गोठ्याची वाडी

Submitted by स्टीव रॉजर्स on 12 July, 2026 - 12:32

मुंबईसारख्या शहरात माणूस कधीच एकटा नसतो, असं म्हणतात.
आजूबाजूला हजारो माणसं असतात. लोकलच्या डब्यात, बसमध्ये, रस्त्यावर, बाजारात... प्रत्येक क्षणी कोणीतरी आपल्या शेजारून जात असतं. तरीही काही माणसं अशी असतात की त्यांचं आयुष्य गर्दीच्या मध्यभागी असूनही एकाकी असतं.
शेखर आपटे त्यापैकीच एक.
दादरच्या हिंदू कॉलनीला लागून असलेल्या जुन्या चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात त्याचं बालपण गेलं. चाळ ब्रिटिशांच्या काळातली. जाड दगडी भिंती, लाकडी गॅलरी, लोखंडी जिने, पावसाळ्यात भेगांमधून झिरपणारं पाणी आणि सकाळ-संध्याकाळ देवघरांतून ऐकू येणारे शंख, घंटा, आरतीचे स्वर—हेच त्याचं विश्व होतं.
त्याची आई, सुमित्रा, शेखर पाच वर्षांचा असतानाच वारली. तिची आठवण त्याच्या मनात फारशी उरली नव्हती. देवघरात ठेवलेल्या कृष्णधवल छायाचित्रातला हसरा चेहरा आणि वडिलांनी कधीतरी सांगितलेल्या दोन-चार गोष्टी, एवढीच त्याची आई.
आई गेल्यानंतर श्रीधरशास्त्री आपटे यांनी स्वतःला पूर्णपणे मुलासाठी वाहून घेतलं. दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांनी कधी केला नाही. सकाळी चार वाजता उठून स्नान, संध्यावंदन, देवपूजा आणि त्यानंतर पौरोहित्याची कामं—हा त्यांचा दिनक्रम वर्षानुवर्षे तसाच होता.
मुंबईतल्या अनेक घरांमध्ये त्यांचा मोठा मान होता. सत्यनारायणाची पूजा असो, गृहप्रवेश असो, नामकरण असो की श्राद्ध—लोक आवर्जून त्यांनाच बोलवत. त्यांच्या मंत्रोच्चारात दिखाऊपणा नव्हता; पण प्रत्येक शब्दात विलक्षण स्थैर्य होतं. पूजा सुरू झाली की घरातलं वातावरण नकळत गंभीर आणि पवित्र होत असे.
लहानपणी शेखर त्यांच्या मागे मागे फिरत असे. पूजेची पिशवी उचलणं, फुलं आणणं, तांब्या भरून ठेवणं, एवढ्यापासून सुरुवात झाली. नंतर त्याने संकल्प म्हणायला शिकला. पुढे ऋचा, सूक्तं, अभिषेक, होमहवन... एक दिवस असा आला की वडील फक्त त्याच्याकडे पाहून मान हलवत आणि शेखर पुढचा मंत्र सुरू करत असे.
बापलेकांमध्ये फार बोलणं नसायचं.
पण त्यांचं मौनही बोलकं होतं.
श्रीधरशास्त्रींनी शेखरला दोन गोष्टी शिकवल्या होत्या.
पहिली—धर्म कधी विकायचा नसतो.
दुसरी—भीती माणसाला बाहेरून कमी, आतून जास्त खात असते.
दुसऱ्या वाक्याचा अर्थ मात्र त्यांनी कधीच समजावून सांगितला नव्हता.
शेखर दहा-अकरा वर्षांचा असताना शाळेत एक उपक्रम झाला होता.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मूळ गावाबद्दल सांगायचं होतं.
कोणी कोल्हापूरचं वर्णन केलं. कोणी साताऱ्याचं. कोणाचं गाव विदर्भात, तर कोणाचं कोकणात.
शेखरची पाळी आली तेव्हा तो काही क्षण गप्प उभा राहिला.
"तुझं गाव?" शिक्षकांनी विचारलं.
"मला माहीत नाही."
संपूर्ण वर्ग हसला.
त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर त्याने पहिल्यांदाच वडिलांना विचारलं,
"बाबा, आपलं मूळ गाव कुठलं आहे?"
श्रीधरशास्त्री देवघरात समई लावत होते.
त्यांच्या हाताची हालचाल क्षणभर थांबली.
इतकाच क्षण.
मग त्यांनी वात पेटवली, देवाला नमस्कार केला आणि शांतपणे म्हणाले,
"आपलं घर मुंबईत आहे."
"ते माहीत आहे. पण आधी?"
यावेळी त्यांनी उत्तर दिलं नाही.
खिडकीतून बाहेर पडणाऱ्या संध्याकाळच्या पावसाकडे ते बराच वेळ पाहत राहिले.
मग मंद आवाजात म्हणाले,
"काही जागा आयुष्यात मागे सोडलेल्या चांगल्या असतात."
"का?"
"कारण प्रत्येक माणूस जिथे जन्मतो, तीच जागा त्याचं घर असते असं नाही."
शेखरला उत्तर समजलं नाही.
पण त्याला एवढं मात्र जाणवलं की हा विषय वडिलांना अजिबात आवडलेला नाही.
त्या दिवसानंतर त्याने पुन्हा कधी गावाबद्दल विचारलं नाही.
पण त्या रात्री...
त्याला पहिल्यांदा ते स्वप्न पडलं.
(क्रमशः)

