ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १४
पूर्वभाग
डॅनियल क्रॉस आणि त्याची टीम मुंबईच्या भूगर्भातील विस्मरणात गेलेल्या फ्रेट टनेल्समधून पळ काढत असताना Black Ember च्या रिकव्हरी टीम्स त्यांच्या अगदी मागावर येतात.
कुर्ला फ्रेट कॉरिडॉरमधून बाहेर पडताना डॅनियल जुनं सुरक्षा गेट बंद करून आणि समोरून येणाऱ्या मालगाडीचा फायदा घेत शत्रूला काही काळासाठी रोखण्यात यशस्वी होतो.
दरम्यान मुंबईत माया सेन आणि कबीर यांना ब्लॅक एम्बरची काळी एसयूव्ही सतत पाठलाग करत असल्याची खात्री पटते, त्यामुळे ते शहरातील जुन्या रेल्वे मेंटेनन्स कॉरिडॉरमध्ये लपून मार्ग बदलतात.
कबीरच्या बर्नर फोनवर अचानक “TRACK 17” हा गूढ सिग्नल दिसतो आणि त्याला समजतं की आरव देशमुख आणि डॅनियल क्रॉस अगदी जवळ आहेत. शेवटी “A.D.” या एन्क्रिप्टेड कॉन्टॅक्टला कबीर कॉल लावतो.
************************************************************************************************************************
ऑपरेशन ब्लॅक एम्बर - भाग १५ – SIX FRAGMENTS
त्या लाईनमधून सुरुवातीला फक्त स्टॅटिक लहरींचा खरखर आवाज आला आणि त्यानंतर दूरवर कोसळणाऱ्या पावसाचा मंद, एकसुरी आवाज... आणि फोनच्या अगदी जवळ कुणाचातरी श्वासोच्छवास.
कबीर काही सेकंद पूर्ण शांत राहिला. त्याची तीक्ष्ण नजर कॉरिडॉरच्या दाट अंधारात स्थिर होती. जणू तो फोनवरचा आवाज नाही, तर त्या शांततेच्या मागे लपलेली शत्रूची हालचाल ऐकण्याचा प्रयत्न करत होता.
मग त्याने अतिशय मंद, जवळजवळ कुजबुजल्यासारख्या आवाजात विचारलं Dock 14 compromised?”
फोनच्या दुसऱ्या बाजूला लगेच उत्तर आलं नाही. काही वेळ फक्त त्या मुंबईच्या पावसाचा आवाज ऐकू येत राहिला. मग... एक अत्यंत शांत आणि सावध पुरुषी आवाज लाईनवर उमटला.
“तू कोण?” डॅनियलने पलीकडून अत्यंत धारदार आवाजात विचारले.
कबीरच्या चेहऱ्यावर कोणतीही रिएक्शन उमटली नाही. तो त्या गंजलेल्या लोखंडी भिंतीला टेकून उभा राहिला आणि कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला, म्हणजेच त्या काळ्या एसयूव्हीच्या दिशेने नजर ठेवत म्हणाला “तुमच्याकडे LAST_TIDE आहे.”
फोनच्या दुसऱ्या बाजूला क्षणात संपूर्ण शांतता पसरली. आता हा फक्त दोन माणसांमधला संपर्क राहिला नव्हता... हे 'ब्लॅक एम्बर'च्या दोन वेगवेगळ्या जगांमधलं सर्वात मोठं व्हेरिफिकेशन होतं.
फोनवर डॅनियलचा आवाज पुन्हा ऐकू आला. या वेळी तो आधीपेक्षा थंड आणि धारदार होता, “हे नाव तुला कुठून माहित? LAST_TIDE बद्दल फक्त काही मोजक्याच लोकांना कल्पना होती.”
कबीरने क्षणभर आपले डोळे मिटले. त्याच्या डोक्यात जुन्या शिपिंग मॅनिफेस्ट्सची पाने चमकून गेली. कंटेनर रूट्स, गायब झालेल्या मालाची यादी आणि रात्रीच्या अंधारात केलेली सायलेंट एक्स्ट्रॅक्शन्स आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला एक चेहरा - दुष्यंत देशमुख.
