
************************************************************************************************************************
*************************************************** स्पॉइलर वॉर्निंग *****************************************************
खरंतर या चित्रपटात स्पॉइल होण्यासारखं काही गौप्य नाही.
तरीही, तुम्हाला जर कोर्या पाटीने चित्रपट पाहून स्वतःचं मत बनवायला आवडत असेल तर मग पाहण्याआधी हा धागा वाचू नका.
************************************************************************************************************************
मागे स्लार्टीने मायबोलीवर मार्टिन आउअरच्या एका फार सुंदर जर्मन कवितेबद्दल लिहिलं होतं.
In their language they had no word for love.
They knew seven degrees of devotion,
eleven grades of respect,
twenty levels of acquaintance,
seventeen stages of alliance,
eight variants of dependence,
one expression for marriage
and thirty two terms for mutual advantage.
परवा 'साबर बोंडं' चित्रपट पाहताना मला या कवितेची सरसरून आठवण आली होती.
वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी मुंबईहून गावात आलेल्या आनंदच्या आयुष्यातल्या दहा दिवसांची ही गोष्ट. जी एकच नाट्यमय घटना म्हणायची, ती म्हणजे वडिलांचा मृत्यू. ती घडून गेलेली आहे. चित्रपटाची सुरुवातच त्यांचं शव ताब्यात घेण्याच्या प्रसंगाने होते. आनंद बहुधा फार विचार न करता हाताला लागेल तो टीशर्ट घालून आला आहे. 'काळा शर्ट कशाला घातलास नेमका' असं आई त्याला विचारते, तिला तो 'काळा नाही, राखाडी आहे' म्हणून उडवून लावतो. प्रसंग काय आणि प्रश्न काय - असं त्याला वाटलं असावं. पण ती फक्त चुणूक ठरते. इथे जगण्यावागण्याची घट्ट चाकोरी आहे आणि ती पिढ्यान्पिढ्या कसोशीने पाळली जाते आहे. आता वडिलांचा दहावा होईतो त्याने ल्यायचं काय, खायचं किती, बसायचं कसं, निजायचं कुठे वगैरे सगळे नियम त्याला रीतसर शिकवले जातात. आनंद अजून अविवाहित असल्यामुळे खरंतर त्याने अग्नी देणंही अनेकांना खटकलेलं आहे.
दहनविधी, चटके सोसत राख सावडत अस्थी गोळा करणं, सांत्वनं, दिवा, पिठाचं ताट, सगळं कसं एखाद्या उत्तम वठलेल्या नाट्यप्रयोगाप्रमाणे सुरू आहे. पात्रं नवी, पण संहिता तीच!
पण हळूहळू त्या लिहून दिलेल्या संवादांच्या अधेमधे सुरू असलेल्या दबक्या स्वरांतल्या कुजबुजी आपल्या कानांवर पडायला लागतात. आनंदने तिशीचा झाला तरी लग्न का केलेलं नाही हे कोणी आडून तर कोणी उलटतपासणीच्या सुरात विचारतं. 'काही प्रॉब्लेम असेल तर सांग - ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन काय ते बरं करून घेऊ!' अशी 'ऑफर' दिली जाते. अनोळखीसुद्धा माणसं 'मग तिकडे मुंबईत तुमचा पगार किती' वगैरे सह्ज विचारतात. एकूण पर्सनल स्पेस वगैरे भानगडी इथे अजून शिरलेल्या नाहीत.
