ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जून महिना म्हटले की पहिला पाउस्, शाळेचा पहिला दिवस.. नविन वर्ग, नविन वर्गशिक्षक्,नविन पाठ्यपुस्तके,नविन वह्या हे समिकरण लहानपणी जितके डोक्यात भिनले होते तितकेच जून महिना सुरु झाला म्हणजे आता विंबल्डन स्पर्धा फार काही दुर नाही हेही मला १९७५ साल उजाडेस्तव समजु लागले होते...

माझ्या टेनिसप्रेमाला कारणीभुत होणारी कोणती एक टेनिस स्पर्धा असेल तर ती म्हणजे विंबल्डन! टेनिसमधे वर्षातुन चार ग्रँड स्लॅम स्पर्धा असल्या तरी का कोण जाणे जरी ती वर्षातलि पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असली तरी मला ऑस्ट्रेलिअन ओपन बद्दल कधीच एवढे आकर्षण वाटले नाही जेवढे फ्रेंच ओपन, विंबल्डन व यु एस ओपनबद्दल वाटले. एखाद्या सावत्र मुलासारखी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसस्पर्धा टेनिसप्रेमींच्या मनात नेहमीच उपेक्षली गेली आहे.तसेच फ्रेंच ओपन स्पर्धेतले पॅरिसचे लाल मातीचे रोलँड गॅरस व त्या स्पर्धेतले फ्रेंच पंचांनी फ्रेंच भाषेमधे उच्चारलेले पॉइंट्स व स्कोर व एकंदरीतच पॅरिसमधले ते वातावरण..... कितीही रोमँटिक वाटले... व न्युयॉर्क मधे होत असलेल्या यु एस ओपन स्पर्धेचे वातावरण.... कितीही कॅज्युअल,समरी व फेस्टिव्ह वाटले तरी... त्या स्पर्धांना विंबल्डनचे वलय नाही या मताचा मी तरी आहे.. या विंबल्डन स्पर्धेला मात्र एक वेगळेच वलय आहे.. एक वेगळीच फॉर्मॅलिटी आहे.. एक वेगळाच चार्म आहे. तो नेमका शब्दात वर्णन करणे कठीण आहे.. पण ही स्पर्धा गेली ३४ वर्षे बघताना मला तरी तसे वाटले आहे.

तर मंडळी.. २००९ च्या विंबल्डन स्पर्धेची आज सुरुवात होत आहे.. त्या निमित्ताने या स्पर्धेच्या दरम्यान पुढच्या २ आठवड्यात.. ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन... या सदराखाली या स्पर्धेबद्दल... व ही स्पर्धा गाजवणार्‍या काही लेजेंडरी टेनिसपटुंबद्दल लिहीण्याचा हा माझा एक प्रयत्न....:)

