मंकी ब्रेड (Monkey bread)

Submitted by Adm on 3 January, 2026 - 00:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

ब्रिटीश बेकिंग शो मध्ये बघितल्यापासून ही रेसिपी करायची होती. शिवाय माझा ब्रेड दरवेळी चांगला होईलच ह्याची खात्री नसते. त्यामुळे एक प्रयोग म्हणूनही हा ब्रेड करून बघायचा होता. ह्या ब्रेडमध्ये डो चे लहान लहान एका घासाएव्हडे तुकडे करून ते एकत्र बेक करायचे असतात आणि मग खाताना ते तुकडे तोडून खायचे असतात. माकडं एकत्र बसून त्यांच्या खाण्यावर ताव मारतात असाच काहीसा प्रकार म्हणून हा मंकी ब्रेड म्हणे.

१. दुध - ३५० मिली
२. साखर - १ टेबलस्पून
३. यीस्ट - ७ ग्रॅम
५. ब्रेडचे पिठ किंवा मैदा - ५०० ग्रॅम
६. मीठ - ८ ग्रॅम (१ टीस्पून)
७. लसूण - ४ मोठ्या पाकळ्या (किसून)
८. ऑरेगानो, रोसमेरी थाईम, वगैरे हरर्ब्स मिळून - १ टीस्पून
९. बारीक चिरलेली पार्स्ली - ३ टेबलस्पून
१०. बारीक चिरलेली कांद्याची पात - ३ टेबलस्पून
११. रेड आणि ब्लॅक पेपर - १ टीस्पून
१२. ऑलिव्ह ऑईल - १२० मिली (पण हे अंदाजाने घ्यावं)
१३. चिजचे छोटे छोटे क्युब
१४. किसलेलं कोणत्याही प्रकारचं चिज

क्रमवार पाककृती: 

PXL_20251226_040904791.jpg

१. एका ग्लासात दुध घेऊन त्यात साखर विरघळवून घेतली आणि त्यात यीस्ट घालून, नीट ढवळून, ग्लासावर झाकण ठेऊन साधारण १० मिनीटे बाजूला ठेऊन दिलं. एव्हड्या वेळात यीस्ट अ‍ॅक्टिवेट होऊन मिश्रणाला बुडबुडे यायला लागतात. साखर अगदी थोड्या प्रमाणात असते. तिच्यामुळे गोड चव येत नाही, पण ही साखर यीस्टचं "खाद्य" असल्याने महत्त्वाची असते.
२. दरम्यान पिठात मीठ घालून नीट एकत्र करून घेतलं.
३. मोठ्या परातीत पिठाचा खळगा करून त्यात दुध-यीस्टचं मिश्रण ओतलं आणि हळूहळू एकत्र करत त्याचा गोळा करून घेतला. हे डायरेक्ट ओट्यावरही करता येतं.
४. गोळा हाताच्या तळव्याने चांगला मळून घेतला. गोळा छान तुकतुकीत झाला पाहिजे आणि बोटाने थोडसं दाबला की पुन्हा वर आला पाहिजे.
५. हा गोळा भांड्यात झाकून उबदार जागी ठेऊन दिला. हे पहिलं 'प्रुव्हिंग'. साधारण दिड तासाने बघितलं तर गोळा फुगून जवळ जवळ दिडपट झाला होता.
६. एकीकडे लसणाचा किस, सगळे मसाले, कांद्याची पात वगैरे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून घेतले. मूळ रेसिपीमध्ये रोसमेरी दिली होती पण मी ती नाही घातली. ती जरा जरी जास्त झाली तरी खूप तीव्र वास येतो.
७. फुगलेल्या गोळ्याचे डो-कटरने लहान लहान (म्हणजे साधारण पुरीच्या लाटी एव्हडे) तुकडे करून घेतले. पिठाचा गोळा ताणून न तोडता डो-कटर किंवा चाकूने कापावे. ताणून तोडल्यास त्यातले ग्लुटनचे स्ट्रँड्स तुटतात आणि मग पदार्थ फुगत नाही असं एकेठिकाणी वाचलं होतं.
८. एक एक गोळा घेऊन, तो थोडा चपट करून त्यात लहान चीज क्युब भरून पारी बंद केली आणि तो गोळा ऑलिव्ह ऑईल मसाल्यांचा मिश्रणात व्यवस्थित घोळवून घेतला. गोळा चमच्यावर ठेऊन जास्तीचं तेल निथळू दिलं आणि बंड पॅन (bundt pan) मध्ये त्या गोळ्यांची दहीहंडी रचली. दहीहंडीच्या प्रत्येक थराच्या मध्ये घरात असलेलं ग्रेटेड चेडार चीज घातलं.

