कथा: कोवळ्या सरी- भाग 6 (स्वर आले जुळूनी, मंदिर वही बनाएँगे!, स्नेहसंमेलन: मिले सूर मेरा तुम्हारा,#SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 13 April, 2026 - 00:49

Part 1: https://www.maayboli.com/node/88038
Part 2: https://www.maayboli.com/node/88058
Part 3: https://www.maayboli.com/node/88091
Part 4: https://www.maayboli.com/node/88099
Part 5: https://www.maayboli.com/node/88113

मागच्या भागात...
नागपूरच्या गुलाबी थंडीत सोळा वर्षांच्या सचिन तेंडुलकरच्या झंझावाती फलंदाजीने मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्येही एक वेगळाच उत्साह आणि अभिमान निर्माण केला होता. नववीच्या परीक्षा संपल्यानंतर मयंकच्या घरी रंगलेल्या संगीत मैफिलीत सौरभच्या आर्त बासरीवादनाने सावनीला मंत्रमुग्ध केले आणि त्यांच्यातील नाते अधिक प्रगल्भ झाले. 'स्वर आले दुरुनी' या गाण्याच्या सुरांनी भारावलेल्या सावनीने त्या आठवणी एका कॅसेटमध्ये साठवल्या, ज्यामुळे त्यांच्यातील अबोल संवाद सुरांच्या माध्यमातून व्यक्त झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्र पोहण्याचा आणि चित्रपटांचा आनंद घेत असतानाच, सौरभच्या वडिलांच्या अचानक ढासळलेल्या प्रकृतीने भविष्यातील एका कठीण काळाची चाहूल दिली. याच काळात १९९० मधील काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाची हृदयद्रावक बातमी धडकली, ज्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सौरभ आणि सारंगने घरोघरी जाऊन निर्वासितांसाठी ब्लँकेट आणि मदतीचे साहित्य गोळा करण्याचे काम हिरीरीने हाती घेतले. सौरभची आईदेखील 'निर्धार' संस्थेमार्फत सामाजिक कार्यात झोकून देत असतानाच, घरामध्ये वडिलांच्या वाढत्या आजारपणामुळे चिंतेचे सावट होते. बासरीचे मधुर सूर आणि काश्मीरमधील परिस्थितीचा दाहक अनुभव या दोन्ही टोकाच्या भावना सौरभच्या संवेदनशील मनाला मोठे करत होत्या. सावनीला दिलेली ती कॅसेट आणि वडिलांसोबत वाजवलेली बासरी या गोष्टी सौरभसाठी आयुष्यातील अनमोल आठवणी ठरणार होत्या. अशा प्रकारे, कला, प्रेम आणि सामाजिक कर्तव्य यांच्या त्रिवेणी संगमावर उभी असलेली ही कथा एका नव्या आणि गंभीर वळणाकडे निघाली होती.

