न्यूझीलंड डायरी.... ४. उडणारे जीव आणि निर्जीव!!

Submitted by हेमंत नाईक. on 6 January, 2026 - 17:12

४. उडणारे जीव आणि निर्जीव!!

काल कथानक मिळाल्याने सिंगापुर एअरपोर्टचे वर्णन करायचे राहून गेले.सिंगापूरचा चांगी एअरपोर्ट नावाप्रमाणे फक्त चांगला नव्हे तर अप्रतिम आहे.

इथे एकाच ठिकाणी उडणारे नाजूक जीवाचे सुंदर फुलपाखरू आणि हवेत वेगात झेप घेणारे जंबो एअरबस 380 याचे उडणे बघण्याचा योग आला.खूपजण इथे जाऊन आले असतील त्याच्या आठवणीही ताज्या असतील.

चार टर्मिनल असणारा हा एअरपोर्ट सारे टर्मिनल एअरबसने एकमेकांना जोडलेले. सर्वत्र एकासारख्या डिझाईन सुंदर कार्पेट ठिकठिकाणी प्रवास्यांसाठी माहितीच्या पाट्या त्यामुळे सर्वं कोणालाही काही विचारायची गरज नव्हती. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी गरम पाणी सुद्धा उपलब्ध होते.

एअरपोर्टच्या आतील भागात असलेली हिरवी झाडें मन प्रसन्न करून गेली. प्रत्येकाने विमानात वेळेवर येण्याची जबाबदारी त्याची आहे त्यामुळे कोणत्याही अनाउंसमेंट होत नव्हत्या.

एअरपोर्ट मॉल मध्ये सोव्हीनिअर्स आणि मद्याच्या दुकानाची रेलचेल होती.मॅझेनाईन लेव्हलला सिंगापूर लेन मध्ये भारतीयही खाद्यपदार्थाचीही भरपूर रेलचेल होती..फक्त्त किंमत विचारू नका.

रात्री ठीक १०. ४५ ला फ्लाईट होती.. एअर बस 380 हे जम्बो विमान असल्याने लेगरूम आणि सीटची रुंदी मोठी होती प्रवास सुखकर होणार होता.

विमान प्रवासात हवेत डिस्टरबन्स असेल तर कमरेचे बेल्ट बांधायला सांगतात आणि विमान त्या हवेच्या पट्ट्यातून जाताना चक्क थरथरते पण याप्रकारच्या विमानात तो थरकाप विशेष जाणवत नाही.

T3 या टर्मिनलच्या मधोमध असलेले क्रिस्टल गार्डन खूप प्रेक्षणीय असे आहे. चमकदार छोटे मोठे काचेचे क्रिस्टलचे गोल आणि तेथील फुलझाडे मन मोहून घेतात.

स्मोकिंग साठी वेगळ्या जागा होत्या.

T3 हे टर्मिनलचे प्रमुख आकर्षण म्हणजे बटरफ्लाय गार्डन.येथे वेगवेगळी सुंदर मनमोहक भरपूर फुलपाखरे सर्वत्र उडत असतात. सभोंवती असलेली हिरवळ, छोटी झाडें आणि खाद्य म्हणून त्याना अननसाचे काप व ताजी फुले कलात्मक पद्धतीने फुलपाखरच्याच आकारात मांडले होते.

तिथे फिरतांना दोन चार फुलपाखरे माझ्याही हातावर येऊन बसली मला मजा आली पण दुसऱ्या क्षणी, मधुमेह तर झाला नाही ना? ही उगीचच मनात शंका आली.

दोन मजली गार्डन त्यात वरुतून दगडा दगडातून येणारा छोटासा धबधबा सर्वच आकर्षक होते. सर्वं प्रकरच्या फुलपाखरंची अभ्यासपूर्ण माहिती सचित्र दिली होती.लेओव्हर असणाऱ्यासाठी ही एक सुंदर भेट होती.

शाळेतील कवी ग. हा. पाटील यांची फुलपाखरू ही कविता मला आज परत आठवली

फुलपाखरू.

छान किती दिसते,
फुलपाखरू...

या वेलीवर,
फुलांबरोबर
गोड किती हसते,
फुलपाखरू...

पंख चिमुकले
निळे-जांभळे
हालवुनि झूलते,
फुलपाखरू...

