डिलीट करू का?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 21 May, 2026 - 09:30

साल २०१२.. युवा महोत्सवची तयारी सुरु होती, लिखाणात बरा हात असल्याने नाटुकली बसवत होतो, एकपात्री प्रयोगासाठी एका जुनियरला, एका सिनियरने माझ्याकडे पाठवलं. एक सावळीशी, कुरळ्या केसांची अगदी चारचौघांसारखी दिसणारी ती जुनियर आली. पण, आल्याबरोबर माझी नजर खिळली ती तिच्या शांत, काळ्याशार डोहासारख्या डोळ्यात आणि तिच्या निर्व्याज, आत्मविश्वासपूर्ण लाघवी स्मितहास्यात.. मी पाहिलं आणि पाहतच राहिलो, नजर हटेना. सिनियर काय बोलत होती त्याकडे लक्षच गेलं नाही. एवढी साधी असूनही कुणी इतकी सुंदर कशी असू शकते? तिच्या डोळ्यात मी हरवलो, मिताने आवाज दिला आणि भानावर आलो. जुजबी काहीतरी खरडून दिलं एकपात्री प्रयोगासाठी आणि ह्या निमित्ताने तिला बघता येईल म्हणून खुश झालो. ते काय होतं नेमकं? आकर्षण, प्रेम, कि अजून काही वेगळं. निश्चितच माझ्या मनातल्या भावना आकर्षण किंवा प्रेम ह्या सदरात मोडणाऱ्या नव्हत्या. कारण प्रेम तर माझं आधीच तिसऱ्याच एका मुलीवर होतं. पण ह्या जुनियरशी बोलताना खूप छान वाटायचं. तिचं बोलणं वागणं हसणं बघणं सगळंच कसं पवित्र.. मी ओढला गेलो होतो ते तिच्या व्यक्तिमत्त्वाकडे, तिच्या मनाकडे कदाचित.. यथावकाश नंबर बदलले गेले.. तिला पुस्तकांची आवड होती. मी माझं वपुंचं एखाद दुसरं पुस्तक तिला दिलं आणि मग पुस्तकांवरून बोलणं सुरु झालं. मग माझ्या काही कविता तिला पाठवल्या, त्यावरही बोलणं व्हायचं. माझ्यासाठी तिचं माझं नातं कसं होतं? छे, शब्दात मांडता येणार नाही. मला ती हवी होती असेही नाही.. मग नेमकं काय होतं? मला वाटतं एक विशुद्ध मैत्री. पण त्या अडनिड्या वयात हे कळण्याइतपत अक्कल नव्हती. त्यात तिच्यापाठी एक सिनियर आणि तिच्याच वर्गातला एक मुलगा असल्याचं कळलं आणि बोलता बोलता एके दिवशी माती खाल्ली, मैत्रीच्या पुढे जाऊयात का असा प्रपोझ केला. त्यामागे कोणती भावना होती? आता विचार करतो तर कळतंय कि ती माझ्यापासून कधी दूर होऊ नये, आमचं बोलणं कधीच थांबू नये असं असावं माझ्या मनात.. तिने अतिशय नम्रपणे माझ्या प्रस्तावाला नकार दिला, पण तुमच्यासारखा मित्र गमवायचा नाही अश्या अर्थाचं काहीतरी बोलली होती. नंतरही आम्ही खूप बोलायचो. कॉलेज संपलं, हळू हळू आमच्यातला संवाद कमी झाला पण बंद नव्हता. माझं लिखाण तिला आवडायचं. मलाही लिहायला हुरूप यायचा त्यामुळे. यथावकाश तिचं लग्न झालं. त्या वेड्या मुलीने, मधुचंद्राला गेली असताना मला फोन केलेला.. निसर्गावर बोलत होती. माझा पुढे जाऊन एका मोठ्या नात्यातून ब्रेक अप झाला तेव्हासुद्धा बोललो होतो बहुतेक तिला. आठवत नाही फार. ती संसारात रॅली मग मीच बुजून जाऊन नंतर नंतर बोलणं कमी होत गेलं. पण ती असायची मनात कुठेतरी कायम. तिला पाहिलं तरी प्रसन्न वाटायचं. अजूनही वाटतं.

