बिनकामाच्या नोंदी- ४

Submitted by संप्रति१ on 23 February, 2026 - 01:21

१. काय करावं बरं आता? ही संध्याकाळ कशी कुठे घालवावी? खरंतर एकूण आयुष्यच कुठे कसं घालवावं? असे च्युतिया टाईपचे विचार यायला लागले की पटकन एखादी विधायक कृती करून टाकणं बरं राहतं. म्हणून मग दाढी करायला गेलो.‌

तर सलूनचं शटर अर्धं खाली ओढलेलं. वाकून आत गेलो. शटर ओढण्याचं कारण नंतर सलूनवाल्यानं बोलताबोलता सांगितलं, "तिथं पलीकडं देशी दारूचा गुत्ता है. तिथले बेवडे संध्याकाळच्या टायमाला इथं येऊन आरशापुढं भांग पाडत उभं राहतेत. जरा काय बोलायला गेलं तर लगीच भांडायला लागतेत. कोण नादाला लागणार? पेल्यावर लोकं बादशाह झाल्याले असतेत."

'खरंय. देशी पेल्यावर बेभान होतात हो लोक. मातीत गडाबडा लोळायला बी कमी करत नाईत.'- मी.

''बरंच माहितीय की तुमाला.''- सलूनवाला.

२. चितळे मिठाईवाले. तिथं आपल्या हालचालींत अकारण बुजरेपणा येतो. प्रापंचिक स्त्री पुरुषांसारखं सराईतपणे वावरता येत नाही. एकतर सांसारिक मनुष्यांना जे दैनंदिन घरगुती वगैरे पदार्थ लागतात त्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. शिवाय एखाद्या पदार्थाची क्वांटिटी किती लागेल त्याचाही अंदाज येत नाही. मागताना एकप्रकारची दचक जाणवते. आणि अचानक कुणी ओळखीचं भेटेल म्हणून सदोदित दबकत वावरणं हे तर काय आता नेहमीचंच झालेलंय. आणि असंय की ह्या गोष्टींना काय इलाजही नसतो. आता आपण माणूस म्हणून हे असेच असणार.!

मागं एकदा 'दुर्वांकुर'ला जेवायला बसलेलो, तर समोर एक जपानी मुलगी येऊन बसलेली.‌ माझ्या शेजारचा एक काळूराम लगेच तिच्याबरोबर मस्त गप्पाटप्पा हाणायला लागला. गळ्यात पडायचाच बाकी होता तिच्या.

ती काही महिन्यांपूर्वी हिंजवडीत कामानिमित्त आली होती. तिची आई भारतीय ओरिजीनची होती म्हणून ती इकडं भारतीय जेवण ट्राय करायला आलेली. हारूकी मुराकामीच्या कादंबऱ्यांतनं जो काही अंशी जपान ओळखीचा झालेला, त्याअनुषंगानं बोलण्यासाठी थोडाफार मजकूर मनातल्या मनात जुळवत चुपचाप जेवत राहिलो. पण खूप वाचलेलं असणं आणि स्त्रीशी धडपणे बोलता येणं, ह्या दोन ऑलटुगेदर वेगळ्या गोष्टी आहेत. एक ढिम्म शब्दही शेवटपर्यंत तोंडातून बाहेर पडू शकला नाही. त्या काळूरामच्या मानानं तर बरंच बरं बोलू शकलो असतो आपण, पण काय आता, नशीब गांडू अन् कुणाला सांगू?

३. रात्री एक स्वप्न. बाईकची क्लच वायर अचानक तुटली. चरफडत ढकलत ढकलत गॅरेजवर नेली.
तिथं दिसलं की एका भटक्या कुत्र्याला काही जखमा झालेल्या आहेत. आणि गॅरेजवाला त्याच्या सगळ्या अंगावर मेंदी चोळत आहे. कुत्रा शांतपणे उभा राहून चोळून घेत आहे.

