
दि.२७/२ रोजी येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना अग्रिम शुभेच्छा !
या विशेष दिनाच्या अनुषंगाने ‘मराठीतील पहिले. . .’ या उपक्रमा अंतर्गत ज्ञान व मनोरंजन या हेतूने मराठी भाषेसंबंधी संकलित केलेली काही महत्त्वाची माहिती लिहीत आहे. कुठल्याही प्रांतातील पहिली घटना ही समाजासाठी पथदर्शक ठरते म्हणून तिचे महत्त्व. सदर माहिती विविध जालसंदर्भातून आणि छापील मराठी ‘शब्दरत्नाकर’मधून घेतलेली आहे. ती अचूक असल्याचा दावा नाही कारण काही प्राचीन घटनांच्या संदर्भात ‘पहिली कुठली’ याबाबत भाषेच्या इतिहासकारांत मतभेद आहेत. वाचकांनाही एखाद्या मुद्द्याबाबत मतभिन्नता व्यक्त करावीशी वाटल्यास प्रतिसादांतून जरूर करावी. तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेसंबंधी ‘पहिले अमुकतमुक’ या स्वरूपाची अन्य काही माहितीही जरूर लिहावी.
१. बोलीभाषेचा उगमकाळ सांगणे कठीण असते.
२. लेखी भाषा-उगम : इ स. २२८ ते ४७८ हा ‘शिष्ट महाराष्ट्री’ भाषेचा काळ मानला जातो. या भाषेचा लोप होऊन मराठी भाषा बनली.
३. लिप्या :
* देवनागरी लिपीचा उगम प्राचीन ब्राह्मी लिपीतून झाला असून, तिची मुळे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सापडतात. पहिली लिखित मराठी भाषा इ. स. ४७८ मधील असावी. विकसित स्वरूपातील देवनागरी लिपीचा वापर सुमारे १०व्या शतकापासून सुरू झाला.
* मोडी लिपीचा उगम साधारणपणे १२६०-१३०९ या यादवांच्या राज्यकालात झाला. हेमाडपंत (हेमाद्रि पंडित) यांनी या लिपीचा विकास जलद लेखनासाठी केला होता.
४. विविध साहित्यिक व सांस्कृतिक आद्य घटना :
- ताम्रपट : (इ. स. ४८८, मंगळवेढे). त्यावरील मजकुराबाबत शब्दरत्नाकरात उल्लेख नाही.
- शिलालेख, पूर्ण वाक्य (इ. स. ९८३, श्रवणबेळगोळ) : "श्री चामुंडराये करवियले, गंगाराजे सुत्ताले करवियले”.
आद्यग्रंथ : ज्योतिषरत्नमालेवरील टीका
(सन१०३९ च्या पूर्वीचा एकही मराठी ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा (मराठी टीकेसह) काल याच सुमाराचा असल्याने श्रीपतिभट्टविरचित ज्योतिषरत्नमालेवरील टीका हा मराठी भाषेतला आद्यग्रंथ ठरतो.’(राजवाडे समग्र साहित्य खंड दुसरा, प्रस्तावना).
आद्य कवी : ?? मुकुंदराज (विवेकसिंधू : इ.स. ११८८) असा समज होता. पण, मुकुंदराज मराठीचा आद्य कवी नसून तो ज्ञानेश्वरानंतर सुमारे पन्नास वर्षांनी होऊन गेला व त्याचे उत्तरकालीनत्व त्याच्या भाषेवरूनही कसे दिसते ते ह. ना. नेने ह्यांच्यासारख्या संशोधकांनी दाखविले आहे. एकंदरीत आद्यकवीचा मुद्दा वादग्रस्त दिसतो.
शब्दकोश : महानुभाव ग्रंथकारांनी रचलेला मध्यकालीन मराठी शब्दांचा कोश हा बहुदा आद्य असावा.
'गद्यग्रंथ' व 'चरित्रग्रंथ’ : लीळाचरित्र (महिंभट, इ.स. १२७८)
छापील पुस्तक (१६१६): थॉमस स्टीफन्स लिखित 'ख्रिस्ती पुराण' हे मराठी आणि कोकणी मिश्रित भाषेत व रोमन लिपीत.
