कन्फेशन बॉक्स

Submitted by Madan Hunkare on 27 June, 2026 - 04:19

अशी एखादी गोष्ट असते ना? जिची कबुली जगाचा निरोप घेण्याआधी देणं गरजेचं आहे असं वाटतं,
पण वेगवेगळ्या कारणांनी ते जमत नाही.

कधी कधी भीडेखातर, कधी कुणी विचारलं नाही म्हणून, कधी कारण सापडत नाही म्हणून किंवा अशाच कुठल्याही कारणाने ती कबुली राहून जाते. तिचं ओझं असतं किंवा नसतं, पण आठवलं कि वाटतं, कधी योग येणार? उगीच लांबणीवर पडत जाते अशी ही गोष्ट आहे.अशा चक्रात जर अडकला असाल तर कन्फेशन बॉक्स मधे जाऊन कन्फेशन करणं हे आरोग्यदायी ठरतं.

कशाला शेवटच्या क्षणांची वाट बघयची? जितक्या लवकर हे ओझं उतरवून पुढे आनंदी राहता येईल तेव्हढं चांगलं.
कुठेच जमत नसेल आणि इथे व्यक्त होऊन मोकळे वाटत असेल तर इथे कन्फेशन देऊ शकता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा़झा एक चांगला मित्र होता.
खूपदा मी त्याच्याकडे स्वतःहून जायचो. तो भेटला कि असाच भरभरून बोलायचो. मी त्याला स्वतःहून फोन करायचो. आधी त्याच्याकडूनही असाच उबदार प्रतिसाद मिळायचा. आम्ही दिवस दिवस, रात्र रात्र भटकायचो. वाट्टेल ते शेअर करायचो, इतकं जे सख्ख्या भावालाही सांगू शकणार नाही. हळू हळू वय वाढत गेलं.

त्याच्याकडून थंडा प्रतिसाद मिळायचा. मी कितीही फोन केले तरी त्याचा फोन यायचा नाही. नंतर मोबाईल फोन आले. त्याच्यावर मिस्ड कॉल दिसतात. त्याने एकदाही उलटून फोन केला नाही. मी त्याच्याकडे गेलो कि "पाच मिनिट बस, मी आलोच" म्हणून निघून जायचा. तास दोन तासांनी मी तिथेच असलो कि "अरे सॉरी कामात आहे" असं म्हणायचा.

हा मला टाळतोय हेच समजलं नाही. कारण त्याच्याकडून अपेक्षाच नव्हती. जेव्हां समजलं तेव्हां खूप दु:खी झालो. त्याच्या बायकोनं भडकवलं असेल असा विचार केला. मग पुन्हा त्याला भेटलो नाही. तो पण रिटायर झाल्याचं समजलं. पण त्याला भेटायला गेलो नाही. एकदा रस्त्यात दिसला, पण थांबलो नाही. त्याने आरशात मला पाहिलं. मी तसाच निघून गेलो.

नंतर का म्माहीत नाही मनाला डाचणी लागली.
म्हटलं आपण एकतर्फी विचारत तर न्नाही करत? हा विचार मनात आल्याबरोबर प्रत्येक नाराजीची दुसरी बाजू दिसायला लागली. म्हटलं त्याच्या स्पेस वर आपण आक्रमण करत असू. त्याला मित्र समजून त्याला अडचणीत आणत असू. त्याला सांगता येत नसेल.

नाराज झाल्याने चांगला मित्र दुरावला. याचं कन्फेशन त्याला कसं द्यायचंं? ते इथेच देऊ शकतो.

तुमच्या ओरिजिनलचा Happy

धागा खराब करू नका प्लीज. मी तुमच्या कुणाचंच काही वाईट केलं नाही.

माझ्या नणदेच्या प्रमिता नावाच्या अतिशय गोड , वेल्हाळ मुलीशी बोलता बोलता मी फार पूर्वी तिला जात विचारलेली. आणि तिचा चेहरा पडला वगैरे तिने जात सांगीतली वगैरे. पण मग तो खेळकरपण आमच्यात कधीच आला नाही ना वेल्हाळपणा. इन फॅक्ट शी कॉम्प्लिमेन्टेड मी. तिला मी आवडलेले होते. ती लहान होती. मी तरुण होते. मी संकुचित होते. पुढे देश बदलला, क्षितीजे रुंदावली. लहानपणीची काही बाळकडू ही कडू असतात हे कळले. असो. Sad आय विल रिपेन्ट इट टु माय डेथ्बेड.
----------
बाकी पश्चात्ताप नाहीत कारण फिट्टमफाट झालेली आहे , होत असते. त्यामुळे कर्ज नाही कोणाचं.

