लाल रेषा - भाग १ - पहिलं पोस्टिंग - गडचिरोली
पूर्वभाग
कथेची सुरुवात एका नक्षल-प्रभावित भागातील पोलिस कॅम्पपासून होते, जिथे वातावरण वरवर शांत असलं तरी आतून तणाव जाणवत असतो. मुख्य पात्र (अधिकारी) आणि त्याची टीम नियमित ड्युटी करत असताना एक अनपेक्षित माहिती मिळते, जंगलात संशयास्पद हालचाल सुरू आहे.
टीम त्या दिशेने जाते आणि अचानक चकमक होते. गोळीबार तीव्र असतो, आणि काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. दोन्ही बाजूंना हानी होते, काही जवान जखमी होतात, आणि काही नक्षलही मारले जातात.
*************************************************************************************************************************
लाल रेषा - भाग २ - चकमकीनंतर
तिच्या डोळ्यांत भीतीचा लवलेशही नव्हता.
ती शत्रू होती, हे मला ठाऊक होतं.
मी तिचा शत्रू होतो, हे तिलाही माहीत होतं.
त्या क्षणाला संवादाला जागा नव्हती, विचारांना थारा नव्हता आणि प्रश्नांना उत्तरं नव्हती.
उरली होती ती फक्त एक 'रिफ्लेक्स' - एक शेवटची जीवघेणी प्रतिक्रिया!
तिने आधी गोळी झाडली. ती माझ्या कानाजवळून गेली.
हवेचा एक तीव्र झटका आणि गोळी मागे कुठेतरी आपटल्याचा आवाज.
मी रिटर्न फायर केलं. विचार न करता.
अंतर मोजलं. ट्रिगर दाबला. गोळी सरळ गेली.
तिचा तोल गेला आणि ती मागे कोसळली.
पण थांबायला वेळ नव्हता.
त्या क्षणाला मागे वळून पाहणं म्हणजे स्वतःला एक्सपोज करणं होतं. शरीर अजून त्या झटक्यातून सावरत होतं, पण हालचाल थांबवणं शक्य नव्हतं.
“स्मोक!” कुणीतरी ओरडलं.
क्षणात धुराचे कॅनिस्टर फुटले. एक दाट, पांढरट धूर आसपास पसरायला लागला. सुरुवातीला तो विरळ होता पण काही सेकंदांतच तो दाट झाला. झाडांच्या मधून सरकत, जमिनीवर पसरत, तो सगळं गिळायला लागला.
दृष्टी धूसर झाली. आकृत्या अस्पष्ट झाल्या. तो धूर फक्त आम्हाला लपवत नव्हता, तो वेळही देत होता.
आम्ही उताराकडे धावलो.
धावणं म्हणणं सोपं आहे पण तो उतार सरळ नव्हता. माती सैल होती. ओलसर. पाय टाकला की घसरत होता. कुठे मुळं बाहेर आलेली, कुठे दगड लपलेले.
पहिलंच पाऊल घसरलं. मी तोल सावरला. मागून कुणीतरी आदळलं तोही सावरला.
आम्ही धावत नव्हतो आम्ही पडत-पडत पुढे जात होतो.
शरीर झाडांना आपटलं. खांद्यावर एक धक्का बसला दुखणं जाणवलं, पण थांबायला वेळ नव्हता.
गुडघा मातीवर घासला पण उठणं भाग होतं.
पाठीवरचं वजन मागे ओढत होतं सामान, रायफल, सगळं.
श्वास जोरात चालू झाला.
धूर मागे पसरत होता पण त्यातूनही अधूनमधून गोळ्यांचे आवाज येत होते. टक. धाड.
एखादी गोळी जवळच्या झाडावर आपटत होती. एखादी माती उडवत.
ते अजून थांबायला तयार नव्हते.
उतार संपत आला.
खाली नाला दिसला अरुंद, पाणी वाहत होतं.
“उडी घ्या!” कुणीतरी पुढे ओरडलं.
मी शेवटचं पाऊल टाकलं आणि खाली झेपावलो.
पाणी थंड होतं. एकदम शरीराला झटका बसला.
क्षणभर श्वास अडखळला.
पायाखालील दगड निसरडे होते. पाय टेकवताना नीट पकड घ्यावी लागत होती.
पाणी कंबरेपर्यंत होतं. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी.
