लाल मुंग्या (गूढकथा)

Submitted by करभकर्ण on 10 July, 2026 - 11:26

लाल मुंग्या..

हळूहळू त्या लाल मुंग्या पलंगाच्या एका पायावरून वर चढू लागल्या. त्यांची ती भली मोठी रांग संथ गतीने माझ्याकडे कूच करत होती. माझे डोळे मिटलेले होते. सभोवताली घनघोर शांतता होता. तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातील संवेदना मला दस्तक देत होत्या की, लाल मुंग्याची ती फौज माझ्यावर चालून येत आहे. कोणत्याही क्षणी त्यांनी माझ्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली असती, पण तरीही मी तसाच शांत पडून होतो. त्या मुंग्यांना कुठला विरोध करावा अथवा दोन्ही हातांच्या पंजांनी त्या ठेचून काढाव्यात असे अजिबात वाटत नव्हते. त्यांना अवरोध करण्याची माझी इच्छाशक्तीच नष्ट झाली होती.
अचानक तळपायाला गुदगुल्या झाल्या. त्या मुंग्या आपल्या छोट्या छोट्या पायांनी माझ्या तळपायावर चढत होत्या. त्यांची रांग पुढे सरकत घोट्यापर्यंत आणि मग गुडघ्यापर्यंत आली. रांग भली मोठी दिसत होती. तळपायावर त्यांची ती फौज अजूनही चढतच होती. आता त्या छातीपर्यंत आणि मग कान, नाक, डोळे आणि तोंडापर्यंत पोहोचणार होत्या. आतातरी काहीतरी हालचाल करणे क्रमप्राप्त होते. नाहीतर ती त्यांची फौज माझ्यावर तुटून पडणार यात काही शंका नव्हती. त्या हजारो मुंग्या एकाच वेळी जर माझ्यावर तुटून पडल्या तर मी काय करू शकणार होतो? एखादी मुंगी चुकून चावली तरी मेंदूपर्यंत त्याची झिंग जाते. मग इथे तर हजारो मुंग्याच्या चावण्याचा प्रश्न होता. पण मी तसाच स्तब्ध, निश्चील पडलेलो होतो. ना कुठली हालचाल करत होतो ना कुठला विरोध! सर्व अंगात एक सुस्तपणा शिरला होता. सर्व अवयवांनी मेंदूच्या आज्ञा झिडकारल्या होत्या. संकट येत आहे! जवळ आले आहे! उठ संकटाचा सामना कर! किंवा मग त्याच्यापासून लांब पळ ! या सगळ्या सुटकेच्या गोष्टी मेंदू शरीराला वारंवार सांगू लागला, पण सगळे काही निरर्थक होते. शरीर पक्षघात झाल्यासारखे एकाच जाग्यावर स्तब्ध पडले होते. डोळ्यापुढे काळे वर्तुळे उमटत होते. त्या वर्तुळात मन कैद होत होते. एकंदरीत माझ्या शरीराने आणि मनाने स्वत:च्या रक्षणाचे सर्व हत्यारे फेकून दिले होते. आणि स्वत:ला त्या मुंग्यांच्या हवाली केले होते. एक स्थिर समाधी लावुन पुढे घडणाऱ्या घटनांची मुकाट्याने वाट पाहण्याशिवाय माझ्यापुढे गत्यंतरच उरले नव्हते.
एक हातात आणि एक खांद्यावर अशा दोन पिशव्यात सामान घेऊन मी खोलीत आलो. बऱ्याच धडपडीनंतर ही खोली मिळाली होती. शहराच्या या गर्दीत निवारा मिळणे महाकठीण झाले असता, अशी लहान-सहान खोली मिळणेही समाधानाची बाब होती. शहरापासून थोडी दूर असली तरी शहरात जायला यायला चांगला रस्ता होता. वाहनांची गर्दी तुरळक होती. गोंगाट कमी होता. आणि आजूबाजूला खेळती हवा होती. कामाचे ठिकाण येथून जवळच होते. त्यामुळे मला खोली आवडली होती. पण खोलीची जरा दुर्दशा दिसत होती. ती बरेच दिवस बंद असल्याचे लक्षणे पाहताक्षणीच दिसत होते. खालची फरशी काळवंडली होती. तिच्यावर जागोजागी काळ्या-करड्या रंगाच्या खपल्या धरल्या होत्या. काही भिंतीचा रंग उडालेला होता. डाव्या बाजूच्या भिंतीवर फिक्कट पिवळ्या रंगाचे डाग कुठे कुठे दिसत होते. त्यात काही ठिकाणी रंगाचे आणि सिमेंटचे हलकेसे पापुद्रे बाहेर आलेले होते. एखाद्या राकट पुरुषाच्या चेहऱ्यावर पांढरे कोड फुटले असल्याचा भास होत होता. कुबट वास नाकात शिरत होता. वरच्या सिमेंटी पत्राच्या चिरा ठळकपणे नजरेस येत होत्या. आणि त्या खोलीच्या मागच्या बाजूला एक माणूस झोपू शकेल अशा मापाचा, एक लाकडी पलंग ठेवलेला होता. त्यावरही बरीच धूळ साचलेली होती. एकंदरीत खोलीची अवस्था प्रचंड निराशजनक होती. पण काही तक्रार करून चालणार होते का? गपगुमान खोलीत येऊन साफसफाईला लागणेच उत्तम ठरणार होते. आणि मी आता तेच करायला सुरुवात केली होती.
