अकरावी बारावीत असताना कै. नानामामांच्या (आईचे मोठे बंधू) तोंडी पहिल्यांदा रंग और नूर की बारात किसे पेश करू ऐकलं तेव्हा मदन मोहन नावाचा एक विलक्षण संगीतकार हिंदी चित्रसृष्टीत होऊन गेला हे प्रथमच कळलं. त्यानंतर एकदा असंच आईच्या तोंडून "माई री sss, मैं कासे कहूं" ऐकलं आणि मग मात्र मदन मोहन या माणसाने पछाडून टाकलं मला. मी लिस्ट बनवली आणि मदनमोहनची गाणी रेकॉर्ड करून आणायला कॅसेटवाल्याकडे गेलो. तेव्हा कोऱ्या कॅसेट्स घेऊन त्यावर आपल्याला हवी ती गाणी रेकॉर्ड करून मिळायची. आता इंटरनेटवर हवे ते सगळे मिळते. तेव्हा मात्र, अरे लष्करमध्ये नको तिकडे नव्या पेठेत तो अमुक कॅसेटवाला आहे ना, तो तुला अगदी हुस्नलाल भगतराम सुद्धा मिळवून देईल, त्याच्याकडे जा. असे संवाद व्हायचे आणि आम्ही वेड्यासारखे सायकलवर टांग टाकून नव्या पेठेत कुठल्यातरी टपरीत दुकान टाकून बसलेल्या त्या कॅसेटवाल्याला शोधत तंगडतोड करत फिरायचो. ते दिवसच काही औरच होते राव. मी मदनमोहन हवाय म्हटल्यावर त्या कॅसेटवाल्याने कौतुकाने माझ्याकडे टाकलेला दृष्टीक्षेप मला अजूनही आठवतोय. तेव्हा त्या क्षणी त्यात काही विशेष वाटलं नव्हतं. ती जाणीव जेव्हा त्या रेकॉर्डेड कॅसेटची पारायणे सुरू झाली तेव्हा व्हायला लागली. हे काहीतरी वेगळं, काहीतरी अफाट आहे हे कळायला लागलं होतं.
मदनमोहनची बहुतेक सगळीच गाणी गाजलीच. पण आजच्या लेखाचा विषय त्याची मला प्रचंड आवडणारी पण त्यातल्या त्यात तुलनेने कमी गाजलेली गाणी असा आहे.
मदन मोहन यांची “कमी गाजलेली” गाणी हा विषय ऐकायला जितका साधा वाटतो, तितका तो प्रत्यक्षात खोल आणि अनेक स्तरांवर विखुरलेला आहे. कारण मदन मोहनचं संगीत लोकप्रियतेच्या निकषांवर मोजण्याऐवजी संवेदनशीलतेच्या, गुणवत्तेच्या, त्यातल्या छोट्या छोट्या जागांच्या निकषांवर ऐकावं, समजून घ्यावं लागतं. त्याच्या रचना पहिल्या वेळी कदाचित लगेच, पटकन पहिल्या वेळी आवडणार नाहीत. त्या हळूहळू पुन्हा पुन्हा ऐकल्या की उलगडत जातात. आणि एकदा उलगडल्या की आयुष्यभर सोबत राहतात.
मदनमोहनच्या संगीताचा केंद्रबिंदू म्हणजे शब्द. गीतकार कोण आहे, तो काय म्हणतोय, आणि त्या शब्दांचा सूर नेमका कसा पकडायचा, कुठे ताणायाचा, कुठे थांबायला हवा, याची विलक्षण जाण मदनमोहनला होती. म्हणूनच त्याची अनेक गाणी ऐकताना असं वाटतं की संगीत मागेच थांबलय कुठेतरी आणि शब्द मात्र प्रखरपणे त्या संगीतावर स्वार होऊन पुढे येताहेत. प्रत्यक्षात त्याचं संगीत इतकं सूक्ष्मपणे काम करत, पाझरत असतं की आपल्याला ते फक्त “ऐकू” येत नाही, तर “जाणवत” राहतं. गात्रागात्रातून झिरपत राहतं.
