खोली क्रमांक ४

Submitted by रुद्रसेन on 26 May, 2026 - 14:34

"अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला.

"काय..." कानामध्ये हेडफोन्स घातलेले असल्याने टोनीला नीट ऐकू गेलं नाही.

अजयच्या ते लक्षात आलं. तसं त्याने गाडीच्या मागून चालत येत पुढे बसलेल्या टोनीच्या कानातले हेडफोन्स काढून ते मागच्या सीटवर फेकले.
"गधड्या खाली उतर आणि धक्का मार. त्या दोघीच धक्का मारत आहेत" अजय जरा नरमाईत बोलत गाडीच्या मागे धक्का मारायला गेला. नाईलाजानेच टोनी गाडीमधून उतरला आणि गाडीला धक्का मारायला मागे गेला.

"आलास का? बरं झालं.. आता तू जरा धक्का मार अजयसोबत. मी दमलेय." असं म्हणत माधुरी गाडीच्या बाजूला उभी राहून घाम टिपू लागली.
"टोनी तू इथे मधे ये आणि गाडीच्या बरोब्बर मागून धक्का मार. तुझ्यात ताकद जास्त आहे. मी आणि अजय बाजूने धक्का मारतो" घामाने निथळणारी अपूर्वा टोनीला म्हणाली. तसं टोनी आज्ञाधारकपणे गाडीला धक्का मारायला लागला. तिघेही धक्का मारत होते आणि त्यांची बंद पडलेली गाडी हळूहळू पुढे सरकत होती. मागून माधुरी आपल्या जवळील मोठ्या रुमालसदृश कापडाने आपले डोके झाकुन त्यांच्यामागोमाग चालत होती. ऊन जास्त नसलं तरीसुद्धा दमल्यामुळे सगळेच घामाघूम झालेले होते.

अजय, माधुरी, टोनी आणि अपूर्वा चौघांची कॉलेजपासूनची घट्ट मैत्री. कॉलेजमधील सगळी वर्षे या चौघांनी जवजवळ सोबतच अनुभवली. लेक्चर्स, प्रॅक्टिकल, विविध कलागुणांचे समारंभ, गॅदरिंग सगळ्यांमध्ये चौघे एकत्रच सहभाग घ्यायचे. नंतर पुढे परीक्षा संपल्या आणि सोबतच कॉलेजसुद्धा.
आता आयुष्यात पुढच्या प्रवासात कोण कुठल्या क्षेत्रात जाणार हे माहित नसल्याने आणि परत कॉलेजमधे सर्रास भेटीगाठी व्हायच्या तशा होतील कि नाही हे माहित नसल्याने चौघेही कुठेतरी मस्तपैकी फिरून यावे या इराद्याने गाडी घेऊन बाहेर पडले होते. कुठे फिरावं याबाबत त्यांनी चर्चाविमर्श केला. समुद्रकिनारा, प्राचीन मंदिरे आणि शहरी ठिकाणांना आधीच सगळ्यांनी भेटी दिलेल्या होत्या म्हणून असं ठरलं कि अशा ठिकाणी जाऊ जिथे चौंघांपैकी कोणीही आत्तापर्यंत गेलेले नसेल.

बाणेरीचा डोंगर या ठिकाणी ट्रेकिंगचा अनुभव घ्यावा असं सर्वानुमते ठरलं. अजय आणि माधुरी भलतेच खूष होते कारण डोंगरदऱ्या आणि निसर्गरम्य वातावरणात फिरायला त्यांना नेहमीच आवडे. बाणेरीच्या डोंगराकडे जाणारा रस्ता काहीसा जंगलभागातुन जाणारा होता त्यामुळे अजय आणि माधुरीला या ट्रिपचं जास्त आकर्षण वाटतं होतं. अपूर्वाला निसर्गरम्य वातावरणापेक्षा डोंगर चढाई करण्यात जास्त रस होता. तशीही ती जराशी गंभीर आणि धाडसी स्वभावाची होती. इतर मुलींसारखा सोशिक आणि भिडस्त स्वभाव तिच्या शरीरात नव्हताच जणू. भीडभाड न बाळगता बोलणे हा तिचा स्वभावधर्मच. टोनीला आपल्या या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला आवडे. परत भेट होईल कि नाही म्हणून तो या सगळ्यांसोबत आलेला होता. डोंगरदऱ्यांवरची चढाई वा जंगलामधला निसर्गरम्य परिसर यापेक्षा तो संगीतामधे जास्त रमे. या प्रवासात सुद्धा त्याने त्याचे हेडफोन्स जवळ बाळगलेले होते.

ठरल्याप्रमाणे चौघे आपल्या गाडीमधून बाणेरीच्या डोंगराकडे जावयास निघाले होते. मस्तपैकी हसत खेळत, थट्टा मस्करी करत ते चाललेले असतानाच अचानक रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. आनंदाच्या क्षणात काय मधेच अरिष्ट कोसळलं असं वाटून सगळे गाडीमधून उतरून गाडी का बंद पडली हे पाहू लागले. गाडीचे सगळे टायर्स व्यवस्थित होते पण इंजिनाच्या बाजूने हलकासा धूर येत होता. इंजिनच्या भागात काही अडचण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रस्त्यावर माणसांची जास्त वर्दळ नव्हती आणि आसपास कुठे गॅरेज सुद्धा दिसत नव्हतं. मागून येणाऱ्या एका गाडीला त्यांनी हात केला तर त्यातील माणूस म्हणाला पुढे काही अंतरावर गॅरेज आहे. त्यामुळे जास्त नाराज न होता काही अंतर गाडी ढकलत जावे असा विचार त्यांनी केला. बाणेरीचा डोंगर त्यांच्या दृष्टीक्षेपात आलेला होता पण काही अंतर अजून जावं लागणार होतं. तसंही त्यांना कसलीही घाईगडबड नव्हती. कॉलेज संपलेले होते आणि फिरण्यासाठीच म्हणूनच ते बाहेर पडलेले होते म्हणून गाडी बंद पडल्याने त्यांच्या उत्साहावर जास्त काही परिणाम झालेला नव्हता.

"अजून किती लांब आहे गॅरेज" गाडी ढकलतच असताना टोनीचा खरखरीत स्वर आला.
"जास्त लांब नाहीये, पुढे ते मोठ्ठ झाड दिसत आहे ना? तिथेच आहे वाटतं" अजयचा थकलेला आवाज आला.
"अरे काही वेळच झाले तुला गाडी ढकलून तर लगेचच वैतागलास का? ती माधुरी बघ मागापासून धक्का देत होती. मुलगी असूनपण जास्त तक्रार केली नाही तिने. आणि तू एवढा हट्टाकट्टा आहेस सगळ्यांपेक्षा आणि कंटाळलास होय रे शुंभा?” अपूर्वा आपल्या नेहमीच्याच रोखठोक स्वभावात बोलली.
"कंटाळलो नाहीये गं..किती लांब आहे ते विचारलं फक्त" टोनी म्हणाला.
"तर तर.. दिसतंय कि तुझ्या चेहऱ्यावरून किती त्रास होतोय तुला ते" अपूर्वा आता त्याला उगाचच कचाट्यात पकडत होती.

दोघेही एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देत होते. यामधे अजय आपला सहभाग न दाखवता गाडीला धक्का देत होता आणि मधेच मागून डोक्यावर कापडं टाकलेल्या माधुरीला ती मागेच चालत आहे ना म्हणून लक्ष देत होता. माधुरी आपली इकडे तिकडे पाहत रस्त्यावरून चालत होती. आजूबाजूला झाडे होती पण काहीसा मोकळा मैदानी भागसुद्धा होता. पुढे काही मिनिटांच्या अंतरावर बाणेरीचा डोंगर दिसत होता. डोंगराच्या पायथ्याला जंगलभाग दिसत होता. जंगलभाग चालू होण्याआधी रस्त्यावर काही हॉटेल्स आणि टपऱ्या दिसत होत्या.

"मला वाटतं समोर टपरीवजा काहीसं दिसतंय. ते गॅरेज असावं" माधुरी समोर पाहत बोलली.
तिच्या या वाक्यासरशी अजयने समोर पाहिलं आणि "हम्म.. दिसतंय खरं.." असं म्हणाला.
"चला मग पटापट धक्का द्या. लगेचच पोहोचू तिथे. माधुरी तू पण ये ग" अपूर्वा म्हणाली.
तसं माधुरीसुद्धा त्या तिघांसोबत गाडीला धक्का देऊ लागली. काही मिनिटातच ते त्या टपरीवजा खोपटापाशी येऊन पोहोचले. गाडीला बाजूला लावून त्यांनी त्या खोपटाकडे पाहिलं आणि सगळ्यांचीच निराशा झाली. कारण ते गॅरेजच होतं पण त्याच्या लोखंडी दरवाजाला भलं मोठं कुलूप होतं.
"बोंबला... आता काय करायचं. गॅरेज तर बंद आहे" टोनी अस्वस्थ मनाने म्हणाला आणि गाडीच्या मागच्या सीटवरून आपले हेडफोन्स घेऊ लागला.
"अरे यार.. आसपास दुसरं गॅरेज देखील दिसत नाहीये." अजयने आपला त्रागा व्यक्त केला.
अपुर्वासुद्धा चरफडत गाडीच्या बॉनेटवर जाऊन बसली.
"तिथे बाजूला एक हॉटेल दिसतंय तिथे विचारून येउयात का? कदाचित हॉटेलमालक दुसरा गॅरेजवाला कुठे मिळेल हे सांगेल किंवा दुसरा काहीतरी पर्याय देईल तो" माधुरी समोर पाहत म्हणाली.
खोपटाच्यापुढे गेल्यावर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला एक दुमजली हॉटेल होतं. लांबून लक्षातही येत नव्हतं. कारण त्याच्या आसपास काहीशी झाडांची गर्दी होती. हॉटेलच्या शोभीकरणासाठी लागतात तशी झाडेसुद्धा दिसत होती.
"कल्पना चांगली आहे. चल माझ्यासोबत लगेचच जाऊन येउयात. मुलांनो तुम्ही इथेच थांबा आम्ही हॉटेलमधे जाऊन चौकशी करून येतो" अपूर्वा माधुरीला म्हणाली आणि लगोलग पुढे चालूसुद्धा लागली.

माधुरीसुद्धा काहीही न बोलता अपूर्वाच्या मागोमाग गेली.
गाडीजवळ आता अजय आणि टोनीच होते. अजय आसपासचा परिसर न्याहाळत होता. गॅरेजच्या बाजूलाच गाडी पार्किंगला लावतात तसे काही शेड्स होते. त्याच्यामागे फुलझाडांची शेती असावी कारण ती रोपे मस्तपैकी हवेत डोलत होती. सूर्य आता उतरणीला लागलेला होता. टोनी गाडीजवळच उभं राहून कानात हेडफोन्स लावून काहीतरी ऐकत मान डोलवत होता.

अजय चालत चालत पार्किंगसाठी लावलेल्या शेडच्या जवळ आला. तिथून खोपटाच्या मागचा भाग दिसत होता. खोपटाच्या मागे जरा मोकळी जागा होती आणि तिथे एक पांढऱ्या रंगाची गाडी लावलेली होती. अजयला अचानक त्या गाडीचं तिथे असण्याचं आश्चर्य वाटलं. कारण गाडीवर धूळ होती आणि गाडी बरेच दिवस वापरात नसल्यासारखी दिसत होती.

अजय गाडीच्या जवळ जाऊन गाडीचं निरीक्षण करू लागला. गाडी खूप चांगल्या स्थितीत होती. गाडीला कसलाही ओरखडा किंवा अपघाती खुणा दिसत नव्हत्या. तरीपण या गॅरेजच्यामागे हि गाडी अशी का उभी असावी याचं राहून राहून अजयला आश्चर्य वाटत होतं. पुढच्या भागाचं निरीक्षण करून अजय गाडीच्या मागच्या भागाकडे आला. गाडी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित दिसत होती. अजयने मागूनच मागचे सीट्स आणि आतल्या भागांकडे पाहिलं आणि हळूहळू त्याची नजर ड्राइव्हर सीटच्या समोरील आरशाकडे जो मागची वाहने पाहण्यासाठी असतो तेथे गेली आणि क्षणभर तो दचकलाच ...

कारण त्या आरशात त्याला कोणत्यातरी व्यक्तीचे डोळे जे त्याच्याचकडे पाहत होते हे दिसलं. पण दुसऱ्याच क्षणाला ते डोळे गायब होऊन परत तिथे साधारण आरसा दिसला.

अजयला क्षणभर आपल्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही कारण जे घडलं ते एवढं क्षणार्धात घडलं कि आपण जे पाहिलं ते सत्य होतं कि भास हेच त्याला समजेना. या धूळ खात पडलेल्या जुन्या गाडीमधे कोणीतरी बसले आहे असं वाटणं हा भास होता हे त्याच्या मेंदूला समजायला काही अवधी गेला. अचानक गॅरेजवजा खोपटाच्या पुढच्या बाजूने त्याला अपूर्वा आणि टोनीचा आवाज ऐकू आला. तो पटकन तिथून माघारी गॅरेजच्या पुढे आला.

"अगं अजून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला गॅरेज नक्कीच मिळेल" टोनी म्हणाला.
"अरे पण तो हॉटेलमालक म्हणालाय ना कि उद्या हा गॅरेजवाला येईल. तेव्हा तुमची गाडी दुरुस्त करून देईल तो" अपूर्वा त्याला समजावत बोलली.
माधुरी शांतपणे त्या दोघांकडे पाहत उभी होती. अजय तिच्या बाजूला उभा राहिला आणि माधुरीकडे 'काय झालं' अशा अर्थाने हातवारे केले.
त्यावर माधुरी शांतपणे म्हणाली कि "हॉटेलमालक म्हणतोय कि गॅरेजवाला उद्या येईल. तोपर्यंत आजची रात्र हॉटेलवर रहा आणि उद्या सकाळी गॅरेजवाला आला कि गाडी दुरुस्त करून जा".
"चांगलंय ना मग.. असंही आता संध्याकाळ होत आलीय. पुढचा रस्ता आपल्या ओळखीचा नाहीये. आजची रात्र त्या हॉटेलमधे काढणं श्रेयस्करचं आहे" अजय माधुरीच्या वाक्यावर दुजोरा देत म्हणाला.
"हो.. पण टोनी म्हणतोय अजून पुढे गेल्यावर आपल्याला कुठेतरी गॅरेज मिळेल आणि हॉटेल मालक उगाचंच गिऱ्हाईक मिळेल या स्वार्थीभावनेनं रहा म्हणतोय आणि अपूर्वा त्याला समजावून सांगतेय" माधुरी कपाळावर आठ्या पाडत म्हणाली.
यावर अजय काहीही न बोलता अपूर्वा आणि टोनीचा वाद पाहत उभा होता. दोघेही आपापल्या गोष्टीवर ठाम होते. अखेर त्या दोघांमधे एकमत होईना म्हणून मग अजय त्यांच्यामधे पडला.
"एक मिनिट थांबा दोघेही" अजय बोलला. त्याच्या आवाजासरशी अपूर्वा आणि टोनी बोलायचे थांबले आणि अजयकडे पाहू लागले.
"संध्याकाळ झालेली आहे. इथे अनोळखी भागात आपल्याला कोणीही आसरा देईल असं वाटतं नाही. उगाचंच रिस्क घेऊन थकलेलं शरीर घेऊन पुढे गाडी ढकलत जाण्यापेक्षा आजची रात्र इथेच त्या हॉटेलवर काढू खाऊ,पिऊ,आराम करू. उद्या हा गॅरेजवाला येईलच तेव्हा गाडीची दुरुस्ती करू आणि पुढे डोंगराकडे जाऊयात." असं बोलून अजय त्या दोघांकडे पाहू लागला.
त्या दोघांनाही अजयचा मुद्दा पटला होता. टोनीला सुद्धा अजयचं म्हणणं पटलं.

अपूर्वातर माधुरीसोबत पुढे निघून त्या समोरच्या हॉटेलकडे चाललीसुद्धा. अजयसुद्धा टोनीसोबत गाडीला धक्का मारत त्या हॉटेलच्या जवळ येऊन पोहोचला. दोघांनी गाडी हॉटेलच्या पार्किंगमधे उभी केली. अपूर्वा माधुरीसोबत हॉटेलच्या रिसेप्शनवर हॉटेलमालकासोबत काहीतरी बोलत होती. हॉटेल हे जास्त मोठे नव्हते वा लहान देखील नव्हते. एका जुन्या बंगल्याचे रूपांतर हॉटेलमधे केल्याप्रमाणे ते हॉटेल वाटत होते. प्रवेशद्वारापाशी असणारी सुशोभित बाग वगळता काहीही नूतनीकरण दिसत नव्हते.

"अरे या.. या... आलात तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांसोबत..या तुमचं स्वागत करतो" जरासं पोट पुढे आलेला, डोक्यावर मध्यभागी टक्कल आणि डोळ्यावर चष्मा असा रिसेप्शनवरचा माणूस जो त्या हॉटेलचा मालकदेखील होता तो अपूर्वाकडे पाहून बोलला. मगाशीच अपूर्वाने या हॉटेलमालकाला आमची अवस्था यथासांग वर्णन करून सांगितली होती.
"अरे किशन यांचं सामान खाली लगेजरूममधे ठेवुन दे" हॉटेलमालकाने त्याच्या कामगाराला आदेश सोडला. तसा किशन नावाचा खुरट्या दाढीचा मध्यमवयीन इसम आमचं सगळं सामान एक एक करून खालीच असणाऱ्या लगेजरूममधे ठेवू लागला.
"काका आम्हाला दोन रूम्स हव्यात. एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी" अपूर्वा हॉटेलमालकाला म्हणाली.
"बेटा एकचं रूम अव्हेलेबल आहे" चष्मा सावरत आणि हसत हॉटेलमालक म्हणाला,
"ओह्ह.. असं कसं काय.. काही अड्जस्ट नाही का होणार?" अपूर्वा मधाळ आवाजात म्हणाली.
"अवघड आहे बेटा.. काय आहे कि.. एकूण ५ रूम्स आहेत. त्यातील खोली क्रमांक १ मधे एक माणूस आहे. खोली क्रमांक २ मधे एक कपल आहे जे बाहेर गेलंय. खोली क्र. ३ पेस्ट कन्ट्रोल करण्यासाठी बंद केलीय. खोली क्रमांक ५ तुम्हाला मिळेल. मोठी पण आहे आणि तिथे २ बेड आहेत" हॉटेलमालक पटापट माहिती देत बोलला.
"ठीक आहे. मग अड्जस्ट करूयात. तसंही थांबावं तर लागणारच आहे" अपूर्वा दुसरं वाक्य आपल्या मित्रांकडे पाहत हळूच म्हणाली. या सगळ्या संभाषणात अजय, माधुरी आणि टोनी फक्त ऐकण्याची भूमिका बजावत होते. कारण बोलण्याचं काम तसंही अपूर्वाच करायची. वर जाऊन खोल्या पाहुन तरी येऊयात असा विचार करून अजय आणि माधुरी बाजूच्या जिन्यावरून वरच्या मजल्यावर जिथे खोल्या होत्या तिथे निघाले. अपूर्वा आपलं फ्रेश होण्याचं सामान बॅगेतून काढण्यासाठी लगेजरूमकडे वळली.

"काका.. पण खोली क्रमांक 4 अव्हेलेबल आहे कि नाही हे सांगितलेच नाही तुम्ही" इतका वेळ शांत असलेला टोनी हॉटेलमालकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर अजय आणि माधुरी वर जिन्याकडे जातानाच मधेच थांबले आणि काकांकडे पाहू लागले. अपूर्वासुद्धा आतल्या लगेजरूमकडे जाताजाता मागे वळून पाहू लागली.

टोनीच्या या प्रश्नावर हॉटेलमालक काहीसा शांत बसला. त्याच्या टकलावर थोडेसे घामाचे बिंदु जमा झाले. खिशातून रुमाल काढून त्याने टकलावरून फिरवला.
"ती खोली बंद आहे बेटा" काहीसं हसत मालक म्हणाला.
"का बरं" टोनी परत बोलला.
काहीसं शांत बसून नंतर हॉटेलमालक म्हणाला "ते.. खोलीत जरा दुरुस्तीचं काम बाकी आहे. कपाटे जुनी झालीत, बेड दुरुस्त करायचाय"
त्याच्या या उत्तरावर कोणीच काही बोललं नाही.

