Submitted by मंदार खांबेटे. on 10 July, 2026 - 12:40
चेंगरलेल्या शहरामध्ये मंडळांचा घोळ,
नव्या सणाच्या नावाखाली नवा गदारोळ ;
थर्माकोलात बसवून देवा नवीन भिक मागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
घाई-गडबड, लगबग-तगमग नुसती पळापळ,
संस्कृतीच्या आड घरच्या लक्षुमीचा छळ ;
आपला नारायण सारं सोफ्यावरती मागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
चार दिवस घरोघरी आरत्यांचा नाद,
नंतर पुन्हा तीच खुसपूस तोच जुना वाद;
माळ्यावरती मखर जाता पुन्हा राक्षस जागतो,
घरात देव नसल्यावरती, देव आणावा लागतो!
देवाचेही दिवस ठरवून भक्ती करतो आम्ही,
माणूसकीवर आस्तिकतेची सक्ती करतो आम्ही;
देव कोण? आपण कोण? वेगळे वेगळे वाटतो?
घरात देव नसल्यावरती देव आणावा लागतो!
- मंदार खांबेटे ©
#कवी_मी ♥️
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.