लाल रेषा - भाग ४

Submitted by नितनवे on 31 March, 2026 - 11:25

लाल रेषा - भाग ३

पूर्वभाग

चकमकीनंतर कॅम्पमध्ये अस्वस्थ शांतता पसरते, आणि हिडमे नावाचा गावकरी आतून माहिती लीक होत असल्याचा इशारा देतो. टीम जाणूनबुजून निष्क्रिय असल्याचा भास निर्माण करते, पण शत्रू आधीच त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचं स्पष्ट होतं. रिजजवळ सापळा रचून शिंदेला जिवंत पकडलं जातं, तर जाधव जखमी अवस्थेत सापडतो. शत्रूचा हेतू फक्त हल्ला नसून मानसिक दबाव आणि नियंत्रण निर्माण करणं आहे, हे उघड होतं. आता ही केवळ शोधमोहीम नसून—चाल आणि प्रत्युत्तर यांचा जीवघेणा खेळ सुरू झाला आहे.
*************************************************************************************************************************

लाल रेषा - भाग ४ - थिजलेला माग

जाधवला उचलून आम्ही परत कॅम्पच्या दिशेने निघालो. आमची पावलं ओल्या मातीवर अलगद पडत होती. जाधवचा भार खांद्यावर जाणवत होता, पण त्याहून जड होतं ते वातावरण.

त्याचा श्वास अडखळत होता—कधी खोल, कधी तुटक. त्या आवाजात वेदना होती, पण त्यातच एक भीतीही मिसळलेली होती.

आजूबाजूला काहीच हलत नव्हतं. पानं स्थिर. वारा थांबलेला. रात्र जणू श्वास रोखून उभी.

मागे कुणीतरी चालत आहे का, ही जाणीव वारंवार डोकं वर काढत होती. पण मागे वळून पाहण्याची हिंमत कोणी करत नव्हतं.

कारण सगळ्यांना ठाऊक होतं—कधी कधी काहीच दिसत नाही, याचा अर्थ तिथे काहीच नाही असा नसतो.

कॅम्पचे दिवे लांबून दिसायला लागले तेव्हा एक मनाला दिलासा जाणवला, पण तोही पूर्ण नव्हता. आम्ही सीमारेषा ओलांडली, आणि आतल्या जागेत पाऊल ठेवलं.

तेवढ्यात हालचाल सुरू झाली.

“मेडिकल!” कुणीतरी ओरडलं.

पांढऱ्या गणवेशातील मेडिकल टीम धावत आली. त्यांनी जाधवला काळजीपूर्वक खाली घेतलं. पट्ट्या, औषधं, आदेश सगळं एकाच वेळी घडत होतं.

जाधव शुद्धीवर होता. पण त्याचे शब्द तुटत होते. ओठ हलत होते, आवाज बाहेर पडत नव्हता.

त्याने डोळे उघडले आणि एका क्षणासाठी तो पुन्हा तिथेच गेला होता. त्या रिजवर. त्या अंधारात.

मी जाधवच्या खाटेजवळ जाऊन थांबलो. खोलीत औषधांचा तीक्ष्ण वास भरून राहिला होता. मंद प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता—सुजलेला, फाटलेला.

ओठ फुटलेले, गालावर निळसर ठसे, कपाळावर सुकलेल्या रक्ताच्या रेघा. त्याच्या श्वासात वेदना मिसळलेली होती. प्रत्येक श्वास जणू प्रयत्न करून घेतला जात होता.

मी काही क्षण काही बोललो नाही. “शिंदे कुठे आहे?” मी शेवटी विचारलं.

जाधवने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पापण्या जड झाल्या होत्या. त्याने छताकडे पाहिलं, जणू तिथून तो पुन्हा त्या अंधारात जात होता.

त्याच्या गालाची एक नस हलकीशी थरथरली.

“त्यांनी…” तो पुटपुटला.

आवाज खूपच क्षीण होता.

त्याने ओठ हलवले, पण शब्द लगेच बाहेर आले नाहीत.

मी थोडा पुढे झुकलो.

“आवाजच केला नाही…” तो म्हणाला, श्वास अडखळत, “गोळी नाही… काहीच नाही…”

त्याच्या हातावर सूज होती. बोटं नीट बंद होत नव्हती.

