दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १७: मल्लिपट्टिणम- तंजावूर ६८ किमी

Submitted by मार्गी on 1 June, 2026 - 12:29

✪ किनारपट्टीवरून सुपीक- संपन्न प्रदेशाकडे राईड
✪ चौल, पांड्य आणि नायकांच्या प्रदेशात
✪ तंजावूरमधली पायी केलेली भटकंती
✪ अविस्मरणीय तंजावूर रॉयल पॅलेस
✪ बृहदीश्वर मंदिर- अद्भुत, अचाट आणि अशक्य!
✪ तंजावूर रामकृष्ण मठामध्ये संवाद
✪ मुलांनी केलेलं योगासनांचं सुंदर आणि नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिक
✪ गटांमधून केलेली आसनं आणि एकमेकांचं कौतुक

नमस्कार. २८ जानेवारीची सकाळ! तोंडीमधल्या रामर कोविलचा फोटो घेऊन निघालो. आजचं अंतर फक्त ६८ किमी आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेलं तंजावूर! मल्लिपट्टीणमवरून तंजावूरला जाण्याचा लहान गावांमधून जाणारा रस्ता घेतला. सकाळचं‌ वातावरण आणि नुकताच झाडांमागे उगवलेला सूर्य! वा! उलट्या दिशेचा वारा आहेच. पण आता त्याची सवय झालीय. छोटी गावं आणि अगदी आतला असला तरी किती सुंदर आणि शांत रस्ता. मोकळा निसर्ग. १२ किलोमीटर अंतर झाल्यावर एका थोड्या मोठ्या रस्त्यावर पोहचलो. इथे नाश्ता केला. सध्या लग्नाचे दिवस असावेत असं वाटतंय. काही ठिकाणी समारंभांची तयारी दिसली. एका ठिकाणी दक्षिण भारतीय मंगलाष्टक आणि सनईसुद्धा कानी पडली!

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)


.

.

.

.

.

.

.

आजचं मुख्य आकर्षण तंजावूरमधला रामकृष्ण मठ. तिथे मला थांबायची संधी मिळेल. सेवा भारती दक्षिण तमिळ नाडूच्या केसवनजींनी तिथे व्यवस्था केली आहे. शिवाय तिथलं बृहदीश्वर मंदिर आणि राजवाडा! आज अंतर थोडं असलं तरी परिसर झपाट्याने बदलतोय. किनारपट्टीचा परिसर- नारळाची झाडं हळु हळु मागे पडत आहेत. समृद्ध शेतांचा हिरवागार परिसर सुरू होतोय! रखरखीत भूप्रदेशापासून आता हिरवाईनी नटलेला सुपीक असा प्रदेश सुरू होतोय. समुद्रापासून लांब आलो तसे छोटे चढ- उतार सुरू झाले. समुद्र दोन दिवस दिसणार नाही! मंदिरांमधील विविधता रस्त्यावरच्या व छोट्या गावांमधल्या मंदिरांपासूनच जाणवते आहे.

तंजावूरच्या पंचवीस किलोमीटर अलीकडे अजून एक छोटा ब्रेक घेतला आणि निघालो. तंजावूर थोडं दूर असताना मोठा हायवे लागला. मोबाईलमधल्या नकाशामध्ये रस्ता बघून पुढे गेलो. ऐतिहासिक शहर! खरोखर मी खुद्द तंजावूरला सायकलवर आलोय! विश्वास बसत नाहीय. शहरात ब्रिजवरून जाताना एक वळण चुकलं. त्यामुळे थोडं फिरून जावं लागलं. तरीही अगदी वेळेत म्हणजे ११:३० लाच तंजावूरला पोहचलो आणि ६८ किलोमीटर पूर्ण झाले. त्यात सायकलिंग फक्त पावणेचार तास केलं. तंजावूर स्टेशनपासून जवळच असलेला रामकृष्ण मठ! मठाजवळ रेल्वेचे आउटर ट्रॅक्स.

रामकृष्ण मठ! विवेकानंद जयंतीला स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानमधून सुरू केलेला हा प्रवास विवेकानंद केंद्रामार्गे रामकृष्ण मठापर्यंत पोहचाला! विवेकानंदांपासून रामकृष्ण परमहंसांपर्यंत! तिथले स्वामीजी व ब्रह्मचारी भेटले. दुपारी केशवनजीसुद्धा भेटायला आले. संध्याकाळी त्यांनी मुलांसोबत एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला आहे. इथे योग वर्ग चालतो.

