चित्रपट - राजा शिवाजी!

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 May, 2026 - 13:01

राजा शिवाजी चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
बघून या मस्त आहे.
मी सुरू करतो

सर्वात पहिले मी कबूल करतो की स्टारकास्ट बघून मी आधीच नकारात्मक मत बनवून ठेवले होते. त्याच वेळी चित्रपट शिवाजी महाराजांवर आहे तर चुकवायचा कसा याही द्विधा मनस्थितीत होतो. पण चित्रपट प्रदर्शित होताच कुठलाही किंतु परंतु मनात शिल्लक राहिला नाही. जर "छावा" संभाजी महाराजांना चित्रपटगृहात बघून आलो तर "शेर" शिवाजी महाराजांना बघायला जायचेच होते.

शिवाजी महाराजांवर आतापर्यंतचा बिगबजेट भव्य दिव्य चित्रपट म्हणजे चर्चा तर होणारच होती. ती नावापासूनच सुरू झाली. काहींना नावात छत्रपती हवे होते तर काहींना "राजा शिवाजी" हा एकेरी उल्लेख खटकून "राजे शिवाजी" असे नाव हवे होते. पण आमच्या शाळेचेच नाव "राजा शिवाजी विद्यालय" असल्याने आणि ते आम्ही महाराजांच्या नावाईतकेच अभिमानाने अन आदराने घेत असल्याने मी या वादावर मनातल्या मनात फक्त 'बर्रं' म्हटले.

दुसरा वाद चित्रपटातील कास्टींगवर होता. इतरांबद्दल पुढे लिहितोच पण शिवाजी महाराजांची भुमिका रितेश देशमुखने स्वतः करणे हा मोठा वादाचा विषय होता. त्याने आधी ईतर चित्रपटात साकारलेल्या खट्याळ भुमिका हा माझ्यामते कलाकारांसाठी गैरलागू मुद्दा होता. पण त्याचे व्यक्तीमत्व महाराजांची भुमिका साकारू शकेल का ही शंका मलाही होती. अन्यथा त्याचा अभिनय मला आवडतोच. पण त्याने भुमिकेची लाज राखली. हा माझ्यासाठी या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला अन्यथा चित्रपट डब्यात होता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याएवढाच मोठा ईतिहास असलेल्या महाराजांवरचा चित्रपट तीन तासात बसवायचा म्हणजे जिथे कसोटी खेळवायला हवी तिथे ट्वेंटी-ट्वेंटीचा सामना खेळवावे असे झाले. म्हणून चित्रपटात शिवशाहीचा पुर्ण ईतिहास न दाखवता तो अफझलखानाच्या वधापर्यंत दाखवला आहे आणि कथा देखील त्याभोवतीच बांधली आहे. पण त्याआधी रयतेवरील अन्याय आणि स्वराज्याची गरज ही पार्श्वभूमी दाखवली आहे.

चित्रपट देखील ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या इनिंगप्रमाणेच मला तीन तुकड्यात वाटला. सुरुवातीचा भाग हा पॉवरप्लेप्रमाणेच रोचक होता. मुघल, निजामशाही, आदीलशाही यांच्या जुलमी सत्त्तासंघर्षात भरडली जाणारी रयत आणि त्यांचा तारणहार म्हणून राजा शिवाजींचे जन्माला येणे हा भाग छान जमला आहे. महाराजांच्या लहानपणीचे किस्से, छोटेमोठे भावनिक प्रसंग, बालकलाकारांचा अभिनय, फारसे चर्चेत नसलेले त्यांचे मोठे बंधू संभाजी यांच्याशी असलेले त्यांचे भावनिक नाते हे बघायला छान वाटत होते. सचिन खेडेकर हे जणू शहाजीराजेच झाले होते आणि नेहमीप्रमाणेच अभिनय म्हणजे त्यांचे रोजचेच काम आहे असे वाटत होते. जिजाऊ माता यांच्या भुमिकेत भाग्यश्री अनपेक्षितपणे सुखद धक्का देत होती तरी अजून कणखरपणा आवडला असता कारण शिवाजी महाराजांमधील धाडसाचे स्त्रोत त्या होत्या. पण सुरुवातीपासूनच सर्वांचेच संवाद छान लिहिले होते. ऐकायलाही मजा येत होती आणि त्यामुळेच आपण चित्रपटाशी जोडले जात होतो.