हा प्रकार औषधी आहे की नाही, कुणास ठाऊक, पण कुत्र्याला त्यामुळे बराच आनंद झालेला दिसला. दूरवर पळत पळत जाणं आणि परतून त्या गॅरेजवाल्याच्या अंगाशी झोंबाळणं, यातून ते स्पष्ट झालं. गार गार वाटत असेल त्याला. हा डॉगेश आता नजीकच्या भविष्यात पुन्हा कुठं मारामारी करायला जाणार नाही, अशी आशा आहे.

बाकी आता स्वप्नंसुद्धा बाईकची क्लच वायर तुटल्याची पडायला लागली म्हणल्यावर अवघडच झालं म्हणायचं.

४. एका बाईकवर तीन जेनझी अल्फा मेल ट्रिपल सीट फुल तर्राट हो हल्ला करत कर्कश हॉर्न वाजवत कट मारत सिग्नल तोडत रॉंग साईडनं घुसत घुसत जातात. अशा पद्धतीनं लाखो वर्षांची उत्क्रांतीची प्रक्रिया रिव्हर्स करून सिव्हिलायझेशनचे सगळे निर्बंध झुगारत पुन्हा आदिम स्वरूप प्रकट करण्याची प्रेरणा ह्यांना त्या 'ॲनिमल'वाल्या वांग्याकडनं मिळाली असेल का? परंतु अल्फा मेल तर एकच असतो म्हणे एका टोळीत.!

५. पुन्हा एकदा 'उंबरठा'. कितव्यांदा कुणास ठाऊक.

स्मिता पाटील. अधिक्षिका, स्मिता पाटील.
महिलाश्रमाच्या त्या आवारातून ताठ कण्यानं वावरणारी, जबाबदाऱ्यांची जाणीव असणारी, अधिकार तडफेनं राबवणारी, दबाव झुगारणारी, सबॉर्डिनेट्सना हलगर्जीपणाचा जाब विचारणारी, वॉचमनच्या 'सब ठीक है' च्या‌ घुमणाऱ्या आरोळीसोबत मध्यरात्री एकटीच फायली चाळत बसणारी स्मिता पाटील. सगळी देहबोली एकदम अशी Calm and composed. चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण कमालीचं. एक बारीकशीही गैरजरूरी हालचाल नाही. सगळ्या हालचाली कसलेल्या. आणि त्यात एक ग्रेसफुल डौल. काय मस्त कॅरी करते यार ही स्वतःला.!

६. इतकुसा रविवार. किती पुरवून पुरवून वापरायचा.!
तरी बरं, संध्याकाळी कोथरूडला कबीरांवरचं ते नाटक चुकवलं नाही. एकदम क्लास प्रकार होता. परकाया प्रवेश, ऐकलं होतं. आज डोळ्यांसमोर घडताना बघितलं. त्या कलाकारावर कबीरच उतरल्यासारखं.

एक प्रसंग.
एकदा कबीरांकडं एक मुल्ला येतो कुणीतरी दुरून. तो पुस्तकी मुल्ला असतो. कबीरांनी घराबाहेर एक डुक्कर बांधून ठेवलेलं असतं. मुल्ला विचारतो, हे काय?
कबीर म्हणतात, काही लोकं डोक्यात घेऊन फिरतात. मी घराबाहेर बांधलं.‌

एकदा एकजण कबीरांशी कसलातरी वादविवाद करायच्या उद्देशानं येतो. येताना बैलगाडी भरून पोथ्या घेऊन आलेला असतो. 
कबीरांची पोरगी त्याला म्हणते की कबीर शिखरावर राहतात. तिथवरचा रस्ता एकदम निसरडा, आणि अरूंद.‌ मुंगीचं पाऊल घसरेल. तिथं तुझी बैलगाडी कशी जाणार.!

७. फूटपाथकडेला बसलेली एक भिकारीण. तिच्या शेजारी एक भटका कुत्रा शेपूट हलवत उभा. ती त्याला जवळ बोलावते. बोचक्यातून कायतरी काढून खायला देते, गोंजारते. म्हणते, "बस हितं, तुला नाय कुनी हाकलत. मी हाय गी तुला कुनी काय बोललं तर."

