मैफिल

Submitted by जितू on 8 March, 2026 - 08:23

सुरेल मैफिल त्या रात्रीची स्मरते आहे पुरी
धुंद स्वरांची उब अजूनही जाणवते अंतरी
संगितातले दिग्गज ज्यांना विश्व सर्व मानते
असे गायिका गायक होते थोर जुने जाणते

राग बंदिशी ख्याल तराणे दोघांनी गायले
दोघांनी ही गाण्यामध्ये प्राण जणू ओतले
शिष्य गुरूंचे बसले मागे तानपुरे घेउनी
साथीला दोघेही वादक फारच होते गुणी

दोघांच्याही स्वरात होता फार छान गोडवा
थंडी होती सुखवत होता अंगाला गारवा
जमले होते मैफिलीस त्या श्रोतेगण मोजके
जाणकार जे संगितातले लोक असे नेमके

दुधात साखर घालत होते तबला संवादिनी
डोलत होते श्रोते त्यावर मंत्रमुग्ध होउनी
नादब्रह्म अवतरले तेथे त्यात सर्व रंगले
सुरात एका जणू सर्व ते तानपुरे छेडले

दोघांनी भैरवी गायली मैफिल अन् संपली
असे भारले होते सारे टाळी ना वाजली
प्रत्येकाच्या अंतरातली तार अशी छेडली
चित्त सुरांनी भारले जणू समाधीच लागली

स्तब्ध कुणी डोळ्यात जरासे अश्रूही दाटले
गंधित झाली रात्र सुरांनी धन्य धन्य वाटले
जणू मनाचे नाते होते आत्म्याशी जोडले
मैफिलीतले सूर मनावर कायमचे कोरले

जितू ओक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users