आम्ही त्या पाण्यातून पुढे सरकत राहिलो.
पाण्याचा विरोध, खाली दगड, चिखल... पाय उचलणं कठीण जात होतं.
प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक टाकावं लागत होतं.
मागे धूर होता. वर जंगल होतं.
आणि अजूनही गोळ्यांचे आवाज येत होते.
ते आता थोडे लांबून येत होते, पण होते.
कधी एखादी गोळी पाण्याच्या पृष्ठभागावर आदळत छोटे तुषार उडवत होती.
आम्ही पुढे जात राहिलो. कोणी मागे वळून पाहिलं नाही. कोणी बोललं नाही.
फक्त हालचाल. श्वास आणि पाणी कापत पुढे जाणं.
मग हळूहळू गोळीबार कमी झाला.
एक आवाज थांबला. मग दुसरा. मग काहीच नाही.
फक्त पाण्याचा मंद आवाज उरला. आणि आमचे श्वास.
आम्ही बाहेर आलो तेव्हा सूर्य कलायला लागला होता.
जंगल मागे राहिलं होतं पण आपण पूर्णपणे सुटलो, अशी जाणीव कुणालाच होत नव्हती. आम्ही बाहेर आलो होतो, पण काहीतरी अजूनही तिथंच अडकल्यासारखं वाटत होतं.
सगळे थकलेले होते. तो साधा थकवा नव्हता धावत आल्याचा किंवा चालत आल्याचा. तो आतून येणारा मानसिक थकवा होता.
हात जड झालेले. पायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागत होता.
श्वास अजूनही खोल-खोल घेतला जात होता जणू शरीर अजूनही धावतच आहे.
कपडे चिखलाने माखलेले. कुठे पाण्याने भिजलेले. कुठे रक्ताचे डाग.
काही जखमा लगेच दिसत होत्या कापलेलं, खरचटलेलं, सुजलेलं.
काही जखमा अजून जाणवत नव्हत्या त्या नंतर उघड होणार होत्या.
पण ज्या जखमांनी मन पोखरलं जात होतं, त्या बाहेर दिसतच नव्हत्या. त्या फक्त जाणवत होत्या. दोन सोबती आता कधीच परतणार नव्हते.
चार जखमी होते. त्यांना बसवलं गेलं. कोणी पट्ट्या बांधत होतं.
एक भयानक शांतता तिथे पसरली होती. कुणाचे डोळे उघडे असूनही काहीच टिपत नव्हते, तर कुणीतरी स्वतःच्याच अस्तित्वाची खात्री करून घेत होतं.
तिथे शब्दांची गरजच उरली नव्हती. ना सांत्वन, ना चौकशी. प्रत्येकाला दुसऱ्याच्या मौनाचा अर्थ उमजला होता. ती एक अशी सामूहिक जखम होती, जी फक्त अनुभवायची असते, बोलायची नसते.
मी रेडिओ काढला.
हातात घेताना जाणवलं तो थोडासा थरथरत होता.
मी बटण दाबलं. काही क्षण काही बोललो नाही.
शब्द मनात होते पण ते व्यवस्थित लावायला वेळ लागला.
मग मी रिपोर्ट दिला.
स्थान. संपर्क. हानी. जखमी.
मोजकंच.
जास्त काही नाही.
आवाज माझाच होता
पण ओळखीचा वाटत नव्हता स्थिर, भावनाविरहित.
जणू तो कुणीतरी दुसराच बोलत होता आणि मी फक्त ऐकत होतो.
*************************************************************************************************************************
जंगलातून बाहेर आलो, तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकत होता.
आम्ही नाल्याच्या कडेला थांबलो होतो.
कोणी बसलेलं. कोणी थेट पाठीवर पडलेलं डोळे उघडे, पण काहीच न पाहत.
कोणी जखमीला धरून ठेवलेलं त्याच्या श्वासाच्या तालावर स्वतःचा श्वास जुळवत.
पाण्यात चिखल मिसळून गढूळ झालं होतं.
त्या गढूळपणात रक्ताची एक हलकीशी रेषा वाहत होती.
ती लगेच लक्षात येत नाही.
पण एकदा दिसली
की नजरेत अडकते.
आणि मग
मनात कायम राहते.
मी अजूनही श्वास सावरत होतो.
