
************************************************************************************************************************
*************************************************** स्पॉइलर वॉर्निंग *****************************************************
खरंतर या चित्रपटात स्पॉइल होण्यासारखं काही गौप्य नाही.
तरीही, तुम्हाला जर कोर्या पाटीने चित्रपट पाहून स्वतःचं मत बनवायला आवडत असेल तर मग पाहण्याआधी हा धागा वाचू नका.
************************************************************************************************************************
मागे स्लार्टीने मायबोलीवर मार्टिन आउअरच्या एका फार सुंदर जर्मन कवितेबद्दल लिहिलं होतं.
In their language they had no word for love.
They knew seven degrees of devotion,
eleven grades of respect,
twenty levels of acquaintance,
seventeen stages of alliance,
eight variants of dependence,
one expression for marriage
and thirty two terms for mutual advantage.
परवा 'साबर बोंडं' चित्रपट पाहताना मला या कवितेची सरसरून आठवण आली होती.
वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी मुंबईहून गावात आलेल्या आनंदच्या आयुष्यातल्या दहा दिवसांची ही गोष्ट. जी एकच नाट्यमय घटना म्हणायची, ती म्हणजे वडिलांचा मृत्यू. ती घडून गेलेली आहे. चित्रपटाची सुरुवातच त्यांचं शव ताब्यात घेण्याच्या प्रसंगाने होते. आनंद बहुधा फार विचार न करता हाताला लागेल तो टीशर्ट घालून आला आहे. 'काळा शर्ट कशाला घातलास नेमका' असं आई त्याला विचारते, तिला तो 'काळा नाही, राखाडी आहे' म्हणून उडवून लावतो. प्रसंग काय आणि प्रश्न काय - असं त्याला वाटलं असावं. पण ती फक्त चुणूक ठरते. इथे जगण्यावागण्याची घट्ट चाकोरी आहे आणि ती पिढ्यान्पिढ्या कसोशीने पाळली जाते आहे. आता वडिलांचा दहावा होईतो त्याने ल्यायचं काय, खायचं किती, बसायचं कसं, निजायचं कुठे वगैरे सगळे नियम त्याला रीतसर शिकवले जातात. आनंद अजून अविवाहित असल्यामुळे खरंतर त्याने अग्नी देणंही अनेकांना खटकलेलं आहे.
दहनविधी, चटके सोसत राख सावडत अस्थी गोळा करणं, सांत्वनं, दिवा, पिठाचं ताट, सगळं कसं एखाद्या उत्तम वठलेल्या नाट्यप्रयोगाप्रमाणे सुरू आहे. पात्रं नवी, पण संहिता तीच!
पण हळूहळू त्या लिहून दिलेल्या संवादांच्या अधेमधे सुरू असलेल्या दबक्या स्वरांतल्या कुजबुजी आपल्या कानांवर पडायला लागतात. आनंदने तिशीचा झाला तरी लग्न का केलेलं नाही हे कोणी आडून तर कोणी उलटतपासणीच्या सुरात विचारतं. 'काही प्रॉब्लेम असेल तर सांग - ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन काय ते बरं करून घेऊ!' अशी 'ऑफर' दिली जाते. अनोळखीसुद्धा माणसं 'मग तिकडे मुंबईत तुमचा पगार किती' वगैरे सह्ज विचारतात. एकूण पर्सनल स्पेस वगैरे भानगडी इथे अजून शिरलेल्या नाहीत.
आनंदचा जीव अर्थातच या सगळ्यात घुसमटतो आहे. अशात त्याला त्याचा बालमित्र बाळ्या भेटतो - आणि त्याला नितांत आवश्यक झालेली स्पेस त्याला बाळ्याच्या सहवासात सापडते. त्यांचं जुनं मैत्र अगदी नैसर्गिकपणे पुन्हा जुळतं, उमलून येतं. बाळ्याबरोबर त्याच्या बकर्या चरायला नेणं, दूध डेअरीत पोचवायला जाणं, पोहणं, झाडाखाली बसून जिवाभावाच्या गप्पा करणं, सहज आपलेपणाने एकमेकांची काहीतरी छोटीशी हौसमौज आठवणीने पुरवणं, इअरबड्स शेअर करून दोघांनी एकच गाणं (सैराटचं!) ऐकणं, एकमेकांच्या बर्यावाईट मनःस्थितीत नुसती अबोल सोबत करणं, या सगळ्यात सुख गवसायला लागतं. उत्स्फूर्तपणे शारीरिक जवळीकही होते. हे सगळं जितकं अकृत्रिम नैसर्गिकपणे घडतं, तसंच ते आपल्यापर्यंत पोचतं. एका प्रसंगात बाळ्या आनंदसाठी साबर बोंडं पाठवतो - पण नुसती पाठवत नाही, त्याचे काटे काढून, स्वच्छ करून गोड रसाळ फळं तेवढी पाठवतो.
