चित्रपट - राजा शिवाजी!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2026 - 13:01

राजा शिवाजी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
बघून या मस्त आहे.
मी सुरू करतो

सर्वात पहिले मी कबूल करतो की स्टारकास्ट बघून मी आधीच नकारात्मक मत बनवून ठेवले होते. त्याच वेळी चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे तर चुकवायचा कसा याही द्विधा मनस्थितीत होतो. पण चित्रपट प्रदर्शित होताच कुठलाही किंतु परंतु मनात शिल्लक राहिला नाही. जर "छावा" संभाजी महाराजांना चित्रपटगृहात बघून आलो तर "शेर" शिवाजी महाराजांना बघायला जायचेच होते.

शिवाजी महाराजांवर आतापर्यंतचा बिगबजेट भव्य दिव्य चित्रपट म्हणजे चर्चा तर होणारच होती. ती नावापासूनच सुरू झाली. काहींना नावात छत्रपती हवे होते तर काहींना "राजा शिवाजी" हा एकेरी उल्लेख खटकून "राजे शिवाजी" असे नाव हवे होते. पण आमच्या शाळेचेच नाव "राजा शिवाजी विद्यालय" असल्याने आणि ते आम्ही महाराजांच्या नावाईतकेच अभिमानाने अन आदराने घेत असल्याने मी या वादावर मनातल्या मनात फक्त 'बर्रं' म्हटले.

दुसरा वाद चित्रपटातील कास्टींगवर होता. इतरांबद्दल पुढे लिहितोच पण शिवाजी महाराजांची भुमिका रितेश देशमुखने स्वतः करणे हा मोठा वादाचा विषय होता. त्याने आधी ईतर चित्रपटात साकारलेल्या खट्याळ भुमिका हा माझ्यामते कलाकारांसाठी गैरलागू मुद्दा होता. पण त्याचे व्यक्तीमत्व महाराजांची भुमिका साकारू शकेल का ही शंका मलाही होती. अन्यथा त्याचा अभिनय मला आवडतोच. पण त्याने भुमिकेची लाज राखली. हा माझ्यासाठी या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला अन्यथा चित्रपट डब्यात होता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याएवढाच मोठा ईतिहास असलेल्या महाराजांवरचा चित्रपट तीन तासात बसवायचा म्हणजे जिथे कसोटी खेळवायला हवी तिथे ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळवावे असे झाले. म्हणून चित्रपटात शिवशाहीचा पुर्ण ईतिहास न दाखवता तो अफझलखानाच्या वधापर्यंत दाखवला आहे आणि कथा देखील त्याभोवतीच बांधली आहे. पण त्याआधी रयतेवरील अन्याय आणि स्वराज्याची गरज ही पार्श्वभूमी दाखवली आहे.

चित्रपट देखील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या इनिंगप्रमाणेच मला तीन तुकड्यात वाटला. सुरुवातीचा भाग हा पॉवरप्लेप्रमाणेच रोचक होता. मुघल, निजामशाही, आदीलशाही यांच्या जुलमी सत्त्तासंघर्षात भरडली जाणारी रयत आणि त्यांचा तारणहार म्हणून राजा शिवाजींचे जन्माला येणे हा भाग छान जमला आहे. महाराजांच्या लहानपणीचे किस्से, छोटेमोठे भावनिक प्रसंग, बालकलाकारांचा अभिनय, फारसे चर्चेत नसलेले त्यांचे मोठे बंधू संभाजी यांच्याशी असलेले त्यांचे भावनिक नाते हे बघायला छान वाटत होते. सचिन खेडेकर हे जणू शहाजीराजेच झाले होते आणि नेहमीप्रमाणेच अभिनय म्हणजे त्यांचे रोजचेच काम आहे असे वाटत होते. जिजाऊ माता यांच्या भुमिकेत भाग्यश्री अनपेक्षितपणे सुखद धक्का देत होती तरी अजून कणखरपणा आवडला असता कारण शिवाजी महाराजांमधील धाडसाचे स्त्रोत त्या होत्या. पण सुरुवातीपासूनच सर्वांचेच संवाद छान लिहिले होते. ऐकायलाही मजा येत होती आणि त्यामुळेच आपण चित्रपटाशी जोडले जात होतो.

गंमत म्हणजे महाराजांच्या लहानपणीच्या भुमिकेत रितेश देशमुखच्याच दोन्ही मुलांनी काम केले आहे. थोडक्यात पुर्ण देशमुख कुटुंबीयच पडद्यावर भोसले कुटुंबीय साकारायला उतरले होते. हे मला घरी आल्यावर समजले. जे एका अर्थी चांगले झाले. अन्यथा उगाच त्या मुलांची कामे नेपोकिड म्हणून बघितली गेली असती. जी प्रत्यक्षात छान झाली आहेत. एकूणच पहिल्या पाऊणेक तासात चित्रपट जणू रितेश देशमुखच्या धमाकेदार एंट्रीसाठी सेट झाला होता.

पण निदान माझ्यामते तरी उलट झाले. रितेश देशमुख आणि महाराजांचे भाऊ संभाजी राजे यांच्या भुमिकेत असलेला अभिषेक बच्चन या दोघांची एंट्री झाल्यापासून थोडा कंटाळा यायला लागला. म्हणजे अध्येमध्ये काही सीन चांगले होते पण नावीन्य नसलेले होते आणि त्यातून कथा पुढे सरकतेय असे वाटत नव्हते. अभिषेक बच्चनचे मराठी उच्चार फार सदोष वाटले. त्याच्या अभिनयात किंवा वेशभुषेत सुद्धा काही विशेष वाटले नाही. जेनेलियाबाबत सुद्धा ती आताची देशमुख असली तरी मराठीची बोंब आहेच. ईतर भुमिकात चालले असते पण या भुमिकेत बिलकुल नाही. बाकी ती दिसली नेहमीप्रमाणेच सुंदर आणि खरोखरच्या नवर्‍यासोबत केमिस्ट्री जुळवायचे काम तेवढे चोख बजावले आहे.