लताबाईंसोबतचं त्याचं नातं हा स्वतंत्र विषय आहे. १९५५ साली आलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्म मधलं “चांद मद्धम है आसमां चुप है” हे गाणं पहिल्यांदा ऐकताना अजून एक हिंदी गाणं एवढंच वाटतं, फारसा प्रभाव जाणवत नाही. पण आपण जसं जसं पुन्हा पुन्हा ऐकायला लागतो, तसं लक्षात येतं की या गाण्यात कुठेही भावनेचा अतिरेक नाही. साहिर लुधियानवींचे शब्द जणू रात्रीच्या रिकाम्या प्लॅटफॉर्मवर सहज , पण रात्रीशी एकरूप होऊन निवांत फिरावे तसे आपल्या मनात घुमायला लागतात. आणि मदनमोहन आपल्या संगीताने त्या शब्दांना जणू काही श्वास प्रदान करतो. लताबाईंचा स्वर इथे नेहमीप्रमाणे आपल्या तेजाने तळपत नाही, तो निवांतपणे त्या शब्दांना तेज देतो, प्रकाश पसरवतो. मदनमोहनची खरी ओळख अशा गाण्यांतून स्पष्ट होते. रागाधारीत असूनही हे संगीत जड वाटत नाही. स्वर हळूवारपणे उमटत राहतात. जणू रात्रीच्या एकांतात, शांतपणे धुळवाटेवर उमटत जाणारी पावलं. लतादीदी गात नाहीत, त्या ती भावना जगतात आणि त्यांच्याबरोबर आपण सुद्धा...
१९५१ साली आलेल्या अदा या चित्रपटामध्ये लतादिदी आणि मदनमोहनचं एक अप्रतिम गाणं होतं. राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेलं, "प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते"...!
प्रेमाच्या वृथा वल्गना न करता त्याच्या अपूर्णतेची, न मिळालेल्या क्षणांची हळवी जाणीव करून देणारं हे गीत. अतिशय साधे शब्द, त्यांतून व्यक्त होणारी आयुष्यभराची आस. मदनमोहनचे मंद, संयत आणि विरहाच्या छाया शब्दांवर वागवणारे संगीत. अहाहा ! यात सूर शब्दांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते शब्दांना श्वास, प्राण देतात. लतादीदींचा आवाज या संगीताला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतो. एक विलक्षण खोली देतो. विरहगीत असले तरी दीदींचा स्वर आर्त होत नाही. उलट तो कमालीचा शांत आहे, जणू एकाकी मन स्वतःशीच बोलतय. शब्द, सूर आणि आवाज एकत्र येऊन हे गाणे विरहाच्या तक्रारीपेक्षा स्वीकाराचे, वेदनेपेक्षा आठवणीचे रूप धारण करते आणि म्हणूनच ते ऐकून झाल्यानंतरही मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हळूच नकळत रुतून बसते, रुजून जाते.
१९६० साली आलेल्या बहाना मधलं “जा रे बदरा बैरी जा” या गाण्याचा उल्लेख अनेकदा “पावसाचं गाणं” म्हणून केला जातो, पण प्रत्यक्षात ते विरहाचं गाणं आहे. इथे पाऊस हा फक्त निमित्त आहे. चाल रागदारीच्या जवळ जाणारी, पण तरीही शास्त्रीय संगीताकडे न वळणारी. मदन मोहनची खासियत इथे दिसते. तो राग वापरतो, पण शास्त्रीय संगीत ऐकवण्यासाठी नाही, त्या शब्दांना, त्यातल्या भावनेला अपेक्षित खोली देण्यासाठी तो शास्त्रीय संगीताचा वापर करतो. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दाचं गारूड मदनमोहन अजून पक्कं करतो.
१९६५ साली आलेल्या नीला आकाशची गाणी ऐकली आहेत? त्या बोलपटामधलं “ना आसमां ना सितारे फ़रेब देते हैं” ऐकलंय कधी? हे गाणं विशेष आहे. लताबाईंच्या आवाजातली ही रचना ऐकताना असं वाटतं की मदनमोहनला गाण्याच्या लोकप्रियतेविषयी काही देणेघेणेच नसायचे. प्रत्येक वेळी काहीतरी अनवट वाट शोधून काढायचा त्याचा प्रयत्न असायचा. याच चित्रपटातील आशाताईंचे "आपको प्यार छुपाने की बुरी आदत है" हे गाणे देखील याच श्रेणीतले. लताबाईंच्या आवाजातला तटस्थ, तत्त्वचिंतनशील सूर कुठेतरी आतवर मनाला स्पर्शून जातो, तेव्हा त्यात मदनमोहनचा वाटा सिंहाचा असतो.