साल २०२०.. ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्यासोबत ब्रेक अप झालं होतं.. फार कठीण वेळ होती.. मग मुली बघण्याचे कार्यक्रम सुरु झाले. झाले म्हणजे काय, फक्त २ मुली पाहिल्या . त्यावेळी मला फक्त कुठंतरी एक विसावा पाहिजे होता. माझं मन जे नुकताच heal होत होतं, त्याला सावरण्यासाठी एका व्यक्तीची गरज होती. म्हणून पाहिलेल्या दोन्ही मुलींना मी होकार दिलेला माझ्याकडून, पण घरून नापसंती होती..त्या गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. मग एक ओळखीतुन स्थळ सांगून आलं, मला फोटोतुनच आवडेल असं वाटत होतं, पहायला गेलो आणि पुन्हा तशीच अवस्था होते कि काय असं वाटलं. ती सरळ माझ्या डोळ्यात बघत होती. तिच्या नजरेत एक आव्हान होत कि प्रेम कि अजून काही... माहित नाही. पण मी माझ्या सोयीसाठी प्रेमच समजलो. पसंती झाली दोन्ही बाजूने.. बोलणं सुरु झालं आणि काहीही बोलायला नसताना पार पाहत होईस्तोवर आम्ही बोलायचो. तिला भेटायला गेलेलो ८ तास प्रवास करून.. फिरलो वगैरे आणि माझं तिच्यावर प्रेम बसलं. खूप सुंदर तर होतीच पण तिने लग्न ठरल्यापासून माझ्यावर जीव ओवाळून टाकून प्रेम केलं होतं, तिचं प्रेम जाणवायचं मला. आपल्यावर कुणीतरी जीवापाड प्रेम करतय हि फिलिंगच किती सुंदर आहे.. मला मनातल्या मनात वाटायचं कि मी एवढ्या प्रेमाच्या लायक आहे का खरंच? हे सगळं खरं आहे कि खोटं? माझ्याच नशिबावर मला विश्वास बसत नव्हता.. असच बोलता बोलता मग मी तिला जुनियर बद्दल बोललो..माझ्या आधीच्या प्रेमभंगाबद्दल काहीही बोललो नाही, पण जुनियर बद्दल सांगितलं कि एक मैत्रीण होती आणि मी तिला प्रपोज केलं होतं मैत्रीसाठी इतकं बोललो आणि.. विस्फोटच झाला. मग समजावणं आलं. असेही जुनियर तिच्या संसारात busy होतीच, बोलणंहि फार उरलं नव्हतं.. मग भावी पत्नीच्या, माझ्या सईच्या समाधानासाठी तिला ब्लॉक केलं सगळीकडे. गेल्या पाच वर्षात तिची फार आठवण येत नाही. अगदी येतच नाही असे नाही, पण फार नाही. तिचा विचारही मनात आला कि मी मनातल्या मनात हसून घेतो. पण सईला कळत असावं. माझ्या मनातल्या बऱ्याच गोष्टी तिला न सांगता कळतातच तश्या.. ती निरखून पाहते आणि निघून जाते माझ्या हातातला चहाचा कप घेऊन. मी मग तिच्या मागोमाग जाऊन पाठमोऱ्या उभ्या असलेल्या तिला बिलगतो, प्रतारणा नसली, तरीही माझे ओठ तिच्या मानेवर टेकवून तिची मनातच माफी मागतो, तीही मनातल्या मनात माफ करत असावी असं वाटतं मग मला.

पण, एखाद्या दुपारी अल्हादावणाऱ्या थंड झुळकेसारखी जुनियरची आठवण येतेच. अनेकदा वाटलं कि तिला बोलावं पण नाही झाली हिम्मत कधी. अनेकदा संधीही होती, पण नाहीच, नकोच वाटायचं. अखेर एकदा, सई नसताना मनाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक जास्तीचं अकॉउंट काढून, सोशल मीडियावर तिला मेसेज केला.