प्रकरण ३

स्वर आले जुळूनी

दहावीचं वर्ष सुरू झालं आणि राणे सरांचा क्लासही सुरू झाला. यंदा मात्र या मित्रांची थोडी ताटातूट झाली. गौरव आणि सारंग यांना संध्याकाळची बॅच मिळाली, तर सौरभ आणि अखिल सकाळच्या बॅचमध्ये गेले. क्लास सुरू होऊन साधारण एक आठवडा झाला होता. एक दिवस अचानक क्लासमध्ये सौरभला सावनी दिसली.
आत गेल्यावर त्याने विचारलं, "सावनी, तू कशी काय आज क्लासमध्ये?" सावनी म्हणाली, "माझ्या आई-बाबांना असं वाटलं की यंदा दहावीचं वर्ष आहे, तर एक चांगला guidance असावा. म्हणून राणे सरांशी माझे वडील बोलले. सरांनी सांगितलं की मुलींची बॅच फुल्ल आहे, तिथे अजिबात जागा उरलेली नाही. सावनीला चालणार असेल तर ती मुलांच्या बॅचमध्ये येऊ शकते. सरांनी मला हाच पर्याय दिला होता, त्यामुळे मी आजपासून तुमच्या बॅचला आहे."
सौरभ गमतीने म्हणाला, "So, you regret being here with me?"
सावनी उत्तरली, "फार त्रास देतोस तू!"
सौरभ म्हणाला, "छळ... नुसता छळ!"
दोघांच्याही मनात मात्र आनंद दाटून आला होता. जणू 'स्वर आले जुळूनी!'
सावनीने विचारलं, "त्या दिवशी तू मयंककडे का नव्हता आलास? त्या दिवशी पहिल्या दिवसासारखी मजा नाही आली."
सौरभने सांगितलं, "त्या दिवशी म्हणजे ते चार-पाच दिवस बाबांना बरं नव्हतं. त्यांना खूप थकवा जाणवत होता. आणि तू का नव्हती आलीस?"
सावनी “आम्ही नाशिकला गेलो होतो”
इतक्यात केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर आले. सावनीला वर्गात नवीन पाहून त्यांनी विचारलं, "नवीन का?" बाजूच्या खोलीतून राणे सरांनी दरवाजा वाजवला आणि तो किंचित उघडून सांगितलं, "सर, सावनी आजपासून... आणि उद्या आणखीन एक मुलगी येणार आहे, मोनाली."
त्या दिवशी क्लास संपल्यावर अखिल म्हणाला, "अबे, ही तुमच्या वर्गातली आहे ना?"
मग तो कुरकुरत पुढे म्हणाला, "अबे, आपली पोट्टेशाहीची freedom गेली!"
सौरभने मनातल्या मनात म्हटलं, "तुम क्या जानो, इसमें क्या मजा है!"
दिवस छान जात होते. सौरभला यंदा गणित पूर्वीपेक्षा जास्त चांगलं जमत होतं आणि तो ते एन्जॉयही करत होता. एक दिवस राणे सरांच्या क्लासमध्ये सरांनी अचानक विचारलं, "कुणाला 'कॉमन क्रेट' (Common Krait) पाहायचा आहे का?" काही जण उत्साहाने "हो!" म्हणाले. सर एक डबा घेऊन आले. त्यात काळ्या रंगाचा आणि पांढरे पट्टे असलेला एक साप होता. सर म्हणाले, "गेल्या रविवारी हा आपल्या सौरभने केलेला पराक्रम आहे!"
सगळा वर्ग आश्चर्यचकित झाला. सौरभच्या घराजवळ कुणीतरी निरोप पाठवला होता की तिथे साप आहे. सौरभचे वडील घरी नव्हते. सौरभ लगेच तिथे गेला. साप जेव्हा दिसला तेव्हा त्याला तो 'कवड्या' (Wolf Snake) वाटला होता. त्याच्याकडे साप पकडायची काठी होती आणि त्याने पूर्ण सावधानता बाळगून त्याला पकडलं. पण जेव्हा तो जवळ गेला तेव्हा त्याला शंका आली. अधिक निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आलं की हा 'मण्यार' अर्थात Common Krait आहे, जो नागापेक्षाही जहाल विषारी साप असतो.
सरांनी विचारलं, "सौरभ, बाबा काय म्हणाले?"
सौरभ म्हणाला, "सुरुवातीला थोड्या शिव्या खाल्ल्या. पण नंतर ते म्हणाले की, मी तिथेच उभा होतो आणि तू त्याला कसं handle करतोयस हे पाहत होतो. तू ते व्यवस्थित केलंस. फक्त घोणस हाताळताना 'Be 10 times careful'."
सर म्हणाले, "बाबा खुश आहेत, माझं बाबांशी बोलणं झालंय. शेवटी कधी ना कधी एकट्याने साप हाताळण्याची वेळ येणारच होती."
दुसऱ्या दिवशी सावनीने त्याला विचारलं. तिच्या आवाजात काळजीचा स्वर होता, "सौरभ, अरे तू 'मण्यार' पकडलास? ग्रेटच आहेस तू. पण तुला जीवाची भीती वाटत नाही का? जहाल विषारी साप आहे तो! किती रिस्क घेतलीस तू? कधी माझा... म्हणजे तुझ्या आईचा विचार केला आहेस का? तुला काही झालं तर त्यांना काय वाटेल?"
सौरभ शांतपणे म्हणाला, "अगं, तू उगाच काळजी करतेयस. मी पाचवीत असल्यापासून हे सगळं पाहतोय. या वेळी कबूल आहे की मी एकटा होतो, पण मी minimum रिस्क घेतली होती. हा साप मुळात शांत स्वभावाचा असतो."
सावनी वैतागून म्हणाली, "तू पण ना सौरभ...!"