कबीरने डोळे उघडले आणि हळू, धीरगंभीर आवाजात उत्तर दिलं, “कारण मी रिकव्हरी लॉजिस्टिक्स मध्ये होतो, डॅनियल. आणि दुष्यंतने एकदा मला सांगितलं होतं जर LAST_TIDE अॅक्टिव्हेट झालं “तर त्याचा अर्थ एकच... विखुरलेले तुकडे अखेर एकमेकांना जोडले गेलेत.”
फोनवर पुन्हा काही सेकंद संपूर्ण शांतता पसरली. मायाने नकळत आपला श्वास रोखून धरला होता. कॉरिडॉरच्या तुटक्या छतातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज आणि दूरवरून जाणाऱ्या लोकल ट्रेनचा खडखडाट... एवढेच आवाज त्या शांततेत ऐकू येत होते.
मग डॅनियलचा आवाज परत आला. या वेळी त्याच्या आवाजात एक अविश्वास आणि धार होती, “तू ब्लॅक एम्बरसाठी काम केलं आहेस, कबीर. याचा अर्थ तू सिस्टिमचा भाग होतास.”
कबीरने लगेच उत्तर दिलं नाही. त्याने आपली नजर वळवून त्या ब्रिजजवळ उभ्या असलेल्या काळ्या एसयूव्हीकडे पाहिलं. ती गाडी अजूनही बाहेरच थांबलेली होती. तिचे हेडलाईट्स धुक्यात चमचमत होते. स्थिर. शांत. जणू ती आत येण्यापेक्षा, आतून त्यांना हवं असलेलं कन्फर्मेशन मिळण्याची वाट पाहत होती.
कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि अतिशय मंद, खोल आवाजात म्हणाला, “पूर्वी करत होतो, डॅनियल. आता मीसुद्धा त्यांच्यापासूनच पळतोय.”
त्याच्या या एका वाक्याने फोनच्या दुसऱ्या बाजूला अचानक हालचाल झाली. कुणीतरी फोनजवळ सरकल्याचा आवाज आला. जणू डॅनियल आता तिथे एकटा नव्हता, त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाने फोन आपल्याकडे ओढून घेतला होता.
मग लाईनवर एक दुसराच आवाज ऐकू आला.
“कबीर...?”
“माझ्या बाबांना तू ओळखत होतास?”
मायाने पहिल्यांदाच कबीरला एका संपूर्ण वेगळ्या रूपात पाहत होती. कबीर... ज्याचा चेहरा एखाद्या दगडासारखा स्थितप्रज्ञ असायचा, ज्याच्या डोळ्यांत तिने आतापर्यंत फक्त एक थंड क्रूरता आणि सावधगिरी पाहिली होती... त्या कबीरच्या चेहऱ्यावरचा तो कठोरपणा आरवच्या प्रश्नानंतर काही क्षणांसाठी पूर्णपणे लोपला. त्याच्या नजरेसमोरून दुष्यंत देशमुखांसोबत घालवलेले ते शेवटचे दिवस एका सेकंदात तरळून गेले. कबीर काही सेकंद शांत राहिला.
मग तो अगदी मंद, काहीशा जड आवाजात म्हणाला, “हो, आरव. मी ओळखत होतो दुष्यंतना.”
“आणि त्यांनीच मला पहिल्यांदा सांगितलं होतं...”
“ब्लॅक एम्बर कधीच फाईल्स लपवत नाही, कबीर... ते फक्त त्या फाईल्स लोकांसमोर येण्याची timing लपवतं.”
कबीरचे हे शब्द ऐकताच फोनच्या दुसऱ्या बाजूला अचानक संपूर्ण शांतता पसरली. आरवच्या बाजूने श्वासाचा आवाजही येईनासा झाला. बाहेर पावसाचा जोर आणखी वाढला होता. पाण्याचे मोठे थेंब कॉरिडॉरच्या त्या तुटक्या, लोखंडी छतावर आदळत होते.