Hi , ओळखलं का?

पार्टनर, तुम्हाला कसं विसरेन?

कशी आहेस?

मस्त, अगदी आनंदात.. (तिच्या उत्तरातून, तिने ठेवलेल्या स्टोरीज मधून तो आनंद मला माहिती होताच.. ) तुम्ही कसे आहेत?

मी पण मस्त..

लिखाण कसं चाललंय?

सध्या काही लिहीत नाही. (आता उगाच मारायचा म्हणून डायलॉग मारला) जिवंत कवितेसोबतच राहतोय आता, म्हणून काही सुचत नाही.

तरीही लिहीत जा, लिहिणं तुमची गरज आहे.. असं मला वाटतं..

(इथं मी अडकलो. वाटलं होतं कि काय काय बोलेन, किती साऱ्या गोष्टी सांगेन वगैरे, पण नाही. सगळं मागं पडलं. एक अपराधीपणाची भावना मनात आली, मग भडाभडा बोलून टाकलं कि बायकोला तुझ्याशी, किंवा इतर कोणत्याही मुलीशी मी बोललेलं आवडत नाही. पण, सोबतच माझ्या सईचं माझ्यावर असलेलं प्रेम उद्धृत करायला विसरलो नाही.)

"असं असेल तर आपण नको बोलायला" असं म्हणून, अजून २ गोष्टी इकडच्या तिकडच्या बोलून ती गेली. संपला संवाद.. माझ्या २ कविता आणि या आधी इथेच लिहिलेल्या विस्कळीत ललिताची लिंक तिला पाठवली. ते विस्कळीत इतकं जास्त विस्कळीत होतं कि पाठवल्यानंतर मलाच नको वाटत होतं.. शेवटी उडवलं.

पण मनात असलेल्या भावना हे शल्य कि अजून काही, लिहित नाही तोवर चैन पडत नव्हतं. आता पुन्हा लिहीलंय.. हं आहे खाजगी, पण लिहिण्याशिवाय इलाज नव्हता. तर असं आहे एकंदर.

आता माझ्या मनाचा माझ्याशी झालेला संवाद असा कि, माझं माझ्या सईवरच प्रेम आहे. जुनियरच्या आठवणींची झुळूक येत जात राहील, पण ती फक्त एक झुळुकच.. प्रतारणा नाही, हि माझ्या मनाची एक तडजोड आहे असं म्हणता येईल फारतर.

सरतेशेवटी एक कविता..

तुझी माझी सये एक,
गोष्ट कधीच सरलेली,
तरी देखील कधी कधी
दोघांच्यात उरलेली

डोळ्यातून डोळा चुकवून
वाहे एक चुकार आसू
पुसता पुसता त्याला
ओठी फुटते उगाच हासू..
हसू आणि आसवाच्या
आसपास हरवलेली.....

जुनी पुराणी पत्रे आणि
पारावरले भकास गाणे,
उदास पिंपळ झाकोळणारा
अन डोळ्यात तुझे तरळून जाणे
कोरड्या पिंपळपानासारखी
चाळण मनाची झालेली

चंद्र सुद्धा हल्ली नालायक
शत्रुत्व जुनं उकरून काढतोय,
तुझ्यासवे मोजल्या त्या
चांदण्यांची संख्या विचारतोय
कसं सांगू त्याला अजून
मोजदाद नाही सरलेली....

-अजिंक्य

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जरा जास्त पेर्सोनल होत >> सहमत.

प्रत्येक व्यक्तीचे ३ चेहरे असतात. १ जो बाहेरच्या जगाला दिसतो, दुसरा जो फक्त जवळच्या व्यक्तींना दिसतो आणि तिसरा जो फक्त तुम्हाला माहिती असतो. खरं तर दुसऱ्या चेहऱ्यात पण अनेक कप्पे असतात, बायकोला एक कप्पा माहीत असतो, मित्रांना दुसरा, नातेवाईकांना तिसरा. बऱ्याचदा चेहरा एकच असला तरीही आतल्या कप्प्यांमध्ये संपूर्णपणे देवाणघेवाण होत नाही. तात्पर्य काय तर या वेगवेगळ्या चेहऱ्यांनी एकमेकांना न भेटणे हे चांगले असते.