आनंदचा जीव अर्थातच या सगळ्यात घुसमटतो आहे. अशात त्याला त्याचा बालमित्र बाळ्या भेटतो - आणि त्याला नितांत आवश्यक झालेली स्पेस त्याला बाळ्याच्या सहवासात सापडते. त्यांचं जुनं मैत्र अगदी नैसर्गिकपणे पुन्हा जुळतं, उमलून येतं. बाळ्याबरोबर त्याच्या बकर्या चरायला नेणं, दूध डेअरीत पोचवायला जाणं, पोहणं, झाडाखाली बसून जिवाभावाच्या गप्पा करणं, सहज आपलेपणाने एकमेकांची काहीतरी छोटीशी हौसमौज आठवणीने पुरवणं, इअरबड्स शेअर करून दोघांनी एकच गाणं (सैराटचं!) ऐकणं, एकमेकांच्या बर्यावाईट मनःस्थितीत नुसती अबोल सोबत करणं, या सगळ्यात सुख गवसायला लागतं. उत्स्फूर्तपणे शारीरिक जवळीकही होते. हे सगळं जितकं अकृत्रिम नैसर्गिकपणे घडतं, तसंच ते आपल्यापर्यंत पोचतं. एका प्रसंगात बाळ्या आनंदसाठी साबर बोंडं पाठवतो - पण नुसती पाठवत नाही, त्याचे काटे काढून, स्वच्छ करून गोड रसाळ फळं तेवढी पाठवतो.
दोन जाणत्या व्यक्तींतली सहवासाची ओढ, सहसंवेदना, परस्परांच्या वाटेतले काटे दूर करण्याची धडपड, सुख देण्याघेण्याची उर्मी, आणि कृतीतून त्याचा उमटणारा सहजोद्गार यांची हा चित्रपट म्हणजे एक सुंदर चित्रकविताच होऊन जातो!
'प्रेम' या चित्रपटभर एकदाही न उच्चारल्या गेलेल्या शब्दाचे अनुनाद अधिक गहिरे होतात ते आनंदच्या आईवडिलांच्या यासंदर्भातल्या भूमिकेमुळे. वडिलांच्या हयातीतच आनंदला आपल्या लैंगिक कलाची जाणीव झालेली होती आणि वडिलांशी त्याचं त्याबाबत बोलणंही झालेलं होतं असा उल्लेख मायलेकांच्या बोलण्यात येतो. वडिलांना वाटतं पत्नीला - आनंदच्या आईला हे नीट कळणार नाही म्हणून ते तिला समजावून सांगू पाहतात, पण तिने ते त्याआधीच जाणलेलं आहे.
'स्वीकार' हा शब्ददेखील विसंवादी वाटावा इतकं सहज हे घडतं. 'ठरवून/प्रयत्नपूर्वक केलेला' स्वीकार नव्हेच हा! तशी आवश्यकताच कुठे आहे?!
आईच्या मांडीवर डोकं ठेवून तिच्याशी गुजगोष्टी करणारा, स्वप्नात वडिलांच्या मिठीत शिरणारा आनंद, त्यांचा आनंदच आहे केवळ - त्यात त्याचं वय, उंची, पगार, लैंगिक कल, असले गद्य विषय येतीलच कसे?
ही संवादाची, सहसंवेदनेची भूक ही एक थीम चित्रपटभर जाणवत राहाते. 'गावात/परिसरात इतरही समलिंगी व्यक्ती आहेत, पण अनेकदा ते केवळ घाईघाईत शारीरिक भूक भागवायला भेटतात, कोणी असं सोबत बसून चार शब्द बोलत नाही' असं बाळ्या गप्पांच्या ओघात सांगतो. आनंद सतत सुतकासाठी जमलेल्या लोकांच्या गराड्यात आहे, पण तिथे बव्हतांशी होतात त्या वर म्हटल्याप्रमाणे स्क्रिप्टेड शाब्दिक देवघेवी, संवाद कमीच.
पुढे बाळ्या आनंदबरोबर मु़ंबईला येतो. खोलीत लावायला आनंदने वडिलांचा फोटो आणला आहे. बॅगेतून तो काढताना त्याला एकदम भडभडून येतं.
इतक्या दिवसांत आनंद प्रथम धाय मोकलून रडतो!
कथेच्या अनुषंगाने चित्रपटात भवतालच्या सामाजिक परिस्थितीवर, बदलांवर भाष्य येत राहातं. माळावरचा आता वृक्षतोडीत नाहीसा झालेला जुळा आंबा, 'आधुनिक' रंगरंगोटीमुळे कुरूप दिसू लागलेलं गावातलं देऊळ, पशुवैद्य असणार्या चुलतभावाची पशुवैद्यकच शिकलेली परंतु आता चूल आणि मूल यांतच गुंतवली गेलेली बायको, वडिलांचा एन्लार्ज करायला दिलेला फोटो 'गोरा' करून मिळण्याची सोय, गावातून मुंबईत आल्यावर एकदम संकोचून गेलेलं अवकाश, अशी छोटीमोठी निरीक्षणं जाताजाता ओघात नोंदवली जातात.