खोली हळूहळू साफ होत होती. दारावर, खिडक्यांवर साचलेले जळमटे, जाळे बाहेर निघू लागले. भिंतीवरचे पापुद्रे खरडले जात होते. फरशीवर पाणी पडताच तिचा मुळचा पांढरसा रंग नजरेसमोर येऊ लागला. डाव्या भिंतीवर एक काचेच्या चौकटीत फोटो टांगलेला दिसत होता. काचावर धूळ बसल्यामुळे त्यातला चेहरा दिसत नव्हता. उत्सुकते पोटी त्यावरची धूळ पुसून काढली. चेहरा दृश्यमान झाला. साधारणता माझ्याच वयाच्या तरुणाचा फोटो दिसत होता. एका मोठ्या खडकावर बसून, डावा हात गालाला लावलेल्या पोझेतला तो फोटो पाहून, मला हसायला आले. तो तरुण कोण असावा? स्वत:चा फोटो असा मागे ठेऊन तो कुठे गेला असावा? कदाचित तो आधी याच खोलीत राहत असावा. आणि आता कुठे दुसरीकडे गेला असावा. पण मग हा फोटो तरी का मागे ठेवला असेल? काही कळायला मार्ग नव्हता. असो! असेल काहीतरी कारण आपल्याला काय? तो फोटो काढून कचऱ्याच्या ढिगात झोकून दिला.
खोली आता टापटीप दिसू लागली. कोंदट वास नाहीसा झाला होता. लाकडी पलंग झोपण्यासाठी उपयोगी येणार होता. दोन पिशव्यातील सामान खोलीत मांडून ठेवले. मागच्या तीन तासापासून चाललेली धावपळ आता कुठे शांत झाली होती. पलंगावर अंग टाकताच शरीराला चांगलाच आराम मिळाला.
मन आणि शरीर जरा थाऱ्यावर येताच, गतकाळातील आठवणी मेंदूतून भराभरा बाहेर येऊ लागल्या. पण या सगळ्या आठवणीत गंगा आणि प्रभू यांची आठवण तीव्र आणि ताजी होती. गंगा माझी पत्नी आणि प्रभू माझा पाच वर्षाचा मुलगा. दोघेही होते , आता नाहीत! सहा महिन्यापूर्वी अपघातात दोघे गेले. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाडीने दोघे उडाले.लांबवर फेकल्या गेले. आणि काही क्षणात दोघांचा मृत्यू झाला. चालणारा बोलणारा माझा संसार त्या एका धडकेने कोसळून पडला. आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो. लहान होतो तेव्हा आई बाप गेले आणि नेमक्या कुठे संसाराला सुरुवात केली तेव्हा, बायको आणि मुलगा गेले. या अशा जगात, या मरणाचे दु:ख पदराला कवटाळून मी एकटाच उरलो होतो. ना कोणाची सोबत होती ना कोणाचा आधार! गंगा आणि प्रभू गेल्यानंतर जगण्याची इच्छा सुद्धा उरली नव्हती. जगणे असह्य झाले होते. पण जीवन संपवण्यासाठी लागणारी हिम्मत माझ्यात नव्हती. आत्महत्या करण्याएवढा शूर मी नक्कीच नव्हतो.तेवढे धाडस माझ्यात नव्हते. आम्ही तिघे राहत होतो त्या घरात राहणे मला शक्य नव्हते. त्या दोघांच्या आठवणी तिथे सारख्या माझ्याभोवती घुटमळत होत्या. तिथे डबल खोलीचे भाडेही एकट्यासाठी पुरणारे नव्हते. त्यामुळे तिथून आता या एका खोलीत आलो होतो.
पाण्याने डबडबलेले डोळे मी हाताने पुसले. डोक्यातून सारे विचार काढून टाकून मी अलगद डोळे मिटून घेतले. सूर्य तांबडा झाला होता. सावल्या लांबल्या होत्या. खोलीत अंधार भरून येत होता. चांगली दोन तासाची झोप झाली होती. खोलीतला पिवळा दिवा लावल्यावर खोली उजळून निघाली होती. त्या पिवळ्या दिव्याच्या उजेडात, डाव्या हाताच्या भिंतीवर काहीतरी उमटलेले दिसत होते. मी जवळ जाऊन नीट निरखून बघितले. फुट दोन फुट परिघात भिंतीवर लहान लहान पुरळ उठले होते. काही पापुद्रे बाहेर आलेले होते. दोन तीन लाल मुंग्या तिथे घुटमळत होत्या. मला जरा नवल वाटले. अगदी दोन तासापूर्वीच मी सगळी भिंत खरडून साफ केली होती. जळमटे, जाळे, पापुद्रे सगळे साफ केले होते, मग हे भिंतीवर काय उमटले आहे? काही कळत नव्हते. मी पुन्हा एकदा ते पापुद्रे खरडून काढले आणि भिंत साफ केली.
रात्र शांततेत गेली. नवीन जागा असल्यामुळे एक दोनदा झोप चाळवली. कुठलेतरी स्वप्न पडले होते पण आता ते बिलकुल आठवत नव्हते. सकाळी लवकर जाग आली. कामावर जाण्याची गडबड सुरु झाली. मनात कितीही दुख असेल,पिडा असेल तरी पोटापाण्याचा उद्योग कोणाला चुकला आहे का? सारे जग पोटाभवतीच तर फिरत असते. फरक फक्त पोटात असतो. भुकेत असतो. कोणाची भूक मोठी असते कोणाची अगदी तोकडी. पण तरीही त्या पोटासाठी पायपीट करावीच लागते. पोट तुमच्या भावनांना भिक घालत नाही. ते तुमच्या भावना समजून घेत नाही. त्याला अन्न पाहिजे. उर्जा पाहिजे. सुख, दुख, लोभ, माया, द्वेष, मत्सर या भावनांशी त्याला काही देणेघेणे नसते. तुम्ही सुखात असाल किंवा मग प्रचंड दुखात असाल तरी पोटाची खळगी भरावीच लागते. आणि त्यासाठी आता कामावर निघावे लागणार होते.
