न्यूझीलंड डायरी.. १३. एकटा

Submitted by हेमंत नाईक. on 24 January, 2026 - 23:58

१३. एकटा

इथले अप्रतिम निसर्गाचे फोटो पाहून एका मित्राने सुंदर अभिप्राय दिला,

"तुझ्या कॅमेराची लेन्स सुंदर आहे तेवढीच सुंदर डोळयांचीही लेन्स आहे. "

खरं सांगू तर,

"इथला निसर्ग इतका सुंदर आहे की अगदी डोळे मिटून देखील फोटो काढले तरी एका पेक्षा एक सुंदरच येतात."

रोटोरुआ येथे दोन दिवस फिरत असताना शेवटी निघताना काही वस्तु घेण्यासाठी काउन्ट डाऊन या सुपर शॉप ला गेलो असताना इथल्या सौंदर्यालाही डावी बाजू आहे हे नकळत कळलं.

सोनेरी केसांचा एक गोरापान सुंदर युवक माझ्या पुढे लाईनीत त्याने घेतलेल्या सामनाने भरलेली ट्रॉली घेऊन बिलिंग साठी उभा होता. तो फक्त्त एका पायावरच उभा होता कारण दुसरा पाय प्लास्टर मध्ये होता. बरोबर तो वॉकर घेऊन आला होता. हे असं दृश्य आपल्याकडे मी आतापर्यंत बघितले नव्हते.

मी त्यास विचारले,
"कसे काय झाले? आणि या स्थितीत दुकानात काय करतोय?"
तो उत्तरला,
"एक छोटा अक्सीडेन्ट होता... पडलो होतो मी.
मी इथं जवळच राहतो, पण अगदी एकटा! गरजेच्या वस्तू घेण्यासाठी दुकानात येण्याशिवाय पर्यायच उरला नाही."

हे विदारक चित्र एकटेपणाचे गांभीर्य जाणवून देणारे होते.आपल्यापेक्षा एकटेपणा इथं खूप जास्त आहे.

शिकल्यावर लागलीच वेगळे घरटे करणारी मंडळी, नवरा बायको दोन्ही सबळ असल्याने कोणाचं कोणावाचून अडत नसल्याने किरकोळ मतभेदाचा घटस्फोटात होणार रूपांतर,स्वतंत्र स्पेसचे आवाजवी महत्वाने तडजोड या शब्दाचा पडत असलेला विसर या सर्वं गोष्टी सर्वत्रच चिंताजनक वाटतात.

पिढी बदलली की जीवनमूल्यही बदलतात आपल्याला जे वावग वाटत ते पुढच्या पिढीची जनरीत असतें.यालाच आपण जनरेशन गॅप म्हणून स्वीकारतो.

मोठया शहरांत शेजारच्या फ्लॅटमधील व्यक्ती अगदी वर गेली तरी बाजूच्याला पत्ता नसतो किंवा शेजारी कोण राहतो हे फक्त्त त्यास नेमप्लेट वाचून माहित असतें.

"Man is social animal. " हे खरं असल तरी, आपण खरंच तेवढे सोशल राहिलो आहोत का?

काही प्रश्न स्वतःच्या मनास विचारले की आपोआप कळेल.

कुणी आमंत्रण दिल तर आवर्जून जातो की ते अव्हॉइड करतो? घरी कुणी आल्यावर आनंद होतो की कपाळावर नकळत आठ्या पडता?

छोट्या गावाकडून मोठ्या गावाकडे जाताना समाजाची जवळीक ही दूर दूर जाताना दिसते.

जशास तसें अर्थात टिट फॉर टॅट हा नियम सर्वत्र लागू आहे.तुम्ही लोकांपासून दूर दूर राहिलात तर लोकही जवळ येत नाही.

एकटेपणा हा जीवघेणा आहे.. सुदैवाने आपल्या भारतात तो इतर प्रगत देशापेक्षा नक्की कमी आहे..

आजही घरी मित्र बोलावले की सर्वं आवर्जून येतात.मग गप्पांचा डाव रंगतो.एकटेपणा इथे नव्हे जगात सर्वं ठिकाणी असतो. तो टाळण्यासाठी तुम्ही मात्र सोशल असणे गरजेचं आहे.

वय जसे जसे वाढते किंवा खूप जास्तीचे आयुष्य असले तर सारे मित्र आप्त आधीच सोडून जातात दुःख खूप वाटून दुःख या शब्दाचा त्या शतायुषी वरदान प्राप्त झालेल्यास विसर पडतो.

आपण वाढदिवशी शतायुषी व्हा अशा आशीर्वाद वा शुभेच्छा देतो पण वयाची शंभर वर्ष जो अनुभवतो त्यास शेवटी तो शापच वाटतो.जाण्याचीच शेवटी तो आतुरतेने वाट पाहत असतो.

_एकटा आला इथं तू_
_जाशील एकटाच तू_
_नाते अनेक जोडूनी_
_जीवन सार्थ ठरवतो तू_

_दुःख ते एकटेपणाचे_
_एकटा जो तोच जाणे_
_साक्षात त्याचे चित्र उभे_
_दुकानी आज मी पाहिले_

_शंभरीत फक्त्त एकटा_
_सोडून जाता आप्त तया.._
_दुःखाचीच सवय होउनी_
_दुःख शब्दही तो विसरला.._

_शतायुषी व्हा तुम्ही_
_वाढदिनी शुभेच्छा जरी.._
_अभिशाप त्या वाटे तया_
_जो गाठतो शतकाला.._

०८.०४.२३

Group content visibility: 
Use group defaults

वाचतोय. या लेखात “न्यूज़ीलंड” कमी आहे जरा.

भीड़ में अकेला तर सर्वत्रच आहे आता.

एक दुरुस्ती सुचवतो :

…”मार्केटिंगला” स्वतः येण्याशिवाय पर्यायच उरला नाही…

इथे “शॉपिंग” म्हणायचे असावे. तसे असल्यास बदल करा प्लीज.

मला माझ्या आगाऊपणाबद्दल माफ़ी द्या.