------
त्या रात्रीचं स्वप्न आयुष्यभर शेखरच्या मनात कोरलं गेलं.
पण जाग आल्यावर त्याला त्यातलं फारसं काही आठवलं नाही.
फक्त तीन गोष्टी.
अखंड कोसळणारा पाऊस.
कुठेतरी दूरवरून येणारा मंद गुंजारव.
आणि काळ्याकुट्ट अंधारात क्षणभर चमकून नाहीसा झालेला निळसर प्रकाश.
बाकी सगळं धुक्यासारखं विरून गेलं.
सकाळी उठल्यावर त्याने हा विषय पुन्हा काढला नाही. श्रीधरशास्त्रींनीही काही विचारलं नाही. जणू काल काही घडलंच नव्हतं.
आयुष्य पुन्हा आपल्या नेहमीच्या लयीत सुरू झालं.

वर्षं सरत गेली.
शेखरच्या चेहऱ्यावर मिशी-दाढी आली. आवाजात गंभीरपणा आला. वडिलांसोबत पूजा करत फिरणारा मुलगा आता स्वतंत्रपणे विधी करू लागला. मुंबईतल्या अनेक घरांत त्याची ओळख तयार झाली होती.
श्रीधरशास्त्री मात्र पूर्वीसारखेच होते.
त्यांच्या आयुष्यात घड्याळाच्या काट्यांप्रमाणे शिस्त होती.
पहाटे चारची जाग.
स्नान.
संध्यावंदन.
देवपूजा.
आणि मग दिवसभराचं काम.
कधी कधी शेखरला वाटायचं, हे माणूस थकतच नाही का?
पण वय कोणालाच सोडत नाही.
साठी ओलांडल्यानंतर त्यांच्या चालण्यात नकळत मंदपणा आला. जिना चढताना ते पूर्वीसारखे भराभर चढत नसत. पूजा आटोपून घरी आल्यावर काही वेळ शांत बसून राहत. "वय झालं रे," एवढंच म्हणून विषय मिटवत.
शेखर मात्र आतून काळजी करू लागला होता.

एक दिवस दुपारी ते दोघे एका गृहप्रवेशाच्या पूजेवरून परतत होते.
जूनचा शेवटचा आठवडा.
आकाश ढगांनी भरून आलं होतं.
अरबी समुद्राकडून येणारा वारा दमट झाला होता. हवेत पावसाचा गंध दाटून राहिला होता.
घरात येताच श्रीधरशास्त्रींनी उपरणं खुंटीवर टांगलं आणि पाणी प्यायला तांब्या उचलला.
पण तांब्या हातातून निसटला.
पितळ जमिनीवर आपटल्याचा आवाज खोलीभर घुमला.
शेखर धावत स्वयंपाकघरात आला.
श्रीधरशास्त्री भिंतीला टेकून उभे होते. चेहरा फटक पडला होता.
"बाबा!"
"काही नाही... जरा भोवळ आली."
त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला; पण त्या हसण्यात नेहमीचं आश्वासन नव्हतं.
दुसऱ्याच दिवशी शेखर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला.
तपासण्या सुरू झाल्या.
एक डॉक्टर.
मग दुसरा.
पुन्हा चाचण्या.
औषधं.
रक्ततपासणी.
एक-दोन आठवडे गेले; पण प्रकृतीत फारसा फरक पडला नाही.
आजाराचं नाव डॉक्टर सांगत होते.
पण त्या नावापेक्षा शेखरला वडिलांचा दिवसेंदिवस कमी होत जाणारा उत्साह अधिक भेसूर वाटत होता.