सौगंध राम की खाते है मंदिर वही बनाएँगे!

दिवस भरभर जात होते. १९९०-९१ ही वर्षं अनेक सामाजिक आणि राजकीय उलथापालथींची साक्ष देणारी ठरली. एकीकडे केंद्र सरकारने 'मंडल आयोग' लागू केला होता, तर दुसरीकडे 'राम जन्मभूमी आंदोलन' शिखरावर पोहोचलं होतं. या दोन्ही घटनांचा खोलवर परिणाम तत्कालीन समाजावर झाला होता.
विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या आवाहनानुसार, ३० ऑक्टोबर रोजी हजारो कारसेवक अयोध्येत पोहोचले. "परिंदा भी अयोध्या में पर नहीं मार सकेगा," अशी वल्गना उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. तरीही कारसेवकांनी विवादित ढाच्यापर्यंत मजल मारली. पोलिसांनी बळाचा वापर केला, गोळीबार झाला आणि त्यात काही कारसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. संपूर्ण देशात तणावाचं वातावरण होतं, पण नागपूर त्यामानाने शांत होतं. ३० ऑक्टोबरला देवोत्थान एकादशीचा (कार्तिकी एकादशी) मुहूर्त कारसेवेसाठी निवडला होता. शाळेला दिवाळीची सुट्टी होती, पण राणे सरांचा क्लास सुरू झाला होता.
त्या दिवशी क्लास संपल्यावर अखिल आणि सौरभ, सारंगकडे गेले. सारंगकडे उत्तम रेकॉर्ड प्लेयर होता आणि 'गीत रामायणा'च्या रेकॉर्ड्स होत्या. तेव्हाचा माहोलच असा होता की, अद्याप मिसरूडही न फुटलेल्या या शाळकरी पोरांनाही आपण कारसेवेला अयोध्येला जावं, असं वाटायचं.
सौरभ म्हणाला, "आज कारसेवा आहे. अयोध्येत काहीतरी मोठं घडतंय, पण आपल्याला अजून सविस्तर बातमी मिळालेली नाही. आजच्या दिवशी आपणही अयोध्येच्या दिशेने फुलं वाहिली पाहिजेत. सारंग, जरा गीत रामायण लाव बे मस्त!"
सारंगनी गीत रामायण लावलं. फक्त तो म्हणाला, “हा फूल emotional आहे”
प्रत्यक्ष श्री राम ऐकतात आहे…

स्वये श्री रामप्रभू ऐकती
शरयू तीरा वरी अयोध्या
राम जन्मला ग सखे

३ नोव्हेंबरला अयोध्येत परिस्थिती अधिक चिघळली होती. कोठारी बंधूंच्या बलिदानाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती (कोठारी बंधूंना त्यांच्या मुक्कामावरून बाहेर ओढून गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मुलायम सिहांच्या या कृत्याची त्या वेळी जनरल डायर च्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करण्यात अली होती). याच्या निषेधार्थ ५ नोव्हेंबर रोजी देशभर सत्याग्रह करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. नागपुरातील झाशी राणी चौक, आकाशवाणी चौक, बडकस चौक, प्रतापनगर चौकात इत्यादी ठिकाणी शांततापूर्ण आंदोलनाचं आयोजन केलं होतं. सौरभची आई या सत्याग्रहात भाग घेणार होती.
त्या दिवशी क्लासला आलेला सौरभ खूप शांत आणि काळजीत होता. सावनीने अखिलला विचारलं, तेव्हा त्याने तिला सगळी परिस्थिती सांगितली. सावनीच्या चेहऱ्यावरही काळजी उमटली. 'पोलीस काय करतील?' हाच विचार तिच्या मनात घोळत होता. क्लास सुटल्यावर अखिल आणि सौरभ प्रतापनगर चौकात पोहोचले. तो चौक माणसांनी गच्च भरला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे आणि घोषणांचा आवाज घुमत होता—

याचना नही अब रण होगा, संग्राम बडा भीषण होगा
सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएँगे
खून देंगे प्राण देंगे राम मंदिर लेके रहेंगे
जो राम का नही वो हमारे काम का नही
संभाजी का क्या संदेश, हिंदुओंक हिंदू देश

