कसं काय होतं तुम्हाला इतकं सायटिंग जंगलामध्ये?......

Submitted by णेम्सेक on 11 June, 2026 - 00:25

कसं काय होतं तुम्हाला इतकं सायटिंग जंगलामध्ये?......
हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला .. माझे .. दूधवा ,पिलिभित,, धिकाला , पन्ना , कान्हा , ताडो बा , पेंच , बांधवगड अश्या सफरीतले फोटो मी बऱ्याचदा शोकेस करते अगदी जवळच्या परिचितात .. तेव्हा ..! .. प्रश्नाचे उत्तर देताना गडबड उडाली ..कारण आमचेही अनेक निराश क्षण होतेच ..अनेक रिकाम्या सफारी.. त्याची आठवण आधी आली . म्हणून मग असा विचार केला की काय बरं असं होत असेल की ज्यायोगे जंगलामध्ये सायटिंग व्हायची शक्यता वाढेल. असे छोटे-छोटे टिप्स डोक्यात आले ते - एकत्र केलेत. ग्रेट काही नाही आहे, वाटायला छोट्याच गोष्टी वाटतात, पण म्हणतात ना — devil is in the details. आणि आजकाल खूप जणं वाइल्डलाईफ सायटिंगसाठी जंगलामध्ये जायला उत्सुक असतात, अतिशय सिरीयस पण असतात ..पण साशंक .. आणि आजकाल हे पर्यटन बऱ्यापैकी महाग पण झालेले आहे .. तुम्ही अगदी माझ्यासारखे हौशी फोटोग्राफर असाल तरी .. वेळेचा -पैशांचा सदु व्हावा असे तुम्हाला वाटत असेल - तर कदाचित याचा उपयोग होईल.म्हणून ...काही observations .. ...
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे — एक किंवा दोनच सफारीज बुक करून जंगलामध्ये जाऊ आणि मग काहीतरी अविस्मरणीय पदरात पडेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अगदी त्या जंगलामध्ये वाघांची, प्राण्यांची संख्या कितीही घनदाट असली तरी एक-दोन सफारी म्हणजे तीन-सहा तास. इतक्या वेळामध्ये काहीतरी खूप मोठं दिसेल, इतकं काही कोणाचं नशिब चांगलं नसतं. शंभरातले एक-दोन लोक असतील ज्यांना पहिल्याच सफारीला भन्नाट सायटिंग होतं. बाकीच्यांना होत नाही.
म्हणून जर जायचंच असेल तर dedicated sighting साठी म्हणून जा. “मजा करू, पिकनिक करू, स्टार रेसोर्ट/ हॉटेलमध्ये राहू आणि मग जमलं तर एक-दोन सफारी करून सायटिंगही होईल” — असं करून होत नाही. जंगलाशी पण आपलं नातं जुळावं लागतं. तिथली शांतता, तिथल्या हालचाली, तिथले आवाज हे सगळं आपल्याला हळूहळू उलगडत असतं. एकदम गेलं तर एखादा घरात पाहुणा शिरल्यावर त्याच्याशी जसं घरातले लोक हातचं राखून वागतील, तसं जंगल वागतं. आणि मग अजिबात सायटिंग होत नाही. “वाघ सोडा, शेपुटही दिसलं नाही” असं अत्यंत उद्वेगाने म्हणणारी शंभरातली अठ्याण्णव माणसं त्यामुळेच भेटतात.त्यामुळे , पहिली टिप .. कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त आठ सफारीचे प्लॅनिंग करा .. कोअर झोन -बफर झोन मिक्स असू द्यात.. जिथे अडीच तीन वर्षे वयातली वाघांची संख्या जास्त असते त्या झोन मध्ये वाघ दिसायची शक्यता अधिक असते .. कारण ते वाघातले टिन एजर्स असतात .. फिकीर कमी आणि उत्साह जास्त .. सबब -त्यांची चहलपहल जास्त असते..
दुसरी गोष्ट म्हणजे — जर का तुम्ही सफारी सिरियसली करणार असाल, मग व्यावसायिक फोटोग्राफीसाठी असो किंवा स्वतःच्या आनंदासाठी, पण खरंच चांगलं सायटिंग मिळावं, एखादी सुंदर फ्रेम मिळावी, एखादा क्षण कॅमेऱ्यावर पकडता यावा असं वाटत असेल, तर शक्यतो तुमच्या जीपमध्ये कमीत कमी माणसं असतील असं बघा. अवघड पडतं. कारण आजकाल सफारीची किंमत खूप जास्त झाली आहे. पूर्ण जीप स्वतःसाठी बुक करणं फार महाग प्रकरण असतं हे मला माहीत आहे. त्यामुळे शेअरिंग केली जाते. पण शेअरिंगमध्ये प्रायॉरिटीज जुळणं खूप महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, माझ्याबरोबर बसलेल्या माणसाला बर्डिंगमध्ये इंटरेस्ट असेल आणि ड्रायव्हर-ट्रॅकरला वाघाच्या मागे जायची घाई असेल, तर मग दोघांनाही एकमेकांचा राग यायला लागतो. एकाला एखाद्या पक्ष्याचे फोटो काढायला थांबायचं असतं, दुसऱ्याला वाघाच्या मागे जायचं असतं.एखादा रील काढण्यातच जास्त खुश तर एखादा सतत बडबड करणारा .. हि असली दुनिया घेऊन फिरायचं तर अवघड आहे.