काही सेकंदांच्या सुन्नतेनंतर आरवचा आवाज पुन्हा ऐकू आला. या वेळी तो आधीपेक्षा अधिक सावध, “तुला आमचं अचूक लोकेशन कसं मिळालं? आम्ही इथे कुर्ला फ्रेड यार्डमध्ये आहोत हे तुला कसं ठाऊक?”
कबीरने या वेळी ताबडतोब उत्तर दिलं नाही. त्याची नजर अजूनही त्या मेंटेनन्स गेटच्या पलीकडे, ब्रिजखाली उभ्या असलेल्या काळ्या एसयूव्हीवर खिळली होती. अचानक, त्या एसयूव्हीचे बंद असलेले हेडलाईट्स एका तीव्र झटक्याने चालू झाले. तिचे चालणारे व्हायपर्स बंद झाले. गाडी गिअरमध्ये पडल्याचा एक मंद आवाज त्या मुसळधार पावसातही कबीरच्या कानावर पडला.
त्याचा थरथरत असलेला बर्नर फोन त्याने आपल्या ओठांच्या जवळ आणला आणि तो अगदी हळू, थंड आवाजात म्हणाला, “कारण मी शोधण्याआधी... त्यांनी तुम्हाला शोधून काढलंय, आरव.”
माया नकळत कबीरच्या आणखी जवळ सरकली. फोनवर काही सेकंद कुणीच काही बोललं नाही. मग अचानक डॅनियलचा आवाज पुन्हा लाईनवर आला. या वेळी त्याच्या आवाजातली संदिग्धता निघून गेली होती, तिथे फक्त एका कमांडोची तगमग होती, “किती जण आहेत?”
कबीरने क्षणाचाही विलंब न करता, बाहेरच्या गाडीच्या हालचालींवरून अंदाज बांधत उत्तर दिलं, किमान दोन. पण ऑब्झर्व्हर्स जवळपास अजून असू शकतात. त्यांनी परिसर घेरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
“Armed?” डॅनियलने विचारले.
Definitely,” कबीरने सांगितलं.
मग डॅनियल अतिशय मंद, पण ठाम आवाजात म्हणाला, “ जर तू ऑब्झर्व्हर नसशील तर दहा मिनिटांत ट्रॅक १७ वर ये”
त्या शब्दासोबतच फोन कट झाला. लाईन डेड झाली.
माया काही सेकंद कबीरच्या हातातल्या त्या बर्नर फोनकडे पाहत राहिली. तिच्या छातीची धडधड अजूनही वेगाने चालू होती. ती कबीरच्या चेहऱ्यावरील शांतता वाचण्याचा प्रयत्न करत घाबरलेल्या आवाजात म्हणाली, “त्यांचा आपल्यावर विश्वास आहे?”
कबीरने बर्नर फोन बंद केला आणि जॅकेटच्या खिशात टाकून दिला. मग तो कॉरिडॉरच्या अंधाऱ्या आणि निसरड्या वाटेने पुढे चालायला लागला.
तो न थांबता म्हणाला, “नाही. पण दुष्यंतवर आहे”
************************************************************************************************************************
पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता. त्या ओसाड यार्डमध्ये उभ्या असलेल्या जुन्या, गंजलेल्या निळ्या कार्गो वॅगनच्या पत्र्याच्या छतावर पावसाचे जाड थेंब एकाच लयीत सतत आदळत होते.
डब्याच्या आत जमलेले सहाही जण पूर्णपणे शांत बसले होते. आरव देशमुख, ज्याच्या हातात वडिलांचा डिजिटल रेकॉर्डर होता. डॅनियल क्रॉस, अजूनही आपल्या जखमेतून वाहणारं रक्त पुसत दारापाशी लक्ष ठेवून होता. समीर, ज्याने आपली बंदूक लोड करून पायाजवळ ठेवली होती. विनायकराव कोपऱ्यात एका जुन्या लाकडी खोक्यावर थकलेले डोके टेकवून बसले होते. कबीरचे डोळे अजूनही निर्विकार होते पण कान बाहेरच्या हालचाली टिपत होते आणि माया सेन आरवच्या अगदी जवळ उभी होती.