माझ्या नणदेच्या प्रमिता नावाच्या अतिशय गोड , वेल्हाळ मुलीशी बोलता बोलता मी फार पूर्वी तिला जात विचारलेली. आणि तिचा चेहरा पडला वगैरे तिने जात सांगीतली वगैरे
नवीन Submitted by सामो on 27 June, 2026 - 17:46

सामोताई तुमच्या नणंदेचा आंतरजातीय विवाह होता का? सजातीय असेल तर जी जात तुमच्या पतीची आहे तीच तिची पर्यायाने तिच्या मुलीची असेल ना?

सॉरी मैत्रिण *
अज्ञान बालक चूक लक्षात आणुन दिल्याबद्दल आभार. ती नणंदेची, मैत्रिण होती.

कन्फेशन:

कौटुंबिक stability आणि जबाबदाऱ्यांच्या नादात क्षमतेपेक्षा कमी लेव्हलचे काम करतोय. आजकाल दिवाभित झाल्यासारखे झाले आहे, ट्रान्स्फर तर होणार नाही, टिकून तर राहता येईल ? ह्या प्रश्नांनी विचारमग्न असतो, एकेकाळी आमच्या विभागात मी अतिशय धडाडीचा आणि आले अंगावर का घे शिंगावर पद्धतीनं क्लायंट सांभाळणारा म्हणून प्रसिद्ध होतो, आता मीच कातडी वाचवून काम करतो असे feel होते, बॉसचे पासबुक भरणे इत्यादी चाटू कामे पण पत्करली आहेत, आतल्या आत हे सगळे मला जाळत सुटले आहे, मी आरश्यासमोर उभा राहू शकत नाही, ज्युनिअर मंडळी मला हा कुठला कोण "लिचड" बॉस आहे असे बघते आणि तुमच्या adventurous कामांच्या फक्त गोष्टी ऐकल्या आहेत सर असे म्हणून जाते, मी मान खाली घालून ऐकतो. नाही, सुसायडल इत्यादी नाही झालेलो मी, पण कधीतरी मनात दाटून येते की सगळे झुगारून जसा होतो तसा परत व्हावे, एकेकाळी मी Gym Rat होतो, आता दाढी पिकवून मणभर वजनाची ढेरी अन् नष्ट झालेली इज्जत सावरत एक एक दिवस कंठतो. Social gatherings मध्ये जाणे बंद केले आहे, पुस्तके वाचत एकटा बसणे आवडते, पावसाळा आवडतो, मुंबईच्या पावसात "जरा भिजून येतो" म्हणून घरातून बाहेर पडतो नाक्यावर एक सिगारेट मारतो संथ चालत घरी येतो, मुंबईच्या मुसळधार पावसात बेटे ढसाढस रडलो तरी कोणाला कळत नाही, घरी येतो, अंग पुसतो जेवतो झोपतो, परत सकाळी उठून ऑफिसमध्ये जातो, जेम्या लेका ढेरी आहे का पखाल ऐकून स्वतःच खदाखदा हसत सिनियर ज्युनिअर मंडळींचा विदुषक म्हणून कर्तव्यावर हजर रहायला.

मजेत आहे मी.

तुम्हाला कळतय हे महत्वाचे आहे. तिथेच अर्धी लढाई जिंकली आहे जेम्स वांड. मायक्रोहॅबिटसनी सुरुवात करा. हा हा म्हणता पुन्हा सगळं वैभव परत येइल.

थँक यू ! प्रयत्न सुरू आहेत, बघूया कितपत यश येते. मायक्रो हॅबिट्स बद्दल अजून काही सांगू शकाल का ? काही यूट्यूब व्हिडिओ असले तरी चालतील, मदत म्हणून मागतोय हे पण कन्फेस करून टाकतो.

@मदन आपले असंख्य आभार, हा धागा काढल्याबद्दल, एकंदरीत बरे आणि हलके वाटले कन्फेशन लिहून मला तरी.