PXL_20251226_013406158.jpg

९. सगळे गोळे भरून झाल्यावर हे पॅन पुन्हा झाकून उबदार जागी ठेवलं. हे दुसरं प्रुव्हिंग. हे साधारण पाऊण ते एक तास केलं. हे गोळे छान टम्म फुगतात आणि स्वतःला त्या पॅनमध्ये नीट बसवतात.

PXL_20251226_021833033.jpg

१०. ओव्हन १८० डि.से.ला प्रिहीट करून त्यात हा ब्रेड साधारण पाऊण तास बेक केला. ही वेळ ओव्हन नुसार बदलेल. पण ब्रेड छान सोनेरी रंगाचा झाला पाहिजे.

PXL_20251226_040510275.jpg

११. पॅन ओव्हन मधून बाहेर काढून ब्रेड ट्रेमध्ये काढून ठेवला आणि थोडासा गार झाल्यावर सूप बरोबर खायला घेतला.

आणि हा आमच्या ख्रिसमस फिस्टचा फोटो!

PXL_20251226_041455177.jpg

वाढणी/प्रमाण: 
६ जणांच्या जेवणाला पुरेसा झाला.
अधिक टिपा: 

१. मसाल्यांचं प्रमाण आपापल्या आवडीनुसार बदलू शकता आणि कुठलीही काँबिनेशन करू शकता. मी पुढच्या वेळी अ‍ॅलॅपिनोचे किंवा हिरव्या मिरचीचे अगदी बारीक तुकडे घालणार आहे. मूळ रेसिपीत वरून कोथिंबीर भुरभुरली होती पण मी नाही घातली.
२. प्रत्येक गोळ्याच्या आत भरलेलं चीज महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुंदर टेक्चर येतं.
३. प्रत्येक तुकड्यात चीज भरणं, तेल मसाल्यात घोणवणं हे जरा वेळखाऊ आहे पण वर्थ इट!
४. हाच गोडाचाही करता येतो. सिनॅमन-शुगर किंवा बाकी कुठले फ्लेवर करता येतील. मी पुढच्यावेळी एक तिखट आणि एक गोड करणार आहे.
५. आधी करून ठेवला तरी चालेल. खायला घेताना ओव्हन किंवा एअर फ्रायरमध्ये थोडा गरम करून घ्यायचा. आधी केला तर मसाले छान मुरतात असं उरलेला ब्रेड खाताना जाणवलं पण ताजाही सुंदर लागतो!

माहितीचा स्रोत: 
https://www.youtube.com/watch?v=a3D0E7sR2EY ही रेसिपी वापरली पण वेळ, काही घटक पदार्थ आणि स्टेप्स मी बदलल्या
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!
निगुतीने करण्याची पाकृ आहे. चव कशी लागत असेल कल्पना करुन बघितलं पण गार्लिक ब्रेडच्या फारसं पुढे जाता आलं नाही. (ममवची दौड तेवढीच!)
तुम्ही क्वँसॉं करता, म्हणजे हे तुम्हाला हा डाव्या हाताचा खेळ वाटला असेल.