वातावरण तापलेलं होतं. सकाळी घरात ठरल्याप्रमाणे फक्त आईच सत्याग्रहात भाग घेणार होती. सौरभ गर्दीत आईला शोधत असतानाच तिथे सावनीही आली. ती सुद्धा लांबून सौरभलाच शोधत होती. सौरभला आई दिसली, तो धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "आई, मी पण सत्याग्रहात भाग घेतो!" पण आईने रामनामाचा जप करत त्याला निक्षून नकार दिला. आंदोलक रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी आंदोलकांना उचलून बसमध्ये भरण्यास सुरुवात केली.
सौरभच्या आईला पोलिसांनी अटक करून बसमध्ये बसवलं तेव्हा सौरभ कासावीस झाला. सावनी त्याच्याजवळ पोहोचली. तिने आधार म्हणून त्याचा खांदा थोपटला आणि शांत राहण्याची खूण केली. त्याचा एक हात सावनीने तर दुसरा हात अखिलने घट्ट धरून ठेवला होता. सौरभने स्वतःला सावरलं आणि दोघांनाही खुणेनेच हात सोडायला सांगितलं. त्याने जवळच्या पोलिसाला विचारलं, "यांना कुठे घेऊन चाललात?" पोलिसाने उत्तर दिलं, "टाकळी पोलीस लाईन."
थोड्याच वेळात चौक रिकामा झाला. सौरभचे वडीलही तिथे आले होते. ते सौरभला म्हणाले, "मी टाकळी पोलीस लाईनला जाऊन येतो." त्यांनी अखिलला सांगितलं, "अखिल, मी येईपर्यंत याच्यासोबत राहा." अखिल म्हणाला, "हो काका, मी आहे याच्यासोबत."
अखिलने सावनीला सांगितलं, "सावनी, तू आता घरी जा. पण मुख्य रस्त्याने न जाता आतल्या गल्लीतून जा."
सावनी म्हणाली, "हो, अखिल याला एकटं सोडू नकोस."
तिने सौरभकडे पाहून म्हटलं, "सौरभ, काही होणार नाही, काळजी नको करू. अच्छा!"
सौरभने विचारलं, "मी ठीक आहे सावनी. तू नीट जाशील ना? की आम्ही सोडायला येऊ?" सावनी म्हणाली, "नको, मी जाईन आतल्या बाजूने."
जाता जाता सावनीने मागे वळून पुन्हा एकदा हात उंचावून सौरभला पाहिलं आणि अच्छा म्हणत आपली सायकल घेऊन ती दिसेनाशी झाली. सौरभच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू आलं होतं. आईच्या काळजीसोबतच सावनीचा तो डोक्यावरून पांढरी ओढणी घेतलेला चेहरा त्याच्या मनातहोता. ती नजरेआड होईपर्यंत तो तिकडेच पाहत राहिला.
सावनीच्या मनात विचार आला, 'आज हळव्या सौरभचं दर्शन झालं. संवेदनशील तर तो आहेच, पण आज त्याचं हळवं रूपही कळलं. सौरभ खरोखर इतर मुलांपेक्षा वेगळा आहे.' तिच्याही डोळ्यांच्या कडा किंचित पाणवल्या आणि एक अनामिक भावना तिच्या चेहऱ्यावर उजळली. आज शब्दांशिवाय त्यांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्या होत्या!
दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सावनीने सौरभला पाहिलं, तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.
ती म्हणाली, "सौरभ, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंच आहे, पण तुझी आई आली ना रे घरी?"
सौरभने हसून सांगितलं, "हो, काल ५ वाजता आई घरी होती."
सावनी त्याला चिडवत म्हणाली, "मग! काल बाळ एकदम आईच्या कुशीत शिरलं असेल ना?" अखिलने साथ दिली, "हो न! काल हा एकदम बाळच झाला होता."
सौरभने दोघांनाही "हट्ट!" करत गप्प केलं.
सगळे हसले.
सौरभला आनंदात पाहून सावनीला खूप बरं वाटलं. तिचं लक्ष त्याच्या गालावर पडणाऱ्या खळीकडे गेलं आणि पुन्हा एकदा दोघांची नजरा नजर झाली. त्या दिवशी शाळेत जाताना अखिलने गौरव आणि सारंगला सांगितलं, "देसाईंची फूल दांडी उडाली आहे... सा-व-नी!"
सगळ्यांनी सौरभची खूप खेचली. त्याच दिवशी शाळेत 'स्नेहसंमेलना'ची तारीख जाहीर झाली—डिसेंबरचा शेवटचा आठवडा. शेवडे सरांनी मयंक आणि सौरभला निरोप पाठवला, "शाळा सुटल्यावर ३०५ मध्ये मला भेटा."