त्या दिवसानंतर श्रीधरशास्त्रींनी बाहेरची कामं कमी केली.
आता शेखर एकटाच बहुतेक पूजा करू लागला.
रात्री जेवण झाल्यावर दोघे बराच वेळ खिडकीजवळ बसून पाऊस पाहत असत.
एके रात्री श्रीधरशास्त्री अचानक म्हणाले,
"शेखर..."
"हं?"
"तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे."
शेखर हसला.
"हे अचानक कशासाठी?"
"सहज."
"काहीतरी मनात आहे तुमच्या."
श्रीधरशास्त्रींनी उत्तर दिलं नाही.
ते बराच वेळ बाहेरच्या अंधाराकडे पाहत राहिले.
मग शांत स्वरात म्हणाले,
"आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं आपण देत नाही."
"मग?"
"ती वेळ देते."
शेखर हलकंसं हसला.
"तुम्ही नेहमी असंच कोड्यात बोलता."
श्रीधरशास्त्रीही हसले.
पण त्या हसण्यात एक थकवा होता.
आणि...
एक खोल दुःखही.

पावसाळा चांगलाच जोरात सुरू झाला.
एका पहाटे शेखर देवघरात पूजा करत असताना बाहेर काहीतरी आपटल्याचा आवाज झाला.
तो धावत बाहेर आला.
श्रीधरशास्त्री जमिनीवर कोसळले होते.
त्यांचा श्वास जोरात चालू होता.
शेखरने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
डॉक्टर उपचार करत होते.
शेखर बाहेर बाकावर बसला होता.
पहिल्यांदाच त्याला रुग्णालयाचा वास असह्य वाटत होता.
भिंतीवरील घड्याळाचा प्रत्येक ठोका त्याच्या छातीत आदळत होता.
दोन तासांनी डॉक्टर बाहेर आले.
"प्रकृती गंभीर आहे."
एवढंच ते म्हणाले.
त्या रात्री शेखर वडिलांच्या पलंगाशेजारी बसून राहिला.
पहाटेच्या सुमारास श्रीधरशास्त्रींनी अलगद डोळे उघडले.
त्यांनी हाताने शेखरला जवळ बोलावलं.
"कपाट..."
त्यांचा आवाज अगदी क्षीण झाला होता.
"वरचा कप्पा..."
शेखर त्यांच्या अगदी जवळ झुकला.
"तिथे..."
त्यांनी श्वास सावरला.
"...एक पत्र आहे."
"कसलं पत्र?"
"मी... गेल्यावर... वाच."
"बाबा, असं काही बोलू नका."
श्रीधरशास्त्रींनी त्याचा हात घट्ट धरला.
त्या क्षणी त्यांच्या डोळ्यांत प्रथमच शेखरने भीती पाहिली.
स्वतःच्या मृत्यूची नव्हे.
तर...
काहीतरी मागे राहणाऱ्या गोष्टीची.
त्यांनी मोठ्या प्रयत्नाने ओठ हलवले.
"मी... तुला... एका गोष्टीपासून... इतकी वर्षं... दूर ठेवलं..."
वाक्य अर्धवट राहिलं.
खोकल्याची उबळ आली.
डॉक्टर धावत आत आले.
शेखरला बाहेर जावं लागलं.
काचेच्या पलीकडे उपचार सुरू होते.
काही मिनिटांनी यंत्राचा एक सलग आवाज संपूर्ण खोलीत घुमला.
आणि...
शेखरच्या आयुष्यातली सर्वांत मोठी शांतता सुरू झाली.

-----
श्रीधरशास्त्रींच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
सकाळ होईपर्यंत चाळीतल्या प्रत्येक घराचं दार उघडलं होतं. शेजारी, परिचित, यजमान, मित्र—ज्यांच्या घरात कधी ना कधी श्रीधरशास्त्रींनी पूजा केली होती, अशी कितीतरी माणसं शेवटचा निरोप द्यायला आली होती.
घरात मंत्र नव्हते.
आरती नव्हती.
फक्त दबक्या आवाजात चाललेली कुजबुज आणि अधूनमधून येणारे हुंदके.
शेखर मात्र शांत होता.
अतिशय शांत.
कधी कधी दुःख इतकं मोठं असतं की डोळ्यांत पाणीही येत नाही.
अंत्यविधी पार पडले.
दहावे, बारावे, तेरावे.
धार्मिक विधी करताना तो स्वतःच मंत्र म्हणत होता; पण प्रत्येक मंत्रोच्चारात त्याला वडिलांचा आवाज ऐकू येत होता. ते बाजूला उभे आहेत, एखादा उच्चार चुकला तर नेहमीप्रमाणे दुरुस्त करतील, असा भास पुन्हा पुन्हा होत होता.
तेराव्या दिवशी संध्याकाळी शेवटचा पाहुणा निघून गेला.
चाळ पुन्हा आपल्या नेहमीच्या गतीने जगू लागली.
पण आपटे यांच्या घरात काळ जणू थांबून राहिला होता.