या चित्रपटाला पार्श्वसंगीत नाही. अगदी ते इअरबड्स शेअर करून ऐकलेलं गाणंही आपल्याला ऐकू येत नाही.
पात्रांच्या संवादाबरोबरच त्यांची कुजबूज, हुंकार, उसासे, कधी जलद झालेले तर कधी कंठात अडकलेले श्वास मात्र आपल्यापर्यंत नेमके पोचतात आणि आपण त्या चित्राचा एक भाग होवून जातो.
****
मी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला. त्यानंतर दिग्दर्शक रोहन कानवडेबरोबर छोटासा प्रश्नोत्तरांचा सेशनही ठेवला होता - ज्याचं संचालन मीरा नायर यांनी केलं होतं.
चित्रपटाचं ध्वनिसंयोजन, सिनेमॅटोग्राफी याबद्दल रोहनने काहीशी तांत्रिक माहिती दिली. चित्रपट 'रॉ' दिसावा, ग्लॉसी/शार्प इमेज नको म्हणून मुद्दाम अॅन्टिक रशियन लेन्सेस कशा वापरल्या, साऊंड्स कसे जाणीवपूर्वक इन्टिमेट ठेवले इत्यांदींबद्दल तो बोलला. मला सामान्य प्रेक्षक म्हणून बघताना ज्या बाबी सह्जसोप्या वाटल्या होत्या त्यांच्यामागे किती विचार आणि प्रोसेस होती याचा अचंबा वाटला. या चित्रपटाची कल्पना तो स्वतः त्याच्या वडिलांच्या निधनानंतर गावाला गेलेला असतानाच त्याला सुचली होती, मात्र हे त्याचं आत्मकथन नाही.
प्रेक्षकांनी विचारलेले प्रश्न मुख्यतः चित्रपटाशी संबंधित लोकांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रियांबद्दल होते. जिथे शूटिंग झालं, त्या गावकर्यांना हा चित्रपट कशाबद्दल आहे याची कल्पना दिलेली नव्हती, आणि त्यांच्या प्रतिक्रियेची थोडीशी धास्तीही होती असं तो म्हणाला. पण झालं ते उलटंच - त्यांना त्यात काही आक्षेपार्ह वाटलं नाहीच, पण 'यात काय सिनेमा काढण्यासारखं आहे! हे तर आमचं रोजचं जगणं आहे!' असे अभिप्राय त्यांच्याकडून मिळाले.
रोहनच्या आईवडिलांनी त्याचं क्विअर असणं असंच सहजपणे स्वीकारलं होतं, पण अनेकांना अजूनही घरीदारी अनेक पातळ्यांवर त्यासाठी झगडावं लागतं. अशा कलाकृती कदाचित त्या झगड्यात साहाय्यभूत ठरू शकतील अशी आशा.
चित्रपटाला सनडान्स फेस्टिवलमधील ग्रॅन्ड ज्यूरी अवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सनडान्समध्ये अवॉर्ड मिळवणारा हा पहिला मराठीच नव्हे, तर पहिला भारतीय चित्रपट आहे.
जमलं तर मोठ्या स्क्रीनवर, नाहीतर जिथे उपलब्ध असेल तिथे नक्की बघा अशी मी आवर्जून शिफारस करेन.
सुंदर परिचय !
सुंदर परिचय !
अतिशय हृद्य लिहिलं आहेस.
अतिशय हृद्य लिहिलं आहेस.
<'स्वीकार' हा शब्ददेखील विसंवादी वाटावा इतकं सहज हे घडतं. 'ठरवून/प्रयत्नपूर्वक केलेला' स्वीकार नव्हेच हा! तशी आवश्यकताच कुठे आहे?!> हे अगदी भिडलं. यावरून माझ्या आवडत्या Heartstopper मालिकेतला एक प्रसंग आठवला.
मस्त मस्त! थॅंक्स स्वाती..
मस्त मस्त! थॅंक्स स्वाती..
इथे जगण्यावागण्याची घट्ट
इथे जगण्यावागण्याची घट्ट चाकोरी आहे आणि ती पिढ्यान्पिढ्या कसोशीने पाळली जाते आहे. >> ग्यानबाची मेख ! आमच्याइथे थेटरात लागायचे चांसेस कमी आहेत. त्यामुळे सापडेल तिथे पाहीन .
छान ओळख. ओटीटीवर जिथे येईल
छान ओळख. ओटीटीवर जिथे येईल तिथे बघेन.
व्वा, फारच सुंदर परिचय.
व्वा, फारच सुंदर परिचय.
कंगोरे छान उलगडून दाखवलेत. बरंच ऐकून आहे ह्या सेनेमाबद्दल.
अवश्य पाहणार..
अतिशय सुंदर परिचय. जेव्हा/जसा
अतिशय सुंदर परिचय. जेव्हा/जसा बघायला मिळेल तेव्हा/तसा नक्की बघणार.
सुरुवातीची कविताही काय सुंदर आहे!
मस्त परिचय!
मस्त परिचय!
परिचय आवडला.
परिचय आवडला.
मार्टिनच्या हृदयस्पर्शी जर्मन कवितेतील शेवटच्या ओळीत त्याने लिहिलेल्या ३२ चे इंग्रजी भाषांतर करताना ३३ का झाल्येत कळेना!
छान परिचय!
छान परिचय!
चित्रपटाचा विषय ठाऊक होता. पण अजून काही गवसेल असे तुमचे परीक्षण वाचून वाटले.
सहसा आपल्याकडे या विषयावर फिल्मी, उथळ चित्रपट निघतात किंवा जे जेन्युइन असतात तिथेही यांना सहानुभूती द्या, स्वीकारा असा संदेश देणारे असतात. तुम्ही स्वीकारा किंवा नाही पण जे आहे ते असे आहे हे सांगणारा अभावानेच. हा कदाचित तसा असावा.
पण हे समजले नाही,
<<<< यात काय सिनेमा काढण्यासारखं आहे! हे तर आमचं रोजचं जगणं आहे >>>> हे गावकऱ्यांनी समलिंगी संबंधाबद्दल म्हटले का?
छान परिचय!
छान परिचय!
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार!
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार!
अनन्त_यात्री, असं झालंय का! बदलते, धन्यवाद.
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
सनडान्समध्ये अवॉर्ड मिळवणारा हा पहिला मराठीच नव्हे, तर पहिला भारतीय चित्रपट आहे. >>> सिरीयसली? मग भारी अॅचिव्हमेण्ट आहे. आपल्याकडे चित्रपटांच्या पोस्टरवर ज्या पानेफुले असलेल्या महिरपी असतात त्यात सनडान्सवाले एकही नसेल असे वाटले नव्हते
खूप सुंदर परिचय करून दिला
खूप सुंदर परिचय करून दिला आहेस. संधी मिळाली की बघणार नक्की.
चांगला सिनेमा आहे हा. इकडे
चांगला सिनेमा आहे हा. इकडे येऊन गेला थिएटर्समध्ये.
मागे मराठी चित्रपटांच्या धाग्यावर छोटासा अभिप्राय लिहिला होता.
तुम्ही सुंदर लिहिले आहे स्वाती. सिनेमा आवडला होताच, हा रिव्ह्यू पण आवडला.
छान परीचय करून दिलाय
छान परीचय करून दिलाय
बघेन नक्कीच
फार छान लिहिलंय.
फार छान लिहिलंय.