गंमत म्हणजे महाराजांच्या लहानपणीच्या भुमिकेत रितेश देशमुखच्याच दोन्ही मुलांनी काम केले आहे. थोडक्यात पुर्ण देशमुख कुटुंबीयच पडद्यावर भोसले कुटुंबीय साकारायला उतरले होते. हे मला घरी आल्यावर समजले. जे एका अर्थी चांगले झाले. अन्यथा उगाच त्या मुलांची कामे नेपोकिड म्हणून बघितली गेली असती. जी प्रत्यक्षात छान झाली आहेत. एकूणच पहिल्या पाऊणेक तासात चित्रपट जणू रितेश देशमुखच्या धमाकेदार एंट्रीसाठी सेट झाला होता.

पण निदान माझ्यामते तरी उलट झाले. रितेश देशमुख आणि महाराजांचे भाऊ संभाजी राजे यांच्या भुमिकेत असलेला अभिषेक बच्चन या दोघांची एंट्री झाल्यापासून थोडा कंटाळा यायला लागला. म्हणजे अध्येमध्ये काही सीन चांगले होते पण नावीन्य नसलेले होते आणि त्यातून कथा पुढे सरकतेय असे वाटत नव्हते. अभिषेक बच्चनचे मराठी उच्चार फार सदोष वाटले. त्याच्या अभिनयात किंवा वेशभुषेत सुद्धा काही विशेष वाटले नाही. जेनेलियाबाबत सुद्धा ती आताची देशमुख असली तरी मराठीची बोंब आहेच. ईतर भुमिकात चालले असते पण या भुमिकेत बिलकुल नाही. बाकी ती दिसली नेहमीप्रमाणेच सुंदर आणि खरोखरच्या नवर्‍यासोबत केमिस्ट्री जुळवायचे काम तेवढे चोख बजावले आहे.

त्याचवेळी दुश्मन पार्टीचे कास्टींग मात्र जमून आले आहे. कारण त्यांचे संवाद हिंदीतच आहेत. त्यामुळे कानाला कुठले अत्याचार नाहीयेत. (अरे हो, चित्रपटाच्या मराठी वर्जनमध्ये सुद्धा ते हिंदीच बोलत होते. तेव्हा तिकीट बूक करताना आपण चित्रपट मराठीतच बघायचा आहे हे लक्षात ठेवा. हिंदी वर्जन ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठीच आहे.)

बिजापूरचा आदिलशहा म्हटले की आता अमोल गुप्तेच आठवतील असा त्यांचा गेटअप जमून आलाय. त्यांची पत्नी म्हणून विद्या बालन सुद्धा परफेक्ट कास्ट आहे. फरदीन खान यारी दोस्तीत आला आहे असे वाटले होते, पण शहाजहान म्हणून त्याला मोजून चार संवाद आहेत. ज्यातले तीन तो तोंडातल्या तोंडात पुटपुटतो आणि अर्धा मिनिटभर सुद्धा स्क्रीनवर दिसत नाही. आणि महत्वाचे म्हणजे त्यातही तो काही वाईट दिसत नाही. जेवढे त्याला संवाद नाहीत त्यापेक्षा जास्त शब्द मी त्यावर खर्च केलेत. आणि या न्यायाने मग अफझलखानावर स्वतंत्र लेख हवा. कारण हा चित्रपट म्हणजे महाराजांचा पुर्ण ईतिहास नसून त्यातील अफझलखानाचा वध हे प्रकरण केंद्रस्थानी आहे. जसे दर दुसर्‍या ब्लॉकबस्टर चित्रपटात हिरोईन म्हणून रश्मिका मंदाना दिसते तसे प्रत्येक अतरंगी निगेटीव्ह भुमिकेत हल्ली संजय दत्त दिसतो. पण यात तो धिप्पाड अफजलखान आणि त्याच ताकदीचा क्रिंज अभिनेता म्हणून परफेक्ट बसला आहे.