सगळेजण आपापल्या मार्गाला निघून गेले. अजय आणि माधुरी वरच्या मजल्यावर सगळ्या खोल्या पाहत फिरत होते. त्यांची खोली क्रमांक ५ हि अगदी टोकाला होती. ते ज्या खोलीमधे थांबलेले होते तिथे दोन बेड होते. खोली बऱ्यापैकी मोठी होती. हॉटेलला जास्त खोल्या नव्हत्या याचं दोघांनाही आश्चर्य वाटलं. वरच्या मजल्यावर मोठा पॅसेज होता आणि ठराविक अंतरावर रूम्स होत्या. ते दोघेही ५ क्रमांकाच्या खोलीत जाऊन पाहून लागले. सगळं सामान व्यवस्थित होतं. फक्त बेड २ होते आणि त्यामुळे साहजिकच अजय आणि टोनीला खाली जमिनीवर झोपावं लागणार होतं म्हणजे दोन मुलींना बेडवर झोपता येईल.
"वाह.. एका रात्रीची सोय होण्यापुरती छान खोली आहे." अजय खिडकीकडे जात म्हणाला.
"हो पण.. तुम्हा दोघांना खाली झोपावं लागेल याची खंत वाटतेय. आपण रात्री जागा बदलूयात मी खाली झोपते. तू बेडवर झोप नंतर" माधुरी काळजीच्या स्वरात म्हणाली.
"अरे सोड ना यार.. त्यात काय मोठं.. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. करेन अड्जस्ट" अजय तिची समजूत घालत म्हणाला.
माधुरीला आपण मुलगी आहोत म्हणून असं सवलत घेणं कधीच पसंत नसायचं. अजयला तरीसुद्धा तिने आपली काळजी दाखवत परत रात्री जागा बदलण्याविषयी सांगितलं. पण अजयने तिला दाद दिली नाही.
"एकच खोली अव्हेलेबल आहे म्हणून हा घोळ आहे. ना जाणो शेजारच्या खोली क्रमांक ५ मधे कसली दुरुस्ती चालू आहे. एका रात्रीपुरतं तिथे झोपता आलं असतं तर आपली गैरसोय टळली असती" माधुरी विचार करत म्हणाली.
"हो.. पण हॉटेलमालक म्हणालाय ना कि तिथे दुरुस्तीचं काम बाकी आहे" अजय म्हणाला आणि बेडवर आडवा पडला.
"देव जाणे काय सुरु आहे तिथे" असं पुटपुटत माधुरी आपल्या रूममधुन बाहेर पडली. पॅसेजमधे येऊन तिने आसपास पाहिलं. कोणीही नव्हतं. दुसऱ्या खोलीमधले कपल बाहेर गेलेले ते आले नव्हते. त्यांच्या खोलीला बाहेरून लॉक होतं. पहिल्या खोलीमधे एक माणूस होता. असे हॉटेलमालक म्हणाला होता ते दार आतून लावलेलं होतं. आपल्या रूममधून बाहेर पडल्यावर पुढे काही अंतरावरच खोली क्रमांक ४ होती. नकळतच माधुरीची पावले त्या दिशेने वळली. जवळ येऊन पाहताच तिला आश्चर्य वाटलं. कारण खोली क्रमांक ४ च्या दरवाजाला फक्त बाहेरून कडी लावलेली होती. माधुरीने आसपासचा कानोसा घेतला आणि कोण पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली.
जिन्याच्या खालून अपूर्वाचा आवाज येत होता ती अजूनही हॉटेलमालकाशी काहीतरी बोलत होती. अजय खोलीमधेच लवंडला होता. टोनी कुठेतरी बाहेर गेला होता.

माधुरीने हळूच कडी उघडली आणि दरवाजा पुढे लोटू लागली. हलकासा कर्रर्रर्र.. असा आवाज झाला.
दरवाजा उघडून माधुरीने खोली क्रमांक ४ मधे प्रवेश केला. खोलीमधे बरीच धूळ साचलेली दिसत होती. जमिनीवरसुद्धा धुळीची पुटं जमलेली होती. खोलीमधे मध्यभागी एकच बेड होता. बेडवरुन गादी अर्धवट बेडच्या खाली सरकली होती. बाजूचं कपाट अर्धवट उघड होतं. बेडच्या पुढे जमिनीवर कोळशाने कसल्यातरी २-३ विचित्र आकृत्या आणि एक रिंगण काढलेलं दिसत होतं. कोपऱ्यात एक टेबल होतं त्यावर जाडसर धागे आणि चित्रविचित्र बाहुल्या पडलेल्या होत्या. टेबलच्या बाजूला एक काचेची खिडकी होती जिचा पडदा अर्धवट लावलेला होता आणि उरलेल्या अर्धवट काचेच्या भागातून अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे कवडसे आत येत होते. खोलीत एक गूढ शांतता होती जणूकाही दुसऱ्याच जगात आलो आहे अशा प्रकारची. माधुरी दरवाजातच थांबून खोलीतल्या गोष्टींचं निरीक्षण करत होती. खोलीमध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणीही फिरकले नसल्याचे दिसत होते. माधुरीला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं कि खोलीतील सामान जसेच्या तसे होते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती किंवा कामकाज चालल्याच्या खुणा दिसत नव्हत्या.

हॉटेलमालक उगाचंच दुरुस्तीचं कारण का सांगत होता. आत्ताच खाली जाऊन हॉटेलमालकाला विचारावं म्हणून माधुरी मागे वळून दरवाजा उघडू लागली. त्याच वेळी हूं.. हूं.. एक धीरगंभीर हुंकार तिला ऐकू आला. माधुरीने झटक्यात मागे वळून पाहिलं पण आसपास कोणीही नव्हतं. फक्त तणावपूर्ण शांतता होती. तिला खूपच विचित्र वाटलं. ती परत दरवाजा उघडून बाहेर पडत असतानाच परत जरा मोठ्याने तिला हूं..हा.. असा आवाज आला. पण माधुरीने मागे वळून न पाहता झटकन दरवाजा बंद केला.

दरवाजाला बाहेरून कडी लावून माधुरी आपल्या भास झाला होता कि जे जाणवलं ते सत्य होतं या गोष्टीचा विचार करत आणि आपल्या धडधडत्या हृदयाचे ठोके ऐकत भिंतीला टेकून उभी होती. पण भास तर नक्कीच वाटला नाही. कसलातरी हुंकारण्याचा आवाज आलाच होता. खोलीत एक गूढ प्रकारची शांतता होती. जमिनीवर काळ्या रंगातल्या त्या आकृत्या कसल्या असतील. माधुरीला काहीच सुचेना. तशाच संभ्रमित अवस्थेत ती जिना उतरून खाली गेली.

इकडे अजयला आपल्या खोलीत बेडवर पडल्या पडल्याचं डुलकी लागलेली. हात पाय पसरून तो बेडवर पडलेला होता.
घु.. घु.. वाऱ्याचा आवाज खोलीभर पसरला. दारे खिडक्या बंद होत्या तरीही वारं आतमधे कसं आलं कुणास ठाऊक. खोलीच्या दरवाजावर नखांनी ओरखडे ओढावेत तसा आवाज आला.
"उठ.. उठ" कुठूनतरी खोल दरीतून घुमल्यासारखा आवाज आला आणि अजय दचकून उठला. त्याच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते.
अजयची नजर खोलीभर पसरली खोलीत दुसरं कोणीही नव्हतं पण तरीही आपल्याला कोणीतरी पाहतंय या विचारानेच त्याला उगाचंच पिंगा घातला. अजय बेडवरुन सावकाश खाली उतरला आणि त्याने आपलं डोकं पकडलं. त्याचं डोकं अगदी जड झाल्यासारखं भासत होतं. मगाशी स्वप्न पडून त्यामधे आपल्याला कोणीतरी "उठ उठ" म्हणून सांगत असल्याचं त्याला आठवलं.

‘श्या.. संध्याकाळच्या वेळी असं झोपायला नको होतं. उगाचंच चित्रविचित्र स्वप्नं पडतात. अजय मनाशीच म्हणाला.

जड झालेलं डोकं पकडून तो शेजारच्या खिडकीजवळ गेला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा जाणवलं कि अंधार हळूहळू पडू लागलाय. लांबवर क्वचित ठिकाणी दिव्यांची लुकलुक होत होती. पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. बाकीचे सगळेजण कुठे आहेत असा त्याच्या मनात विचार आला असताच त्याला खोलीच्या बाहेर पॅसेजमधे मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. खोलीचा दरवाजा उघडून तो बाहेर आला. समोर पॅसेजमधे हॉटेलमालक आणि माधुरी मोठ्या आवाजात बोलत होते तर बाजूला अपूर्वा हाताची घडी घालून उभी होती.
"अहो मी शपथेवर सांगतेय कि हि खोली क्रमांक ४ उघडी होती" माधुरी हॉटेलमालकाला म्हणाली.
"अहो मॅडम मी पण शपथेवरच सांगतोय कि इथे आत्ता दिसतंय तसंच कुलुप होतं" हॉटेलमालक आपलं म्हणणं मांडत होता. अपूर्वा जरा संशयानेच हॉटेलमालकाकडे तर नंतर माधुरीकडे आळीपाळीने पाहत होती.
त्यांच्याजवळ जात अजय त्या सगळ्यांकडे पाहत बोलला " काय झालंय ... कशाला गोंधळ करताय"
अजय जवळ आलेला पाहताच सगळ्यांची नजर त्यावर गेली आणि आता हॉटेलमालक अजयकडे वळत म्हणाला "अहो बघा ना.. या मॅडम म्हणतायत खोलीला बाहेरून कडी होती आणि त्या या खोलीमधे गेल्या होत्या आणि मी यांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करतोय कि हि खोली बंद आहे जशी आत्ता दिसतं आहे तशीच.. बघा इथे अजूनही कुलूप आहे"
हॉटेलमलाच्या या म्हणण्यावर अजयने खोली क्रमांक ४ च्या दरवाजाकडे पाहिलं. एक जुनाट वळणाचा दरवाजा होतात व आणि त्याला बाहेरून कुलूप लावलेलं दिसतं होतं.
"अजय मी मगाशी इथे होते तेव्हा या खोलीला फक्त बाहेरून कडी घातलेली होती. मी आतमधे गेलेसुद्धा होते. अजय माझावर विश्वास आहे ना तुझा" माधुरी अजयच्या जवळ जात म्हणाली. अजयने खोली क्रमांक ४ कडे पाहिलं आणि त्याला मनातून मगाशी झोपेत ऐकलेला खोल दरीतून आल्यासारखा घुमलेला तोच आवाज ऐकू आला आणि त्याचं डोकं परत जड झालं.
"अहो मॅडम तुम्ही थकला आहात, त्यामुळे तुम्हाला भास झाला असेल. तुम्ही आपल्या खोलीत जाऊन झोपा मी जेवणाची वेळ झाली कि बोलावतो" असं म्हणून हॉटेलमालक टकलावरचा घाम पुसत जिन्याने लगबगीने खाली गेला.
"मला भास झालेला नव्हता. या खोलीला कुलुप नव्हतंच मुळी ..." माधुरी जिन्याने खाली जाणाऱ्या हॉटेलमालकाल उद्देशून काहीश्या वैतागलेल्या अवस्थेत म्हणाली. पण हॉटेलमालक काहीही बोलता चटचट पायऱ्या उतरून खाली निघून गेला. माधुरी हताश नजरेने अजयकडे पाहू लागली. जो एका हाताने आपलं डोकं चोळत उभा होता.
"ठीक आहेस ना तू.. डोकं दुखतंय का तुझं" माधुरीने काळजीच्या स्वरात विचारलं.
"हो.. मगाशी जरा डुलकी लागली होती आणि उठलो तर डोकंच धरलं माझं" खरखरत्या आवाजात अजय म्हणाला.

"चला आपल्या खोलीत जाऊयात आणि तिथे जाऊन बोलूयात असंही आपल्याला आराम करायला हवाय आता" मगापासून शांत असलेली अपूर्वा त्या दोघांकडे पाहत बोलली आणि खास करून तिची नजर माधुरीवर होती. अपूर्वाने असं बोलल्यानंतर तिघेही आपल्या खोलीत आले. अजय आपलं डोकं चोळत बेडवर बसला आणि माधुरी त्याच्या शेजारी त्याची विचारपूस करत बसली. अपूर्वा दरवाजातच हाताची घडी घालून दोघांकडे पाहत उभी होती.