पिच्चर बघायचा होता पण खूप कमी शोज होते. आता ott वरच बघायला मिळेल.साबर बोंडं नाव का आहे हे लेखातून समजले. अश्या विषयांवर तरल चित्रपट फार कमी बनतात त्यातल्यात्यात राजकुमार राव आणि भूमी चा एक चित्रपट आला होता. त्यातही drama जास्त होता पण त्याचा शेवट चांगला होता किमान पॉझिटिव्ह.
सुंदर लिहीलेले आहे. कविता फार
सुंदर लिहीलेले आहे. कविता फार आवडली.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
फार सुंदर लिहिलं आहेस.
फार सुंदर लिहिलं आहेस.
'ठरवून/प्रयत्नपूर्वक केलेला' स्वीकार नव्हेच हा! तशी आवश्यकताच कुठे आहे?! >>> खरोखर, तशी आवश्यकताच नाही.
साबर बोंडं काल नेटफ्लिक्सवर
साबर बोंडं काल नेटफ्लिक्सवर आला. आणि मी काल रात्रीच पाहून
टाकलाघेतला.सुरुवातीच्याच हॉस्पिटलमध्ये शव ताब्यात मिळायची वाट बघण्यापासून ते पुढचे अंत्यविधीचे अनेक प्रसंग पाहताना मी अशा ज्या काही मोजक्या प्रसंगांतून गेलो आहे, ते भरकन मनःचक्षूंसमोर फिरून गेले.
अंत्यविधींच्या धबाडग्यात आणि नातलगांच्या गोतावळ्यात मायलेकाला एकमेकांशी धड बोलायला मिळायलाही काही दिवस जावे लागतात.
आनंदचं स्वतःबद्दल अगदी क्लिअर असणं, शांतपणे पण ठामपणे आपलं म्हणणं मांडणं , कधी चढा स्वर लागला, तर त्याबद्दल नंतर दिलगिरी व्यक्त करणं , इतरांना आपल्या अवकाशात आगंतुकपणे शिरू न देणं हे वेळोवेळी जाणवलं. त्याच्या आईवडिलांनी त्याला सहज समजून घेणं हे किती मोलाचं आहे ते शब्दांत सांगता येणार नाही.
आनंद आणि बाळ्यामधल्या शारीरिक जवळिकीत कसलीही वखवख नाही. एकमेकांच्या दुखर्या भागांवर हळुवार फुंकर मारून त्यावरून अलगद हात फिरवणं आहे.
स्वातीने तांत्रिक मुद्द्यांबद्दल लिहिलं होतं, त्यामुळे कदाचित पहिल्या शॉटपासूनच वातावरणातले आवाज कसे टिपले आहेत त्याकडे लक्ष जात राहिलं. विशेषतः गाईचं दूध काढतानाचं लयबद्ध संगीत. चित्रपटाला पार्श्वसंगीत नाही, हे चित्रपट संपला तेव्हा लक्षात आलं.
या चित्रपटातली शांतताच बोलकी आहे!
आनंद बहुतेक प्रत्येक फ्रेममध्ये आहे. अशी आणखी दोनच उदाहरणं आठवली. हॅरी पॉटर पट आणि बहुतेक ऐ दिल है मुश्किलमध्ये रणबीर कपूरचा अयान
आनंदच्या गावाकडच्या घराच्या तुलनेत मुंबईतलं घर हे रोजगारारासाठी होणारं स्थलांतर आणि शहरीकरणावर काही न बोलता भाष्य करून गेले.
आणखी एक विरोध . गावाकडचा मोकळा परिसर तिथे मन मात्र बंदिस्त. मुंबईचा कोंडलेला परिसर मात्र अॅनॉनिमिटीचं कवच देऊन मनाला अवकाश देतो. इथे कोणी भोचक प्रश्न विचारणार नाही, अनाहूत सल्ले देणार नाही.
लग्नाचा दबाव टाळण्यासाठी समलैंगिक पुरुषाने नोकरी धंद्याच्या निमित्ताने घरापासून, आपल्या लोकांपासून दूर जाणं हा पर्याय शोधणं हे कॉमन म्हणता यावं. त्यासाठी आई वडिलांनी समजून घेतलेलं असो वा नसो, दोघांना एकमेकांपासून दूर राहावं लागावं ही क्वीअर असण्याची आणखी एक शिक्षा. समाजाने स्वीकार केला तरच त्यातून मार्ग निघेल.