चित्रपटाच्या मधल्या टप्यात आलेली मरगळ शेवटच्या पाऊणेक तासात झटकली जाते. वर म्हटले तसे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधील स्लॉग ओव्हर सुरू होतात. अफझलखानाने तो फेमस विडा उचलल्यानंतर शेवटपर्यंत मी चित्रपट खुर्चीच्या कडेवर बसून पाहिला. अफझलखान त्याच्या बलाढ्य सैन्यासह चाल करून येतो तेव्हा प्रत्येक प्रसंगागणिक वातावरणातील वाढता तणाव छान दाखवला आहे. या भागात जितेंद्र जोशी एंट्री मारतो आणि मोजक्याच द्रुश्यात अलगद आपली छाप टाकतो. न टाकल्यास नवल अश्या ताकदीचा अभिनेता तो आहेच, पण तसेच कॅरेक्टर सुद्धा मिळावे लागते. सलमान खान सुद्धा मोजून दोन संवादात शिट्ट्या खेचतो. अफझलखान वधाच्या प्रसंगात जे पहिले नाव आजही आपल्या तोंडी येते त्याची भुमिका त्याला मिळाली आहे. रितेश देशमुख जे आधी इमोशनल संवादात चांगला वाटत होता ते चित्रपट शेवटाकडे जाताना त्याचीही भुमिका दमदार होते. एकूणच खानाच्या वधाचा क्लायमॅक्स वेगळ्या उंचीवर गेल्यासारखा वाटतो त्यामागचे कारण दमदार परफॉर्मन्स, संवाद आणि बॅकग्राऊंड म्युजिक हे तर आहेच. पण ज्या मुत्सदीपणा आणि गनिमी कावा युद्धपद्धतीसाठी शिवाजी महाराज आणि मावळे ओळखले जायचे त्याची झलक आपल्याला यात दिसते.

चित्रपट संपताना पुन्हा राजा शिवाजी अँथम म्हणून प्रसिद्द झालेले गाणे लागते. त्याची हूक लाईन आधीच फार आवडलेली, जेव्हा जेव्हा बॅकग्राऊंड म्युजिकमध्ये येते तेव्हा छानच वाटते. पण शेवटी चित्रपट संपल्यावर जेव्हा ते गाणे पुन्हा लागले तेव्हा पुर्ण गाणे आवडले. कारण तोपर्यंत खानाच्या वधाने स्फुरण चढले होते. त्यामुळे संगीतच नाही तर शब्द देखील मनाला भिडले. ए आर रेहमान यांनी जी छावामध्ये अरेबिक संगीताची शॉक ट्रीटमेंट दिली होती त्यातून आपल्याला अजय-अतुल इथे बाहेर काढतात.

रितेश देशमुखने माझी टीम तर मीच कॅप्टन असे केले असले तरी माझी बॅट तर माझीच बॅटींग असे केले नाही. सगळ्यांना व्यवस्थित फूटेज होते. स्वतःची एंट्री लवकर करायची घाई नव्हती. स्वत:वरच फोकस राहावा असा हट्ट कुठे दिसला नाही. संजय दत्तचा अफझलखान तर पुर्ण चित्रपटभर व्यापला होता. अभिषेक बच्चनचे फूटेज कमी करून स्वतला घेतले असते तरी चालले असते. पण ते थोरले बंधू संभाजी राजेंना दिलेले महत्व होते.