आरवच्या समोर एक रग्ड लॅपटॉप उघडा होता, जो डॅनियलने या वॅगनमधील एका गुप्त कप्प्यातून बाहेर काढला होता. लॅपटॉपच्या फिकट निळ्या स्क्रीनवर 'LAST_TIDE' चा डिकोड झालेला, तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरलेला डेटा सतत चमकत होता. तिथे उघड झालेल्या फाईल्समध्ये अनेक धक्कादायक गोष्टी होत्या.
मुंबई बंदरातून अचानक वळवण्यात आलेल्या जहाजांचे गुप्त मार्ग त्यात नोंदवलेले होते. कोट्यवधी रुपयांच्या मालावर संशयास्पद पद्धतीने सक्रिय झालेले विमा व्यवहार आणि त्यामागची पोझिशनिंग स्पष्ट दिसत होती. बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करण्यासाठी मुद्दाम साठवून ठेवलेल्या इंधनाशी संबंधित इमर्जन्सी कमोडिटी हेजेसचे तपशील तिथे होते. याशिवाय, Black Ember शी जोडलेल्या बोगस कंपन्यांच्या परदेशी बँक खात्यांचे परस्पर संबंध आणि पैशांचा गुप्त प्रवाह दाखवणारे ऑफशोर होल्डिंग ओव्हरलॅप्सही त्या फाईल्समधून समोर आले.
पण... एवढं सगळं समोर असूनही ती संपूर्ण केस, ते चित्र अजूनही अपूर्ण होतं. मुख्य दुवा अजूनही सापडत नव्हता.
माया सेनने स्क्रीनवर वेगाने बदलणाऱ्या त्या कोड्सकडे आणि आकड्यांकडे पाहिले. ती अतिशय काळजीयुक्त आवाजात म्हणाली, “हे नक्कीच संशयास्पद आहे, कबीर. यावरून ब्लॅक एम्बरने बाजारात कसा गोंधळ घातलाय हे समजतंय पण कोर्टात किंवा जगासमोर टिकेल असं हे अजूनही conclusive नाहीये. या फायलींमध्ये कुठेही ब्लॅक एम्बरच्या मुख्य प्रमुखांची नावं किंवा थेट ऑर्डर्स नाहीत.”
डब्यामध्ये उपस्थित असलेल्या कोणीही तिच्या या वाक्याला विरोध केला नाही. कारण ती शंभर टक्के बरोबर होती. समोर जे दिसत होतं, ते फक्त गुन्ह्याचे पॅटर्न्स होते. पण ब्लॅक एम्बरचा गळा आवळता येईल, असा कोणताही थेट पुरावा तिथे नव्हता.
डॅनियल क्रॉसने काही सेकंद त्या चमकणाऱ्या स्क्रीनकडे शून्य नजरेने पाहिले. त्याला दुष्यंत देशमुखांचा तो शेवटचा चेतावणी देणारा चेहरा आठवला. तो म्हणाला, “दुष्यंतने complete archive एकाच जागी कधीच ठेवलं नसतं, माया. तो ब्लॅक एम्बरला ओळखून होता. त्याला माहिती होतं की जर एक जागा कॉम्प्रमाईज्ड झाली, तर अख्खा पुरावा नष्ट होईल.”
समीर नायर वैतागून म्हणाला, “म्हणजे अजून काय बाकी आहे? आपण मागच्या बारा तासांपासून मृत्यूच्या दाढेतून धावतोय. अजून किती पुरावे गोळा करायचेत?”
डॅनियलने लॅपटॉप स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे फिकट राखाडी रंगात एक छोटा टेक्स्ट ब्लिंक होत होता.
ARCHIVE INCOMPLETE, LIVE CORRELATION REQUIRED.
कबीर वॅगनच्या मधोमध असलेल्या त्या लोखंडी टेबलकडे थोडा पुढे झुकला. त्याचे डोळे स्क्रीनवर फिक्स झाले होते. “तो स्टॅटिक प्रूफ तयार करत नव्हता, समीर...” कबीर म्हणाला.