आता या टेनिसमधल्या.. ज्वेल इन द क्राउन... सारख्या स्पर्धेबद्दल लिहीताना सुरुवात कशी करायची हेच मला सुचत नव्हत.... गेल्या ३४ वर्षाच्या विंबल्डनच्या आठवणींचा चलतचित्रपट माझ्या मनःपटलासमोरुन झर्रकन सरकु लागला.. त्यात मग फिलाचा स्ट्राइप्ड शर्ट व डोक्याला पट्टी बांधलेला बिऑर्न बोर्ग येउन गेला..तरुणपणाचा फ्लँबॉयंट जिंमी कॉनर्स विंबल्डनच्या हिरव्यागार गवतावर.. सर्व्ह अँड व्हॉली कसे खेळायचे.. याचे प्रात्यक्षिक केन रोझवॉलला देताना दिसु लागला... लांब कुरळ्या केसांचा.. डोक्याला लाल पट्टी लावलेला व पंचाशी हुज्जत घालुन.. बोर्गचे सहा वर्षाचे विंबल्डन प्रभुत्व अस्तास आणणारा टिन एजर मॅकेन्रो आठवला..केवळ सतरा वर्षाचा बोरिस बेकर.. याच विंबल्डनच्या गवतावर .. जमीनीस समांतर.. आडवा स्ट्रेच होउन बॉल परतवण्यासाठी... झेप घेताना दिसु लागला व झालच तर सँप्रासचा इथली सात विजेतपद मिरवत असतानाचा हसरा चेहरा आठवु लागला....२००१ मधे त्याच्या तिसर्‍या फायनलमधे.. तेही लिस्ट एक्स्पेक्टेड असताना.. गोरान इव्हनिव्हिकने जेव्हा एकदाचे विंबल्डन विजेतेपद जिंकले.. तेव्हाचे हर्षभराने आलेले त्याचे आनंदाश्रु सुद्धा आठवले आणि गेल्या ६ वर्षातले रॉजर फेडरर नामक माणसाने उठवलेला या स्पर्धेवरचा ठसा व त्याच्यातल्या व नादालमधे गेल्या ३ वर्षात झालेले अंतिम सामने.. खासकरुन गेल्या वर्षीचा अजरामर अंतिम सामना डोळ्यासमोर तरळु लागला. महिलांमधले मार्टिना नवरातिलोव्हाचे ख्रिस एव्हर्टला इथे वारंवार हरवणे व तिचे इथले निर्विवाद वर्चस्व व स्टेफी ग्राफची इथल्या ग्रासवरची चित्त्याची चपळता व तिच्या सर्वांगीण खेळाने तिने गाजवलेले इथले प्रभुत्वही मला स्पष्टपणे आठवु लागले.. यापै़की प्रत्येक आठवणींबद्दल एक एक पोस्टच काय... एक एक पुस्तकही होउ शकेल. आणि या सगळ्या आठवणींबद्दल या सदरात लिहीण्याचा मी जरुर प्रयत्न कारणार आहे.

पण या सदराची सुरुवात यापैकी कोणत्याही आठवणींनी न करता... बड कॉलिन्स व डिक एनबर्ग.. या एन बी सी.. वरच्या टेनिस समालोचकांच्या नावाच्या उल्लेखाने मी केली तर तुमच्यापै़की अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसेल हे मला माहीत आहे.. पण माझ्या विंबल्डनच्या आठवणित बड कॉलिन्सला व डिक एनबर्गला बोर्ग्,कॉनर्स्,मॅकेन्रो,बेकर्,सँप्रास्,फेडरर,मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफी ग्राफ इतकेच मोठे स्थान आहे. त्याचे कारण म्हणजे मी जेव्हा विंबल्डन स्पर्धा बघु लागलो तेव्हापासुन शनिवार व रविवारच्या विंबल्डन फायनल्स.. एन बी सी..ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन...अशी त्याची जाहीरात करुन दाखवत.. व अजुनही तशीच जाहीरात करुन दाखवतात!त्या ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन या ब्रॉडकास्टचा एक अविभाज्य भाग म्हणजे.. एन बी सी टिव्हीवरचे समालोचक.. डिक एनबर्ग व बड कॉलिन्स!... (बड कॉलिन्सला १९९० च्या सुमारास एन बी सी ने एक्पर्ट कॉमेंटेटर म्हणुन काढुन टाकले.) गेल्या ३४ वर्षात विंबल्डन फायनल्समधे इथल्या हिरवळीवर अनेक टेनिसपटु आपला ठसा उमटवुन गेले.. वर्चस्व गाजवुन गेले.. पण त्या सर्व फायनलमधे एक अविभाज्य भाग कोणता असेल तर डिक एनबर्गचे समालोचन! डिक एनबर्गचे... ओ माय.. ओ माय... लुक आउट...मॅच इज नॉट ओव्हर यट.. वुइ आर् गोंइंग टु अ फायनल सेट टायब्रेकर हिअर अ‍ॅट ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन... असे म्हणताना एन बी सी वर जाहीरातीचा ब्रेक झालेला मला असंख्य वेळा आठवत आहे.अमेरिकेत आल्यावर गेल्या २० वर्षात विंबल्डन स्पर्धेच्या फायनल्स विकेंडला डिक एनबर्गचे समालोचन ऐकता ऐकता केलेला स्ट्रॉबेरी व क्रिमचा ब्रेकफास्ट व माझ्या विंबल्डनच्या आठवणी.. या दोन गोष्टी एकरुप झालेल्या आहेत.. त्यामुळे ब्रेकफाट अ‍ॅट विंबल्डन असे सदर लिहीताना डिक एनबर्ग व बड कॉलिन्सबद्दल आधी २ शब्द लिहीले नाहीत तर माझ्या विंबल्डन आठवणींशी प्रतारणा केल्यासारखे होइल.. त मंडळी... त्या दोघांचे नाव घेउन मी माझ्या विंबल्डनच्या आठवणिंचे हे सदर तुमच्यापुढे सादर करतो...