छाती जोरात चालू होती जणू शरीर अजूनही धावत आहे.
रायफल हातात घट्ट पकडलेली.
पकड इतकी घट्ट होती की बोटं सुटायला तयार नव्हती.
मी जाणीवपूर्वक ती सैल केली.
पाटील माझ्या जवळ उभा होता, त्याच्या हातावरून रक्त वाहत होतं. ते हळूहळू कोपराकडे सरकत होतं, आणि तिथून थेंब पडत होते.
पण त्याला त्याचं भान नव्हतं, तो फक्त आजूबाजूला बघत होता. त्याची नजर स्थिर नव्हती ती फिरत होती.
जणू अजूनही कुणीतरी आपल्याला पाहत आहे. जणू गोळीबार थांबला असला तरी तो संपलेला नाही.
“दोन…” तो हळू आवाजात म्हणाला.
तो शब्द पूर्ण नव्हता.
पण अर्थ पूर्ण होता.
मी मान हलवली.
शब्दांची गरज नव्हती.
त्या क्षणी “हो” किंवा “नाही” यापलीकडे काही नव्हतं.
मी अजूनही त्या नाल्याकडे पाहत होतो. त्या पाण्याकडे.त्या रेषेकडे.
कॅम्पमध्ये परत येईपर्यंत अंधार पसरला होता.
आत शिरताच सगळं अचानक वेगात घडायला लागलं.
जखमींना आत नेणं.
“इकडे ठेवा ”
“प्रेशर धर ”
“पाणी ”
डॉक्टरांचे आदेश.
सहाय्यकांची हालचाल.
स्ट्रेचर इकडून तिकडे.
त्या सगळ्या गोंधळात एक सवयीचा ताल होता.
जणू प्रत्येकाला आपापलं काम पाठ होतं.
कोणी विचारत नव्हतं काय करायचं.
मी बाहेरच उभा राहिलो. हात धुतले. पाण्याखाली धरले.
माती खाली वाहून जात होती, रक्तही.
पण
बोटांमध्ये अजूनही काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. जणू ते पूर्ण निघत नव्हतं.
मी पुन्हा पाणी टाकलं. पुन्हा. आणखी जोरात.
तरीही ती जाणीव तशीच राहिली.
रात्री उशिरा सगळं शांत झालं.
आम्ही सगळे बसलो होतो. एकत्र.
पण प्रत्येकजण वेगळा.
कोणी बोलायचा प्रयत्नही करत नव्हतं.
चहा समोर ठेवलेला होता. वाफ निघत होती. पण कोणी हात लावत नव्हतं.
तो तसाच थंड होत गेला. वेळ जात राहिला.
पाटीलने कप हातात घेतला. एक क्षण तो त्याकडे पाहत राहिला.
मग तो हळू आवाजात म्हणाला , “उद्या परत जावं लागेल.” त्या वाक्यात निश्चितता होती.
मी त्याच्याकडे पाहिलं. “कशासाठी?” मी विचारलं.
तो थोडा वेळ गप्प राहिला. त्याने नजर खाली केली. मग पुन्हा वर पाहिलं.
आवाज अजून हळू झाला “आपल्या माणसांचे मृतदेह तिथेच आहेत… आणि त्यांचेही.”
थोडा वेळ मी एकटाच तिथे बसलो.
कॅम्पमध्ये हालचाल होती, पण ती दूरवरची वाटत होती. कुणीतरी हळू आवाजात बोलत होतं, कुठेतरी भांडी हलण्याचा आवाज येत होता, एखादा पावलांचा आवाज पण ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं.
तिथे एक वेगळीच शांतता होती.
रायफल बाजूला ठेवलेली. हात रिकामे. पण ते रिकामेपणही जड होतं.
मी भिंतीला टेकून बसलो. काही क्षण डोळे उघडे ठेवले समोर काहीच न पाहता. मग हळूहळू ते मिटले.
आणि एक प्रतिमा उभी राहिली.
स्पष्ट.
अगदी तशीच. ती मुलगी. जमिनीवर पडलेली. तिचं शरीर निश्चल. पण तिचे डोळे उघडे स्थिर.
ते थेट माझ्याकडे पाहत होते.
जणू त्या क्षणानंतर काहीच बदललं नाही.
जणू वेळ तिथेच थांबली.
मी डोळे उघडले.
प्रतिमा नाहीशी झाली.