“मागून पकडलं… खाली पाडलं…”

तो थोडा थांबला. वेदना स्पष्ट दिसत होती.

“आणि… मग…”

त्याने डोळे घट्ट मिटले.

“काठीने, बुटांनी, बंदुकीच्या दस्ताने, ते माझ्यावर अक्षरश: तुटून पडले…”

एवढं बोलताना त्याचा श्वास जड झाला.

“मग… शिंदे…” मी शांतपणे विचारलं, “काय केलं त्यांनी?”

जाधवने हळूच मान हलवली.

“त्याला वेगळं केलं आणि फरफटत नेलं… गोळी नाही… काहीच नाही… फक्त ओढून नेलं... अंधारात…”

त्याच्या आवाजात भीती होती. खोलीत काही क्षण शांतता पसरली. पाटील जवळ उभा होता. त्याच्या मुठी घट्ट आवळलेल्या.

मी सरळ उभा राहिलो. जाधवकडे पाहिलं. तो अजूनही तिथून पूर्णपणे बाहेर आलेला नव्हता.

मी काही न बोलता बाहेर पडलो. रात्रीचा गारवा चेहऱ्यावर आला.

पाटील माझ्या मागे आला. “सर…” त्याच्या आवाजात ताण होता, “त्याला त्यांनी जिवंत नेलंय…”

मी मान हलवली “हो,” मी शांतपणे म्हणालो, “आणि तेच सगळ्यात धोकादायक आहे.”

तो गोंधळला. “म्हणजे?”

मी त्याच्याकडे वळलो. “मारायचं असतं तर तिथेच संपवलं असतं,” मी म्हणालो.

“पण त्यांनी वेळ घेतला, त्यांनी माणूस निवडला आणि मग—त्याला जिवंत नेलं.”

पाटीलच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्याला अर्थ उमजत होता. “ते आपल्याला बाहेर खेचणार आहेत…” तो हळू आवाजात म्हणाला.

मी शांतपणे मान हलवली. “किंवा, आपल्याला त्यांच्या खेळात ओढणार आहेत.”

कॅम्पमध्ये हालचाल सुरू झाली होती, पण ती गडबडीची नव्हती. प्रत्येक नजर सावध होती. प्रत्येक जण आता जवानासारखा नाही, तर एखाद्या सावजासारखा विचार करत होता.

गोळीबाराला उत्तर देणं सोपं असतं, पण जे दिसत नाही, त्याच्याशी कसं लढणार?

मी नकाश्यासमोर उभा राहिलो. टेबलावर पसरलेल्या त्या कागदावरच्या रेषा आता फक्त रेषा राहिल्या नव्हत्या.

त्या जागा होत्या. अनुभवलेल्या. जिवंत... टेकड्या, तो नाला, ती दाट झाडी.

मी डोळे काही क्षण मिटले आणि ती संपूर्ण जागा मनात उभी केली. शिंदे जिथे पकडला गेला, ती जागा खूप विचार करून निवडलेली होती.

visibility कमी, आवाज control करता येईल अशी, आणि जवळच उतार... जिथून कुणालाही पटकन खाली ओढून नेता येईल.

मी नकाशावर बोट फिरवलं. “ते मुख्य वाटेने आत गेले नसतील,” मी ठामपणे म्हणालो. “ते सरळ जाणार नाहीत. त्यांनी मार्ग बदलले असणार.

"मग सर्च ऑपरेशन?" पाटीलने विचारलं. "अंधारात नाही," मी स्पष्ट केलं.

तो थोडा जवळ आला, "पण सर, उशीर झाला तर—".

"उशीर आणि घाई, दोन्ही जीवघेणे आहेत," मी त्याला थांबवलं.

"आपण नक्की कुठे जातोय हे कळल्याशिवाय पाऊल टाकलं, तर आपण त्यांच्यासाठी दुसरा 'शिंदे' ठरू."

रात्री उशिरा कॅम्पच्या सीमजवळील पहारा अधिक कडक करण्यात आला.

