आदिशक्ती

Submitted by नितनवे on 5 March, 2026 - 06:29

हसते ती खुळी... म्हणून तुम्ही तिला 'भोळी ' समजलात?
मायेच्या ओलाव्याला तिची 'लाचारी' समजलात?
आतल्या जखमांनी आता निखाऱ्याचं रूप घेतलंय,
तुमच्या या ढोंगी जगाचं तिनं पारं डोकं फिरवलंय!

बाहेर पडली की तुमच्या नजरांच्या 'टोळ्या' सज्ज बसतात,
वस्त्रांमधून शरीराचा 'भूगोल' शोधत असतात;
रस्त्यांच्या वळणांपेक्षा तुमच्या 'लाळघोट्या' नजरांना चुकवलंय ,
तिला चवचाल म्हणणाऱ्याना तिने चारित्र्य शिकवलंय!

उंबरठ्यापाशी येताच जिथे अपेक्षांचे फास ओढले जायचे,
तिच्या रक्ताच्या घामावर जिथे कर्तव्याचे शिक्के मारले जायचे;
तिने आता नात्यांच्या नावाखाली दिलेलं ते ओझं सोडलंय,
'राबणारी वस्तू' होण्याचं गुलामीचं ते चक्र तिनं तोडलंय!

नकोय तिला तारणहार , ना कुणाचे खोटे आधार,
पुरे झाली तुमची 'दया', आता तिचा हुंकार उधळलाय
स्वाभिमानाचा जाळ, आता तिच्या काळजात शिरलाय
स्वतःच्याच श्वासांनी तिनं आता रणशंख फुंकलंय !

जाणवले तिज 'आदिशक्ती' ती, आधार साऱ्या विश्वाचा,
स्वतःसाठीच आता तिने वैचारिक 'जागरण' मांडलंय!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users