मला मदनमोहन सगळ्यात जास्त आवडला तो १९७० साली आलेल्या दस्तक मध्ये. मजरूहसाहेबांचे अंतर्बाह्य हलवून टाकणारे शब्द जेव्हा "न तड़पने की इजाजत है, न फ़रियाद की है, घुट के मर जाऊ ये मर्जी मेरे सय्याद की है" म्हणत थेट अंगावर येतात आणि मग जेव्हा लताबाई "माई री, मैं कासे कहूं...." म्हणत एक अस्फुट, मौन टाहो फोडतात तेव्हा हादरून जायला होतं. पण माई री.... ऐकावं ते दस्तुरखुद्द मदनमोहनच्या आवाजातलंव . लताबाई देखील फिक्या पडतात त्यासमोर.
याच चित्रपटातील दीदींचंच “बैयाँ ना धरो” हे गाणं असंच. का कुणास ठाऊक पण मला सतत असं वाटत आलेलं आहे की हे गाणं लोकप्रिय असूनही खरं तर समजून घेण्याच्या पातळीवर कमी ऐकलं गेलेलं आहे. माई री किंवा बैय्या ना धरो यासारखी गाणी ऐकताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे मदन मोहन फक्त गाण्याला संगीत नाही द्यायचा. तो त्या गाण्याला आत्मा द्यायचा, शील द्यायचा , एक चिरंतन अस्तित्व द्यायचा. इथे मदनमोहनची चाल एकदम चिरेबंदी आहे. ठाम, शांत, आणि उत्कट.
अर्थात मदन मोहन म्हणजे फक्त लता मंगेशकर नाही. मदनमोहनचं आणि तलतचं एक वेगळंच, नितांत सुंदर, विलक्षण, रादर जीवघेणं समीकरण आहे. तलत महमूदच्या आवाजात त्याचं संगीत काही वेगळ्याच रंगात दिसतं. १९६४ साली आलेल्या जहाँआरा मधली राजेन्द्रकृष्णजीची नज़्म आठवते?
“फिर वही शाम वही ग़म वही तनहाई है” ही नज़्म ऐकताना असं वाटतं की संध्याकाळ स्वतःच बोलतेय. तलतच्या आवाजात एक अबोल, मौन उदासी आहे, त्याच्या स्वरांमधला हळूवार, मुलायम कंप याचे द्योतक आहे आणि मदन मोहन त्या उदासीला अतिशय संयत, संवेदनक्षम चौकट देतो. कुठेही मोठे आरोह-अवरोह नाहीत, पण प्रत्येक ओळ मनावर एक प्रकारचा ताण उभा करते.
जहाँआरा मधलंच "मैं तेरी नज़र का सुरूर हूँ, तुझे याद हो के ना याद हो" हे असंच अजून एक अप्रतिम गीत. गाजलेलं पण तरीही कमी ऐकलं गेलेलं. मदनमोहनचे संयत, विरहप्रधान संगीत आणि तलतचा तरल, मृदू, किंचित उदास स्वर यांचा अतिशय नाजूक संगम आहे हे गाणं. इथे प्रेमाची मागणी नाहीये, तर फक्त आठवणीत तरी स्थान मिळावे अशी एक आर्त याचना आहे. मदनमोहनची शब्दांना त्यांची स्पेस देणारी, अपूर्णतेची जाणीव करून देणारी चाल तलतच्या आवाजात ती वेदना थेट मनात उतरवते. म्हणूनच ही गाणी निव्वळ विरहगीते म्हणून न राहता प्राक्तनाचा स्वीकार आणि एक हळवी स्मृती बनून श्रोत्याच्या मनात खोलवर रुजून बसतात.
त्याच चित्रपटातील “किसी की याद में दुनिया को हैं भुलाए हुए , ज़माना गुज़रा है अपना ख़याल आए हुए ” ही राजेंद्रकृष्णजीची गझलसुद्धा तुलनेने फार कमी ऐकली जाते. इथे स्मृती ही वेदना नाही, ती सवय आहे. राजेंद्र कृष्ण यांच्या शब्दातल्या छोट्या छोट्या जागा, सूक्ष्म छटा मदन मोहन यांच्या संगीताने ठळकपणे उठून आल्या आहेत. रफी साहेबांनी फार सुंदर गायली आहे ही गझल.
