मैत्रीचं आंदण

Submitted by Meghvalli on 1 March, 2026 - 03:05

दे पुन्हा एकदा हात हातात,
चल पुन्हा जाऊ त्या रानात।

पुन्हा ऐकू चल ते वनाचे गाणे,
चल ना सखे, सोड सारे बहाणे।

रानवारा झाडांत सळसळला,
भृंग कमळांत जाऊन बसला।

पारवा टिवटिवला दूर कोठे,
आवाज त्याचा बनांत साठे।

चल रानमेवा खुणावतो अजून,
चिंचा-बोरी पाहती वाट अजून।

चल बसू या तलावाच्या काठावर,
दगडांनी उठवू तरंग त्या पाण्यावर।

तु झालीस लेकुरवाळी, मी गृहस्थचारी,
वयाने का आणली मैत्रीत ही लाचारी?

चल देऊ झुगारून वयाचे बंधन,
चल पुन्हा घेऊ ते मैत्रीचे आंदण।

चल बसू पुन्हा शाळेच्या त्या बाकावर,
घंटा होताच पळू पुन्हा रानावर।

उरली आयुष्यात वेळ खूप थोडी,
चल चाखू पुन्हा रानमेव्याची गोडी।

सखे, दे पुन्हा एकदा हात हातात,
चल ना पुन्हा जाऊ त्या रानात।

रविवार, १/३/२६ , १२:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच आहे. पण माणसाच्या मनात का,कधी,कशी कोणती इच्छा जन्म घेईल याचा कही नेम नाही , आणि अनुभव सांगतो की बर्‍याचदा त्या इच्छा,उर्म्या अव्यवहार्य च असतात. _/\_