कधीकधी वाटते आपण ओझ्याचे बैल आहोत हे मान्य करून टाकणं बरं असतं. (पु ल देशपांडे) पटेश असते वाक्य राव.

जेम्स वांड फार पूर्वी मी मायक्रो हॅबिटसबद्दल प्रथम वाचलं. मला वाटतं 'मिडिअम' वरती. 'मिडिअम' वरचे लेख मला आवडतात. - https://medium.com/write-a-catalyst/micro-habits-the-science-of-small-ch...

पण आपण शोधलत बरच काही सापडेल. आता हा शब्द प्रचलित झालेला आहे. एकदम मोठा घास घेउन ठसका लागण्यापेक्षा, लहान मॅनेजेबल घास घ्यायचे. लहान लहान सवायींनी सुरुवात करुन एकच सवय नीट अंगी बाणवून मग दुसर्‍या सवयीकडे वळायचे. अशय या सवयींचा ढीग आपल्याला साठवायचा आहे.
माझ्यासारख्या 'होर्डिंग' आवडणार्‍या व्यक्तीकरता ही संकल्पना फार सेक्सी आहे. शिवाय बावरुन जायला (ओव्हरव्हेल्म) होत नाही हा फायदा.

- जेवणानंतर १०० पावले चालायचे. १०० च.
- फ्लॉस करणे
- गादीवर पडण्याआधी, १० वेळा प्राणायाम किंवा खोल श्वास घ्या.
- रोज १० ओळी लिहा
- ठराविक वेळेला रोज एखादे डुडल करा.

वगैरे बरेच सजेशन्स सापडतील.

मानवी स्वभाव आहे मदत करण्याचा. त्याबद्दल कौतुक केले पाहीजे. पण कन्फेशन बॉक्सची कल्पना माझ्या मते कुणाजवळ तरी व्यक्त होणे ही आहे. त्यावर फादर फक्त धीर देतात. (ते सुद्धा माणूसच असतात. ते गंभीर गुन्ह्यात पोलिसांना वर्दी देऊ शकतात. हा वेगळा विषय).
कन्फेशन दिल्यानंतर त्या व्यक्तीला मोकळे वाटावे. त्यावर माझ्या मते चर्चा नको व्हायला. अर्थात हे माझे मत आहे. छोट्या छोट्या गोष्टीत मदतीच्या भावनेने दिलेले सल्ले उपयोगी पडतात हे मान्य आहे.

@सामो थँक यू वेरी मच

@राज सहमत - थोडा मीच drift झालो कारण अनुभव नाही, बुडता आहे काडीचा आधार मिळाला म्हणून जरा पसरलो, पण point well taken.

कन्फेशन देऊन बरे वाटते म्हणून अजून एक -

पोकळ मैत्रीचे वासे, अकरावीत होतो तेव्हा बालपणापासून सोबत असणारे आम्ही चारपाच "मित्र" शिकवण्यांना लांब जावे लागते म्हणून गाड्या घेऊ धजलो.

सगळ्यांनी त्याकाळी सुप्रसिद्ध अशी टीव्हीएस स्कूटी ई. एस. (तत्कालीन किंमत २९,०००/-) घेतल्या तेव्हा मी आपली चादर पाहून हिरो पुक (ऑटोमॅटिक) घेतली (किंमत १८,०००/-) , त्यावर एकदा फिरायला जाताना लक्षात आले की त्या गाडीचे passing lights किंवा headlights on/off करायला ignition वरून चावी हलवावी लागत असे, मला हरकत नव्हती, पुढे वाकून चावी फिरवण्याची किंवा १८,०००/- पूक चालवण्याची पण तितक्यावरून दात विचकत "अठरा आणि एकोणतीस मधे काहीतरी फरक असेल का नाही भोसडीच्या" म्हणून हीन पद्धतीने माझ्या तत्कालीन लायकीचा उद्धार मनात खोलवर बसला होता,

मागच्या वर्षी जीप मेरिडियन काढली तशी स्कूटीचे २९,०००/- दाखवून आता स्विफ्ट डिझायर मध्ये फिरणाऱ्या त्याच "मित्राला" फोन करून ये कधीतरी तुला ४८ लाखाच्या गाडीत फिरवतो, काय भोसडीच्या ८ लाखाच्या टॅक्सी मधे फिरतो असे म्हणले

