तंत्रज्ञानात झालेल्या जवळपास प्रत्येक क्रांतीनंतर एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेला आहे, तो म्हणजे "ह्यामुळे माणूस निरुपयोगी होणार का?"
यांत्रिक छपाईचे तंत्रज्ञान आल्यावर 'आता हस्तलेखनाच्या परंपरेला धोका निर्माण झाला' असे वाटले, कॅमेरा आला तेव्हा चित्रकार अस्वस्थ झाले, संगणक आल्यावर 'आता लेखन, गणित, नोंदवही सगळंच संपेल' अशी भीती निर्माण झाली. परंतु प्रत्येक वेळी तंत्रज्ञानाने माणसाला निरुपयोगी न करता उलट त्याच्या क्षमतेला नवी दिशा दिली, त्याची कार्यक्षमता वाढवली आणि कौशल्यगुणांचा विकास होण्यास हातभार लावला.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) अशा नावाने आपल्याला परिचित असलेली क्रांती देखील त्याला अपवाद नाही. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे साहित्य / कला विश्वातही AI च्या वापरामुळे बऱ्यापैकी अस्वस्थता दिसून येते. पण इथे प्रश्न केवळ ह्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या साधनांचा नसून तो विचारांचा आहे!
लेखन, कथा, कविता, चित्रनिर्मिती, संगीत ही सगळी क्षेत्रे जी खास मानवी सर्जनशीलतेची मानली जात होती, आता तीच क्षेत्रे AI सहजरित्या हाताळताना दिसत आहे. त्यामुळे लेखक / कवी / चित्रकार / संगीतकार अशांच्या मनात “आता माझी गरजच काय?” असा प्रश्न उभा राहणे जितके स्वाभाविक आहे तितकेच वाचक / प्रेक्षक आणि श्रोत्यांना "आता आपल्याला नको नको ते वाचायला / बघायला /ऐकायला मिळेल" अशी धास्ती वाटणेही स्वाभाविक आहे, कारण आज अनेक नवोदित लेखक, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स AI कडे एका जादुच्या छडीसारखे पाहतात,
'दोन ओळींचा प्रॉम्प्ट दिला की झाला लेख तयार' पण AI ची ही सुलभता जितकी आकर्षक वाटते, तितकीच ती धोकादायकही आहे. कारण लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो.
मराठी भाषेच्या संदर्भात हा संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण आपल्या भाषेची परंपरा केवळ साहित्यिक नसून ती सांस्कृतिक आहे. AI हे मुख्यतः 'इंग्रजीला प्राधान्य देणारे' साधन असल्याने इंग्रजीत मजकूर निर्माण करण्यासाठी ते जेवढे प्रभावी ठरते, तेवढे ते मराठीत मजकूर निर्मितीसाठी प्रभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे मराठीत लेखन करण्यासाठी AI चा वापर करताना 'मराठी भाषा, तिची लय, भाव आणि संदर्भ' जपण्याची जबाबदारी ही पूर्णपणे लेखकावर येते.
मला स्वतःला AI ला प्रॉम्प्ट देऊन त्याच्याकडून लिहून घेतलेले आणि त्यावर वापरकर्त्याने मानवी सर्जनशीलतेचे कुठलेही 'संस्कार' न करता जसे च्या तसे प्रकाशित केलेले 'यांत्रिक' लेखन वाचायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सदर लेख मालिकेचा उद्देश AI चे कौतुकगीत गात त्याला 'नायक' ठरवणे किंवा त्याची निंदानालस्ती करत त्याला 'खलनायक' ठरवणे हा नसून, तंत्रज्ञानापेक्षा विचारप्रक्रियेला प्राधान्य देत नवोदित लेखक लेखक / कवींना आपल्या मनातील कल्पना कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात उतरवण्यासाठी ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे सदूपयोग होऊ शकतो हे सांगण्याचा आणि 'AI म्हणजे लेखकाचा शत्रू आहे की तो एक सहकारी आहे? AI मुळे लेखन सुलभ होते की साचेबद्ध? AI कल्पना देतो की कल्पनाशक्ती कुंठित करतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI वापरताना लेखकाने स्वतःला कुठे थांबवायचे?' अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करत आहे.