समोर पुन्हा कॅम्प.
अंधार. भिंत.
मी पुन्हा डोळे मिटले.
ती पुन्हा तिथेच होती.
तिच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं ना राग, ना भीती.
फक्त एक प्रश्न. जो तिने विचारला नव्हता. पण तरीही तो तिथे होता.
श्वास जड झाला. मी डोळे उघडले.
या वेळी जास्त जोरात.
जणू त्या प्रतिमेला थांबवता येईल.
पण ती बाहेर नव्हती. ती आत होती.
मी हात कपाळावर नेला. थंडावा जाणवला.
पण डोक्यात विचार थांबत नव्हते.
त्या दिवसभरातलं सगळं पुन्हा उलगडायला लागलं. स्फोट, कदम, गोळ्या, धूर, धावणं आणि ती.
त्या सगळ्यात एक धागा जोडला गेला होता. जो आधी दिसला नव्हता.
तो हल्ला नव्हता… तो सापळा होता.
*************************************************************************************************************************
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा निघालो.
कालचाच मार्ग. पण आज प्रत्येक पाऊल जास्त जड वाटत होतं.
शरीर थकलं होतं पण तेवढंच कारण नव्हतं. काल जे घडलं, त्याचं ओझं अजून उतरलं नव्हतं. प्रत्येक पाऊल टाकताना जणू त्या आठवणीवरच पाय ठेवत आहोत, अशी जाणीव होत होती.
जंगल तसंच होतं. तीच झाडं. तीच माती. तोच ओलसर वास.
पण आता त्या सगळ्यात कालचं काहीतरी मिसळलं होतं.
जिथे नजर जाते, तिथे काहीतरी आठवत होतं.
हेच ते वळण, इथे आपण थांबलो होतो.
इथे आवाज आला होता.
जंगल बदललेलं नव्हतं पण आपण बदललो होतो.
जिथे स्फोट झाला होता, तिथे पोहोचलो.
खड्डा अजूनही तसाच होता.
माती थोडी बसली होती, पण कडा अजून स्पष्ट दिसत होत्या. कालची ताकद अजूनही त्या जागेत अडकून राहिल्यासारखी वाटत होती.
आम्ही थांबलो. कोणी काही बोललं नाही.
काम सुरू झालं.
हळू. शिस्तीने. जपून.
जमीन तपासली गेली. आसपासची जागा पाहिली गेली.
कोणी खाली वाकून, कोणी उभं राहून, कोणी नजर फिरवत. प्रत्येक हालचाल ठरलेली.
अशा वेळी शब्द अडथळा ठरतात.
कारण लक्ष विचलित होतं.
आणि इथे चूक परवडत नाही.
मग आम्ही पुढे गेलो.
त्या दिशेने जिथे ती मुलगी पडली होती.
पाय आपोआप संथ झाले. जणू त्या जागेचं अंतर अचानक वाढलं.
शेवटी ती जागा दिसली. ती अजूनही तिथेच होती.
जमिनीवर. एका बाजूला वळलेली. तिचं शरीर जिथे पडलं होतं, तिथेच स्थिर.
चेहऱ्यावर माती सुकली होती. केसांमध्ये धूळ अडकली होती. डोळे अर्धवट उघडे.
काल जसं पाहिलं होतं तसंच.
मी काही क्षण तसाच उभा राहिलो.
बाकीचं सगळं मागे सरकलं...जंगल, आवाज सगळं धूसर झालं.
फक्त ती स्पष्ट दिसत होती.
ते तिचा देह घेऊन गेले नव्हते.
का?
तो विचार लगेच आला.
कदाचित वेळ नव्हता. कदाचित तेही घाईत होते. कदाचित आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त वेळ टिकून राहिलो होतो.
किंवा कदाचित त्या दिवशी, त्यांनाही मागे वळून पाहायची संधी मिळाली नव्हती.
मी हळूच खाली बसलो. माती अजून ओलसर होती. मी हात पुढे केला.
क्षणभर थांबलो. मग तिच्या खिशात हात घातला.
एक छोटी वही मिळाली.
ती चिखलाने माखलेली होती.
कडा वाकलेल्या. पानं ओलसर.
मी ती बाहेर काढली. हळूच उघडली.
पहिल्या पानावर लिहिलं होतं, “आई, मी परत येईन. पण नाही आले तर मला माफ कर.”
