
डॉ. विद्या जोशी यांचा बीएमएम २०२६अधिवेशनात 'स्त्रीत्वाचा सन्मान' उपक्रमांर्गत विशेष सन्मान केला जाणार आहे,
त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद
त्यांची थोडक्यात ओळख
डॉ. विद्या जोशी या होमिओपॅथी डॉक्टर, लेखिका, शिक्षणतज्ज्ञ आणि उत्तर अमेरिकेतील मराठी समाजातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी २०१९ ते २०२२ या कालावधीत बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) च्या अध्यक्षा म्हणून यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात न्यू जर्सी येथे भरलेले २० वे BMM अधिवेशन अत्यंत यशस्वी ठरले. मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, समाजसेवा आणि समुदाय विकास या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाला एकत्र आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
होमिओपॅथी डॉक्टर, लेखिका, मॉडेल आणि समाजसेविका इतक्या विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करण्यामागची प्रेरणा आणि प्रवास कसा होता?
हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो आणि खरं सांगायचं तर मला स्वतःलाही कधी कधी आश्चर्य वाटतं की हा प्रवास इतका विविधांगी कसा घडला! पण माझ्या दृष्टीने ही सगळी क्षेत्रं वेगवेगळी नाहीत. त्या सगळ्यांचा समान धागा एकच आहे—माणसांशी जोडून राहणं आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणं.
माझ्या आयुष्याची सुरुवात एक डॉक्टर म्हणून झाली. होमिओपॅथीचं शिक्षण घेत असताना आणि नंतर स्वतःचा दवाखाना सुरू केल्यानंतर मला हजारो रुग्णांना भेटण्याची संधी मिळाली. प्रत्येक रुग्ण फक्त आजार घेऊन येत नव्हता; तो त्याच्या आयुष्याची एक कथा घेऊन यायचा. त्यांचे संघर्ष, त्यांची भीती, त्यांची आशा... हे सगळं जवळून अनुभवताना मला जाणवलं की डॉक्टरचं काम फक्त औषध देण्यापुरतं मर्यादित नसतं. एखाद्याला धीर देणं, त्याचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणं, हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. याच अनुभवातून मला लेखनाची प्रेरणा मिळाली. अनेक गैरसमज, अपुरी माहिती आणि होमिओपॅथीबद्दलची उत्सुकता पाहून मला वाटलं की माझे अनुभव पुस्तकाच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यातून "होमिओपॅथी – एक वरदान" हे पुस्तक जन्माला आलं. माझ्यासाठी ते केवळ पुस्तक नव्हतं; तर माझ्या व्यावसायिक अनुभवाचं आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचं प्रतिबिंब होतं.
लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण मॉडेलिंगचाही माझ्या आयुष्यात महत्त्वाचा वाटा आहे. अनेकांना वाटतं की मॉडेलिंग म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य. पण माझ्यासाठी ते आत्मविश्वास, शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वतःला प्रभावीपणे सादर करण्याचं माध्यम होतं. समाजात काम करताना, हजारो लोकांसमोर बोलताना किंवा एखाद्या मोठ्या संस्थेचं नेतृत्व करताना याच कौशल्यांचा मला खूप उपयोग झाला.
त्यानंतर आयुष्यात एक मोठं वळण आलं—अमेरिकेत स्थलांतर. नवीन देश, नवीन संस्कृती आणि नवीन आयुष्य. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही -समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ.
अमेरिकेत आल्यानंतर मला जाणवलं की इथे राहणाऱ्या मराठी कुटुंबांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे, पण त्यांना एकत्र आणणारे, जोडून ठेवणारे आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवणारे अधिक उपक्रम आवश्यक आहेत. तिथून महाराष्ट्र मंडळ शिकागो, BMM, शिकागो मराठी शाळा आणि नंतर 'सहाय्य' फाउंडेशनचा आता कॅनडामध्ये, Milton Marathi Association च्या माध्यमातूनही मराठी समाजाशी जोडले जाण्याची संधी मिळत आहे. या संस्थेच्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निवेदिका (Master of Ceremonies) म्हणून काम करण्याचा मला आनंद मिळतो. अशा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करताना केवळ कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी नसते, तर उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण करणे, विविध पिढ्यांना एकत्र जोडणे आणि मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा अभिमान जपणारे वातावरण निर्माण करणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.प्रवास सुरू झाला.
