“‘अगं, झाला का डबा? माझी ९:४५ची पंचवटी आज नक्कीच सुटेल.” वडिलांचा आवाज कानावर पडताच नीलची झोप मोडली. “हो, आलेच...एक मिनिट” आई किचनमधूनच म्हणाली. सकाळच्या धावपळीत तिची होणारी तारांबळ झोपेतून उठलेल्या जड डोळ्यांनी नील बघत होता. अंजली ज्वेलर्सच्या पिशवीत भाजीचा डबा आणि महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत चपात्या बांधून आई डब्याची पिशवी घेऊन आली. वडिलांनी ती त्यांच्या ऑफिसच्या बॅगेत ठेवली आणि निघू लागले. ते घरातून निघणार तेवढ्यात आई म्हणाली “अहो, ती फाईल घेतली ना?” वडील “हो...चल येतो मग” म्हणाले आणि धावपळ करत निघाले. वडील जाताच नील झोपेतून उठून बसला. त्याने आईला विचारले "कसली फाईल गं?". आई म्हणाली "कसली नाही. तू जा आवरून घे". आपल्या समजण्यापलीकडचं काही असेल असं समजून तो पलंगावरून खाली उतरला.
...
उन्हाळाच्या सुट्टीत यंदा जरा जास्तच उकडत होतं आणि तापमानाने तर कहरच केला होता. नील आणि त्याच्या मित्रांनी भरपूर विचारविनिमयाने दुपारी १ ते ४ मधील क्रिकेटचा सामना रद्द करून बसक्या खेळाचा म्हणजेच दुपारी टीव्हीवर सिनेमा बघायचा निर्णय घेतला.
उन्हाळ्याच्या सुट्टीत चौकातली काही बिऱ्हाडं गावी जायची आणि घरी चोरी होऊ नये म्हणून घराची चावी शेजाऱ्यांकडे देऊन - रात्री कुणालातरी झोपायला पाठवा - असं सांगायची. यावर्षी देशमुखांच्या घरची चावी खाडेंच्या घरी होती. खाडेंच्या मुलाने सगळ्यांना दुपारी देशमुखांच्या घरी कलर टीव्हीवर सिनेमा बघण्याचं आमंत्रण दिलं. आजूबाजूचे पाच चौक मिळून फक्त तीन कलर टीव्ही असलेल्यांमधलं एक घर म्हणजे देशमुखांचं. काहीतरी भलताच मान वगैरे होता तो. सगळ्या मुलांनी ते "आज तो मेहफिल जमायेंगे" या भावनेने आमंत्रण स्वीकारलं आणि दुपारचं जेवण आटपून, आपली चादर, उशी, पाण्याची बाटली घेऊन १ वाजता चौकाच्या मैदानात भेटायचं ठरवलं.
दुपारच्या जेवणासाठी नील घरी आला आणि आईला ठरलेला बेत सांगितला. आईने त्याला "काही गरज नाही लोकांच्या घरी जायची. मुकाट्यानं घरी राहा. चांगल्या हस्ताक्षराचा सराव कर" असं बजावलं. नील रागावून म्हणाला "हे काय गं. एकतर टीव्ही नाही आपल्याकडे आणि त्यात तू दुसरीकडेही जाऊ देत नाही. आता काय सुट्टीत पण अभ्यास करू". आई "घेऊ आपण टीव्ही...थोडा धीर धर" म्हणाली. नील हिरमुसलेल्या चेहऱ्याने पटापट जेवायला लागला. आईला त्याचा चेहरा बघवला नाही. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली "तुला एक गोष्ट सांगते. पण कुणाला सांगायची नाही". नील मान खाली घालून जेवत होता पण त्याचे दोन्ही कान आई काय म्हणते यावर लागून होते. "आपल्या चौकातलं ते समोरच्या चाळीतलं घर आपण विकत घेतोय". नील आईकडे चमकत्या डोळ्यांनी बघत म्हणाला "खरंच?" आणि आई "हो" म्हणताच तो उडाला आणि जोर जोरात उड्या मारू लागला - कधी पलंगावरून खाली तर कधी चित्र विचित्र डान्स करत. “तू आज सकाळी विचारात होतास ना फाईल बद्दल. पप्पा आज ती फाईल घेऊन गेलेत बँकेत" आई म्हणाली. "आनंद पोटात माझ्या माईना रे माईना" गाणं लागलं समजून नील नाचत नाचत घराबाहेर धावत निघाला. आईने “गावभर सांगू नकोस” बजावलं पण नीलचा आनंद गगनात मावत नव्हता.
