ओल्या वाळूतल्या पाऊलखुणा

Submitted by Meghvalli on 18 January, 2026 - 03:06

चिरंतन प्रश्नांची निरंतर कोडी,
हळूहळू उलगडत — थोडी थोडी.

कधी काळ थांबतो आरशातल्या नजरेत,
क्षणभर प्रश्नच उत्तरासारखा वाटतो तिथेच.

कितीही जपलं तरी ते निसटतंच,
मन मात्र त्याला कायमचं चिकटतं.

हसण्यामागची शांत सावली अजून ओळखीची आहे,
जुनं दुःखही आता थोडंसं आपुलकीचं आहे.

जुन्या आठवणींचे रेशमी शामियाने खुणावतात,
त्यांच्या उबदार मखमाली बिछान्यात मनं विसावतात.

आठवणी शब्द न वापरता बोलतात,
मनाच्या कप्प्यात अलगद उतरतात.

तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी शरीराने खूप वेगळे आहोत,
आम्हा दोघांची विश्व वेगळी ,तरी आम्ही एकाच आहोत.

वेळेच्या ओघात बरंच काही बदललं असलं,
आत कुठेतरी तेच बालपण जपलेलं असतं.

आजही एखादा वास, एखादी संध्याकाळ,
मला मागे नेते — कुठलीही सूचना न देता.

पुळणीवरच्या पाऊलखुणा मागे राहिल्या,
मी पुढे निघून आलो — ओल्या वाळू मागे राहिल्या.

आणि कळत नकळत मी वर्तमानात उभा राहूनही
भूतकाळाशी हळूच हात मिळवतो.

शनिवार, १७/१/२६ , १०:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>>>>>>जुन्या आठवणींचे रेशमी शामियाने खुणावतात,
त्यांच्या उबदार मखमाली बिछान्यात मनं विसावतात.
सुंदर

>>>>>>आजही एखादा वास, एखादी संध्याकाळ,
मला मागे नेते — कुठलीही सूचना न देता.
.
पुळणीवरच्या पाऊलखुणा मागे राहिल्या,
मी पुढे निघून आलो — ओल्या वाळू मागे राहिल्या.

कल्पना आवडली
------------------
छान आहे कविता.

छान