आज मागे वळून पाहताना मला वाटतं की या सगळ्या भूमिका—डॉक्टर, लेखिका, मॉडेल, प्रशासक, समाजसेविका किंवा नेत्या—या वेगळ्या नसून एका ध्येयाच्या विविध अभिव्यक्ती आहेत. प्रत्येक भूमिकेने मला काहीतरी शिकवलं, अधिक संवेदनशील बनवलं आणि लोकांशी जोडण्याची क्षमता वाढवली.
माझा नेहमी एकच विश्वास राहिला आहे—आपण किती मोठं यश मिळवलं यापेक्षा, आपल्या कामामुळे किती लोकांच्या आयुष्यात आनंद, आशा आणि संधी निर्माण झाल्या, हेच आपल्या यशाचं खरं मोजमाप आहे.
आजही मला नवीन प्रकल्प सुरू करण्याची, समाजाला काहीतरी परत देण्याची आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी शाश्वत निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. कारण सेवा ही माझ्यासाठी जबाबदारी नाही—ती माझी जीवनशैली आहे.
शिकागोमध्ये मराठी शाळेची स्थापना करून ती Illinois State Board मान्यताप्राप्त संस्थेपर्यंत नेण्याचा प्रवास कसा घडला? आजच्या पिढीमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती जपताना कोणती आव्हाने आणि समाधानाचे क्षण अनुभवले?
२०१४ साली श्री. नितीन जोशी यांच्या प्रेरणेने आणि BMMच्या मार्गदर्शनाखाली मराठी शाळा – शिकागो सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी आमच्यासमोर एकच ध्येय होते—उत्तर अमेरिकेत वाढणाऱ्या मराठी मुलांना केवळ भाषा शिकवायची नाही, तर त्यांना त्यांच्या संस्कृतीशी, परंपरांशी आणि मराठी अस्मितेशी जोडून ठेवायचे.
या प्रवासाची सुरुवात अवघ्या ५० विद्यार्थ्यांपासून झाली. आज अभिमानाने सांगता येते की हीच संस्था ३०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने होती, पण त्याचबरोबर प्रत्येक यशाने पुढे जाण्याची नवी ऊर्जा दिली.
सुरुवातीला वर्गांसाठी योग्य जागा मिळवणे, अभ्यासक्रम तयार करणे, विविध वयोगटांसाठी अध्यापन पद्धती विकसित करणे, स्वयंसेवी शिक्षकांचे प्रशिक्षण, पालकांचा विश्वास संपादन करणे आणि समाजाला या उपक्रमाशी जोडणे—ही सर्व मोठी आव्हाने होती. अमेरिकेत वाढणाऱ्या मुलांसाठी मराठी शिकणे हा एक आनंददायी आणि संवादात्मक अनुभव असावा, यासाठी आम्ही अभ्यासक्रमात भाषा, साहित्य, कथा, गाणी, खेळ, सण-उत्सव आणि सांस्कृतिक उपक्रम यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला.
माझ्या मते, मराठी शिकवणे म्हणजे केवळ बाराखडी किंवा व्याकरण शिकवणे नाही; तर मुलांना त्यांच्या ओळखीशी जोडणे आहे. जेव्हा एखादे मूल पहिल्यांदा मराठीत गोष्ट वाचते, आपल्या आजी-आजोबांशी मराठीत संवाद साधते किंवा मंचावर उभे राहून आत्मविश्वासाने मराठीत बोलते, तेव्हा त्या क्षणाचे समाधान शब्दांत व्यक्त करता येत नाही. त्या क्षणांमध्ये आपल्या प्रयत्नांचे खरे सार्थक झाल्याची जाणीव होते.
या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे Illinois State Board कडून मान्यता (Accreditation) मिळवणे. त्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक निकष पूर्ण करणे, अभ्यासक्रमाचे मानकीकरण, प्रशासकीय प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि मान्यतेसाठीचा सविस्तर अर्ज तयार करणे, ही अत्यंत वेळखाऊ आणि जबाबदारीची प्रक्रिया होती. मात्र संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही मान्यता मिळाली आणि मराठी भाषेला शैक्षणिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. हा केवळ मराठी शाळेचाच नव्हे, तर संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासाठी अभिमानाचा क्षण होता.