काही वेळ शांततेत गेल्यानंतर अपूर्वा म्हणाली "माधुरी तु त्या खोलीकडे का गेली होतीस. जर हॉटेलमालक म्हणत होता कि ती दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे"
अपूर्वाच्या प्रश्नावर माधुरीने कपाळावर आठ्या पाडत उत्तर दिलं. "अगं आपल्या खोलीत दोनच बेड आहेत. सगळेच थकलेलो आहोत. अजय आणि टोनीला उगाचंच जमिनीवर झोपावं लागू नये म्हणून जर जागा मिळालीच तर पाहावं म्हणून मी त्या खोलीत गेले होते. ३ क्रमांकांची खोली पेस्टकंट्रोलसाठी बंद आहे. शपथ.. मला खोली क्रमांक ४ च्या दरवाजा कडी लावलेला दिसला"
"तसं असेलही पण मला वाटतं उगाचच आपण हॉटेलमालकाला त्रास न दिलेला बरं आहे" खोलीमध्ये दरवाजापाशी येरझाऱ्या मारत अपूर्वा म्हणाली.

अपूर्वाच्या या वाक्यावर अजय आणि अपूर्वा एकमेकांकडे गोंधळून पाहू लागले. त्यांच्या या अशा पाहण्यावर मग अपूर्वाच म्हणाली "हे बघा जवळ आसपास कुठेही हॉटेल नाहीये आणि हॉटेलमालक आपल्याला स्वस्तात खोली द्यायला तयार झालाय. न जाणो त्याला काही बोललो तर उगाचच रागात आपल्याला बाहेर हाकलून देईल. आजची रात्रच काढायची आहे आपल्याला इथे. कशाला उगा दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि तसंही रस्त्याच्या बाजूचा तो गॅरेजवाला उद्या सकाळी येईल असं तो म्हणाला आहे. सकाळ झाली कि त्या गॅरेजवाल्याकडून गाडी दुरुस्त करून आपापल्या मार्गाला निघुयात"

अपूर्वाच्या या तर्कामुळे अजय आणि माधुरी विचारात पडले आणि त्यांना अपूर्वाच तर्क पटला सुद्धा. आपल्याला काय करायचंय कोणती खोली बंद आहे नि कोणती खोली उघडी आहे. गप आजची रात्र या स्वस्तातल्या खोलीत काढू आणि सकाळ झाल्यानंतर निघुयात.
"तुझं डोकं कसं आहे आता. तुझ्यासाठी गोळी आणु का खालून. हॉटेलमधे औषधांचा स्टॉक आहे. मी मगाशीच घेतली एक" अपूर्वा अजयजवळ जात म्हणाली.
"नाही, आता ठीक आहे माझं डोकं. मगाशी जरा जड झालं होतं" अजय म्हणाला.
"बरं तरीही मी आणून ठेवते एकदोन गोळ्या. रात्री कोणाला लागल्याचं तर... बरं हा टोनी कुठे कडमडला आहे? कोणी पाहिलंय का त्याला?" अपूर्वाने त्या दोघांना विचारलं. त्यावर दोघांनी नकारात्मक माना हलवल्या.
"ठीक आहे तुम्ही दोघे आराम करा. मी टोनी कुठे आहे ते पाहून येते" असं म्हणत अपूर्वा खोलीतून बाहेर पडली. पॅसेजमधून पुढे जाताना खोली क्रमांक ४ च्या दरवाजाकडे तिने नजर वळवून पाहिलं. त्या दरवाजाला मगाशी सारखंच कुलूप होतं. जिन्यावरून खाली उतरत ती रिसेप्शनजवळ आली. तिथे कोणीच नव्हतं. कदाचित मालक मागच्या बाजूला असेल म्हणून अपूर्वा रिसेप्शनजवळच्या छोट्या पॅसेज मधून पुढे गेली. तिथे आतमधे भाज्या किंवा खाण्याचं इतर सामान ठेवण्याची जागा होती. तिथून कसलीतरी कुजबुज ऐकू येत होती. अपूर्वा जरा नजीक गेली आणि आडोशाला उभा राहून तिने कानोसा घेतला.

"अरे वेड्या तुला कळतंय का ती पोरगी त्या खोलीत गेली असं म्हणत होती. सगळीकडे तुला लक्ष दे म्हणालो होतो ना मी" मालकाचा आवाज आला.
"हा मालक.. माज लक्ष हुतं.. आनायला भाईर गेलो हुतो" दुसरा आवाज आला जो किशनचा होता.
"मग दुसऱ्या कोणालातरी लक्ष द्यायला उभं करायचं ना मूर्खा" मालक चांगलाच तापलेला होता.
"पन मालक.. आस किती दिस चालनार. तित काय झालंय माहिती हाये कि आपल्याला हाटील काही दिस बंद ठिवूयात कि.." किशनचा दबका आवाज आला.
"हॉटेल बंद करून आपण खायचं काय? रोजीरोटी बंद करून भागात नाही.. जास्त अक्कल शिकवू नकोस. सांगितलेलं काम करत जा" मालक चरफडत म्हणाला.

अपूर्वा कान देऊन ऐकत होती. ते कशाबद्दल बोलतायत हे तिला काही समजलं नाही. किशन मालकाला काहीतरी सुचवू पाहत होता. कदाचित हॉटेल व्यवस्थित चालत नसेल म्हणून किशनने मालकाला काहीतरी सुचवलं असेल. काही का असेना, मगाशी आपणच ठरवल्याप्रमाणे इतर कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष न देता फक्त इथे रात्र काढायची असा विचार करून ती हळूच तिथून बाहेर हॉटेलच्या मुख्यदरवाजाजवळ आली. बाहेर आता अंधार पडलेला होता. हॉटेलपासूनच पुढे एका कोपऱ्यावर टोनी कानात होडफोन्स घालून उभा असलेला तिला दिसला.
भुवया वक्र करूनच ती त्याच्याकडे जायला निघाली. असा कोपऱ्यावर उभं राहून तो काय करत असावा याचा अंदाज अपूर्वाला आलेला होता.

"का रे.. असा का उभा आहेस.. सिगरेट पित आहेस का?" जवळ जाताच अपूर्वा संशयाने टोनीला म्हणाली.
तिच्या अशा अचानक येण्याने टोनी काहीसा दचकलाच. टोनी अधेमधे सिगरेट पित असतो हे सर्वानाच माहिती होतं. म्हनुनच अपूर्वाला शंका आलेली होती कि असा कोपऱ्यावर उभं राहून तो हाच कार्यक्रम तर करत नसावा.
पण स्वतःला सावरत कानातले हेडफोन्स खाली घेत तो म्हणाला "नाही ग.. असंच उभा आहे. तो समोर बाणेरीचा डोंगर पुसटसा दिसतोय बघ. तिकडेच पाहतोय" अपूर्वाने त्या दिशेने पाहिलं. अंधारात पुसटसं डोंगराचं टोकं दिसत होतं आणि त्याच्या पायथ्याला काही ठिकाणी दिवे लुकलुकत होते.
"इथे थांबलो नसतो तर पुढे कुठेतरी तिथेच पायथ्याशी जात आलं असतं. रात्रीचं डोंगराच्या पायथ्याशी राहायला छान वाटलं असतं" टोनी स्मित करत म्हणाला.
"हो ना.. गाडी बंद पडली नसती तर नक्कीच तिथे गेलो असतो" अपूर्वाने परिस्थितीची कल्पना देत टोनीला सांगितलं. यावर टोनी काहीच बोलला नाही. टोनीचा स्वभाव हा बेधडक होता. अंधार म्हणू नका खाच खळगे म्हणू नका सगळीकडे बिनधास्त फिरायचा तो. आत्तासुद्धा इथे हॉटेलवर राहण्यापेक्षा मस्तपैकी डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी राहता आलं असतं या विचारातच तो गुंग होता.
“जेवणाची वेळ झालीय आपण जेवू घेऊ आणि आराम करूयात. सकाळ होताच आपल्याला निघायचंय. अपूर्वाने टोनीला सांगितलं.
त्यावर "तू पुढे हो. मी आलोच" असं म्हणत टोनी समोर डोंगराच्या पायथ्यापाशी लागलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे पाहू लागला.
त्यावर अधिक काहीही न बोलता अपूर्वा माघारी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळ यायला वळली. अंधार झाल्यामुळे हॉटेलमधे सगळीकडे दिवे लागलेले होते. माघारी येत असतानाच अपूर्वाची नजर वरच्या मजल्यावरील काचेच्या खिडक्यांकडे गेली.

झटकन कोणीतरी वरच्या एका खिडकीतून बाजूला झालं. अपूर्वाला तो आभास जाणवला आणि तशी ती जागीच थांबली आणि पाहु लागली. कोणीतरी त्या खिडकीतून अपूर्वा आणि टोनीला मगाशी बोलताना पाहत होतं. जशी अपूर्वाची नजर वर गेली तसं पटकन ते बाजूला झालं होतं. अपूर्वाला या गोष्टीचं विशेष वाटलं. आपल्याला असं चोरून कोण बरं पाहत असेल? आणि का? तिला या गोष्टीचा काहीसा रागसुद्धा आला. ती कोणत्या बरे खोलीची खिडकी असावी? कोण बरं ती खोली भाड्याने घेऊन राहत असेल? कदाचित त्या खोलीत हॉटेलमालक असावा. मगाशी माधुरीने जो गोंधळ घातला होता त्यामुळे तो सगळ्यांवरच लक्ष ठेवत असेल. अंदाज बांधतच ती पुढे मुख्यप्रवेशद्वाराकडे वळली.

रिसेप्शनच्या मोठ्या टेबलाजवळच तिला हॉटेलमालक उभा असलेला होता. अपूर्वा आतमधे येताच हसून “जेवण तयार आहे. खाली येऊन जेवून घ्या” असं आदबीने हॉटेलमालक म्हणाला. त्यावर होकार भरत अपूर्वा जिना चढुन विचार करतच वर गेली. मालक तर खालीच होता. मग मगाशी खिडकीत कोण असावं? अपूर्वाला प्रश्न पडला. मगाशी खालून वर खिडकीत दिसलेली ती सावली कोणत्या खोलीतील खिडकीची असावी याचा अंदाज बांधत ती पॅसेजमधून पुढे जात होती. अंदाजानेच ती एका खोलीपाशी उभी राहिली. इथे कोणी राहत असेल का असा तिच्या मनात आला. आत जावे कि नाही असं तिला क्षणभर वाटलं. पण आतमधे जाऊन जे कोणी इथे राहत असेल त्याला काय विचारावे? मगाशी खिडकीत तुम्हीच होतात का? का बरे पाहत होतात खाली माझ्याकडे?