('भिकारीण' हा एक क्रूर शब्द आहे.)

८. चार वर्षांचे डिग्री कोर्सेस. आयुष्याचाच छोटासा प्रोटोटाईप.

फर्स्ट ईयर - ब्रह्मचर्याश्रम. कडक साधना. उदात्त ध्येयवाद. सिन्सिॲरिटी. इनोसन्स. ओबिडियन्स. एक भाबडा शिष्यत्वभाव. सगळ्याविषयी कुतूहल.

सेकंड ईयर - गृहस्थाश्रम. आपापल्या कुवतीप्रमाणं रंगारंग किंवा समजा डांगडींग वगैरे स्वरूपाचे कार्यक्रम. लव्ह, सेक्स, दारू आणि यारीदोस्ती वगैरे. आपण इथे असण्यात आनंद आहे, असं वाटण्याचा काळ.

थर्ड ईयर- वानप्रस्थाश्रम. काहीतरी चुकतंय याचा अंदाज आलेलाय पण मन अजून पूर्णपणे विरजलेलं नाही. काही रंगढंग अजेनही इंटरेस्टिंग वाटत आहेत.

लास्ट ईयर- संन्यासाश्रम. गलबताचा बंदरातला सुरक्षित मुक्काम संपत आलेला आहे आणि समोर खुला उफाणलेला समुद्र रोरावतो आहे. अज्ञात भविष्याचं भय. बाकबूक खरंतर. मिडलक्लास भाषेत, संध्याछाया भिववीती हृदया वगैरे. कशालाच काय अर्थ नव्हता, याचा साक्षात्कार. आपला फार मोठा च्युतिया काटला गेलेला आहे, याची लख्ख जाणीव.

९. त्या गार्डनमधला विशिष्ट हिस्सा कपल्ससाठी राखीव आहे. मोस्टली कोवळे टीनेजर जेनझी कपल्स. कॉलेजवयीन म्हातारे जेनझी सहसा तिकडे फिरकत नाहीत, ते ओयोपर्यंत पोचलेले असणार. मिलेनियल्सना आपापली घरं असतात. जनरेशन एक्सवाल्यांमध्ये आता या क्षेत्रात आणखी झेंडे गाडण्याची इच्छा किंवा खरंतर जोर उरलेला असेल, असं वाटत नाही. बाकी मग ग्रेट जनरेशनवाल्यांना काय आता सगळंच लवडेन् भोज्यम् !

तर ही वॉचमन आणि कपल्स यांच्यातील परस्पर सामंजस्यावर आधारित सिस्टीम. म्हणजे फक्त किसिंग अलाऊड.‌ तुम्हाला तेवढीच ढील दिली जाऊ शकते. तुम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅंडिंग मोडू शकत नाही. वॉचमनच्या मृदू स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकत नाही. समजा तो आवेग कंट्रोलच्या बाहेर जाऊन आता हे लोक बेंचवर अगदी आडवेच होतात की काय, अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास एक जोरदार शिट्टी वाजवली जाते. आणि संबंधित दोघेजण जैवरासायनिक महापुरातून गटांगळ्या खात किनाऱ्याला लागतात. मग माफक लाजणं किंवा समजा विस्कटलेले केस नीट करणं वगैरे.

आता या ठिकाणी, काय हो, तुमची काय तिथं वॉचमन पदी नियुक्ती झालेली आहे काय? किंवा तुम्हाला काय लाज लज्जा शरम आब्रू वगैरे काय हाय का नाय? वगैरे मुद्दे उपस्थित करून आता हा विषय मॉरल ग्राऊंडवर न्यायचा प्रयत्न करू नका प्लीज. एथिकल हायग्राऊंडवरून बोलूच नका प्लीज. नैतिकतेवर बोलणार असाल तर तुम्ही इथून जावा बरं प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता पाटील.....त्यात एक ग्रेसफुल डौल. काय मस्त कॅरी करते यार ही स्वतःला.!>>>>पूर्ण पॅरा भारी
लिहीत राहा बिनकामाच्या नोंदी!