वा! वा! मेरी ख्रिसमस! आणि Happy New Year

बेकिंग फार पेशन्सचं आणि निगुतीने करायचं काम आहे.

बेक झाल्यावर मधल्या चीझच्या थराचं काय होतं? त्याने दहीहंडीतले गडी एकमेकांना घट्ट धरून ठेवतात का?

छोटे छोटे बन वेगवेगळे बेक केले तर चालेल का? चवीत आणि पोतात (texture ) मध्ये फरक पडेल का?

भारी दिसतोय मंकी ब्रेड. वाचून करायला जमेल हे मनाशी आल ( तुझ्या आधीच्या पाककृती वाचून अपनेसे नहीं होगा हे फिलिंग आले होते Lol )

बाकी ते पहिल्या फोटोत हिरव्या शेवाळी रंगाचे काय आहे?

छान दिसताहेत हे बन. करून बघेन कधीतरी.
मध्यंतरी याच्याच सारखा pull apart focaccia बनवला होता मी यीस्ट ऐवजी सावर्डो स्टार्टर वापरून. असेच छोटे बन बनवून हर्ब्ज आणि लसूण घातलेल्या तेलात बुचकळून शेजारी शेजारी ठेवले होते सेकंड प्रूफिंग साठी आणि नंतर ते डबल होऊन एकमेकांना चिकटल्यावर प्रत्येक बन वर focaccia ला करतात तसे खळगे करून उरलेले तेल घालून वरून चीज चा थर दिला होता. वरच्या चीज च्या थरामुळे ते असे वेगवेगळे बन दिसत नव्हते पण असेच हाताने तोडून खाता आले.

वा !

Pull apart buns अगदी प्रो लेवल आहेत. 👌

हे आयतेच मिळायला-गिळायला हवे आहेत, आमच्यासारख्या सामान्यांना जमण्यासारखे काम नाही हे !

मंकी ब्रेड.
बन ची दहीहंडी. जबरी दिसतंय हे प्रकरण.
शेवटचा फोटो, मांडणी, प्लेटिंग, क्रॉकरी सगळंच भारी आहे.

हे आयतेच मिळायला-गिळायला हवे आहेत, आमच्यासारख्या सामान्यांना जमण्यासारखे काम नाही हे >>>>>>>> अगदी अगदी.

भारी दिसतोय!!
मी गोड प्रकार खाल्ला आहे पूर्वी, असा करून बघायला हवा.
पहिल्या प्रूफिंगनंतर वळकटी करून घेतली होती का? इतक्या एकसारख्या लाट्या कशा कापल्या?

धन्यवाद सगळ्यांना Happy

चव कशी लागत असेल कल्पना करुन बघितलं पण गार्लिक ब्रेडच्या फारसं पुढे जाता आलं नाही >>> टेक्चर साधारण तसच पण बाकी मसाल्यांचाही स्वाद (चव) लागतो.

तुम्ही क्वँसॉं करता, म्हणजे हे तुम्हाला हा डाव्या हाताचा खेळ वाटला असेल. >>>> हाहा. यीस्ट हा प्रकार बेभरवशी आहे. त्यामुळे होईपर्यंत धाकधुक वाटते. परवाही पहिल्यांदा यीस्ट अ‍ॅक्टीवेट झालच नाही. अजिबात बुडबुडे येईनात. सगळं ३५० मिली दुधाचं मिश्रण फेकुन द्यावं लागलं!

बेक झाल्यावर मधल्या चीझच्या थराचं काय होतं? त्याने दहीहंडीतले गडी एकमेकांना घट्ट धरून ठेवतात का? >>> हो, ते चीज मस्त मेल्ट होऊन त्या थरांमध्ये बसतं. ते नसलं तरीही बन्स एकमेकांना धरून रहातात लादीपावासारखे.