अपूर्वाला स्वतःलाच ते प्रश्न अवघडल्यासारखे वाटले. कोणालाही हे प्रश्न वेडसरपणाचे वाटले असते आणि मगाशीच माधुरीने गोंधळ घातला असताना उगाचच आपल्या या शोध मोहिमेची त्यात भर पडेल आणि हॉटेलमालक आपल्याला येथून निघून जा म्हणेल. पण मगाशी खिडकीतून जे कोणी पाहत होतं ते नक्कीच विचित्र होतं. त्याचा छडा लावावाच अशी उर्मी तिच्या मनात दाटून आलेली होती. शेवटी दार वाजवून आतील भाडेकरूला आपण इथे आत्ताच या हॉटेलमध्ये शेजारच्याच खोलीत आलोय. आपली बंद पडलेली गाडी दुरुस्त करणारा कोणी मॅकेनिक आसपास मिळेल का हे विचारून आत प्रवेश मिळवावा असं तिने ठरवलं. मनाची तयारी करून अपूर्वाने त्या खोलीवर थाप मारली. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. थोड्या वेळाने अपूर्वाने परत थाप मारली तरीही काही उत्तर नाही.

थोडं वेळ थांबून अपूर्वाने जरा जोरातच थाप मारली तर दरवाजा थोडा पुढे सरकला. म्हणजे दरवाजा उघडाच होता तर अपूर्वा मनातच म्हणाली. दरवाजा थोडासा पुढे करून अपूर्वाने आत डोकावून पाहिलं. आतमधे मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश होता. कोणिहि आतमधे असल्याची चिन्हे दिसत नव्हती. अपूर्वाने तिच्या नकळतच आतमधे पाऊल टाकले. खोलीत धीरगंभीर शांतता होती. बाहेरून येणारे हवेचे आणि खाली रिसेप्शनवरून येणारे मालक आणि किशन यांचे आवाज अचानक येणे बंद झाले.

न जाणो कोणी बाथरूममधे असेल असं वाटुन अपूर्वाने "हॅलो.. कोणी आहे का"? असे दोनदा आवाज दिले पण कोणीच पुढे आलं नाही.
अपूर्वा त्या मिणमिणत्या प्रकाशात संपूर्ण खोली न्याहाळू लागली. समोर बेड होता. बेडवरुन गादी अर्धवट बेडच्या खाली सरकली होती. बाजूचं कपाट अर्धवट उघड होतं. समोर एक खिडकी होती. खिडकीकडे पाहून अपूर्वाला जाणवलं याचं खिडकीमधे मगाशी कोणीतरी उभं होतं. अपूर्वाची पावले सावकाशपणे खिडकीकडे वळली. काचेच्या खिडकीचा अर्धवट पडदा बाजूला करून तिने खाली पाहिलं तर मगाशी ती खाली उभी होती ती जागा दिसत होती. टोनीसोबत बोलत होती ती जागासुद्धा दिसत होती. पण समोर तर टोनी कुठेच दिसत नव्हता.

अचानक घू... असा धीरगंभीर पण हळू आवाज आला आणि अपूर्वाने मागे वळून पाहिलं. खोलीमधे कोणीही नव्हतं. इथे कोणीच नाहीये याची खात्री अपूर्वाला झालेली होती. पण असं असताना बाहेरचं दार उघडं कसं काय होतं. विचार करतच अपूर्वा खिडकीच्या शेजारी असणाऱ्या टेबलाकडे वळली. शेजारील टेबलवर तिची नजर जाताच तिला धक्काच बसला. धागेदोरे आणि विचित्र काळ्या बाहुल्या तिथे पडलेल्या होत्या. मिणमिणत्या प्रकाशात तिला टेबलावर काय आहे ते लांबून समजलंच नव्हतं. टेबलाजवळ गेल्यावर हे सगळं पाहून तिला चांगलाच हादरा बसला. हे तर काहीतरी वाईट शक्तींची उपासना करण्याचं तंत्र साहित्य आहे. अपूर्वाची तर मतीचं गुंग झाली. अपूर्वाचं लक्ष टेबलच्याखाली गेलं. टेबलच्याखाली एक ड्रॉवर होता. अपूर्वाने सावकाशपणे तो ड्रॉवर उघडला. उघडताना त्याचा कर्रर्रर्र असा लयीत हळुवार आवाज झाला जो खोलीभर घुमला. आतमधे हात घालून अपूर्वाने चाचपलं. तिला एक कागदासारखं काहीतरी हाताला लागलं. अपूर्वाने ते बाहेर काढलं तर तो एक फोटो होता. अंधुक प्रकाशात जास्त काही दिसत नव्हतं. फोटो तिने जरा डोळ्यांसमोर धरला. कुणा व्यक्तीचा फोटो दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्याभोवती एक लाल रंगाचं वर्तुळ काढलेलं होतं. अपूर्वाला काहीतरी शंका अली म्हणून तिने फोटो अजून जवळ धरला तर तिला अजून एक धक्का बसला कारण ते लाल रंगाचं वर्तुळ हे रक्ताने काढलेलं होतं. वर्तुळातून लाल ठिपके बाहेर पसरलेले होते. अपूर्वाला इथे या खोलीत काहीतरी भयानक प्रकार चाललेला आहे याची कल्पना आलेली होती.

ती या सगळ्या प्रकारचा विचार करत असतानाच मागून दरवाज्याचा खाड्कन आवाज झाला. अपूर्वा गर्रकन मागे वळाली. मगाशी उघडा असणारा दरवाजा अचानक बंद झालेला होता. अपूर्वा वेगाने दरवाजाजवळ गेली. दरवाजाची मूठ पकडून तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा काही उघडला नाही. कदाचित तो लॉक झालेला असावा.

हूं... हा.. एक अंगावर शहारे आणणारा धीरगंभीर हुंकार खोलीभर पसरला.
आता मात्र जिवाच्या आकांताने घाबरून अपूर्वाने जोरजोरात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. पण दरवाजा काही उघडेना. तेवढ्यात खोलीतल्या अर्ध्या उघड्या कपाटातून धडधड असा झाला. अपूर्वाने थरथरत तिकडे वळून पाहिलं. तिचं तिच्या शरीरावरचं नियंत्रण सुटल्यासारखं झालं होतं. श्वास रोखून ती कपाटाच्या दिशेने पाहत होती. कपाटातून एक हलकीशी खरखर ऐकू आली. कपाटात काहीतरी होतं जे बाहेर पडायला बघत होतं.

अपूर्वाचा चेहरा पूर्णपणे घामाने डबडबला होता. तरीही भारल्याप्रमाणे ती कपाटाकडे पाहतच होती. त्या अर्धवट उघड्या कपाटाच्या दरवाजातून एक पांढराशुभ्र हात बाहेर आला. कपाटाच्या दरवाजाला त्या हाताने आतूनच पकडलं. हे पाहून तर अपूर्वाची बोबडीचं वळली.
मोठ्याने किंचाळून अपूर्वाने जोरजोरात दरवाजावर धक्के द्यायला चालू केले. "कोणी आहे का.. कोणी आहे का..वाचवा..?" असं म्हणत अपूर्वा अक्षरशः दरवाजावर बुक्क्या मारू लागली. मागे कपाटातील पांढरा हात आतूनच कपाटाचं दार पकडून हळुवारपणे उघडू लागला.
अपूर्वा दरवाजा बडवत असतानाच खोलीचा दरवाजा अचानक उघडला गेला. अपूर्वा गांगरलीच आणि धडपडत पटकन बाहेर पडू लागली. खोलीचा दरवाजा उघडून कोणीतरी तिला बाहेर ओढलं होतं. अपूर्वा झटकन बाहेर पडली. बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या ती अंगावरच कोसळली. तिच्या या आवेशात बाहेर पडण्याने अपूर्वा आणि ती व्यक्ती दोघेही पॅसेजमधल्या जमिनीवर कोसळले. घाबरून अपूर्वा जमिनीवर गलितगात्र झाल्यासारखी पडलेली होती. आपण कोणाच्या अंगावर कोसळलो ते पाहायला सुद्धा तिने मान वळवलेली नव्हती. थोड्या वेळाने तिच्या शेजारून कोणाच्यातरी हसण्याचा आवाज आला. ती ज्या व्यक्तीच्या अंगावर कोसळली होती जिने तिला त्या खोलीतून बाहेर काढलेलं होतं ती व्यक्ती जमिनीवर लोळतच हसत होती. अपूर्वाने रागातच शेजारी पाहिलं तर बाजूला टोनी जमिनीवर लोळत हसत होता.

अच्छा तर टोनीने आपल्याला त्या भयानक खोलीतून बाहेर काढले तर विचार करतच अपूर्वा उठली आणि तिने आपले कपडे झटकले. टोनी अजूनही दात काढतच जमिनीवर पडलेला होता.
"तुला हसायला काय झालंय. तुला माहिती का आतमधे मी काय पाहिलंय." टोनीच्या मुर्खासारख्या हसण्यावर अपूर्वाला खरतर धक्काच बसला.
"हसू नको तर काय करू?.. मगाशी वर येताना मला हा दरवाजा उघडा दिसला आतमधे पाहिलं तर तू पाठमोरी उभी होती. म्हटलं थोडी गम्मत करावी मग धाडकन आवाज करत दरवाजा बाहेरून लावून घेतला" असं म्हणत टोनी अजूनच हसू लागला.
त्याचं हे बोलणं ऐकून तर अपूर्वाचं टाळकंच सटकलं. आतमधे भीतीने आपली गाळण उडालेली असताना हा निर्लज्ज टोनी दात काढतोय आणि सगळ्यात कहर म्हणजे दरवाजा यानेच बाहेरून लावलेला होता. तेपण का? तर आपली गंमत करायला. काय हा मूर्खपणा. खोलीत आपण काय अनुभवलं हे अपूर्वालाच माहिती होतं. हसत हसत टोनी जागचा उठला.

अपूर्वा संतापाने थरथरत होती. तशाच अवस्थेत ती त्याच्या जवळ गेली आणि खाडकन टोनीच्या मुस्काटात मारली. टोनीला याची सुतराम कल्पना नव्हती कि अपूर्वा असं काहीतरी करेल. अर्थात अपूर्वा हे करू शकत होती पण या छोट्याश्या मस्करीवर तिने एवढं रिऍक्ट व्हावं याचं त्याला आश्चर्य वाटलं.
"मूर्ख माणसा आतमधे माझी अवस्था काय झाली होती माहिती का? आतून मी जिवाच्या आकांताने ओरडत हाका मारत होते. तुला ऐकायला आलं नाही की माकडा.. तुला हि सगळी गंमत वाटली का?" अपूर्वा रागात म्हणाली. भीतीने तिचं अंग अजूनही थरथरत होतं.
"थोडावेळ फक्त दरवाजा लावून तुला भीती दाखवावी असं वाटलं. पण मला आतून तुझा कसलाहि आवाज ऐकू नाही आला" टोनी खाली मान घालून गालावर हात ठेवत म्हणाला.
"कसला खोटारडा आहेस रे.. धडाधड मी दरवाजा वाजवत होत आणि ओरडत होते आणि तुला ऐकू आलं नाही म्हणतोस.. नालायक" अपूर्वा अजूनच खेकसत म्हणाली.
"नाही शपथ... मला कसलाही आवाज नाही आला. ना तुझा ना इतर कसला.. मी फक्त तुला ऐकू जाईल अशा पद्धतीत दरवाजा ओढून लावला आणि थोड्यावेळाने तुझ्या २-३ थापा दारावर पडल्या तेवढ्या काय त्या ऐकल्या. मग वाटलं घाबरलीस तू आणि मग लगेच उघडला." टोनी आपली बाजू मांडत म्हणाला.