नक्कीच @ उपाशी बोका, कधीतरी कडेलोट होतो, मी प्रत्यक्षात जे लोक मला व्यक्तिशः ओळखतात त्यापैकी हे कुणाला वाचायला देणार नाहीच. ज्या भावना मला प्रामाणिक वाटत आहेत, त्याच माझ्या जवळच्याच व्यक्तीला तश्या वाटतील कि नाही हे मी सांगू शकत नाही. म्हणून, कप्पे वेगळेच आहेत. इथं अनामिक असल्याने, अनोळखी असल्याने प्रामाणिक वागू शकतो, प्रत्यक्ष जीवनात ते कधी जमेल असे वाटत नाही. ह्या लेखाची, संपादन करण्या आधीच्या लेखाची लिंक मी जुनियरला दिली होती.. तीसुद्धा चूकच झाली खरेतर, पण हरकत नाही माझा खरा चेहरा तिला दिसला तरी. असेही, मी तिला पुन्हा ब्लॉक करणार आहेच!

स्वतः त्या मुलीशी कॉन्टॅक्ट करुन वर माझ्या बायकोला तुझ्याशी किंवा इतर मुलींशी बोललेल आवडत नाही हे कशाला सांगायचं? तुम्ही तिच्याशी बोलायला गेला होतात न, ती नव्हती आली बोला म्हणून... एवढं होतं तर नव्हतं बोलायचं आधीच

स्वतः त्या मुलीशी कॉन्टॅक्ट करुन वर माझ्या बायकोला तुझ्याशी किंवा इतर मुलींशी बोललेल आवडत नाही हे कशाला सांगायचं?....... +१.

कारण, कमी असला तरी संपर्क होता, तो अचानक एके दिवशी तुटलाच. त्या मुलीने मला सोशल मीडियावर शोधलं होतं नंतर, पण मी सापडलो नाही. ते एक explanataion देखील होतं आणि सीमाही.

तुमच्या बाजूने तुम्ही व्यक्त झालात हे ठीकच. संपर्क करुन परत घोस्ट करण्यापेक्षा जुनिअरला परीस्थितीची कल्पना दिली, तिच्या बाजूने तिला निर्णय घेता आला हे चांगलेच.

कुणाची आहे ते आठवत नाही, पण एका गझलेच्या काही ओळी आठवल्या-

आठवांचे दिवे.

जरी भेट वाटेतली टाळतो मी
तुला पाठमोरीच न्याहाळता मी|

तुझे हसणेही रुते काळजाला
तरी हसता तू पुन्हा भाळतो मी|

म्हणालो जरी सर्व विसरेन मी
दिला शब्द माझा कुठे पाळतो मी|

अशाने का विझे आग कोठे
तरी तुझी जुनी पत्रे चाळतो मी|

पुन्हा रात्र झाली पुन्हा सोबतीला
तुझ्या आठवांचे दिवे जाळतो मी|

प्रत्येक व्यक्तीचे ३ चेहरे असतात. १ जो बाहेरच्या जगाला दिसतो, दुसरा जो फक्त जवळच्या व्यक्तींना दिसतो आणि तिसरा जो फक्त तुम्हाला माहिती असतो. खरं तर दुसऱ्या चेहऱ्यात पण अनेक कप्पे असतात, बायकोला एक कप्पा माहीत असतो, मित्रांना दुसरा, नातेवाईकांना तिसरा. बऱ्याचदा चेहरा एकच असला तरीही आतल्या कप्प्यांमध्ये संपूर्णपणे देवाणघेवाण होत नाही. तात्पर्य काय तर या वेगवेगळ्या चेहऱ्यांनी एकमेकांना न भेटणे हे चांगले असते. >>> +१००

प्रामाणिक लेखन.

प्रत्येक व्यक्तीचे ३ चेहरे असतात >>>> सहमत