रफीसाहेबांसोबत मदन मोहन यांची मैफल अधिक गंभीर, अधिक विस्तारलेली वाटते. १९६४ साली आलेल्या गझल मधलं “रंग और नूर की बारात किसे पेश करूँ” हे गाणं म्हणजे निव्वळ एक गीत नसून एक संगीतमय निवेदन आहे. खरेतर साहिरच्या शब्दांची स्वतःचीच उंची इतकी अफाट आहे की नुसते गद्यात वाचली असती गझल तरी हिट झाली असती, इथे तर मदनमोहनचे संगीत आणि जोडीला रफीसाहेबांचा दैवी आवाज. मदन मोहन कुठेही शब्दांना सुरांनी, संगीताने सजवण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त साथ देतो आणि साहिरचे शब्दच दिग्विजय करतात. रफीसाहेब इथे फक्त गात नाहीत, ते साहिरचा शब्द न शब्द जणुकाही शोषून घेतात, ती गझल जगतात आणि मग जे काही जन्माला येतं ते निखालस सोनं असतं.
मन्ना डे यांच्यासोबत मदन मोहनची शैली अधिक शास्त्रीय बाजूकडे झुकताना दिसते. देख कबीरा रोया (१९५७) मधलं “कौन आया मेरे मन के द्वारे” हे गाणं भक्तिरसाच्या सीमेला जाऊन भिडतं. रचना ऐकताना वाटतं की हे गाणं चित्रपटासाठी नाही, तर एखाद्या शास्त्रीय संगीताच्या बैठकीसाठी, मैफिलीसाठी संगीतबद्ध केले असावे.
आशा भोसले यांच्या आवाजातली मदन मोहन यांची गाणी तुलनेने कमी आहेत, कदाचित म्हणून ती तुलनेने दुर्लक्षित झाली असावीत का? अदालत (१९५८) मधलं मदनमोहनसाठी त्यांनी लतादीदींबरोबर गायलेलं "जा जा रे जा सजना" असो , अथवा गीता दत्तबरोबर आशाताईंनी गायलेलं "दुपट्टा मेरा मलमल का" असो, ही गाणी देखील तितकीच नितांतसुंदर म्हणता येतील अशीच होती. पण लतादीदींनी अदालतमधली "उनको ये शिकायत है, यूं हसरतों के दाग..." आणि "जाना था हमसे दूर.." ही गाणी आपल्या सुरांच्या ताकदीने इतक्या उंचीवर नेऊन ठेवलीत की आशा आणि गीतादेखील निष्प्रभ झाल्यात या चित्रपटात.
पण मदनमोहनने आशाला काही नितांतसुंदर अशी गाणी दिलेली आहेत. १९५६ साली आलेल्या मेमसाहिबमधलं "इश्क एक जहर सही" असो, वा १९५३च्या चाचा चौधरीमधलं "मेरे पिया छेड़े जिया" असो. अठ्ठावन्नच्या आखरी दांव मधलं नुतनवर चित्रित झालेलं "हाय उनकी वो निगाहें, दिल देखे जिनकी राहे" असो, वा १९५९ साली आलेल्या बँक मॅनेजर मधलं "सबा से ये कह दो के कलियाँ बिछाए" असो. मदनमोहनने आशाला देखील अत्यंत देखणी गाणी दिलेली आहेत आणि आशाने देखील तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच तन्मयतेने ती निभावली देखील आहेत. काही म्हणा, लतादीदी मदनमोहनला भाऊ मानायच्या, त्यांचं नातं काही विलक्षणच होतं. "गझलों का बादशाह" म्हणायच्या लतादीदी मदनमोहनला. लताबाईंना जेवढी ग्रेट गाणी दिलीत मदनमोहनने तेवढी इतर कुणालाच नाही दिली. पण आशाची ही गाणी ऐकताना लक्षात येतं की आशाताईंच्या आवाजातली ताकद मदनमोहनने अगदी नेमकेपणाने ओळखली होती आणि तिचा त्याने व्यवस्थित वापरही करून घेतलेला आहे.