कबीरचे हे बोलणे ऐकताच कोपऱ्यात बसलेल्या विनायकरावांचा चेहरा हळूहळू बदलला. एका जुन्या कायद्याच्या आणि सिस्टिमच्या जाणकाराला दुष्यंतची चाल समजली होती. विनायकराव गंभीर आवाजात म्हणाले, “तो behaviour trap तयार करत होता.”
वॅगनमध्ये काही क्षण पुन्हा पूर्ण शांतता पसरली.
आरव देशमुखने कीबोर्डजवळ आपला हात नेला, पण नक्की काय टाईप करावं हे न समजल्याने त्याने कबीरकडे पाहिले, “Correlation म्हणजे काय? बाबांना नक्की काय मॅच करायचं होतं?”
या वेळी माया सेन पुढे आली. “मी सांगते...” असं म्हणत तिने आपला डिजिटल टॅबलेट उघडला. तिची बोटं स्क्रीनवर वेगाने चालू लागली. तिने थेट काही सरकारी आणि आंतरराष्ट्रीय सर्व्हर्सचे live data feeds अॅक्सेस करायला सुरुवात केली. लाईव्ह कमोडिटी फीड्स- जागतिक बाजारपेठेतील इंधन आणि कच्च्या मालाचे चालू भाव, शिपिंग अॅडव्हायझरीज- अरबी समुद्रात ये-जा करणाऱ्या जहाजांच्या ताज्या सूचना, इन्शुरन्स अलर्ट्स- मोठ्या लॉजिस्टिक्स कंपन्यांचे रिस्क असेसमेंट रिपोर्ट.
ती काही सेकंद त्या लाल-निळ्या ग्राफ्स आणि कोडिंगमधून वेगाने स्क्रोल करत राहिली. मग अचानक तिचे हात थांबले. तिचा चेहरा एकदम ताठ झाला, डोळे विस्फारले. “थांबा...” ती अत्यंत धीम्या पण घाबरलेल्या आवाजात म्हणाली.
डब्यातील सगळेच जण श्वास रोखून तिच्याकडे पाहू लागले. मायाने एका विशिष्ट आंतरराष्ट्रीय पोर्ट ऑथॉरिटीची ताजी अॅडव्हायझरी स्क्रीनवर झूम केली. तिथे वर ठळक अक्षरात लिहिलं होतं: WESTERN COAST FUEL CORRIDOR REVIEW INITIATED
आणि अगदी त्याच ओळीच्या खाली, लहान अक्षरात एक तातडीची चेतावणी होती: TEMPORARY TANKER HOLD ADVISORY UNDER ASSESSMENT
डॅनियल क्रॉसचा चेहरा ते शब्द वाचताच क्षणात बदलला. त्याच्या कपाळावरच्या आठ्या अधिक खोल झाल्या. त्याने मायाच्या हातातून तो टॅबलेट स्वतःकडे ओढून घेतला. काही सेकंद तो खोलीतील इतर कोणत्याही आवाजाकडे लक्ष न देता, फक्त त्या एका वाक्याची रचना, त्याचं वर्डिंग पुन्हा पुन्हा वाचत राहिला. काही सेकंदांनंतर, त्याने कबीरकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, “ही एक्झॅक्ट तीच फ्रेज नाहीये, जी दुष्यंतच्या आधीच्या केस फाईल्समध्ये होती पण या वाक्याचं स्ट्रक्चर अगदी सेम आहे.”
समीर गोंधळला. त्याने दोघांकडे पाहत विचारलं, “ मला सांगा नक्की काय चाललंय? या अॅडव्हायझरीचा आणि आपल्या केसचा काय संबंध?”
डॅनियलचा श्वास जड झाला होता. त्याने टॅबलेट बाजूला ठेवला आणि समीरच्या डोळ्यांत पाहत भूतकाळातील एका मोठ्या घातपाताचा संदर्भ दिला, “ऑस्ट्रेलिया.”
तो क्षणभर थांबला, “...सिडनीच्या त्या मोठ्या रिफायनरीला आग लागण्याच्या ठीक दोन दिवस आधी सिस्टीममध्ये नेमकी अशीच अॅडव्हायझरी फ्लॅश झाली होती.”
“थ्री-स्टेज अॅडव्हायझरी सायकल,” डॅनियल पुटपुटला.