त्याचवेळी दुश्मन पार्टीचे कास्टींग मात्र जमून आले आहे. कारण त्यांचे संवाद हिंदीतच आहेत. त्यामुळे कानाला कुठले अत्याचार नाहीयेत. (अरे हो, चित्रपटाच्या मराठी वर्जनमध्ये सुद्धा ते हिंदीच बोलत होते. तेव्हा तिकीट बूक करताना आपण चित्रपट मराठीतच बघायचा आहे हे लक्षात ठेवा. हिंदी वर्जन ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठीच आहे.)

बिजापूरचा आदिलशहा म्हटले की आता अमोल गुप्तेच आठवतील असा त्यांचा गेटअप जमून आलाय. त्यांची पत्नी म्हणून विद्या बालन सुद्धा परफेक्ट कास्ट आहे. फरदीन खान यारी दोस्तीत आला आहे असे वाटले होते, पण शहाजहान म्हणून त्याला मोजून चार संवाद आहेत. ज्यातले तीन तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो आणि अर्धा मिनिटभर सुद्धा स्क्रीनवर दिसत नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यातही तो काही वाईट दिसत नाही. जेवढे त्याला संवाद नाहीत त्यापेक्षा जास्त शब्द मी त्यावर खर्च केलेत. आणि या न्यायाने मग अफझलखानावर स्वतंत्र लेख हवा. कारण हा चित्रपट म्हणजे महाराजांचा पुर्ण ईतिहास नसून त्यातील अफझलखानाचा वध हे प्रकरण केंद्रस्थानी आहे. जसे दर दुसर्‍या ब्लॉकबस्टर चित्रपटात हिरोईन म्हणून रश्मिका मंदाना दिसते तसे प्रत्येक अतरंगी निगेटीव्ह भुमिकेत हल्ली संजय दत्त दिसतो. पण यात तो धिप्पाड अफजलखान आणि त्याच ताकदीचा क्रिंज अभिनेता म्हणून परफेक्ट बसला आहे.

चित्रपटाच्या मधल्या टप्यात आलेली मरगळ शेवटच्या पाऊणेक तासात झटकली जाते. वर म्हटले तसे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधील स्लॉग ओव्हर सुरू होतात. अफझलखानाने तो फेमस विडा उचलल्यानंतर शेवटपर्यंत मी चित्रपट खुर्चीच्या कडेवर बसून पाहिला. अफझलखान त्याच्या बलाढ्य सैन्यासह चाल करून येतो तेव्हा प्रत्येक प्रसंगागणिक वातावरणातील वाढता तणाव छान दाखवला आहे. या भागात जितेंद्र जोशी एंट्री मारतो आणि मोजक्याच द्रुश्यात अलगद आपली छाप टाकतो. न टाकल्यास नवल अश्या ताकदीचा अभिनेता तो आहेच, पण तसेच कॅरेक्टर सुद्धा मिळावे लागते. सलमान खान सुद्धा मोजून दोन संवादात शिट्ट्या खेचतो. अफझलखान वधाच्या प्रसंगात जे पहिले नाव आजही आपल्या तोंडी येते त्याची भुमिका त्याला मिळाली आहे. रितेश देशमुख जे आधी इमोशनल संवादात चांगला वाटत होता ते चित्रपट शेवटाकडे जाताना त्याचीही भुमिका दमदार होते. एकूणच खानाच्या वधाचा क्लायमॅक्स वेगळ्या उंचीवर गेल्यासारखा वाटतो त्यामागचे कारण दमदार परफॉर्मन्स, संवाद आणि बॅकग्राऊंड म्युजिक हे तर आहेच. पण ज्या मुत्सदीपणा आणि गनिमी कावा युद्धपद्धतीसाठी शिवाजी महाराज आणि मावळे ओळखले जायचे त्याची झलक आपल्याला यात दिसते.

चित्रपट संपताना पुन्हा राजा शिवाजी अँथम म्हणून प्रसिद्द झालेले गाणे लागते. त्याची हूक लाईन आधीच फार आवडलेली, जेव्हा जेव्हा बॅकग्राऊंड म्युजिकमध्ये येते तेव्हा छानच वाटते. पण शेवटी चित्रपट संपल्यावर जेव्हा ते गाणे पुन्हा लागले तेव्हा पुर्ण गाणे आवडले. कारण तोपर्यंत खानाच्या वधाने स्फुरण चढले होते. त्यामुळे संगीतच नाही तर शब्द देखील मनाला भिडले. ए आर रेहमान यांनी जी छावामध्ये अरेबिक संगीताची शॉक ट्रीटमेंट दिली होती त्यातून आपल्याला अजय-अतुल इथे बाहेर काढतात.

रितेश देशमुखने माझी टीम तर मीच कॅप्टन असे केले असले तरी माझी बॅट तर माझीच बॅटींग असे केले नाही. सगळ्यांना व्यवस्थित फूटेज होते. स्वतःची एंट्री लवकर करायची घाई नव्हती. स्वत:वरच फोकस राहावा असा हट्ट कुठे दिसला नाही. संजय दत्तचा अफझलखान तर पुर्ण चित्रपटभर व्यापला होता. अभिषेक बच्चनचे फूटेज कमी करून स्वतला घेतले असते तरी चालले असते. पण ते थोरले बंधू संभाजी राजेंना दिलेले महत्व होते.