छोटे छोटे बन वेगवेगळे बेक केले तर चालेल का? चवीत आणि पोतात (texture ) मध्ये फरक पडेल का? >>>> चवीत काही फरक पडेल असं वाटत नाही. वेग बेक करूच शकतो. पण ही रेसिपीच पुल अपार्ट ब्रेडची आहे.

बाकी ते पहिल्या फोटोत हिरव्या शेवाळी रंगाचे काय आहे? >>>> तेल, कांद्याची पात, किसलेला लसूण आणि बाकी मसाल्यांच मिश्रण.

मध्यंतरी याच्याच सारखा pull apart focaccia बनवला होता मी यीस्ट ऐवजी सावर्डो स्टार्टर वापरून. >>>> अरे वा! इंटरेस्टींग प्रकार आहे. मल आधी साधा focaccia नीट करायचा आहे. एकदा केला तेव्हा फार दडस झाला!

पहिल्या प्रूफिंगनंतर वळकटी करून घेतली होती का? इतक्या एकसारख्या लाट्या कशा कापल्या? >>>> हो, वळकडी करून घेतली. लाट्या अंदाजानेच कापल्या.

सगळ्यांनी नक्की करून बघा. सोप्पा आहे एकदम. पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

मस्त.. ब्रेड करायचा असे बरेच दिवस मनात आहे. अल्पनाचे सावरडो बघत व वाचत असतेच पण तिथवर पोचायचे असेल तर आज आपल्या साध्या यिस्टवाल्या ब्रेडने सुरवात करावी हे बेस्ट.

आता लगेच करायला घेते. पुल अपार्ट नावाने वाचलाय बर्‍याच ठिकाणी. पण मंकी ब्रेड नाव जास्त आवडले.

आणि एका आयडीने लेख लिहायचा व दुसर्‍या आयडीने धन्यवाद द्यायचे ये चॉल्बे ना हा… Happy Happy Happy

एका आयडीने लेख लिहायचा व दुसर्‍या आयडीने धन्यवाद द्यायचे ये चॉल्बे ना हा… >>>> वो आपुनका स्टाईल है ! Proud

अल्पनाचे सावरडो बघत व वाचत असतेच >>>> मी ही बघत असतो. मी गेल्यावर्षी सावरडो करून बघितला होता. छान होतो. फक्त आम्ही ट्रीपला गेलो आणि त्या दिवसांमध्ये माझं स्ट्रार्टर मेलं. मग परत नाही आणलं. आता आणेन कोणाकडूनतरी थोडसं.

पराग म्हणजे adm आहे? >>> हो Happy

धन्यवाद दक्षिणा. Happy

फक्त आम्ही ट्रीपला गेलो आणि त्या दिवसांमध्ये माझं स्ट्रार्टर मेलं>> ट्रिप ला जाताना फीड करून स्टार्टर फ्रिज मध्ये ठेव पुढच्या वेळी. १०-१५ दिवस तर नक्कीच काहीही होत नाही.
आल्यावर बाहेर काढून २-३ वेळा फीड केलं की व्यवस्थित बबली होतं. मी १५ दिवसांचा प्रयोग केला आहे.
आणि थोडे स्टार्टर ड्राय करून ठेव. बेकिंग शीट वर स्टार्टर चा पातळ थर पसरवायचा आणि कोमट ओव्हन ( खूप गरम नाही, नाहीतर स्टार्टर मरेल) मध्ये वाळवायचे. अशा वाळवलेल्या स्टार्टर मध्ये परत थोडे पाणी घालून दोनेक वेळा फीड करून स्टार्टर वापरायला घेता येतं. माझी तर एक छोटीशी डबी फ्रिझर मध्ये पण ठेवली आहे. पण ती वापरता येईल का माहित नाही.

व्वा! एकदम प्रो दिसतोय! गोड मंकीब्रेड फार आवडतो पण खायला बंदी आहे. हा तिखट मिठाचा मस्त वाटतोय. लवकरच धीर गोळा करुन प्रयोग करेन.