गेल्या काही काळात आलेल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या लाटेत हा चित्रपट मला उजवा वाटला. तसेच कुठलाही छुपा अजेंडा, प्रोपगंडा न जपता, ईतिहासाची तोडमोड न करता प्रामाणिक प्रयत्नांनी बनवलेला वाटला. तर मुलांनाही जरुर दाखवा. ईतिहास काही चित्रपटातून शिकायची गोष्ट नाही वगैरे पाट्या न नाचवता ईतिहासाची गोडी लागायचे एक माध्यम म्हणून दाखवा. आम्हाला तर शिवाजी महाराजांचे जुनेच चित्रपट छान वाटतात असे आपण कितीही नॉस्टेल्जिक होत म्हटले तरीही तसे चित्रपट बनवल्यास ते थिएटरमध्ये बघायला किती जण जातील हा प्रश्नच आहे. त्याचवेळी नव्या तंत्रज्ञानाचा भडीमार असलेले कृत्रिम भासणारे ऐतिहासिक चित्रपट बघणे नकोसे वाटते हे सुद्धा तितकेच खरे आहे. पण मला हा चित्रपट या दोन्हीतील दरी थोडी कमी करणारा वाटला.

एकूणच महाराजांवरचा चित्रपट आणि जितका जमला आहे ते पाहता मराठी चित्रपटांत बॉक्स ऑफिसवर एखादा नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे. याचा दुसरा भाग येणार असेल तर माझी आताच अ‍ॅडवान्स बूकिंग आहे. मला काही आतली खबर वगैरे नाही, पण तो येईलच याची खात्री आहे.

कारण आता केवळ खानाचा वध (१६५९) झाला आहे. अजून बाजीप्रभूंची पावनखिंड (१६६०) शाईस्तेखानाची फजिती (१६६३), सूरतेची लूट (१६६४), आग्राहून सुटका (१६६६), आधी लगीन कोंढाण्याचे (१६७०) आणि अखेरीस क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक (१६७४) होणे शिल्लक आहे!

- तुमचा अभिषेक

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केशवकूल काय एवढे काढले?

रमड आणि ऋतुराज नक्की बघा..

काल आमच्या घरचे बघून आले. त्यांना माहित नाही हा रिव्ह्यू पण त्यांची मते ऐकली ती बहुतांश या रिव्ह्यूसोबत तंतोतंत जुळली. त्यांच्याही टीकेचा सर्वात मोठा धनी अभिषेक बच्चन झाला. मलाही तोच सर्वात मिसफिट वाटला होता.

आमच्या इथे पहिल्या आठवड्यात हिंदीचे शोज होते पण जमले नाही. उद्यापासून दिसत नाहीत शोज. म्हणजे आता महाराष्ट्र मंडळाने मराठी चा शो आणला तरच थिएटरमधे. नाहीतर ओटीटीवर येईल तेव्हा.

आता मला फेबुपासून यूट्यूबपर्यंत सगळीकडे या पिक्चरमधल्या शॉर्ट क्लिप्स, लोकांचे रिव्यूज, पाचव्या दिवशी कमाई हेच सगळे येत आहे. पण गंमत म्हणजे हा पिक्चर बघा सांगणारे हटकून हे सांगतात की त्या ट्रेलर व क्लिप्स वर जाऊ नका Happy हे ऋन्मेषबद्दल नाही. या चित्रपटाबद्दल लिहीणारे बहुतांश लोक तेच सांगत आहेत. म्हणजे त्या क्लिप्स केजीएफ क्राउड करता आहेत. पण इतर पब्लिकही यावे म्हणून हे सांगावे लागत असेल.

<<<< हा पिक्चर बघा सांगणारे हटकून हे सांगतात की त्या ट्रेलर व क्लिप्स वर जाऊ नका
>>>>
ट्रेलरची दहशत सगळीकडेच होती म्हणजे Happy

@ सामो,
रामदास स्वामी नाहीयेत.
दादोजी कोंडदेव सुद्धा आठवत नाहीयेत.
बालपणीचे प्रशिक्षणाचे सीन फार नाहीयेत. तरी त्यात कुठे असतील आणि माझ्या लक्षात आले नसेल असेही झाले असेल.
भवानीमातेसमोर आपल्या सवंगड्यांसोबत घेतलेली शपथ सुद्धा बहुधा एका गाण्यात एखादी फ्रेम येते आणि जाते. म्हणजे ज्याला संदर्भ माहीत असेल त्यालाच हे कळावे. तेव्हाही वाटले की यावर दोनचार मिनिटे खर्ची केली असती तर चालले असते