तुम्हीच अगोदर ज्या पुस्तकांबद्दल लिहिलं होतं त्याचा लेखक Zoran Zivcovicची आठवण येत आहे.

हा हा हा. लोलसंपृक्त!

>>काय करावं बरं आता? ही संध्याकाळ कशी कुठे घालवावी? खरंतर एकूण आयुष्यच कुठे कसं घालवावं? <<
>> तिथले बेवडे संध्याकाळच्या टायमाला इथं येऊन आरशापुढं भांग पाडत उभं राहतेत. <<

हा हा. बघा म्हणजे तुम्हाला अस्तित्ववादी प्रश्न पडला तर तुम्ही थेट सलून मधे जाता आणि त्यांना पडला तर ते व्हाया गुत्ता सलून मधेच येतात. मग अतिवास्तववाद रिचवून सगळे आरशासमोर मॅजिकल रियालिझम.

>> आयुष्याचाच छोटासा प्रोटोटाईप <<
apt.

शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट मधे काट्या पडतात. अशा वेळेस भावकी तोडावी लागते.

>> स्मिता पाटील <<

आपल्याला हा प्रकार कधीच आवडला नाही. काही लोक लता सोडून आशा मुद्दाम आवडून घेतात तसे काहीसे उगाच स्मिता स्मिता करीत हिंडत असतात असे मला वाटते. या लोकांच्यामधली सीनियर व्हॅराइटी म्हणजे ते साहिल अमृता इमरोज यांच्या थ्रीसम चुत्यप्पाला भुलणारे.

रॉय >>> १००+
मला साहिर अमृता आणि इमरोजच्या त्रिकोणाच्या भारावून जायला वगैरे होत नाहीत. साहिर आणि अमृताचं एवढं प्रेम होतं आणि तरीही इमरोझ तिच्या आयुष्यात होता तर Imroz was shortchanged. त्याने ती भूमिका स्वतःहून स्वीकारली असेल तरी इतरांनी साहिर अमृता उसासे टाकणं बावळट्टपणाचं आणि इमरोझवर अन्याय करणारं आहे. मुळात त्रिकोण चौकोन आणि अजून कशात कोण कुणाच्या किती इंटेन्सिटीने प्रेमात आहेत ही काय जाहीर चर्चेची गोष्ट आहे का?
आता मारा दगडं मला बिनधास्त. हुश्श!

आवडलं.
<एक बारीकशीही गैरजरूरी हालचाल नाही.> तसं यात एकही गैरजरूरी शब्द नाही.

भारी लिहिलय.

देशी गुत्त्या आणि तुमच्या बिनकामाच्या नोंदी - दोन्हीवरून हे आठवले.