गाडीला किक मारून बाहेर पडत होतो. काल आजूबाजूचा परिसर पाहता आला नव्हता. पण आता सगळा परिसर नजरेपुढे होता. माझ्या खोलीच्या आसपास काही अंतरावर अजून अशाच खोल्या पसरलेल्या होत्या. जागा मुबलक असल्यामुळे खोल्यात बरेच अंतर होते. शहरापासून हा भाग जरा दूर असल्यामुळे इकडे पाहिजे तसे अजून शहरीकरण झालेले नव्हते. त्यामुळे शहरात असलेले नियोजन इथे बघायला मिळत नव्हते. घरांची, खोल्यांची दिशा,रचना, मांडण्या कशाही वेड्यावाकड्या होत्या. रस्त्यांना कुठूनही फाटे फुटत होते. बऱ्याच घरांच्या अवतीभवती वेड्या बाभळींचे झुडपे वाढलेले होते. माणसांची चहलपहल तुरळक दिसत होती. माझ्या खोलीच्या थोड्या अंतरावर असलेल्या खोलीबाहेर एक माणूस बसलेला दिसत होता. माझ्याकडेच बघत असावा बहुतेक. मी त्याच्याकडे बघून हलकेच स्मित केले. पण तो तसाच माझ्याकडे बघत होता. अगदी कोऱ्या नजरेने. मग थोड्या वेळात तो उठून त्याच्या खोलीत निघून गेला. जरा विचित्रच वाटत होता तो. त्याचा नाद सोडून मी कामाकडे रवाना झालो.
माणसाला नेहमी एक सुरक्षित वर्तुळ हवे असते. कन्फर्ट झोन हवा असतो. आपल्या हिताचे माणसे आसपास हवे असतात. मुळात माणूस समाजशील प्राणी आहे. समाजाच्या चाली-रिती, परंपरा, तत्वे, नियमे याला धरून त्याला चालावे, वागावे लागते. याच समाजात त्याचे मित्र बनतात, शत्रू बनतात. पण नियमाला अपवाद असतात तसे काही माणसे यालाही अपवाद असतात. त्यांचे मित्र बनत नाहीत आणि शत्रूही. ते एकटेच राहतात. आपल्याच कोशात. तो त्यांच्या स्वभावाचा दोष असतो किंवा मग इतर काहीतरी. पण असेही लोक असतात. मीही तसाच नव्हतो का? मला तरी कुठे घनिष्ठ मित्र आहेत? आप्तेष्ट आहेत? जीवाभावाचे होते तेही या जगात नाहीयेत. आणि आताचा हा प्रसंग, हा साधा माणूसही आपल्याला भाव न देता खोलीत निघून गेला आहे. कठीण आहे सगळे!
आपण एकटेच बरे, अशी मनाची समजूत घालता घालता मी कामावर पोहीचलो. सगळे काम परिचयाचे होते. तेच ते काम करत असल्यामुळे ते अंगवळणी पडलेले होते. कामात वेळ पुढे निघून जात होता. एका मोठ्या आकाराच्या गेअरला थ्रेट पाडण्यासाठी लेथ मशीनवर लावून दिल्यावर, त्या गेअरकडे पाहता पाहता पुन्हा एकदा विचारचक्र सुरु झाले. गंगा, प्रभू, अपघात, खोली, काचेची ती फ्रेम, ते भिंतीवरचे पापुद्रे, सकाळचा तो माणूस सगळा घटनाक्रम डोळ्यापुढे तरळून जात होता. त्या विचारात बुडतच होतो की, मशीनचा अलार्म वाजला आणि त्या विचारचक्रातून मी कसातरी बाहेर आलो, आणि कामाला लागलो.
कामाला आलो तसाच आता माघारी निघालो. संध्याकाळची गार हवा अंगाला झोंबून पुढे जात होती. रस्त्यावर वाहनांची तुरळक गर्दी असल्यामुळे दुचाकी भरधाव वेगाने पुढे जात होती. रस्त्यावरच्या खांबावरचे पिवळे दिवे एक एक करून लागत होते. खोली जवळ येत होती. इकडे माणसांची गर्दी विरळ होती. क्वचित एखाद दोन माणसे नजरेस येत होते. येतानाच खानावळीत दोन घास घशाखाली घातले होते. हल्ली हे असे बाहेरचे खाणे जीवावर येत असे. गंगा होती तेव्हा फार क्वचित बाहेर खाण्याचा प्रसंग आलेला होता. मुळात आम्हा दोघांनाही बाहेरचे खाणेच आवडत नसे. त्यामुळे गंगा गेल्यापासून पोटाची पार अबाळ झाली होती. रात्रीचे जेवण तर बळेच करावे लागत होते. पण त्याला काही इलाज नव्हता. आज जरा अशक्तपणा जाणवत होता. काल खोलीची साफसफाई अंगाला भोवणार होती असे दिसत होते. सगळे अंग मुरडून आले होते. त्यात आज कंपनीतही कामातून फुरसत मिळाली नव्हती. शरीराला आरामाची गरज होती.