त्यावर अपूर्वाने काहीच विचारलं नाही. कपाळावर आठ्या पाडून तिने बाजूच्या खोलीच्या दाराकडे पाहिलं मग पॅसेजमध्ये आजूबाजूला पाहिलं. पॅसेजमध्ये दुसरं कोणीही हा धुडगूस बघायला नव्हतं याचं तिला हायसं वाटलं. आजूबाजूच्या खोल्या बंदच होत्या. आत्ता बाहेर पडलेल्या खोलीच्या दरवाजाकडे अपूर्वाने पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं कि ती खोली क्रमांक ४ मधे गेलेली होती. खोलीमधे मगाशी अनुभवलेल्या गोष्टी आठवताच एक भीतीची शिरशिरी तिच्या अंगातून विद्युतप्रवाहाप्रमाणे गेली. त्या खोलीपुढून तात्काळ दूर जावे अशी इच्छा तिला झाली. तरातरा चालत ती तिथून आपल्या खोलीकडे निघाली. तिच्यामागून टोनीसुद्धा सावकाशपणे खोलीत आला.

खोलीत अजय आणि माधुरी बेडवर काहीतरी बोलत बसले होते. अपूर्वा आणि टोनीच्या खोलीत एकदम येण्याने ते दोघेही चांगलेच दचकले. अपूर्वाचा तर अवतारच झालेला होता. अंगावर सगळीकडे धूळ होती, कपडे मळके दिसत होते, केस अस्ताव्यस्त झालेले होते. ती भीतीने थरथरत असल्यासारखी वाटतं होती. मगाशी त्या खोलीत कपाटातून बाहेर येत असलेला पांढरा शुभ्र हात पाहून तिची अशी अवस्था होणं सहाजिकच होतं. माधुरीने जागेवरून उठून तिच्याजवळ जात तिची विचारपूस केली असता अपूर्वाने खोली क्रमांक ४ मधील आलेला तो भयानक अनुभव त्या सगळ्यांना सविस्तर कथन केला. माधुरीने हे ऐकून तोंडावरच हात ठेवला आणि म्हणाली "बघा.. मी म्हणाले होते ना कि मगाशीसुद्धा ती खोली बाहेरून उघडी होती. आतमधे नक्कीच काहीतरी विचित्र आहे" अपूर्वा अजूनही दहशतीखाली असल्यासारखी वाटत होती. माधुरीने तिला मिठी मारली आणि तिचं सांत्वन करू लागली.

टोनीला या सगळ्या प्रकरणावर काय बोलावे तेच समजेना कारण त्याने इथे आल्यापासून असला कोणताच अनुभव घेतलेला नव्हता म्हणून तो फक्त मान खाली घालून आणि कपाळाला आठ्या पाडून ऐकण्याचं काम करत होता. अजय मात्र खिडकीच्या बाहेर आपली दुखरी मान चोळत पाहत होता. बाहेर चांगलाच अंधार पडलेला दिसत होता. हॉटेलपासून काही अंतरावर असणारे ते गॅरेज आणि त्यामागची बेवारस गाडी या खिडकीतून दिसतेय का ते पाहण्याचा त्याचा प्रयत्न चाललेला होता. मगाशी तिथे त्या गाडीजवळ असताना त्यालासुद्धा असाच विचित्र अनुभव आलेला होता. तो अनुभव आपल्या मित्रांना सांगावा का असं त्याला वाटलं. पण काहीसा विचार करून त्याने ते का कुणास ठाऊक टाळलं.
एवढ्यात दरवाजावर टक टक झाली. सगळेजण दरवाजाकडे पाहू लागले पण जागचं हललं कोणीच नाही. अपूर्वाने मात्र माधुरीचा हात पटकन घट्ट पकडला. काही वेळाने परत टक टक झाली. टोनी जो दरवाजाजवळच उभा होता त्याने सावकाशपणे दरवाजाकडे जात कडी उघडली आणि हळूच बाहेर पाहिलं तर बाहेर हॉटेलचा नोकर किशन उभा होता.

"जेवन तयार आहे. मालकानी खाली बोलावलंय" आपल्या खरखरत्या आवाजात किशन म्हणाला.
त्याचा आवाज ऐकताच अपूर्वा दरवाजाकडे जात म्हणाली "आम्ही सगळे इथेच खोलीत जेवू शकतो का?
अपूर्वाच्या अचानक समोर येण्याने किशन जरासा शांत झाला. पण नंतर लगेचच म्हणाला "मालकानी खाली येऊनच जेवाय सांगितलंय. वर जेवनं आणायला स्वयंपाकी नाहीयेत आत्ता हॉटेलमधे"
त्याच्या या उत्तरावर अपूर्वा काहीतरी बोलणारच होती इतक्यात मागून माधुरी म्हणाली "हो मालकांना सांगा आम्ही आलोच लगेच" माधुरीच्या या उत्तरावर किशन लगोलग तिथून निघाला.

अपूर्वाने कपाळावर आठ्या पाडत माधुरीकडे पाहिलं. त्यावर माधुरी म्हणाली कि उगाचच कशाला त्या बिचाऱ्याला जेवण वर आणायला सांगायचं. मालक सांगतोय खाली येऊन जेवण करा तर जाऊन येऊया. इथे कोणाच्याच तोंडाला न लागता गुपचूप एक रात्र काढून सकाळी पळून जावं असं माधुरीचं ठाम मत झालेलं होतं. अपूर्वाला अजूनही मगाचा तो खोली क्रमांक ४ मधला क्षण आठवला तरी थरकाप सुटत होता. माधुरीने तिला जवळच धरून ठेवलं होतं. सगळ्यांनी मग पटकन फ्रेश होऊन खाली जेवायला जायचं ठरवलं. सगळेजण खोलीतून बाहेर पडून पॅसेजमधून जात होते. पॅसेजमधून ते सगळेजण खोली क्रमांक ४ च्या पुढून जात असतानाच माधुरीची आणि अपूर्वाची नजर आपसूकच खोली क्रमांक ४ च्या दरवाजाकडे वळली. अजय आणि टोनीचं मात्र लक्ष नव्हतं ते आपले पुढे निघून गेले.

त्या दरवाजाकडे पाहताच अपूर्वाने माधुरीचा हात इतक्या जोरात दाबला कि तो लाल पडला. माधुरी सुद्धा हादरलीच. कारण आत्ता ते खोली क्रमांक ४ च्या पुढून जात असताना त्यांना दिसलं कि खोली क्रमांक ४ च्या दरवाजाला चक्क कुलूप आहे.
दोघींनी भयभीत आणि सूचक नजरेने एकमेकींकडे पाहिलं. इथे कुलूप कसं काय असू शकतं. कारण मगाशीच दोघींनी खोली क्रमांक ४ च्या दरवाजाला बाहेरून उघडा असलेला पाहिलं होतं. अपूर्वा हेच माधुरीकडे पाहत बोलणार होती पण माधुरीने तोंडावर बोट ठेवून तिला चुप्प बसण्याची खूण केली. दोघी एकमेकींना आधार देताच पॅसेजमधून खाली जेवणाच्या खोलीकडे गेल्या.

खाली लगेजरूमच्या शेजारीच खाण्याची व्यवस्था केलेली होती. खोलीच्या मधोमध मोठं टेबल मांडलेलं होतं आणि हॉटेलमालक टेबलाच्या एका टोकाला बसलेला होता. बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर सगळेजण बसले आणि किशनने भराभरा ताटे वाढली.

"काय मग खोली आवडली कि नाही" हसत हसत मालक सगळ्यांकडे पाहत म्हणाला.
या प्रश्नावर कोणालाच काय बोलावे ते कळेना.
"छान आहेत..पण आम्हाला काय एकच रात्र काढायचीय" टोनी कोरडं हसत म्हणाला.
"हो.. हो.. खरंय खरंय..जेवा जेवा.." मालक म्हणाला.
"हॉटेलमधले बाकीचे भाडेकरू कुठे आहेत" अजय म्हणाला. कारण जेवणाच्या टेबलवर त्या चौघांव्यतिरिक्त कोणी नव्हतं.
यावर मालक जरासा थांबला. पण त्याने हसून उत्तर दिलं "बाकीचे भाडेकरू सकाळीच फिरायला गेले ना डोंगराकडे. तिथे बऱ्याच गोष्टी आहे पाहण्यासारख्या. फिरून झालं कि रात्री मुक्काम करतात लोक तिथे आणि दुसऱ्या दिवशी इथे हॉटेलवर येतात"
हॉटेलमधे खोली बुक केलेली असताना परत कोणी प्रवासी डोंगराच्या पायथ्याशी का मुक्काम करेल हे कोणालाच कळेना. पण भूक लागल्याने कोणी काही प्रश्न विचारले नाही. पटापट पुढ्यात वाढलेल्या अन्नावर सगळेजण तुटून पडले.
"तू खूप शांत वाटतेयस बेटा" अपूर्वाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत मालक म्हणाला. एवढी बडबडणारी अपूर्वा अचानक शांत कशी बसली असं वाटून मालकाने हा प्रश्न विचारला होता.
या प्रश्नावर अपूर्वा जरा दचकलीच. आपण का शांत झालोय याचं उत्तर मालकाला सांगून सुद्धा पटेल कि नाही हे अपूर्वाला समजलं नाही म्हणून ती फक्त मान खाली घालून आपल्या ताटाकडे पाहत बसली
"आमची बंद पडलेली गाडी ढकलून ढकलून जरा दमलेय ती" कसनुसं हसत माधुरीने मालकाला उत्तर दिलं.
त्यावर अच्छा.. असं होय.. अशी प्रतिक्रिया देऊन मालक काहीही न बोलता जेवू लागला.

अजय आपल्या मानेला झटके देत ताटात पाहत बसला होता. जणू काही त्याच्या मानेला लचक भरली असावी. टोनी मात्र एक प्रकारच्या वेगळ्याच चिंतनात गढला. हॉटेलमधे आपण सोडून इतर कोणीच नाही आणि अपूर्वा आणि माधुरीला हॉटेलमधल्या त्या गूढ खोलीत आलेले विचित्र अनुभव. जेवण करायला आपण सोडून मालक आणि किशन एवढेच. इतर कोणताही हॉटेलचा कर्मचारी आसपास नाही. नक्की चाललंय काय इथे. टोनीला एक वेगळीच शंका आलेली होती.