AI ला अनुभव नसतो. AI ला स्मृती नसते. AI ला भाव-भावना आणि संस्कृतीची जाणीव नसते. पण आधीच्या मजकुरावरून पुढचा शब्द काय असू शकतो ही संभाव्यता ओळखण्याची विलक्षण क्षमता AI कडे असते. त्यामुळे AI चा वापर आपण लेखनासाठी किती जवाबदारीपूर्वक करतो ह्यावर तो आपल्या वैभवशाली लेखन / वाचन संस्कृतीला समृद्ध करेल की दरिद्री करेल हे अवलंबून असेल.
मालिकेतल्या पुढील भागांमध्ये आपण AI कडे मानवी सर्जनशीलतेला पर्याय म्हणून मिळालेला तांत्रिक/यांत्रिक गुलाम म्हणून पाहणार नसून, लेखनासाठी त्याचा वापर करणाऱ्या लेखकाचा 'मदतनीस' म्हणून पाहणार आहोत. हा मदतनीस कधी आपल्याला वेगाने लिहायला मदत करेल, कधी आपल्याला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव करून देईल, तर कधी आपल्या विचारातील उणिवा ठळक करून दाखवेल.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
क्रमश:
छान सुरवात झालीय. पुभाप्र.
छान सुरवात झालीय.
पुभाप्र.
+७८६
+७८६
सुरुवात उत्कंठावर्धक केली आहे
सुरुवात उत्कंठावर्धक केली आहे, पुढील भागही त्याच तोडीचे होतील ही खात्री आहे.
सदर लेख मालिकेचा उद्देश AI चे कौतुकगीत गात त्याला 'नायक' ठरवणे किंवा त्याची निंदानालस्ती करत त्याला 'खलनायक' ठरवणे हा नसून, तंत्रज्ञानापेक्षा विचारप्रक्रियेला प्राधान्य देत नवोदित लेखक लेखक / कवींना आपल्या मनातील कल्पना कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात उतरवण्यासाठी ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे सदूपयोग होऊ शकतो हे सांगण्याचा आणि 'AI म्हणजे लेखकाचा शत्रू आहे की तो एक सहकारी आहे? AI मुळे लेखन सुलभ होते की साचेबद्ध? AI कल्पना देतो की कल्पनाशक्ती कुंठित करतो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे AI वापरताना लेखकाने स्वतःला कुठे थांबवायचे?' अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून करत आहे.
हे सर्वात महत्त्वाचे!
पुभाप्र
वाह ! छान सुरवात. झकास . . .
वाह ! छान सुरवात. झकास . . .
पुभाप्र.
आत्ता डोकं जड असल्याने जड
आत्ता डोकं जड असल्याने जड विषय नको. नंतर येईन.
उत्तम सुरुवात. भावे, हे तुमचे
उत्तम सुरुवात. भावे, हे तुमचे विचारमंथन आहे की आपण एखादा कोर्स केलेला आहे किंवा पब्लिश्ड पुस्तक वाचलेले आहे? ए आय ची मदतही असू शकते. मी सहज शक्यता विचारतेय.
छान लिहिले आहे. AI पाणी भयंकर
छान लिहिले आहे. AI पाणी भयंकर वापरते, पर्यावरणासाठी हानीकारक आहे. Chat gpt generators use water to cool off the system, that too drinkable water not ocean water. त्यामुळे गंमत म्हणून सुद्धा मी अजून वापरले नाही. मला फार माहिती नाही, पण वाचायला आवडेल.
लेखातील "यांत्रिक लेखन अजिबात आवडत नाही"ला अनुमोदन. मलाही अजिबात सहन होत नाही. वाचूच शकत नाही.
छान सुरूवात आणि विषय आवडीचा
छान सुरूवात आणि विषय आवडीचा आहेच.
यांत्रिक लेखन, एआयने तयार केलेली चित्रे, व्हिडीओ हे १५-२० सेकंदात मला टर्न-ऑफ करतात.