आजही आव्हाने आहेत. इंग्रजी भाषेचे वाढते वर्चस्व, मुलांचे व्यस्त वेळापत्रक आणि डिजिटल युगातील बदलती जीवनशैली यामुळे मातृभाषेशी सातत्याने नाते जोडून ठेवण्यासाठी अधिक नाविन्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. परंतु त्याचबरोबर पालकांचा वाढता सहभाग, स्वयंसेवी शिक्षकांचे समर्पण आणि मुलांचा उत्साह हे आमच्यासाठी मोठे प्रेरणास्थान आहे.
माझा ठाम विश्वास आहे की भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते; ती संस्कृती, मूल्ये, इतिहास आणि आपल्या ओळखीचा पाया असते. मराठी शाळा ही मुलांना भाषा शिकवण्याबरोबरच त्यांच्या मनात मराठीपणाचा अभिमान जागवणारी एक चळवळ आहे. आज जेव्हा आमचे विद्यार्थी आत्मविश्वासाने मराठीत बोलताना, लिहिताना आणि आपल्या संस्कृतीचा अभिमानाने परिचय करून देताना दिसतात, तेव्हा वाटते—या प्रवासातील प्रत्येक संघर्ष खरोखरच सार्थकी लागला.
BMMच्या अध्यक्षा म्हणून Atlantic City येथील अधिवेशनाचे नेतृत्व करताना तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि सर्वात संस्मरणीय क्षण कोणता होता?
माझ्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा कदाचित BMMच्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक काळांपैकी एक होता. कारण ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर काहीच महिन्यांत संपूर्ण जग कोविड-१९च्या संकटाला सामोरं गेलं. अशा वेळी मला जाणवलं की, नेतृत्व म्हणजे केवळ कार्यक्रमांचं नियोजन किंवा संस्था चालवणं नव्हे, तर संवेदनशील, सेवाभावी आणि लोकांना आधार देणारं नेतृत्व देणं अधिक महत्त्वाचं आहे.
कोविडच्या काळात अनेक मराठी कुटुंबं भारतात किंवा इतर देशांमध्ये अडकली होती. काहींना वैद्यकीय मदतीची गरज होती, काहींना प्रवासासंदर्भात मार्गदर्शन हवं होतं, तर अनेक कुटुंबांना मानसिक आधाराची गरज होती. त्या काळात आम्ही BMM COVID Helpline सुरू केली. त्याचबरोबर Deep Stambha सारख्या उपक्रमांद्वारे प्रवासाशी संबंधित अडचणीत असलेल्या शेकडो लोकांना मदत केली. त्या काळाने आम्हाला शिकवलं की, संस्था ही फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नसते; संकटाच्या काळात समाजाचा विश्वास बनून उभी राहणं ही तिची खरी ओळख असते. या सगळ्यानंतर Atlantic City Convention आयोजित करणं हे आणखी एक मोठं आव्हान होतं. कोविडनंतर लोकांचा आत्मविश्वास परत मिळवणं, प्रायोजकांचा विश्वास संपादन करणं, स्वयंसेवकांना पुन्हा एकत्र आणणं आणि संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाला आभासी माध्यमांद्वारे (Virtual Media) सातत्याने जोडून ठेवणं, ही अत्यंत कठीण पण तितकीच महत्त्वाची जबाबदारी होती.
या अधिवेशनामागे २५० हून अधिक स्वयंसेवकांची अथक मेहनत, हजारो सहभागींचा विश्वास आणि लाखो डॉलर्सच्या नियोजनाचं मोठं व्यवस्थापन होतं. विशेष आनंदाची बाब म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिवेशन यशस्वीपणे पार पाडतानाच आर्थिकदृष्ट्याही ते सक्षम ठरलं आणि अधिवेशनाने $50,000 पेक्षा अधिक शिल्लक (surplus) निर्माण केला. माझ्यासाठी हा केवळ आर्थिक आकडा नव्हता; तर नियोजन, पारदर्शकता, टीमवर्क आणि सर्वांच्या विश्वासाचं प्रतीक होता. पण माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय क्षण कोणता असेल, तर तो अधिवेशनाच्या उद्घाटनाचा. हजारो मराठी बांधव एकाच छताखाली, उत्साहाने, अभिमानाने आणि आपुलकीने एकत्र आलेले पाहताना माझ्या डोळ्यांत अक्षरशः आनंदाश्रू आले. त्या क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—हे माझं यश नव्हतं; हे प्रत्येक स्वयंसेवकाचं, प्रत्येक प्रायोजकाचं, प्रत्येक सहभागीचं आणि संपूर्ण उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाचं सामूहिक यश होतं. आजही त्या क्षणाची आठवण झाली की मन अभिमानाने भरून येतं. कारण त्या अधिवेशनाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी समाज एकत्र आला, तर कोणतंही आव्हान अशक्य राहत नाही.