मी एकटाच तारांच्या कुंपणापाशी येऊन उभा राहिलो. समोर जंगल होतं. अंधार दाट होता, पण तो रिकामा नव्हता.

तो थरावर थर साचलेला वाटत होता—जणू आत कुठेतरी काहीतरी हालचाल आहे, जी दिसत नाही, पण जाणवते.

मी त्या अंधाराकडे पाहत राहिलो. डोक्यात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता...त्यांनी शिंदेला जिवंत का नेलं? माहितीसाठी? दबावासाठी? की—तो फक्त एक संदेश होता?

पाठीमागे हलक्या पावलांचा आवाज आला. पाटील माझ्या शेजारी येऊन उभा राहिला.

आम्ही काही वेळ काहीच बोललो नाही. दोघांची नजर समोरच्या त्या काळोखातच अडकली होती.

“सर,” तो शेवटी हळू आवाजात म्हणाला, “आपण काहीच हालचाल केली नाही तर?”

मी नजर न वळवता उत्तर दिलं, “आपण काहीच करत नाही आहोत… असं त्यांना वाटू दे.”

तो काही बोलला नाही.

मी पुढे म्हणालो, “रात्र त्यांची आहे. अंधार त्यांचा आहे. पण प्रकाश आपला आहे.”

मी थोडा थांबलो. “सकाळ होऊ दे. प्रकाशात खुणा दिसतात—पायवाटा, ओढल्याच्या रेघा, तुटलेली पानं… सगळं बोलायला लागतं.”

पाटीलने मान हलवली. मग तो पुन्हा म्हणाला, यावेळी आवाजात स्पष्ट कातरता होती—“आणि शिंदे?”

मी काही क्षण काहीच बोललो नाही. नजर त्या अंधारातच रोखून ठेवली.

मग हळू आवाजात म्हणालो,“तो जिवंत आहे… तोपर्यंत हा खेळ चालू आहे.”

रात्र हळूहळू पुढे सरकत होती. वेळ जणू पावलांवर चालत नव्हता...तो ओढला जात होता.

कुठेतरी दूर झाडांची हलकी सळसळ झाली, जणू एखादं पान स्वतःच हललं… आणि मग पुन्हा सगळं थांबलं.

कॅम्पमध्ये कुणी झोपलं नव्हतं. कोणी डोळे मिटले असतील, पण झोप नव्हती.

प्रत्येकजण आपापल्या जागी स्थिर होता...बंकरमध्ये, टॉवरवर, सावल्यांच्या आड. बंदुकीवरची पकड सैल नव्हती, आणि कान प्रत्येक हलक्या आवाजाकडे सजग होते.

कॅम्पच्या बाहेर त्या काळोखाच्या खोल थरांमध्ये काहीतरी चालू होतं. नजरेला न दिसणारं. आवाजात न मावणारं. आणि तरीही असलेलं.

त्या अंधाराच्या पोटात, कोणीतरी शिंदेला घेऊन पुढे सरकत होतं. हळू. निशब्द. निश्चित. मागे एकही स्पष्ट खूण न ठेवता.

जणू ही हालचाल आधीच ठरलेली होती. जणू प्रत्येक वळण, प्रत्येक सावली, प्रत्येक थांबा...सगळं आधीपासून आखलेलं होतं.

*************************************************************************************************************************

दिवस उजाडला, पण त्याने प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. उलट, रात्री जे काही धूसर होतं, ते आता अधिक स्पष्ट आणि अधिक भयाण दिसायला लागलं.

अंधारात जे लपलं होतं, ते उजेडात उघडं पडलं होतं; पण त्याने दिलासा दिला नाही. कारण आता प्रत्येक खूण दिसत होती… आणि प्रत्येक खुणेला काहीतरी सांगायचं होतं.

आता तो सगळा नकाशा आमच्यासमोर स्पष्ट होता. आम्ही ‘रिज’च्या दिशेने निघालो.

सकाळचा प्रकाश झाडांच्या पानांतून खाली झिरपत होता, पण तो सरळ नव्हता—तुटक, विस्कटलेला. काही ठिकाणी उजेड, काही ठिकाणी अजूनही अंधुक सावल्या. त्या सावल्यांमध्ये अजूनही रात्रीचा अंश अडकून बसला होता.