दोन जाणत्या व्यक्तींतली सहवासाची ओढ, सहसंवेदना, परस्परांच्या वाटेतले काटे दूर करण्याची धडपड, सुख देण्याघेण्याची उर्मी, आणि कृतीतून त्याचा उमटणारा सहजोद्गार यांची हा चित्रपट म्हणजे एक सुंदर चित्रकविताच होऊन जातो!
'प्रेम' या चित्रपटभर एकदाही न उच्चारल्या गेलेल्या शब्दाचे अनुनाद अधिक गहिरे होतात ते आनंदच्या आईवडिलांच्या यासंदर्भातल्या भूमिकेमुळे. वडिलांच्या हयातीतच आनंदला आपल्या लैंगिक कलाची जाणीव झालेली होती आणि वडिलांशी त्याचं त्याबाबत बोलणंही झालेलं होतं असा उल्लेख मायलेकांच्या बोलण्यात येतो. वडिलांना वाटतं पत्नीला - आनंदच्या आईला हे नीट कळणार नाही म्हणून ते तिला समजावून सांगू पाहतात, पण तिने ते त्याआधीच जाणलेलं आहे.
'स्वीकार' हा शब्ददेखील विसंवादी वाटावा इतकं सहज हे घडतं. 'ठरवून/प्रयत्नपूर्वक केलेला' स्वीकार नव्हेच हा! तशी आवश्यकताच कुठे आहे?!
आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याशी गुजगोष्टी करणारा, स्वप्नात वडिलांच्या मिठीत शिरणारा आनंद, त्यांचा आनंदच आहे केवळ - त्यात त्याचं वय, उंची, पगार, लैंगिक कल, असले गद्य विषय येतीलच कसे?
ही संवादाची, सहसंवेदनेची भूक ही एक थीम चित्रपटभर जाणवत राहाते. 'गावात/परिसरात इतरही समलिंगी व्यक्ती आहेत, पण अनेकदा ते केवळ घाईघाईत शारीरिक भूक भागवायला भेटतात, कोणी असं सोबत बसून चार शब्द बोलत नाही' असं बाळ्या गप्पांच्या ओघात सांगतो. आनंद सतत सुतकासाठी जमलेल्या लोकांच्या गराड्यात आहे, पण तिथे बव्हतांशी होतात त्या वर म्हटल्याप्रमाणे स्क्रिप्टेड शाब्दिक देवघेवी, संवाद कमीच.
पुढे बाळ्या आनंदबरोबर मु़ंबईला येतो. खोलीत लावायला आनंदने वडिलांचा फोटो आणला आहे. बॅगेतून तो काढताना त्याला एकदम भडभडून येतं.
इतक्या दिवसांत आनंद प्रथम धाय मोकलून रडतो!
कथेच्या अनुषंगाने चित्रपटात भवतालच्या सामाजिक परिस्थितीवर, बदलांवर भाष्य येत राहातं. माळावरचा आता वृक्षतोडीत नाहीसा झालेला जुळा आंबा, 'आधुनिक' रंगरंगोटीमुळे कुरूप दिसू लागलेलं गावातलं देऊळ, पशुवैद्य असणार्या चुलतभावाची पशुवैद्यकच शिकलेली परंतु आता चूल आणि मूल यांतच गुंतवली गेलेली बायको, वडिलांचा एन्लार्ज करायला दिलेला फोटो 'गोरा' करून मिळण्याची सोय, गावातून मुंबईत आल्यावर एकदम संकोचून गेलेलं अवकाश, अशी छोटीमोठी निरीक्षणं जाताजाता ओघात नोंदवली जातात.
या चित्रपटाला पार्श्वसंगीत नाही. अगदी ते इअरबड्स शेअर करून ऐकलेलं गाणंही आपल्याला ऐकू येत नाही.
पात्रांच्या संवादाबरोबरच त्यांची कुजबूज, हुंकार, उसासे, कधी जलद झालेले तर कधी कंठात अडकलेले श्वास मात्र आपल्यापर्यंत नेमके पोचतात आणि आपण त्या चित्राचा एक भाग होवून जातो.
****
मी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला. त्यानंतर दिग्दर्शक रोहन कानवडेबरोबर छोटासा प्रश्नोत्तरांचा सेशनही ठेवला होता - ज्याचं संचालन मीरा नायर यांनी केलं होतं.