हात थोडा थरथरला.
ती थरथर काबूत ठेवण्याचा मी प्रयत्न केला.
पुढचं पान उलटलं.
तारखा. काही नोंदी. लहान-लहान वाक्यं.
“आज पहिलं ट्रेनिंग…”
“भीती वाटतेय…”
“कोणाला सांगायचं नाही…”
अपूर्ण वाक्यं. काही शब्द अर्धवट.
जणू वेळ मिळाला नव्हता पूर्ण लिहायला.
मी काही क्षण ती पानं पाहत राहिलो. मग वही बंद केली. हळूच. जणू आवाज झाला तरी काहीतरी तुटेल.
मी वर पाहिलं. ती तशीच पडली होती. काल ती माझ्यासमोर उभी होती.
बंदूक रोखून. डोळ्यांत ठामपणा.
आज ती फक्त एक शांत मृतदेह होती.
*************************************************************************************************************************
कॅम्पमध्ये परत आल्यावर सगळं पुन्हा नेहमीसारखं झालं. किंवा तसं दिसायला लागलं.
टेबलावर कागद मांडले गेले. रिपोर्ट लिहिणं सुरू झालं.
वेळ. ठिकाण. संख्या. घडामोडी.
प्रत्येक गोष्ट एका ठराविक चौकटीत बसवली जात होती.
कोण कुठे होता. किती वाजता संपर्क झाला. किती मिनिटं फायरिंग. किती जखमी. किती गेले.
सगळं व्यवस्थित. स्वच्छ. मोजकं.
कागदावर ते सगळं नीट बसत होतं. जणू काही ते नियंत्रणात होतं.
जणू त्याला एक आकार होता. एक मर्यादा होती.
पण काही गोष्टी कागदावर बसत नाहीत.
त्यांचं मोजमाप नसतं. त्यांना वेळ नसतो.
त्या फक्त राहतात.
आत...खोल मनात, तळाशी.
रात्री झोपायचा प्रयत्न केला.
बेडवर पडल्यावर शरीराने हार मानली होती.
थकवा स्पष्ट होता.
पण डोळे मिटताच पुन्हा तेच.
स्फोट. तो अचानक उठणारा धक्का.
धूर. ज्यात सगळं हरवतं.
गोळ्या. ज्या कुठून येतात, कळत नाही.
आणि ती. तीच जागा. तीच नजर.
मी डोळे उघडले. छताकडे पाहिलं.
श्वास जरा वेगात चालू होता. मी तो हळूहळू आवरला.
पुन्हा डोळे मिटले.
पुन्हा तेच.
वेगवेगळ्या तुकड्यांत.
एक पूर्ण चित्र नाही, तुटक. पण जास्त तीव्र.
एक क्षण असा आला की मला वाटलं, कुणीतरी बाहेरून चालत गेलं.
तो आवाज अगदी हलका होता. पण स्पष्ट.
जणू पानं हलली. जणू एखादं पाऊल. मी डोळे उघडले.
काही क्षण ऐकत राहिलो.
पुन्हा
काहीच नाही.
पण ती जाणीव तशीच राहिली.
मी उठलो.
हळूच.
बेडचा आवाजही होऊ नये म्हणून.
बाहेर आलो.
रात्रीचा अंधार तसाच होता.
कॅम्प शांत.
तीच, अस्वस्थ करणारी शांतता.
मी काही क्षण तसाच उभा राहिलो.
डोळे अंधाराशी जुळवून घेत होते.
आकृत्या हळूहळू स्पष्ट होत होत्या, झाडं. काटेरी तार. बंकरची चौकट.
आणि अचानक मला वाटलं, कुणीतरी झाडामागे उभं आहे.
अगदी हलकेच.
जणू ते तिथे आधीपासून आहे.
फक्त आता दिसायला लागले.
मी थिजलो. शरीर स्थिर.
डोळे त्या दिशेला रोखलेले.
त्या सावलीत काहीतरी वेगळं वाटत होतं.
एक आकार. एक उभं असलेलं अस्तित्व.
मी एक पाऊल पुढे टाकलं.
हळू.
जमिनीवरचा आवाज न करता.
मग दुसरं.
हृदयाचा ठोका स्पष्ट ऐकू येत होता.
मी आणखी जवळ गेलो.