प्रत्येक पाऊल मोजून टाकलं जात होतं. जमिनीवर पाय ठेवण्याआधी नजर जात होती—मातीचा रंग, पानांची स्थिती, एखादी हलकीशी हालचाल.

इथे घाईला जागा नव्हती. पण थांबणं तेही शक्य नव्हतं. कारण थांबणं म्हणजे स्वतःला उघडं करणं. आम्ही पुढे सरकत राहिलो.

जिथे जाधव सापडला होता ती जागा आता वेगळी दिसत होती. माती विस्कटलेली होती. ओढल्याच्या खुणा अजूनही दिसत होत्या—सुकलेल्या, पण स्पष्ट.

काही पानं चिरडलेली, काही फांद्या तुटलेल्या. जमीन बोलत होती. आणि आम्ही ऐकत होतो.

त्या जागेत उभं राहिल्यावर एक गोष्ट जाणवत होती, काल इथे जे घडलं, ते अचानक नव्हतं. ते आखलेलं होतं.

प्रत्येक हालचाल, प्रत्येक दिशा सगळं आधीच ठरलेलं.

मी त्या खुणांकडे पाहत राहिलो. आणि हळूहळू त्या सगळ्या रेषा जोडल्या जाऊ लागल्या.

त्या फक्त पावलांच्या खुणा नव्हत्या. त्या एका मार्गाकडे नेत होत्या. जिथे शिंदेला घेऊन गेले होते.

मी खाली वाकलो. माती अजूनही सैल होती—वरून थोडी कोरडी भासणारी, पण आतून हलवलेली.

ओढल्याच्या खुणा स्पष्ट होत्या. सुरुवातीला त्या सरळ पुढे गेल्या होत्या—जणू घाईत. पण काही अंतरावर अचानक त्यांचा मार्ग वळला होता.

पाटील माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याने त्या खुणांकडे बारकाईने पाहिलं.

“सरळ गेले नाहीत,” तो कुजबुजला.

मी पुन्हा खुणा नीट पाहिल्या—जिथे दिशा बदलली होती, तिथं माती जास्त विस्कटलेली होती. एखाद्याला वळवताना जास्त जोर लावला गेला होता, हे स्पष्ट दिसत होतं.

“आपल्यामागे कोणी येतंय का, हे ते तपासत होते,” मी शांतपणे म्हणालो.

थोडं पुढे गेल्यावर खुणा दोन फाट्यांत विभागल्या. एक वाट सरळ उताराकडे खाली जात होती—घाईत धावत गेल्यासारखी. दुसरी डावीकडे घनदाट झाडीत.

पाटील तिथेच थबकला. त्याची नजर दोन्ही वाटांवर फिरली. “दोन गट झालेत की काय?” त्याने विचारलं.

मी काही क्षण उत्तर दिलं नाही. दोन्ही दिशेकडचं निरीक्षण केलं. उताराकडच्या वाटेवर पायांचे ठसे जास्त खोल होते—जणू मुद्दाम जोर देऊन टाकलेले.

पण ओढल्याच्या खुणा तिथं कमी होत्या. डावीकडच्या वाटेवर खुणा हलक्या होत्या, पण सलग. फांद्या आतल्या बाजूला वाकलेल्या. काही पानं उलटी पडलेली.

जणू हालचाल कमी दिसावी म्हणून सावधगिरी बाळगली होती.

मी हळू आवाजात म्हणालो,“नाही… गट एकच आहे.”

पाटील माझ्याकडे पाहत राहिला.

“पण आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी ही खेळी खेळली आहे.”

तो काही बोलला नाही. कदाचित त्याला समजलं होतं.

मी डावीकडच्या झाडीकडे पाहिलं. ती वाट दिसत नव्हती ती फक्त जाणवत होती. “इथून गेलेत,” मी ठामपणे म्हणालो. आम्ही डावीकडची वाट धरली.

जसजसे आम्ही जंगलाच्या उदरात शिरलो, तसा प्रकाश क्षीण होत गेला. झाडांची गर्दी वाढली, हवेतला जडपणा वाढला आणि प्रत्येक हालचाल जणू भिंगातून पाहिल्यासारखी स्पष्ट जाणवू लागली.