त्या रात्री शेखर पहिल्यांदाच पूर्णपणे एकटा होता.
खोलीत एकच दिवा लावलेला होता.
देवघरात समई तेवत होती.
भिंतीवर आईचा फोटो.
त्याच्या शेजारी नुकताच लावलेला श्रीधरशास्त्रींचा फोटो.
त्या दोघांकडे पाहताच त्याच्या मनात एकाच वेळी रिकामेपणा आणि जबाबदारीची जाणीव दाटून आली.
तेवढ्यात त्याला रुग्णालयात वडिलांनी उच्चारलेले शब्द आठवले.
"कपाट... वरचा कप्पा..."
तो हळूहळू उठला.
भिंतीलगतच जुनं सागवानी कपाट उभं होतं.
या कपाटात वडिलांनी आयुष्यभराची कागदपत्रं, पोथ्या, पंचांगं आणि धार्मिक ग्रंथ जपून ठेवले होते.
वरचा कप्पा त्यांनी जवळजवळ कधीच उघडला नव्हता.
शेखरने कपाटाचं दार उघडलं.
जुन्या कागदांचा, चंदनाचा आणि बंद लाकडाचा मंद वास बाहेर आला.
वरच्या कप्प्यात पंचांगांचा गठ्ठा ठेवलेला होता.
तो बाजूला करताच त्याला एक पिवळसर लिफाफा दिसला.
लिफाफ्यावर वडिलांच्या ओळखीच्या हस्ताक्षरात फक्त तीन शब्द लिहिले होते.
"फक्त शेखरसाठी."
शेखर बराच वेळ तो लिफाफा हातात धरून बसून राहिला.
जिवंत असताना जे सांगितलं नाही...
ते मृत्यूनंतर पत्रातून सांगण्याइतकं कोणतं गुपित असू शकतं?
त्याने खोल श्वास घेतला.
लिफाफा अलगद उघडला.
आत दुमडलेली काही पानं होती.
पहिल्याच ओळीत वडिलांचं हस्ताक्षर पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.

प्रिय शेखर,
हे पत्र तू वाचत असशील, तर माझा प्रवास संपला असेल. आयुष्यभर मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. त्याबद्दल तू माझा राग करशील, तरी मला ते मान्य आहे. पण त्या वेळी माझ्याजवळ दुसरा मार्ग नव्हता.
आपलं मूळ गाव मुंबई नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात, डोंगर आणि समुद्र यांच्या मध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात आपल्या पूर्वजांचं घर आहे. त्या गावाचं नाव—गोठ्याची वाडी.
गोठ्याची वाडी.
हे नाव वाचताच शेखर क्षणभर थिजून बसला.
हे नाव त्याने आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं.
तरीही...
ते पूर्णपणे अनोळखी वाटत नव्हतं.
जणू फार वर्षांपूर्वी कुणीतरी हे नाव त्याच्या कानात कुजबुजलं होतं.
तो पुन्हा पत्र वाचू लागला.

त्या घरात गेली अनेक वर्षं एक कुटुंब भाड्याने राहत आहे. माझ्यानंतर त्या घराची जबाबदारी तुझ्यावर येईल. तू तिथे जा. घराची पाहणी कर. कागदपत्रं व्यवस्थित करून घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव—तिथे गेल्यावर कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस.
गावात तुला अनेक गोष्टी ऐकायला मिळतील. काही लोक भीतीपोटी बोलतील. काही अंधश्रद्धेपोटी. काही जाणीवपूर्वक खोटं बोलतील. पण कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस. आधी पाहा. मग विचार कर. आणि शेवटीच विश्वास ठेव.
शेखरच्या भुवया नकळत उंचावल्या.
वडिलांचा स्वभाव त्याला चांगला माहीत होता.
अंधश्रद्धेवर त्यांचा कधीच विश्वास नव्हता.
मग पत्रात अशी सूचना का?
तो पुढे वाचू लागला.

मी तुला आणखी बरंच काही सांगू शकलो असतो. पण काही सत्यं ही दुसऱ्याच्या शब्दांत समजत नाहीत. ती स्वतः अनुभवावी लागतात.
फक्त एकच विनंती आहे.
गोठ्याची वाडीला नक्की जा.
कारण मी आयुष्यभर ज्यापासून पळत राहिलो...
त्याचा सामना कदाचित आता तुला करावा लागेल.

पत्र तिथेच संपलं.
ना कारण.
ना स्पष्टीकरण.
ना पुढची सूचना.
फक्त शेवटी...
– तुझा बाबा
शेखर बराच वेळ निश्चल बसून राहिला.
खिडकीबाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता.
थेंबांचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता.
त्याने पत्र पुन्हा दुमडलं.
लिफाफ्यात ठेवणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं...
लिफाफ्याच्या तळाशी अजून एक दुमडलेला कागद अडकलेला होता.
तो पत्र नव्हता.
तो एका जुन्या घराचा हाताने काढलेला नकाशा होता...
आणि नकाशाच्या खाली फक्त एकच शब्द लिहिला होता—
"जपून."

