कोकणकडा – एक स्मरण रंजन

Submitted by आनंदशोध on 27 December, 2025 - 05:44

#Sahyadrirockclimbing #kokankada#Firstascentswg#Westernghat #Rockclimbing

१९८८-८९ मध्ये हरिश्चंद्रगडाचा कोकण कड़ा “सेंटर रूट” प्रथम चढाई करताना ठाणे येथील कै.मिलिंद पाठक यांचे सोबत राजू देशमुख, अभिजीत दांडेकर, विश्वास थत्ते, अभय पावगी, सुहास पाठक इ .व पुण्यातले आघाडीचे प्रस्तरारोहक राजेश पटाडे, अनिल साबळे आणि इतर मंडळी होती…

“पिंपरी चिंचवड माउंटेनियरिंग असोशिएशन” या संस्थेच्या नवीन पिढीतील प्रस्तरारोहक इंद्रनील खुरंगळे, इरफान शेख, निखील मार्गोनवार, विकी भालेराव आणि सहकारी यांनी ४ मे ते १७ मे २०१७ या कालावधीत हरिश्चंद्रगडाचा कोकण कड़ा “सेंटर रूट” पुन्हा चढाई करून मार्गात आधुनिक, टिकाऊ आधार खिळे मारत चढाई यशस्वी केली.

चढाई करताना त्यांचा कस लागला. सुरेंद्र शेळके आणि स्वानंद जोशीची त्यांना दमदार साथ आणि मार्गदर्शन मिळाले.

या निमित्ताने यापूर्वी हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यात चढाई करून यश मिळवणारे जुने प्रस्तरारोहक-IIT पवई क्लबचे वसंत लिमये {१९८४-८५}, मिलिंद पाठक {१९८८}, ”गिरिविराज” चे किरण अड़फड़कर {२००५} आणि त्यांचे सहकारी किती धडाडीचे होते ते कळले असेल.

याच “centre route” मार्गावरुन जानेवारी २००१ मध्ये ‘Rock climbers’ क्लब चे राजेश पटाडे आणि सहकारी यशस्वी झाले.

*** काल पाचनई मार्गे येथे पोचून या दोस्तांचे कौतुक केले आणि आणि त्यांना घेऊन रात्री पुण्यात परतलो.

पुण्यातील चमूची येथील चढाई पूर्ण होते न होते तो पर्यंत लोणावळा येथील अजून एक चमू ‘ गिरिविराज ‘ चा कोकण कडा मार्ग चढायला दाखल झाला.

प्रचंड आधुनिक गिर्यारोहण साहित्य, संपर्क, दळणवळण, छायाचित्रण व्यवस्था, भरपूर मदतनीस, तयार खाणे - पिणे - रहाणेची सोय यात सोय बघत रहाणे आणि कोकण कड्याचे गेल्या काही वर्षात निर्माण झालेले गारुड/हवा यात आपण असायला हवे, आपले नाव व्हायला हवे अशी मनोधारणा असणारे अनेक “हवेशीर” बघून जीव दडपला आणि वयाच्या साठीला आलेले अनुभवी, उत्साही गिर्यारोहक मा. अरुण सावंत कौतुक करायला अतिशय सहजतेने आवर्जून उपस्थित राह्यले होते तेव्हा नवीन मंडळींची निसर्ग आणि गिर्यारोहणाबद्दलचा आदरभाव, नम्रता, शिस्त याबद्दलची बेफिकीर वृत्ती जाणवत राहिली.

मात्र या निमित्ताने कोकण कड़ा चढाई चे स्वप्न बघणाऱ्या नव्या-जुन्या आरोहकांना कडक उन, धो-धो पाऊस, गारा, थंडी, मधमाश्या, दगड कोसळणे या नैसर्गिक घटनांचा सामना करावा लागला असेल आणि कोकण कडा “फत्ते”करणे, रूट”मारणे”, “उडवणे”, “नमवणे” हे शब्द वापरणे किती फिजूल आहे, आणि निसर्गापुढे आपण मानव किती क्षुद्र आहोत याचे भान आले असेल.

आपण कितीही आधुनिक उपकरणे वापरली तरी कुठलीही स्पर्धा न करणे, प्रचंड सराव, अनेक दिवस एक एक टप्पा शांतपणे गाठण्याची एकाग्रता, सहचर्य किती आवश्यक आहे हे उमजले असेल तर नवीन मंडळी आता “repeat route” न करता स्वतःचे जीवावर, अभ्यासाने, कष्टाने नवीन चढाई मार्ग शोधून सह्याद्री प्रस्तरारोहण इतिहासात काही उत्तम चढाई मार्गांची नक्की भर घालतील अशी आशा आहे.

या निमित्ताने नवीन पिढी Traditional climbing,Alpine Style climbing,Big wall climbing (???), Sports route – त्यातील फरक, तुलना त्या-त्या कड्यासाठी असणारी त्या प्रकारची उपयुक्तता या बद्दल विचार न करणे, वरवरची आपल्या सोयीने परिभाषा बदलणे, वरील चढाई प्रकाराची गल्लत करते आणि यासाठी जादा वाचन -फारसा अभ्यास न करता कुठेही, कशीही प्रकटते हे प्रकर्षाने जाणवले.

नवीन, प्रथम चढाई मार्ग चढून यशस्वी होण्यासाठी नवीन मंडळींना शुभेच्छा!!!!!

विवेक मराठे
२०१७

Group content visibility: 
Public - accessible to all site users