ठरल्याप्रमाणे देशमुखांच्या घरी मैफल जमली. वेफर्सचे पॅकेट्स, लिंबू सरबत, जांभूळ आणि लिमलेटच्या गोळ्या असा जंगी बेत होता. पण त्या गोंधळात नीलचं संपूर्ण लक्ष निटनेटकं सजवलेल्या देशमुखांच्या घराकडे होतं. आजपर्यंत फक्त बाहेरूनच पाहिलेल्या त्यांच्या घराला पहिल्यांदाच तो आतून बघत होता. त्यांचा सोफा, खुर्च्या, भिंतीवरील सजावट, फैमिली फोटो आणि किचन बघून नील खूप भारावून गेला. आपण घेणारं नवीन घर पण असंच काहीसं सजवायला सांगू आईला असा निश्चय करून तो कलर टीव्हीवर Mr. India मूव्ही बघण्यात गुंग झाला.
संध्याकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा आज वडिलांना उशीर झाला. नील आणि त्याची भावंडं खेळून घरी आली तरी ते परतले नव्हते. रात्री ते घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह दिसत नव्हता. त्यांनी बॅग एका कोपऱ्यात ठेवली, हातपाय धुतले आणि बराच वेळ गप्पच बसून राहिले. रात्री उशिरा जेवण झाल्यावर आईने “फाईल पास झाली?” विचारलं. वडिलांनी फक्त नकारार्थी मान हलवली.
…
त्या दिवसानंतर काही आठवडे घराबद्दल फारशी चर्चा झाली नाही. सुरुवातीला रोज बँकेच्या फेऱ्या, कागदपत्रं, हमीदार अशा गोष्टींची चर्चा कानावर पडायची. पण अचानक सगळंच शांत झालं. नीलला काही कळत नव्हतं, पण काहीतरी बिनसलं आहे याची जाणीव मात्र होत होती. आई आधीसारखी उत्साहात दिसत नव्हती. रात्री जेवताना ती आणि वडील हळू आवाजात बोलायचे. पण मुलं आले की विषय बदलायचा.
…
एक संध्याकाळी नील अभ्यास करत बसला असताना त्याला किचनमधून कुजबुज ऐकू आली. “इतके पैसे आणायचे कुठून आता?” आईचा आवाज काळजीने भरलेला होता. “काहीतरी मार्ग काढू,” वडील शांतपणे म्हणाले. त्या रात्री पहिल्यांदाच नीलने वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता पाहिली.
थोड्या वेळाने तो स्वतःहून वडिलांच्या जवळ जाऊन बसला आणि बोलला “तो गणिताचा स्पेशल क्लास…मला नाही जायचं.” वडिलांनी वर्तमानपत्रातून नजर वर केली. क्षणभर वडील काही बोललेच नाहीत. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, “तू नको काळजी करू.” नीलला ते उत्तर अपेक्षित नव्हतं. वडील हसले आणि बोलले “चल. माझ्याबरोबर जरा बाहेर ये.” दोघं चौकाच्या कोपऱ्यावर असलेल्या फोन बूथकडे निघाले. बूथमध्ये जाऊन वडिलांनी खिशातून छोटी डायरी काढली आणि नंबर फिरवला.
“हॅलो… नमस्कार साहेब”. वडिलांचा हसरा चेहरा बघून समोरची व्यक्ती बहुतेक ओळखीची असावी असा अंदाज नीलने लावला. तो बूथच्या काचेबाहेर उभा राहून त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होता. थोड्या गप्पांनंतर वडिलांचा आवाज गंभीर झाला.
“हो… थोडी मदत हवी होती.”