जेव्हा जीपमधल्या लोकांचा प्राधान्यक्रम वेगळा असतो, तेव्हा सफारीमध्ये एकतानता येत नाही. ते collective mind तयार होत नाही जे सायटिंगसाठी अत्यंत आवश्यक असतं.आणि अजून भयंकर अवस्था म्हणजे नुसती पिकनिक म्हणून आलेली माणसं. जंगलामध्ये सायटिंग होणार म्हणजे वाघ, अस्वल, हत्ती, हरणं आपल्या समोरून परेड करत जातील आणि अधूनमधून सलामी देतील अशी काहीतरी खुळचट कल्पना घेऊन आलेली मंडळी जर तुमच्या जीपमध्ये असतील, तर तुमच्या सफारीची वाट लागली म्हणून समजा. अशी रिस्क शक्यतो कमीत कमी ठेवावी. वाईट पणा आला तरी चालेल पण नवख्या, अति आगाऊ मनुष्य प्राण्याला समज द्यायला मागेपुढे पाहू नका .. एक कान पिचकी शक्यतो पुरे होते ....
तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे — ट्रॅकर.किंवा गाईड ...
त्या वेळेला त्या ठिकाणी जो सर्वोत्तम ट्रॅकर असेल त्याचा आग्रह धरा. कारण सायटिंगचं यश जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के ट्रॅकरवर अवलंबून असतं. उरलेले पाच टक्के ड्रायव्हरकडे असतात. ड्रायव्हर आणि ट्रॅकर यांच्यामध्ये परफेक्ट ताळमेळ असणं फार महत्त्वाचं असतं. तेव्हाच ते तुम्हाला सर्वोत्तम अनुभवा कडे घेऊन जाऊ शकतात.
त्यासाठी ड्रायव्हर-ट्रॅकरशी थोड्या गप्पा मारा. आपल्या आधीच्या अनुभवांबद्दल सांगा. आपल्या फोटोग्राफीच्या प्रायॉरिटीजबद्दल सांगा. आणि मुख्य म्हणजे — आपण डेस्परेट नाही आहोत, सायटिंग झालं नाही तरी चालेल पण जंगल म्हणून अनुभव घेण्यात आपल्याला genuinely इंटरेस्ट आहे — हे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. हे झालं की ते रिलॅक्स होतात. त्यांच्यावरचं प्रेशर जातं. आणि कुठलाही माणूस प्रेशर नसतानाच आपल्यातलं सर्वोत्तम देऊ शकतो. मग तो ट्रॅकरसुद्धा मनापासून प्रयत्न करतो.
आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ.
पहाटेच्या वेळेला खूप लवकर तयार होऊन निघावं लागतं. अनेकदा गेट रिसॉर्टपासून दूर असतं. हे सगळं लक्षात घेऊन प्लॅनिंग करा. उशिरा येणाऱ्या आणि त्यामुळे जंगलामध्ये सातवी-आठवी-नववी जीप घेऊन फिरणाऱ्या लोकांना जवळजवळ कधीच सायटिंग होत नाही. पहिल्या शिरणाऱ्या दोन-तीन जीप्सना जे सायटिंग होतं ते सर्वोत्तम असतं.
म्हणून प्रत्येक सफारीला ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधी रिसॉर्टच्या बाहेर तयार उभे राहा. ड्रायव्हर-ट्रॅकर तुमच्यासाठी थांबले आहेत अशी वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नका. हे एकदा तुम्ही पाळलं ना, की त्यांनाही समजतं की तुम्ही किती involved आणि committed आहात. मग तुमची जीप आतमध्ये पहिली किंवा दुसरी शिरेल याची ते स्वतःहून काळजी घेतात.
आणि शेवटची गोष्ट — जंगलात फिरताना मोठ्यानं बोलू नका. अनावश्यक हालचाली करू नका. प्लास्टिकच्या कुरकुर आवाज करणाऱ्या पिशव्या, विचित्र आवाज करणारे डबे, वेळीअवेळी खाणं, उगाच जागा बदलत राहणं — या सगळ्या फिजिटी गोष्टी टाळा.
शक्य तितक्या निश्चल आणि शक्य तितक्या नीरवपणे जी जीप जंगलामधून फिरू शकते, तिला सर्वोत्तम सायटिंग होऊ शकतं.
आपल्याला कळत नाही, पण आपल्यापेक्षा कितीतरी जास्त संवेदनशील प्राणी आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्यांना बघण्याआधी त्यांनी आपल्याला दहा वेळा बघितलेलं असतं. त्यामुळे त्यांना बघायचं असेल तर त्यांच्या संवेदनशीलतेशी स्वतःची संवेदनशीलता जुळवावी लागते. हे खूप कठीण काम आहे.