· नियतकालिक (वृत्तपत्र) : 'दर्पण'. हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबईतून सुरू केले. ते एप्रिल १८३२ पर्यन्त पाक्षिक आणि नंतर जून १८४० पर्यन्त साप्ताहिक होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे. 'दर्पण'च्या स्मरणार्थ दरवर्षी ६ जानेवारी हा 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
· मासिक : 'दिग्दर्शन'. (बाळशास्त्री जांभेकर, मे १८४०)
· स्वतंत्र सामाजिक कादंबरी : 'यमुनापर्यटन' (बाबा पदमनजी, १८५७). तत्कालीन समाजातील विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी कादंबरी. (गमतीचा भाग म्हणजे याच लेखकांनी १९५५मध्ये ‘अरुणोदय’ या पुस्तकात असे म्हटले आहे की, “आपल्याला कादंबऱ्या वाचण्याचा नाद नाही!”)
. 'विरामचिन्हांची परिभाषा' ही छोटेखानी पुस्तिका : मेजर थॉमस कँडी, १८५०.
मराठी प्राचीन गद्य आणि पद्य वाङ्गयात विरामचिन्हे दोनच होती. दंड (l) आणि विसर्ग (:). कँडी यांनी इंग्रजीतील 5 चिन्हे मराठी लेखनपद्धतीसाठी स्वीकारली :
1. स्वल्पविराम (,) 2. अर्धविराम (;) 3. पूर्णविराम (.) 4. प्रश्नचिन्ह (?) 5. उद्गारचिन्ह (!).
( लेखिका : पहिली स्त्री लेखक यासंबंधी ठोस पुरावा मिळत नसल्याने मूळ नोंद संपादित केली आहे).
दिवाळी अंक : 'मनोरंजन' (१९०९), संपादक काशिनाथ रघुनाथ आजगावकर (का. र. मित्र)
· नाटक : विष्णूदास भावे लिखित 'सीता स्वयंवर'. हे ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सांगली संस्थानाच्या दरबारात पहिल्यांदा सादर झाले.
· चित्रपट (मूकपट) : दादासाहेब तोरणे यांचा 'श्री पुंडलिक', १९१२
( दादासाहेब फाळके निर्मित 'राजा हरिश्चंद्र' १९१३चा आहे).
· बोलपट : अयोध्येचा राजा (१९३२), व्ही. शांताराम दिग्दर्शित.
मुलींची शाळा : महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात. या शाळेत सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका.
ही माहिती प्रस्थापित असून इतिहासाच्या पुस्तकांमध्येही आलेली आहे. परंतु, या माहितीपेक्षा काही वेगळे सांगणारी माहिती वृत्तपत्रीय लेखातून वाचायला मिळते.
त्यानुसार स्वतः फुले दांपत्य ज्या शाळेत शिकले ती म्हणजे पुण्यातील सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा. या शाळेची स्थापना १८२७ मधील असून ती मराठी माध्यमाची असल्याचं इथे लिहिलंय.
1840 पर्यंत मिचेल या स्कॉटिश दाम्पत्याच्या पुण्यात 5 मुलींच्या शाळा चालू झालेल्या होत्या. म्हणजेच, पहिली मराठी शाळा अथवा पहिली मुलींची मराठी शाळा कोणती याबाबत संदिग्धता असल्याने इतिहास संशोधकांचे मत घ्यावे लागेल.
. .
· अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ('मराठी ग्रंथकार संमेलन') : ११ मे १८७८ रोजी पुण्यातील हिराबागेत. अध्यक्ष : न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. (गेल्या १४८ वर्षात एकूण ९९ संमेलने झालेली आहेत).
साहित्य अकादमी पुरस्कार : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, १९५५ (वैदिक संस्कृतिचा विकास)
ज्ञानपीठ पुरस्कार : वि. स. खांडेकर, १९७४ (ययाति कादंबरीसाठी)
एकाक्षरी शब्दांचा लघुकोश (बहुधा पहिला) : प्रा. भा.म.गोरे, १९९२. मराठीतील एकाक्षरी शब्दांची संख्या कोशनिर्मिती करण्याइतपत मोठी आहे हे पाहून आपण स्तिमित होतो.