खोलीच्या आजूबाजूला काहीसा अंधार होता. बाजूच्या रस्त्यावर खांबाला पिवळा दिवा लटकलेला होता. त्याचा रोगट प्रकाश जमिनीपर्यंत जेमतेमच पोहोचत होता. त्या अंधुकशा प्रकाशात गाडी खोलीसमोर उभी केली. आजूबाजूला नजर टाकली तर सगळीकडे सामसूम दिसत होती. तो सकाळचा माणूसही जाग्यावर नव्हता. खोलीचे कुलूप काढून मी आत आलो. आत अंधार होता. दिवा लावताच खोली उजेडाने उजळून निघाली. मी सरळ पलंगावर अंग झोकून दिले. अशक्तपणा जरा वाढला होता. अंगातून गरम वाफा निघत होत्या. तापाची लक्षणे दिसत होती. गंगा गेल्यापासून मनाने मोठी हाय खाल्ली होती. अधूनमधून असे आजार उफाळून येतच होते. मनाचा उभारच नाहीसा झाला होता. त्यात हा अवतीभवतीचा परिसरही भकास, उदासवाना होता. आधी वाटले होते. माणसाची गर्दी नसलेल्या परिसरात मन लागेल, मनाला ताजेतवान वाटेल पण नेमके उलट घडत होते. मनाला प्रसन्न वाटेल, आनंद होईल असे काहीच आजूबाजूला नव्हते. बोलायला, चालायला एकही माणूस नव्हता. दिवसभरात एक माणूस नजरेस पडला होता, त्याच्याशी संवाद साधावा म्हटले तर तोही दळभद्री निघाला. उगाच मनावर मळभ चढू लागले. गंगाची, प्रभूची आठवण मन:पटलावर उमटू लागली. मी अलगद डोळे मिटून घेतेले. आणि झोपेच्या तयारीला लागलो.
अंगावर पांघरून घेताच, घामाने सगळे शरीर डबडबले. ताप अंगातून जरा उतरल्यासारखा वाटला. तोंडावरचे पांघरून बाजूला केल्यावर, अंग जरा हलके वाटू लागले. रात्रीचे अकरा वाजले होते. सभोवताली सर्वत्र शांतता पसरली होती. ना कुठले आवाज होते ना कुठल्या हालचाली. सगळी सृष्टी निपचिप पडली असावी असे वाटत होते. हा भाग, हा परिसर तसेच आजूबाजूचा भोवताल एव्हाना ही खोली हे सगळे जरा विचित्रच वाटत नव्हते का? मानवी समाजाचा स्पर्श अजून या भागाला पूर्णता झाला नव्हता का? माणसांच्या अवती भोवती घडणाऱ्या कुठल्याच घटना येथे घडत नव्हत्या. माणसांचा गोंधळ नव्हता. लहान मुलांचा किलबिलाट नव्हता. पक्ष्यांचे, प्राण्यांचे रेकाटणे नव्हते. रातकिड्यांचा किर्र्र्रर्र्र्र आवाज नव्हता. रोडवरच्या वाहनांच्या आवाजाशिवाय दुसरे काहीच कानावर पडत नव्हते. एव्हाना काही नजरेसही पडत नव्हते. एखादे कुत्रे, मांजर, घाणीतले डुक्कर किंवा मग सरपटणारा, रेंगणारा जीवही दिसत नव्हता. रेंगणारा! चालणारा! अचानक काहीतरी लक्षात आले. काल दोन-तीन मुंग्या पाहिल्याचे स्मरणात आले. मी झटक्यात पांघरून बाजूला केले. आणि त्या डाव्या हाताच्या भिंतीवर नजर टाकली.

“ हे काय आहे?
आपण पाहतोय ते खरच घडत आहे की आपल्या विस्मृतीत काही घोळ झाला आहे.
काल आपण स्वत:च्या हाताने ही भिंत खरडून काढली होती.
चकाचक केली होती,आणि आता हे काय दिसत आहे? "

टक लावून मी त्या भिंतीकडे बघत होतो. तिच्यावर आता दोन तीन फुटाच्या परिघात चांगले मोठ मोठे पापुद्रे बाहेर आले होते. त्या पापुद्र्यांच्या आसपास अनेक लाल मुंग्या फिरत होत्या. मला नवल वाटत होते. हे काहीतरी डोक्याबाहेरचे होते. मी जवळ जावून त्या पापुद्र्यांकडे, मुंग्याकडे बघत होतो. एखाद्या दगडाच्या, लाकडाच्या मूर्तीभोवती आदिवासी लोकांनी फेर धरावा तसा त्या मुंग्यांनी त्या पापुद्र्यांभोवती फेर धरला होता. त्या गोल गोल फिरत होत्या. त्यांचे ते फिरणे मोठे चमत्कारिक दिसत होते. पापुद्रे भिंतीला धरून चिकटले होते. थोडासा धक्का बसाल तरी ते खाली गळून पडत होते. भिंतीखाली बरेच पापुद्रे माती होऊन पडले होते. काल रात्री भिंत साफ केल्यापासून, आतापर्यंत ते एवढे वाढले होते. सकाळीही ते असतील पण कामाला जाण्याच्या घाई गडबडीत आपले त्याच्याकडे लक्ष गेले नसावे. सगळे काही गूढ होते. आता नेमके काय करावे काही कळत नव्हते.
मी हातात कापड घेऊन ते पापुद्रे खरडायला लागलो. मी त्या पापुद्र्याना हात लावला तशा त्या मुंग्या फिरायच्या थांबल्या. एक क्षण असे वाटले की त्या आपले नाकाडे वर करून माझ्याकडे बघत आहेत. त्या सगळया मुंग्याचे एकाच वेळी थांबणे. माझ्याकडे बघणे हे खासच होते. त्या क्रोधाने माझ्याकडे बघत असणार यातही शंका वाटत नव्हती. एखाद्या हिंस्र श्वापदाची शिकार लंपास केल्यावर तो जो आकांडतांडव करेल तशा त्या मुंग्या करत आहेत असे वाटत होते. एक क्षण मला त्यांची भीती वाटून गेली. एवढासा जीव त्याला कोणी घाबरेल का? पण इथे या अवस्थेत जर त्यांना कोणी पहिले तर नक्कीच भीतीचा पोटात गोळा उठल्याशिवाय राहणार नाही.