आपली शंका बरोबर आहे कि नाही हे पडताळायला हवं असं वाटून टोनी पटापट जेवायला लागला आणि सगळ्यात आधी त्याने जेवण संपवलं. जेवण झाल्यावर आपल्याला सिगरेट प्यायची असते हे कारण सांगून टोनी तिथून सटकला. त्यावर त्याला कोणी काही हटकलं नाही. जेवणाच्या खोलीतून टोनी सरळ रिसेप्शनच्या टेबलाजवळ आला. कोणी आपल्याला पाहत नाहीये याची खात्री करून तिथे असलेलं रजिस्टर त्याने उचललं आणि चाळू लागला. इकडे तिकडे पाहत सावधगिरीनेच त्याने रजिस्टर पाहायला सुरुवात केली.
आजच्या तारखेखाली खोली क्रमांक ५ सोडली तर कोणतीच एंट्री नव्हती. इतर खोल्या कोणीच बुक केलेल्या नव्हत्या. इतकच नव्हे तर मागची काही पाने उलटली असता त्याला असं आढळलं कि मागच्या महिन्याभरापासून कोणतीच खोली बुक झालेली नव्हती. टोनीला हे पाहून आश्चर्य वाटलं नाही. कारण त्याला मगाच संशय आलेला होता. हॉटेलच्या पार्किंगमधे इतर कोणाच्याही गाड्या नाहीयेत. मगाचपासून आपण चौघेजण सोडले तर कोणी गिऱ्हाईक खोली बुक करायला आलेलं नाही. मगाशी बाहेर उभं राहून त्याने रस्त्यावर अंदाज घेतलेला होता कि डोंगराच्या पायथ्याला काही प्रमाणात राहण्याची सोय असावी. गाड्या रस्त्यावरून थेट तिथेच जातात. इथे कोणीही थांबतं नाहीये.
नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे नाहीतर असं इथे कोणीच कसं येत नाहीये. जेवणाच्या खोलीतून कोणीतरी बाहेर येत असल्याचा आवाज आला आणि टोनी रजिस्टर सावकाशपणे टेबलवर आहे तसं ठेवून हॉटेलच्याबाहेर वळाला.

हॉटेलबाहेर रस्त्यालगत हॉटेलच्या नावाचा बोर्ड होता तिथे जाऊन टोनी सिगरेटचे झुरके मारत उभा राहिला. बाहेर किर्रर्र काळोख पसरलेला होता. बाणेरीच्या पायथ्याला दिव्यांची लुकलुक दिसत होती. हॉटेलच्या पार्किंगच्या बाजूला कसलातरी आवाज आला म्हणून टोनीने मागे वळून पाहिलं तर हॉटेलमधला नोकर किशन लाकडे आणि इतर गोष्टी गोळा करून शेकोटी करत होता. किशनला पाहताच टोनीला वाटलं कि हा किशन किती दिवसांपासून इथे कामाला असेल? किशनला या हॉटेलमधे घडणाऱ्या विचित्र घडणाऱ्या गोष्टींचं गौडबंगाल नक्कीच माहित असावं. असं वाटून टोनी किशनकडे जाऊ लागला. किशनने लाकडे व्यवस्थित करून जाळ केलेला होता.

"काय किशन काका मस्त शेकोटी करताय" टोनी मुद्दाम खेळीमेळीच्या स्वरात म्हणाला.
"शेकोटी.. असं काय नाय. मागच्या अंगणात कागदे कपटे आणि कचरा पडलेला होता. तो जरा जाळून टाकावा म्हटलं" किशन शांतपणे म्हणाला. शेकोटी पेटवून किशन बाजूला जाऊन बसला आणि बंडीच्या आतमधे बिडी शोधू लागला. किशन खुरटी दाढी असलेला एक मध्यम वयाचा इसम होता.
"तुम्ही किती वर्षांपासून इथे कामाला आहात" खाली बसत गुडघ्यावर हात ठेवत टोनीने विचारलं.
"मला झाली असतील तीनेक वर्षे" बंडीच्या आतल्या भागात बिडी सापडल्याने किशनने शेकोटीतून एक लाकूड काढलं आणि बिडी पेटवू लागला.
"हि घ्या सिगरेट... बिडीपेक्षा छान आहे" आपल्याजवळील सिगरेट किशनला देत टोनी म्हणाला. किशनकडून काही माहिती काढायची म्हटल्यावर त्याला काहीतरी देणे टोनीला गरजेचे वाटले. टोनी देत असलेली महागडी सिगरेट पाहून किशनच्या डोळ्यात चमक आली. पटकन त्याने टोनीकडून ती सिगरेट घेतली आणि विस्तवाने पेटवली.
"तुमचे सगळे दोस्त गेलेत झोपायला त्यांच्या खोलीत.. तुमी का बाहेर आहात" सिगरेटचा एक दीर्घ झुरका घेत किशन म्हणाला. आजूबाजूला चांगलाच काळोख पडलेला होता. हॉटेलमधले मोठे दिवे विझवुन आता तिथे मिणमिणता प्रकाश होईल एवढेच दिवे लावलेले होते. तेवढाच काय तो प्रकाश पसरलेला होता.
"मला लवकर झोप येत नाही म्हणून जरा बाहेर पाय मोकळे करावं म्हटलं" टोनीने उत्तर दिलं.
"असं वय.. थोडंसं थांबून किशन आगीकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाला. “रातच्याला बाहेर फिरू नये हित."
"का बरं.. काही अडचण आहे का इथे हॉटेलमधे" त्याचं गंभीर आवाजात टोनीने किशनला विचारलं.
सिगरेटचा अजून एक झुरका घेत किशनने हॉटेलकडे पाहिलं. सगळीकडे शांतता वाटतं होती. किशनच्या चेहऱ्यावर एकप्रकारची गूढमिश्रित गंभीरता आलेली होती. शेकोटीच्या उजेडात किशनच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसत होती.
शेकोटीकडे पाहत किशन हळू आवाजात म्हणाला "हित फुडं जो डोंगर हाये. बानेरीचा हो... तीत काही लोक का येत्यात माहिती का तुमाला"
"फिरायला येत असतील” टोनी किशनकडे म्हणाला.
"हा ते येत्यातच हो.. पण सगळेचजण फिरायला येत नाईत. काही लोक वेगळ्या कामाला पण येत्यात" असं बोलून किशन परत हॉटेलच्या दरवाजाकडे पाहू लागला. जणू काही कोणाचा कानोसा घेत असावा.
"म्हणजे मला नाही समजलं.. फिरण्याशिवाय इथे अजून काय काम असतं लोकांचं?" टोनी किंचित आठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाला.
"तुमि शहरातील मानस आहात. तुमाला असल्या गोष्टी नाहीत पटनार" किंचित हसत किशन शेकोटीतील लाकडे व्यवस्थित करू लागला.
"तुम्ही आमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहात. तेव्हा तुम्ही जे सांगाल ते खरंच असेल, त्यामुळे विश्वास ठेवावाच लागेल. तसंही इथे या हॉटेलवर जास्त लोक येत नाहीत वाटतं" किशनला अजून बोलतं करण्यासाठी टोनी संभाषण वाढवत म्हणाला.

टोनीच्या या बोलण्यावर किशनने फक्त कोरड्या नजरेने टोनीकडे पाहिलं. थंड नजरेने टोनी फक्त किशन आता काय बोलेल हे पाहू लागला.
शेकोटीतले एक लहान काढून जमिनीवर रेघोट्या काढत किशन बोलू लागला" आपल्या हॉटेलवर आदी लय मानस यायची राहायला. काही जण फिरायला आलेले असायचे. काही असेच... बानेरीच्या पायथ्याला पूर्वी एक समशान होतं. असं काही जुनेजाणते लोक म्हणत्यात. लैच जागृत समशान हुतं. तांत्रिक उपासना करणारे लोक आजबी तीत साधना करायला येत असत्यात"
"ओह्ह म्हणजे मांत्रिक लोक" टोनी जास्तच गंभीर आवाजात म्हणाला.
"हा आन.. उपासना वगेरे झाली कि राहायची सोय म्हणून हॉटेलवर किंवा तिथेच पायथ्याला कुठेतरी राहत्यात" किशनने माहिती पुरवली.
किशनने हि माहिती सांगताच टोनी चांगलाच विचारात पडला. या इथल्या हॉटेलवर सुद्धा त्या वाम गोष्टीचा प्रभाव आहे कि काय असं त्याला वाटलं.
"आपल्या हॉटेलवर सुद्धा ती लोक येत होती का? तुम्ही म्हणालात कि आधी लोक यायचे खूप इथे आता येत नाहीत असं का”? टोनीने किशनला प्रश्न विचारले.

टोनीच्या या प्रश्नावर किशनने आपली खुरटी दाढी खाजवली आणि गंभीरपणे टोनीकडे पाहिलं. त्या गडद काळोख्या रात्रीत त्या दोघांचं संभाषण मधेमधे थांबल्यावर उरणारी शांतता भयावह वाटत होती.

"आपल्या हाटीलवर काही महिन्यांपूर्वी एक मानुस आलेला हुता. तांत्रिक वाटतं नवता. सादा आपल्यासारखाच मानुस हुता. बरेच दिस होता मुक्काम त्याचा. सांच्याला निघायचा इथून आन सकाळी झाली कि परत याचा. त्याच्या खोलीत एकदा चहा द्यायला गेलो होतो. मला आतमदी पण येऊ दिलं नाई त्याने. थोडासा दरवाजा उघडला चहा घेतला आन खाडकन दरवाजा लावला. पण तेवढ्या उघडलेल्या दरवाजातून माजी नजर आतमदी गेली हुती. खोलीत अंधुकसा धूर होता कसलासा आन जमिनीवर कसल्यातरी रेगोट्या काढलेल्या होत्या. आन त्या रेगोट्याच्या मदे एक फुटू होता कोणाचातरी." किशनने पटापट सांगितलं आणि थोडावेळ सिगरेटचे झुरके घेतले. "मग पुढे काय" टोनी कान देऊन किशनचं बोलणं ऐकत होता. शेकोटीचा अग्नी मंदपणे जळत होत होता. संभाषण थांबल्यानंतर आजूबाजूला मगासारखीच भीषण शांतात पसरली.
"तेच्या खुलीत मी जे काय पायलेल… ते समदं मालकाला सगळं सांगितलं. पन मालकाने काय लक्ष दिल नाई. नंतर एके दिशी तो मानुस रात्री गेलेला तो परत सकाळच्याला आलाच नाई. अचानकच गायब झाला. तेच्या खोलीला कुलूप लावलेलं हुतं. आमी लय वाट पाईली पन तेचा पत्ता काय लागला नाई. तेचि गाडीबी पार्किंग मदी तशीच पडून होती. तो काही परतला न्हाई मंग मालकाने नंतर गॅरेजवाल्याला दिऊन टाकली. एके दिशी वरच्या मजल्याव कामानिमीत मी फिरत होतो. तर त्या कुलूप लावलेल्या बंद खोलीतून कसलातरी घुमल्यासारखा आवाज आला होता. शेजारच्या खोल्या तवा भाड्याने दिलेल्या होत्या. ती लोकंबी तकरार करायले कि, कसलातरी कि आवाज येतोया खुलीतून" किशनने एवढं बोलून आवंढा गिळला. टोनी पापणीही न लावता किशन सांगत असलेली हकीकत ऐकत होता. टोनीच ह्दय नाही म्हटलं तरी धडधायला लागलं होतं.
किशन पुढे बोलू लागला - "मग मालकांनी ती खुली काय उघडली नाई. हळूहळू आसपासच्या लोकास्नी कळलं कि इत हाटीलमदी काईतरी अडचण आहे. तवा लोकं हित यायची कमी झाली. मी म्हनलं मालकाला कि हाटील बंद करूयात तर मालक मलाच ओरडला. मंग म्या भी कानाला खडा लावला.. हा तुमी मालकाला सांगू नगा बरका मी तुमाला हे समद सांगितलंय म्हनून"
"बरं.. कोणत्या खोलीत थांबलेला तो माणूस" टोनीने विचारलं
"खोली क्रमांक ४" एवढं बोलून किशनने सिगारेटचं थोटूक समोर आगीच्या मंद ज्वाळांमधे टाकलं. जळताना थोटकाचा चरचर आवाज झाला.