-------
तेरावेआटोपून चार दिवस झाले होते.
चाळीतलं आयुष्य पुन्हा नेहमीच्या गतीने सुरू झालं होतं.
सकाळी सहाला दुधवाल्याची घंटी. त्यानंतर वर्तमानपत्रं दारावर आपटल्याचा आवाज. शाळेच्या गणवेशात धावत जाणारी मुलं. नोकरीला निघालेल्या माणसांची लगबग. दुपारी गॅलरीत बसून गप्पा मारणाऱ्या काकू. संध्याकाळी देवघरांतून ऐकू येणाऱ्या आरत्या.
सगळं पूर्वीसारखंच होतं.
फक्त आपटे यांच्या घरात वेळ थांबून राहिली होती.
देवघरात समई तेवत होती; पण तिची वात आता शेखर बदलत होता.
सकाळचा चहा तो स्वतःच करत होता.
स्वयंपाकघरात दोन ताटं काढण्याची सवय अजून मोडली नव्हती. हात नकळत दुसरं ताट काढत असे आणि लगेच तो थबके. काही क्षण ते ताट हातात धरून उभा राहे. मग हळूच परत कपाटात ठेवून देई.
त्या क्षणी घरातली शांतता आणखी गडद होत असे.
रात्री झोपण्यापूर्वी श्रीधरशास्त्रींची खोली बंद करण्याची त्याची हिंमत होत नव्हती. दार उघडंच राहायचं. आतल्या खुर्चीवर त्यांचं उपरणं अजूनही तसंच घडी करून ठेवलेलं होतं. जणू ते बाहेर गेले आहेत आणि थोड्याच वेळात परत येणार आहेत.
पण प्रत्येक सकाळ त्याला एकाच गोष्टीची आठवण करून देत होती—
आता ते कधीच परत येणार नव्हते.

घर आवरण्याचं काम त्याने मुद्दाम पुढे ढकललं होतं.
काही वस्तूंना हात लावण्याचं धाडस होत नव्हतं.
पण आता ते करणं भाग होतं.
त्याने मोठी पिशवी काढली आणि एकेक कप्पा रिकामा करायला सुरुवात केली.
जुन्या पोथ्या.
ताडपत्रीवर लिहिलेली काही हस्तलिखितं.
वर्षानुवर्षांची पंचांगं.
वडिलांचा जाड काचांचा चष्मा.
चांदीची छोटी घंटा.
रुद्राक्षांची माळ.
प्रत्येक वस्तू हातात घेताना एखादी आठवण जागी होत होती.
एका जुन्या डब्यात त्याला पांढऱ्या खडूचा तुकडा सापडला.
तो पाहताच तो नकळत हसला.
लहानपणी अभ्यास करायला बसला की श्रीधरशास्त्री काळ्या पाटीवर संस्कृत श्लोक लिहून दाखवत. एखादा उच्चार चुकला की हाच खडू त्यांच्या बोटांमध्ये फिरत असे.
"ऋ म्हणताना जीभ मागे घे."
"दीर्घ आणि ह्रस्व यात फरक ठेव."
"मंत्र पाठ करणं सोपं आहे; पण अर्थ समजून म्हणालास, तर त्यात शक्ती येते."
तो खडू हातात धरून शेखर बराच वेळ बसून राहिला.
घरात माणसं नसली, तरी आठवणींची गर्दी होती.