गेल्या काही काळात आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या लाटेत हा चित्रपट मला उजवा वाटला. तसेच कुठलाही छुपा अजेंडा, प्रोपगंडा न जपता, ईतिहासाची तोडमोड न करता प्रामाणिक प्रयत्नांनी बनवलेला वाटला. तर मुलांनाही जरुर दाखवा. ईतिहास काही चित्रपटातून शिकायची गोष्ट नाही वगैरे पाट्या न नाचवता ईतिहासाची गोडी लागायचे एक माध्यम म्हणून दाखवा. आम्हाला तर शिवाजी महाराजांचे जुनेच चित्रपट छान वाटतात असे आपण कितीही नॉस्टेल्जिक होत म्हटले तरीही तसे चित्रपट बनवल्यास ते थिएटरमध्ये बघायला किती जण जातील हा प्रश्नच आहे. त्याचवेळी नव्या तंत्रज्ञानाचा भडीमार असलेले कृत्रिम भासणारे ऐतिहासिक चित्रपट बघणे नकोसे वाटते हे सुद्धा तितकेच खरे आहे. पण मला हा चित्रपट या दोन्हीतील दरी थोडी कमी करणारा वाटला.

एकूणच महाराजांवरचा चित्रपट आणि जितका जमला आहे ते पाहता मराठी चित्रपटांत बॉक्स ऑफिसवर एखादा नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे. याचा दुसरा भाग येणार असेल तर माझी आताच अ‍ॅडवान्स बूकिंग आहे. मला काही आतली खबर वगैरे नाही, पण तो येईलच याची खात्री आहे.

कारण आता केवळ खानाचा वध (१६५९) झाला आहे. अजून बाजीप्रभूंची पावनखिंड (१६६०) शाईस्तेखानाची फजिती (१६६३), सूरतेची लूट (१६६४), आग्राहून सुटका (१६६६), आधी लगीन कोंढाण्याचे (१६७०) आणि अखेरीस क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक (१६७४) होणे शिल्लक आहे!

- तुमचा अभिषेक

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> नंतर पिक्चरमधे चांगले प्रसंग आहेत असे ऐकले आहे <<

अक्षरश: एकही चांगला प्रसंग नाही. जिथे आहे असे वाटू लागते तेवढ्यात ते अजय अतुल चे निरर्थक एंट्री संगीत वाजते आणि सगळ्याची डबल माती होते.
सगळेच नुसत्या एंट्र्या करत आहेत.

या चित्रपटाला कोट्यवधीचा गल्ला मिळू शकतो यावर खरेतर अजिबातच विश्वास बसत नाही. एवढे कसे लोक कामातून गेलेत आजकाल?

रितेश भाऊंनी थोडंफार तरी धड मराठी बोलता येणारे कलाकार घ्यायला पाहिजे होते.
स्वतः रितेश ने महाराजांवर चित्रपट आहे म्हणून दाढी वाढवण्याशिवाय काही कष्ट घेतलेले दिसत नाहीत.

बॉलीवूडमधील मंडळी मराठी कार्यक्रमात आल्यावर जशी जीभ वाकडी करून एखादं-दुसरं मराठी वाक्य बोलतात, तसंच या चित्रपटातही वाटतं.

चित्रपटाची कमाई १०० कोटींच्या वर गेली म्हणजे रितेश आपल्याच घरातील किंवा जवळच्या कलाकारांना घेऊन महाराजांवर आणखी चित्रपट काढणार, हे नक्की.

अभिषेक, सलमान, जिनेलिया यांचे बोबडे मराठी प्रोमोत ऐकूनच बघावासा वाटलाच नाही हा सिनेमा. वरचे रिव्ह्यू एक से एक भारी आहेत Happy मला तर अजय अतुल चे संगीत पण कंप्लीट लेट डाउन वाटले. स्वतःचा वेळ खर्च करून मनस्ताप करून घ्यायचा मूड झाला तर बघेन Happy

मला सर्वात खटकले आहे ते Transactional revenge drama चे स्वरूप. त्यामुळे इतक्या थोर व्यक्तिरेखांचे खुजीकरण झाले आहे आणि हा सगळा कथापट एका बदल्यासारखा सादर झाला आहे.

थोरल्या शंभुराजेंना मारल्यावर जिजाऊ म्हणते "आम्हाला खानाचं मस्त्क हवंय शिवबा"! सिरीयसली? आता प्रत्यक्षात त्या वेळी रागामधे असा संवाद झालाही असेल. पण चित्रपटात तो संवाद येतो आणि पुढे सगळे अफझल चे फुटेज सुरू होते. जणू काही हा त्याचा बदला आहे. अफजलखानाला मारताना या अनेक गोष्टींचा राग शिवरायांच्या डोक्यात असेलच पण वैयक्तिक बदल्यापेक्षा कितीतरी पट मोठ्या एका योजनेचा तो भाग होता. अजून शेवटचा भाग पाहिलेला नाही, त्यात ते वळण चित्रपटाने घेतले आहे का माहीत नाही.

तेवढे एकच नाही. जेथे शहाजी राजांची जहागीर आहे तेथे एक रँडम दुसराच सरदार येऊन लोकांची सुंता करायला बघतो (ती ही उघड्यावर) आणि बरोब्बर त्याच वेळेला अभिषेक तेथे उगवतो व त्यांना मारतो. आणि वर सांगतो आमच्या जहागिरीत असले काही चालणार नाही. तो सगळा प्रसंग "हीरो-एण्ट्री-फुटेज" करता असलेला आणि बनावट वाटतो. हे सरदार लोक एकेकटेच लढत असतात गनिमांशी. त्याच्याशी लढायला आलेले आदिलशाही सैनिक एकत्रित पुढे यायला घाबरतात पण एकेकटे एकदम त्वेषाने पुढे येतात.

अगदी एण्ट्रीपासूनच असे वातावरण आहे की हे सगळे लोक इतके डेंजरस आहेत की यांना समोर पाहूनच शत्रूचे सैनिक थिजतात. पण हे इथपर्यंत पोहोचले कसे ते काहीच यात येत नाही. अजून कोठे गनिमी कावा दिसला नाही. पहिल्या लढाईपासून सगळे समोरासमोर युद्ध आहे.

काय एकेकाच्या एण्ट्र्या! रितेशची तर आता घोडा, फ्रीज. मग पुढच्या फ्रेम मधे पाय फ्रीज. मग डोके, मग कानातले, मग चेहर्‍याचा एक भाग असे करत करत पूर्ण रितेश फ्रेममधे येतो. मुळात तो दुसरीकडे पूजा करत होता. मग एकदम इथे घोड्यावरून कसा आला. ते ही उभा राहून. ही अशी वरून उडी मारून लोकांना मारायची कला फक्त या साइडच्या लोकांनाच माहीत दिसते. त्या उडीची ट्रॅजेक्टरी रानोमाळ हरवली आहे सीजीआय मुळे. त्याचे सैनिक सगळे आरडाओरडा करत समोरूनच आले. मग मधेच डोक्यावरची पोती फेकून काहीतरी सरप्राइज एलिमेण्ट दिसले, ते कुठून आले? ते आधी सोडलेले पन्नास साठ वळू आसमंतात विरून गेले काय? त्यातला एकच नंतर दिसला. तो ही लढाईच्या गर्दीत शिरून बरोब्बर शत्रूच्या एकाला शिंगावर घेउन पुढे गेला.

विक्सच्या जाहिरातीतील गोंडस मुलगा बरा झाल्यावर आईशी एकदम "Aww!" प्रतिक्रिया येईल असा निरागस बोलतो, तसा लहान शिवबाचा रोल केलेला तो मुलगा सगळ्या सीन्स मधे बोलतो. शहाजीराजांचे सैनिक इतके गये गुजरे होते का, की एक तोफ घरंघळून खाली येऊ लागल्यावर तेथील पन्नास एक लोक पळून जातात, खाली खेळणारी मुले तरीही निर्विकारपणे तशीच खेळत राहतात? हे सगळे लहान शिवबाने पळणार्‍यांच्या उलट दिशेने पळत जाउन बाजूचे बांबू पाडून ती तोफ थांबवली हे दाखवण्याच्या खटाटोपाकरता. ती तोफही शिरस्त्याप्रमाणे तेथील मुले बनवत असलेल्या किल्ल्याच्या दोन इंच अलीकडे थांबते.

"हानी/इजा करू शकणारी गोष्ट हीरोने दोन इंच अलीकडे रोखली" ही सगळ्या शिवपटांमधली रिकरिंग थीम आहे. मग दिग्दर्शक कोणीही असो.

कोठेतरी स्पार्क ऑफ ब्रिलियन्स दिसेल, काहीतरी वेगळे दिसेल असे बघत होतो. किल्ल्याच्या बुरूजावर शिवराय रयतेसमोर उभे आहेत तो सीन जमला आहे, थोडा लायन किंग सारखा असला तरी. राजे अँथम आहे ते चांगले लिहीलेले आहे असे जाणवले. व्हिज्युअल्स कायच्या काय असले तरी. शिवाजी महाराजांसमोर आजूबाजूच्या रयतेतील स्त्रिया नाचतायत? सिरीयसली?

जावळीच्या मोर्‍यांसमोर येउन शिवाजी महाराज जे बोलतात ते डॉयलॉग चांगले होते. पण चंद्रराव मोरे जे करतोय ते का करतोय हेच नीट सादर झालेले नाही. त्यामुळे ते फार प्रभावी होत नाही. चंद्ररावाचे काम करणारा अभिनेता (नाव विसरलो) वास्तविक काय मस्त काम करतो (सैराट मधला आर्चीचा बाप. पण त्याचा मुळशी पॅटर्न मधला रोल पाहा). इथे त्याचे कार्टून केले आहे.

चंद्रराव मोरे आणि शिवाजी महाराज यांच्यातील पत्रव्यवहार इतिहासाच्या पुस्तकात की कोठेतरी वाचला होता. चंद्ररावाचा उद्दामपणा आणि त्याला दिलेले उत्तर दोन्ही भारी होते. त्यातही "बदफैली केलिया मारले जाल" वगैरे खुद्द शिवाजी महाराजांचे शब्द आपण वाचतोय हे जाणवून अंगावर रोमांच उभे राहिले होते. तसले काहीही या सीन्स मधे जाणवत नाही. त्यावेळेची काही सरदार घराणी भोसले घराण्याला त्यांच्या लेव्हलचे समजत नसत वगैरे न्युआन्सेस तर सोडूनच द्या.

तु बराच पेशन्स राखुन आहेस..मला पिस काढायला तरी पुढे बघायचा आहे पण....सन्जय दत्त तिकडे धुरधर टू राजा शिवाजी फक्त मेकप आणी गेटप बदलुन सेमच भुमिका असल्यासारखा वावरतो..एकाच सुरात डायलॉग बोलतो..त्याची रितिकच्या अग्निपथ मधे व्हिलन म्हणून दहशत वाटली होती तशी इथे वाटत नाही.
फरदीन तर ("लाडकी बहीण "योजनेसारखा) "लाडका मित्र" योजनेत घेतला असावा.
यापेक्षा रणजित देसाई किवा इतर इतिहासकारानी लिहलेली पुस्तक जास्त ड्रामा उभा करतात..अगदी समोर घडतायत प्रसन्ग घडतायत अस वाटाव इतकी सुन्दर लिहली आहेत.
मला आठ्वतय श्रीमान योगी मी ५-६ वीत असताना सुट्टीत वाचल होत..एका दोलायमान क्षणी महाराज समर्थ घळीत जावुन स्वतःच मस्तक अर्पण करण्याचा विचार करतात..ते वर्णन वाचुन डोळ्यात पाणी आल होत.
बाय द वे ! इथे राजा शिवाजी वर पिस तरी काढता येतात.. इतरत्र सोमीवर काहीही लिहलत तर मात्र तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरता आणी जात वैगरे सहित शेलक्या विशेषणानी गौरवान्वित होता.

तेवढे एकच नाही. जेथे शहाजी राजांची जहागीर आहे तेथे एक रँडम दुसराच सरदार येऊन लोकांची सुंता करायला बघतो

असे खरेच आहे सिनेमात ?

हो आदिलशाह, मुघल वगैरेंनी सगळे प्रोटोकॉल गुंडाळून ठेवले आहेत. वास्तविक जितके मध्ययुगीन तितके दैनंदिन व्यवहारातले अवडंबर जास्त, दरबारी आदब, राजे-सरदार यांच्या वागण्यातली औपचारिकता जास्त असे हवे. पण इथे आदिलशहाची बेगम भर दरबारात त्याचा खवचट पाणउतारा करते. प्रत्यक्षात अफझलखान कितीही जगात भारी असला तरी तो आदिलशहाचा एक सरदार. त्याला दरबारचे नियम पाळावे लागलेच असतील. पण संजूबाबा हे कसे करेल? मग तो आपण तुमच्या दरबारात चाकरी करतोय ही सुलतानावर मेहरबानीच आहे अशा थाटात सगळीकडे वावरतो.

बेगम सगळ्या सरदारांना बांगड्या देते दरबारात. जावळी काबीज होउन तीन वर्षे झाली तरी तुम्ही सगळे ऐश करताय म्हणत. अरे तुम्हीच आदेश द्यायचे असतात ना? ही काय सेल्फ सर्विस सरदारी आहे का? मनात येईल ती मोहीम ठरवायला. विजापूरच्या दुसर्‍या बाजूची जबाबदारी असलेला एखादा सरदार कशाला कडमडायला जाईल जावळीला वरून आदेश आल्याशिवाय? त्यालाही भर दरबारात बांगड्या देऊन अपमानित करतील काय?

अफझलखानाने विडा उचलला ते खरे असेल, प्रतीकात्मक असेल पण तेव्हा तो दरबारात ऑलरेडी उपस्थित असणार. त्याला तशी आज्ञाच असेल. इथे तो एण्ट्री मारल्यासारखा कोठूनतरी येतो भावखाऊ स्टाइलने.

शंभूराज्यांनी अफजलखानाबरोबर काम करावे अशी अट घातल्यावर अभिषेक जाउन सरळ त्याच्या शेजारी उभा राहतो. नंतर लढाईतही त्याचा आदेश ऐकत नाही. आपले हीरो कोणापेक्षा कधीच कमी नव्हते हे प्रत्येक फ्रेममधे ठसवण्याचा अट्टाहास हास्यास्पद होत जातो. हे सगळे लोक कितीही शूर असले, तरी शेवटी कोणत्यातरी सुलतानाच्या सैन्यात होते. शिवाजी महाराज यापेक्षा वेगळे होते म्हणून त्यांची थोरवी आहे ना? तेच जर दाखवायचे टाळले तर ती थोरवी लोकांना कळणार कशी?

तो गोंडस लहान मुलगा रितेशचाच आहे बहुतेक. मी वर लिहिले आहे तेवढाच पाहून सोडून दिला. मला ते कर्कश-बेगडी साऊथ इंडियन छापाचे पिक्चर सहन होत नाहीत पण तुम्ही फारच हसू खिदळू लागलात आणि मला गप बसावं लागू लागलं तर पूर्ण करेन. हिरो आपल्याकडे येत नाही, "प्रगट" होतो. मग ह्यांच्या प्रत्येक लिंबूटिंबू हिरोला अरायव्हल एंट्र्या ( दरवेळी आपण- तूने मारी एंट्रियां और दिल में बजी घंटीयां करावे हा अट्टाहास) एवढ्या घंट्या तीन घंटा. Happy . ह्यांच्या ऑरा आणि प्रगटीकरणाच्या नादात गणिमी काव्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो. दरवेळी बा अदब बा मुलायजा व एवढा गाजावाजा. तितकेच फूटेज पुन्हा व्हिलनला, त्यामुळे कथेत काटछाट.

तो तोफ गडगडत खाली येण्याच्या सीनमधे बाळरितेश खालून वर पळत येत असतो. वर तोफ घेऊन जाणारे लोक तोफ आता आदळणार म्हणून आरडाओरडा करत असतात. पण खाली उतरत जाणारे मावळे ढुंकूनही मागे वळून पाहत नाहीत Lol "हे आपलं डिपार्टमेंट नाही"- टाईप उतरत राहतात. ह्यांना पेरिफेरल व्हिजन नाही, रिफ्लेक्सेस नाहीत, ऐकू कमी येतं, ॲलर्टनेस नाही. बरं झालं खरे मावळे असे नव्हते नाही तर आपलं काही खरं नव्हतं. हिरोला सुपरह्यूमन करण्याच्या नादात ह्यांना डंब केले आहे.

मागे एकदा लांजेकरच्या कुठल्यातरी चित्रपटाबद्दल लिहिले होते तेच पुन्हा - जी व्यक्ती जी भूमिका करत आहे तिचा त्या भूमिकेत राहण्यापेक्षा त्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर दिसून येतो. जो अर्थात सर्व महाराष्ट्रीयन लोकांना आहेच. म्हणजे रितेशच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर असणार पण तो दिसायला नको आहे कारण तोच शिवाजी आहे. That keeps them apart from the characters they are playing. मग ते गणेश मंडळातील नाटक वाटते. तसेच उलटे अफजलखान सतत "मी असा दुष्ट आहे की नाही बस रे बस" टाईप देहबोली घेऊन खरेच वावरत असेल का ? नाही वाटत. हा फार मोठा कॅरेक्टर फ्लॉ आहे. आपल्या आस्थांशी खेळून इझी मनी मिळवण्यासाठी आळशी मार्ग पत्करला आहे. शिवाजी महाराज दिसले की रोमांच येतातच कारण ते जसे होते तसे शौर्य, तसा पराक्रम पुन्हा दिसणे नोहे!

प्रतापगड हे नाव खानाचा वध झाला तेव्हापासून पडले आधी तो भोरप्याचा गड नावाने ओळखला जायचा. पिक्चरमध्ये सगळे आधीपासूनच प्रतापगड प्रतापगड करत सुटलेत.

हिरो आपल्याकडे येत नाही, "प्रगट" होतो. मग ह्यांच्या प्रत्येक लिंबूटिंबू हिरोला अरायव्हल एंट्र्या >>> Lol

तो गोंडस लहान मुलगा रितेशचाच आहे बहुतेक >>> Happy हो त्याच्यात कधी रितेशची तर कधी जेनेलियाची झाक दिसतेच.

अफजलखान सतत "मी असा दुष्ट आहे की नाही बस रे बस" टाईप देहबोली घेऊन खरेच वावरत असेल का ? नाही वाटत >>> टोटली. सतत तसाच दाखवला आहे. वास्तविक संजूबाबाला थोडा गमत्या असलेला भाई छाप आव्रिर्भाव चांगला जमतो. त्याचा वापर करायला हवा होता. त्या नादात तोच भाव खाउन गेला असता, पण जसा दाखवलाय तो फारच एकसुरी झालाय.

पाहिला पूर्ण आता. शेवटच्या दोन चॅप्टर्स मधे पिक्चर बर्‍यापैकी उचलला आहे. नव्याने सामील होणार्‍या मावळ्यांना युद्धाला प्रेरित करण्याच्या सीनपासून ते खानाला मारेपर्यंत. इथे मी एंगेज झालो. विशेषतः खानाला गाफील ठेवत जावळीपर्यंत आणण्याचा भाग. पिक्चरचा वेग कमी केला आहे, वातावरणातील ताण चांगला दाखवला आहे. खानाच्या तंबूतली पाण्याची गळती व त्याचबरोबर विजापूरवरून येणार्‍या फर्मानामुळे खानाचा ताण वाढत जातानाचे दिग्दर्शनही छान. हळुहळू उत्कंठा वाढत जाते इथे सगळे माहीत असले तरी. जितेंद्र जोशीने पंताजी गोपीनाथचा रोल भारदस्त केला आहे. दहा मिनिटांच्या रोल मधे छाप उमटवून जातो.

मात्र खान पडल्यावर लढाईत आधीचा सगळा अचाट अतर्क्यपणा परत येतो. शिवाजी महाराजांच्या सीन्स मधे त्यांच्या व्यक्तिरेखेचे महत्त्व कमी न होऊ देता चांगला कॅमिओ कसा असावा याचे उदाहरण म्हणजे जितेंद्र जोशीचा रोल, आणि कसा असू नये याचे उदाहरण म्हणजे सलमानचा रोल. अनावश्यक भावखाऊ आणि स्टाईलाइज्ड. त्याची एण्ट्री सेट अप करायला सीन असा केला आहे की भर लढाईत मागून त्यांचे नाव घेत ओरडत शत्रूचा कोणी (सय्यद बंडा) येत आहे तरी महाराज मागेही न पाहता पुढेच चालले आहेत. आणि मग अचानक सलमान येतो जिवा महाला म्हणून. तेथे तो खाली बघत स्क्रीन फ्रीज. मग हळू वर बघून ऑरा फार्मिंग. नंतर जनरल अ‍ॅक्शनपटांसारखे रितेश आणि सलमान पाठीला पाठ लावून लढायच्या पवित्र्यात. आणि केवळ त्याला एक कॅची डॉयलॉग द्यायचा म्हणून महाराजांचा अंगरक्षक महाराजांना म्हणतोय तुम्ही व्हा पुढे आम्ही इथे लढतो. आणि मग तो सलमान असल्याने तीन सैनिक व त्यांच्या पुढची ढाल एकाच दांडपट्ट्याच्या घावात भेदून टाकतो.

विजापूरच्या दूतांना कोठे काय बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जात नसावे. बडी साहेबा खानाला उपहासाने बांगड्या पाठवते तो "नजराणा" त्यांच्या शत्रूच्या वकीलासमोरच तो दूत उघडून दाखवतो.

>> थोरल्या शंभुराजेंना मारल्यावर जिजाऊ म्हणते "आम्हाला खानाचं मस्त्क हवंय शिवबा"! सिरीयसली? आता प्रत्यक्षात त्या वेळी रागामधे असा संवाद झालाही असेल. पण चित्रपटात तो संवाद येतो आणि पुढे सगळे अफझल चे फुटेज सुरू होते. जणू काही हा त्याचा बदला आहे. अफजलखानाला मारताना या अनेक गोष्टींचा राग शिवरायांच्या डोक्यात असेलच पण वैयक्तिक बदल्यापेक्षा कितीतरी पट मोठ्या एका योजनेचा तो भाग होता. अजून शेवटचा भाग पाहिलेला नाही, त्यात ते वळण चित्रपटाने घेतले आहे का माहीत नाही. <<

फारेण्ड, खरेतर हा बदलाच होता.
नरहर कुरुंदकरांनी यावर सविस्तर लिहिले आहे. एकतर यातून दोन गोष्टी साध्याच्या होत्या. संपूर्ण भारतात शॉकवेव पसरवणे आणि पर्सनल बदला घेणे.
खानाने गद्दारी केली आणि शिवरायाच्या पाठीत खंजीर खुपसला हे आपल्याला खुपदा सांगितले गेले. किंबहुना पाठीत खंजीर खुपसणे हा मराठी भाषेत गद्दारीचाच वाक्प्रचार झाला एवढा मोठा हा प्रसंग आहे. जावळी सारख्या दुर्गम भागात खान स्वतःहोऊन एवढे सगळे घेऊन जाईल एवढा मोठा मूर्ख तर खान नक्कीच नसणार आहे नाहीतरी तो आदिलशाहीत एवढा महत्त्वाचा झाला नसता. परंतु जरा विचार करा -

अफझलखान हा धूर्त होता आणि तो काही मूर्ख नव्हता की तो जवळी मधे येईल आणि त्याने शिवाजीकडून आपला खून होणार नाही याची कोणतीच शक्यता नाही असे इमॅजिन केले नाही असे होणे शक्यच नाही.

कुरुंदकर म्हणतात की हा सगळा प्रकार शिवाजी आणि जिजाऊ या दोघांनी खानालाच दिलेला दगा आहे. खानाच्या जीवाला धोका होणार नाही हा शद्ब जिजाऊनी दिल्याशिवाय खान इकडे आला नसता. कारण जिजाऊ शब्दाला पक्की आहे अशी तिचा लौकिक होता. दुसरा भाग म्हणजे खानाने शहाजीराजांना लेवरेज केलेले असणार आहे किंबहूना या दोघांनी त्याला कन्विन्स करण्यात खूप मोठी भूमिका केली असणार आहे.

त्यामुळे खानाने ही गारंटी घेतली आहे आणि मगच तो जावळीत आला आहे.
म्हणून खरेतर खानाचाच ठरवून खून केला आहे. त्याला कसल्याही परिस्थितीत मारायचेच हे व्यवस्थित प्लॅनच केलेलं आहे. यात रिव्हेंज हा खूप मोठा भागच आहे.
दुसरा भाग म्हणजे त्याच्या फौजेची धूळदान उडवून थेट आदिलशाहीचा प्रदेश काबीज करत जाणे..

कुरुंदकर म्हणतात अफझलखानाच्या खुनाची बातमी ही आसाम पर्यंत पोचली होती इतकी ही शॉकवेव मोठी होती.

त्यामुळे पर्सनल अँगल यायलाच हवा. मात्र तो असा बटबटीत पणे नको कारण खानाला जावळीत आणणे हे हर्क्युलियन टास्क होते, तुलनेने त्याला परास्त करणे सोपे होते. हे negotitiation दाखवणे कुणालाच जमत नाही.

@ फारएंड - आपला खुसखुशीत चित्रपट रिव्ह्यू वाचून फारा दिवस जाहले... असे तुटक प्रतिसाद नकोत. एक संपूर्ण रिव्ह्यू तुमच्याच शैलीत होऊन जाऊ देत...

त्यामुळे पर्सनल अँगल यायलाच हवा. मात्र तो असा बटबटीत पणे नको कारण खानाला जावळीत आणणे हे हर्क्युलियन टास्क होते, तुलनेने त्याला परास्त करणे सोपे होते. हे negotiation दाखवणे कुणालाच जमत नाही. >> धन्यवाद. हा संदर्भ माहीत नव्हता.

प्रत्यक्षात तसे कधी दाखवतील असे मला वाटत नाही. एकतर आपल्या अशा पिक्चर्स मधे आपले हीरो समोरासमोर लढतात व बाकीचे फसवाफसवी करतात हे चित्र उभे करतात. हे मराठीतच नव्हे, तर पद्मावत टाइप पिक्चर्समधेही असते. आपले प्रत्येक हरलेले किंवा लढाईत मारले गेलेले थोर लोक हे चिटिंग मुळे हरले/मारले गेले असेच सहसा दाखवतात. दुसरे म्हणजे यात जिजाऊलाच त्या प्रसंगापुरते का होईना पण निगेटिव्ह दाखवावे लागेल. ते कोणालाच पसंत पडणार नाही. जरी ते for greater good असले तरी.

बाय द वे, तुमच्या आधीच्या पोस्टीत महाराष्ट्रात रामलीला व रावण जाळणे बद्दल वाक्य होते. रामलीला कदाचित नसावी पण रावण दहन मी पुण्यात औंधला होत असे ते लहानपणी पाहिले आहे. आता ते शिवकाळात होत होते का वगैरे माहीत नाही.

