घुसमट

Submitted by 'कल्पनेचा कुंचला' ✍️ on 16 February, 2026 - 13:47

अंतःकरणात जे आहे ते सहज बोलता यावे,
आपल्याला जे सांगायचे आहे ते मांडता यावे।

लोकांचे काय? ते तर गरजेनुसार बदलतात,
सोयीचे असेल तेव्हाच शब्दांचे खेळ मांडतात।

चेहऱ्यावर मुखवटे किती दिवस लावणार?
कधीतरी जगाला आपले खरे रूप कळणार।

जे हृदयात साचलंय ते ओठांवर येऊ दे,
भावनांची ही कोंडी शेवटी निघून जाऊ दे।

मनुष्य हा निसर्गाचा श्रेष्ठ असा आविष्कार,
पण जगाच्या भीतीपोटी झालाय किती लाचार!

डोंगर-दऱ्यांतून वाहणारी नदी ही प्रवाही,
अस्तित्वाची नवी वाट आपल्याला सापडावी।

चारही दिशांनी वाहणारा हा चौफेर वारा,
आपल्याकडे असावी एक मुक्त विचारधारा।

इतरांच्या चौकटीत राहून मोठे कसे होणार?
दुसऱ्यांच्या सावलीत नवा अंकुर कसा फुटणार?

जग काहीही बोलो, क्षितिजाच्या पलीकडे जावे,
मनातल्या घुसमटीला स्वतःच्या आवडीने जिंकावे।

संकटांवर मात करून पुन्हा उभे राहावे,
लाभलेल्या या आयुष्याला उत्तर निर्भीडपणे द्यावे।

© 2026 Arjun (कल्पनेचा कुंचला' ✍️). All Rights Reserved.

Group content visibility: 
Public - accessible to all site users