
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलातून वारी निघाली होती. एक अनुभवी म्हातारा माणूस आणि त्याचा तरुण नातू दोघे त्या वारीचं नेतृत्व करत होते. आजोबा नातवाच्या गप्पा अगदी रंगात आल्या होत्या आणि तितक्यात- जंगलाची हवा पालटली, तुफान वेगाने वारे वाहू लागले, कर्कश्य शिट्ट्या वाजू लागल्या, आणि बघता बघता त्या सगळ्यांना दरोडेखोरांच्या टोळीने घेरलं, मुखियाने त्या तरुण पोराची बॅग पकडली आणि सर्वांना उद्देशून म्हणाला, जे काही सोबत आहे ते इथे सोडून निघा, नाहीतर सगळ्यांची खांडोळी करतो कि नाही बघा. त्या काळात जंगलामधून जाताना अशी वारकऱ्यांची लूटमार होणं नेहमीचं झालं होतं, दाट जंगलात त्यांचा शोध घेणं अवघड गोष्ट होती, लुटले गेलेले वारकरी बिचारे नशिबाला दोष देत रिकामे हात हलवत पुढच्या वाटेला निघायचे, पण... पण आजचा दिवस जरा वेगळा होता. ज्याची बॅग मुखियाने धरली होती त्या तरुणाने एक हलकं स्मित केलं, जणू काही तो यांची वाटच बघत होता. पुढच्याच क्षणी त्या तरुणाची मजबूत लाथ त्या मुखियावर पडली आणि मुखिया हवेत चार फूट उडाला, सगळे दरोडेखोर अचानक झालेल्या या हल्ल्याने भांबावून गेले आणि दोन पावलं मागे सरकले. तरुणाने हातातल्या पताक्यामधला झेंडा काढून आजोबांकडे दिला आणि झेंड्याची काठी हत्यारासारखी पुढे करून आक्रमण करण्याच्या पवित्रा घेऊन उभा राहिला, बाकी सर्व वारकरी त्याच्या मागे गेले. हर हर महादेव, बस एक ललकारी आणि आपला नायक त्या सहा दरोडेखोरांवर असा तुटून पडला कि त्यांना पळता भुई थोडी झाली. सर्व दरोडेखोर अक्षरश: पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटले. आपले वारकरी सुद्धा त्या तरुण पोराच्या भवती गोळा झाले, आजोबाने मोठ्या आनंदाने कौतुकाची थाप त्याच्या पाटीवर मारली आणि म्हणाले, "वाह गड्या, मोठा पराक्रम गाजवलास, आज त्या राक्षसांना पण कळलं असेल, कि गरज पडलीच तर शांत विठ्ठलाचं रूप असणारा एखादा वारकरी वेळेला शंभू महादेवाचं रूप घेऊन धारकरी सुद्धा होऊ शकतो. चला, पुढच्या प्रवासाला निघू, बोला, पाऊले चालती... पंढरीची वाट...
चित्ररूपात पाहण्यासाठी इथे जा-
https://www.instagram.com/reel/Da16OtZxc60/?igsh=YTdxbXp4OHJldDlw