#भारत का दिल देखो ( पाककृती) मकई का घोल/ मक्याचे पिठले.

Submitted by मनिम्याऊ on 4 June, 2026 - 06:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भारत का दिल देखो या माझ्या मध्यभारता विषयीच्या मालिकेत आणखीन एक साधा सोप्पा पदार्थ.

2 मक्याची कणसे ( मधू-मका असेल तर आणखीन छान)
1 मोठा कांदा बारीक चिरून
मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
आले लसूण पेस्ट ( optional)
2 हिरव्या मिरच्या किंवा चमचाभर लाल तिखट
हळद, जिरेपूड, गरम मसाला ( प्रत्येकी एक चमचा)
मीठ चवीनुसार
फोडणी साठी तेल, मोहरी

क्रमवार पाककृती: 

प्रथम मक्याची कणसे किसून घ्या. पाणीदार लगदा तयार होईल ( सुटलेले पाणी फेकायचे नाही)
कढईत तेल गरम करून मोहरी तडतडून घ्या.
त्यात हिरव्या मिरच्या , कांदा आणि आलं लसणाची पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
कांद्याचा कच्चा वास गेला की कोथिंबीर घालून एक मिनिटभर पुन्हा परतून घ्या. या मिश्रणात हळद, जिरेपूड आणि गरम मसाला घाला. मक्याच्या लगद्याला सुटलेले पाणी घालून चांगले तेल सुटेपर्यंत परता.
यानंतर किसलेला मका घाला व चवीनुसार मीठ व थोडे पाणी घालून झाकण घालून ठेवा. पिठल्या सारखी consistency असते.
मकई का घोल तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

हि पळीवाढी भाजी आहे.
मध्य भारतातल्या नर्मदा खोऱ्यातील भागात हा प्रकार केला जातो.
नर्मदेच्या खोऱ्यात मका भरपूर पिकतो. तेथील हरदा - होशंगाबाद परीसरात आठवड्यातून एकदा तरी हा "घोळ" करतात.

माहितीचा स्रोत: 
हरदा येथील मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसते आहे भाजी. फ्रोजन मक्याच्या दाण्यांना मिक्सरमध्ये बारीक केले तर करता येईल का?
बरोबर थालीपीठ आहे का?

Thanks, ऋतुराज, मृणाली, स्नेहा आणि अनिंद्य.

>>.फ्रोजन मक्याच्या दाण्यांना मिक्सरमध्ये बारीक केले तर करता येईल का?>> जमेल पण ही चव येणे मुश्किल आहे. त्यापेक्षा
भुट्टे का इंदोरी कीस करायचा फ्रोजन मक्याचा. उपम्या सारखा.

बरोबर थालीपीठ आहे का?
हो Happy

व्वा! काहीतरी हटके आणि वेगळे पहायला / वाचायला मिळाले कितपत करेन कल्पना नाही वेळेचा अभाव पाहता पण तूर्तास बुकमार्क करून ठेवतोय.

आता महाराष्ट्रात सर्व मोठ्या शहरात फक्त अमेरिकन कॉर्नच मिळतो, तो मिट्ट गोड असतो , त्याचा उपमा करावा तर शिराच होतो.

तुमच्याकडे अजूनही पांढरे दाणे असलेली मक्याची कणसे मिळत असल्यास खरी चव येत असेल. ते वाण आता शेतकरी पेरतच नसावेत.

पांढरे दाणे असलेली मक्याची कणसे मिळत असल्यास

त्या वाणाचे नाव गंगा सफेद असे आहे. दाणा गोडीला अन् वजनाला थोडा कमी भरतो पण क्वालिटी असतो. मुळात मका कणीस स्वरूपात कमी खपतो, इंडस्ट्रीयल एप्लिकेशन्स पक्षी कॉर्न फ्लॉवर, कॉर्न स्टार्च, इथेनॉल, कॉर्न सिरप, इत्यादी, डाय बेस, पेंट बेस, एडिबल ऑइल इत्यादी मध्ये जास्त जातो, त्यामुळे लोक अमेरिकन स्वीट कॉर्नला जास्त prefer करतात.

शिवाय गंगा सफेद मधे कणीस पोखरणाऱ्या लाल अळीचा प्रादुर्भाव तुलनेने लवकर होतो. त्यामुळे इनपुट कॉस्ट वाढतात कीटकनाशक इत्यादींच्या. परत आजकाल कैक कंपनी रेसिड्युअल केमिकल्स प्रति बऱ्यापैकी संवेदनशील असतात म्हणून खप पण कमी होतो.

सोपी वाटतेय पाककृती . कणसे वगळता बाकी जिन्नस घरात असतात , आता कणसांचा सीझन आहे. पुढच्या वेळेस कणसे आणली की करणार.

छान आहे रेसिपी. मला स्वीट कॉर्न आवडत नाहीत त्यामुळे बाजारात गावठी मका दिसला की तो आणते, हल्ली कमीच दिसतो. तसा मिळाला तर करून बघेन.