खूप मोठ मोठे गन्स असलेले कॅमेरा लेन्सेस आणून , जणू काही बाकीच्या फडतुस कॅमेरा होल्डर्स नी आपल्याला आपसूक सलामी द्यायला हवी असे मानून ,सतत जोर जोरात एकमेकात बोलत राहणारे,, ओरडून चालकाला पुढे ने .. मागे ने .. सासू गिरी ( सारख्या सूचना ) करणारे ग्रुप्स सध्या खूप येतात .. प्राणी दिसला नाही म्हणून .. किंवा दिसला तरी फोकस मिळाला नाही, फ्रेम जमली नाही म्हणून करवादत राहण्याची फॅशन आहे सध्या .. असा ग्रूप लांब ठेवा .. चुकवा .. किंवा त्यांनी निवडलेला रास्ता टाळून जंगल पाहूया असे गाईडला सुचवा ! ते मार्ग काढतात .. आपली सफारी सेव्ह होते !
खरं म्हणजे मला असं वाटतं की जर का तुम्हाला मनापासून काही अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात आणि आपल्या मेमरीमध्ये जमा करायचे असतील, तर जंगल हा कधीही न संपणारा खजिना आहे. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे — नुसती त्या खजिन्याची चावी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही जंगलात गेलात म्हणजे तो आपली रत्नं तुम्हाला देईलच असं अजिबात नाही. त्याचं स्वतःचं एक मन असतं.स्वतःच एक तंत्र तुम्हाला स्वीकारायचं किंवा हाकलून लावायचं!
कधीकधी मला असं वाटतं की हळूहळू आपण शिकत जातो की हा अनुभव घ्यायचा कसा...सुरुवातीला आपण अगदी हरणांचे, मोरांचे, बॅबलर्सचे, ट्रीपायचे, वानरांचे — दिसेल त्या हलणाऱ्या प्राण्याचे फोटो काढतो. मग हळूहळू आपण सायटिंग सिरियसली करायला लागतो. नुसता प्राणी नाही -क्षण शोधायला लागतो !मग आपण पोर्ट्रेट फोटोग्राफीवर भर द्यायला लागतो. म्हणजे समोरून येणाऱ्या वाघाचे डोळे, हेड-ऑन फोटो, हत्ती समोरून आला तर त्याचा क्लोजअप — ही पहिली फेज असते.त्यातून थोडंसं मॅच्युअर झालो की मग कळायला लागतं की नुसता टाईट क्लोजअप म्हणजेच काही अविस्मरणीय नाही. उलट थोडंसं लांबून त्या प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये, त्याचं नैसर्गिक वर्तन करताना पकडता आलं, तर तो क्षण जास्त मोठा असतो.
मग हळूहळू पोर्ट्रेटमधून बिहेविअरकडे वाटचाल सुरू होते. आणि त्यानंतर स्पेसिफिकindividual behaviour कडे.मग कुठलाही वाघ बघण्यापेक्षा “तोच” वाघ त्याच्या दिनक्रमात बघण्याची उत्सुकता निर्माण व्हायला लागते. तोच हत्ती दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला आपल्या कळपाबरोबर कसा वागतो, त्याचे संबंध कसे आहेत, हे निरखण्यात जास्त आनंद वाटायला लागतो.मग नुसतेच जंगलभर भिरभिरत फिरण्यापेक्षा एकाच त्या जीवाशी शिव शोधायचा खेळ आवडायला लागतो..ही पुढची पायरी असते फोटोग्राफीची.
आणि कदाचित त्याच्याही पुढे एखादी पायरी असेल. मला माहीत नाही. मी अजून तिथपर्यंत पोहोचले नाही. पण कदाचित ज्या मानवी भावभावना आपण स्वतःमध्ये बघतो —खरा संताप, मत्सर,लटका राग , नुसतीच हूल, हुंदडहुल्लड, डीप थॉट!! — त्या जेव्हा या प्राण्यांमध्येही आपल्याला दिसायला लागतात, आणि त्याचं छायाचित्रण करता येतं, ती कदाचित जंगल फोटोग्राफीमधली खूप सुंदर आणि खूप समाधान देणारी स्टेज असेल. ते पहायची ओढ लागते .. म्हणूनच जंगलात पुन्हा पुन्हा जावे वाटते ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फार फार मस्त लिहिलं आहे... Happy
कॉर्बेट च्या जंगलात नुसतं फिरण्याचा अनुभवच इतका भारी होता माझा... की प्राणी दिसले नाही दिसले तरी काही फरक पडणार नाही असं वाटलं ज्या क्षणी जंगलात शिरलो त्याक्षणी तिथला एक तो खास जंगलाचा वास आणि शांतता यामुळे मोहात पडायला झालं मला..
परत एकदा जंगलात जायची वाट बघते आहे.. योगच येत नाहिये... हे असे लेख वाचले की अजुनच जायची ईच्छा तीव्र होते..
बघु कधी जमेल...