काल हा बघायला सुरुवात केली.
मला फारच अंडरव्हेल्मिंग वाटला. सगळं एआय ने केलेलं, जे एआने केलेलं नाही त्या विशविशीत प्रॉपस, चीप ग्राफिक्स, भडक जरतारी साड्या, भडक सीन्स, जुने सीन्स सेपिया वगैरे रंगात न दाखवता आजच्या भर उन्हात शूट केलेले दाखवणे, जत्रेत मिळतात तसे पेहराव केलेली पोरं दाखवणे, पात्रपरिचय न होताच रँडम घडणारे प्रसंग काहीच मिळून आलेलं वाटलं नाही. मी अजुन तीनच चॅप्टर बघितले आहेत. हिंदीत बघतोय. आज बघेन उरलेला.
काल थिएटरला जायला जमलं नाही ते बरंच झालं वाटलं. नाही आवडला.

ओटीटीवर कसा येईल इतक्यात.. अमेरिकेतील जनता इतर नवीन चित्रपटाबाबत सुद्धा बरेचदा अर्धा बघितला किंवा बघायला सुरू केला वगैरे उल्लेख करतात. तिथे कुठे ऑनलाइन प्रदर्शित होतात का पिक्चर?

थिएटर मध्येच कामाला असणारी लोकं असे करत असतील का Happy
घरी आल्यावर बायकापोराना दरवेळी नवीन पिक्चरची स्टोरी सांगत असतील.

अमितव रोज थेट्रात जाऊन थोडा थोडा बघतोय? >>
तीन तास वगैरे लांबीच्या चित्रपटांना अशी सुविधा दिली पाहिजे. तिकीट काढुन तीन वेगवेगळे दिवस निवडुन एका दिवशी एक तासा करता सीट बूक करण्याची सुविधा.

काल पहिल्यांदा एक क्लिप पाहिली जी खरे म्हणजे ट्रेलरमधे हवी होती. अफजल खानाशी लढायला जाताना हा स्वराज्याचा लढा कोणासाठी आहे ते सांगत शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना लढाईकरता प्रोत्साहित करतात तो सीन. तो चांगला जमला आहे.

>> तो चांगला जमला आहे.<< +१
इनफॅक्ट तो संपुर्ण प्रसंग (अफझल खान वीडा उचलतो ते त्याच्या वधा पर्यंत) अतिशय खुबीने चित्रीत केलेला आहे. शत्रु आपल्यापेक्षा १०० पटिने प्रबळ असुनहि युक्तीने त्याच्यावर मात कशी केली जाउ शकते याचा वस्तुपाठ आहे, हा प्रसंग. खानाच्या हत्तीवर केलेला विषप्रयोग ते खानाला वाई (त्याच्या मिलिटरी बेस) पासुन दूर जावळीत आणण्याची मुत्स्द्देगिरी याला इतिहासात तोड नाहि. रितेशने या ऐतिहासीक घटनेला न्याय दिलेला आहे, असं मला वाटतं...

राज +786
अफझलखान प्रकरण शेवटचा पाऊणेक तास सगळाच चांगला जमला आहे.

स्वराज्य आणि स्वराज्याचा लढा म्हणजे काय हे सांगणारे संवाद दोनेक दृश्यात आहेत जे मलाही आवडले.

मध्यंतरापर्यंत मी सुद्धा चिकवावर एखादी पोस्ट टाकावी बघून आल्याची इतपतच उत्साहात होतो. पण पूर्ण पाहिल्यावर वाटले हा जमलाय छान. यावर स्वतंत्र धागा असायला हवा.

राजा शिवाजी - all aura farming, no sauce very little sauce

राजा शिवाजी पाहिला. माझी एकूणात संमिश्र प्रतिक्रिया आहे.

