कैलास मानसरोवर – १० वर्षांनी पूर्णत्वाची भेट

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:35

१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलं… त्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव होता — अस्पष्ट, तरी खरा.
आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .

पाठीवरचा त्रिकूट थकलाय, पण मन शांत, निःशब्द आणि तयारआहे.सहप्रवासी लांब गेले आहेत, मी एकटाच इथं उरलो आहे.हवा विरळ आहे, पण प्रत्येक श्वासा सरशी अंतरंगात काही तरी नवं घडत आहे. मी वाळूत खाली टेकलो ,डोळे मिटले आणि तोच प्रकाश परत आला.
डोळे उघडतो तर शरीर थरथरले , अधर विलगच राहिले . शरीरावर रोमांच दाटले .समोर दहा वर्षां पूर्वेचे तेच दृश्य प्रत्यक्षात होते .तेच निळसर पाणी, त्यावर निथळणारी शांतता, आणि समोरचं शुभ्र हिमशिखर.अगदी जसं ध्यानात पाहिलं होतं — अगदी तसं. तेव्हा “पाहिलं नव्हतं पण अनुभवलं”होतं.क्षणभर माझ्या अंगावर काटा आला .हे दृश्य माझं स्वप्न नव्हतं, हे उमगून आलं —

माझे डोळे पाणावले . मी गुडघे टेकून बसलो .संपूर्ण वातावरण नीरव. फक्त वारा काय तो वाहत होता .त्या निळ्या सरोवरात आता हलकीशी लहर उठते.आणि सरोवराच्या मधोमध,माझ्या दृष्टिपथात पुन्हा तेच सात निळे गोलक तरंगताना दिसतात.
ते गोलक मला पुन्हा बोलावत आहेत.माझा संपूर्ण अस्तित्व शरीरातच आहे, पण माझी ओळख मात्र पाण्याकडे ओढली जाते आहे.मी उठतो, टोकाला जातो, आणि दोन्ही हात जोडून पाण्यात वाकतो.

क्षणभर विचार येतो — “मी आत गेलो तर परत येईन का?”
मग दुसऱ्याच क्षणी उत्तर येतं —
"जे ‘मी आत जातं तेच खरं ‘मी ‘ असतं. बाकीचं सगळं परत यायचंच नसतं.”
मी पाण्यात उतरतो.पाणी निथळतं, गारसरतं,पण त्यात भीती नाही.एक छान उब आहे .त्या सात गोलकांच्या दिशेने मी पोहतो… अगदी मध्यभागी पोहोचल्यावर काही प्रकाशलहरी झुळझुळतात…

आणि त्या प्रकाशात — ते पुनःप्रकट होतात.
समोर महाराज उभे आहेत !!!!!! खरंच !!!!!!!!!
हो,माझे सद्गुरू.
ज्यांच्या तसबिरीला मी १० वर्षं नमस्कार करत आलो — तेच

ते आज माझ्यासमोर उभे आहेत! कपाळावर चंदन, मुखकमलावर मिश्किल हास्य.काहीही बोलत नाहीत,फक्त हात पुढे करतात. मी माझा हात पुढे करून त्याच्या हातात देतो. हात हातात देताच मी ही महाराजां सारखाच दिसू लागतो . महाराजांना लपवून मला दाखवला तर कोणी ही संशय घेतला नसता इतके साम्य आमच्यात होते . काही कळण्या पलीकडे होते आणि काही कळावे ही इच्छा ही नव्हती . हे क्षण असेच अविरत राहावे असे मात्र राहून राहून वाटत होतं.कोठूनतरी एक आवाज येत होता ......

“हेच आहे तुझं पूर्ण रूप”.
प्रकाशही आहे, सावलीही आहे. ध्यानही आहे, अनुभवही. शब्दही आहेत, पण आता मौनात विरून गेले आहेत.
“मी तू आणि तू मी आहेस , कोणते ही द्वैत आता उरले नाही ”. असे म्हणून महाराज माझ्यात सामावतात .

मी पुन्हा डोळे उघडतो.मानस सरोवर शांत आहे.गोलक गेले आहेत.हवा थंड आहे आणि माझं अंतरंग कोऱं आहे, पण पूर्ण आहे.मी मागे वळतो.सहप्रवासी पुन्हा दिसतात.मी त्यांच्यात सामील होतो —
पण आता 'मी' बदललोय.
मी गेलो नव्हतो…
मी परत आलोय.
"जेव्हा ध्यानात पाहिलेलं वास्तवात प्रकटतं,तेव्हा शब्द नाहीसे होतात…आणि उरतं फक्त अनुभवाचं तेज”

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

अजय सरदेसाई (मेघ)
मानस सरोवर, तिबेट –

गुरुवार, तारीख : ??/??/?? वेळ : ??:??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून वाचलं नाहीये, पण एक आगाऊ सल्ला देऊ का?

देतोच. एका दिवसात शक्यतो एकच धागा/ एकच भाग टाका. पहिल्याच पानावर 10 धागे एकाच लेखकाचे दिसले तर फार कुणी उघडत नाहीत त्याला.

शिवाय, लेट युअर ऑडिअन्स डिमांड इट बिफोर यु डिलिव्हर इट

खूपच सुंदर लिहीले आहे. मेघ, प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस आधीची लिंक द्या व शेवटास पुढील भागाची लिंक द्या.

हे काहीतरी वेगळं, अद्भुत आहे. नेमकी काय प्रक्रिया द्यावी हे समजत नाही. कदाचित माझं अनुभवविश्व तोकडं आहे.

हे लेख आवडले. म्हणजे त्यातल्या अनुभूती पासून काही हात दूर असूनही समजू शकलो. ह्या अनवट, अवघड विषयातली क्रमशः प्रगती वाचताना बोजड वाटली नाही. लेखांना एक आकृतीबंध होता. पण त्यामुळे कथनाला साचेबंदपणा आला असे वाटले नाही. शब्द आणि रचनेतलं लालित्य हरवलं नव्हतं त्यामुळे भावना पोहोचल्या. कल्पनाविलासाला वाव मिळाला. छान वाटलं

सुरूवात केली आहे. तुम्ही छान लिहिता.
तुमच्या कडे सांगण्यासारखा कंटेट आहे आणि तो जबरदस्त आहे.
तुमच्या या प्रवासात सहभाग नोंदवला आहे. नंतर निवांत वाचून काढेन.

आमची आजी म्हणायची "कैलासाला पोहोचला". हायेस्ट अचिव्हमेंट साठी ही फ्रेज सर्रास होती. खायचं काम नाहीच कैलास मानसरोवर यात्रा.

@अजिंक्यराव पाटील तुमच्या सल्या बद्दल आभारी.
@माझेमन प्रतिसादा बद्दल धन्यवाद
@धनश्री धन्यवाद,सुचना लक्षात ठेविले.
@Abuva प्रतिसादा बद्दल खुप धन्यवाद.
@एकलेखक प्रतिसादा बद्दल धन्यवाद, वाचुन झाल्यावर जरुर कळवा.

सर्वांना पुन्हा मनापासून धन्यवाद