त्या दिवशी एक वेडा माणूस दिसला..
थंडीने इतका गारठलेला
की चौकाचौकात दिसेल त्या शेकोटी कडे पळत होता
पण हवी तशी ऊब मात्र
त्याला काही मिळत नव्हती..
काही शेकोट्या आधीच विझलेल्या..
काही आधीच दुसऱ्यांनी बळकावलेल्या..
हल्ली-हल्ली तर तो
कुठल्याही आगीजवळ
उभा असलेला दिसायचा..
कधी चणे-शेंगदाणे वाल्याच्या हातगाडीवरच्या भट्टी जवळ-
कधी उकिरड्या वरच्या कुणीतरी पेटवलेल्या कचऱ्याजवळ-
कधी रस्त्यालगत कुणीतरी मांडलेल्या चुलीजवळ-
अगदी कुणी सिग्रेटसाठी माचीसची काडी पेटवली-
तरी समोर उभा असायचा..
कुणी हटकलं
की त्यांचं रॉकेल, तेल, दारू, निखारे दिसेल ते घेऊन पळायचा..
वेड्याला थंडी वाजत होती की थंडीने वेडा झालेला - काही कळायला मार्ग नव्हता..
काल-परवा कुणीतरी त्याला जळत्या प्रेताशेजारी उभा असलेला पाहिला..
एक दिवस त्याने ठरवलं-
आता घरातून बाहेरच नाही पडायचं आपण..
पण आपण बाहेर पडलो नाही म्हणून वाराही आत येणार नाही
एवढं कळण्याइतपत नव्हतं त्याच्याकडे शहाणपण..
मग तो सगळी दारं-खिडक्या बंद करू लागला-
एकएक करून..
आधी पडवी, मग माजघर, मग माळा, शेवटी तळघरातील अडगळीची खोली सुद्धा
त्यानं टाकली अंधारून..
तरी साला गारठा काही कमी होईना..
नक्कीच कुठल्यातरी फटीतून वारा आत येत असावा!
तासामागून तास उलटले
फट काही सापडेना..
भिंतीच पोकळ की दरवाजे कुचकामी
काहीच उमजेना..
शेवटी उठला तो एक युक्ती करून!
“सगळी दारं-खिडक्या बंद ठेवून घरात धूर केला-
तर फटीतून धूर निघेल
आणि फट सापडेल..”
मग जमवलेलं सगळं इंधन ओतून-
त्यानं दिल्या सगळ्या भिंती पेटवून
आणि वाट बघू लागला फट समोर येण्याची..
…फट काही सापडली नाही
पण आता सारं घर उबदार झालं होतं!
अगदी त्याला हवं होतं तसं..
तेव्हापासून तो काही बाहेर पडलेला दिसला नाही..
वेडा कुठला!
ब्लॅक ह्युमर जमलीये.
ब्लॅक ह्युमर
जमलीये.
मला किती कळली माहीत नाही, पण
मला किती कळली माहीत नाही, पण भिडली मात्र नक्की.
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
भरत, काहीतरी वाटलं ना झालं तर मग!