जंगल : अनुभवाचा आतला प्रवास-
" काय वैनी? निघाला का जंगलात…? ओठांच्या कडेवरचे हसू दाबत , काय तरी बाई तऱ्हेवाईक आवडी ?? - असे एक्सप्रेशन चेहऱ्यावर घेऊन घरातल्या मदतनीस बाईनी प्रश्न केला आणि आम्ही जंगल सफरीला निघतोय ही बातमी गावभर झाली असल्याची ग्वाही मिळाली ..
पण विचार केला तर जाणवले की खरंच .. चक्क व्यसन असावे असे विथड्रॉवल्स येतात मला .. बुद्ध पौर्णिमा जवळ आली की !! किंवा डिसेंबर मध्ये जरा सलग सुट्टी मिळण्याची शक्यता दिसली की . काय बरे गोम आहे ? काय आहे काय असे त्या जंगलात ???
नुसते फिरणे ,पर्यटन नाही ते ! जंगलाचा अनुभव हा अगदी वेगळा आहे .. माणसाच्या अनुभव आत्मसात करण्याच्या क्षमतेची एक प्रकारची कसोटी आहे. तिथे काहीच तुम्ही आलात म्हणून घडवलय अस , किंवा कायमच तितकेच दिलखेचक दिसत राहील असलं ,क्यूरेटेड नसत.. इथे "घडतंय" असं काही स्पष्टपणे दिसत नाही. लांब काळ शांतता असते, काही विशेष दिसत नाही काहीच घडत नाही. ऊन मी म्हणत असते, रस्ते धुळीचे, जिप्सी खडखडणारी- कधी कधी तासन्तास पळून पाठीचा बुकणा पडणारी , अवेळी उठून भुतासारखे फिरणे - हातावर घेऊन खाणेपिणे! वाघ दिसेल याची खात्री नसते, कुठलाच प्राणी दिसेल याची नसते .. दिसत नाही पण ...कोणतीही ठरलेली कथा नसते, आणि बराच वेळ काहीच घडत नाही असेच अनेक क्षण ,मिनिटे ,तास प्रहर असतात . हे झेपत नाही .. एथेच बहुतेकांची विकेट पडते .. आपण एनटरटेनमेंट शोधतो. आपण " बोअर " होतो .. आपल्याला सवय असते की पर्यटन स्थळाने, पुस्तकाने , गाण्याने , समोरच्या फेसबुक रील ने - "अनुभव द्यावा " अर्थ सांगावा .. आणि मग तो आपण "घ्यावा" .. !
ही बातच ईथे नसते . येथे फक्त संथपणे जीवन घडते .. घडत राहते .. त्याचा अनुभव करायची जबाबदारी , त्या अनुभवाला अर्थ देण्याची जबाबदारी जंगल घेतच नाही .. ती सरळ निरीक्षकावर , म्हणजे आपल्यावर येते. आणि याच ठिकाणी अनुभव आत्मसात करण्याची खरी गेम आणि गोम कळते .
"वाघ दिसला नाही, त्यामुळे काहीच मिळालं नाही"— हा विचार घातकी--- अनुभव म्हणजे वाघाचं दर्शन; ते नसेल तर अनुभवच नाही."मी वाघ पाहायला आलो आहे", "मी पैसे दिले आहेत"—माती आणि धोंडे .. !!!इथे अनुभव हा बाहेरून मिळत नाही, तर आतून तयार होतो. आणि म्हणूनच, जंगलाचा खरा आनंद हा "आपण" किती आणि काय काय पाहतो यावर असतो.. किती खोल मुरवतो .. मौनाची अक्षरे किती जाणतो आणि आत्मसात करतो यावर अवलंबून असतो.
जंगल प्रत्येक भेटीत अधिक समृद्ध होत जातं. समृद्ध करत जात .. त्याचं लक्ष सूक्ष्म गोष्टींकडे असतं—पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांच्या हालचालींचे संकेत, प्रकाशातील बदल, किंवा अगदी शांततेतील बदलसुद्धा. हवा सुद्धा बदलते , आपल्या अपेक्षे पेक्षा आपल्या निरीक्षणात आपला आनंद लपलेला असतो ..वाघ किंवा कोणताही प्राणी प्रत्यक्ष दिसण्याआधीचा जो माहोल असतो ना तो जाम देखणा असतो ! तो आपण को क्रिएट करायचा असतो आजूबाजू बरोबर ! हे अगदी एखादी गाण्याची मैफल ऐकण्या सारखे आहे .. प्रत्येक हरकती बरोबर ऐकणारा माणूस संगीत को क्रिएट करतो .... प्रत्येक भेट ही आधीच्या अनुभवावर आधारलेली असते. आधीच्या अनुभवामुळे अधिक श्रीमंत असते ... ते फक्त पाहायच काम नाही ... अनुभवाच्या मृगजळाच बांधकाम आहे ते !! वाघ दिसणं हा अनुभवाचा एक भाग असू शकतो, पण तो एकमेव उद्देश नसतो. संपूर्ण जंगलाचा अनुभव एक सॉलिडब्लॉक असतो
जंगल हे केवळ नैसर्गिक सौंदर्याचं ठिकाण नाही; ते माणसाच्या अंतर्मुख होण्याच्या क्षमतेचं प्रतिबिंब आहे.जंगल आपल्याला काही देत नाही—ते आपल्याकडून काही मागतं.आपली घाई, आपली अपेक्षा, आपला अधीरपणा—हे सगळं मागे ठेवून, फक्त थांबण्याची तयारी.
आणि जेव्हा आपण थांबतो, तेव्हा लक्षात येतं—
जंगल बाहेर नव्हतंच इतकं, जितकं ते आत होतं.!!!
जन्गल भ्रमन्ति
Submitted by णेम्सेक on 7 June, 2026 - 01:25
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहीत आहात.
छान लिहीत आहात.
<<वाघ दिसणं हा अनुभवाचा एक भाग असू शकतो, पण तो एकमेव उद्देश नसतो. संपूर्ण जंगलाचा अनुभव एक सॉलिडब्लॉक असतो.>> सहमत.
खुपच छान लिहिताय. लेख आवडला
खुपच छान लिहिताय. लेख आवडला.
वाघ पाहायचा अनुभव रोमांचकारी असतोच पण फक्त तेवढेच जंगल नसते हे बहुतेकजण विसरतात. could not see woods for the trees अशी बहुतेकांची अवस्था असते
जास्त भाग असतील तर १,२,३ अशी नावे dyaaं
भाग 1 भाग 2 केले आहेत ..
भाग 1 भाग 2 केले आहेत .. नुकत्याच केलेल्या सफरीचे ते वर्णन आहे. पूर्वी केलेल्या ,पाहिलेल्या आरण्यका बद्दल पण क्रम क्रमाने लिहायचा विचार आहे .. कारण दर जंगलाचा अनुभव वेगळा आणि नवा आहे .. डायरीज विस्तृतपणे लिहून ठेवल्याने तपशील हाताशी आहेत .. प्रतिसाद हेच बळ .. आणि सूचना सर आख्हो पर !!!