कधी कधी म्हणतात बदला/revenge ही सर्वाधिक शुद्ध भावना असते, पण त्या माणसाला तसे म्हणलो खरे तरी जाणवले नाही, नंतर मनाला सल बसली की आपण उगाच मनात ठेऊन वेळ प्रसंग न पाहता उद्धटपणा केला, पण दुसरीकडे एक दुचाकीची किंमत काढणे हा एकच मुद्दा होता संबंधित कायम असाच बुली करण्याच्या मोड मध्ये असे, लहानपणापासून त्याचा एक impact पडला आहे मनावर, अजूनही यूट्यूब वर "मॅन/बॉय हम्बल बुलीज" व्हिडिओ पाहताना ASMR फील येते

बरोबर का चूक सांगवत नाही पण कन्फेशन आहे बुवा.

कॉलेजात असताना एका लहान मुलाच्या हातातून पार्कर pen ढापला होता.. मला आवडायचा पण ठरवूनही घेता येण्याची ऐपत नव्हती, म्हणून तोच pen जसा दिसला तसा त्या मुलाला खेळवत खेळवत ढापला. विशेष म्हणजे तो पेन माझ्याकडे जवळपास 8 वर्ष टिकला.. मध्यंतरी चोरलेला पेन गहाळ झालेला तेव्हा मी विकत घेतलेला सेम पीस, आणि तो हरवलासुद्धा.. पुन्हा हा चोरलेला पेन सापडला.. आता पुन्हा सापडत नाहीये, पण मला माहिती आहे हे चौर्यकर्म अधून मधून आठवत राहते तसा तो पेन पुन्हा सापडेल मला...

अशीच अधून मधून माझ्या मनातल्या 2 प्रिय मुलींची आठवण येत जात राहते. त्यांना बोलावं अस वाटतं पण बायकोला घाबरतो. त्यांच्यासोबतचे chat मी मेल वर सेव्ह करून ठेवले होते.. म्हणजे एका स्पेशल मेल id वर पाठवून माझ्या primary mail च्या sent item मधून डिलिट केलं होतं, पण ते chat सुद्धा कधीकधी आपोआप मेलबॉक्समध्ये दिसतं.. बहुतेक ते drive की कुठंतरी बॅक अप झालं असेल.. परवा तर काहीतरी शोधताना लॅपटॉपवर तो इमेल समोर आला, शेजारीच बायको बसलेली. अगदी निर्ढावलेल्या अँक्टर प्रमाणे वागून एकदम कूल वागून तो मेल डिलिट केला.. मनातल्या मनात एवढी फाटलेली की आभाळाच ठिगळ केलं तरी पुरले नसते.

टिनेज नुकतेच पार करत असताना एका ओळखीच्या घटस्फोटीत महिलेसोबत नाही नाही ते काम करून बसलो होतो, अर्थात त्यातही मी पुढाकार घ्यायचो नाही पण तेव्हा मजाही वाटायची आणि नंतर जरा विचित्र वेगळं वाटायचं. कोवळ्या वयात मला वाटायचं मी पुरुषार्थ गाजवतोय, पण आता वाटतं तो माझ्यावरच झालेला काहीतरी वेगळा अत्याचार होता. नंतर तसा अनुभव मिळवण्यासाठी एकदा वेश्यागमना करण्याचा प्रयत्न केला, फसला.. नंतर इथलेच समीरबापू गायकवाड यांचे लेखन वाचून मी किती मोठी फालतुगिरी, पाप करण्याच्या मार्गावर होतो ते लक्षात आलं. तेव्हापासून वेश्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

बाकी आता मला शारीरिक तर होतच नाही, पण मानसिक प्रतारणा होत असेल माझ्याकडून तरी वाईट वाटतं. मला बरेच लोक खूप चांगला माणूस समजतात, पण मागे वळून पाहिल्यावर मला माझी किळस येते. मी त्या किळसवाण्या माझ्याचपासून लांब लांब पळत राहतो, चांगुलपणाचा मुखवटा चढवत जगत राहतो. मी आतून एक जनावर होतो, आता माणूस होण्याचा प्रयत्न चालू आहे. बऱ्यापैकी झालोय.. बरंच लिहून बसलोय, उडवू ka? जाऊ दे मरू दे.. जे होईल ते होईल.

माझ्या ओरिजनल डुप्लिकेट आयडीवरून हे लिहित नाहीये हे अजून एक कन्फेशन.