मध्यंतरापर्यंत सिनेमा नुसता चमचमाट आहे, त्यात मटेरियल काहीच नाही. डायलॉगबाजी, हाणामारी इत्यादी. महेश माजरेकर लखुजी जाधव म्हणून aura farming करून जातो. त्यात लखुजी जाधवांना का मारले ह्याचे उडत उडत एक वाक्यात कारण मिळते पण इतर कसलीही पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न झाला नाही. लखुजी आणि शहाजी राजांनी एकमेकांशी युद्धे केली, एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक मारले हे सगळे आले असते तर कथेतली इंटेन्सिटी वाढली असती पण निव्वळ aura farming करण्याचे सिनेमाने ठरवले असल्याने ते काही होत नाही. अभिषेक बच्चनचे मराठी सहन करावे लागते. तरी बरे फरदीन खान शहाजहान होता.

आदिलशहा एक विनोद म्हणून लिहिला आहे. शत्रूला कार्टूनिशली दुष्ट किंवा मूर्ख दाखवण्याचा अट्टाहास केला आहे. त्यामुळे कोणतेही शत्रू पात्र लक्षात राहण्याजोगे नाही. संजय दत्तचा प्रचंड कंटाळा धुरंधर १ पासून आला आहे तो इथेही जाणवला.

मध्यंतरानंतर सिनेमा रोचक होतो असे वाटले. सलमानचा Cameo बोरिंग आहे.

मराठी चित्रपट आणि त्यात महाराजांवर आहे म्हणून बघून आलो.
पण चित्रपट अजिबात बघणेबल नाही.
एक तर अमराठी कलाकार का घेतलेत ते समजतं नाही. त्यांना अजिबात मराठी बोलता येत नाही.ऐतिहासिक चित्रपटात जिजाबाई, सईबाई आणि शंभूराजे यांच्या भूमिकेत किमान मराठी बोलता येणारे कलाकार तरी घायला पाहिजे होते.
रितेश देशमुख महाराज्यांच्या भूमिकेत शोभत नाही. फक्त केस वाढवण्या व्यतिरिक्त त्यानं काहीच कष्ट घेतलेले दिसत नाहीत. त्यानं स्वतः मावळ्याची भूमिका करून एखाद्या चांगल्या नटाला महाराज बनवायला पाहिजे होत.
सगळ्या चित्रपटात महाराज महाराज हतबल आणि दुःखी दिसत होते.जरा म्हणून चेहऱ्यावर तेज दिसत नव्हतं. ह्या पेक्षा लांजेकराचा अफझल खानाच्या वधा वरचा चित्रपट दहा पटीने तरी चांगला होता.
बरं झालं नागराज मंजुळेनीं काढता पाय घेतला.

राजा शिवाजी हा सैराट नंतर १०० करोड क्लब मध्ये प्रवेश मिळवणारा दुसरा मराठी चित्रपट बनायची शक्यता आहे.

आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

सैराट (2016) – जगभरात ₹110 कोटी

राजा शिवाजी (२०२६) – जगभरात अंदाजे ९३ कोटी रुपये

बाईपण भारी देवा (2023) – जगभरात ₹90.5 कोटी

वेड (2022) – जगभरात ₹75 कोटी

नटसम्राट (२०१६) – जगभरात अंदाजे ₹४६–५० कोटी

पावनखिंड (२०२२) – जगभरात ~ ३७.७२ कोटी

लय भारी (२०१४) – जगभरात ~३७ कोटी

बाईपण भारी देवा (2023) – जगभरात ₹90.5 कोटी >>> सिरिअसली ?
ह्या सिनेमाने एवढा गल्ला केला ? मी हा असाच कुठे तरी पहिला होता, बोर झाला. पण आता जाणवते की बऱ्याच स्त्रियांना रिलेट झाला असणार.

बाईपण मला चांगला वाटला होता एकदा बघायला. ओळखीच्या बायका असल्याने.

पण चालला नक्कीच होता. बायकांमध्ये तेव्हा फॅड आले होते त्या चित्रपटाला नटून थटून टोळी करून जायचे आणि फोटो काढून सोमिवर अपलोड करायचे.

Pages