कबीरच्या डोक्यातही आता संपूर्ण गेम प्लॅन स्पष्ट झाला होता. तो टेबलाजवळ लगेच पुढे आला, “पहिल्या टप्प्यात टँकर रिव्ह्यू. सुरक्षेच्या कारणास्तव जहाजे किनारपट्टीवरच रोखली जातात.”
“दुसऱ्या टप्प्यात इन्शुरन्स हेझिटेशन. विमा कंपन्या त्या मालाची जोखीम पत्करायला नकार देतात.”
“आणि तिसऱ्या टप्प्यात इमर्जन्सी रीरूटिंग. मालगाड्या आणि जहाजांचे मार्ग अचानक बदलले जातात. आणि मग... अचानक रिफायनरीला आग लागते.”
मायाच्या डोळ्यांत संपूर्ण सत्य समोर आल्याची जाणीव दिसली. ती लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत आश्चर्याने म्हणाली, “म्हणजे मार्केटमधला कोणताही पॅनिक इव्हेंट प्रत्यक्षात घडण्याच्या आधीच, सिस्टीमच्या मागे त्याचा पाया तयार केला जातो...”
कोपऱ्यात बसलेले विनायकराव हे ऐकून थोडे पुढे झुकले. कित्येक वर्षांनंतर त्यांच्या आवाजात पुन्हा एकदा जुनी, अचूक कोर्टरूम प्रिसिजन आली होती. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि डॅनियलकडे पाहत या 'बिहेविअर ट्रॅप'चा अंतिम अर्थ सांगितला, “गुन्ह्याचं ठिकाण बदलतं, समीर... बदलू शकतं.”
“पण गुन्हेगाराचं financial behaviour मात्र नेहमीच रिपीट होतं.”
वॅगनमध्ये पुन्हा शांतता पसरली. दूरवर कुर्ला यार्डच्या कोणत्यातरी ट्रॅकवर मालगाडीचा खोल, जड आवाज घुमला आणि विरून गेला. पावसाचे थेंब वॅगनच्या पत्र्याच्या छतावर आता आणखी जोरात आदळू लागले होते, जणू बाहेर वेळ वेगाने सरकत असल्याची ती चेतावणी होती. आरव हळूहळू लॅपटॉपकडे वळला. त्याने मायाच्या टॅब्लेटवर दिसलेला तो लाईव्ह अॅडव्हायझरी कोड मॅन्युअली कीबोर्डवर टाईप केला - WCFCR-17A त्यानंतर त्याने Enter दाबले. लॅपटॉप स्क्रीन काही सेकंद गोठली आणि प्रोग्रेस बार फिरत राहिला. तो लॅपटॉप ऑनलाईन नव्हता, कारण बाहेर ब्लॅक एम्बरचे आयपी ट्रॅकर्स टपून बसले होते. तो फक्त दुष्यंतने आधी जमा केलेल्या हिस्टोरिकल एस्केलेशन पॅटर्न्सशी या कोडची तुलना करत होता.
काही सेकंदांच्या संथ प्रोसेसनंतर, स्क्रीनवर एकापाठोपाठ एक नवीन विंडोज उघडायला लागल्या. त्या वेगवेगळ्या देशांतील आर्थिक विनाशाच्या कहाण्या होत्या. Australian fuel panic, Russian shipping freeze, Mediterranean insurance surge ...आणि आता, त्या सर्वांच्या खाली अगदी शेवटी नवी विंडो फ्लॅश झाली Western Coast advisory.
त्या गंजलेल्या डब्यात बसलेल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर आतापर्यंत पडद्यामागे राहिलेला इतिहास उलगडत होता. या सगळ्या इन्सिडेंट्समध्ये तीन गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागल्या होत्या:
आयडेंटिकल हेज टाइमिंग - संकट येण्याच्या आधी बाजारात पैशांची केलेली अचूक साठवणूक.
सिमिलर शेल राउटिंग - पैसा फिरवण्यासाठी वापरलेल्या बोगस कंपन्यांचे सारखेच मार्ग.
