भास

Submitted by नितनवे on 21 March, 2026 - 14:15

अंधाराच्या दाट श्वासात
तुझी चाहूल विरघळत राहते,
जणू रिकाम्या हवेलाही
तुझ्या उबेची सवय लागते.

तू दिसत नाहीस
पण जाणवत राहतेस,
त्वचेच्या अगदी आत
एक हळूवार कंप सोडत.

जवळ येण्याआधीच
क्षण थांबून जातो,
आणि त्या थांबण्यातच
संपूर्ण जवळीक जळू लागते.

स्पर्श होत नाही
पण त्याची वेदना होते,
जणू न झालेल्या स्पर्शानेच
देह आतून विरघळतो.

श्वास तुटक होतात,
आणि मन अधिकच तुझ्याकडे ओढलं जातं,
पण अंतर तसंच राहतं
निर्दयी… न हलणारं.

ही ओढ इतकी कातर
की सुखही वेदनेत मिसळतं,
आणि वेदनाही गोड भासते
फक्त तुझ्या भासामुळे.

आणि त्या सगळ्यात
एक गूढ, अधांतरी नशा
ज्यात तू कधीच पूर्ण भेटत नाहीस,
पण मी मात्र
प्रत्येक वेळी…
पूर्णपणे हरवत जातो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users