बीएमएमच्या सचिव आणि अध्यक्षा या दोन्ही भूमिकांमध्ये काम करताना उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासाठी कोणते उपक्रम सर्वाधिक प्रभावी ठरले, असे तुम्हाला वाटते?
माझ्या मते, एखादा उपक्रम तेव्हाच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो, जेव्हा तो लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष आणि सकारात्मक बदल घडवतो. BMMच्या सचिव आणि नंतर अध्यक्षा म्हणून काम करताना हाच माझ्या प्रत्येक उपक्रमामागचा मूलभूत विचार होता—"समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं." कोविडच्या कठीण काळात सुरू केलेली COVID हेल्पलाइन, विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मार्गदर्शन करणारा Deep Stambha, विवाह इच्छुकांना जोडणारा Reshim Gathi, ज्येष्ठ कलाकारांना व्यासपीठ देणारा Uttar Rang, युवकांसाठी विविध नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम, मराठी शाळा, तसेच महिला सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न—या सर्व प्रकल्पांनी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, BMM North America च्या ऑनलाइन उपक्रमांमधून Netak Mogra, "लेखक तुमच्या भेटीला" ही लेखकांशी संवाद साधणारी मालिका, लेखन कार्यशाळा, तसेच नवोदित लेखकांच्या पुस्तकांना व्यासपीठ आणि प्रसिद्धी देण्याचे प्रयत्न यांमुळे साहित्य आणि संस्कृतीच्या जतनालाही नवी दिशा मिळाली. आज मला अभिमानाने वाटते की BMM ही केवळ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारी संस्था राहिलेली नाही. ती शिक्षण, समाजसेवा, युवक विकास, वरिष्ठ नागरिक, महिला सक्षमीकरण, साहित्य, आणि नवीन पिढीला मराठी संस्कृतीशी जोडणारे विविध उपक्रम राबवणारी एक सक्षम, सर्वसमावेशक आणि समाजाभिमुख संस्था म्हणून विकसित झाली आहे.
तुमच्या मते, पुढील दशकात बीएमएमची भूमिका कशी विकसित व्हावी? विशेषतः युवा पिढी, महिला सक्षमीकरण आणि मराठी भाषा-संस्कृतीच्या जतनासाठी कोणत्या दिशा महत्त्वाच्या ठरतील?
माझ्या मते, पुढील दशकात BMMची भूमिका केवळ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेपुरती मर्यादित न राहता, उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाला दिशा देणारी, विविध पिढ्यांना जोडणारी आणि नेतृत्व घडवणारी एक सर्वसमावेशक संस्था म्हणून अधिक विकसित व्हायला हवी. बदलत्या काळानुसार समाजाच्या गरजाही बदलत आहेत आणि त्या गरजांनुसार BMMनेही आपल्या कार्याची व्याप्ती सातत्याने वाढवत राहणे आवश्यक आहे. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम हे BMMचे वैशिष्ट्य कायम राहीलच; परंतु त्याचबरोबर नेतृत्व विकास, व्यावसायिक नेटवर्किंग, उद्योजकता, डिजिटल शिक्षण, समाजसेवा आणि समुदाय विकास या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.