दुपार सरत आली होती.
बाहेर पाऊस सुरू झाला.
जुन्या कौलांवर पावसाचे थेंब आपटू लागले.
शेखर खिडकीपाशी उभा राहिला.
समोरच्या गॅलरीत देशमुख काका बसले होते. हातात वर्तमानपत्र होतं; पण त्यांचं लक्ष वाचनात नव्हतं. त्यांनी दूरूनच शेखरकडे पाहिलं आणि हलकेच मान डोलावली.
ती मान डोलावणंही सांत्वनासारखंच होतं.
तेवढ्यात दारावर टकटक झाली.
दारात अभिजित उभा होता.
हातात गरम वडापावाचं पुडकं आणि दुसऱ्या हातात चहाचा थर्मॉस.
"आत येऊ?"
शेखर हलकंसं हसला.
"परवानगी कधीपासून घ्यायला लागलास?"
अभिजित आत आला.
दोघं बराच वेळ काही न बोलता बसून राहिले.
मित्र असण्याचा तोच तर अर्थ असतो.
प्रत्येक वेळी शब्दांची गरज नसते.
अभिजितने थर्मॉस उघडला.
दोन कपांत चहा ओतला.
"आठवतंय?" तो म्हणाला.
"काय?"
"बारावीचा निकाल लागला होता. तू नापास झालो असं समजून रडत बसला होतास."
शेखर हसला.
"आणि माझा सीट नंबरच चुकीचा वाचला होता."
"हो. मग आपण याच चहावर दोन प्लेट वडापाव संपवले होते."
दोघेही हसले.
हसू क्षणभर टिकून राहिलं.
मग पुन्हा शांतता.
अभिजितने हळूच विचारलं,
"कधी निघतोयस?"
"परवा."
"तिकीट काढलं?"
"हो. कोकणकन्या."
"एकटाच?"
"आणखी कोण आहे माझ्याबरोबर?"
अभिजितने उत्तर दिलं नाही.
त्याने फक्त शेखरच्या खांद्यावर हात ठेवला.
त्या स्पर्शात शब्दांपेक्षा जास्त आधार होता.
"लवकर परत ये," तो एवढंच म्हणाला.
शेखर खिडकीबाहेर पाहत राहिला.
पावसाच्या धारा आता आणखी दाट झाल्या होत्या.
"परत आलो..."
तो मंद हसला.
"...तर नक्की भेटू."
त्या वाक्यात नकळत एक विराम होता.
तो अभिजितलाही जाणवला.
पण त्याने त्याबद्दल काही विचारलं नाही.
-----
पावसाने रात्रभर उसंत घेतली नव्हती.
पहाट झाली, तरी आकाश काळ्याभोर ढगांनी भरून राहिलं होतं. चाळीच्या पत्र्यांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज इतका सतत होता, की त्याची सवय झालेल्या कानांनाही तो वेगळा जाणवत होता.
शेखर पहाटेच उठला.
आज पहिल्यांदाच त्याला कुठल्याही यजमानाच्या घरी जायचं नव्हतं. कुठली पूजा नव्हती. कुठलाही मुहूर्त नव्हता.
आज तो स्वतःच्या आयुष्यातला एक अध्याय संपवणार होता.
त्याने स्नान केलं.
नेहमीप्रमाणे देवघरात समई पेटवली.
श्रीगणेश, कुलदैवत आणि घरच्या देवांना नमस्कार केला.
मग आई-वडिलांच्या छायाचित्रांसमोर बराच वेळ निश्चल उभा राहिला.
श्रीधरशास्त्रींच्या छायाचित्राला हार अजून ताजा होता.
शेखरने अलगद हात जोडले.
"मी निघतोय, बाबा..."
इतकंच.
पुढे शब्द फुटले नाहीत.
त्याने खिशातून वडिलांचं पत्र काढलं. क्षणभर ते छायाचित्रासमोर धरलं आणि पुन्हा जपून आत ठेवलं.
ते पत्र आता कागद उरलं नव्हतं.
तेच त्याचा मार्गदर्शक होतं.

घरात फारसं सामान नव्हतं.
काही कपडे.
धार्मिक ग्रंथ.
काही भांडी.
एक लोखंडी ट्रंक.
वडिलांचं कपाट.
मोठं सामान त्याने तसंच ठेवून दिलं होतं. शेजारी देशमुख काकांकडे किल्ली ठेवायची ठरलं होतं.
देशमुख काका सकाळपासूनच दारात उभे होते.
त्यांच्या हातात काळी छत्री होती.
"सगळं झालं?"
"हो."
"काळजी करू नकोस. घराची जबाबदारी माझी."
शेखरने किल्ली त्यांच्या हातावर ठेवली.
देशमुख काकांनी ती मुठीत घट्ट धरली.
"तुझ्या बाबांनी या चाळीत चाळीस वर्षं काढली. त्यांनी कोणाचं वाईट केलं नाही. हे घर तुझी वाट पाहील."
शेखरच्या घशात काहीतरी अडकलं.
त्याने मान हलवली.

दार ओढून घेताना तो थांबला.
त्या जुन्या लाकडी दारावर हात फिरवला.
लहानपणी उंची मोजताना श्रीधरशास्त्रींनी पेन्सिलने काढलेल्या रेघा अजूनही चौकटीवर होत्या.
१९९७
२००१
२००५
प्रत्येक वर्षासमोर एक छोटी रेघ.
आणि बाजूला वडिलांच्या अक्षरात लिहिलेली उंची.
शेखरच्या बोटांनी त्या रेघांना स्पर्श केला.
नकळत त्याच्या ओठांवर हसू उमटलं.
"यंदा पुन्हा मोजू..."
असं श्रीधरशास्त्री दरवर्षी म्हणायचे.
आता ती रेघ तशीच राहणार होती.
त्याने हळूच दार बंद केलं.
कुलूप लावलं.
किल्ली दोनदा फिरवली.
धातूचा तो छोटासा आवाज त्याच्या मनात मात्र फार मोठा घुमला.
काही कुलुपं दारांना लागतात.
काही आयुष्याला.

