IPL चा हंगाम सुरू झाला की चाहत्यांमध्ये उत्साह संचारतो आणि सगळे या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत
असतात. IPL मधील “PL” या अक्षरांनी मला एक गमतीशीर विचार सुचला आणि तोच या लेखातून
मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
पु. ल. (PL) हे महाराष्ट्रातील अतिशय लाडके साहित्यिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या विनोदी लेखनामुळे त्यांना
आजही प्रचंड चाहतावर्ग लाभला आहे. रोजच्या आयुष्यातील वेगवेगळ्या माणसांचं त्यांनी इतक्या रम्य
आणि विनोदी पद्धतीने व्यक्तिचित्रण केले की ती पात्रे अक्षरशः अजरामर झाली.
त्यांच्या लिखाणातील अनेक व्यक्तिरेखा आपण प्रेमाने आठवतो आणि त्यांच्या पुस्तकांकडे किंवा त्यांच्या
कथनांकडे पुन्हा पुन्हा वळतो. आमची पिढी तर या व्यक्तिरेखांना अगदी आपल्या शेजारच्यांसारखी
ओळखत मोठी झाली. त्यात रंगतदार रावसाहेब अहेत, मिश्किल कोकणातला अंतू बर्वा अहे, आणि अशा
ईतर कितीतरी व्यक्तिरेखा आहेत ज्या त्यांनी आपल्या लेखणीतून जिवंत उभ्या केल्या.
मग मला वाटले — जर IPL साठी पु. ल. यांच्या व्यक्तिरेखांची एखादी टीम बनवायची झाली तर ती कशी
असेल? म्हणजे “PL की IPL टीम”.
आजकाल गावस्कर, अश्विन आणि इतर अनेक पुर्व क्रिकेटपटू, कोणत्याही स्पर्धेपूर्वी, त्यांच्या आवडीच्या
सर्वोत्तम अकराची निवड जाहीर करतात. मग आपणही पु. ल. यांच्या व्यक्तिरेखांमधून एक संघ का तयार
करू नये? तो संघ कसा असेल? अर्थात पु. ल. यांच्या साहित्याचा अधिक अभ्यास असलेले काही लोक,
कदाचित वेगळी टीम निवडतीलही. असो, थोडी गंमत!
अशी आहे— मेरी PL की IPL टीम.
या संघाचा कर्णधार म्हणून मला “तुझे आहे तुजपाशी” या नाटकातील काकाजीं शिवाय दुसरे कोणी सुचत
नाही. प्रभावी व्यक्तिमत्त्व, सर्वांकडून आदर मिळवणारे नेतृत्व आणि आक्रमक पण मनोरंजक
बुद्धिबळातिल डावपेच — T20 क्रिकेटसाठी अगदी योग्य! शिवाय ते यष्टीरक्षणही करू शकतील, त्यामुळे
जवळून संपूर्ण खेळावर लक्ष ठेवता येईल.पटवडी सारखे ते राजबिंडे ही आहेत.
पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात करण्यासाठी नाथा कामत आणि रावसाहेब ही जोडी उत्तम ठरेल. नाथा
कामत हा स्टायलिश आणि मनगटी (wristy) फलंदाज असेल, त्याच व्यक्तिमत्व अगदी तरुणींनवर चटकन
भाळनार, अगदी शुभमन किंवा ईशान सारखे आक्रमक. तर रावसाहेब हे आजच्या काळातील उच्च स्ट्राईक-
रेटचा धडाकेबाज ओपनर ठरतील. आपल्या फटकेबाजीने ते कोणत्याही गोलंदाजीवर तुटून पडू शकतात.
अगदी संजु किंवा रोहित सारखे निःस्वार्थी संघासाठी खेळणारे.
वरच्या फळीत तिसऱ्या क्रमांकावर नंदा प्रधान. भारावून टाकणार व्यतीमत्व. कुठल्याही परिस्थितीत
आत्मविश्वासन स्थिरता देणारा फलंदाज म्हणून योग्य ठरेल. विशेषतः सलामीचे बल्लेबाज पावर प्ले मध्ये
लवकर बाद झाले तर तो खंबीरपणे विराट सारखा शेवटपर्यंत एकटाच लढेल.
मधल्या फळीमध्ये, क्रमांक चारवर चितळे मास्तर योग्य ठरतील. त्यांना उप कर्णधार ही नेमुया. ते कडक पण
विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक होते. त्यामुळे संघाला सावरून धरण्यासाठी ते अगदी योग्य आहेत.
संघातील खेळाडू पण, त्यांना जसे विद्यार्थी आदर देतात, तसेच पाहतील. त्यांच्या नंतर काकाजी येतील. हे
दोघे संघाचा अनुभवी कणा ठरतील.
सहाव्या क्रमांकावर मी नारायणची निवड करेन. तो नेमका करतो काय, हे कुणालाच ठाऊक नसते, पण तो
एक उत्तम ‘युटिलिटी प्लेयर’ ठरेल — अगदी रिंकू सारखा. कोणत्याही परिस्थितीत पाठवला तरी तो काहीतरी
करामत करून दाखवेलच आणि कुठल्याही जागी क्षेत्ररक्षणातही तो चपळ राहील.
दोन अष्टपैलू खेळाडूंमध्ये पहिले असतील पेस्टन काका — वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी
करणारे मजबूत आणि कणखर. अत्यंत उत्साही खेळाडू. दुसरा असेल अंतू बर्वा. तो परिस्थितीला अगदी
आपल्या सोयीनुसार “फिरवू” शकतो. मधल्या षटकांमध्ये धूर्त फिरकी टाकून धावा रोखणारा आणि
खालच्या फळीत उपयोगी फलंदाजही ठरेल — म्हणजेच एकदम कंजूष गोलंदाज आणि strike rotate
करणारा फलंदाज.
संघातील गूढ फिरकीपटू (mystery spinner) असेल सखाराम गटणे. दिसायला साधा, किरकोळ, पण
पद्धतशीर आणि थोड्या अनोख्या शैलीत गोलंदाजी करणारा. कधीही एखाद्या आश्चर्यकारक चेंडूने
फलंदाजाला गारद करू शकणारा.
दहाव्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज म्हणून हरि तात्या. कधी कधी थोडे अनियमित आणि महागडे ठरतील,
पण त्यांच्यात प्रचंड धाडस आहे. दबावाखालीही ते कधी घाबरत नाहीत. आणि शेवटी अकरावा, सर्व संघांना
धडकी भरवणारा सर्वात भयानक वेगवान गोलंदाज — नामू परिट. त्याच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच त्याची
गोलंदाजीही तुफानी. बुमरा सारखा, सामना जिंकून देण्याची ताकद असलेला खेळाडू.
PL की IPL टीम- काकाजी (कर्णधार व यष्टीरक्षक), नाथा कामत, रावसाहेब, नंदा प्रधान, चितळे मास्तर (उप
कर्णधार), नारायण, पेस्टन काका, अंतू बर्वा, सखाराम गटणे, हरि तात्या, नामू परिट.
तिसरा umpire आचार्य यांना नेमता येईल. तर Commentary box मध्ये बगुनाना, उस्मान शेठ, मधू मलुश्ठे व
ईतर प्रतिष्ठित मंडळी व त्यांच्या बरोबर पापण्यांची उगाच पिटपिट करणारी सुबक ठेंगणी.
तर कशी वाटली माझी पुलंची ची IPL टीम. तुम्ही कुणाला निवडाल? जरुर कळवा.
Uday Virkud
March 2026
(No subject)