काखेत तोफ घेऊन चालवणे. अफझल खानाचे कानाचे पडदे काय सुपरमॅन कडून रोपण करून बसवलेले काय ? >>>> Lol आणि तोफेच्या गोळ्याने केलेले प्रिसाइज टार्गेटिंग Happy माझा समज होता तेव्हाच्या तोफा (आणि आताच्याही) दारे, बुरूज ई विस्तृत भाग उध्वस्त करतात. एखादी व्यक्ती तिचे लक्ष्य होईल अशी अचूक मार नसते. पण इथे अभिषेकला लक्ष्य केले आहे. तो ही आख्खा गोळा छातीवर झेलून पुन्हा लांबून डुलत डुलत आलेल्या खानाच्या डॉयलॉगला प्रत्युत्तर देण्याइतका शुद्धीवर असतो. नशीब समोर खानच असल्याने हिंदीत बोलून चालले. नाहीतर अभिषेकचे आधीचे मराठी पाहता तो म्हणाला असता पाहिजे तर या सीन मधे अजून एक तोफेचा गोळा मारा पण तेवढे मराठी बोलायला नका लावू.

कृत्रिम वाटणारे मराठी सर्वात जास्त जेनेलियाचे, मग अभिषेक, मग इतर. इव्हन कधीकधी रितेशच्या मराठीत ती सफाई वाटत नाही, नेहमी बोलत असल्यासारखी.

किल्लेदार - नक्कीच Happy मी हा पिक्चर तसे काही लिहायच्या उद्देशाने पाहिला नाही. ट्रेलरमधे जे दाखवले आहे त्याच्या पलीकडे या पिक्चर मधे बरेच चांगले काही आहे असे इथे वाचले, इतर ठिकाणी पाहिले/ऐकले त्याबद्दल कुतूहल होते. पण ते अगदी कमी निघाले.

फा आणि रॉय, चर्चा आवडली. कुरुंदकर म्हंटले की आवर्जून वाचावे वाटते. जिजाऊ बद्दलचा भाग फार इंटरेस्टींग वाटला रॉय! "नरो वा कुंजरो वा" चेच व्हर्जन वाटले.

कुरुंदकर म्हणतात की हा सगळा प्रकार शिवाजी आणि जिजाऊ या दोघांनी खानालाच दिलेला दगा आहे. खानाच्या जीवाला धोका होणार नाही हा शद्ब जिजाऊनी दिल्याशिवाय खान इकडे आला नसता. कारण जिजाऊ शब्दाला पक्की आहे अशी तिचा लौकिक होता. दुसरा भाग म्हणजे खानाने शहाजीराजांना लेवरेज केलेले असणार आहे किंबहूना या दोघांनी त्याला कन्विन्स करण्यात खूप मोठी भूमिका केली असणार आहे.
द्वारकानाथ संझगिरींनी ह्याबाबत एक अनुभव वर्तमानपत्रात लिहिला होता. भारतीय टीम ऐशींच्या दशकात पाकिस्तान दौर्यावर गेलेली असताना क्रिडा पत्रकार ताफ्यात संझगिरी पण गेले होते. जिथे जातो तिथली शालेय पाठ्यपुस्तकाची इतिहास भूगोल वगैरेची पुस्तके वाचण्याची त्यांची आवड होती. तेव्हा अपाल्या सवयीनुसार त्यांनी पाकिस्तानातील शालेय अभ्यासक्रमाकीत इतिहासाची पाठ्यपुस्तके घेतली.त्यांच्या नुसार त्या पाठ्यपुस्तकातील इतिहास हा पूर्णपणे मुस्लीम आक्रमण कर्त्यांच्याच बाजुने लिहिला होता. शिवाजी राजांनी खानाला दगाफटका करुनच मारले असाच उल्लेख त्यात केला होता.

मुळात खानाला आपल्याला दगा होईल असे वाटत असल्याचा काय पुरावा आहे
तो स्वतःच दगा करण्याच्या उद्देशाने आला होता
त्याची शक्ती आणि पराक्रम याचा त्याला घमंड होता

मंदिरे तोडत आला कारण तोही सायकॉलॉजी वॉरफेर करत होता
मंदिरे तोडली तर बाकी हिंदू राजांसारखा शिवाजी पण पेटून उठेल आणि आपल्याला समोरा येईल बेभानपणे असं वाटलं असेल
पण पंढरपूर तुळजाभवानी मंदिरे फोडून मंदिरात गाय मारूनही तसे काही होईना म्हणून
बजाजी निंबाळकर ला हत्तीच्या पायी देण्याचे ठरले

हे सगळंच इतकं विलक्षण आहे की त्यात अजून नाट्य आणण्यासाठी काही नकोच आहे

खान मंदिरे तोडत कशाला आला होता?>>> सगळी मंदिरे जुनी झाली होती. ती बघून खानाला दुःख झाले आणि तो ढसाढसा रडला. म्हणाला थांबा ही तोडतो आणि नवीन बांधून देतो. खानाला बघून बायका पोरं खुश व्हायचे बोलायचे आमचे खान मामा आले चला चला. बायका भाऊराया आला म्हणून मटण पुरीचा बेत करायचा खान त्यांना साडी चोळी द्यायचा. खान निघाला की सगळे दुःखी होऊन ओक्साबोक्शी रडायचे.

बायका भाऊराया आला म्हणून मटण पुरीचा बेत करायचा खान त्यांना साडी चोळी द्यायचा. खान निघाला की सगळे दुःखी होऊन ओक्साबोक्शी रडायचे.>बोकलत इकडे तरी आवरा स्वतःला .

Pages