या मॉडेल्सच्या ट्रेनिंगकरता लागणारे नैसर्गिक रिसोर्सेस वगैरे आहेच. अस्मिताने पाण्याबद्दल लिहीले आहे. या डेटा सेण्टर्सना लागणारी विजेची गरजही प्रचंड आहे. आता ते आकाशातील डेटा सेन्टर वगैरे काय ते नीट वाचलेले नाही. पण हे लोक यांच्या इनोव्हेशन क्लेम्स बद्दल "हिट ऑर मिस" आहेत. त्यामुळे खात्री नाही. पण कदाचित भविष्यात तो प्रश्न सोडवला जाईल. तरीही एआय मॉडेल्स, एजण्ट्स व ते वापरणारी अॅप्लिकेशन्स जेथे प्रतिभेची गरज आहे तेथे किती प्रमाणात उपयोगी ठरतील याबद्दल शंका आहे.
मूळ लेखातील "स्मृती नाही" बद्दल - एआय मॉडेल्स चर्चेचा संदर्भ सेव्ह करतात. त्यामुळे त्या अर्थाने स्मृती असते.
मात्र लेखातील या मूळ आशयाशी पूर्ण सहमतः
प्रत्येक वेळी तंत्रज्ञानाने माणसाला निरुपयोगी न करता उलट त्याच्या क्षमतेला नवी दिशा दिली, त्याची कार्यक्षमता वाढवली आणि कौशल्यगुणांचा विकास होण्यास हातभार लावला.
>>>>>>>>कारण लेखन ही केवळ
>>>>>>>>कारण लेखन ही केवळ शब्दांची रांग नसून ती अनुभव, संदर्भ आणि संस्कृती ह्यांची गुंफण असते, लेखक आणि वाचकामधला तो एक अबोल पण अत्यंत प्रभावी असा शाब्दीक 'संवाद' असतो
हे वाक्य आवडले.
@ मानव पृथ्वीकर । ऋन्मेऽऽष ।
@ मानव पृथ्वीकर । ऋन्मेऽऽष । वामन राव । हेमंतकुमार । एक लेखक । धनश्री । अस्मिता । फारएण्ड
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ धनश्री
>>>"हे तुमचे विचारमंथन आहे की आपण एखादा कोर्स केलेला आहे किंवा पब्लिश्ड पुस्तक वाचलेले आहे? ए आय ची मदतही असू शकते. मी सहज शक्यता विचारतेय.">>>
सुरुवातीचे काही भाग हे 'स्वानुभवाधारीत विचारमंथन, ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी झालेल्या चर्चा, पब्लिश्ड पुस्तक नाही पण आंतरजालावर ह्या विषयावर माहितीपूर्ण असे व्यावहारिक लेखन करणाऱ्या काही ब्लॉगर्सच्या पोस्ट्स वाचून मिळालेली माहिती' अशा घटकांवर बेतलेले आहेत. 'AI चा वापर करून लेख, कथा, कविता आणि चित्र/प्रतिमा निर्मिती विषयीच्या प्रात्यक्षिकांसहित असलेलया भागांसाठी AI चा प्रत्यक्ष वापर करणे, त्याची मदत घेणे अपरिहार्य आहे. (पद्य, काव्य-कविता ह्या विषयीचे माझे ज्ञान आणि अनुभव हे अक्षरशः 'शून्य' पातळीवरचे असल्याने मालिकेतला 'कविता लेखन' बद्द्लचचा भाग एका कवयत्री मैत्रिणीच्या आणि अर्थातच AI च्या मदतीने लिहिलेला असेल 😀)
@ अस्मिता आणि फारएण्ड,
तुम्ही उपस्थित केलेले 'AI पाणी भयंकर वापरते, पर्यावरणासाठी हानीकारक आहे' आणि 'डेटा सेण्टर्सना लागणारी विजेची गरजही प्रचंड आहे' हे मुद्दे अगदी रास्त आहेत. त्यावर भविष्यात काय तोडगे काढले जातात हे पाहण्याची मलाही उत्सुकता आहे!
प्रतिसादाची दखल घेतल्याबद्दल
प्रतिसादाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
मस्त लिहिलंय. चांगली सुरुवात.
मस्त लिहिलंय. चांगली सुरुवात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत