोपल्यावर दोघे डेऱ्याच्या गच्चीवर जाऊन बसायचे. वर चांदण्यांनी भरलेलं आकाश, खाली झोपलेलं शहर... आणि त्यांच्या न संपणाऱ्या गप्पा.
चंद्रिका नेहमी भविष्याची स्वप्नं रंगवायची.
"मल्ली..."
"हं?"
"एक दिवस आपण आपलं घर बांधू."
मल्ली हसत विचारायचा, "कुठं?"
"कुठंही... पण तिथं कुणी आपल्याकडे बोट दाखवणार नाही."
तिचे डोळे स्वप्नांनी उजळून निघायचे.
"छोटंसं घर असेल. अंगणात तुळस असेल. तू रोज तिला पाणी घालशील...आणि मी पहाटे अंगण झाडून सडा घालेन."
मल्ली तिच्याकडे पाहत राहायचा.
"आणखी?"
चंद्रिका हसली.
"आणखी काय... संध्याकाळी दोघं ओट्यावर बसून चहा पिऊ."
मल्लीने मुद्दाम गंभीर चेहरा केला.
"आणि जर कुणी बोट दाखवलंच तर?"
चंद्रिका खळखळून हसली.
"तर आपण त्यांच्याकडे बघून इतकं गोड हसू..."
ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली,
"...की त्यांचंच बोट ओशाळून खाली येईल."
मल्लीही हसला. पण त्या हसण्यामागे एक वेदना होती.
त्याने अलगद तिचा हात आपल्या हातात घेतला. घट्ट. जणू काळानेही तो हात सोडवू नये. कारण त्याला माहीत होतं... ते स्वप्न फार नाजूक होतं. या समाजाच्या एका दगडानेही ते क्षणात तुटू शकत होतं.
तरीही...त्या स्वप्नावरच त्यांचं जगणं उभं होतं.
************************************************************************************************************************
पण त्यांच्या अस्तित्वाकडे पाहण्याची समाजाची नजर कधीच बदलली नव्हती. बाजारात भाजी घ्यायला गेलं की दुकानदार तराजू नीट तोलायचाही नाही. वजनात फसवणूक झाली, म्हणून जाब विचारला तर उत्तर तयार मिळायचं, "जास्त शहाणपणा करू नको, हिजड्या"
बसमध्ये चढलं की शेजारची जागा रिकामी असली, तरी लोक उभं राहणं पसंत करायचे; पण त्यांच्या शेजारी बसत नसत.
रस्त्यावरून चालताना मागून शिट्ट्या, कुचकट हशा, अश्लील टोमणे...हे सगळं इतकं रोजचं झालं होतं की वेदनाही आता सवयीची झाली होती.
पण चंद्रिका...ती कधीच कडवट झाली नाही. एका रात्री, असाच एक अपमान सहन करून दोघे डेऱ्यात परतले.
मल्लीचा संताप अनावर झाला होता, "किती दिवस सहन करायचं हे?" तो भिंतीवर मूठ आपटत म्हणाला, "आपण माणूस नाही का?"
"एक दिवस हे सगळं बदलेल, मल्ली." तिने अलगद त्याचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या आवाजात नेहमीसारखाच अढळ विश्वास होता.
मल्ली कटू हसला, "इतकं सगळं सोसूनही... तुला अजून आशा कशी वाटते?"
"कारण...आशाच सोडली, तर मग जगायचं कशासाठी?" ती त्याला समजुतीच्या स्वरात म्हणाली.
मल्ली काही बोलू शकला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याला वाटलं...जग तिचा अपमान करू शकेल...तिला रडवू शकेल...पण तिला कधीच मोडू शकणार नाही.
तो विश्वास त्याने मनाच्या तळाशी जपून ठेवला. आणि नियतीने नेमका त्याच विश्वासावर घाव घालायचं ठरवलं होतं.
देवप्पा इथे थांबला आणि बराच वेळ काहीच बोलला नाही. घरात एक विचित्र शांतता पसरली.
नेहाने हळूच उठून त्याच्यासमोर पाण्याचा पेला धरला. देवप्पाने न बोलता एक घोट पाणी प्यायला आणि डोळे क्षणभर मिटले.
पुन्हा बोलायला सुरुवात केली, पण यावेळी त्याचा आवाज आधीपेक्षा अधिक जड झाला होता.
************************************************************************************************************************
"गावाच्या वेशीबाहेर दरवर्षी मोठा जत्रोत्सव भरायचा. त्या वर्षीही तसाच भरला. चंद्रिका आणि मल्लीला आशीर्वाद द्यायला, नाचायला बोलावणं आलं होतं. वर्षातली मोठी कमाई मिळायची"
"पण त्या दिवशी मल्लीला जोराचा ताप आला होता."
देवप्पा जणू ते दृश्य डोळ्यांसमोर पाहत होता. "अंग तापानं फणफणत होतं. त्याला उठून बसायचीही ताकद नव्हती."
चंद्रिका त्याच्या कपाळावर ओला पंचा ठेवत, त्याच्या केसांतून अलगद हात फिरवत उशाशी बसली होती.
"तुला या अवस्थेत एकटं सोडून मी नाही जाणार." ती ठामपणे म्हणाली.
मल्लीने कसेबसे डोळे उघडले, "वेडी आहेस का? एवढी मोठी कमाई सोडायची? गुरुमा रागावेल."
"रागावू दे."
"नको..."
त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. मी ठीक होईन. साधा ताप आहे. सकाळपर्यंत उतरून जाईल."
चंद्रिका अजूनही साशंक होती. "खरंच?"
"खरंच." मल्लीने तिच्याकडे पाहत हसण्याचा प्रयत्न केला. जा... आणि एक वचन दे."
"कसलं?"
"पहाटेपर्यंत परत यायचं."
चंद्रिकाने हळूच खाली वाकून त्याच्या तापाने गरम झालेल्या कपाळावर ओठ टेकवले.
"पहाटेच्या आधी... नक्की परत येईन."
ती उठली. एकदा मागे वळून पाहिलं. मल्लीने हात हलवला.
ती निघून गेली...ती पुन्हा कधीच परत आली नाही.
************************************************************************************************************************
गावाच्या जत्रेचा रंगात आलेला उत्सव संपत आला होता, रात्रभर हजारो लोकांनी गजबजलेला मंदिराचा परिसर आता हळूहळू ओस पडत होतं. धूप, कापूर आणि फुलांचा सुगंध अजूनही हवेत दरवळत होता. थोड्या वेळाने काकडआरती करून जत्रेची सांगता होणार होती.
चंद्रिकाने आपल्या पैंजणांचा आवाज थांबवला. हातात मिळालेली दक्षिणा, काही फुलं आणि एक छोटी कापडी पिशवी घेऊन लगबगीने ती डेऱ्याच्या दिशेने निघाली. मल्लीच्या काळजीने तिचा जीव अर्धा झाला होता.
गावाबाहेरचा जंगलातला रस्ता पार केला की ती डेऱ्यात पोहोचणार होती. ती चालत असतानाच मागून आवाज आला, "अरे... थांब ना!"
चंद्रिकाचं पाऊल क्षणभर थबकलं. पण मग ती न थांबता भराभर पावलं उचलू लागली. तेवढ्यात तिघेजण तिच्या समोर येऊन उभे राहिले.
दारूच्या वासाचा भपकारा चंद्रिकाच्या नाकात शिरला.
त्यांच्यातला एकजण गावातल्या आमदाराचा धाकटा भाऊ. अंगावर महागडा पांढरा शर्ट, गळ्यात जाड सोन्याची साखळी, हातात महागडं घड्याळ.
"जत्रेत काय फक्कड नाचलीस... तुझ्यासमोर तर सिल्क स्मितापण फिकी वाटली!" ."
चंद्रिका काहीही उत्तर न देता त्यांच्या बाजूने वाट करून जाऊ लागली.
त्याने तिची वाट अडवली. "इतकी कसली घाई?"
दुसऱ्याने तिच्या हातातली पिशवी हिसकावून घेतली.
चंद्रिकाचा घसा कोरडा पडला. ती मागे सरकली. "मला जाऊ द्या..." तिचा आवाज कापत होता.
आमदाराचा भाऊ तिच्या अगदी जवळ आला. "सगळ्या गावाला आशीर्वाद देतेस..."
तो कुचकटपणे हसला. "...आज आम्हालाही दे." असे म्हणत त्याने तिच्या साडीचा पदर खेचला.
ती झटापट करू लागली. "सोडा! मला सोडा!"
तिने पूर्ण ताकदीने त्याला ढकललं. तो क्षणभर धडपडला. त्याने संतापून तिच्या गालावर जोरदार चापट मारली. त्या धक्क्याने चंद्रिका जमिनीवर कोसळली. तिच्या ओठातून रक्ताची एक बारीक रेघ वाहू लागली.
"खूप माज आलाय...थांब तुझा माज उतरवतो" तो गुरगुरला.
दूरवर उत्सवाच्या शेवटच्या फटाक्यांचा आवाज येत होता. मंदिरात देवाची काकडआरती सुरू झाली असावी...
आणि इथे चंद्रिकाची विटंबना सुरु होती.
त्या पहाटे तिच्यावर जे अमानुष अत्याचार झाले, त्यांनी माणुसकीलाच काळिमा फासला. सकाळी ती कुठेच दिसत नसल्याने शोध सुरू झाला आणि दुपारी नदीकाठी तिचा निर्जीव देह सापडला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांपैकी अनेकांनी तो विदारक देखावा पाहून क्षणभर नजर वळवली. पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर धक्का आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. संपूर्ण गाव सुन्न झालं होतं.
************************************************************************************************************************
चंद्रिकेच्या मृत्यूनंतर गावात दोन दिवस शोकाचं वातावरण होतं. पोलीस आले. पंचनामा झाला. छायाचित्रं काढली गेली. लोक दबल्या आवाजात चर्चा करत होते, प्रत्येकाला माहित होते की हे कोणी केलं आहे... पण त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिम्मत कोणाकडेच नव्हती.
मल्लीने चौकशी केली तेव्हा त्याला समजले की उत्सवाच्या रात्री चहावाल्याने त्या तिघांना चंद्रिकेच्या मागे जाताना पहिले होते.
गुरुमांनी स्वतः मल्लीला पोलिसांकडे जाण्यास भाग पाडलं. "रागाने काही करू नकोस," त्या समजावत म्हणाल्या, "कायद्यावर विश्वास ठेव."
दुसऱ्या दिवशी मल्ली पोलीस ठाण्यात गेला. त्याने थरथरत्या आवाजात पोलिसांसमोर तिघांची नावं दिली.
तपास अधिकारी काही क्षण शांत बसला. त्याने वही बंद केली.
"तुला खात्री आहे का?"
"हो."
"पुरावा आहे?"
मल्ली गप्प झाला. त्याच्या डोळ्यांसमोर चंद्रिकेचा तो विदीर्ण चेहरा उभा राहिला.
अधिकाऱ्याने दीर्घ श्वास घेतला. "मरण्यापूर्वीचा जबाब नोंदवलाय का?"
"नाही."
"कोणी प्रत्यक्ष पाहिलंय?"
मल्लीने चहावाला आणि दोन-तीन जणांची नावे सांगितली.
पण ज्यांनी उत्सवाच्या रात्री त्या तिघांना चंद्रिकेच्या मागे जाताना पाहिलं होतं, ते आता "आम्ही काही पाहिलंच नाही" असं म्हणू लागले. चहावाल्याने तर स्पष्ट सांगितलं, "साहेब, त्या रात्री मी दुकान लवकर बंद केलं होतं."
तिसऱ्या दिवशी पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी बोलावलं. तिघेही पांढरे शुभ्र कपडे घालून आले. आमदाराचा भाऊ हसतच आत शिरला. पोलीस निरीक्षक स्वतः उठून त्याच्याशी हस्तांदोलन करत होता. चहा मागवला गेला. खोलीचं दार बंद झालं. पंधरा मिनिटांनी तिघे बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती...उलट उपहास होता. जाताना आमदाराच्या भावाने मल्लीकडे पाहून स्मित केलं. ते स्मित मल्लीच्या काळजात खंजीरासारखं घुसलं.
काही दिवसांनी तपास अधिकाऱ्याने मल्लीला पुन्हा बोलावलं. त्याच्या समोर फाईल ठेवली. "फॉरेन्सिक अहवाल आला आहे."
मल्लीने आशेने त्याच्याकडे पाहिलं.
अधिकारी निर्विकार आवाजात म्हणाला, "अत्याचार सिद्ध होत नाही."
"काय?"
"पुरावे मिळाले नाहीत."
"पण...!"
"घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंचे नमुने जुळत नाहीत."
मल्लीचं डोकं भणाणलं.
त्याने स्वतः पाहिलं होतं, चंद्रिकेचे फाटलेले कपडे, रक्ताचे डाग...
मग हे सगळं गेलं कुठे?
त्याने संतापाने विचारलं,
"पुरावे कुठे गेले?"
अधिकाऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती.
मग तो म्हणाला, "जे आहे ते तुझ्यासमोर आहे."
आठवडाभरात प्रकरण जवळजवळ थंड पडलं. फाईलवर नवीन शिक्का उमटला, 'पुरेशा पुराव्याअभावी तपास स्थगित.'
मल्ली बराच वेळ त्या शिक्क्याकडे पाहत राहिला. त्याला त्या लाल शाईत न्यायाचा मृत्यू दिसत होता.
त्या संध्याकाळी तो डेऱ्याच्या गच्चीवर बराच वेळ बसला. सूर्य मावळत होता. त्याने आपले थरथरते हात सूर्यासमोर जोडले, "मी प्रयत्न केला..."
त्याचा आवाज तुटत होता. "कायद्यावर विश्वास ठेवला... पण त्यांनी तुला दुसऱ्यांदा मारलं." त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
चंद्रिकाच्या तेराव्याच्या रात्री, मल्ली एकटाच नदीकाठी जाऊन बसला. जिथून तिचा निर्जीव देह बाहेर काढला होता. नदीचं पाणी संथ वाहत होतं. मल्ली हळूहळू पुढे सरकला. त्याने हात पाण्यात बुडवला. गार... बर्फासारखं थंड...त्या पाण्याने त्याला पुन्हा त्या सकाळी नेऊन उभं केलं.
चंद्रिकाचा रक्ताने माखलेला चेहरा...तिचे मिटलेले डोळे...त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागले.
"तुझं काय चुकलं होतं, चंद्रिका...?"
"तू कुणाचं वाईट केलं नव्हतंस. तुझा गुन्हा एवढाच... की तू अशी जन्माला आलीस आणि त्या गुन्ह्याची शिक्षा तुला मृत्यूने मिळाली...आणि मला...आयुष्यभर न भरणारी पोकळी."
त्याच्या मनात अनेक प्रश्न धुमसू लागले होते.
माणूस म्हणून जगण्याची साधी विनंती करूनही जर काही मिळत नसेल...जर न्याय दारोदारी भटकूनही मिळत नसेल... तर मग तो न्याय स्वतःच्या हातांनी हिसकावूनच घ्यावा लागतो का?
जेव्हा प्रेमाच्या बदल्यात पदरी फक्त द्वेष आणि तिरस्कारच पडतो, तेव्हा त्या द्वेषाची परतफेड द्वेषानेच करायला हवी का?
आणि जर या निष्ठुर समाजाला माणुसकीची, आदराची साधी भाषा समजतच नसेल... तर मग त्याला सरळ वठणीवर आणायला दहशतीचीच भाषा वापरावी लागेल का?
याच प्रश्नांनी त्या रात्री मल्लीच्या मनात सूडाचं पहिलं बीज रुजलं. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक निर्णय झाला. आता न्यायालय नाही... आता निर्णय मी देणार.
हा भाग सुद्धा छान झाला आहे.
हा भाग सुद्धा छान झाला आहे.
उत्कंठावर्धक.....
चंद्रिकाच्या तेराव्याच्या रात्री>>>>> चंद्रकोर १३ ?
बाप रे!
बाप रे!
तेराव्याची विधी.
चंद्रिकाच्या तेराव्याच्या रात्री>>>>> चंद्रकोर १३ ?>>> तेराव्याचा विधी.
छान आहे हा भाग सुद्धा. पण, हा
छान आहे हा भाग सुद्धा. पण, हा भाग थोडा मूळ कथेच्या जौनर पासून विभक्त झाल्यासारखा वाटतो. म्हणजे थोडा सामाजिक अंगाने जाणारा. चंद्रिका आणि मल्लिची कथा हे उपकथानक असून ते थोडक्यात आटोपायला हवे होते. काही ठिकाणी संवाद नसणारी वाक्ये अवतरणात आहेत.
>>>>>मूळ कथेच्या जौनर पासून
>>>>>मूळ कथेच्या जौनर पासून विभक्त झाल्यासारखा वाटतो.
मला तर फारच पूरक वाटला. ही मानसिक घडण, उत्पात माहीत नसता तर नायक त्याला 'सहानुभूती / कंपॅशन' दाखवु शकणार नाही. त्याला नायक, मुक्ती देइलसे वाटते. त्याकरता ही पार्श्वभूमी फार आवश्यक होती. की या टोकाला मल्ली का गेला, कसा तो स्वतःच्याच विषात भिनत गेला.
.
अर्थात असे काही नसेलही. नितनेवे सांगतीलच.
चंद्रिकाच्या तेराव्याच्या
चंद्रिकाच्या तेराव्याच्या रात्री>>>>> चंद्रकोर १३ ?>>> तेराव्याचा विधी.
नितनवे,
मला, चंद्रिका म्हणजे चंद्रकोर आणि तेरावा म्हणजे १३ आकडा ....जे अभिजितला सतत स्वप्नात दिसत होते त्याबद्दल आहे का असे सुचवायचे/ विचारायचे होते.
छान आहे हा भाग
छान आहे हा भाग
मागच्याच भागात मल्लि च पात्र कथेत आलं तेंव्हा जोगवा आठवला.
दुर्दैवाने अजूनही तृतीय पंथियांना समाज स्वीकारत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाही तिरस्कार सोसून सुध्दा "आशिर्वाद" देऊन कमाई मिळवणं सोप वाटत.
कथेत पोलिस "व्हिडिओ" पुराव्यासाठी मागतात हे थोड खटकल, हा प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी घडलाय ना? तेंव्हा मोबाईल, CCTV वैगरे कुठे होते.
धन्यवाद ऋतुराज., सामो, माबो
धन्यवाद ऋतुराज., सामो, माबो वाचक आणि manya.
चंद्रिकाच्या तेराव्याच्या रात्री>>>>> चंद्रकोर १३ ? >>>खरंच की हे माझ्या लक्षात नाही आले. पण मी त्या angle ने नाही लिहिले.
@माबो वाचक तुमचा मुद्दा रास्त आहे आणि यापुढे लिहिताना मी लक्ष देईन, पण सामो म्हणाल्या तसे मल्लीची वेदना, न्यायव्यवस्थेचं अपयश आणि त्याचं हळूहळू होत गेलेलं पतन कळलं नाही, तर शेवटी अभिजित त्याच्याबद्दल सहानुभूती का बाळगतो, हे तितकं प्रभावी वाटणार नाही.
@manya चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, बदल केला आहे.
पण सामो म्हणाल्या तसे मल्लीची
पण सामो म्हणाल्या तसे मल्लीची वेदना, न्यायव्यवस्थेचं अपयश आणि त्याचं हळूहळू होत गेलेलं पतन कळलं नाही, तर शेवटी अभिजित त्याच्याबद्दल सहानुभूती का बाळगतो, हे तितकं प्रभावी वाटणार नाही. >>> खरे आहे. आता पटले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
वाचतोय.
वाचतोय.
वाचतोय >>> मी पण
वाचतोय >>> मी पण