मी दोन पावले मागे सरकलो. आणि त्या मुंग्याकडे, त्या पापुद्र्याकडे बघू लागलो. मुंग्यांनी परत आता त्या पापुद्र्या भोवती फेर धरला होता. त्या गोल गोल फिरत होत्या. काहीतरी विचित्र, नवलाचे घडत होते हे नक्की. रात्री भिंतीवर फुटभरात पसरलेले ते पापुद्रे आता दोन तीन फुटापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या पृष्ट्भागाखाली काहीतरी काळे काळे दिसत होते. कदाचित भिंतीचा मूळ रंग असावा तो. एकदा ते पापुद्रे खरडल्यावर पुन्हा यायला नको होते, पण काल खरडलेले पापुद्रे आज पुन्हा दुप्पट वेगाने कसे प्रकट झाले होते? त्या पापुद्र्यांच्या पृष्ठभागाखाली ते काळे काळे तरी काय होते? मुळच्या भिंतीचा रंग म्हणावा तर तोही वाटत नव्हता. जरा जवळ जाऊन बघायचा प्रयत्न केल्यावर, एखादी खोल खोल गेलेली गर्ता असते तसे ते दिसत होते. अंधाराची पोकळी आरपार गेल्यासारखी वाटत होती. एखादा चेंडू आत फेकला तर तो खोल कुठेतरी अज्ञानात गेला असता. कालच्या पापुद्र्या खाली असे काही जाणवले नव्हते पण आताचे हे पापुद्रे वेगळेच होते. त्या पापुद्र्याच्या त्या काळ्या पोकळीत हात घालावा अशी तीव्र इच्छा होत होती, पण पुन्हा त्या मुंग्याचे नाकाडे वर करून माझ्याकडे पाहणे, हे आठवले की त्याला हात लावण्याची माझी हिमंत होत नव्हती.
अंगातले त्राण पुन्हा कमी होऊ लागले. अंग तापू लागले. ह्या पापुद्र्यांचा निकाल लावल्याशिवाय झोपही येणार नव्हती. डोक्यात सारखे तेच घुमले असते. मी घाबरलो होतो. भीतीचा मनावर पगडा पडला होता. पण त्या पापुद्र्याना, त्या मुंग्यांना घाबरण्यासारखे त्यांच्यात काय होते. त्या एवढ्या एवढ्याश्या मुंग्या त्या आपले काय वाकडे करू शकणार आहेत. आणि ते पापुद्रे, त्या पापुद्र्यांच्या पृष्ठभागाखाली असलेले ते काळे काळे, जे काय आहे तेही नक्की काय आहे तेही बघण्यात काय धोका आहे. काहीतरी हालचाल करावी लागेलच ना ?
मी हिमंत करून पुढे झालो. हातात कापड घेतले. आणि ते पापुद्रे खरडायला लागलो. त्या मुंग्या पुन्हा एकदा जागेवर उभ्या राहिल्या, आणि माझ्याकडे क्रोधाने बघू लागल्या. पण यावेळेस मी त्यांना जराही घाबरलो नाही. त्या पापुद्र्यावरून कापड फिरवला. आधी काहीसा खडबड आणि मग काहीसा हलता तरल स्पर्श हाताला झाल्यासारखा जाणवला. हात क्षणभर त्या भिंतीत घुसत असल्याचे जाणवले. पण क्षणभरच. पुन्हा हाताला टणक भिंत लागली. तो भास होता की वस्तुस्थिती? काही कळत नव्हते. पापुद्र्याची सगळी माती खाली भिंतीच्या कडेला पडली होती. आणि त्या मातीवर काही मुंग्याची मृत शरीरे पडली होती. भिंत खरडताना मुंग्या ठेचल्या गेल्या असव्यात. त्यांची ती चेंदामेंदा झालेली शरीरे खाली अस्ताव्यस्त पडली होती. त्यांच्यावर नजर जाताच,भीतीची एक सनक मेंदूत शिरली. अंगावर काटा उभा राहिला. काही क्षणाअगोदर ज्या मुंग्यांनी मला भीती दाखवली त्याच मुंग्या आता मृतावस्थेत पडल्या होत्या. त्यांच्याकडे जास्त वेळ पाहणे मला शक्य होणार नव्हते. मी नजर दुसरीकडे वळवली. भिंत आता स्वच्छ झाली होती. पापुद्रे नाहीसे झाले होते. मुंग्या मरून पडल्या होत्या. मनातील सारे विचार महत्प्रयासाने काढून टाकून मी अंग पलंगावर झोकून दिले.
माणूस झोपतो. माणसाचे शरीर स्थिर होते. मन एकाग्र होते. पण माणसाची एक चेतना मात्र जागीच असते. ती तुमच्यासोबत घडलेल्या दिवसभरातील घटनाक्रमांचे चिंतन, मनन करत असते. त्यावर मंथन करत असते. त्यातून निघणाऱ्या बऱ्या-वाईट अर्थांचे विश्लेषण करत असते. मग तेच अर्थ तुमच्या मनच:क्षुसमोर स्वप्न,भास म्हणून उमटत असतात. अगदी तसेच घडत होते. त्या मुंग्या, पापुद्रे, काळी गर्ता, मुंग्याचे गोल गोल फिरणे हे सारे डोक्यात घुमत होते. डोळ्यापुढे ते पापुद्र्यांचे ते दोन तीन प्रसंग येत होते. कधी अचानक झोपेतून जग येत होती तर कधी त्याचे स्वप्न पडत होते. अंगात आधीच त्राण कमी होते. त्यात झोप अशी मोडत होती. भास, स्वप्न यांनी मनात चलबिचल होत होती. सगळे काही विसंगत घडत होते. अंग चांगलेच पोळत होते. घामाने शरीर डबडबले होते. मनात नुसती विचारांची गर्दी दाटली होती. मी तसाच तळमळत पडलो होतो.