सरस्वती सन्मान पुरस्कार : विजय तेंडुलकर, १९९३ (‘कन्यादान’ नाटकासाठी). भारतीय समाजव्यवस्थेतील जातीयता, वर्गकलह आणि आदर्शवादाचे अपयश यावर परखड भाष्य करणारे हे प्रभावी आणि वादग्रस्त ठरलेले नाटक.
संकेतस्थळ स्थापना (मराठी व देवनागरी लिपीत) : अर्थात (आपली) मायबोली ! (१६/९/१९९६). त्याबद्दल संस्थापकांचे विशेष अभिनंदन !
सन २०१० नंतर संगणकावरील देवनागरी लेखनाबाबत ज्या तांत्रिक सुविधा झपाट्याने विकसित होत गेल्या त्यासंबंधी एखाद्या जाणकाराने काही लिहिल्यास बरे होईल.
असे आहेत हे मराठी भाषेच्या विकासातील काही महत्त्वाचे टप्पे. भाषेच्या विविध पैलूंसंबंधी पहिलीवहिली कामगिरी करणाऱ्या वरील सर्वांना मानाचा मुजरा ! संपन्न प्राचीन वारसा असलेल्या आपल्या मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे 'अभिजात भाषेचा' दर्जा प्रदान करण्यात आला हे तर आपण जाणतोच.
मराठीच्या उत्क्रांतीदरम्यान संगणकावरील मराठी-देवनागरी लेखन हा विसाव्या शतकाच्या अखेरीस लागलेला महत्त्वाचा तांत्रिक शोध म्हणावा लागेल. या सुविधेमुळेच जगभर विखुरलेली आपण सर्व मराठी माणसे एकमेकांशी मातृभाषेतून दैनंदिन सुलभ लेखनसंपर्क करीत आहोत. हे मैत्रीचे बंध असेच दृढ राहोत ही सदिच्छा !
*******************************************************
लेखात प्राचीन काळापासून ते
लेखात प्राचीन काळापासून ते संगणक युगाच्या प्रारंभापर्यंतच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला आहे. संगणक युगातील काही आद्य गोष्टींबद्दल कुतूहल वाटते. जसे की, मराठीतील पहिले इ-दैनिक अथवा इ-पुस्तक कोणते असावे?
याची खात्रीशीर माहिती मिळाल्यास तत्सम मुद्दे जरूर लिहा.
वा !
वा !
इतक्या सगळ्या महत्वाच्या नोंदी एकत्रित इथे मांडल्याबद्दल धन्यवाद!
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुमच्याकडून या वर्षी काय असेल याची एक उत्सुकता होती.
खूप छान. बर्याच नोंदी
खूप छान. बर्याच नोंदी कष्टपूर्वक मिळवल्या आहेत याची जाणीव होते आहे.
खूप छान. बर्याच नोंदी
खूप छान. बर्याच नोंदी कष्टपूर्वक मिळवल्या आहेत याची जाणीव होते आहे.
>>>> + १
चांगले संकलन.
चांगले संकलन.
यंदा मायबोलीवर मराठी भाषा गौरव दिनाचा उपक्रम नाही
छान माहिती.
छान माहिती.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
* यंदा मायबोलीवर मराठी भाषा गौरव दिनाचा उपक्रम नाही
>>>>> खरंय.
मराठी भाषा या विषयावर ठराविक पद्धतीच्या लेखाऐवजी जरा वेगळी कल्पना लढवली.
छान संकलन @ हेमंतकुमार
छान संकलन @ हेमंतकुमार
पहिले मराठी नाटक : विष्णूदास भावे लिखित 'सीता स्वयंवर'. ५ नोव्हेंबर १८४३… वा !
पहिले “व्यावसायिक” मराठी नाटक कोणते असावे याबद्दल उत्सुकता आहे. जालावर उलटसुलट दावे आहेत.
पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र
पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र नाही हे वाचून चकित झालो. दादासाहेब तोरणे and श्री पुंडलिक चित्रपट याबद्दल कधीच काहीच ऐकले नाही. काय कारण असावे? चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कारही दादासाहेब फाळके ह्यांच्याच नावाने आहे
तिता - 2013 मध्ये दादासाहेब
तिता - 2013 मध्ये दादासाहेब तोरणे यांचा मुलगा अनिल तोरणे, सून मंगला तोरणे आणि मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचे सहकारी विकास पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना श्रेय मिळावे, अशी मागणी केली होती. 1912 मध्ये बनलेला श्री पुंडलिक हा चित्रपट एका नाटकाचे रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे त्याला पहिल्या फीचर फिल्मचा दर्जा देता येणार नाही, असे म्हणत त्यांची याचिका फेटाळण्यात आली. हा चित्रपट परदेशात प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला असून त्याचा कॅमेरामनही परदेशी असल्याचे सांगण्यात आले. तर एका वर्षानंतर प्रदर्शित झालेला दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट पूर्णपणे भारतात तयार झाला होता.
छान संकलन.
छान संकलन.
) होतील. तु तो ती अशी. हा शब्दकोश कोणी बघितला आहे का? फार उत्सुकता आहे.
एकाक्षरी शब्दकोश! फारच रोचक. मराठीतील ३६ व्यंजने + १२ स्वर. अर्थात प्रत्येक अक्षर काही अर्थपूर्ण असणार नाही. पण त्यांची परम्युटेशन्स ही (हे पण एक आणि 'हे' पण!
भरत +१. यंदा मभादि कार्यक्रम का नाही केले कोण जाणे!
या वर्षी कुसुमाग्रज जन्मले
या वर्षी कुसुमाग्रज जन्मले नाहीत. वि वा शिरवाडकर पण नाहीत.
एखाद्या मायबोलीकराच्या वाढदिवसाचे निमित्त गाठून त्या दिवशी करूयात मराठी भाषा कुमार गौरव दिन.
अतिशय चांगली चर्चा आणि पूरक
अतिशय चांगली चर्चा आणि पूरक माहिती देखील.
* पहिल्या व्यावसायिक नाटकाप्रमाणेच पहिली एकांकिका आणि पहिला एकपात्री प्रयोग कोणता याबद्दल मला देखील उत्सुकता आहे.
* मी दोन वर्षांपूर्वी गोरेंचा एकाक्षरी लघुकोश विकत घेतलाय. तो 85 पानी आहे. त्यातील अनेक रोचक शब्द सुमारे वर्षभर शब्दवेध धाग्यावर चर्चेसाठी घेतले होते.
पहिल्या छापील पुस्तकाबाबत
पहिल्या छापील पुस्तकाबाबत बहुतेक सगळ्या माध्यमांमध्ये 1805 सालच्या विल्यम कॅरेलिखित पुस्तकाचा उल्लेख असतो कारण ते पहिले देवनागरीत छापलेले पुस्तक आहे.
वर लेखात उल्लेखलेले सन 1616 मधील पुस्तक मराठी भाषेतील व रोमन लिपीतील आहे.
धन्यवाद भरत. रोचक माहिती
धन्यवाद भरत. रोचक माहिती
इ-पुस्तक कोणते असावे? >>>>
इ-पुस्तक कोणते असावे? >>>>
पहिले मराठीतील ई -पुस्तक - डी. एन. नगरकर यांचे
उद्योग व्यासाची साधना हे २००० साली samrudhiprakashan.com या संकेत स्थळावर प्रकाशित झाले.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. . .
२६फेब्रुवारी : विशेष दिन प्रस्ताव
भारतावरील ब्रिटिश राजवटीच्या काळात मेजर थॉमस कँडी यांनी मराठी भाषेसाठी कोश निर्मिती, लेखन, संपादन, भाषांतर आणि व्याकरण या सर्व कामांत मोठे योगदान दिलेले आहे. यंदा त्यांचा १५०वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने साधना साप्ताहिकाने असे सुचवले आहे की, कॅन्डींचा स्मृतिदिन म्हणजेच २६फेब्रुवारी हा यापुढे ‘विरामचिन्हे दिवस’ म्हणून साजरा करता येईल.
आज पुण्यात ‘थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान’ या विषयावर डॉ. प्रदीप कर्णिक यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे.