हे ऐकून टोनीची विचारचक्रे फिरू लागली. टोनीला आत्ता समजत होतं कि अपूर्वाला आणि माधुरीला तसे भयाण अनुभव का आले. त्या खोलीत तो माणूस नक्कीच तंत्र शक्तींची उपासना करत असणार आणि अचानक तो गायब झाला. आता ती खोली वाईट शक्तींनी भारलेली आहे. पण खोलीचं दार कधी उघडलंच गेलं नाही तर अपूर्वा आणि माधुरीने आतमधे प्रवेश कसा काय मिळवला होता. टोनीला या गोष्टीचा काहीच उलगडा होईना. टोनीच सगळं अंग शहारलं. हॉटेलमालकाने पद्धतशीरपणे या सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या. स्वतःच्याच पोटावर लाथ कोण मारणार म्हणून तो हॉटेल अजूनही चालवत होता.

आपली खोली सोडून आसपास कुठेही फिरकू नका. सकाळ झाली कि त्वरित इथून निघून जाऊयात असं आपल्या मित्रांना सांगायला टोनी पटकन आपल्या जागेवरून उठला. हॉटेलमध्ये प्रवेश करून जिन्याने वर जाऊ लागला. पॅसेजमधे अंधुकसा प्रकाश होता. आपल्या खोलीकडे जाताना टोनीने कटाक्षाने खोली क्रमांक ४ कडे पाहणं टाळलं. आपली खोली जवळ येताच त्याने दार उघडलं. दरवाजा आतून लावलेला नव्हता याचं त्याला बरं वाटलं. खोलीत अंधार होता. नाही म्हणायला खिडकीच्या बाहेरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दिव्यांचा प्रकाश येत होता. टोनीने लाईटच्या स्विचकडे हात नेला आणि लाईटच बटण दाबलं.

खोली प्रकाशाने उजळून निघाली. टोनीने समोर पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला. आपलं हृदय बंद पडतंय कि असं त्याला वाटलं. समोर आपापल्या बेडवर माधुरी आणि अपूर्वा पडलेल्या होत्या. पण रक्ताच्या थारोळ्यात.... त्यांच्या डोक्याची शकलं झालेली होती.

टोनीने आपलं डोकं पकडून घाबरून खाली बसकणच मारली. त्याला काय करावं तेच सुचेना.. समोरचं दृश्य बघवत नव्हतं. काहीतरी करणं गरजेच होतं. कोणाला बोलवावं कि काय करावं. काहीच न सुचून काही मिनिटे टोनी थंड बसून राहिला. नंतर तो जरा भानावर आला. त्याला वाटलं नक्कीच या गोष्टीचा संबंध खोली क्रमांक ४ शी असला पाहिजे. अजयचा कुठेच पत्ता दिसत नव्हता. अजय कुठे गेला असेल त्याला शोधावं लागेल.

सगळा धीर एकवटून टोनी जागचा उठला आणि खोलीतून बाहेर पॅसेजमध्ये आला. त्याचं सगळं अंग थरथरत होतं. पॅसेजच्या मिणमिणत्या प्रकाशात तो पुढे आला तेव्हा खोली क्रमांक ४ च्या जवळ तो आला आणि त्याला दिसलं कि दरवाजा थोडासा उघडा आहे. त्याने अनिच्छेनेच बाहेरून आतमधे डोकावून पाहिलं. आतमध्ये खोलीच्या मधोमध त्याला कोणीतरी पाठमोरं उभं दिसलं. आतमध्ये अंधुक प्रकाश होता. कोण असावं म्हणून टोनीने जरा डोळे किलकिले करून पाहिलं तर त्याला दिसलं कि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून अजय होता. अजय आतमधे काय करतोय हे पाहून टोनीला धक्काच बसला. अजय बेडच्या पुढे उभा राहून घुमत होता. बेडच्या समोर काढलेल्या कसल्यातरी रिंगणात तो उभा होता. त्याची मान सावकाशपणे मागे पुढे हलत होती. टोनी नखशिखांत हादरला होता. आपल्या खोलीत माधुरी आणि अपूर्वाची अवस्था काय झालीय हे सांगून तात्काळ हे हॉटेल सोडलं पाहिजे असं अजयला सांगणं गरजेचं होतं. आपण खोली क्रमांक ४ मधे शिरतोय हे माहित असूनही नाईलाजाने टोनी दार ढकलून आतमधे आला. "अजय अजय..." टोनीने लागोपाठ हाका मारल्या. पण अजयने मागे पाहिलं नाही. तो एकसारखा मागेपुढे होतं घुमत होता.
टोनीने सावकाशपणे जवळ जात अजयच्या पाठमोऱ्या खांद्यावर हात ठेवून त्याला वळवण्याचा प्रयत्न केला. त्या स्पर्शाने अजय अचानक हलायचा थांबला आणि गर्रकन मागे वळाला. त्याच्या अशा अचानक मागे वळल्याने टोनी घाबरून जरासा मागे सरला. अजयचा चेहरा खूपच भेसूर दिसतं होता. त्या अंधुक प्रकाशाच्या खोलीपण त्याचे लाल डोळे भयानक दिसतं होते. अजयच्या शर्टवर रक्ताचे थेंब सुद्धा उडालेले दिसत होते.

"अजय अजय.. काय झालंय तुला" असं म्हणत टोनी घाबरून फक्त अजयकडे पाहतच होता.
"हमम... रक्त.." अजयच्या घशातून विचित्र आवाज आला. जणूकाही हा आवाज अजयचा नसून त्याच्या शरीरातून कोणीतरी दुसरंच बोलत होतं असा भासत होता. अजयच्या हातात काहीतरी लांब वस्तू होती. टोनी पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभा होता. अजय थोडा पुढे झाला आणि त्याचा हात वर झाला. टोनीच लक्ष आता त्याच्या हाताकडे गेलं तेव्हा त्याला दिसलं कि अजयच्या हातात मोठा हातोडा आहे. त्या हातोड्याच्या पुढे रक्त लागलेलं होतं.

खाड खाड... हातोड्याचा आवाज घुमला. टोनी जमिनीवर गतप्राण झालेला होता. रक्त आजूबाजूला पसरलेलं होतं.

अजय त्या खोलीतून बाहेर आला. हातातील हातोडा जमिनीवर घासत अडखळत तो पुढे चाललेला असल्याने हातोड्याचा खरखर आवाज घुमत होता. अजयची हालचाल जणूकाही कोणीतरी त्याला आदेश देत असल्याप्रमाणे होत होती. खालच्या मजल्यावर येऊन त्याने खाली असणाऱ्या घरमालकाच्या खोलीत प्रवेश केला.

खाड..खाड..परत हातोड्याचा आवाज घुमला. आवाजानंतर खोली रक्ताने माखली…

मग यानंतर सगळीकडेच शांतता झाली.

दुसऱ्या दिवशी अजयला जाग आली. सकाळ झालेली होती आणि तो कोणत्या तरी गाडीत होता. त्याचं डोकं चांगलंच जड झालेलं होतं जणूकाही भिंतीवर आपटून ते बधिर झालं असावं. डोळे चोळत तो आसपास पाहू लागला. खाकी वर्दीतील लोक त्याला गाडीबाहेर दिसले. त्याची नजर आपल्या हाताकडे गेली तर हातात हातकड्या होत्या. हे सगळं पाहून तो चाटच पडला. गाडीच्या बाहेर एक खाकी वर्दीतील माणूस उभा राहून फोन वर बोलत होता.

"हो साहेब, ४ मृतदेह सापडलेत हॉटेलवर आणि एक खाली हॉटेलच्या बाहेर शेकोटीजवळ आहे. हो गुन्हेगार आमच्या कस्टडीमधेच आहे. हत्यारचे ठसे आणि अंगावरच्या कपड्यावर रक्त होतं त्यामुळे चटकन समजलं.. हो गाडीत टाकलंय त्याला.. पोलिसस्टेशनवरच घेऊन येतोय"
अजयने आपल्या कपड्यांकडे पाहिलं तर त्याचे कपडे पूर्णपणे कोरड्या रक्ताने माखलेले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला काहीही आठवत नव्हतं. अचानक एक खाकी वर्दीवाल्या माणसाने गाडीत प्रवेश केला आणि त्याने गाडी सुरु केली.

"अरे..अरे.. कुठे नेताय मला.. मी काहीही केलेलं नाहीये..." अजय ओरडून म्हणाला. त्याच्या बोलण्याचा त्या खाकी वर्दीवाल्यावर काही परिणाम झाला नाही. शांतपणे त्याने गाडी हॉटेलच्या बाहेर काढली कारण सगळे पुरावे अजयच्या खुनी असण्याकडेच निर्देश करत होते.
"अरे अरे... ऐका माझं... मला काहीही आठवतं नाहीये. माझे मित्र कुठे आहेत सगळे" असं म्हणत गाडीच्या मागच्या काचेतून अजयने हॉटेलकडे नजर टाकली. हॉटेलपुढे २ खाकी वर्दीवाले लोकं जमिनीवर पांढरं कापडं टाकून झाकुन ठेवलेल्या ४-५ प्रेतांकडे पाहत काहीतरी बोलत होते. अजयची नजर हॉटेलच्या वरच्या मजल्याकडे जाताच भीतीने त्याचे डोळेच मोठे झाले.

हॉटेलच्या वरच्या मजल्यावरच्या असणाऱ्या “त्या” खोलीतील काचेच्या खिडकीत पडद्याजवळ एक काळी सावली गाडीकडेच पाहत उभी होती. अजय आ वासून पाहत होता आणि हॉटेलपासून पुढे जाणाऱ्या गाडीकडे पाहत ती धुरकट सावली स्थिरपणे तशीच उभीच होती.

=========================================================================================

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा छानच झालीय पण इतक्या हत्यामागचा उद्देश किंवा एखादी बॅकग्राऊंड स्टोरी पण टाकायची होती.