स्नेहसंमेलन: मिले सूर मेरा तुम्हारा

ठरल्या वेळी मयंक आणि सौरभ शेवडे सरांना भेटले. सर नेहमीप्रमाणे थट्टेच्या सुरात म्हणाले, "कलाकार कुलोत्पन्न, कलाकारांचे शिरोमणी मयंक आ रहे हैं! या वाघोबा, या बसा. जरा दोन मिनिटं द्या हं."
सरांनी त्यांचं काम संपवलं आणि आपली खुर्ची सौरभ आणि मयंकच्या जवळ ओढली. "तुम्हाला माहीतच आहे की आपल्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन जवळ आलंय. त्यात एक गाण्याचा कार्यक्रम करायचा विचार आहे. पण तुम्ही यंदा दहावीला आहात, हेही मला ठाऊक आहे. मला तुमच्याकडून खूप मोठं काही नकोय, पण पाच ते सात मिनिटांचं काहीतरी छान बसवू शकाल का? मागच्या वर्षी सहलीला तुम्ही जसं केलं होतं, तसंच काहीतरी. पाच मिनिटं खूप झाली, जास्तीत जास्त सात. एक लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट ती जेव्हा सर्वोच्च शिखरावर असते, तिथेच ती सोडून द्यावी. गाण्याची मैफल सुद्धा कळसाला असतानाच संपवावी, असा संकेत आहे. लोकांना वाटलं पाहिजे की अरे, इतक्यात का संपलं? Let them remember it for years to come. आधी घरी विचारून घ्या, कारण तुम्हाला दोन-तीनदा तरी तालमीसाठी यावं लागेल. घरचे हो म्हणाले, तरच यात भाग घ्या."
मयंक म्हणाला, "ठीक आहे सर, वेळेचं काही नाही, आम्ही घरी विचारतो. पण आम्हाला पलीकडची 307 नंबरची खोली मिळू शकेल का? त्यातली अडगळ बाजूला करून आम्ही तिथे सराव करत जाऊ. शाळा सुटली की इथेच पाऊण-एक तास सराव केला की आमचा वेळही फुकट जाणार नाही."
सरांनी संमती दिली, "गुड आयडिया! मी सांगतो कोणाला तरी, 307 मिळायला हरकत नाही."
सावनी आणि मुग्धानेही गाण्यासाठी आपली नावं दिली होती. मुलांनी घरी विचारलं, तेव्हा सुरुवातीला घरून नकारच मिळाला. पण अभ्यास सांभाळून हे सगळं करू, असं आश्वासन दिल्यावर शेवटी एकदाचं शिक्कामोर्तब झालं.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मयंक आणि सौरभने त्यांना काय सादर करायचं आहे, याची पूर्ण आखणी केली.
मयंक म्हणाला, "अबे, आपण थोडं काहीतरी वेगळं करायचं का?"
सौरभने विचारलं, "म्हणजे नक्की काय?"
मयंक म्हणाला, "नेहमीसारखी गाणी न घेता, काही लोकप्रिय जाहिरातींची गाणी घेतली तर?" सौरभ उत्साहाने म्हणाला, "अरे, माझ्या मनातलंच बोललास तू!"
त्यांनी 'मिले सूर मेरा तुम्हारा' (फक्त हिंदी भाग),
'पूरब से सूर्य उगा',
'टायटन'ची ट्यून (बासरी आणि की-बोर्डवर) आणि
'अजंटा watches' ची जाहिरात...
असं सगळं मिळून साधारण सहा मिनिटांचा एक पीस बसवला.
एक दिवस त्यांनी शाळा सुटल्यावर मुग्धा आणि सावनीला 307 नंबरच्या खोलीत बोलावलं आणि तयार केलेला पीस ऐकवला. सावनी आणि मुग्धाला तो प्रचंड आवडला. मुग्धाने टाळ्या वाजवल्या, तेव्हा तिने पाहिलं की सावनी कुठल्यातरी शून्यात हरवली आहे. टाळ्यांच्या आवाजाने ती भानावर आली.
सावनी म्हणाली , "अरे लोक पागल होतील पागल, खत्रा पागल. नुसता खतरनाक माहोल होईल!"
सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
सावनी “भैताडा सारखे काय पाहून राहिले?”
त्यावर मयंक म्हणाला, "अबे, ही आता पूर्ण १०१ टक्के नागपूरकर झाली आहे."
सावनी हसून म्हणाली, "मग!"
हे संगीत ऐकून बाहेरून डोकावणारे इतर चार-पाच विद्यार्थीही म्हणाले, "मस्त जमलंय!"
मयंक आणि सौरभने एक कल्पना मांडली, "'मिले सूर मेरा तुम्हारा' मध्ये 'सूर की नदियां...' हा जो भाग आहे, तो तुम्ही गाणार का?" दोघींनी तो भाग बसवला आणि चार-पाच दिवसांनी पुन्हा गाऊन पाहिला. पण मुग्धा स्पष्टवक्ती होती, ती म्हणाली, "अरे, आमच्या आवाजापेक्षा तुम्ही जे Instrumental बसवलंय, तेच जास्त मस्त वाटतंय. काही बदलू नका, एकदा सरांना ऐकवून बघू."
एका संध्याकाळी सरांच्या उपस्थितीत त्यांनी आपलं सादरीकरण केलं. सर डोळे मिटून ऐकत होते, त्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. गाणं संपल्यावर सर साशंकतेने म्हणाले, "आहे छान, पण... सगळ्यांना हे आवडेल का?" तिथे जमलेल्या इतर विद्यार्थ्यांना मात्र ते खूपच आवडलं होतं. सर काय म्हणतात, याकडे सर्वांचे कान लागले होते. मयंक म्हणाला, "सर, आम्हाला तर हे खूप आवडलंय आणि सावनी-मुग्धालाही हे ऐकायला छान वाटतंय." सरांनी समोरच्या गर्दीला विचारलं, "का रे, तुम्हाला आवडलं का हे?" समोरून एकच जोरात "हो!" असा आवाज आला. सर हसून म्हणाले, "झालं तर मग, माझीही काही हरकत नाही."
मयंकने सावनी आणि मुग्धाला खूण केली. त्यांनी तो गायनाचा भागही ऐकवला. सरांनी पुन्हा मत विचारलं, तेव्हा हातांची संख्या कमी होती. सर प्रेमाने म्हणाले, "सावनी, मुग्धा, तुम्ही नाराज होऊ नका, पण मलाही हे फक्त वाद्यांवरच जास्त आवडलंय." मुग्धा म्हणाली, "सर, मी तर यांना आधीच सांगितलं होतं की Instrumental जास्त उठावदार वाटतंय."
सर म्हणाले, "मयंक, सौरभ, तुमची जोडी मस्त जमली आहे. काहीतरी नवीन विचार करण्याची तुमची ही पद्धत मला खूप आवडली. जोडी मजबूत आहे तुमची!"
त्यानंतर मयंक क्लाससाठी घाईघाईने निघाला. मुग्धालाही लवकर निघायचं होतं त्यामुळे तीच गाण होताच ती ही निघाली. सावनीचं गाणं ऐकण्यासाठी सौरभ तिथेच थांबला होता. सराव संपल्यावर दोघंही सोबत जिना उतरू लागले.
सौरभ म्हणाला, "सावनी, मस्त होतंय गाणं. मुळात तुझा आवाजच खूप गोड आहे."
सावनी थोडी ओशाळली आणि म्हणाली, "Thank you!"
सौरभने सहज विचारलं, "अभ्यास कसा चाललाय?"
सावनी म्हणाली, "चांगला सुरू आहे."
सौरभ म्हणाला, "माझाही. मुख्य म्हणजे यंदा गणित चांगलं जमतंय, फक्त संस्कृतचं टेंशन आहे." सावनीने विचारलं, "संस्कृतचं काय?"
सौरभ म्हणाला, "ती सुभाषितं पाठ करणं आणि एकूणच संस्कृत मला फारसं आवडत नाही." सावनीने त्याला काही सोप्या क्लृप्त्या सांगितल्या. दोघंही वेळेचं भान विसरून बोलत उभे राहिले. सावनी दचकून म्हणाली, "अरे, किती उशीर झाला! आई ओरडणार आता, अंधारही पडलाय."
