न्यूझीलंड डायरी ६. सापशिडी

Submitted by हेमंत नाईक. on 10 January, 2026 - 01:20

६.सापशिडी!!
...हेमंत नाईक

चि. सौरभच्या हाफ मून बे या ऑकलंडच्या उत्तम वसाहतीत असलेल्या घरापासून चार समुद्र किनारे जवळ असल्याने माझा फेरफटका या किनाऱ्यावर आलटून पलटून रोज असतो. चि. कियान व चि.कबीरची आजी माझी सौभाग्यवती मात्र अधून मधून बरोबर येते.

फक्त ऑकलंड येथे नव्हे तर या देशात सर्वं ठिकाणी पळण्यासाठी, फिरण्यासाठी, सायकलिंगसाठी असे दुतारफा हिरवळ असलेले चार पाच फुटाचे काँक्रीटचे वोक वे आहेत. सभोंवती मात्र हिरवेगार नीट कट केलेले लॉन शोभून दिसते.त्यापैकी आजचा हा समुद्रकिनारी लागत जाणारा रोटरी मार्ग, गोलाकार आणि अतिसुंदर आहे.

सकाळी खूप थंडी असते आणि थंडगार बोचरे वारे असल्याने दुपारी ११ वाजता फिरण्यास जातो.प्रत्येकास विश करण्याची इथली पद्धत आता अंगवळणी पडली आहे.

आजचे शिर्षक थोडे आश्चर्यचकित करणारे वाटतं असेल.

*"आपल जीवन एका सापशिडीच्या खेळा सारखेच आहे सुदैवाच्या शिडीने भरकन उंच उंच जाताना केव्हा दुर्दैवाचा साप गिळेल यांची शाश्वती नसते.मात्र कष्टाचे फासे मात्र तुम्हालाच फेकावे लागतात... गीतेत सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे."*

म्हणून आता आहे त्या पायरीवर बसून सर्वं एन्जॉय करा, जसा आज सकाळी अकरा वाजता मी तमाकी नदी आणि सागराच्या संगमावर असलेल्या बीचवर असलेल्या हिरवळीवरच्या एका लाकडी टेबला वर बसून समोर असल्या निळ्या सागराची आणि निळ्या आकाशात कापसाच्या पूजक्या प्रमाणे दिसणाऱया ढगाची डोळ्यात सुंदरता टिपत लेख लिहिणं एन्जॉय करतोय.

सर्वं सुंदर स्पॉटला बसण्यासाठी अशी टेबल ठिकठिकाणी, अगदी मोटार वे ला लागून सुद्धा असतात. इथे रविवारी कुटुंब एकत्र येऊन डबापार्टी करतांनाही दिसतात.

पृथ्वीवर वातावरण विषववृत्तावर अधिक जाडीचे आणि दोन्ही गोलार्धाकडे निमूळते कमी जाडीचे होत जाते. हा देश दक्षिण गोलार्धापासून जवळ असल्याने येथे वातावरणाची जाडी कमी असल्याने आकाश खाली आल्या सारखे वाटते.त्यामुळे थंडी असूनही उन्हाची तीव्रता जाणवते सन बर्न होऊ नये म्हणून इथं खेळाडू क्रीम लावलेले आपण क्रिकेट मॅचेस मध्ये बघतो.स्किन कॅन्सर चे प्रमाण त्यामुळं इथं बरेच आहे.

सापशिडीवर लिहून सुरुवात केली खरी! पण ही प्रेरणा समोरच हिरव्यागार डोंगर उतरावर असणाऱ्या स्नेक अँड लॅडर पार्क पासून आली.

आकडे लिहिलेल्या लाकडी ठोकळ्यावर बॅलन्स करत पुढे जाताना काही ठिकाणी चढण्यासाठी शिड्या तर काही ठिकाणी सर्परूपात घसराण्यासाठी घसरगुंडी अशी कलांत्मक रचना या पार्कची केली आहे.

तिन गोंडस मुलं तोल सांभाळत हा खेळ खेळत होती बहुदा बहीण भावंड असावीत आणि त्यांची जेमतेम तिशीतील आई त्याच्यावतीने खाली स्टँड वर फिक्स केलेले फासे फिरवीत होती.

आपल्या इथल्या सारखे "हम दो हमारा एक. " असे सूत्र इथं नाही एकाच वेळी एक दोन वर्षाच्या अंतराने असलेली तिन मुलं आणि त्यांचे आई बाबा अशा सुखी कुटुंबाची एकत्र फिरतानाची खूप दृश्य इथे दिसलीत. आपल्याकडे ही दुर्मिळ झाली आहेत.

जीवनात सर्वच तोल सांभाळणे किती महत्वाचे हे जाणून या ओळी रचल्यात.

तोल सांभाळण्याचा
धडा ठोकळ्यावर
आठवणीत राहो तो
अनमोल आयुष्य भर

तोल सर्वं बाबींचे
लिलया ते सावरावे..
तोल जाण्यापूर्वीचे
अतिरेक ते टाळावे..

तोल जाता पडतो_
कुणी कुठे कधीतो_
हात देण्यास तुम्ही_
पुढे नित्य असावे..

या पार्क समोरच बीचवर दोन स्विंग बांधले होते लहान मुलं पडणार नाही अशी पूर्ण काळजी घेतली होती. बाजूला ग्रीन जीम देखील होती.. व्यायामासाठी.

एक तो झोका
उंच उंच झोका
आकाशी जाणारा
हवासा वाटाणारा..

सुखाचे झोके खूप
उंच उंच घेतले.
अजूनही नित्य घेतोय
स्वरूप असे ते वेगळे.._

झोक्यावर न बसता
येता आठवणीचे झोके
भूतकाळात नाठाळ मन
जाते अन तेथे रमते

अशा खूप मधूर आठवणी
लिहिण्याचा माझा अट्टाहास
सुंदर समोर मोहक निसर्ग
वर्णना लेखणीची ती साथ

अफलातून सृष्टीसौंदर्य, अगदी निळ्या आकाशापासून तर थेट निळ्या सागराच्या स्वच्छ लाटापर्यत सर्वंदूर उसळताना बघताना धन्य वाटते. निसर्ग या देशावर विशेष मेहेरबान असंल्याचे जाणवते . डावीकडील हिरव्यागार टेकड्यावर दूर जाणाऱ्या पाऊल वाट, सुंदर समुद्राकडे बघणारे, तेवढेच आकर्षक बंगले, त्या समोरील फुलझाडांची आकर्षक रंगसंगती व रचना आदी सर्वं दृष्य टिपत, साऱ्या ३६० डिग्री मध्ये माझी नजर सर्वत्र अधाशासारखी भिरभीरत होती.

काय साठवू अन काय नको.. अस झालय मला!

माझ्या मेंदूची मेमरी निश्चितच कमी पडेल म्हणून हा लिहिण्याचा घाट घातलाय.

एरवी अगदी चहाही न पिणारा मी, आज या सौंदर्याचे एकेक घोट स्थिर बाकावर बसून नजरेने रिचवत होतो. सौंदर्याची झिंग चढत होती..
"न पिता हँगओव्हर काय असतो तेही आज अनुभवत होतो.."*

आजच्या फिरण्याचे काही फोटोचा अल्बम वर फोटोच्या कोलाज मध्ये देत आहे.

हेमंत नाईक
३१.०३.२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users