गीता दत्त यांचं "भाई भाई (१९५६)" मधलं “ऐ दिल मुझे बता दे” हे गाणं एक अस्वस्थ प्रश्न आहे. उत्तर नाही, फक्त शोध आहे. चाल साधी आहे, पण त्या साधेपणात एक अस्वस्थता आहे. गीता दत्त यांच्या आवाजातला कंप आणि मदन मोहन यांची मितभाषी धून मिळून हे गाणं खोलवर रुततं.
मुकेश यांच्या आवाजातली १९६१ साली आलेल्या संजोग मधली “भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ” ही रचना आज क्वचित ऐकू येते. पण हे गाणं ऐकताना जाणवतं की मदन मोहन यांनी मुकेश यांचा एक साध्या माणसाचा, सच्च्या माणसाचा म्हणून ओळखला जाणारा स्वर किती प्रामाणिकपणे वापरला आहे. इथे दु:ख वरवरचं न राहता ते जगण्याचा एक भाग बनून जातं.
शमशाद बेगम आणि मुकेश यानी गायलेलं , १९५० साली आलेल्या आँखें मधलं “हमसे नैन मिलाना बीए पास करके” हे गाणं मदन मोहन यांच्या वेगळ्या, थोड्या खेळकर बाजूचं उदाहरण आहे. फक्त गंभीर गझलाच नव्हे, तर गरज पडली तर तो लोकप्रिय, हलकंफुलकं संगीतही तेवढ्याच सफाईने देऊ शकत होता हे सिद्ध करणारं हे देखणं गाणं.
या सगळ्या गाण्यांकडे एकत्र पाहिलं, तर लक्षात येतं की मदन मोहन यांची कमी गाजलेली किंवा फारतर कमी ऐकली गेलेली गाणी हा त्यांच्या संगीताचा खरा गाभा आहे. मदनमोहन प्रसिद्धी, यश, झगमगाट यापेक्षा, नेहमीच गुणवत्तेला, अंतर्मुख करणाऱ्या संगीताला प्राधान्य देत आलेला आहे. म्हणूनच ही गाणी आजही शांतपणे ऐकली जातात. ती कदाचित प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे लक्ष वेधून घेत नसतील, पण एकदा ऐकली की कायमची मनात ठाण मांडून बसतात. मदन मोहन यांचं संगीत म्हणजे शांत एकांतात, आवाज कमी करून निवांतपणे, वेळ देऊन ऐकायचं संगीत आहे. आणि कदाचित म्हणूनच, ते आजही तितकंच जिवंत आहे, तितकंच हवंहवंसं आहे.
©विशाल कुलकर्णी
<<< पण २-३ वेळा कार मधे पूर्ण
<<< पण २-३ वेळा कार मधे पूर्ण फोकसने ऐकताना "आँखों मे है बरसोंकी प्यास" हे असे काही पोहोचले की त्यानंतर मी किती वेळा ते गाणे ऐकले असेल गणतीच नाही. तसेच नैनों मे बदरा छाये मधे पहिल्या कडव्याच्या शेवटी "...शरमाके देगी तोहे मदिरा के प्याले" ची चाल, संगीत, लताचा आवाज यातून काय अवर्णनीय मॅजिक निर्माण झाले आहे माहीत नाही. पण हीच जागा पुन्हा ऐकायला मी असंख्य वेळा हे गाणे ऐकले (याच्या सुरूवातीच्या संगीताबद्दल माझेमन यांचे वर्णनही सुंदर आहे). तीच गोष्ट मिलो न तुम तो ची. ओ भोले साथिया/ओ सोहणे जोगिया च्या वेळची जागा.>>>>
जियो जानेमन ! याचसाठी केला होता अट्टाहास. हा लेख फेसबुकवर देखील टाकला होता. पण जी चर्चा इथे होते, ती तिथे नाही होत. धन्यवाद फारेंडा !
मदनमोहनने स्ट्रिंग्सचा उत्तम
मदनमोहनने स्ट्रिंग्सचा उत्तम वापर केलेलं अजून एक गाणं चराग़ दिल का जलाओ बहोत अँधेरा है. इंटरल्यूड्समध्ये तर आहेतच पण पूर्ण गाण्यात रफीवर कुरघोडी न करता बॅकग्राऊंडला हलकीशी व्हायोलिन्स वाजत राहतात, गाण्याचा मेलंकली मूड अधोरेखित करत राहतात. या गाण्याचं कुठलंही इंस्ट्रुमेंटल व्हर्जन ऐकलंत तर पार्श्वसंगीतात व्हायोलिन्स असतात. त्यात रफीचा आवाज. तो जेव्हा अंधेरा शब्द खेचतो तेव्हा खरंच खूप काळोख दाटलाय असं वाटत राहतं.
फा, 'जो हम ने दास्ताँ अपनी
फा, 'जो हम ने दास्ताँ अपनी सुनाई' पण लक्ष देऊन ऐकलंस तर 'आप क्यूँ रोये' लता प्रत्येक वेळी निराळं गाते बघ - कारण त्या त्या ठिकाणी ती ओळ खरंच निरनिराळ्या अर्थांनी येते.
तसंच 'लग जा गले' गाण्यात दोन्ही कडव्यांची चाल मोअर ऑर लेस सारखीच आहे, पण 'फिर आपके नसीब में' आणि 'आँखों से फिर ये प्यार की' या क्रॉस लाइन्स नीट ऐकल्यास तर त्या 'फिर'वर तिने एक इतकी सटल आणि सुंदर हरकत घेतली आहे की ती सगळी हुरहूर त्यातून ऐकू येते. म्हणून लता लता होती!
आज तिची पुण्यतिथी आहे हे आत्ता लिहिता लिहिताच लक्षात आलं.
म्हणून लता लता होती >>> मौका
म्हणून लता लता होती >>> मौका भी हैं दस्तूर भी हैं...लतावर येऊ दे एक लेख अश्या सुंदर सुंदर जागा सांगणारा.
लतादीदींच्या पुण्यतिथीला हा
लतादीदींच्या पुण्यतिथीला हा लेख वाचला आणि आपण किती भाग्यवान याची पुन्हा एकदा जाणीव झाली!
तुम्ही दिलेली काहीशी अप्रसिद्ध गाणी आज शोधून ऐकणार आहे.
धन्यवाद या लेखासाठी! अजून भरपूर लिहा
सुरेख लेखन आहे. मदनमोहनची
सुरेख लेखन आहे. मदनमोहनची सर्वच गाणी प्रचंड आवडतात.
माझे काका शंकर-जयकिशनचे मोठे चाहते. त्यांना मदन मोहन आवडायचे नाहीत याचं अजब कारण होतं की त्यांच्या कुठल्याच गाण्यात कडव्याच्या वेगवेगळ्या चाली नाहीत. सर्व कडव्यांची एकच चाल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग ते कौतुकाने शंकर-जयकिशनच्या प्रत्येक कडवी वेगवेगळ्या चालीच्या असलेल्या रचना ऐकवायचे. मग त्यांना मी 'तुम जो मिल गये हो' हे रफीच्या सुरांची जादू असलेले गीत ऐकवले आणि ते गप्प बसले
@माझेमन अगदी अगदी, माझं देखील
@माझेमन अगदी अगदी, माझं देखील अतिशय आवडतं गाणं आहे "चराग दिलका...". चिराग मधलंच "जब देख लिया तो छिपेंगे कहा " (रफीसाब) आणि लताबाईंचे "भोर होते कागा पुकारे " देखील लूपमध्ये वाजत असतात माझ्या गाडीत.
स्वातीताई, लिहाच लताबाईंच्या
स्वातीताई, लिहाच लताबाईंच्या गाण्यावर, त्यातल्या अशा अनवट जागांवर.
मनःपूर्वक आभार, मंडळी _/!\_
मनःपूर्वक आभार, मंडळी _/!\_
मी वर ‘माई री’ गाण्याची लिंक
मी वर ‘माई री’ गाण्याची लिंक दिलीय. तुम्ही म्हणता तसंच मदनमोहनचे स्वर संपता संपता लताचे सुरू होतात. >>> याकरता आवर्जून धन्यवाद, माझेमन!
हम है मताये कुचा मध्ये लताबाई
हम है मताये कुचा मध्ये लताबाई उठती है हर निगाह गुनहगार की तरहा मध्ये उठती म्हणताना आवाज वॉल्युम आणि सूर दोन्ही चढवतात.
नुकत्याच काही एलपी विकत घेतल्या त्यात अदालतची एलपी मिळाली.
जरा सी आहट हे ही मदन मोहन
जरा सी आहट हे ही मदन मोहन यांचं फार फार आवडतं गाणं आहे.
Pages