आठवांचे मोती

Submitted by Meghvalli on 4 March, 2026 - 02:39

चंद्राने शिंपिले ताऱ्यांनी सर्व आसमंत,
दरवळली रात्र अलगद, झिरपतं चांदणं नभांत।

सानिध्य तुझे दाटले मनाच्या अंतरडोहांत,
राग कलावती ची सुरावट गुंजते दूर डोंगरांत।

सागराच्या निळडोहांत शिंपल्यात दडले मोती,
तुझ्या आठवांच्या जणू जपून ठेवल्या ज्योती।

खिडकीशी जरा घुटमळला वारा, तुझे नाव गुणगुणत,
उमटल्या पाऊलखुणा जणू तू आलीस घरात।

प्रेमाची ही प्रेमवेल चढली हृदयास वेढूनी,मी गुंतलो त्या वेलीत तुझ्या स्मरणांत बिलगूनी।

शब्द सारे विरले, उरला फक्त श्वासात गंध,अलवार तो सुगंध ठेवला मी मनात बंद।

गुरुवार, ४/०२/२०२६ — ११:३५ AM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

Group content visibility: 
Public - accessible to all site users