चित्रपट कुठेही प्रीची , प्रचारकी, आंदोलनजीवी न होता अगदी सहजपणे हे प्रश्न आपल्यासमोर मांडतो. उत्तरांची दिशा दाखवतो.
क्वीअर व्यक्तींना हा चित्रपट जवळचा वाटेलच. पण ज्यांनी आपल्या आईवडिलां पैकी कुणाला नुक्तचं ( हे नुकतं काही वर्षे मागे असू शकतं) गमावलं आहे, त्यांनाही हा चित्रपट जवळचा वाटेल.
भरत अगदी मोजक्या शब्दात छान
भरत अगदी मोजक्या शब्दात छान लिहिलय
नेटफ्लिक्सवर आला आहे तर आता
नेटफ्लिक्सवर आला आहे तर आता बघता येईल.
अजिंठा एलोरा चित्रपट
अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सवात हा चित्रपट बघायला मिळाला आणि नंतर दिग्दर्शकाशी थोडा वेळ गप्पा मारायला मिळाल्या.
हा चित्रपट बघणं आणि नंतरचा गप्पांचा कार्यक्रम हे दोन्ही खूप सुरेख अनुभव होते.
कॅनडात नाही आलाय
कॅनडात नाही आलाय
नेफ्लिवर पाहिला.
नेफ्लिवर पाहिला.
स्वातीच्या रिव्युशी सहमत. कसलाही अभिनिवेश न आणता विषय मांडलाय. असेही वाटले की बाळ्याच्या आईबाबांनाही संशय आलाय बाळ्याचा आणि बाळ्याच्या तोंडुन सत्य ऐकायच्या आधीच ते त्याला सरळमार्गावर आणु इच्छितात, म्हणुन लग्नासाठी दबाव.
पार्श्वसंगिताची उणिव भासत नाही. आजुबाजुचे आवाज छान पकडलेत.
पण चित्रपट पेनफुली स्लो आहे. महोत्सवात बक्षिसे मिळवणारे सर्वच चित्रपट असेच स्लो असतात. कंटाळा येतो पाहताना. चित्रपट चांगला आहे, आपल्याला पाहायचाय असे स्वतःला समजावत पुढे पुढे पाहायचा.
>>> गावाकडचा मोकळा परिसर तिथे
>>> गावाकडचा मोकळा परिसर तिथे मन मात्र बंदिस्त. मुंबईचा कोंडलेला परिसर मात्र अॅनॉनिमिटीचं कवच देऊन मनाला अवकाश देतो
अगदी!!
>>> असेही वाटले की बाळ्याच्या आईबाबांनाही संशय आलाय बाळ्याचा आणि बाळ्याच्या तोंडुन सत्य ऐकायच्या आधीच ते त्याला सरळमार्गावर आणु इच्छितात
हो, शक्य आहे.
सर्व नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!
नेटफ्लिक्स वर पाहिला स्लो आहे
नेटफ्लिक्स वर पाहिला स्लो आहे पण चांगला आहे. लेखाइतकाच चित्रपट आवडला.आनंद च्या आईची भूमिका फार महत्वाची वाटली मुलाला पूर्णतः नसली तरी बऱ्यापैकी एक्सेप्ट करणारी ,नाहीतर अशा बाबतीत अनेक कहाण्या घरगुती संघर्षाच्या पाहण्यात येतात, जिथे जगापेक्षा घरातूनच सेक्शुअलिटी ला एक्सेप्ट केलं जात नाही किंवा आयुष्य खोट्याने जगावे लागते.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DUf8n_qE4K1/?utm_source=ig_web_copy_link&igs...
Waking up at 4 a.m. in the chilling winters. Car waiting sharp at 5, which would take more than an hour to reach the set, the beloved Kharshinde village.
As a sound intern on Sabar Bonda, a task was given to me by @mandar_designs_sound sir to go to every corner of the village and record the ambience, without moving a single finger or else the recorder would catch that too.
Pages