खाली उतरून तो गल्लीत आला.
पाऊस अजूनही कोसळत होता.
समोरची पानटपरी.
कोपऱ्यावरचं जुनं हनुमान मंदिर.
दर रविवारी वडिलांसोबत घेतलेला गरम चहा.
गल्लीत क्रिकेट खेळताना फुटलेल्या खिडक्या.
पहिल्यांदा सायकल चालवताना पडलेली जागा.
प्रत्येक कोपरा त्याच्याकडे पाहत असल्यासारखा वाटत होता.
टॅक्सी दाराशी येऊन उभी राहिली.
चालकाने डिकीत बॅग ठेवली.
शेखर बसला.
टॅक्सी हळूहळू पुढे सरकली.
त्याने मागच्या काचेतून शेवटच्यांदा चाळीकडे पाहिलं.
देशमुख काका अजूनही पावसात उभे होते.
त्यांनी दूरून हात उंचावला.
शेखरनेही हलकेच हात हलवला.
क्षणभरात वळण आलं.
आणि चाळ दिसेनाशी झाली.
तो काही वेळ तसाच मागच्या काचेकडे पाहत राहिला.
जणू पुन्हा ती दिसेल, अशी एखादी बालिश आशा मनात उरली होती.
पण मुंबईत मागे गेलेले रस्ते परत दिसत नाहीत.
टॅक्सी पुढेच जात राहते.
आणि आयुष्यही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जुन्या दगडी कमानींवर पावसाचं पाणी अखंड ओघळत होतं.
फलाटावर नेहमीची लगबग होती. कुणी घाईघाईने डबा शोधत होतं, कुणी नातेवाईकांचा निरोप घेत होतं, तर कुणी पावसापासून वाचण्यासाठी बॅग डोक्यावर धरून धावत होतं.
त्या गर्दीत शेखरही होता.
पण त्याच्या चेहऱ्यावर कुठेही घाई नव्हती.
जणू तो प्रवासाला नव्हे, तर आयुष्याच्या पुढच्या अध्यायाकडे चालला होता.
कोकणकन्या एक्स्प्रेस आधीच फलाटावर उभी होती.
पावसाच्या सरींनी तिच्या निळ्या डब्यांवर पाण्याच्या असंख्य रेघा उमटल्या होत्या.
शेखरने आपली जागा शोधली.
खिडकीजवळची सीट.
त्याने बॅग वरच्या रॅकमध्ये ठेवली. खिशातून वडिलांचं पत्र काढलं, क्षणभर हातात धरून पुन्हा काळजीपूर्वक आत ठेवलं.
गाडी सुटायला अजून काही मिनिटं होती.
समोरच्या बाकावर एक वृद्ध दांपत्य बसलं होतं. आजीच्या हातात स्टीलचा डबा होता. आजोबा वारंवार तिकीट काढून पाहत होते. त्यांच्या शेजारी एक महाविद्यालयीन मुलगा कानात इयरफोन घालून बाहेर पाहत बसला होता.
प्रत्येक जण आपल्या जगात हरवलेला.
शेखरही.
अचानक शिट्टी वाजली.
गाडीने एक हलकासा धक्का दिला.
रुळांवर लोखंड घासल्याचा आवाज झाला.
फलाट अलगद मागे सरकू लागला.
शेखरने नकळत खिडकीबाहेर पाहिलं.
स्टेशनची भव्य इमारत.
ओल्या दगडी भिंती.
घड्याळाचा उंच मनोरा.
धावत येणारा एक उशिरा पोहोचलेला प्रवासी.
त्याच्या मागे हात हलवणारी लहान मुलगी.
क्षणात सगळं मागे पडलं.
गाडीने वेग घेतला.