सौरभ म्हणाला, "चल, मी येतो तुला घरापर्यंत सोडायला. मेन रोड सोडला की पुढे अंधार असतो आणि रस्ताही ओसाड आहे."
सावनी म्हणाली, "नको रे, जाईन मी. तुला घरी जायला उशीर होईल."
सौरभच्या घराची बाजू शाळेच्या समोरच्या बाजूला होती, तर सावनीचं घर शाळेच्या मागच्या बाजूला होतं.
सौरभने आग्रह धरला, "चालेल एक दिवस."
सौरभ तिला सोडायला निघाला. सावनीला तो सोडायला आला, यापेक्षाही त्याच्यातील Sense of Responsibility (जबाबदारीची जाणीव) जास्त भावली. घराच्या थोडं अलीकडे ते थांबले. सावनी म्हणाली, "आता डिसेंबर संपेलच दोन आठवड्यांत. मग जानेवारी, फेब्रुवारीत प्रिलिम्स आणि मार्चमध्ये बोर्डाची परीक्षा. किती लवकर संपलं रे हे वर्ष! आणि मी नागपूरला येऊनही दोन वर्षं झाली. My God!"
सौरभ म्हणाला, "हो, दिवस खूप पटकन गेले. पुढे काय करायचं ठरवलंयस?"
सावनी म्हणाली, "सौरभ, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे, पण आता उशीर झालाय आणि असं रस्त्यावर बोलणं योग्य नाही. उद्या क्लासमध्ये वेळ मिळाला तर बोलू. पण तुझी बासरी... तिचे स्वर अजूनही कानात घुमतायत, “मिले सूर मेरा तुम्हारा...तो सूर बने हमारा"
सौरभ चा चेहरा उजळला, तो म्हणाला, "चल, आता निघ तू, मीही निघतो."
दहावीचं वर्ष संपत आलं होतं. उरलेले हे काही महिने आणि हे सूर थोडेच दिवसांचे सोबती आहेत की काय, अशी एक शंकेची पाल दोघांच्याही मनात चुकचुकली.
फाटकापर्यंत पोचल्यावर सावनी ने मागे वाळून पाहिल तेव्हा तिला पाठमोरा सौरभ मुख्य रस्त्यावर वळताना दिसला. आपल्याच खुमारीत, सौरभचं बोलण, त्याची ती खळी आठवत सावनी घरात गेली.
घरात पोचल्यावर सावनीची आई म्हणाली “अहो सावनी मॅडम, कुठे होतात इतक्या वेळ?”
सावनी म्हणाली, “कुठे नाहीग आई, आज थोडा उशीर झाला, पण आई सौरभ आणि मयंकनी इतकं मस्त बसवल आहे न instrumental peace.”
सावनीची आई, “सौरभ म्हणजे तो एकदा आपल्याला बर्डीवर भेटला होता तो, केवढा लाजला होता तो. मयंक म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात ज्याच्या घरी गेला होतात तो? या दोघांनी काहीतरी मागच्या वर्षी सहलीत पण वाजवलं होतं न?मला आठवत तू काही तरी सांगितलं होतं बासरी आणि keyboard”
सावनी क्षणाची ही उसंत न घेता उत्तरली “Aai you are correct, तेच दोघ. They are so great. सौरभ तर इतका मस्त बासरी वाजवतो.”
आई, “चल लवकर हात पाय तोंड धून देवाला नमस्कार कर, जेवायला बसू. आज बाबा पण आहेत, पोचतात आहे थोड्या वेळात आणि जरा अभ्यासाकडे लक्ष द्या. तिथेही सूर लागू द्या”
सावनी ओरडत, “आई बाबा येतात आहे? किती दिवसांनी. मी पटकन आले. आणि regarding अभ्यास, अभ्यास मागे पडला आहे का माझा? I am scoring better in all subjects than last year.”

क्रमश:

-अमोल दांडेकर

पुढच्या भागा: आघात

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users