बराच अवधी गेला होता. रात्र पुढे सरकली होती. आता हळूहळू मन शांत होत होते. विचार हळू हळू एका जागेवर स्थिरावत होते. पहाटे पहाटे कधीतरी झोप लागली असावी.
‘मी पुन्हा पुन्हा त्या फोटोकडे बघत होतो. आणि माझ्यासमोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीकडे बघत होतो. ज्याचा फोटो मी कालच कचऱ्यात फेकून दिला होता. तोच व्यक्ती माझ्या पुढ्यात उभा होता. माझ्या नजरेला नजर भिडून. मला नवल वाटत होते. कदाचित तो त्याचा फोटो न्यायला परत आला असावा. त्याचा फोटो असा कचऱ्यात फेकून दिल्याचे मला आता वाईट वाटले. मी त्यासाठी त्याच्याकडे दिलगिरी व्यक्त करणारच होतो. पण तो माझ्याकडे अतिशय गंभीरतेने बघत होता. त्यामुळे त्याला काही बोलण्याची माझी हिंमतच होईना. बराच अवधी गेला. पण कोणीच काही बोलत नव्हते. शेवटी त्याने एका निर्वाणीच्या स्वरात मला सांगायला सुरुवात केली.

“ तु जो कोणी आहेस. तुला फक्त एकच संगतो, या खोलीत राहू नकोस. का राहू नकोस? कशामुळे राहू नकोस ? त्याचे कारण काय? या असल्या फालतू प्रश्नात पडू नकोस. आहे तसा या खोलीतून बाहेर जा. तुझे सामान, वस्तू आहे तशाच पडू दे. पण येथून निघून जा. इथे घडणाऱ्या काही अतार्किक घटना असतील, बाबी असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. त्यांच्या तपशिलात घुसू नकोस. इथे घडणाऱ्या गोष्टी सरळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. आपला सरळ इथून निघून जा. काही गोष्टी या कायम अनुत्तरीत असतात. त्यांचे स्पष्टीकरण कधीच कोणाला मिळत नाही. त्या अनादी काळापासून घडत आलेल्या असतात. त्यांचे चक्र अविरत सुरु असते. त्यात मग अनेकजण अडकतात. कधीही न सुटण्यासाठी. त्यामुळे अशा चक्रापासून जेवढे दूर जाता येईल तेवढे दूर गेलेलेच बरे ना? बाकी आता मी काही जास्त फाफट पसारा सांगत बसणार नाही. आता तुझा निर्णय तु घ्यायचा आहे. फक्त उशीर व्हायला नको.”
एका दमात तो हे असे बोलून निघून गेला. अगदी आला तसाच निघून गेला. आणि मी हातातल्या त्याच्या फोटोकडे बघत राहिलो.
एकदम दचकून मी जागा झालो. अगदी पहाटे पहाटे हे असे स्वप्न पडले होते. मी माझ्या हातावर नजर टाकली. हात रिकामे होते. त्या फोटोतला तो व्यक्ती, त्याचे ते बोलणे. सगळे आता आठवू लागले. खरेतर मला फार कमी स्वप्ने पडतात. आणि जे पडतात तेही लक्षात राहत नाहीत. पण आज तसे नव्हते. आज मला सगळे स्वप्न जसेच्या तसे आठवत होते. तो माझ्या हातात असलेला त्याचा फोटो. प्रत्यक्षात तो समोर आलेला, त्याचे ते बोलणे, मला या खोलीत न थांबण्याचा दिलेला निर्वाणीचा इशारा सगळे काही स्पष्ट आठवत होते.
सगळे अंग भिजलेले होते. ताप बराच वर आला होता. अंगात मरगळ दाटली होती. आणि त्यात हे स्वप्न पडलेले होते. पण नक्की हे स्वप्न आताच का पडावे? त्यातून मला काही दस्तक होती का? काही कळत नव्हते. दिवसभरातील घडामोडींचे हे पडसाद होते का? मन सुन्न झाले होते.
सकाळचे ऊन बरेच वर आले होते. खोलीत उन्हाचे कवडसे जागोजागी पसरले होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. पण जाग्यावरून उठू वाटत नव्हते. शरीर सुस्त झाले होते. असाच झोपून राहिलो तर जास्त आजारी पडू या विचाराने, जरा शरीराला जोर लाऊन उठायचा प्रयत्न केला. तेवढ्या हालचालीनेही दम लागला होता. तसाच उठून उभा राहिलो. आपसूकच नजर त्या पापुद्र्यांच्या भिंतीकडे गेली. अंगावर सरसर करून काटे उभे राहिले. आता हे जे घडत आहे, ते नैसर्गिक असूच शकत नाही. इथे काहीतरी मानवी तत्त्वाबाहेरचे घडत आहे ही माझी पक्की खात्री झाली होती. कालच्या स्वप्नाचा संदर्भ आता कुठे लागत होता. भिंतीवर आता सगळीकडे मोठमोठे पापुद्रे बाहेर आले होते. त्या पापुद्र्याच्या पृष्ठभागाखाली भले मोठे तोंड वासलेले काळे विवर होते. आणि त्या सगळ्यांच्या भोवती शेकडो-हजारो मुंग्या गोल गोल फिरत होत्या. सगळी भिंत त्या पापुद्र्यांनी,मुंग्यांनी व्यापून गेली होती. नेमके हे काय घडत आहे याचा काहीच संदर्भ मला लागत नव्हता. पण हे जे काही घडत आहे ते चांगले नाही हे कळत होते. काहीतरी अशुभ, अमंगळ, भ्रमित करणारे घडत आहे याची खात्री होत होती. कालचे ते स्वप्न त्या स्वप्नातील तो निर्वाणीचा इशारा मला आठवला. या खोलीतुन बाहेर गेले पाहिजे. इथे थांबणे धोकादायक आहे, ही जाणीव व्ह्याला लागली.