सुरुवातीला खिडकीबाहेर फक्त मुंबई होती.
इमारतींची अखंड रांग.
लोहमार्गालगतच्या जुन्या चाळी.
पावसाने काळवंडलेले पत्रे.
भिंतींवरची फिकट झालेली जाहिराती.
कुठे क्रिकेट खेळणारी मुलं.
कुठे पावसात भिजत दुकान उघडणारा दुकानदार.
हीच ती मुंबई...
जिथे त्याने जन्म घेतला.
पहिलं पाऊल टाकलं.
आईला गमावलं.
वडिलांच्या हाताला धरून पहिल्यांदा देवळात गेला.
पहिल्यांदा मंत्र म्हटला.
पहिल्यांदा अपयश पचवलं.
पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं.
आज तीच मुंबई हळूहळू मागे सरकत होती.
गाडी पुढे धावत राहिली.
काही वेळाने इमारती विरळ झाल्या.
रस्त्यांची गर्दी कमी झाली.
ओल्या मातीचा वास खिडकीतून आत यायला लागला.
दूरवर सह्याद्रीची धूसर रांग दिसू लागली.
आकाश आणि डोंगर यांच्या मध्ये पावसाचं एक पातळ पांघरूण पसरलं होतं.
शेखरने खिडकीची काच थोडीशी खाली केली.
गार वाऱ्याचा एक झोत आत आला.
त्याच्याबरोबर भिजलेल्या मातीचा गंधही.
तो नकळत हसला.
मुंबईच्या हवेत असा वास कधीच नव्हता.

गाडी आता वेगात धावत होती.
दोन्ही बाजूंनी हिरवळ पळत होती.
मधूनच एखादा शुभ्र धबधबा डोंगराच्या कुशीतून खाली झेपावताना दिसे आणि क्षणात अदृश्य होई.
कुठे लाल मातीची शेतं.
कुठे पाण्याने भरलेली भातखाचरं.
कुठे नारळाच्या उंच झावळ्या वाऱ्यावर डोलताना दिसत होत्या.
शेखरची नजर त्या दृश्यांवर खिळली.
वडिलांनी आयुष्यभर या भूमीबद्दल एक शब्दही का बोलला नाही?
इतकं सुंदर ठिकाण...
मग त्यांनी कायमचं का सोडलं?
प्रश्न पुन्हा मनात डोकावला.
उत्तर मात्र अजूनही तसंच शांत होतं.

दुपार सरत आली.
आकाश आणखी गडद झालं.
पाऊस वाढला.
गाडी एका लांबलचक बोगद्यात शिरली.
क्षणात डब्यात अंधार पसरला.
खिडकीच्या काचेवर आता बाहेरचं काहीच दिसत नव्हतं.
फक्त...
शेखरचं स्वतःचं प्रतिबिंब.
त्याने सहज काचेकडे पाहिलं.
आणि...
क्षणभर त्याच्या छातीत धस्स झालं.
प्रतिबिंबात त्याच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसल्यासारखं वाटलं.
एक काळी, निश्चल आकृती.
चेहरा दिसत नव्हता.
फक्त उपस्थिती जाणवत होती.
गाडी बोगद्यातून बाहेर आली.
उजेड पडला.
शेखरने दचकून मागे वळून पाहिलं.
सीट रिकामी होती.
त्याने पुन्हा काचेकडे पाहिलं.
आता तिथे फक्त त्याचंच प्रतिबिंब होतं.
तो काही क्षण तसाच बसून राहिला.
मग हलकेच डोळे चोळले.
रात्रभर झोप झाली नव्हती.
कदाचित...
डोळ्यांचा भास असेल.
पण तरीही...

भाग 2 -- https://www.maayboli.com/node/88519

Group content visibility: 
Use group defaults

तुफान वातावरण निर्मिती साहेब ! प्रचंड आवडेश! मुंबईची असंख्य वर्णने असंख्यवेळी वाचली आहेत पण

पण मुंबईत मागे गेलेले रस्ते परत दिसत नाहीत.

एक नंबर लेखन आहे तुमचे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत आणि पुढील लेखनास शुभेच्छा.

il_fullxfull.2696921881_senc.jpg

Dhanyu

खूप दिवसांनी माबोवर छान कथा वाचतोय, कथा अर्धवट सोडूं नका

एक सूचना: कोकण कन्या एक्सप्रेस रात्री ११ वाजता CST हून सुटते आणि पहाटे ५.२५ रत्नागिरी पोहचते.

एक सूचना: कोकण कन्या एक्सप्रेस रात्री ११ वाजता CST हून सुटते आणि पहाटे ५.२५ रत्नागिरी पोहचते.>>>>>हेच सांगणार होते ( कोकातकोका)
बाकी कथा अर्धवट सोडून देऊ नका ही नम्र विनंती.

एक सूचना: कोकण कन्या एक्सप्रेस रात्री ११ वाजता CST हून सुटते आणि पहाटे ५.२५ रत्नागिरी पोहचते.>>>>>हेच सांगणार होते ( कोकातकोका)
बाकी कथा अर्धवट सोडून देऊ नका ही नम्र विनंती.

छान सुरुवात.
आता पुढचे भाग वाचते.

मजकुरात इतके एन्टर दिलेत, त्यामागे काही उद्देश आहे का?
(कारण त्यामुळे कथेच्या एकसंधतेला धक्का पोचतो.)