चित्रपटाचं ध्वनिसंयोजन, सिनेमॅटोग्राफी याबद्दल रोहनने काहीशी तांत्रिक माहिती दिली. चित्रपट 'रॉ' दिसावा, ग्लॉसी/शार्प इमेज नको म्हणून मुद्दाम अॅन्टिक रशियन लेन्सेस कशा वापरल्या, साऊंड्स कसे जाणीवपूर्वक इन्टिमेट ठेवले इत्यांदींबद्दल तो बोलला. मला सामान्य प्रेक्षक म्हणून बघताना ज्या बाबी सह्जसोप्या वाटल्या होत्या त्यांच्यामागे किती विचार आणि प्रोसेस होती याचा अचंबा वाटला. या चित्रपटाची कल्पना तो स्वतः त्याच्या वडिलांच्या निधनानंतर गावाला गेलेला असतानाच त्याला सुचली होती, मात्र हे त्याचं आत्मकथन नाही.
प्रेक्षकांनी विचारलेले प्रश्न मुख्यतः चित्रपटाशी संबंधित लोकांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रियांबद्दल होते. जिथे शूटिंग झालं, त्या गावकर्यांना हा चित्रपट कशाबद्दल आहे याची कल्पना दिलेली नव्हती, आणि त्यांच्या प्रतिक्रियेची थोडीशी धास्तीही होती असं तो म्हणाला. पण झालं ते उलटंच - त्यांना त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाहीच, पण 'यात काय सिनेमा काढण्यासारखं आहे! हे तर आमचं रोजचं जगणं आहे!' असे अभिप्राय त्यांच्याकडून मिळाले.
रोहनच्या आईवडिलांनी त्याचं क्विअर असणं असंच सहजपणे स्वीकारलं होतं, पण अनेकांना अजूनही घरीदारी अनेक पातळ्यांवर त्यासाठी झगडावं लागतं. अशा कलाकृती कदाचित त्या झगड्यात साहाय्यभूत ठरू शकतील अशी आशा.
चित्रपटाला सनडान्स फेस्टिवलमधील ग्रॅन्ड ज्यूरी अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सनडान्समध्ये अवॉर्ड मिळवणारा हा पहिला मराठीच नव्हे, तर पहिला भारतीय चित्रपट आहे.
जमलं तर मोठ्या स्क्रीनवर, नाहीतर जिथे उपलब्ध असेल तिथे नक्की बघा अशी मी आवर्जून शिफारस करेन.
परिचय आणि सिनेमा दोन्ही आवडले
परिचय आणि सिनेमा दोन्ही आवडले.
आधी शिर्षकाचा अर्थ नीट माहित नव्हता आणि कळल्यावर ते नाव सिनेमाला का दिले असावे हे समजत नव्हते. पण सिनेमा पाहिल्यावर ते शिर्षक अगदी चपखल वाटले. एक तर सहसा कुणाला न आवडणारं असं काही आनंदला आवडतं हे अधोरेखीत करत ते शिर्षक आणि मग असं काही चाकोरीच्या बाहेरचं मिळवण्याकरता समाजाचं काटेरी टरफल उकलावंच लागतं हे पण.
गावातल्या बंदिस्त डबक्यात पोहणार्या बाळ्याला खुल्या समुद्राचे आकर्षण असणे हे प्रतिक पण खूप काही सांगून गेलं.
'गावात/परिसरात इतरही समलिंगी व्यक्ती आहेत, पण अनेकदा ते केवळ घाईघाईत शारीरिक भूक भागवायला भेटतात, कोणी असं सोबत बसून चार शब्द बोलत नाही' >>> हे इथे लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद. कारण चित्रपटात तो संवाद इतक्या पटकन येतो की कदाचीत तो निसटलाही असता. पार्श्वसंगीत नाही, स्टायलाइझ्ड अभिनय नाही त्यामुळे तो अधोरेखीतही नाही होत. आणि तो संवाद निसटता तर चित्रपट तितकासा भिडला नसता.
आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे आनंद आणि त्याच्या पप्पाचं नातं. आईपेक्षा त्याला बाबा जवळचा आहे आणि तो बाबाही कधीतरी चुकणारा सामान्य माणुसचं दाखवला आहे. चित्रपटात सर्रास दिसणार्या त्यागमूर्ती आणि अदर्श आई-मुलाच्या नात्यापेक्षा ते बाप-मुलाचे नाते खूप अस्सल आणि रसरशीत वाटले.
सगळ्यात जास्त आवडला तो आनंदचा रडण्याचा प्रसंग. बहुतांशी पुरुष एकटे असतानाच आपले अश्रू डोळ्याबाहेर येऊ देतात. इथे आनंद एकटा नाहीये, पण त्यामुळेच बाळ्या त्याला किती जवळचा आहे हे सहज आणि खोलवर जाणवते.
Pages