अंग शक्तिपात झाल्यासारखे वाटत होते. एक पाऊलही पुढे टाकणे शक्य होत नव्हते. सगळे डोके गरगरत होते. आसपासचा भोवताल आपल्याभोवती फिरत आहे, मेंदू हेलकावे खात आहे, कोणत्याही क्षणी आपण खाली कोसळून जाऊ असे वाटत होते. पण तरीही एक एक पाऊल टाकत मी दरवाज्याकडे जात होतो. नजर त्या भिंतीकडेच होती. त्या भिंतीतून आता पापुद्रे खाली गळत होते. मुंग्या वेगाने फिरत होत्या. माझ्या अंगावर भीतीने काटे उभे राहत होते. दरवाजा जवळ आला होता. मी अंगाताले होते तेवढे बळ लावले. दरवाजाची चौकट हाताला लागली. हाताने चौकटीला रेटा दिला आणि मी दरवाजाबाहेर आलो.
काहीतरी भसकन डोळ्यात गेल्यासारखे वाटले. प्रतिक्षिप्त क्रियेने मी उजवा हात डोळ्याआड लावला.दरवाजाबाहेर सगळीकडे पिवळा प्रकाश विखुरलेला होता. काहीच नजरेस पडत नव्हते. सगळा परिसर गडप झाल्यासारखा वाटत होता. त्या पिवळ्या प्रकाशाखाली अजूबाजुचे सगळे घटक, वस्तू, घरे, परिसर एकूनच सगळा अवकाश अदृश्य झाला होता. मी डोळ्यावरचा हात बाजूला काढला आणि पुढे बघू लागलो. पण ते जमेना. त्या पिवळ्या प्रकाशाचे किरणे डोळ्यात शिरत होते. त्याने अंग भाजले जात होते. आता हे नवीन काय आपल्यासमोर वाढून ठेवले आहे, काहीच कळत नव्हते. खोलीबाहेर पडायला आपल्याला उशीर झालेला आहे, ही गोष्ट आता प्रकर्षाने जाणवू लागली. मी कसेतरी आजूबाजूच्या खोल्यांकडे बघण्याचा प्रयत्न केला. तो कालचा माणूस नजरेस पडतो का हे बघू लागलो. पण काहीच नजरेस पडत नव्हते. सगळीकडे नुसता तो पिवळा प्रकाशच होता. मी जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला पण तोही व्यर्थ ठरला. माझा आवाज माझ्याभोवतीच विरून जात होता. कितीही जोरात ओरडलो तरी तो आवाज काही क्षणात विरत होता. मी ओरडून ओरडून थकलो होतो. अंगातले त्राण कमी होत होते. अंग भाजत होते, डोळे चुरचुर करत होते. आता इथे असे बाहेर जास्त वेळ मी उभा राहू शकत नव्हतो. आत खोलीतही जाऊ शकत नव्हतो. सगळी द्विधा झाली होती. भय, खेद, अगतिकता, दुख या सगळ्या संमिश्र भावनांनी डोक्यात गर्दी केली होती. माझ्या डोळ्यात पाणी दाटले होते. अगतिकता सर्व अंगभर पसरत चालली होती. या सगळ्या जगात आपण एकटेच आहोत. आपल्याला कोणाची सोबत नाही. आपल्या अस्तित्वाशी कोणाला काहीही देणेघेणे नाही. आपण मेलो काय आणि जगलो काय त्याचा इथल्या माणसाना, इथल्या व्यवस्थेला काही एक फरक पडणार नाही.आधी आईबाप गेले, मग बायको आणि मुलगा गेला आणि आता आपण जाण्याच्या मार्गावर आहोत. याचा कोणाला काही फरक पडला का? नाही! या सगळ्या मानवी समूहात एक क्षुद्र जीव आहोत आपण. मी मनातून कोसळून चाललो होतो. आता त्या प्रकाशाचा दाह सहन होत नव्हता. मी तसाच माघारी फिरलो. खोलीत आलो. खोलीतल्या त्या भिंतीकडे पाहण्याची माझी हिंमत होत नव्हती. न जाणो आपल्या दैवात काय वाढून ठेवले असेल ते? मी तसाच हळूहळू पलंगाकडे सरकत होतो. हळूच काहीतरी आवाज झाला. मी दचकून तिकडे बघितले. पापुद्रे गळत होते. त्याचा आवाज येत होता. भिंत हळूहळू मोकळी होत होती. मी गपकन डोळे मिटले. मला ते दृश्य बघायचे नव्हते. कसातरी मी पलंगाजवळ पोहोचलो. आणि त्या पलंगावर अंग झोकून दिले. शरीराला आराम लाभला. बरे वाटले. नाका-तोंडातून गरम वाफा निघू लागल्या. डोळ्यावर ग्लानी येऊ लागली. झोपेचा अंमल चढू लागला.