काही अंतरावर झुडपांत अडकलेला एक कपड्याचा तुकडा चमकला. मी हाताने इशारा केला आणि सगळी टीम एका क्षणात जागीच थिजली.

मी सावकाश पुढे सरकलो. झुडपं अलगद बाजूला करत तो तुकडा उचलला. तो शिंदेच्या गणवेशाचा भाग होता.

मातीने माखलेला. एका कडेला फाटलेला. कापडाचा धागा अजूनही ताणलेला. मी काही क्षण तो हातात धरून पाहत राहिलो.

पाटील माझ्या शेजारी येऊन थांबला. “जाणीवपूर्वक सोडला असेल?” त्याने हळू आवाजात विचारलं.

मी उत्तर देण्याआधी त्या कापडाकडे पुन्हा पाहिलं.

“कदाचित…” मी म्हणालो, “किंवा ओढताना घासल्यामुळे फाटला असेल.” मी तो तुकडा सावधपणे खिशात ठेवला.

आम्ही पुढे सरकलो. जंगल आणखी दाट होत गेलं. प्रकाश अजून कमी झाला. हवा अजून जड झाली.

काही अंतरावर पुन्हा माती विस्कटलेली दिसली. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं.

खुणा स्पष्ट नव्हत्या. पावलांचे ठसे अधूनमधून दिसत होते, पण सलग नव्हते.

ओढल्याच्या रेघा तुटक होत्या. काही ठिकाणी माती मुद्दाम उलटवलेली दिसत होती.

जणू कोणीतरी मागे वळून त्या खुणा पुसत गेलं होतं. मी थांबलो. नजर त्या जागेवर स्थिर केली.

“इथून पुढे ते आपल्याला दिसणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली आहे.” मी शांतपणे म्हणालो.

पाटील माझ्या जवळ आला. त्याचा आवाज कुजबुजेसारखा होता. “मग आपण?”

मी उत्तर देण्याआधी आजूबाजूला पाहिलं. अदृश्य नजर जाणवत होती.

मी हळू आवाजात म्हणालो, “आपण त्यांना दिसलो तरी चालेल, पण आपण काहीतरी चूक करतोय, असं त्यांना अजिबात वाटता कामा नये..”

त्या वाक्यानंतर सगळे काही क्षण शांत उभे राहिलो.

तेवढ्यात मागून एक जवान धावत आला. “सर, खालच्या बाजूला अजून एक पायवाट दिसतेय.”

आम्ही त्या दिशेने उतरलो. उतार तीव्र होता. माती सैल. पाय टाकताना प्रत्येक वेळी संतुलन साधावं लागत होतं.

खाली जाताना हवा बदलली—जास्त ओलसर, जड, आणि कुठेतरी कुजलेल्या पानांचा दर्प घेऊन येणारी.

काही पावलं पुढे गेल्यावर ती जागा दिसली. माती खोलवर दबली गेली होती. जणू कुणीतरी भार खाली ठेवून थांबलं होतं.

जमिनीवरचा दाब अजूनही स्पष्ट दिसत होता—जड वजन काही काळ तिथे स्थिर होतं, हे सहज ओळखू येत होतं.

पाटील खाली वाकला, हाताने मातीला स्पर्श केला. “इथे ते थांबले होते,” तो म्हणाला.

मी आजूबाजूला नजर फिरवली. झाडं जवळ आली होती. दृष्टी अजून मर्यादित झाली होती.

“हो,” मी हळू आवाजात म्हणालो, “आणि इथून पुढे काहीतरी बदललंय.”

त्या जागेत काहीतरी वेगळं होतं. फक्त थांबणं नव्हतं—निर्णय घेतला गेला होता.

थोड्या अंतरावर मला काहीतरी दिसलं. मातीने माखलेली एक चप्पल. मी पुढे जाऊन ती उचलली.

गावाकडची साधी चप्पल. मी ती हातात फिरवून पाहिली. ती इथे पडलेली का होती? अपघाताने? की मुद्दाम?