https://www.maayboli.com/node/28074

त्या दिवशी दोस्त जादाच फ्रस्ट्रेट झाला व्हता. म्या भेटताच मला म्हन्ला, 'बबर्‍या, लायब्ररीमंदी चालतोस का? लई दिस झाले.'
म्या जरा पॉज घितला. मंग म्हन्लं, 'आजच्याला नगं राव, स्सालं सकाळच्याला डोस्कं धरतं, हँगओव्हर झालं की मंग सारा दिस फुकटछाप जातो. उद्दाच्याला कामंबी लई हायेत. तब्येतबी पैल्यावानी साथ देत न्हाई.'
त्यो म्हन्ला, 'यवडा कामून भाव खावून र्‍हायलास? जादा टाईम न्हाई बसायचं. रॉयल स्टॅगच्या दोनेक स्टोर्‍या वाचू, जादा न्हाई. तुला 'हॉट' वाचायचं नसंन तं तू कोल्डमंदी वाच. ऑस्ट्रेलियाचा फोस्टर बराय म्हने, टाईमपास.'
म्या म्हन्लं, 'दोस्ता, आज लई फॉरेन ऑथर्सचे नाव घिवून र्‍हायलास? सांप्रतला देशी ऑथर्स आठवत न्हाई का कोनी दमदार?'
तसं त्यो म्हन्ला, 'बबर्‍या स्टेटस्चा क्वश्चनै. आता पैले दिस र्‍हायले न्हाईत. आन् देशी ऑथर्स कवाकवा लय इमोशनल लेव्हलला नेतेत, आपन त्येंच्यात यवडं इन्वॉल्व्ह व्हतो की मंग आपन आपले र्‍हात न्हाई. इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी आपलं कायबी डिव्होशन न्हाई आसं अन्नेसेसरी आपल्याला वाटू लागतं आन् आपल्या डोळ्याला आपसूक पानी येतं. त्येच्यापेक्षा आपले फॉरेन ऑथर्स कवाबी बरे आस्तेत. त्येंच्या स्टोर्‍याबी लाईट आसतेत आन् जादा इमोशनल व्हन्याचा टाईमबी येत न्हाई.'

कबीर म्हणतात, काही लोकं डोक्यात घेऊन फिरतात. मी घराबाहेर बांधलं.‌
>>> भारीच.
ह्या नोंदी पण आवडल्या.
लिहित रहा.

तुमची निरीक्षणशक्ति अफाट आहे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, प्रसंग, गहन पण विनोदी ढंगाने, थोडेसे टोचणारे वास्तव तुम्ही नेमके पकडता. एकीकडे विनोद, लिखाणातली खुमासदारी, एकटेपणा, आत्मपरीक्षण आणि समाजाकडे पाहण्याचा समंजस दृष्टिकोन ही खासियत वाटते मला.

पटापट तुम्ही कुठून कुठे घेऊन गेलात सलूनपासून कबीरांपर्यंत, जेनझीपासून ‘उंबरठा’पर्यंत आणि भटक्या कुत्र्यापासून भिकारीणपर्यंत. हा प्रवास भिरभिर करायला लावणारा असला तरी, ज्या त्या प्रसंगांची ठराविक जाणीव करून देतोच.

तुमच्या या बिन कामाच्या नोंदी भलत्यात रंजक आहेत. पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत आहे मी.

मस्त आहेत या नोंदी… सगळ्याच आवडल्या.

आपल्याला हा प्रकार कधीच आवडला नाही. काही लोक लता सोडून आशा मुद्दाम आवडून घेतात तसे काहीसे उगाच स्मिता स्मिता करीत हिंडत असतात असे मला वाटते>>>> लताद्वेष्टे लोक कान बंद करुन वावरतात काय Happy Happy एनी वेज… स्मिता भारतरत्न नसेल पण तरीही तिच्यापेक्षा जास्त चांगल्या भारतीय नटीवर एक छानसा लेख लिहा. वाचायला आवडेल. तुमचा आक्षेप उंबरठा चित्रपटावर असेल तर सहमत. मलाही तो आवडला नाही. पण बिनकामाची नोंद उंबरठ्याबद्दलची नसुन स्मिताबद्दल आहे.

स्मिता अत्यंत रटाळ NSD छापाचा नभिनय करणारी सुमार अभिनेत्री होती असे माझे स्पष्ट मत आहे. रंगाने सावळी म्हणून एक्सट्रा कौतुक करणारे देखील रंगीस्ट म्हणायला पाहिजेत. मला कधी नाही वाटले बुवा सावळेपणाचे कौतुक. मी फक्त अभिनयबद्दलच बोलतो.

म्हणजे मला ओव्हरप्ले करणाऱ्या अभिनेत्र्या आवडतात असा नव्हे. कदाचित स्मिताला सगळे दिग्दर्शक तसलेच लाभले असावेत. कदाचित मला आवडणारा रोल करणे तिच्या भाग्यात नसावे.