दुपारी थोडा आराम केला आणि चार वाजता रॉयल पॅलेस आणि बृहदीश्वर मंदिर बघायला पायी पायी निघालो. पायी फिरताना गावाचा जास्त चांगला अनुभव मिळतो. जाऊन येऊन ६-७ किलोमीटर होतील पण मस्त फिरता येईल. नकाशामध्ये रस्ता बघत बघत आधी रॉयल पॅलेसकडे गेलो. तिथलं संग्रहालय अप्रतिम आहे! किती किती जुन्या कलाकृती जपून ठेवल्या आहेत! व्वा! तंजावूरचे भोसले सत्ताधीश. शिवाजी महाराजांचे धाकटे बंधू व्यंकोजी राजे आणि त्या वंशातले पुढच्या काळातले राजे. हा महाल आणि संग्रहालय आवर्जून बघावं असं आहे. अगदी व्हेल माशाच्या हाडापासून नटराज- बुद्ध मूर्ती आणि शिवकालीन नाणी असं खूप काही‌ इथे आहे. शिवाय पुतळे, वास्तू आणि महालही तितकाच देखणा आहे. वेळेच्या मर्यादेमुळे थोडा घाईत आणि थोडाच बघितला आणि बृहदीश्वरकडे निघालो.

बृहदीश्वर! किमान हजार वर्षांपूर्वी बांधलेली ही अद्भुत वास्तू! किती भव्य, किती उंच! किती विस्तृत आणि तितकंच सूक्ष्म शिल्प. अहा हा! इतक्या भव्य वास्तु कशा काय निर्माण केल्या असतील? आजसुद्धा आपण अशी निर्मिती करू शकत नाही. काय तो काळ असेल, कशी ती संस्कृती असेल! कसे ते राज्यकर्ते असतील ज्यांच्याकडे तितकी हिंमत आणि तितकी गहराई असेल! हजारो वर्षं उभं असलेलं हे मानव निर्मित आश्चर्यच म्हंटलं पाहिजे! डोळे भरून मंदिराचं दर्शन घेतलं. उंच जाणारी गोपुरं! असंख्य शिल्प आणि चित्रं! हा अनुभव मनात साठवून परत यायला निघालो!


.

.

.

.

.

.

.

.

.

कार्यक्रमासाठी वेळेवर पोहचलो. ७ किलोमीटरचा तंजावूर वॉकही झाला. कार्यक्रमासाठी रामकृष्ण मठातील साधक, सदस्य आणि सेवा भारती तंजावूरचेही काही सदस्य आले आहेत. तिसरी ते पाचवीतल्या योग विद्यार्थ्यांनी विलक्षण आसनं सादर केली. बकासन, पूर्ण धनुरासन, चक्रासन, अर्ध मत्स्येंद्रासन आणि अशीच इतर अवघड आसनं! त्यांचे "राजेश खन्ना" नावाचे शिक्षक व एक शिक्षिका त्यांना सांगत होते आणि ते अगदी लगेचच करत आहेत. कुठेच न अडखळता किंवा दुरुस्ती न सांगावी लागता! विशेष म्हणजे दोन गटांमध्ये विद्यार्थी हे आसनं करत आहेत. गटातली काही मुलं समोर येऊन आसनं करतात आणि इतर त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करतात. इथे एक खूप नावीन्यपूर्ण प्रकार बघायला मिळाला. योगामध्ये मुलांची आवड वाढवण्यासाठी आणि त्यांचं ज्ञान अजून दृढ करण्यासाठी उपयोगी अशी‌ गोष्ट. दोन विद्यार्थी एकत्र मिळून दोन आसनं करताना दिसले. म्हणजे एक जण धनूरासन करणार तर दुसरा त्याच स्थितीत त्याच्या पाठीवर चढून चक्रासन करणार! हे मुलं- मुली जणू रबराची बनलेली आहेत, असं वाटतंय!

मला मुलांसोबत बोलायला सांगितलं होतं. पण त्यांच्या आसनांमध्ये खूप वेळ गेला. त्यामुळे नंतर फक्त दोन आसनं मुलांसाठी घे, असं मला सांगितलं. मकरासन आणि वज्रासन असे घेतले आणि त्यांच्यासोबत केले. शरीरात होणारे बदल आणि आसनांमुळे झालेला फरक अनुभवायला त्यांना सांगितलं. छोटेखानी पण छान कार्यक्रम झाला. काही‌ वेळ सभागृहामध्ये प्रार्थनाही झाली. नंतरही ट्रस्टच्या सदस्यांसोबत छान भेटी झाल्या. साधकांसोबत संवाद करता आला.

सायकलिंगचा १७ वा दिवस पूर्ण! आता फक्त ३ दिवस बाकी. निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत उद्या श्रीमुशनाममध्ये भेट होईल. पुढे मग पाँडेचेरी आणि चेन्नै! उद्या कुंभकोणमचं अद्भुत मंदिरसुद्धा बघायला मिळेल. केवढ्या सुंदर वास्तु, वारसा आणि सांस्कृतिक इतिहास! आणि अशा साधक लोकांसोबत अशा ठिकाणी राहण्याचा योग! माझा मित्र तर म्हणालासुद्धा की, तू आकाशगंगेच्या अगदी मुख्य भागातून जातो आहेस!

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १८: तंजावूर- कुंभकोणम- श्रीमुशनाम ९४ किमी

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 1 जून 2026.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर प्रवास सुरुय
योगासने करणारी ती मुलं तर किती उत्साही
त्यांना चांगले मार्गदर्शन मिळतेय असे वाटले