त्या विचाराने मनात अस्वस्थता पसरली. तेवढ्यात मागून पुन्हा आवाज आला, “सर… इकडे बघा.”

या वेळी आवाज गंभीर होता. मी त्या जवानजवळ गेलो. मी खाली पाहिलं. जमीन उकरलेली होती.

खूप खोल नाही. पण नैसर्गिक नव्हती. माती बाजूला सारलेली. वरची पानं विस्कटलेली.

जणू कुणीतरी घाईत काहीतरी केलं होतं आणि पुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला होता.

माझ्या छातीत धडधड वाढली. त्या जागेकडे पाहताना एक विचित्र जाणीव झाली ही फक्त खणलेली माती नव्हती.

ही एखादी खूण होती किंवा सापळा. पाटील माझ्या शेजारी येऊन थांबला.

त्याने त्या जागेकडे पाहिलं. मग हळू आवाजात विचारलं, “खोदू?”

मी क्षणभर थांबलो. वेळ जणू त्या एका ठिकाणी येऊन अडकली होती. आजूबाजूचं जंगल पूर्णपणे मुकं झालं होतं—ना पानांची सळसळ, ना पक्ष्यांचा आवाज. जणू सगळं थांबून पाहत होतं… आपण पुढचं पाऊल काय टाकतो ते.

मी हलकंसं मान हलवली. संमती दिली.

दोन जवान पुढे सरकले. त्यांनी माती सावधपणे बाजूला सारायला सुरुवात केली.

काही क्षण गेले. फक्त हातांनी माती ढकलण्याचा मंद आवाज. मग एक पांढरट आकार दिसला.

मातीखालून हळूहळू एक हात बाहेर आला. जवानाचा नव्हता. एखाद्या किशोरवयीन मुलाचा.

पाटीलचा श्वास अडखळला. कुणीतरी हलकंसं “सर…” म्हणालं, पण पुढचं वाक्य बाहेर आलं नाही.

मी त्या हाताकडे पाहत राहिलो. तो निष्प्राण मातीने माखलेला. आणि त्या हातात भीती अजूनही अडकून राहिल्यासारखी वाटत होती.

जवानांनी अजून थोडी माती बाजूला केली. चेहरा दिसला, डोळे मिटलेले. ओळख पटायला वेळ लागला नाही. तोच मुलगा... गावातून गायब झालेला.

त्या क्षणी सगळे धागे एकत्र जुळून आले. गावातली ती दडपलेली शांतता, ओस पडलेली घरं, हिडमेचा तो करडा, अडखळणारा आवाज.

मी सरळ उभा राहिलो. नजर त्या खड्ड्यावरून हटत नव्हती.

शिंदे जिवंत होता कारण त्याला त्यांनी जिवंत नेलं होतं. पण हा मुलगा हा संदेश होता. क्रूर. निशब्द. स्पष्ट.

पाटील माझ्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि अस्वस्थता एकत्र दिसत होती.

“ते आपल्याला घाई करायला लावतायत,” मी शांतपणे म्हणालो.

माझा आवाज स्थिर होता. पाटीलने विचारलं, “मग आता?”

मी पुन्हा त्या उघड्या पडलेल्या खड्ड्याकडे पाहिलं. माती बाजूला झाली होती. सत्य उघडं पडलं होतं.

मी हळू आवाजात म्हणालो, “आपण घाई करणार नाही, आपण त्यांचा खेळ… त्यांच्याच नियमांनी खेळणार नाही.”

त्या क्षणी एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ झाली—हा केवळ शिंदेला शोधण्याचा प्रयत्न नव्हता. हा एक असा खेळ होता, जिथे पहिली चूक कोण करतो, यावरच पुढचा निकाल अवलंबून होता.

लाल रेषा - भाग ५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काटा आला अंगावर..
जणू या पथकाबरोबर मी पण त्या घुम्या जंगलात चालते आहे असे वाटले..

छान लिहीत आहात . थरारक .... मला स्वतःला त्या जंगलात गेल्यासारखे वाटतेय.
या वातावरणात, परिस्थितीत तिथे रात्रंदिवस काम करणाऱ्या जवानांना किती स्ट्रेस येत असेल ना . खूप कठीण आहे