मराठी भावानुवाद - तिसर्‍या स्तराच्या लोकांची पहिली गरज...

Submitted by मुग्धमानसी on 2 June, 2026 - 12:52

बोलत राहणं आमची गरज आहे
भले मातीत तोंड खुपसून का बोलावं लागू नये
माझं निर्दोषत्व मातीत तोंड खुपसून
स्वत:च्या निष्पाप असण्याची ग्वाही देत आहे
असं आहे की... जगण्याच्या सगळ्या रस्त्यांवर
शहराच्या सर्वोच्च न्यायाधीशांच्या आदेशानुसार
एक भीती अंथरली गेलेली आहे
बोलणारे असे आमच्या शहरात उरलेच कितीक आहेत?
त्यांची शीरं खरोखरच छाटून सजवून ठेवायला हवीत
असे लोक पुन्हा कधी पहायला मिळणार?
देवाशपथ
माझ्या डोळ्यांच्या जागी खाचा उगवल्या
तरिही मी रुदन करणार नाही
की माझ्या शेतात किंकाळ्या उगवताहेत
माझ्या अंगणात थांबून राहिलेली सुन्नता
माझ्या पिल्लांचं हसू हिरावून घेत आहे
माझा शिपाई वर्दी घालायला नको म्हणतोय
का? तर म्हणे या वर्द्या तिसर्‍या दर्जाच्या शहराचं प्रतिक बनून गेल्यात
गोष्ट तर प्रतिकांच्याही पुढं निघून गेलीय
पालीच्या तुटलेल्या शेपटीचं प्रतिक असो वा...
रक्ताच्या वासाचं प्रतिक
आता हे सारं भयाचं दुसरं नाव आहे
आपल्याला आपल्याच देशात देशहीन करून टाकलं गेलंय
कारण... आपण जिवंत पण आत्माविहीन, बोलण्याच्या मुलभूत हेतूचीही अवज्ञा केलेले आहोत.

-किश्वर नाहीद यांच्या ’तीसरे दर्जें वालों की पहली ज़रूरत’ या नज़्म चा मराठी भावानुवाद.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी!!
अनुवाद देखील भिडतोय..

तीसरे दर्जें वालों की पहली ज़रूरत’ >> मूळ सुद्धा शोधायला हवे.. आणि कधी लिहिले गेले ते सुद्धा.. अश्या रचनांचे कालातीत असणे किती दुर्दैवी आहे!

मूळ सुद्धा शोधायला हवे.. आणि कधी लिहिले गेले ते सुद्धा.. अश्या रचनांचे कालातीत असणे किती दुर्दैवी आहे!+१११

माझ्यामते 'अनुवाद आहे' हे शीर्षकात येणे आवश्यक आहे. स्वरचित कविता व अनुवाद हे दोन स्वतंत्र समूह नाहीत हे लक्षात घेऊन ते शीर्षकात यायला हवे.

मूळ कविता समोर नसली तरीही हा अनुवाद प्रभावी असणारच असे वाटत आहेच. कोणत्याही युगात लागू होईल असा आशय!

होय भरत. किश्वर नाहीद माझ्या आवडत्या फेमिनिस्ट कवयित्रींपैकी आहेत. पाकिस्तानी आहेत. त्यांच्या सर्वच कविता थेट आणि ज्वलंत विषयांवर स्पष्ट भाष्य करणार्‍या आहेत.

ही कविता किमान २५-३० वर्षांपुर्वीची असावी. किंवात्याही पूर्वीची. पण ही वाचून मला आजची माझ्या सभोतालची परिस्थिती आठवली.
ज्या देशाची निव्वळ कीव आणि द्वेशच करणं आपल्या नसांत पिढ्यानपिढ्या पेरलं गेलंय, नकळत आपणही त्याच्यासारखेच बनत चाललोय का?