डोळे बारीक,
करिती लुकलुक
गोल मणि जणू ते,
फुलपाखरू...

मी धरु जाता
येई न हाता
दूरच ते उड़ते_
फुलपाखरू...

हळुवार उडणारे नाजूक फुलपाखरू आणि त्या बटरफ्लाय गार्डनच्याच शेजारी B2 या गेटवरून भीमकाय जम्बो विमान A380 ऑकलंडला उडणार होते.

A380 या जगातील मोठ्या भीमकाय डबल डेकर जवळपास ७०० -८०० प्रवासी वाहून नेणाऱ्या , तब्बल चार जेट इंजिन असणाऱ्या विमानातून हा प्रवास झाला. एका लाईनीत तिन दोन बाजूस आणि चार मध्ये असे दहा प्रवासी आणि लेगरूम भरपूर वरचा मजला बिझीनेस आणि तळमजल्यावर एकोनॉमी आणि प्रिमिअम इकॉनॉमी असे सीटिंगचे चित्र.

सिंगापूर एअरलाईन जागतिक पहिल्या दहा एअरलाईन पैकी एक असल्याने सर्वं खाद्यपानाच्या सेवाही उत्तम होत्या.हे वजनदार मोठे विमान असल्याने उडायला याला रनवे देखील मोठा ३.० किमी लांबीचा लागतो. ऑकलन्ड ते दुबई हा जगातील सर्वात मोठ्या अवधीचा नॉनस्टॉप विमान प्रवास याच एअरबस द्वारे केला जातो. या विमानाच्या अवाढव्य पंखात पेट्रोलच्या टाक्या असून त्यावर चार जेट इंजिन असतात.या विमानाला एक तासाच्या उड्डाणासाठी ज्यात ९०० ते १००० किमी अंतर पूर्ण करते त्यासाठी सुमारे ११४०० लिटर इंधन लागते. या विमानात एकूण ३,२०,००० लिटर कॅपसिटीच्या फ्युएल टॅंक असतात. या विमानाची लांबी २४० फूट, विमानाची रुंदी २१ फूट तर उंची ८० फूट आणि विंग स्पॅन २६१ फुटाचे असतात. सिंगापूर ते ऑकलंड हा रात्रीचा १० तासाचा प्रवास होता. झोप लागली तर ठीक नाही तर मोबाईल वर काहीतरी लिहीत बसेन.

सुंदर एअरहोस्टेस फिरताना पाहून, सी ओ ई पी त असताना डेक्कनच्या आता अस्तित्वात नसलेल्या नटराज टॉकीजच्या समोरच्या पाईपावरचे दिवस क्षणभर आठवले. संध्याकाळी आम्ही मित्र या पाईपावर विराजमान होत असू. मराठी भाषेत शब्द गाळला किंवा त्याचा क्रम बदलावला तर अर्थ पूर्ण बदलतो हे सांगणारी, आणि जुने दिवस आठवणारी शब्द रचना..झोपता झोपता हे शब्द सुचलेत.

छान किती दिसते
हे पाखरू..

संध्येस डेक्कनवर
आपल्याच धुंदीत_
ऐटीत ते चालते
हे पाखरू..

कमनीय बांधा
गोरे वा सावळे
पंखा विना उडते
हे पाखरू..

भिरभीरणारे
डोळे टपोरे
वेडच लावते
हे पाखरू..

सुंदर स्वप्न पडले
उठता विरले
वाट घरी पाहते
आपले पाखरू..

छान किती दिसते_
आपले पाखरू..

अनेक पाखरातून स्वतः निवडलेलं आणि ईश्वराने सातजन्माची गाठ बांधलेले जोडीदाराच्या रूपांने दिलेले पाखरू जीवनात आल्याने जीवन सार्थ होते. साठीच्या चिरतरुण अशा सुंदर विविध पक्षाच्या जोड्यांची किलबिल कार्ल्याला रिसॉर्टला तळ्याकाठी नुकतीच मी ४० वर्षपूर्तीच्या COEP च्या जंगी गेट टुगेदरला अनुभवली होती..
आज इथंच थांबतो.
लवकर थोड्या वेळात जादुई हिरव्या रंगात लँड होणार आहे.

हेमंत नाईक
२९.०३.२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users