क्रमंशः

विषय: 
प्रकार: 

येऊद्या येऊद्या... वाट बघतो

वा वा... जबरीच.. !!! येऊ द्या..

या विंबल्डन स्पर्धेला मात्र एक वेगळेच वलय आहे.. एक वेगळीच फॉर्मॅलिटी आहे.. एक वेगळाच चार्म आहे. तो नेमका शब्दात वर्णन करणे कठीण आहे.. >> अगदी अगदी..

मस्त सुरुवात..

वा! मस्त... पुढचे भाग वाचायला मजा येणार आता... Happy

छान सुरुवात!!

छान सुरुवात! पटपट लिही पुढच..

आता या सदराच्या सुरुवातीस.. नमन म्हटल्याप्रमाणे ...डिक एनबर्ग व बड कॉलिन्स यांचे नाव रितसर नमुद केल्यावर... खरा प्रश्न आ वासुन माझ्यापुढे उभा राहीला... या स्पर्धेबद्दलच्या माझ्या आठवणि लिहीताना पहिल्या आठवणिचा मान कोणाला द्यायचा? खर म्हणजे या स्पर्धेचे मानाचे मानकरी खुप नसले तरी बोटावर मोजण्याइतके जरुर आहेत त्यामुळे एकाचे(किंवा एकीचे!) नाव सर्वात आधी नमुद करायचे हे महाकठीण काम आहे. कुठल्याही खेळावर प्रेम करण्यांर्‍याना त्या खेळातल्या त्यांच्या आवडत्या प्रथितयश व मान्यवर खेळाडुंमधुन फक्त एकालाच निवडायचे काम कधीच आवडत नसते. ते म्हणजे प्रत्यक्ष आइवडिलांना आपल्या चार मुलांपैकी कुठले मुल जास्त आवडते असे विचारण्यासारखे झाले..:).

जी गोष्ट खेळाडु निवडण्याबाबत.. तिच गोष्ट त्यांच्या इथल्या मॅचेसबद्दल... १९८० चा इथे झालेला मॅकेन्रो-बोर्ग मधला न भुतो न भविष्यती असा... चौथ्या सेटमधला तब्बल २२ मिनिटे चाललेला ३४ पॉइंट्स चा टायब्रेकर व ती सगळी फायनल मॅचच सरस... की गेल्याच वर्षी झालेला इथला फेडरर व नादालमधला एपिक असा अंतिम सामना सरस?.. १९८७ च्या पॅट कॅश बरोबरच्या हरलेल्या अंतिम सामन्यात.. लाइन्समननी चुकीचा कॉल दिल्यावर... अगदी रडकुंडीला येउन पंचांकडे फिर्याद करणार्‍या इव्हान लेंडलची दया जास्त करायची की १९९३ मधल्या फायनलमधे..स्टेफी ग्राफबरोबरचा...(६-७, ६-१ व तिसर्‍या सेटमधे ४-१ व ४०-१५ असा लिड असुनही) जिंकत असलेला सामना हरणार्‍या... व नंतर ट्रॉफी प्रेझेंटेशनच्या वेळी.. डचेस ऑफ केंटच्या खांद्यावर डोके ठेउन.. हमसुन हमसुन रडणारी हाना नव्हाटोना दयेला जास्त पात्र?.....१७ वर्षाच्या... वयाने कोवळा पण शरीराने बळकट अश्या सोनेरि केसाच्या...... अनसिडेड बोरीस बेकरचा.. इथला १९८५ चा विजय तोंडात बोटे घालण्यासारखा की पिस्तोल सँप्रासची इथली ७ विजेतेपद मिळवण्याची विक्रमी कारकिर्द्र तोंडात बोटे घालण्यासारखी? ठरवणार कसे ?

जवाहिर्‍याच्या दुकानात असलेल्या एकापेक्षा एक सरस हिर्‍या सारख्या या आठवणि आहेत हो या... अश्या या अमुल्य आठवणिंच्या हिर्‍याच्या हारातले एक एक अनमोल हिरे काढुन त्याला आपल्या शब्दांच्या तराजुत मोजुन त्याचे मोल ठरवण्याचा या लेखमालेचा हेतु खचितच नाही.. फक्त काळाच्या अंधःकारात दडुन गेलेल्या या आठवणिंच्या हिर्‍यांना पुन्हा एकदा प्रकाशात लख्ख चमकवुन.. त्यांचे त्या वेळेला मनाला भावुन गेलेले पैलु परत एकदा उजेडात आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न..:)

क्रमंशः

मुकुंद,मस्तच लिहिताय.. येऊद्यात तुमच्या त्या सगळ्या आठवणी इथे आमच्या समोर शब्दरुपात. म्हणजे आम्हालाही त्या आठवणींमधुन आम्ही पाहिलेले आणि न पाहिलेले सगळे विंबल्डनचे क्षण अनुभवता येतील Happy

वा क्या बात है! परत एकदा विंबल्डन, परत एकदा मुकुंद यांचे लेखन! जबरीच !
वाचतेय ! Happy

www.bhagyashree.co.cc/

मुकुंद जबरी.. Happy

गोरान इव्हानीसेविच बद्दल पण लिही नक्की.. !! तो जिंकला ती मोमेंट पण लई भारी होती...

तर अश्या या विंबल्डन आठवणींच्या खजिन्यातुन कोणती अमुल्य रत्ने या सदरात सादर करायची या संभ्रमात मी पडलो आहे. पण मग मी असे ठरवले की माझ्या आठवणीत असलेल्या १९७४ ते २००९ या उण्यापुर्‍या ३५ वर्षांच्या विंबल्डन काळाला ..ढोबळपणे... चार पर्वात विभागुन ...प्रत्येक पर्व गाजवलेल्या काही खेळाडुंबद्दल इथे लिहावे म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही. म्हणजे आता बघा..यातले पहिले पर्व होते ते १९७४पासुन ते १९८५ पर्यंत... ज्याला नक्कीच बोर्ग्-कॉनर्स्-मॅकेन्रो या त्रिकुटाचे पर्व म्हणता येइल्(महिलांमधे मार्टिना नवरातिलोव्हा-ख्रिस एव्हर्ट याच पर्वात इथे त्यांच्या अजरामर लढती खेळुन गेल्या).. दुसरे पर्व म्हणजे १९८५ ते १९९२..जे बेकर एडबर्ग पर्व म्हणुन गाजले गेले.. मग आले १९९२ ते २००० चे... निर्विवाद... सॅन्प्रास पर्व(बेकर्-एडबर्ग्-सँप्रास पर्वात.. महिलांमधे... स्टेफी ग्राफ इथे सत्ता गाजवुन गेली) व शेवटचे.. म्हणजे २००१ ते आतापर्यंतचे.... जे साधारणपणे फेडरर-नादाल पर्व म्हणुन ओळखले जाइल...(ज्यात महिलांमधे.. विलिअम्स भगीनींनी.. आपल्या पुरुषी व राकट खेळाने... महिलांचा टेनिस खेळच बदलुन टाकला)

खर म्हणजे विंबल्डनचे ग्रास कोर्ट हे जुन-जुलै मधे.. लंडनमधे असलेल्या हवानासारखेच बेभरवशी!खासकरुन या स्पर्धेच्या दुसर्‍या आठवड्यात.. पहिल्या आठवड्यात झालेल्या कोर्टच्या वेअर अँड टेअर मुळे.. व पाउस झाला असेल तर त्या पावसामुळे.... या वेगवान पण अनप्रेडिक्टेबल ग्रास कोर्टवर.. चेंडु कधी उसळी घेइल व कधी जमिनीलगत जाइल याचा भरवसा नसतो. म्हणुनच सातत्याने बेसलाइनवर उभे राहुन चेंडु परतवणिचा खेळ खेळत बसणे इथे अंगलट येउ शकतो. फक्त बिऑर्न बोर्ग हा एकच बेसलाइन प्लेयर इथे सलग ५ विजेतेपद मिळवुन गेला व अपवाद ठरुन गेला. पण विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर इतर बेसलाइन प्लेयर्सना नेहमी अपयशच व हार्ट्ब्रेकच पदरी पडले आहे. (विश्वास नसेल बसत तर जा.. आणि विचारा त्या बिचार्‍या इव्हान लेंडलला..:(). पण तेच तुमचा खेळ सर्व्ह अँड व्हॉलीवर आधारलेला असेल तर इथे तुम्ही जिंकण्याची शक्यता जास्त असते. विंबल्डनच्या अश्या या बेभरवशी गवती सरफेसवर.. त्यामुळे आपल्या नावाचे पर्व होउ शकेल इतपत सातत्याने खेळणे... फक्त मुठभर खेळाडुंनाच आतापर्यंत जमले आहे. गेल्या ३५ वर्षात..बोर्ग,कॉनर्स्,मॅकेन्रो,बेकर्,एडबर्ग्,सँप्रास, फेडरर व नादाल हे आठच खेळाडु.. त्या आठ जणात मिळुन.. तब्बल ४३ विंबल्डन फायनल्स खेळले आहेत! बोर्ग- कॉनर्स-फेडरर हे ६-६-६ वेळा,मॅकेन्रो ५ वेळा, एडबर्ग-नादाल ३-३ वेळा तर सँप्रास्-बेकर ७-७ वेळा माझा ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन अविस्मरणिय करुन गेले आहेत!

आता वर नमुद केलेले हे सर्व टेनिसपटु हॉल ओफ फेम टेनिसपटु आहेत (व होतील) हे सगळ्यांनाच ठाउक आहे. त्यामुळे त्यापै़की कोणाबद्दल या विंबल्डनच्या सदरात लिहायचे व कोणाला वगळायचे हे सर्वस्वी सापेक्ष असु शकते. खर म्हणजे विंबल्डनच्या सेंटर कोर्टचे ब्रॅगींग राइट्स या वरीलपै़की कोणताही खेळाडु क्लेम करु शकतो. पण मला स्वतःला विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर सर्वात जास्त भावुन गेलेला टेनिसपटु कोण असेल तर तो म्हणजे जर्मनिचा बोरिस बेकर!तर मंडळी.. चला जाउयात परत एकदा आपण .. १९८५ ते १९९५ च्या दशकात..व पाहुयात या अमेझिंग ग्रास कोर्ट चँपिअनच्या दैदिप्यमान विंबल्डन कारकिर्द्रीकडे...:)

१९७४ ते १९८४ या १० वर्षात...सर्व जगाला विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर.. ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डनला.. बोर्ग्,कोनर्स व मॅकेन्रो या ३च लेजेंडरी खेळाडुंना बघण्याची इतकी सवय झाली होती की जेव्हा १९८५ ची विंबल्डन स्पर्धा जेव्हा सुरु झाली.. तेव्हा कोणाच्याही.. (म्हणजे यात मी सुद्धा आलो..) मनात संदेह नव्हता की सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रथम सिडेड व १९८४ चा विंबल्डन विजेता..मॅकेन्रो व तृतिय सिडेड कॉनर्स यां दोघांपैकीच एक जण इथे परत विजेता होणार. इव्हान लेंडलला जरी दुसरे सिडींग दिले होते तरी लेंडलला ग्रास कोर्टवर अजुन आपले वर्चस्व सिद्ध करायचे होते. त्यामुळे कॉनर्स्-मॅकेन्रो असा उपांत्य सामना होइल व त्यातला विजेताच या वर्षीचा विंबल्डनचे विजेतेपद घेउन जाइल असा माझाच नव्हे तर सगळ्या जगाचा होका होता.

१९८५ ची विंबल्डन स्पर्धा सुरु झाली. पहिल्या चार फेर्‍यापर्यंत सर्व काही अपेक्षेप्रमाणे होत गेले.. त्याला अपवाद फक्त २! एक म्हणजे आपल्या भारताचा विजय अमृतराज.. ज्याने पहिल्या ३ फेर्‍या जिंकुन व तेही तिसर्‍या फेरीत १९८३ च्या फ्रेंच ओपन चँपिअन... यान्निक नोहाला हरवुन.. चौथ्या फेरीत धडक मारली होती व दुसरा अपवाद म्हणजे फक्त १७ वर्षाचा असा एक अनसिडेड सोनेरी केसांचा जर्मन खेळाडु.. बोरिस फ्रान्झ बेकर! ज्याने तिसर्‍या फेरीत स्विडनच्या योकिम निस्ट्रॉमला हरवले व चौथ्या फेरीत टिम मयोटला हरवुन उप उपांत्य फेरी गाठली होती. दुर्दैवाने आपल्या विजय अमृतराजचे आव्हान स्विस हाझ गन्थर्डने चौथ्या फेरीत संपुष्टात आणले. तसेच लेंडलचे आव्हानही चौथ्या फेरीत फ्रांसच्या हेन्री लेकाँटने संपुष्टात आणले.

पण खरी मजा उप उपांत्य फेरीपासुन सुरु झाली. तोपर्यंत कोणाच्याच रडारमधे नसलेला साउथ आफ्रिकेचा केव्हिन करन.... आपल्या जबरदस्त सर्व्हिसच्या बळावर.. एसवर एस चा मारा करत.. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करत.. बोरिस बेकरसारखाच..चुपचाप उप उपांत्य फेरीपर्यंत येउन पोहोचला होता. उप उपांत्य फेरीत केव्हिन करनची गाठ होती जॉन मॅकेन्रोशी. पण त्याने जेव्हा मॅकेन्रोलाही आपल्या वेगवान सर्व्हिसच्या बळावर ३ स्ट्रेट सेट्समधे धुळ चारली तेव्हा सर्व जगाने त्याची दखल घेतली.. तो पर्यंत जगाने त्याच्यासारखी वेगवान सर्व्हिस.. तेही इतक्या सातत्याने केलेली बघीतली नव्हती. त्यामुळे केव्हिन करनच्या रुपाने सगळ्या जगाला साक्षात्कार झाला की वेगवान सर्व्हिसच्या अस्त्राचा वापर करुन मॅकेन्रोसारख्या जगातल्या पहिल्या नंबरच्या खेळाडुला नमवता येते. तिकडे १७ वर्षाच्या अननोन बोरिस बेकरनेही उप उपांत्य फेर्रीत हेन्रि लेकाँटला हरवुन उपांत्य फेरी गाठली.. तेव्हा सर्व जग विचारु लागले.. कोण हा बोरीस बेकर?

पण उपांत्य फेरीत जेव्हा मला या बोरिस बेकरचा खेळ प्रथमच बघायला मिळाला.. तेव्हा मला व सर्व जगाला कळले की हा कोणी सर्वसामान्य १७ वर्षाचा मुलगा नाही . त्याने उपांत्य फेरीत ..स्विडनच्या अ‍ॅडर्स जॅरेडचा केलेला खुर्दा पाहुन मी त्याच्या खेळाच्या प्रेमातच पडलो. त्याची नुसती सर्व्हिसच बुमिंग नव्हती तर त्याचे ते फोरहँड व बॅकहँड रिटर्न्स व पासिंग शॉट्सही बुमिंग होते.. म्हणुनच त्याचे टोपण नाव.. बुम बुम बेकर.. असे पडले यात नवल काहीच नाही. त्या बुम बुम सर्व्हिस व पासिंग शॉट्सच्या जोडीला त्याच्या व्हॉलीही एकदम क्रिस्प होत्या. आणि सर्वात कहर म्हणजे त्याचे ते कोर्टवर स्वतःला आडवे.. जमीनीला समांतर झोकुन देउन.. रिटर्न्ससाठी इंपॉसिबल वाटणारे प्रतिस्पर्ध्यांचे शॉट्स व सर्व्हिस.. प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमधे परतवण्याचे त्याचे ते कौशल्य! बस... त्याचा तो जोशपुर्ण व अनब्रायडल एंथु असलेला खेळ.. त्या वर्षीच्या विंबल्डनमधे ज्यांनी ज्यांनी पाहीला.. ते सगळे इंस्टंटली त्याच्या खेळाचे चाहते झाले नसते तरच नवल... जोश्,स्किल व पॉवरचे असे मिश्रण जगाला प्रथमच बघायला मिळत होते.. तेही एका १७ वर्षाच्या मुलाकडुन!

दुसर्‍या उपांत्य फेरीत केव्हिन करनने... त्याचा आतापर्यंतचा वेगवान एसेसचा फॉर्म्युला.. परत एकदा उपांत्य फेरीतही वापरुन जिमी कॉनर्सचाही.. ३ सरळ सेटस मधे धुव्वा उडवुन....अंतिम फेरित १७ वर्षाच्या अनसिडेड बोरिस बेकरबरोबर आपली डेट फिक्स केली. आठव्या सिडेड केव्हिन करनने.. उप उपांत्य फेरीत मॅकेन्रोला व उपांत्य फेरीत कॉनर्सला.. तेही सरळ ३ सेट्समधे.. नमवले असल्यामुळे साहजि़कच अंतिम फेरित अनसिडेड व फक्त १७ वर्षाच्या बोरिस बेकरबरोबर तोच जिंकेल असाच सगळ्यांचा अंदाज होता.पण अंतिम सामन्यात झाले उलटेच! आतपर्यंतच्या सगळ्या सामन्यात अग्रेसिव्ह असलेल्या केव्हिन करनला बोरिस बेकरच्या रुपाने त्याच्यासारखाच .. किंबहुना जास्तच अग्रेसिव्ह वृत्तिचा.. प्रतिस्पर्धी लाभला. त्याचे प्रात्यक्षिक सगळ्यांना बोरिस बेकरच्या केव्हिन करनच्या सर्व्हिसला तोडिस तोड असलेल्या
सर्व्हिसमधेच बघायला मिळाले नाही तर गेम ब्रेक्सनंतर.. साइड चेंज करत असताना.. बेकरने करनच्या खांद्याला.. जाणुनबुजुन.. दिलेल्या धक्क्याच्या रुपातही बघायला मिळाले. वयाने फक्त १७ वर्षाचा कोवळा असला तरी शरीराने मात्र बेकर एकदम मजबुत होता. ६ फुट ३ इंच व ८५ किलो वजनाचा, बळकट स्नायु असलेल्या बोरिस बेकरचे शरिर म्हणजे आयडिअल पुरुषी शरीराचे मुर्तिमंत उदाहरण होते. १९८५ च्या विंबल्डन फायनलमधले त्याने दाखवलेले ते जबरदस्त पॉवरफुल यट स्लायसींग सर्व्हिसचे रुटिन.. हे पुढची १० वर्षे सातत्याने.. तसेच्..बघण्याचे भाग्य सर्व टेनिसप्रेमींना लाभले. त्याची ती जिभ ओठांवर ठेवुन्..कंबरेत वाकुन..मान थोडी मागे करुन..शरीराला दोनदा पुढे झोके देउन..गुढगे खुप बेंट करुन्..डावा हात खाली स्ट्रेच करुन.. त्यातुन बॉल खुप वर व थोडा पाठिंमागे टॉस करुन.. गुढगे परत सरळ करुन त्याच्या बळकट पायातल्या सगळ्या स्नायुची जबरदस्त पॉवर वापरुन..त्यावर त्याच्या उजव्या हातातल्या.. ट्रिमेंडस वेगाने खाली येणार्‍या.. रॅकेटने.. जोरदार प्रहार करुन केलेली पॉवरफुल व स्लायसिंग सर्व्हिस बघणे म्हणजे एक पर्वणि असायची.

त्याच्या त्या पॉवरफुल व अग्रेसिव्ह खेळाच्या बळावर १९८५ च्या विंबल्डन फायनलमधे बोरिस बेकरने वयाच्या १७ व्या वर्षी आपले पहिले विंबल्डन विजेतेपद मिळवुन त्याच्या विंबल्डनच्या सेंटर कोर्टवरच्या सत्तेला धडाक्याने सुरुवात केली. पुढच्या ८ वर्षात.. एक १९८७ चा अपवाद वगळता.. बेकर= विंबल्डन फायनल.. हे समीकरण सर्व टेनिसप्रेमींच्या डोक्यात पक्के बसले.... माझ्या पुढच्या पोस्टिंगमधे आपण या १७ वर्षाच्या बेकरने पुढे जाउन या विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर कशी सत्ता गाजवली याचा आढावा घेउ....

मस्त वर्णन! नेहमीप्रमाणेच... Happy

आता २०१० चे विंबल्डन येउन ठेपले तरी माझ्याकडुन वर प्रॉमिस केलेला..बोरिस बेकरच्या विंबल्डन कारकिर्द्रिचा आढावा अजुन यायचाच आहे.. Happy

मित्रहो.. परागने विंबल्डन निमित्ताने जो आपल्या आवडीच्या टेनिस प्लेयर्सच्या नावांचा धागा पुनरज्जिवीत केला आहे तो पाहुन मलाही माझ्या ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन या सदराची आठ्वण झाली...

विंबल्डनच्या निमित्ताने हे सदर.. बोरिस बेकरच्या तिथल्या अमेझिंग कारकिर्द्रीच्या आढाव्याने सुरुवात करुन.. परत एकदा सजीव करायचा मनसुबा आहे...

मस्तच मुकुंद Happy अजून येउद्या!
वाचताना अंगावर काटा आला एकदम. स्टेफीने नवरातिलोव्हाला पहिल्यांदा हरवले होते तो दिवस आठवला,घरातले बुजूर्ग मार्टिनाच्या बाजूने आणि आम्ही पोरंसोरं स्टेफीचे भक्त,एंड ऑफ अ‍ॅन एरा अशी मॅच होती ती. तोच नजारा पुढे काही वर्षांनी स्टेफीला मोनिका सेलेसने हरवले तेंव्हा होता.