छान लिहिलंय, छान माहिती.

सगळीकडे कर्मशियलाइज झालंय फार आता.
पेंच मध्ये गेल्या वर्षी आणि त्याच्या दोन वर्षे आधी व्याघ्र दर्शन झाले पण तो निव्वळ योगायोग, आणि माणसांना निर्ढावलेले वाघ होते म्हणुन. त्यात कुठे दिसला की ट्रॅकर्सचे धडाधड मेसेजस जातात एकमेकांना. आणि सगळ्या जिप्स मग तिकडे मोर्चा नेतात, सगळ्या बाजूनी वेढतात. शाळकरी पोरांसारखे काही लोक उई, आऊ, आवाज काढतात. गेटवर आणि नंतर ट्रॅकरने बजावुनही. शेवटी ते जनावर हलतं आणि आपल्या ठरलेल्या मार्गाने जाऊ लागतं. सगळ्या जिप्स त्याच्या मागे मागे.
हे गेल्या वेळेस पहाटेच्या सफारीलाही.
यात काहीच मजा नाहीच. आणि प्राण्यांना वैताग.

खरे आहे तुमचे मानव , अगदी अशीच सर्कस असते .. पण म्हणूनच आपल्या ड्रायव्हर गाईड ला आधीच सांगून ठेवायचे की .. मला वाघ पाहायचा नाहीये .. निरखायचा आहे ,,झुंबडीत नेऊ नकोस .. मला बिलकुल इंट्रेस्ट नाही .. चांगली टेलि लेन्स .. आणि बायनॉक .. लांबून थांबून पण शांतपणे बघायचा कॉन्फिडन्स देतात .. मनस्ताप पण कमी होतो .. ते आवाज ,तो अचकटविचकट पणा जवळून सहन करायचा !

काय मस्त लेख येतायत. माबोवर परत चांगलं वाटतय, यावसं वाटतय. हे लेख, वर्षाचे पक्ष्यांवरच लेख. नि तां त सुंदर.

>>>>>>>ज्या क्षणी जंगलात शिरलो त्याक्षणी तिथला एक तो खास जंगलाचा वास आणि शांतता यामुळे मोहात पडायला झालं मला..
खूप छान.

अनुभवातून आलेले ज्ञान, बारिकसारिक टिपांसह + overtourism ची वखवखलेली सर्कस टाळायच्या युक्ती.

बेस्ट लिवलयं 👍