कोऑर्डिनेट्स मॅरिटाईम पोझिशनिंग - समुद्रात संशयास्पद जहाजांची झालेली एकसारखीच मोर्चेबांधणी.
हे सगळं समोर येत होतं, पण अजूनही स्क्रीनवर कुठेही एका खाली एक अशी “Black Ember members list” आलेली नव्हती. त्याऐवजी स्क्रीनवर परस्परांना छेद देणाऱ्या आणि एकमेकांशी जोडलेल्या आर्थिक रचना दिसत होत्या. विचारवंत, सल्लागार किंवा विश्लेषकांच्या नावाखाली दिलेले कोट्यवधी रुपयांचे गुप्त पे-ऑफ, दुसऱ्यांच्या नावावर चालवलेले छुपे शेअर्स आणि आडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या मालमत्ता, संकटात अडकणाऱ्या जहाजांचा वेगवेगळ्या कंपन्यांमधून मुद्दाम घेतलेला विमा, ज्यामुळे नुकसान कुठेही झालं तरी नफा त्यांच्याकडेच परत यावा आणि जागतिक बाजार कोसळताच एकाच वेळी सक्रिय होऊन प्रचंड नफा कमावणारे समन्वयित कमोडिटी फंड्स.
माया त्या गुंतागुंतीच्या आलेखांकडे पाहत मंद आवाजात म्हणाली, “सुटे सुटे करून पाहिले तर हे एखाद्याचे पॅरानॉईड विचार दिसले असते, कबीर. पण, जेव्हा हे सगळे तुकडे एकत्र जोडले तेव्हा हे नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक केलेलं दिसतंय.
डॅनियलने होकारार्थी हलकी मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर दुष्यंतच्या बुद्धिमत्तेबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. “म्हणूनच हे फ्रॅगमेंट्स मुद्दाम वेगवेगळे ठेवले गेले, माया. जर त्यांनी संपूर्ण फाईल एकत्र ठेवली असती, तर ती कधीच कोर्टात टिकू दिली गेली नसती किंवा त्याआधीच ती चोरीला गेली असती.”
कबीरचा आवाज आता कॉरिडॉरमधल्या त्या अंधारापेक्षाही अधिक गंभीर झाला होता. त्याने लॅपटॉप बंद होण्याच्या बेतात असलेल्या स्क्रीनकडे पाहिले आणि म्हणाला, “ब्लॅक एम्बरला फाईल्सची किंवा पुराव्यांची भीती नाहीये, डॅनियल. त्यांना भीती आहे ती फक्त या सिंक्रोनाइझ्ड एक्स्पोजरची. बाजारातल्या या वेगवेगळ्या चोरांच्या चाली एकाच वेळी, एकाच पडद्यावर जगासमोर येण्याची भीती त्यांना आहे. आणि आपण आता नेमके तिथेच पोहोचलो आहोत.”
तेवढ्यात लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक नवा, गडद लाल रंगाचा सेक्शन उघडला. त्याचा मथळा होता - REGULATORY CASCADE SCENARIO
समीरने स्क्रीनजवळ तोंड नेत अगदी हलक्या आवाजात विचारलं, “हे काय आहे आता? रेग्युलेटरी कॅस्केड म्हणजे नक्की काय?”
विनायकराव त्या सिस्टीमच्या मॅट्रिक्सकडे पाहत पुढे झुकले. ते म्हणाले, “समीर, जर हे सगळे पॅटर्न्स आणि फायनान्शियल लिंक्स योग्य वेळेत जागतिक आणि स्थानिक रेग्युलेटर्सपर्यंत पोहोचले तर बाजारात एक प्रचंड साखळी प्रक्रिया सुरू होईल.” विनायकरावांनी एकेक करून मुद्दे स्पष्ट केले.
इमर्जन्सी ऑडिट्स सुरू होतील- ब्लॅक एम्बरशी जोडलेल्या प्रत्येक शेल कंपनीच्या खात्यांची तातडीने तपासणी होईल.
इन्शुरन्स फ्रीझेस लागू शकतात - संशयास्पद जहाजांना आणि ट्रान्झिट्सना विमा कंपन्या कव्हर देणं तात्काळ बंद करतील, ज्यामुळे त्यांची वाहतूक जागीच ठप्प होईल.