कॅन्डींचा सन १८५० मधील ‘विरामचिन्हांची परिभाषा’ हा लेख इथे वाचता येईल :
https://www.weeklysadhana.in/view_article/Definition-of-punctuation-marks
उत्तम संकलन कुमारजी.
उत्तम संकलन कुमारजी.
खुप अभ्यास केलाय हे कळ्तं आहे लेख वाचून.
काशीबाई कानिटकर या पहिल्या
काशीबाई कानिटकर या पहिल्या लेखिका नव्हेत.
* काशीबाई कानिटकर >> धन्यवाद
* काशीबाई कानिटकर >> धन्यवाद. चु.भू. दे घे
मराठीतील पहिल्या कादंबरीकार असे बरेच संदर्भ म्हणताहेत.
महदंबा (१३ वे शतक ): यांना मराठीतील पहिली कवयित्री मानले जाते.
त्याही आधी कोणी ?
छान माहिती आणि उत्तम संकलन
छान माहिती आणि उत्तम संकलन
सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक
सेंट मार्गारेट मराठी प्राथमिक शाळा अजूनही सुरु आहे.
दिशादर्शक बोर्डाचा काही वर्षांपुर्वी काढलेला फोटो इथे बघता येईल
https://www.maayboli.com/node/34769?page=4
सुरेख संकलन.
सुरेख संकलन.
तुम्ही Doctor of medicine आहात का Doctor of literature हे अनेकदा कळेनासे होते
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
* Doctor of literature
>> छे हो ! Student of literature मात्र आहे !
इथल्या बऱ्याच शिक्षकांकडून शिकत आहे
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
श्री कृ कोल्हटकरांच्या या रचनेला महाराष्ट्र गीत अशी लोकमान्यता आहे. अधि़कृत नसले तरी ते महाराष्ट्राचे राष्ट्रगीत समजले जाते. ते सर्वप्रथम कुणी संगीतबद्ध केले आणि सर्वप्रथम गायले गेले याबद्दलची माहिती आहे का ? कारण ही जी माहीती जालावर सापडते त्यापेक्षा वेगळंच तथ्य अचानक आढळून आले. कुणाला नक्की माहीती असेल तर कळवावी ही विनंती.
“भारतातील मुलींसाठीची पहिली
“भारतातील मुलींसाठीची पहिली मराठी शाळा कोणती?”
हा खरोखर इतिहास संशोधनाचा विषय दिसतो आहे. जितके संदर्भ आपण बघत जाऊ तितकी वेगळी आणि अधिक जुनी माहिती मिळताना दिसते. उदाहरणार्थ,
इथे काही रोचक माहिती मिळाली :
https://thesatyashodhak.com/cynthia-farrar-missionary-woman-who-inspired...
त्या माहितीनुसार मुलींसाठीची पहिली शाळा मार्च १८२४मध्ये मुंबईतील अमेरिकी मराठी मिशनने सुरू केली होती. ती गंगाबाई नावाच्या स्थानिक शिक्षिकेने चालवली होती. परंतु शाळा सुरू झाल्यानंतर दोनच महिन्यांनी कॉलराचा मोठा उद्रेक झाला आणि त्यात या गंगाबाई देखील मरण पावल्या. परिणामी ती शाळा बंद पडली असावी.
म्हणजे,
गंगाबाई या आद्य शिक्षिका ठरतात का?
. . . संशोधकांनी सांगावे !
आद्य क्रांतीकारक वासुदेव
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे क्रांतीचे शिक्षण क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांती सेनेत झाले. लहुजींनी ब्रिटीशांची शस्त्रास्त्रांनी भरलेली एक वॅगन लुटली, त्या शस्त्रास्त्रांची मोजदाद करण्याचे काम वासुदेव बळवंत फडके यांनी केले होते.
मग आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांना का म्हणू नये याचे उत्तर काही लोक असे देतात कि, लहुजी साळवे कार्यरत होते तेव्हां ईस्ट इंडीया कंपनीचे सरकार होते. जेव्हां वासुदेव बळवंत फडके कार्यरत झाले तेव्हां ब्रिटीश सरकारचा गव्हर्नर राज्य करत होता. यामुळे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हेच ठरतात.