त्या झाडाजवळ.
नजर स्थिर ठेवून.
आणि... काहीच नाही.
फक्त अंधार.
झाड.
त्याची सावली.
बाकी काही नाही.
मी काही क्षण तसाच उभा राहिलो.
मग हळूच श्वास सोडला.
मी परत वळलो.
पावलं कॅम्पकडे पडत होती, पण लक्ष अजून मागेच अडकलेलं होतं. त्या अंधारात काहीच नव्हतं हे डोळ्यांनी पाहिलं होतं. तरीही, काहीतरी असल्याची, जाणीव सुटत नव्हती.
त्या दिवसानंतर जंगल तसंच राहिलं नाही.
तेच रस्ते. तीच झाडं. तोच वास.
पण आता प्रत्येक गोष्टीला एक अतिरिक्त अर्थ लागला होता.
प्रत्येक आवाज फक्त आवाज राहिला नव्हता.
तो संकेत वाटू लागला.
कुठून आला?
का आला?
कुणासाठी?
हे प्रश्न आधीच मनात उभे राहू लागले.
पानांची सळसळ, वारा आहे की हालचाल?
एखादा तुटणारा फांदीचा आवाज, अपघात की खूण?
प्रत्येक वेळी मन कानोसा घेऊ लागले.
प्रत्येक वेळी नजर आधी शोध घेऊ लागली.
आणि शांतता.
ती सगळ्यात जड झाली.
कारण शांततेत आता रिकामेपणा नव्हता.
तिथे काहीतरी दडलेलं वाटू लागलं.
अदृश्य. पण उपस्थित.
जणू कुणीतरी श्वास रोखून थांबलंय आणि तुम्हीच हलण्याची वाट पाहतंय.
रात्री झोपणं कठीण झालं.
डोळे मिटले की बाहेरचं अंधार नाहीसा व्हायचा.
आणि आतलं सगळं जागं व्हायचं.
ती वही.
चिखलाने माखलेली.
पानं अर्धवट ओलसर.
ती अक्षरं घाईत लिहिलेली.
थोडी वाकडी. थोडी थरथरती.
“आई…”
तो शब्द प्रत्येक वेळी जास्त स्पष्ट वाटायचा.
ती नजर जी शेवटच्या क्षणी माझ्याकडे रोखलेली होती.
ती बदलत नव्हती.
प्रत्येक वेळी तशीच.
स्थिर. थेट.
जणू काहीतरी विचारत, ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.
मी डोळे उघडायचो.
पुन्हा बाहेर अंधार असायचा.
पण आतलं काहीच थांबत नव्हतं.
ते पुन्हा पुन्हा यायचं.
विनाकारण.
विनाविराम.
त्या दिवसानंतर ऑपरेशन संपलं. रिपोर्ट फाइल झाले. नवीन आदेश आले. सगळं पुढे सरकलं.
जंगल पुन्हा शांत झालं.
पण एक वेगळी लढाई सुरू झाली होती. जी दिसत नाही. ज्यात शत्रू निश्चित नसतो. आणि ज्यातून बाहेर पडण्यासाठी कोणताही ठरलेला मार्ग नसतो.
थरारक वर्णन...
थरारक वर्णन...
लिहिलं छान पण फार तुटक आहे.
लिहिलं छान पण फार तुटक आहे. एकेका वाक्याला, शब्दाला नवीन ओळ करणे यामुळे वाचताना साखळी तुटते. गेल्या भागात असं नव्हतं
इंटरेस्टिंग आहे. वाचतोय.
इंटरेस्टिंग आहे. वाचतोय.
हा भाग पण छान
हा भाग पण छान
एकेका वाक्याला, शब्दाला नवीन ओळ करणे यामुळे वाचताना साखळी तुटते. >>>> +१
चांगल वर्णन केले आहे दोन्ही
चांगल वर्णन केले आहे दोन्ही भागात . पुढच्या भागाची वाट बघत आहे
धन्यवाद धनवन्ती, punekarp,
धन्यवाद धनवन्ती, punekarp, Abuva, आबा. आणि जाई.
<<फार तुटक आहे. एकेका वाक्याला, शब्दाला नवीन ओळ करणे यामुळे वाचताना साखळी तुटते>> लेखनातील त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. पुढल्या भागापासून सलगता ठेवून लिहीत जाईन.