स्मिताबद्दलची मतं पटली नसली तरी रंगीस्ट शब्द आवडला.
तिच्या व्यक्तीमत्वात विशेषतः डोळ्यात काहीतरी धारदार होतं जे फार रेअर असतं.

नो थँक्स!

>> विशेषतः डोळ्यात काहीतरी धारदार होतं जे फार रेअर असतं. <<

असं काही नसतं. प्रत्येकालाच गौतम राज्याध्यक्ष सापडत नाही. भाषेतून आपण अनेक गोष्टी ठळक करतो त्यापैकी ही एक. म्हणजे अल पचिनोच्या डोळ्यात काही तरी धारधार होते, तो नजेरेनेच गार करू शकत असे वगैरे असे. लोकांना तशी सिनेमॅटोग्राफी दिसलेली असते. प्रत्यक्षात अल पचिनो रंग उतरवून समोर आला तर त्याला कुणी हिंगलले देखील नसते.

. प्रत्येकालाच गौतम राज्याध्यक्ष सापडत नाही. भाषेतून आपण अनेक गोष्टी ठळक करतो त्यापैकी ही एक. म्हणजे अल पचिनोच्या डोळ्यात काही तरी धारधार होते, तो नजेरेनेच गार करू शकत असे वगैरे असे. लोकांना तशी सिनेमॅटोग्राफी दिसलेली असते>>>>>

गौ रा फक्त फोटोग्राफर होता. उत्तम फोटोग्राफर होता. स्मिताने वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम केले. तिचे डोळे उठुन दिसतात तिच्या चेहर्‍यावर आणि ते सुंदरही दिसतात. हल्ली फे बु वर भुमिकामधली दृश्ये दिसताहेत. भाळावर मोठा कुंकवाचा टिळा व खाली दोन मोठे टपोरे डोळे खुप छान दिसतात.

बाकी पडद्यावर जे भारदस्त व दैवी दिसतात ते प्रत्यक्षात तसे वाटणार नाही याच्याशी सहमत. पण ते तसे वाटणे याचे काही श्रेय कलाकाराला द्यायला हरकत नसावी. कलाकाराचे त्यात काहीच नसेल तर तुषार कपुर व सोनम कपुर ही नावेही जबरदस्त अभिनेते म्हणुन घेता आली असती. त्यांच्यामागे फार मोठी प्रॉडक्शन हाउसेस असुनही त्यांची अजिबात छाप पडु शकली नाही.

>> स्मिताने वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम केले. तिचे डोळे उठुन दिसतात तिच्या चेहर्‍यावर आणि ते सुंदरही दिसतात. <<

एकदा ही फोटोग्राफी मधून (म्हणजे केवळ फोटो मधून नव्हे) नजरेनेच गार करू शकते असे सगळीकडे झाल्यावर प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्या नजरेनेच रसिकांना गार करायचे असते. म्हणून स्मिता प्रत्येक भूमिकेत स्मिता पाटीलच असते. त्यात पुन्हा NSD छापाचा नभिनय. मग ती आदिवासी ठाकर असो किंवा गाव की छोरी असो. सगळीकडे स्मिता पाटीलच. समजा एकाद्या अल्टरनेट युनिव्हर्स मधून चुकून तिने मुन्नी बदनाम हुई हा आयटम डांस केला तरी ती आपल्या कंबरलचकलालित्यापेक्षा नजरेनेच गार करीत बसणार. ऐसे कैसे चलेगा दीदी?

>> स्मितं आणि मी << या उपशीर्षकाच्या बांडल्यावरूनच या पुस्तकात काय असावे याची झलक मिळते.

( पुस्तकाच्या मुखपृष्टावरून पुस्तके जज करण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. )

स्मिताला अजून थोर दिग्दर्शक मिळायला हवे होते याबद्दल अनुमोदन. (असं कुणी म्हणलंय वर, का मीच म्हणतोय?)
दुसरं म्हणजे ती आता असती तर काय निकष लावले असते- हे.

एनएसडी छापाची अख्खी बॅचच आहे आपल्याकडे. अनेक बॅचेस. काय करता मग? एनएसडी व्यतिरिक्त आणि काय आहे का, तर अभ्यास करायला पाहिजे.

एनएसडी नव्व्याण्णव टक्के भारतीयांना माहिती नसेल. आणि तितकेच लोक वेगवेगळ्या अभिरुचीच्या पातळीवर स्वतःची करमणुक करवून घेताहेत. तर मग ही भानगड नक्की काय आहे ते नीट बघितलं पाहिजे.

तिने मुन्नी बदनाम हुई टाईप केले नाही तरी आज रपट जाए किंवा जाने कैसे कब कहा केले आहेच की. आणि त्यात जे काही केले आहे ते कंबरलालित्यापेक्षा भारीच आहे.
असो. तुम्हांला ती आवडलीच पाहिजे अशी काय सक्ती नाही. फक्त वेगळा पर्स्पेक्टीव्ह म्हणून सांगितलं एवढंच.

>> फक्त वेगळा पर्स्पेक्टीव्ह म्हणून सांगितलं एवढंच. <<

मज जन्म माशाचा मिळता मी कार्प झालो असतो
जर असतो मी जर का भाजी तर कांदा झालो असतो.

नव्व्याण्णव टक्क्यांची आवडनिवड आणि 'शंभरातल्या नव्व्याणवांस' वाल्यांची आवडनिवड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत Wink

नव्व्याण्णव टक्क्यांची आवडनिवड आणि 'शंभरातल्या नव्व्याणवांस' वाल्यांची आवडनिवड या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
>>>
Proud टू गूड.

इन्सेप्शन सिनेमा सारखे इथे लेवल वर लेवल (किंवा लेवल खाली लेवल) झाले आहे.

९९% टक्क्यांना झीनत/परवीन वगैरे आणि उरलेल्या शंभरातील नव्याण्णव वाल्यांना स्मिता/ शबाना /दिप्ती नवल वगैरे. आता त्यात शंभरातील नव्याण्णव वाल्या १%त , पुन्हा ९९ आणि १ अशी लेवल. ९९% टक्क्यांना स्मिता आणि उरलेले १% बहुतेक थेट पथेर पंचालीमधली ती म्हातारी आजीच श्रेष्ठ नटी होती लेवल ला.

टवणे सर ही फक्त सपाट हायरार्की झाली.
खरी गंमत पुन्हा सर्क्युलर होण्यात असते.
>> ९९% टक्क्यांना स्मिता आणि उरलेले १% बहुतेक थेट पथेर पंचालीमधली ती म्हातारी आजीच श्रेष्ठ नटी होती लेवल ला. <<

या उरलेल्या १ टक्क्यातल्या ९९ टक्क्यांस ती म्हातारी आवडत असावी मात्र उरलले १ टक्के पुन्हा टूरिस्ट ठिकाणी टूरिस्ट म्हणूनच जाऊन एंजॉय करणारे निघतात. त्यांना झीनत आणि परवीन याच सर्वसामान्य लेवल ला पॅशनेटली आवडत असतात. थोडक्यात ते पुन्हा मूळ नव्याणव टक्क्यांच्या प्रवाहो जनांचा मधे मिसळून घेण्याचा सजग प्रयत्न करतात (जमला नाही तरी). असे हे जीवनाचे वर्तुळ आहे. उलट या शेवटच्या १ टक्के वाल्यांना त्या पाथेर पांचालीच्या म्हातारीला आवडून घेणाऱ्यांचा दंभही कळत असतो आणि मूळ नव्याणव टक्क्यांच्या झीनतप्रेमातला भाबडेपणाही कळत असतो.

हिंदी सिनेमावाले निर्माते केवळ मार्केट आहे म्हणून पार वय उतरलेले नट गळ्यात मारतात. वीसच्या वयातले नायक नायिका हव्या असल्या तरी पन्नास वीस अशा जोड्या उभ्या करतात.

Pages