विशेषतः युवा पिढीला केवळ कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेणे पुरेसे नाही, तर त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान देणे, नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कल्पना व नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आजचे तरुण उद्याचे समाजनेते आहेत. त्यांना जबाबदाऱ्या आणि विश्वास दिला, तर ते BMMला नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही BMMने अधिक व्यापक भूमिका बजावावी. महिलांना नेतृत्वाच्या संधी, व्यावसायिक प्रगती, उद्योजकता, कौशल्यविकास आणि समाजकार्यात सक्रिय सहभागासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महिलांचा सहभाग वाढला की संस्था अधिक सक्षम, संवेदनशील आणि सर्वसमावेशक बनते, याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षांत घेतला आहे. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेतील मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि स्टार्टअप्सना एकमेकांशी जोडणारे प्रभावी व्यासपीठ निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. अनुभवी उद्योजक आणि नवउद्योजक यांच्यात मार्गदर्शन, नेटवर्किंग, सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली, तर केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण मराठी समाजाची प्रगती साधता येईल.
मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन हे आपल्या कार्याचे केंद्रबिंदू राहणारच आहे. मात्र ते करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे तितकेच आवश्यक आहे. डिजिटल शिक्षण, ऑनलाइन अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संवादात्मक शैक्षणिक साधने, पॉडकास्ट, वेबिनार आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा नव्या पिढीपर्यंत अधिक आकर्षक, सुलभ आणि समकालीन पद्धतीने पोहोचवता येईल. संस्कृती जपण्याबरोबरच ती नव्या पिढीच्या जीवनशैलीशी जोडणे हीदेखील आपली जबाबदारी आहे.
माझा ठाम विश्वास आहे की BMMने भाषा, संस्कृती, शिक्षण, समाजसेवा, नेतृत्व आणि नवोपक्रम यांचा सुंदर संगम साधला, तर ती केवळ उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाची संस्था राहणार नाही, तर जागतिक मराठी समाजासाठी एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जाईल. पुढील पिढी अभिमानाने म्हणेल—"आम्ही जागतिक नागरिक आहोत, पण आमची मुळे मराठी आहेत."
आज BMM Seattle 2026 चे आयोजन होत असताना, आयोजक स्वयंसेवकांना आणि अधिवेशनात सहभागी होणाऱ्या मराठी समाजाला तुम्ही कोणता संदेश द्याल?
Seattle 2026 चे सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मराठी बांधवाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. असे अधिवेशन हे केवळ तीन दिवसांचा सांस्कृतिक सोहळा नसतो; तो असतो अनेक वर्षांच्या स्वप्नांचा, अथक परिश्रमांचा, निस्वार्थ सेवाभावाचा आणि शेकडो स्वयंसेवकांच्या समर्पणाचा सुंदर उत्सव. पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकामुळेच हा सोहळा यशस्वी होतो. त्यांचे योगदान दिसत नसले, तरी प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे त्यांची मेहनत आणि समर्पण दडलेले असते.
एक छोटीशी ओळ आठवते—
"माणसं जोडत गेलो, तरच समाज घडतो;
संस्कृती जपत राहिलो, तरच वारसा टिकतो."
अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्वांना माझा एकच संदेश आहे—या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या. कार्यक्रमांचा आस्वाद घ्या, नव्या मैत्री जोडा, जुन्या नात्यांना नव्याने उजाळा द्या आणि आपल्या मुलांना या संस्कृतीचा अनुभव जगू द्या. कारण संस्कृती केवळ पुस्तकांतून शिकवली जात नाही; ती अशा भेटींमधून, संवादातून आणि सामूहिक अनुभवातून पुढच्या पिढीकडे पोहोचते. माझ्यासाठी BMM म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर जगभर विखुरलेल्या मराठी मनांना जोडणारा भावनिक सेतू आहे. भौगोलिक अंतर कितीही असले, तरी भाषा, संस्कृती आणि आपुलकीची नाळ आपल्याला कायम एकत्र ठेवते.
शेवटी, कुसुमाग्रजांच्या भावनेला साजेशा काही ओळी—
"जिथे मराठी मनं एकत्र येतात,
तिथे अंतरांची सारी बंधनं विरघळून जातात.
हातात हात, मनाशी मन जोडत,
आपण संस्कृतीचा दीप पुढे नेत राहतो.
कारण—
'आम्ही जगभर विखुरलो असलो, तरी आमची मुळे मराठी मातीतच रुजलेली आहेत.'
Seattle 2026 हे अधिवेशन केवळ आठवणी देणारे ठरू नये, तर नव्या नात्यांची, नव्या संकल्पांची आणि नव्या प्रेरणेची सुरुवात ठरो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
मुलाखतकार: अश्विनी क्षीरसागर