नीलने कधीच वडिलांना कोणाकडे काही मागताना पाहिलं नव्हतं. वडिलांनी फोन ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता नीलने पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिली. तो शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिला. नील आपल्याकडे बघतोय हे वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी बूथवाल्याला पैसे दिले, सुटे पैसे घेतले आणि बाहेर आले. शेजारी किराणा दुकान होतं. नीलला आठाणे देत ते म्हणाले, “नील, जा चॉकलेट घे.” त्याने मान हलवली, “नको.” वडील हसले आणि त्यांनी नीलच्या खिशात आठाणे ठेवले. वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलले “काळजी करू नकोस. काहीतरी मार्ग निघेल.” नील काही बोलला नाही.
दोघं घरच्या दिशेने चालू लागले. चौकात पोहोचल्यावर नीलची नजर आपोआप देशमुखांच्या घराकडे गेली. नील काही क्षण तसाच उभा राहिला. इतकं छान घर…इतका सुंदर रंग…सगळं किती छान दिसत होतं. अचानक त्याच्या मनात विचार आला. देशमुख काकांनाही हे घर घेताना असा त्रास झाला असेल का? त्याची नजर चौकातल्या इतर घरांकडे गेली. प्रत्येक घराकडे बघताना तोच प्रश्न त्याच्या मनात येत होता.
तेवढ्यात “दादा!” असा आवाज ऐकू आला. विचारांची साखळी तुटली. त्याचा लहान भाऊ आणि बहीण धावत त्याच्याजवळ आले. बहिणीने “चॉकलेट आणलं का?” विचारलं. नीलने नाही म्हणून मान हलवली. दोघं हिरमुसले.
नील मात्र काही बोलला नाही. त्याने घराकडे पाहिलं.
भाड्याच्या घराच्या तुटक्या खिडकीतून वडील दिसत होते. समोर फाईल उघडी होती. एका हातात पेन होतं. तर दुसऱ्या हाताने ते कपाळ दाबून काहीतरी हिशोब करत बसले होते.
नील काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिला.
…
काही महिन्यांनी अखेर सगळ्या अडचणींवर मात करत घराचा व्यवहार पूर्ण झाला. त्या दिवशी आई, वडील, नील, लहान भाऊ आणि बहीण सगळे पहिल्यांदाच नवीन घरात आले. आई कुठे काय सामान ठेवायचं याचा विचार करत होती. भाऊ आणि बहीण घरभर धावत होते.
घराबाहेर अंगणात उंबराचं मोठं झाड होतं. नील ते बघायला बाहेर आला. अचानक त्याची नजर समोरच्या भाड्याच्या घरावर गेली. मग त्याने मागे वळून नवीन घराकडे पाहिलं.
जेमतेम शंभर पावलांचं ते अंतर.
पण ते पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांची किती धडपड झाली होती, हे त्याने गेल्या काही महिन्यांत पाहिलं होतं.
तेवढ्यात देशमुख काका घराकडे आले. वडिलांचा हात हातात घेत त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. चौकातली इतर मंडळीही शुभेच्छा द्यायला येऊ लागले.
नील नवीन घराच्या खिडकीतून वडिलांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होता.
यावेळी मात्र -
त्यांच्या समोर फाईल नव्हती.
हातात पेन नव्हतं.
कपाळावर चिंता नव्हती.
त्यांच्या चेहऱ्यावर फक्त समाधान होतं.
नील त्यांच्याकडे बघतच राहिला.
~ स्वप्निल पगारे
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.

स्वप्नील म्हणजेच नील ना?
छान आहे लेख.
छान आहे लेख.
स्वप्नील म्हणजेच नील ना?
स्वप्नील म्हणजेच नील ना?
>> !!
थैंक्स स्वानंदी, स्नेहा आणि
थैंक्स स्वानंदी, स्नेहा आणि पियू!
हो, नील म्हणजे मीच. माझ्या “आठवणींची गाठोडी” संचातील काही गोष्टींपैकी ही एक गोष्ट.
खूप छान लिहिलंय!
खूप छान लिहिलंय!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
खूप छान लिहिलंय.
छान
छान
खुप छान लिहिलंय.
खुप छान लिहिलंय.
साध सोप सरळ... मनाला भावणार!
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
छान लिहिलय. सरळ, साधं, निरलस.
छान लिहिलय. सरळ, साधं, निरलस.