शेल होल्डिंग्स इन्व्हेस्टिगेट होतील - पडद्यामागचे खरे मालक आणि बेनामी संपत्ती जगासमोर उघडी पडेल.
डॅनियलने विनायकरावांच्या चेहऱ्याकडे पाहत पुढची सर्वात महत्त्वाची ओळ पूर्ण केली, “आणि मग... जेव्हा त्यांच्यावर चहूबाजूंनी चौकशीचा दबाव येईल, तेव्हा ब्लॅक एम्बरची टायमिंग पूर्णपणे तुटेल. बाजारात भीती आणि कृत्रिम टंचाई निर्माण करून कोट्यवधी रुपये कमावण्याची त्यांची जी अचूक वेळ असते, तीच विस्कळीत होईल.”
त्या शब्दांनंतर त्या निळ्या कार्गो वॅगनमध्ये एक पूर्ण, सुन्न करणारी शांतता पसरली. कारण या प्रवासात पहिल्यांदाच तिथे जमलेल्या सहाही जणांना दुष्यंत देशमुखांचा खरा मास्टरप्लॅन काय होता, हे तंतोतंत आणि स्पष्ट समजलं होतं. दुष्यंतचा तो final archive म्हणजे वैयक्तिक बदला घेणारी फाईल नव्हती किंवा एका झटक्यात बातमी लीक करणारं माध्यम नव्हतं. ते तर ब्लॅक एम्बरने बाजारात घडवून आणलेल्या नियोजित आर्थिक विनाशाविरुद्ध अत्यंत हुशारीने तयार केलेला एक सिंक्रोनाइज्ड काउंटर-ट्रॅप होता! ब्लॅक एम्बर सिस्टीमला ज्या चालींनी लुटायचा, त्याच चालींचा वापर करून त्यांना जाळ्यात पकडणारा हा चक्रव्यूह होता.
आणि तो ट्रॅप अॅक्टिव्हेट करण्यासाठी... या वॅगनमध्ये बसलेल्या सहाही फ्रॅगमेंट्सची गरज होती. आरवचे मार्केट अॅनालिसिस आणि त्याच्या जवळ असलेला डेटा, डॅनियलची सुरक्षा, विनायकरावांचे कायदेशीर ज्ञान आणि नेव्हल इंटेलिजन्सचा अनुभव, समीरची फिल्ड अॅक्शन, कबीरचे रिकव्हरी लॉजिस्टिक्स आणि मायाचे मीडिया रिलेशन
हे सगळे जेव्हा एकत्र येणार, तेव्हाच हा सापळा पूर्ण होणार होता.
Jig saw पझल जुळतेय असे वाटतेय
Jig saw पझल जुळतेय असे वाटतेय..
अतिशय वेगळ्या पद्धतीने लिहिता तुम्ही...
Tech डिटेल्स खूप व्यवस्थित map केले आहेत.
फारच अफाट लिहीताय!! आता गोष्ट
फारच अफाट लिहीताय!! आता गोष्ट थोडी थोडी कळायला लागली. मांडणी, डिटेलिंग, चित्र दृश्यता अप्रतिम!!!
मस्त चालली आहे कथा. आता
मस्त चालली आहे कथा. आता खुपश्या गोष्टी क्लिअर झाल्या . जिग सॉ पझल जुळायला लागले ...
गोष्टी जुळत येत आहेत. छानच.
गोष्टी जुळत येत आहेत.
छानच.
जबरदस्त ! एक नंबर वेग अन्
जबरदस्त ! एक नंबर वेग अन् कथानक आहे ! मस्त वाटले वाचून. ही एखाद क्लासिक टेक्निकल इकॉनॉमिक/ कॉर्पोरेट espionage फिल्मची स्टोरी होऊ शकते.
मजा यायला लागलीय अजून, जसजशा
मजा यायला लागलीय अजून, जसजशा गोष्टी क्लिअर होताहेत!
धन्यवाद धनवन्ती, मार्गी,
धन्यवाद धनवन्ती, मार्गी, सामी, झकासराव, जेम्स वांड आणि आबा.