अचानक मोठा आवाज झाला. मी गरकन त्या दिशेने बघितले. भिंतीवरचे सगळे पापुद्रे गळून पडले होते. त्या पापुद्र्याखालचे ते काळे विवर आता उघडे पडले होते. ते हलते-तरल विवर आता स्पष्टपणे नजरेस पडत होते. आभाळाच्या पृष्ठभागावर एखादे होल अनंत अंतरापर्यंत खोल खोल गेलेले असावे तसे ते विवर दिसत होते. त्याची खोली, त्याचा गर्भ, तळ कधी हाताला लागेल असे वाटत नव्हते. एखाद्या हिंस्र प्राण्याच्या जबड्यासारखे ते विवर मला खुणावत आहे, असे एक क्षण वाटायला लागले. आता मला हालचाल करवत नव्हती. पण डोक्यात मात्र विचार प्रचंड वेगाने दौडत होते. आता मला एका एका गोष्टीचा उलगडा होत होता. तो फोटो, त्या फोटोतला तो तरुण. तो आपल्या पाठीमागे फोटो सोडून दुसरीकडे कुठे गेलाच नव्हता. तो इथेच होता. कुठेतरी अज्ञानात. पण इथेच आसपास. कदाचित त्या भिंतीत. त्या भिंतीतल्या काळ्या विवरात. कदाचित त्या अगोदरही अजून कितीतरी या खोलीत राहायला आले असतील. शेकडो जन इथे राहिले असतील. कितीतरी वर्षांपासून हे चक्र सुरु असेल. मी तर केवळ त्या चक्राच्या असंख्य पायापैकी एक पाय असेल.
आता ते काळे विवर फिरत होते. त्याभोवतीच्या लाल मुंग्या भिंतीवरून खाली उतरत होत्या. सावकाश सावकाश पलंगाकडे येत होत्या. माझे डोळे मिटलेले होते. अंगातील उर्जा नाहीशी झाली होती. मी कुठलीच हालचाल करू शकत नव्हतो. आता त्या मुंग्या तळपायावर आणि मग तोंडापर्यंत आल्या होत्या. मी किलकिल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघू लागलो. त्यांनी आता आपले नाकाडे वर केले होते. त्यांनी पवित्रा घेतला होता. आणि क्षणात ते घडले. त्या हजारो लाल मुंग्याचा दंश माझ्या शरीराला झाला. सुरुवातीला एक प्रचंड वेदना अंगभर पसरून गेली. काळे-पांढरे वर्तुळे डोळ्यासमोर चमकून गेली. शिरातून, धमन्यातून एक सनक मेंदूपर्यंत गेली. वेदनेचा एक मोठा स्फोट अंतरंगात झाला. आणि त्यानंतर सगळे काही शांत शांत वाटू लागले. वेदनेचा बहर ओसरून गेला. सगळीकडे एक सुखद शांतता पसरून गेली. शरीर हलके तरल जाणवायला लागले. पुराने नदीच्या पदरातले सगळे बरे-वाईट घटक वाहून न्यावेत तसे माझ्यातल्या सगळ्या चेतना,भावना, वेदना त्या दंशाने वाहून नेल्या होत्या.
मी आता आरामात जाग्यावरून उठलो. आता अंग गरम नव्हते. मी एकदम ठणठणीत होतो. पलंगावरून खाली आलो. त्या भिंतीजवळ आलो. ते काळे विवर नजरेसमोर होते. ते गोल गोल फिरत होते. त्या विवराला आता खोली, रुंदी होती. मी एक पाऊल पुढे टाकले विवराच्या अगदी तोंडाला आलो. आणि स्व:ताला त्या विवरात झोकून दिले. अगदी कायमचे.
मी म्हणालो होतो ना. इथे मी एकटा नाहीये. आम्ही शेकडोंच्या संख्येने येथे आहोत. या काळ्या गर्तेत पडलेलो. तो फोटोतला तरुणही येथेच आहे. मोठ्या कष्टाने त्याने स्वप्नाद्वारे मला सावध करण्याचा प्रयत्न केला होता.पण शेवटी इथे मी त्याच्या जवळच आलो होतो. इथे सगळे काळे काळे आहे. सगळ अवकाश काळा आहे. आम्ही सगळे काळे आहोत. आमचे आचार विचार सगळे काही काळे आहे. या काळ्या योजनेचे आम्ही सगळे काळे घटक आहोत. आम्ही जिवंत आहोत की मृत्त हे सांगणेही कठीण आहे. मुळात येथे जिवंत आणि मृत या कल्पनाच नाहीत. वेळ, काळाच्या संज्ञा नाहीत. जुने लोकही येथेच आहेत आणि नवीनही येथेच आहेत. आता काही काळ शांततेत, स्थिरतेत जाईल. मग कालांतराने कोणीतरी खोली बघायला येईल. खोलीची साफसफाई करेल. मग ते पापुद्र्यांचे दिसणे. ते खरडणे. पुन्हा त्यांचे उगवणे. त्याभोवती लाल मुंग्याचे फिरणे. ते काळे विवर! काळी खोल खोल गर्ता! आणी सगळ्यात शेवटी. त्या हस्तक लाल मुंग्याचा दंश आणि मग कायमची सुटका. हे चक्र असेच सुरु राहणार. अगदी अनादी काळासाठी! निरंतर.!

**समाप्त.
वैभव नामदेव देशमुख.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर कथा आहे, नारायण धारप आणि रत्नाकर मतकरींच्या पठडीतली. वातावरण निर्मिती तर अतिशय उच्च दर्जाची वाटली. कथानायक ज्या दुखः चक्रातून जात होता ते जाणवले इतके हे लेखन ताकदवान वाटले. पुढील लेखनास शुभेच्छा.

खूप छान कथा! काळे विवर हे केवळ भयाचे प्रतीक नसून, माणसाला हळूहळू गिळंकृत करणाऱ्या निराशेचे रुपक वाटले.

एक छोटी सूचना, प्रत्येक परिच्छेदानंतर एक रिकामी ओळ सोडली तर मजकूर कमी दाट वाटेल आणि मोबाईलवर कथा वाचायला अधिक सोपी होईल.
पुढील लेखनास शुभेच्छा!